विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
 
गॅल्वे, प र ग णा- पश्चिम आयर्लंडच्या कॅनाट प्रांतांत असून याच्या उत्तरेस मेयो व रॉस्कोमन, पूर्वेस रॉस्को मन किंग्सचे परगणे व टिपेरारी, दक्षिणेस क्लेअर व गॅल्वे उपसागर आणि पश्चिमेस अटलांटिक महागर आहेत. आयरिश परगण्यांतील कार्कचे खालोखाल गॅल्वे परगण्याचें क्षेत्रफळ सुमारें १४६७८५० एकर आहे. लॉफ कोरिबमुळें या परगण्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन स्वाभाविक विभाग झाले आहेत.पूर्वविभागाचा दक्षिण भाग सुपीक असल्याबद्दल फार प्रसिध्दि आहे. पश्चिमेकडे बालिना, किल व क्लेगन उपसागर आहेत.या परगण्यांत फार थोडया नद्या असून शाननशिवाय सर्व लहान आहेत. लॉफकोरिबचें सरोवर येथील सरोवरांत सर्वांत मोठें असून याच्या पश्चिमेस सुमारें २५ लहान सरोवरें आहेत.लाफरी नांवाचें सरोवर याच नांवाच्या शहराजवळ आहे. हें सरोवराच्या आसपास असलेल्या सृष्टीसौंदर्याच्या देखाव्यानें फार मनोहर दिसतें. येथील किनाऱ्याच्या व अंतर्भागाच्या मनोरम देखाव्यामुळें या परगण्यांत उन्हाळ्यांत बरेच लोक येतात. गॅल्वे क्लिफडेन रेल्वेमुळें पश्चिमेकडील परगण्यांत जाण्याचा मार्ग सुगम झाला आहे. लीलानें रेन्व्हिलेहाऊस लेटर फ्राक, स्टीमस्टॅन, क्लीफडेन आणि कशेल हीं समुद्र कांठचीं आरोग्यकारक स्थानें आहेत. येथील लोकसंख्या (इ. स. १९११) १८२२२४ होती. गॅल्वे (राजधानी टुआय, बलिन्स्लो, लॉघ्रिआ हीं या परगण्यांतील मोठीं शहरें आहेत. या परगण्याचे उत्तर, दिक्षण, पूर्व आणि कॉनेमारा असे चार पार्लमेंटरी विभाग केले आहेत.

१५७९ मध्यें आयलर्डंचा लॉर्ड सर हेनरी सिडने ह्यानें गॅल्वेचा परगणा बनविला. १६९१ मध्यें अघ्रिम येथें आंग्ल राज्यक्रांतीच्या वेळीं लढाई झाली. या परगण्यांत प्राचीन शिलावर्तुळें सांपडतात. यांपैकीं किलमाकडुअघ येथील चांगल्या स्थितींत आहे. जुनी स्मारकेंहि फार आहेत.टुआमपासून सुमारें ६ मैलांवर नाक मॉय येथें सांपडलेले अवशेष फार महत्वाचे आहेत. टुआमचा किल्ला आयर्लंडच्या रॉडरिक ओकोनार राजानें इंग्लिशांच्या स्वारीच्या वेळीं बांधला होता. अरब बेटांवर जुन्या मठांचे अवशेष आहेत.

श ह र.- हें आयर्लंडच्या गॅल्वे परगण्याचें मुख्य शहर, पार्लमेंटरी बरो व बंदर गॅल्वे उपसागराच्या उत्तर किनाऱ्यावर, मिडलान्ड ग्रेट रेल्वेवर आहे. येथील लोकसंख्या (१९०१) १३४२६ लिंचचा महाल म्हणून एक प्रसिध्द इमारत आहे. सेंट निकोलसच्या या देवळांत केव्हरान येथून आणलेली घंटा आहे. सेंट अगस्टाइनचें देऊळ अर्वाचीन आहे. या शहरांत रोमन कॅथोलिक विशप रहातो.लोंकर, शेतकीचे जिन्नस व काळा संगमरवरी दगड हा मुख्य निर्गत माल आहे. येथें लोखंडाचे, दारू गाळण्याचे व कुंच्या व थैल्या तयार करण्याचे कारखाने आहेत. १८८५ पावेतों पार्लमेंटमध्यें दोन प्रतिनिधी निवडून जात होते.आतां फक्त एक प्रतिनिधी जातो. गॅल्वे शहराचे जुनें व नवें शहर असे दोन विभाग असून क्लेडाघ उपनगरांत कोळी लोक रहातात. यांच्या चालीरीती, कायदे, विवाह पद्धति फार विचित्र असून यांच्यांत धर्म व नीतीचें उच्च ध्येय आहे. गॅल्वे शहराच्या आसपासचा देखावा फार सुंदर आहे. रॉसकॉम हें सर्वांत उत्तम व मनोरम स्थान आहे. ओकोनॉर घराणें नामशेष झाल्यानंतर हें शहर डीबरगॉस याच्या हातीं लागलें. पुढें शहराची तटबंदी होऊन येथें बरेच व्यापारी येऊन राहिले व यामुळें व्यापाराच्या दृष्टीनें हें शहर फार प्रसिध्दीस चढलें. दुसऱ्या रिचर्डकडून पुष्कळशा हक्कांची सनद मिळाली. १५४५ मध्यें ह्या बंदराचा अधिकार आरान बेटावर चालावा, आणि ताग व लोंकर ह्याशिवाय कोणताहि माल बाहेर पाठविण्याच्या हक्काची सनद मिळाली. येथें क्रामवेलचे बरेच शिपाई राहिले होते. १६४१ च्या यादवींत हें शहर आयर्लंडतर्फें लढलें व सर चालर्स कूटच्या पार्लमेंटरी सैन्यास शरण आलें. यानंतर येथील जुन्या रहिवाश्यांस येथून काढून देण्यांत आलें. जेम्सच्या (२ रा) राज्यारोहणाच्या वेळीं या लोकांस पूर्वीचे हक्क मिळण्याची जी थोडीबहुत आशा होती ती विल्यम राजा आल्यामुळें पार नाहींशी झाली व जनरल गिंकेलच्या सैन्यानें दिलेल्या वेढयांत पुनः येथील लोकांना शरण जावें लागलें.