विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गहूं- वैदिक काळीं गव्हाचा उल्लेख आलेला आढळतो.(ज्ञानकोश वि. ३ पृ. २९४ पहा.) यास संस्कृतांत गोधूम असें नाव आहे.
इ ति हा सः- गव्हाची लागवड फार प्राचीन काळापासून म्हणजे जगांतील सर्वांत जुन्या भाषा तयार होण्याच्या पूर्वी पासूनच होत असून त्या सर्व भाषांत गव्हाला निरनिराळीं व स्वतंत्र नावें आढळतात; उ. चिनी भाषेंत ''मै'' व हिंब्रूंत 'चिट्टा' अशीं गव्हाला नांवें आहेत. चिनी लोक इ.स.पूर्वी २७०० वर्षे गव्हाची लागवड करीत होते. हिंदुस्थानां तील आर्य लोकांनां वेदकालापासून गव्हाची माहिती होती. कारण गोधूमाचा उल्लेख यजुर्वेद संहिता ब्राह्मण वगैरे ग्रंथांत आढळतो.ईजिप्तमधील दाशूर मनो-याच्या एका विटेंत डंगर नांवाच्या गृहस्थाला गव्हाचे दाणे आढळले होते; व डंगरच्या मतें त्या मनो-याचा काळ इ. स.पू. ३३५९ वर्षे असावा.त्याच्याहि अलीकडचा गहूं स्वित्झर्लंड व इटालीतील कांहीं ठिकाणीं सांपडला होत्या. बायबलांत गव्हाचा निर्देश आहे.बेरोसस नांवाच्या खाल्डियन धर्मोपाध्यायाच्या लिहिण्या वरून मेसापोटेमियांत वन्य अथवा आपोआप होणारा गहूं होता असें दिसतें. व सिंधूच्या खोर्यांतहि तसल्या प्रकारचा गहूं आढळत असे असा समज आहे; परंतु वन्य गहूं आढळल्याचें कोणताहि अर्वाचीन वनस्पतिशास्त्रज्ञ नमूद करून ठेवीत नाहीं ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे.यावरून ज्याला वन्य गहूं म्हणतात, तो व अर्वाचीन गहूं हे एकच नव्हेत एवढें तरी म्हणण्यास हरकत नाहीं.
आशिया, यूरोप, आफ्रिका व अमेरिका या चारहि खंडांत याची लागवड होते. मिसर देशांत नाइल नदीच्या भोंवतालच्या प्रदेशांत उत्तम प्रतीचा गहूं पैदा होतो. तो नाइल नदीला पूर येऊन जो गाळ जमतो त्यांत उत्पन्न होतो. त्या देशांत गव्हाची एक जात आहे तिचें पीक इतकें येतें कीं,एका दाण्यापासून पायली दीड पायली गहूं उत्पन्न होतात.सर्व एकदल धान्यांत गव्हांत पौष्टिकपणा जास्त असतो म्हणून त्यास धान्यराज असें नांव मिळाले आहे.
ग व्हा चे प्र का र व जा ती.- खरीप व रब्बी हे गव्हाचे दोन स्वतंत्र प्रकार आहेत असें माततां येत नाहीं. कारण हवामान व देशमान बदलल्यास अथवा एकाच ठिकाणींहि पेरणी करण्याच्या हंगामाप्रमाणें एका प्रकारचा गहूं दुस-या वेळीं काढतां येतो. उदा. खरीप गहूं दरवर्षी थोडा थोडा उशीर करून अथवा रब्बी गहूं थोडा अगोदर पेरीत गेल्यास, खरीपाचें पीक रब्बीच्या वेळीं, व रब्बीचें खरिपाच्या वेळीं घेतां येतें.
हिंदुस्थानांतून लंडनला पाठविलेल्या गव्हाच्या असंख्य नमुन्यांचें परीक्षण करून डॉ. फोर्बस वॉटसन यानें गव्हाचें पुढीलप्रमाणें वर्गीकरण केलें :- (१) पांढरा मऊ. (२)पांढरा कठिण. (३) तांबडा, मऊ (४) तांबडा कठिण.नरम अथवा मऊ गव्हाला सामान्यतः पिशी गहूं म्हणतात.हे चारी प्रकारचे गहूं थोडयाबहुत प्रमाणांत एकाच ठिकाणीहि आढळतात; परंतु उत्तर हिंदुस्थानांत मुख्यतः पिशी गहूं व दक्षिण हिंदुस्थान आणि बंगालमध्यें कठिण गहूं होती.उत्तम पिशी गव्हाची लागवड मुख्यतः गंगा, सिंधू व नर्मदा या नद्यांच्या वरच्या खोर्यांत होते असें म्हणण्यास हरकत नाहीं. नर्मदेच्या दक्षिणेकडे पिशी गहूं बहुतेक मुळींच आढळत नाहीं. संयुक्त प्रांतांत व बहार आणि तिरहुतच्या कांहीं भागांत पांढरा पिशी व पंजाबांत तांबडा पिशी गहूं पिकतो. दख्खन, वर्हाड व बंगालचा कांहीं भाग यांत कठीण गहूं होतो; मुंबई इलाख्याचा बराच भाग व दक्षिणेस म्हैसूर आणि मद्रासपर्यंतचा प्रदेश यांत होणारा गहूं अतिशय कठीण असतो. त्याला खपली गहूं म्हणतात.
गव्हाचें झाड सुमारें २॥ ते ४ फूट उंच वाढतें. गव्हाच्या एका बुडख्यापासून त्याला अनेक फरगडे फुटतात. व प्रत्येक फरगड्याच्या शेवटीं सुमारें बोटदीड बोट लोंबी येते लोंबींतील दाणे पातळ फोलांत असतात व ते खपले गव्हाखेरीजकरून इतर सर्व जातींत मळणींच्या वेळी सुटतात.
संयुक्तप्रांतांत दौडी गहूं सर्वांत उत्तम समजला जातो.त्या प्रांतांत पांढ-या मऊ व बिनकुसळाच्या गव्हाला मुंडिया म्हणतात. मध्यप्रांतांतील मुख्य गव्हाचे प्रकार म्हणजे पिशी, जलालिया, (हावरा) दौडिया, काठिया व बनसी हे होत. पैकी पहिल्या तीन प्रकारचे पांढरे व मऊ असून दुस-या दोन प्रकारचे तांबडे व कठीण असतात. या सर्व प्रकारच्या गव्हांना सळें असतात.बिनकुसळाच्या गव्हाला पक्ष्यांपासून फार त्रास पोंचतो. म्हणून शेतकरी लोक त्याची लागवड करीत नाहींत.
कठिण अथवा मऊपणा व रंग या प्रमाणें वर्गीकरण करण्यापेक्षां कुसळाचे व बिनकुसळाचे असें वर्गीकरण करणें अधिक बरें असें जी. ए. ग्यामी यांचें मत दिसतें. त्यानें गव्हाचे सहा प्रकार केले आहेत. पैकीं पहिले दोन बिन कुसळाचे असून पांढ-या रंगाचे, कठीण अथवा मऊ असतात तिस-या प्रकारचे म्हणजे काळी कुसळ अथवा बक्षी हे कुसळाचे असून त्याची दाणे कठिण, पांढरे, पिवळे किंवा तांबडे असतात. चौथा पोपटिया गहूं मुख्यतः मुंबई व मध्यप्रांतांत होतो. तो कठीण असून पिंवळ्या किंवा तांबड्या रंगाचा असतो. दाऊदखानी गव्हाचीं कुसळें आंखूड असून दाणा नरम,पांढरा अथवा कठिण असून पांढरा किंवा तांबडा असतो.ग्यामीच्या सहाव्या प्रकारांत निरनिराळ्या प्रकारचे खपली गहूं मोडतात.
गु ण ध र्म व उ प यो गः- भिन्न भिन्न प्रांतांत गव्हाचे निरनिराळे जिन्नस खाण्यांत येतात. गव्हाचें पीठ तीन प्रकारचें असतें. ओलवलेले गहूं दळून चाळल्यावर चाळणीवर जें कणदार पीठ रहातें त्यांतील भुसा अथवा कोंडा काढून टाकला म्हणजे शुभ्र रवा रहातो; चाळणींतून खालीं पडलेल्या बारीक पिठाला मैदा अथवा सपीठ म्हणतात. गहूं नुसते दळल्यास त्या पिठाला कणीक असें नांव देतात. गहूं ओलवल्याशिवाय दळल्यास रवा तांबूस वर्णाचा होतो. निरनिराळ्या प्रकारचीं पक्वान्नें उदाहरणार्थ करंज्या, पु-या,फेण्या, मांडे, घिवर, चिरोटे वगैरे करण्याकरितां साध्या कणकेऐवजी रवा वापरतात. जिलब्या, पुरणाच्या पोळ्या वगैरेंकरितां सपीठ घेतात; व सर्वसाधारणपणे नेहमीं खाण्याच्या पोळ्या अथवा चपात्या कणकेच्या करतात.पंजाबांत कणकेचे रोट करून खातात. हिंदुस्थानांतील ज्या भागांत गंहू खाण्याचा प्रघात आहे तेथें पोळ्या अथवा चपात्या हाच जेवणांतील मुख्य जिन्नस असतो. गव्हाचे पदार्थ नुसतेच म्हणजे तुपाशिवाय खाल्ले असतां पचण्यास जड जातात याकरितां त्यांनां बहुतकरून तूप माखून खातात. कांहीं ठिकाणीं नुसत्या गव्हाची कणीक न करतां दळण्यापूर्वी गव्हांत जव अथवा हरभरा मिसळतात; व यावरूनच गव्हाबरोबर दुसरें मिश्र पीक काढण्याची चाल पडली असावी.मोठमोठ्या शहरांत अलीकडे गव्हाचे पाव व बिस्किटेंहि बरींच होऊं लागलीं आहेत. तांदुळाप्रमाणें
गव्हाची चिकी चुन्यांत मिसळून विशिष्ट प्रकारचें सिमिट तयार करतात. गहू दळण्याकरितां अलीकडे पिठाच्या चक्कया अथवा गिरण्या निघाल्या असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
ग व्हां ती ल भे स ळ.- देशी पद्धतीनें व देशी आउतांनीं तयार केलेला गहूं युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांत होणा-या गव्हाप्रमाणें निर्भेळ नसतो. त्यांत शेंकडा २ पर्यंत माती व इतर भेसळीचे पदार्थ असतात. त्याचप्रमाणें गव्हांत हरभरा, तुर, जव वगैरे धान्येंहि आढळतात. हे सर्व भेसळीचे पदार्थ रहाणार नाहींत अशा रीतीनें गहूं गोळा करून मळण्याची पद्धति निघाली पाहिजे; किंवा हल्लींच्या पद्धतींत बरीच सुधारणा झाली पाहिजे. तरच हिंदी गव्हास चांगला भाव येईल व त्याविषयीं झालेला वाईट ग्रह नाहींसा होईल.
ला ग व ड.- हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांतील भिन्न हवामान व परिस्थितील अनुरूप असे गव्हाचे निरनिराळे प्रकार झाले आहेत. याचे प्रत्यंतर म्हणजे आपण हिंदुस्थानच्या एका टोंकापासून दुस-या टोंकापर्यंत प्रवास केल्यास एकाच ॠतूंत निरनिराळ्या ठिकाणीं गव्हाची लागवड निरनिराळ्या स्थितींत आढळेल. उदाहरणार्थ जूनमध्यें पंजाबांतून निघून दक्षिणेंस यावयास निघाल्यास, उत्तरेकडे शेतकरी लोक सप्टेबरांत पेरणी करण्याकरितां जमिनीची पूर्व मशागत करण्यांत गुंतलेले आढळतील; मध्यभागीं कोकणांतील तयार झालेल्या खपली गव्हाची राखण चालली आहे असें दिसेल व दक्षिणेस म्हैसर व मद्रास इलाख्याच्या कांही भागांत ज्याची कापणी सप्टेंबरांत करावयाची त्या गव्हाची पेरणी चालली असेल (वॉट, अग्रिक. १८९५ नं. ३, ३८). सामान्यतः दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे आर्द्र वातावरण व मळईच्या जमिनी सोडून वर जावें तसतशी गव्हाची लागवड जास्त झालेली दिसते. हिंदुस्थानांतील बहुतेक गव्हाची पेरणी शरदृतूंत होऊन वसंतॠतूंत कापणी होते. म्हणजे बहुतेक पीक रब्बीचें असतें.
उ त्प न्न.- सामान्यतः बीं आक्टोबरांत पेरल्यानंतर ३॥ किंवा ४ महिन्यांत पीक कापणीस येतें. पीक चांगलें असल्यास दर एकरी १० मण (वजनी) उत्पन्न होतें; परंतु पाटाचें पाणी देण्याची सोय असलेल्या जमिनींत मुबलक खत घातल्यास दर एकरीं १५ ते २० मण उत्पन्न होण्यास बहुधा
हरकत नाहीं.गव्हाबरोबर फेरपाळीनें जवस, हरभरा किंवा दुस-या एखाद्या कडधान्याचें पीक घेतात. खाद्य धान्याबरोबर फेर पाळीनें कडधान्याचें पीक काढण्याचें महत्व इकडील लोकांस पूर्णपणें माहीत असून त्याचा ते फायदाहि घेतात.
ग व्हा चे रो ग.- गेरू, गेरवर, जेरू अथवा तांब हा गव्हाचा मुख्य रोग आहे. पाटस्थळाखालच्या जमिनीतील गव्हावर पिकाच्या प्रथमावस्थेंत पाऊस बेसुमार झाल्यास अथवा आकाश आभ्राच्छादित असल्यास किडा पडत असतो (अग्रि. लेजर १८९५, नं. २० मध्यें दोन प्रकारच्या तांबेचें सचित्र वर्णन दिलें आहे). काळी, पिवळी व नारिंगी अशा तीन रंगाची तांब असें बटलर व हेमन यांनी एका लेखांत लिहिलें आहे.गव्हाचा दुसरा रोग म्हणजे काजळी अथवा काणी(स्मट) हा होय. हा रोग पिकास झाल्यास ओंब्यांत दाणा धरत नाहीं; त्यांत नुसती काळी भुकणी आढळते व ओंबीला कुसळ रहात नाहीं. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळें कापणीच्या वेळीं रोगट ओंब्या प्रथम काढून टाकाव्या व नंतर बाकीचें पीक गोळा करावें. नाहींतर पुढील सालीं तें बीं(काजळी लागलेलें) पेरल्यास पुनः रोग उत्पन्न होतो.
ग व्हा चा ची क किं वा स त्व.- गव्हाची कणीक पाण्यांत पुष्कळ वेळ धुतली असतां पाण्यांत न विरघळणारा जो पदार्थ शिल्लक राहतो त्याला सत्व किंवा चीक म्हणतात. हा टणक व चिकट असतो. ओढला असतां तुटत नाहीं. याला चव मुळींच नसते असें म्हटलें तरी चालेल. याचा रंग पिवळसर असून त्यावर थोडी करड्या रंगाची झांक मारते. वाळल्यावर याचें दोन तृतीयांश वजन कमी होतें व तो थोडा ढिसूळ व पारदर्शक होतो. तापविल्यावर फट्फट् असा आवाज करतो.त्याची फुगून लाही होते व नंतर तो जळू लागतो. याचें पृथक्करण केल्यावर यांत शेंकडा ५३ भाग कर्ब (कोळसा), ७ भाग उज्जवायु, १५ ते १८ भाग नत्रवायु, थोडासा प्राणवायु,आणि सरासरी १ भाग गंधक हीं द्रव्यें सांपडतात. बाजरी, राय आणि यांच्या पिठांत हें सत्व नसतें म्हणून त्यांच्या पिठांत गव्हाच्या पिठासारखी चिकणाई नसते. या सत्वाचा उपयोग मधुमेहाच्या रोग्यासाठीं भाकरी, बिस्कुटें वगैरे करण्याकडे करतात; याचा चाकोलेटहि करतात व चहा, काफींत याची भेसळ करतात.