विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे 
     
गाई व म्हशी, गा ई.- सर्व जनावरांत गाय व बैल हे प्राचीन कालापासून माणसाळलेले प्राणी आहेत. आपल्या भरतखंडांतील अतिशय प्रायीन वाङ्मय म्हणजे वेद. यांत निरनिराळ्या ॠचांत निरनिराळ्या प्रसंगाला अनुसरून गाय व तिजपासून होणारें दूध, दहीं, तुप वगैरे जिन्नस यासंबंधानें उल्लेख आले आहेत. गाईच्या मांसाचा उपयोग जरी प्राचीन काळीं होई तरी गोरक्षणाचें महत्वहि प्राचीन काळीं होतेंच. याला अनुलक्षून वेदांत पुष्कळ ॠचा सांपडतात.त्यांपैकी ॠग्वेदांतील एका ॠचेचा भावार्थ पुढें दिला आहे.

"रुद्र-रुद्रपुत्र मरुत- यांची माता, वसूंची दुहिता आणि आदित्यांची भगिनी व अमृतरूप दुधाचें केवल निवासस्थान अशी जी पापरहित गाय तिचा वध करूं नका; असा जाणत्या लोकांनां मी उपदेश करतों'' (ॠ. ८.९०,१५)

वेदकाली संग्रही असणा-या गाईंच्या आधिक्यावरून गृह पतीच्या स्थितींचा अजमास करावयाचा असा प्रघात होता असें मंत्रार्थावरून आढळून येतें.

''हे दिव्य धेनुनों, रोड झालेल्या मनुष्यांस तुम्ही पुष्ट करतां आणि ज्यांच्या तोंडावर अगदीं कळा नाहीं त्यांनां तजेलदार करून सोडतां. तुमचा स्वर मंगलकारक आहे, तर तुम्ही आमचें घर मंगलमय करा. ह्या तुमच्या महान् सामर्थ्याची वाखाणणी लोकसभेंतून सुद्धां होत असतें.''(ॠ. ६.२६,८).

वरील उल्लेखावरून प्राचीनकाळीं गोसंवर्धनाचें महत्वआर्यलाक पूर्णपणें जाणत असत हें सिद्ध होतें. भागवत वगैरे पुराणांत गाईच्या कळपांचीं सुंदर वर्णनें व धार्मिक दृष्टया गाईंचें महत्व दाखविणारीं अनेक वचनें सांपडतात.भागवंतातील दशक स्कंधांत पूर्वार्धांतील तेराव्या अध्यायांत श्रीकृष्णाच्या बालपणाचें वर्णन करतांना श्रीवेदव्यासांनीं फार बहारीचे प्रसंग दिले आहेत व त्यांतील गोपगीतांत गोपाल व गाई यांच्या संबंधानें फार सुंदर काव्य पदोपदीं आढळतें. उदाहरणार्थः-

गावस्ततो गोष्ठमुपेत्य सत्वरं हुंकार घौषैः परिहूत संगतान्।
स्वकान् स्वकान् वत्सतरानपाययन् मुहुर्लिहन्त्य:स्रवदौधसंपय:॥
X X X समेत्स गावोऽधोवत्सान्वत्सवत्योप्यपाययन्।
गिलंत्य इव चांगानि लिहंत्य: स्वौधसंपय:॥

कौटिल्याच्या अर्थशास्त्रांतहि गोरक्षण व संवर्धन यांच्या संबंधीं उल्लेख आलेला आहे. त्यावेळीं या कामाकरितां एक निराळें खातें अस्तित्वांत होतें; त्यावर एक अधिकारी नेमलेला असे. त्याचें काम जनावरांचें वर्गीकरण करून तीं सुस्थितींत आहेत कीं नाहींत व त्यापासून सरकारला होणारें
उत्पन्न बरोबर व योग्यवेळीं मिळतें कीं नाहीं, इत्यादि गोष्टीं संबंधानें देखरेख करणें. अलीकडील सर्व हिंदुराजांस गोब्राह्मण प्रतिपालक ही संज्ञा असे व गाईचें संरक्षण करणें हें आपलें मुख्य कार्यच आहे असें ते समजत व अद्यापहि समजतात.

एवंच इतर देशापेक्षां हिंदुस्थानांत गुरांचें महत्व अधिक आहे. या देशांत आउताचे बैल हें मुख्य शेतकीचें साधन होय. बैल चांगले तर शेती चांगली. बैल आउताला, गाडीला,मोटेला व कित्येक ठिकाणी स्वारीकरतां वर, बसून जाण्यालाहि उपयोगी पडतात. हिंदुस्थानांत गाई मुख्यत्वेंकरून शेतकीला लागणा-या बैलांकरितां पाळितात. गाईचें जें थोडें बहुत दूध निघतें तें घरखर्चास उपयोगी पडतें. गोर्‍हा मोठा झाला म्हणजे तो शेतीच्या कामीं येतो. हिंदुस्थानदेशांतील निरनिराळें हवामान, चा-याचा कमजास्त पुरवठा, निरनिराळ्या प्रकारच्या कमजास्त कसाच्या जमीनी व त्यांवर होणारी निरनिराळ्या प्रकारचीं गवतें व पिकें, या मानानें गाईच्या अनेक जाती आढळतात. त्या जातींत कित्येक पुष्कळ दूध देणा-या, कित्येक कमी पण कसदार दूध देणा-या व कित्येक तर फारच देखण्या आहेत. कित्येकांची प्रजा जड ओझी वाहण्यास, नांगरटीस मजबूत व बळकट असते. कित्येक जास्त काटक व जास्त वर्षे काम देणारी व कित्येकांची अवलाद गाड्या, तांगे वगैरेस घोड्यांप्रमाणें ओढणारी असते. फार पावसाळी भात पिकणा-या भागांत गुरें अगदीं लहान असतात. चांगल्या गुरांच्या जाती उष्ण व समशीतोष्ण भागांतच आढळतात. त्यांपैकीं मुख्य, नेलोरी – मद्रास
ईलाख्यांत, अमृतमहाल- म्हैसूर संस्थानांत, माँटगॉमरी व हांसी- पंजाबांत; सिधी- दक्षिण सिंधप्रांतांत; माळवी – सात- पुड्यांत व मध्यहिंदुस्थानांत;गीर अगर सोरटी- काठेवाडांत; कॉक्रेजी- गुजराथेंत; गौळाऊ- मध्यप्रांतांत; खामगावी – वर्‍हा-डांत; खिलारी- सातपुड्यांत व आठपहाडी महालांत; व कृष्णा-काठी- कर्नाटकांत; अशा जाती आढळतात.

सर्व हिंदुस्थानांत जास्त दूध देणा-या गाईंच्या जाती फक्त पांच आहेत. (१)सिंधी, (२) शहिवाल किंवा माँटगॉमरी(३) हांसी किंवा हिसार, (४) गीर अगर सोरटी,(५) ओंगोल अगर नेलोरी. हिंदुस्थानांत आढळणा-या मुख्य गाईंच्या म्हशींच्या जातींचे वर्णन पुढें दिलें आहे.

माँट गॉमेरा, शहीवाल अगर तेली जातः– ही पंजाब प्रांतांतील उत्तम दुमती जात आहे. या जातींचीं उत्तम गुरें गुंजीबारांत (बार = दोन नद्यांमधील प्रदेश)पैदास होतात. या प्रदेशांत गवत बेताचेंच होत असलें तरी पडीक जमीन मुबलक आहे. पाऊस सरासरी दहाबारा इंच पडतो.या गुरांची पैदास मुसुलमान लोक करतात. साधारणपणें येथील परिस्थिती कराची गाय जेथें पैदा होते तशा तर्‍हेची आहे. या जातीचें कराची गाईशीं पुष्कळ साम्य आहे. या गाईंचा प्रसार चिनाव कॉलनींत लाहोर, मुलतान, अमृतसर वगैरे ठिकाणीं झाला असून शिवाय त्या हिंदुस्थानभर आढळतात.त्या परदेशीहि गेलेल्या आहेत. माँटगॉमेरी जात रंगांत पिंवळी,तांबडी, पांढरट किंवा करडी असते. जनावर लहान, सुबक असून डोकें, शिंगें व कान लहान असतात. मान पातळ असते. जनावर पुठ्ठयाच्या बाजूला जरासें उंच असतें.कांस मोठी असून आंचळांची ठेवण चांगली असते. अंगावरील कातडी पातळ असून केंस तुळतुळीत असतात. गाय रोज सरासरी सोळा पौंड दूध देते. साधारण गाईला शंभर सवाशें रुपये किंमत पडते.

हिसार-हरियाना अगर हांसीः- या जातींतील उत्तम जनावरें गुजराथी व कांक्रेजीसारखीं दिसतात. हीं रंगांत पांढरीं व करडीं असून पंजाबांत रोहटेक, हिसार या जिल्ह्यांत पैदा होतात. या जातीच्या विशेष चांगल्या गाई संपळा व गोहाना तालुक्यांत आढळतात. यांचें तोंड लांब व सुबक दिसतें; कपाळ रुंद उठावदार, डोळे पाणीदार व पोळीला वळकट्या असतात. बैलाचें वशिंड मोठें असतें. एकंदरींत बैल बांधेसूद व मोठा असून तो शिंगानें भव्य दिसतो. जनावर चपळ व ताकदवान असतें. या जातीच्या गाई पुठ्ठयाकडे उंच असून खांद्याकडे उतरत्या असतात. कांस मोठी असून आंचळ आकारांत मध्यम असल्यामुळें दूध काढण्यास सोपें जातें व दूधहि पुष्कळ निघतें. या गाई मिळण्याचीं ठिकाणें पंजाबांत हिंसार, भिवानी, शिरसा व जहाजगड हीं होत. येथें दरवर्षी मोठ्या यात्रा भरतात. जनावराची उंची साधारणपणें ५२ इंच असून छातीचा घेर सुमारें ८० इंच असतो. पुढच्या पायाची नळी ७ इंच असते. हिसार येथील पैदाशीच्या गोशाळेंतून उत्पत्तीसाठीं बियाणू व मिलिटरी खात्यासाठीं मोठमोठ्या गाडया ओढण्यास बैल पुरविले जातात.

नागोरीः- या जातीचे मूलस्थान व राजपुतान्याच्या पश्चिमेस असलेला नागोरा प्रांत होय. या जातींतील गुरांचा रंग पांढरा, तोंड सरळ, कपाळ रुंद, डोळे पाणीदार, मान लांब व बारीक व कान मोठे असून लोंबते असतात. एकंदरींत जनावरें उंच व चपळ असतात. या जातींच्या गाई पुष्कर, हिसार, हांसी व बालोत्रा येथील वार्षिक यात्रेंत मिळतात. गाईची कांस मोठी असून त्या रोज सुमारें २० पौंड(१० शेर)पर्यंत दूध देतात. या जनावराची उंची सुमारें ५२ इंच असते. पुढच्या पायाची नळी ७ इंच असते.

मेवार, मथुरा अगर कोशी.- या जातीचें मुख्य उत्पत्ति स्थान मेवार होय. हा प्रदेश, कोशी तालुक्याचा कांही भाग, पंजाबांतील गुरगांवपैकीं कांही भाग, भरतपूर व अलबार संस्थानचा कांहीं भाग मिळून झालेला आहे. या जातीच्या गाई रंगांत पांढ-या अगर करड्या असून चेहे-याची लांबी हिसार जातीहून कमी असते. डोळे पाणीदार असून कान मोठे व लोंबते असतात. या गाई रोज १०-१६ पौंड दूध देतात. या गाई मथुरा जिल्ह्यांतील कोशीच्या यात्रेंत विकत मिळतात. बैल आकारानें मध्यम असून कामाला चांगले असतात. यांची उंची सुमारें ४९ इंच व छातीचा घेर ६२इंच असतो.

खेरी.- ही जात खेरीगड, पर्‍हेर, मांजरा या ठिकाणीं पैदा होते. या जातीचे बैल कामाला चांगले असतात पण खादाड असतात. या जातीस वळण लावण्यास अगर शिकविण्यास कठिण जातें. गाई फारसें दूध देत नाहींत.

पिंलीवीट (पनया):- ही जात पुरानपूर जिल्ह्यामध्यें पैदा होते. बैल कामाला फार चांगले असतात. गाई फारसें दूध देत नाहींत.

कनवारिया.- ही जात बुंदेलखंडांत पैदा होते. बैल कामाला चांगले असतात. गाई फारसें दूध देत नाहींत.

नेल्लोर (ओंगोल):- या जातीची उत्पत्ति मद्रास इलाख्यांतील नेल्लोर, कृष्णा व गंतूर जिल्ह्यांत होते. जनावरांची दुधाविषयीं व कामकरी बैलांविषयीं प्रसिद्धि आहे. हें जनावर उंच असून दिसण्यांत सुंदर दिसतें. या जातीचीं जनावरें काहींशी कृष्णातीरच्या जनावरांसारखीं दिसतात. दोघांचें मूळ एकच असावें असें दिसतें. मध्यप्रांतांतील आवीं जात आकारांत, बांध्यांत व रंगांत नेल्लोरसारखींच दिसते, पण या जातीच्या गाई फारसें दूध देत नाहींत. नेल्लोर जातीच्या गाई हिंदुस्थानांतील मुख्य दुभत्या जनावरांत गणल्या जातात. या गाई स्वभावानें गरीब असून त्या १४ ते २५ पौंडपर्यंत दूध देतात. बैल फार चपळ नाहींत व फार लठ्ठहि नाहींत. ते शेतकीच्या सर्व कामीं उपयोगी पडतात. नेल्लोर जातींत रंग पांढरा, करडा व केव्हां केव्हां पिंगटहि असतो. चेहरा आंखूड, कपाळ रुंद, जबडा मोठा व डोळे पाणीदार असतात. मान जाड व आंखूड असून पोळी व बेंबट फार वाढलेलें असतें. शिंगें आंखूड व खुरटलेलीं असतात. जनावर पायांत नरम असून दगडाळ किंवा रेंवट जमिनींत व खडीच्या रस्त्यावर याचे पाय लवकर उभळतात, परंतु काळ्या व खोल जमिनी नांगरण्यास हे बैल फार उपयोगी आहेत. साधारण गाईची किंमत ८० ते १५० रुपयेपर्यंत पडते. उत्तम गाईला २०० रुपये पडतात. साध्या बैलांच्या जोडीला १२५ ते १५० रुपये पडत असून जोडीची किंमत ३५० रुपये पर्यंत असते.

कांगायम.- ही जात दक्षिण कोइमतून जिल्ह्यामध्यें पैदा होते. या भागांतील शेतकरी आपल्या शेताचा एक भाग करण्याकरितां वेगळा राखून ठेवितात. गवत लहान असतांना आंत गुरें सोडीत नाहींत. ते खाण्याजोगें उंच झालें म्हणजे शेताचे भाग करून ते थोडे थोडे चारतात. या जातीची गुरें मद्रास इलाख्यांत बरींच आढळतात. जनावर आकारांत मध्यम व बांध्यांत मजबूत असून स्वभावानें फारसें तापट नसतें. ही जात शेतीच्या सर्व कामाला फार उपयोगी आहे. या जातींतील गाई दुभत्या नसतील तेव्हां नांगरास लावण्याची तिकडे चाल आहे. यांचीं उंची सुमारें ५२ इंच असते. जोडीची किंमत १०० ते १५० रुपये पर्यंत असते.

सिलोनी गुरें:- सीलोनमध्यें दोन जातींचीं गुरे आढळतात. एक गांवठी व दुसरी समुद्रकिनारी. समुद्रकिनारी जात म्हैसुराकडून आलेली आहे. गांवठी जात एडनसारखी आकारांत लहान असून ती दिसण्यांत सुरेख दिसते. या गुरांचें डोकें लांबट असून कान लहान असतात. शिंगें आखूड, जाड व खुरटीं असतात. पाय आंखूड व खूर काळे असतात. हीं गुरें साधारणपणें विलायती गुरांसारखीं दिसतात. बैल चपळ व काटक असतात. गाई फारसें दूध देत नाहींत. उंची ४१ इंचापर्यंत असते. सिलोनांत गुरें डागण्याची फार चाल आहे. गेल्या दहा वीस वर्षांत सिलोनांत दुभत्याकरितां कराचीहून ब-याच सिंधी गाई नेलेल्या आहेत.

लाखाभोंडा. (लाखाम्हणजे तांबडी. भांडा म्हणजे तोंडावर पांढरी)- या जातीचें उत्पत्तिस्थान तेलंगणात आहे, म्हणून तिला तेलंगी असेंहि म्हणतात. वर्‍हाडांत या जातीचीं जीं जनावरें आहेत तीं बहुतकरून निजामच्या राज्यांतून आणलेलीं आहेत. तथापि त्यांचीं पैदास यवतमाळ जिल्ह्यांतील केळापूर व वणी तालुक्यांत बरींच होते. याचें डोकें उठावदार असून चेहेरा थोडासा आंखूड व अरुंद असतो. शिंगें व कान आंखूड असतात. या जनावरांचें हाड कणखर असून त्यांची मागची बाजू मजबूत असते. मागील धड पुढील भागापेक्षां थोडेंसें उंच असतें हें यांच्यांत एक विशेष लक्षण आहे. उंची सुमारें ४२ ते ५० इंच असते. एकंदरींत जनावर कणखर असून शेतीच्या फार उपयोगी पडतें. साधारण जोडीला सुमारें १२५ ते १७५ रुपये किंमत पडते.

खुरगांवः- खुरगांव म्हणून होळकरांच्या संस्थानांत एक जिल्हा आहे. या जातीच्या जनावरांचें हें उत्पत्तिस्थान असल्यामुळें तिला हें नांव मिळालें आहे. हीं जात इंदूर, चमहाल व नर्मदा नदीच्या उत्तर भागात दृष्टीस पडते. या जातीचीं जनावरें नेमाडी गुरांपेक्षां सावकाश पण अवजड काम करण्यास अधिक उपयोगी पडतात. या जातीच्या नावरांच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे ठिपके अगर पट्टे असतात व ती निमाडीपेक्षां आकारानें मोठीं असतात. त्यांची उंची वशिंडामागे सुमारें ५० ते ६० इंच असून छातीचा घेर सुमारें ७० इंच असतो. उत्तम जोडीला १५० ते ३०० रुपये किंमत पडते; पण साधारण बैल ६० रुपये पर्यंत विकत मिळतो.

सांकरा:- या जातीचीं जनावरें सिवणी, छिंदवाड, याच्या उत्तरेकडील प्रदेशांत मंडला, जबलपूर व दमोह या जिल्ह्यांत पैदा होतात. हीं जनावरें माळवीच्या खालोखाल असून चपळ असतात. हीं आकारानें लहान असल्यामुळें त्यांनां खावयास कमी पुरतें व तीं हलक्या जमिनी नांगरण्याच्या कामीं उपयोगी पडतात. यांची वशिंडागागें उंची सुमारें ४० इंच असून छातीचा घेर सुमारें ६३ इंच असतो. एकंदरींत सांकरा जात माळवीप्रमाणेंच असून ती आकारानें मात्र लहान असते.

शेरी अगर खैराटः- हीं जात राजपुतान्यांतील शिरोही संस्थानांत पैदा होते व अबूच्या पहाडाच्या आसपास पुष्कळ आढळते. ही माळवीसारखीच पण थोडी उंच असून शिंगांची ठेवण वेगळ्या प्रकारची असते. हिचीं शिंगें एकावर एक दोन वळसे घेऊन उंच होत जातात.

माळवी.- या जातीची खरी पैदास हुशंगाबादच्या उत्तरेस व सागरच्या पश्चिमेच्या प्रदेशांत म्हणजे मध्यहिंदुस्थानांत होते. यांचें मुख्य वसतिस्थान होळकर व शिंदे यांचें राज्य व कांहीं अंशीं पंचमहाल होय. यांची पैदास गवळी,अंजनी, खाटीज, सेंडाज या जातींचे लोक करतात. माळवी जातींची गुरें शेतकीच्या कामीं फारच उपयोगी पडतात तीं कष्टाळू, स्वभावानें गरीब व गवळाऊ एवढीं मोठीं नसली तरी सुटसुटीत व सुदृढ असतात. या जातीचा प्रसार दक्षिणगुजराथ, खानदेश, देश व नर्मदेच्या कांठचा सपाट प्रदेश व वर्‍हाड प्रांत यांत मोठ्या प्रमाणांत झाला आहे. या जातींचीं गुरें रंगानें पांढरी करडीं, आकारानें मध्यम, मजबूत व वाटोळ्या आंगलोटाचीं आणि मध्यम उंचीचीं असतात. चेहेरा आंखूड व नाकाचा भाग किंचित् वर उचललेला असतो. डोकें थोडें खोलगट असतें. शिंगें वर जाऊन व पुढें येऊन कमानदार होतात. एकंदरींत जनावर रुंदट असून लांबला कमी असतें. पाय सुबक असून खूर काळे कणखर असतात. उंची सुमारें ५४ इंच असून छातीचा घेर सुमारें ७० इंच असतो. गाई दूध कमी देतात व त्यांचीं तीन वर्षांत दोन वेतें होतात.

उं ब र डा (डिग्रजा) जात.- मूर्तिजापूर जिल्ह्यांत उंबरडा म्हणून एक गांव आहे, हें गांव या जातीच्या गुरांचे मूलस्थान होय. हल्लीं हीं गुरें यवतमाळ, उमरावती, व अकोला या जिल्ह्यांत फार आढळतात. या जातींत दोन रंगाचीं गुरें आढळतात. कांहीं पांढरीं कांहीं तांबडीं आणि कित्येकांत या दोन्हीं रंगाचें मिश्रण असतें. या जातीचे बैल मध्यम आकाराचे असून त्यांच्या शरिराचा बांधा सुदृढ असतो. चेहेरा सुबक, कपाळ रुंद व किंचित् उठावदार असतें. जबडा रुंद व काळसर रंगाचा असून नाकपुडया मोठ्या असतात. मान आंखूड व जाड असून गळ्याखालची पोळी फारशी वाढलेली नसते. शिंगें मध्यम आकाराचीं असतात. पाठ सरळ असून जनावर एकंदरींत सुबक, मजबूत, चपळ रांकट असतें. या जातीचे बैल सवारीच्या गाडीला रोज ३० ते ४० मैलपर्यंत प्रवास करूं शकतात. साधारण जोडीला १२५ ते २०० रुपये पडतात.

गवळाऊ(अरव्ही)जातः- ही जात नागपूर वर्धा जिल्ह्यांच्या उत्तरभागांत व शिवणी जिल्ह्याच्या दक्षिण भागांत पैदा होते. अस्सल जातीचीं गुरें नागपूर जिल्ह्यांत जेतपूर, रामटेक व सावसर येथें दृष्टीस पडतात. या जातीचा रंग बहुतकरून पांढरा असून शिंगें वर येऊन मागील बाजूस वांकलेलीं असतात. चेहेरा लांबट व डोकें उठावदार असतें. शरीर हलकें, कमरेंत साधारण कमजोर, पुठ्ठा जरा उतरता असून जनावर उंच व पायांत मजबूत असतें. ही जात चपळ असून पळण्यांत चांगली असते. कित्येक वेळीं ते एका दिवसांत ५० मैलपर्यंत मजल मारतात वशिंडामागें उंची सुमारें ५ फूट असून छातीचा घेर सुमारें ७५ इंच असतो. साधारण जोडीची किंमत २०० ते ४०० रुपयेंपर्यंत असते. या जातीच्या गाई चांगले खावयास घातलें तर ४ ते ८ शेरांपर्यंत दूध देतात.

मेळघांट जातः- वर्‍हाडांत अतिसर्वांत लहान जातीचीं गुरें मेलघांट अथवा पहाडी हीं होत. या जातीचें बैल काटक व चपळ असून पहाडी मुलुखांत फार उपयोगी आहेत. यांत अनेक रंग असतात, पण मुख्य तांबडा-पांढरा, काळा-पांढरा व दोन्ही मिश्रित हे होत. यांचें कपाळ सपाट असून मध्यें उभंट खांच असते. पोळी गळ्याबरोबर असते. पुठ्ठयाकडचा भाग चिंचोळा असतो. एकंदरींत बांधा मजबूत असून जनावर गुटगुटीत दिसतें. हे बैल मोठ्या बैलांपेक्षां गरीब लोकांस सोईचे पडतात. साधारण जोडीची किंमत शंभरपासून दीडशें रुपयेपर्यंत असते.

खामगांव जात.- ही जात पश्चिम वर्‍हाडांत बुलढाणा जिल्ह्यांत पैदा होते व खामगांव बाजारांत विकली जाते. त्यावरून या गुरांस हें नांव पडलें. हीं अस्सल जात उंद्री जवळच्या भागांत पैदा होते. या जातीचे बैल पूर्वी लढाईचे सामान वहाण्यास व तोफा ओढण्यास उपयोगी पडत असत. हल्लीं निजामच्या राज्यांत यांचा उपयोग तोफा ओढण्याकडे करतात. या जातीचे उत्तम बैल बुलढाणा जिल्ह्यांतील खामगांव, मलकापूर आणि जळगांव ह्या तालुक्यांत जेथें उत्तमप्रतीच्या जमीनी आहेत तेथें आढळतात व त्यांचा भारी जमिनी नांगरण्याच्या कामीं उपयोग होतो. या जातीचा बैल मोठा, मजबूत व लांबट असून मिश्रित रंगाचा असतो. त्याच्या अंगावर तांबड्या रंगाचे ठिपके असतात; खूर, जबडा,शिंगें व कानाच्या आंतील भाग भुरकट लाल रंगाचे असतात. शिंगें लांबीला मध्यम असून बुडाजवळ जाड असतात. डोकें रुंद व थोडें उंच असून वशिंड बरेंच वाढलेलें असतें. गळ्याच्या खालील पोळी व बेंबट हीं दोन्हीं लोंबतीं असतात. चांगल्या बैलाची उंची वशिंडाच्या मागें सुमारें ५२ इंचांपर्यंत असते. डोक्यापासून शेपटीपर्यंत लांबी ६ फूट असून शरीराचा परिघहि जवळ जवळ तितकाच असतो. एकंदरींत जनावर मजबूत व दमदार असतें व त्याचा उपयोग विशेषतः नांगर ओढण्याच्या कामीं होतो. पण वर्‍हाडांतील लहान जातीच्या बैलापेक्षां पळण्याच्या कामांत ही जाती कमी असते. यांचे खूर नरम असल्यामुळें  पक्कया सडकेवर ते लवकर झिजतात. साधारण जोडीला १५० ते २५० रुपये किंमत पडते व उत्तम जोडीला ३०० ते ३५० रुपयेपर्यंतहि किंमत येते. या जातीच्या गाई फारसें दूध देत नाहींत; दररोज सरासरी २-४ शेरपर्यंत दूध निघतें.

बैतुल जातः- ही जात माळवी आणि खामगांवी या जातींपासून उत्पन्न झालेली मिश्र जात आहे. या जातीचें जनावर फारच चपळ असतें. सामान्यतः माळावरील व डोंगरावरील जनावरें लहान असतात. यांची उंची सुमारें ४० इंच व छातीचा घेर सुमारें ५५ इंच असतो.  कृष्णातीरी (सोरटी अगर देसुरी):- या जातीची पैदास कृष्णा व तिला मिळणा-या मोठ्या नद्या यांच्या कांठीं होते. कृष्णाकांठ कर्‍हाडजवळ सुरू होऊन मिरड, सांगली, कुरुंदवाडवरून पुढें बेळगांव जिल्ह्यांत शिरतो. या जातीच्या उत्तम गुरांची पैदास भिलवडी, दुधगांव, डिग्रज, सांगली, कर्नाळ, अंकली, यडूर, मांजरी, कागवाड आणि सत्ती सवदी येथें होते. पैदास करणारे लोक गुरांची फार काळजी घेतात. खोंडांना मक्याचीं कणसें व भोपळें चारतात व कित्येक तर आवडत्या गुरांना तूप सुद्धां पाजतात. या जातींत गुरांचा रंग मुख्यत्वेंकरून पांढरा असतो. तथापि ही जात निर्भेळ नसल्यानें केव्हां केव्हां तींत काळे, तांबडें, करडे. पट्टयाचे असे सर्व रंग आढळतात. या जातींत कपाळ मोठें चेहेरा लांबट व मांसल, शिंगें मध्यम व खुरटलेलीं, कान मोठे व लोंबते, मान व आंखूड, जाड व मांसल, पोळी मोठी व सुरकुतलेली व पोटाखालील कातडी लोंबती असते. एकदंरींत सर्व जनावरांचा आंगलट लांब, जाडा व मोठा असून जनावर मोठें, उंच व भव्य दिसतें. जनावर बळकट असून चपळाईत जरा कमी असल्यामुळें नांगरटीला व ओझे वहाण्याला तें फारच योग्य असतें. या जातीच्या गाई नदीकांठी चारा व पाणी मुबलक मिळत असल्यामुळें साधारणपणें सिंधी किंवा कांक्रेजीप्रमाणें दूध देतात.

सोरटी (सांगलीकडील):- या जातीचें जनावर स्थूल व भारदस्त दिसतें. यांच्या अंगीं चपळपणा कमी असून काटकपणा मुळींच नसतो. यांचा बांधा ढिला असतो, रंग तांबडा, गवळा अगर काळा असून शिंगे दिवटीं व लहान असतात. यांचें कपाळ पसरट व उठावरदार असतें. या जातीच्या गाईस दूध बरेंच असते. कृष्णातीरी या जातीची गुरें अमेरिका व फिलीपाईन बेटापावेतों गेलीं आहेत.

देशी (डेक्कन):- डेक्कनी ही जात निव्वळ अशी महाराष्ट्रांत नाहींशी झाली आहे. देशी जनावरें हे एक अठरा धान्यांचें कडेबाळें बनलें आहे. याला अनेक कारणें आहेत; त्यांपैकीं वेळेवर पाऊस न पडणें व वरचेवर दुष्काळ पडणें हीं मुख्य होत. पावसाच्या अनिश्चितपणामुळें गुरांच्या खाण्यापिण्याचे फार हाल होतात. एखाद्या वर्षी भरपूर चारा व दुस-या वर्षी कांहींच नाहीं अशा परिस्थितीमुळें, महाराष्ट्रांत माळव्यांतुन माळवी, खिल्लारी व इतर ठिकाणांहून बैल येत असल्यामुळें भेसळ होऊन 'डेक्कनी' निर्भेळ जातीचा लोप झालेला आहे. याकरितां हल्लीं जी डेक्कनी जात म्हणून म्हटली जाते ती लहान, आंखूड, बांधेसूद, चपळ व कणखर अशी असते. पाय लहान असून खुरांत मजबूत असे असतात. बैल हलक्या वाहतुकीला, नांगराला व पळण्याला योग्य असतात. अपु-या व मिळेल तसल्या चा-यावर राहणारी देशाला योग् अशी ही जात बनली आहे. ही जात साधारणपणें खोडकर, हट्टी व शिकविण्यास जरा कठिण अशी आहे. या जातींतील गाई म्हणण्यासारखें दूध देत नाहींत.

कोंकणीः- ही जात डेक्कनी सारखीच असून आंगलोटांत लहान असते. यांत काळे, पांढरे, लाल व पिंवळे वगैरे बरेच रंग आढळतात. या जातीची शेंपटी जमिनीवर लोळण्याइतकी लांब असून शेंपटीच्या शेवटीं केंसांचा झुपका असतो. कोंकणांत जनावराचें हें शेंपटीचें लक्षण फार उत्तम असें मानलें जातें. घाटांवरून जे बैल गाडी वगैरेंना खालीं कोंकणांत जातात त्यांची शेपटी मागील पायांच्या ढोंपरपर्यंतच असतें. अशीं जनावरें कुंभारली व आंबे घाटानें गाडीस जोडून व मळ्या व कुंडी घांटानें गोणीला घालून खालीं कोंकणांत येतात.

डांगी अगर डोंगरी- या जातीची पैदास नाशिक, अहमदनगर व ठाणें जिल्ह्यांतील मावळी भागांत होते. या जातीची गुरें डेक्कनी गुरांपेक्षां थोडीशीं मोठीं असतात.मानेखालची पोळी व बेंबटाजवळील कातडी फार वाढलेली असते. अंगावर काळे, पांढरे ठिपके असतात. बैल कामाला मजबूत असतात पण चपळ नसतात. गाई फार करून दुधाळ नसतात.

सोनखेरीः- ही जात नाशिक जिल्ह्यांतील सटाणा व खानदेशांतील साकरी पिंपळनेर या भागांत पैदा होते. हिचा रंग तांबडा अगर पिंवळट असून हिच्या सर्वांगावर पांढरे ठिपके असतात, त्यांच्या डोळ्याच्या पापण्या व जबडा यांचा रंग मांसाच्या रंगासारखा असतो. ही जात शेतकामाला बरी असते व या जातीच्या गाई दूध बरें देतात.

खिलारी (माणदेशी):- या जातीच्या गुरांची पैदास होळकर राज्यांत सातपुडा पर्वतांत, औंधसंस्थानांतील आठ पाडी महालांत, माण व खानापूर (सातारा) व त्याचप्रमाणें सोलापूर जिल्ह्यांतील कांहीं भागांत व जमखिंडी, मुधोळ, जत आणि सांगली संस्थानांत होते. या जातींत म्हैसुरी जातीची भेसळ झाली असल्या कारणानें तिचें म्हैसुराशीं बरेंच साम्य आहे. हीं गुरें लवकर माणसाळत नाहींत. याचें डोकें, शिंगें व डोळे हीं विशेष प्रकारचीं असतात. चेहेरा लांबट असून कपाळ जरा वर उचल्यासारखें असतें. चेहरा डोळ्यांपासून जबड्यापर्यंत खोलगट असतो. शिंगें सुरवातीला जवळ निघून पुढें जरा मागें व उंच जाऊन त्यांची टोंकें कमानी सारखीं पुढें आलेलीं असतात. डोळे लाल, पाणीदार व रागीट दिसतात. यांचा जबडा, पायांचे खूर व डोळ्यांच्या पापण्या गाजरी रंगाच्या असतात. एकंदरींत ही जात रंगांत पांढरी, जागोजाग पिंवळट झांक मारणारी, मान आंखूड व भरलेली, उंचीला मध्यम पण डेक्कनीपेक्षां मोठी, लांबट व बांधेसूद असून गाडीच्या कामाला फार उत्तम असते. यांचा शेतकीकडे साधारणपणें सर्व कामांस उपयोग होतो. या जातीचा स्वभाव तापट व रागीट असतो. गाईहि आकारानें लहान असून चपळ व मारकट असतात. त्या दूध फारसें देत नाहींत. यांचीं शिंगें बैलांपेक्षां लांब व अणकुचीदार असतात. सांतपुडयांतील खिलारी बैल जास्त चपळ व रंगानें पांढरे असतात. यांच्या गळ्याखालची पोळी फारशी वाढलेली नसते. या जातीचे बैल चपळ असल्यामुळें नांगरटीच्या कामाला लवकर थकतात.

म्हैसुरी- या जातीची पैदास म्हैसुरांत व भोंवतालच्या प्रदेशांत होते. हींत पुष्कळ प्रकार आढळतात. त्यापैंकी महत्वाची जात म्हटली म्हणजे म्हैसुरांतील अमृतमहाल खात्यांत ठेविलेल्या गाईंपासून पैदास होते ती होय. ही पैदास हैदर व टिपूट सुलतान यांच्या अमदानीपासून व्यवस्थित रीतीनें चाललेली आहे. या जातींत दुस-या रक्ताची भेसळ नसल्यामुळें गुरें रंगांत व बांध्यांत एकसारखींच असतात. त्यांची पैदास बहुतेक अर्धवट रानटी स्थितींत असल्यासारखी आहे.

अमृतमहाल खात्यांत शंभर गाईंचा एक कळप केलेला असतो. एका कळपांत बहुतकरून सारख्याच वयाच्या गाई असतात. हे कळप एका कुरणांतील चारा संपला  म्हणजे स-या कुरणांत नेतात. थंड भागांतील कुरणे उन्हाळ्यांत चारण्यासाठीं राखून ठेवतात. कळपांतील गुरांना बांधीत नाहींत, पण कुरणांतील गवत कमी पडल्यास सांठवून ठेवलेल्या गवताचा उपयोग करितात. यांस दाणा कधींच देत नाहींत. एका कळपाबरोबर दोन बियाणू असतात. आपआपसांतील वीण टाळण्यासाठीं हे बियाणू एका कळपांतून दुस-या कळपांत बदलतात. बियाणूखेरीज सर्व गोर्‍हे दोन महिन्यांच्या आंत खच्ची करतात. या जातीच्या कालवडी लवकर वयांत येत नाहींत. गाई फारसें दूध देत नाहीत. गाय आटेपर्यंत सर्व दूध वासरें पितात म्हणून ती चांगली पोसतात. अमृतमहाल गुरें आकारांत सारखी असून त्यांची हाडें ओबडधोबड अशीं नसतात. यांचा रंग करडा व पांढरा मिश्र असून त्यांच्या तोंडावर केव्हां केव्हां पुसट पांढरे ठिपके असतात. बैलावर जास्त काळी झाक असते. चेहरा लांब व अरुंद असून डोक्यापासून जबड्या पर्यंत मध्यें खोलगट असतो. डोळे मोठे व काळे असून त्यांच्या पापण्या म्हसवड खिलारीसारख्या मोठया असतात. शिंगें साधारणपणें खिलारीसारखींच असतात. गळ्याखालची पोळी व बेंबटावरील कातडी फारशी वाढलेली नसते. पाय मजबूत व खुरांत सारखे असतात. एकंदरींत या जातींत बांधा लांबट असून अरुंद असतो.

म्हैसुरीचाचा आणखी एक प्रकार आहे त्याला मधेस्वरन बेत्ता अगर अलमडी असें म्हणतात. यांची पैदास म्हैसूरच्या अग्नेयीकडील डोंगरांत होते. या जातींचीं गुरें अमृतमहालपेक्षां मोठीं असून साधारण बोजड दिसतात. या जातींत पोळी बरीच वाढलेली असून डोकें जड असतें. शिंगे जाड, मान आंखूड व जाड, पाय बोजड व खुरांत नरम असून अंगावरची चामडी जाड असते. हीं जनावरें कामाला जड असून कर्नाटकांत यांचा शेतकीच्या कामीं फार उपयोग होतो. बेळगांवांत या जातीचे बैल तेल्याच्या घाण्याला व धमनीला फार करून अधिक आढळतात.

नंदी येथें दरवर्षी मोठी यात्रा भरते. हें ठिकाण बंगलोरपासून २२ मैलांवर आहे. येथें म्हैसुरी चांगले बैल विक्रीस येतात. तेथें पीनांग्, स्ट्रेट सेटलमेंट्स, मलाया, ब्राझिल (अमेरिका) वगैरे ठिकाणांहून पुष्कळ परदेशी अडश्ये दरवर्षी बैल खरेदी करण्यासाठीं येतात. जोडीला २५० ते ४०० रुपयें किंमत पडते.

हणम्- ही म्हैसुरीची एक पोटजात असून तिची पैदास सांगली संस्थानांत व कर्नाटक प्रांतांत फार होते. या जातीच्या गाई लहान असून अंगानें बारीक, फार चपळ व रानटी गाईसारख्या दिसतात. त्यांचीं शिंगें बरीच लांब असतात. गाईंचा रंग पांढरा असून कांहीं जनावरांत मानेवर तांबूस व कांहींत सर्व अंगावर पांढरे ठिपके असतात.

या जनावरांचा बांधा सडक असतो. शिंगें नीट व अणीदार असतात. तोंड लांबट असतें. जनावर जातीनें चपळ, खणखणीत, बळकट व रागीट असतें.

ए ड न- ही जात आकारांत लहान असून ती अरबस्तानांत पैदा होते. या जातींत दुभत्या जनावरांचे गुण ब-याच प्रमाणांत आढळतात. एडन गाई विक्रीकरितां इकडे येत नाहींत. ज्या काहीं इकडे आढळतात त्या युरोपियन लोकांनीं तिकडून येतांना आणल्या आहेत. आकाराच्या मानानें या गाई बरेंच दूध देतात; व त्या गरीब असल्यामुळें रोज दोन तीन वेळ दूध काढलें तरी देतात. या जातीच्या कालवडी लवकर वितात व गाई फार दिवस भाकड रहात नाहींत. यांचा रंग तपकिरी असतो; व चेहेरा, कान, पाय, पायाचीं हाडें, खूर व आकार यांचें बारीक रीतीनें निरीक्षण केल्यास जनावर साधारणपणें हरिणासारखें दिसते. बैल शेतकीच्या हलक्या कामाला योग्य असून साधारणपणें दक्षिणी बैलाची बरोबरी करतात.

सिंधीः- या जातीचें वसतिस्थान मुख्यत्वेंकरून सिंध प्रांतांतील कराची जिल्हा होय. या जातीची पैदास कराचीच्या आसपास पांच पन्नास मैलांत होते. रानांत चरावयास बेताचेंच असतें. परंतु थोडया चा-यावर तीं गुबगुबीत असतात. पैदास करणारे लोक मुख्यत्वेंकरून मुसुलमान असून ते बियाण्याची निवड करण्यांत जास्त काळजी घेतात व गोर्‍हे लहाणपणींच खच्ची करतात. या दोन कारणांमुळें सिंधी जात बहुतेक निर्भेळ राहिली आहे. या गाई दूध देण्याच्या अगदीं ऐन भरांत असतांना रोज २०-२४ पौंड दूध देतात. ख-या अवलादीचा रंग तांबूस किंवा तांबडा असतो. परंतु कित्येक जनावरांत काळा, जागजागीं पांढरे ठिपके असलेला असाहि असतो. तोंड मोठें व अवजड असतें. कान लांब असून लोंबते असतात. मान जाड व आंखूड असते. शिंगें लांबीला मध्यम असतात. गळ्याखालची व पोटाखालची चामडी बरीच लोंबती असते. एकंदरींत सर्वांग लांबट, उंच व सुंदर असें असून तें आंखूड पायावर तोललेलें असतें. कास साधारण मोठी व मांसल असते. कालवडी लवकर माजावर येतात. गाई स्वभावानें गरीब असून दूधहि ब रेच दिवस देतात. या जातींत खुबे, खांदे व पुठ्ठा हे बरेच मांसल असून त्यांत चरबीहि बरीच असते. पाश्चात्य देशांत हे गुण मांसासाठीं निवडलेल्या जातींत आढळतात. या गुणांमुळें या गाई ब-याच प्रमाणांत बाहेर देशीं जाऊं लागल्या आहेत. या जातीचा प्रसार सर्व हिंदुस्थानांत मिलिटरी डेरी फार्मवर व सिलोनमध्येंहि दुधासाठी झाला आहे. यांचा विलायतेंतील 'आयरशायर' जातीच्या बियाणूबरोबर संकर होऊन झालेली गाय साधारणपणें दीडपटीनें दूध देते असा अनुभव आला आहे. हल्लीं या गाईंना कराची मुक्कामीं १२५ ते १५० रुपयेपर्यंत किंमत पडते. बैल फारसे चपळ नसले तरी साधारणपणें सर्व शेतीच्या कामास उपयोगी पडतात.

गीर (सुरती अगर सोरटी):- या जातीची पैदास रबारी, भाखड, व चारण लोक दक्षिण काठेवाडांत गिरनारचे  अरण्यांत करितात. या अरण्यांत चारा भरपूर असून पाण्याचा पुरवठा मुबलक आहे. जनावरें रात्रीं बांधीत नाहींत. दूध काढण्याच्या वेळीं एके ठिकाणीं जमा करतात. या जातींत त्यांचें डोकें, कान व शिंगें विशेष प्रकारचीं असतात. कपाळ मोठें व पुढें आलेलें असतें. शिंगें जाड, मोठीं, मागें वळून वेटाळलेलीं अशीं असतात. कान मोठे, लांब व लोंबते असून शेंडे वळलेले असतात. रंग तांबडा अगर रंगी बेरंगी तांबडा अगर पांढरा असतो. यामध्यें पांढरा अगर तांबडा या रंगाचा बारीक शिडकाव मारल्यासारखा विचित्र असतो. आंगलट ओबडधोबड, पाठ लांब, सपाट, पाय मोठे, खूर नरम असून जनावर बरेंच उंच असतें. कांस मोठी लोंबती व मांसले असते. आंचळ मोठे व पिळण्यास कठिण असतात. ही जात मोठाड (थोराड) असल्यामुळें खावयास लागणा-या खर्चाच्या मानानें गिरनार अरण्याशिवाय इतर ठिकाणीं फायदेशीर ठरत नाहीं. या जातीच्या गाई काठेवाडांत बरेंच दूध देतात परंतु दुसरीकडे नेल्यास दुधाला कमी येतात. या गाई बरेच महिने भाकड राहतात; व लवकर आटतातहि. काठेवाडांत या गाईला ६० – ७५ रुपये किंमत पडते. बैल मोठे धिप्पाड असतात. वशिंड गाईपेक्षां बैलांत मोठें वाढलेलें असतें. हे बैल जोराच्या कामाला फारच उत्तम असतात. ही जात सर्वत्र पसरलेली आहे. या जातीच्या गाई मारवाडी, गुजर, वाणी व इतर व्यापारी लोक जेथें जेथें व्यापाराकरितां जातात व रहातात तेथें तेथें ते बरोबर घेऊन जातात.

काक्रेजी (वडीयाळ).- या जातीचें मुख्य वस्तिस्थान पालनपूर संस्थानापैकी कांक्रेज हें होय. हें जनावर दिसण्यांत मोठें उमदें असून त्याची नेहमीं उभें रहाण्याची ठेवण ताठ, डोकें वर केलेली अशी असते. कपाळ जरासें खोलगट असतें व उंच, पिळदार व उभ्या शिंगांमुळें हें जनावर एकंदरींत सुरेख व मनांत भरण्यासारखें असतें. शिंगांचें बूड एक दोन इंच केसांनीं वेष्टिलेलें असतें. रंग पांढरा किंवा करडा असतो. जनावर थोडेंसें उंच असतें; पण बाकीचा एकंदर बांधा, पाय, चेहरा वगैरे रेखीव असतो. कान मोठे व लोंबते असतात. गळ्याखालची पोळी व बेंबटाजवळची कातडी ब-याच प्रमाणांत वाढलेली असते. वशिंड फारच भव्य असतें. एकंदरींत जनावराचें शरीर स्थूल, कान लांब, कपाळ पसरट, शिंगें दिवटीं व चाल डुलकी यामुळें हें जनावर दिसण्यांत गंभीर दिसते. तें चपळ व सहनशील असल्यामुळें हलक्या व भारी दोन्ही प्रकारच्या शेतीच्या कामाला योग्य असतें. या जातीच्या गाई गुजराथेंत सिंधी गाईंइतकें दूध देतात. या जातीची पैदास करणारे लोक रब्बारी होत. ते बियाणूची, गाईची व वांसरांची फार काळजी घेतात. गोर्‍हे सहा महिन्याच्या आंतच खच्ची करतात. या जातीची पैदास जेथें होतें तेथें मुबलक चराऊ जमीन व भरपूर पाणी आहे. ही जात निर्भेळ असल्यामुळें ओळखण्यास पंचाईत पडत नाही. सर्व जनावरें सारखींच दिसतात. या जातीचीं जनावरें अमेरिकेपर्यंत गेलेलीं आहेत.

गुजराथी- या जातीची गुरें अहमदाबाद, खेडा व बडोदे सरकारचें राज्य येथें पैदा होतात. हीं गुरें कांक्रेजीसारखीं दिसत असून कित्येक वेळां तीं त्यांपेक्षांहि मोठीं असतात. त्यांची पैदास करणारे लोक बियाणूची फारशी काळजी घेत नाहींत. यात माळवी व खानदेशी जातींची बरीच भेसळ झालेली आढळते.

तलबदा.- दक्षिण गुजराथेंत व सुरत जिल्ह्यांत या नांवाची जात आढळते. ती दिसण्यांत काक्रेजसारखीच दिसते; पण आंगलटांत जरा लहान व त्यांची पोळी व पोटा- खालची कातडी कमी वाढलेली असते. शिवाय कान लहान, खूर मजबूत आणि शेपूट लांब व जाडीला कांक्रेजी पेक्षां कमी असते.

म्ह शी.- हिंदुस्थानांत दुधासाठी म्हशी पाळीतात. कांहीं कांहीं ठिकाणीं पावसाळी भागांत टोणग्यांचा उपयोग शेतकामाकडे करतात. टोणगा बैलांपेक्षां फार मजबूत असतो. पखालीकरितां बहुतेक टोणगाच वापरतात. म्हशींचे मूळ स्थान तिबेट असावें. हिंदुस्थानांत, आरचीपेलेगो, मेसापोटे-मिया व दक्षिण यूरोपांत कांही ठिकाणीं हें जनावर आढळतें. म्हशीच्या जातीला पाणी फार आवडतें. तथापि जातवान म्हशी बेतशीर पावसाळी भागांतच आढळतात. त्यांची चामडी रंगानें काळी व दिसण्यांत चकचकीत असते. ह्या जनावरास उन सहन होत नाहीं. त्यांनां रोज एक दोन वेळ धुवावें किंवा नदींत बसवावें. त्यांच्या अंगावरील केंस पातळ असल्यामुळें त्यांत नेहमीं गोचिड, उंवा, सुळे वगैरे प्राणी उत्पन्न होतात. यासाठीं म्हशींना वर्षांतून दोन वेळ भादरावे व नेहमीं त्यांचे अंग घांसून पाण्याने धुवावें. म्हशींच्या व गाईंच्या जातींत बराच फरक आढळून येतो. म्हशीचें दूध गाईपेक्षां जास्त सत्वशील असतें. म्हशीला वशिंड किंवा कोळें नसतें. त्यांचा आवाज गाईपेक्षां वेगळा असतो. म्हशी गाई पेक्षां फार खोडकर असतात. वासरूं मेल्यास, गवळी बदलल्यास किंवा इतर क्षुल्लक कारणानेंहि कांही दिवस त्या दूध देत नाहींशा होतात. गाईपेक्षां म्हशीच्या जाती कमी आहे. (१)    दिल्ली. (२) जाफराबादी, (३) सुरती, अगर नडियादी (४) नागपुरी अगर वर्‍हाडी (५) दक्षिणी (६) गवळी अगर होळेसाळ, (७) शिरगुजी. शिरगुजी ही जात देशी म्हैस व जंगली टोणगा यांची अवलाद असावी. ही  जात मध्यप्रांतांतील जमीनदारी व छत्तीसगड भागांत आढळते. हें जनावर मानेंत जाड असून याचीं शिंगें व खांदा अगदीं जंगली टोणग्यासारखा असतो. टोणगा ताकदवान असून, म्हैस दुभत्याच्या कामीं अगदीं कमी प्रतीची असते.

हिंदुस्थानांत आढळणा-या म्हशींच्या जातीचें वर्णन पुढें दिलें आहेः-

दिल्ली अगर मुरा.- या जातीचें मुख्य वसतिस्थान रोहटक हें दिल्लीजवळ पंजाबांत आहे. या जातीच्या म्हशी दिल्लीहून दुसरीकडे जातात म्हणून या जातीस दिल्ली हें नांव प्राप्त झालें आहे. या जातींत शिंगें गुंडाळलेलीं असतात. म्हणून त्यांना 'खुंदी' असेंहि म्हणतात. दिल्ली म्हशी विकण्याकरितां मुंबईंत आणितात; व त्यांचा 'मिलिटरी डेरी फार्म'मध्यें सर्वत्र प्रसार झाला आहे. या जातीच्या म्हशी मोठाड (थोराड) असून लांबीला कमी असतात. पाठी मागील भाग रुंदट असून पुढें निमूळता झालेला असतो.कांस मोठी व चांगल्या आकाराची असते. या जातींत दुभत्या जनावरांचे गुण बरेच आढळून येतात. त्या नियमितकाळीं वितात व दूधहि पुष्कळ देतात. जनावर मोठें असल्यामुळें त्यास खाणें जास्त लागतें म्हणून या जातीच्या म्हशी गरीब लोक क्वचितच पाळतात. चांगल्या अवलादीची म्हैस रोज २५ ते ३५ पौंडपर्यंत दूध देते. म्हशीची उंची सुमारें ५३ इंच असून छातीचा घेर १०३ इंचपर्यंत असतो.

सुंरती अगर नडियादी.- ही जात उत्तरगुजराथेंतील खेडा जिल्हा, बडोद्याचें राज्य व मुख्यत्वेंकरून चरोत्तरांत आढळते. या म्हशी दक्षिणी वर्‍हाडीपेक्षां थोड्या मोठ्या असून त्यांचीं शिंगें त्या दोहोंपेक्षां आंखूड असतात. हें जनावर एकंदरींत आकरमानांत मध्यम, बांधेसूद व आटपसर असतें. मागील भाग रुंद असल्यामुळें कांसेला भरपूर जागा मिळून तिची ठेवण सारख्या प्रमाणांत असते. ही जात दुधाला चांगली असून मध्यम प्रतीच्या लोकांनां बाळगण्याजोगी आहे. हिची उंची सुमारें ५३ इंच असून छातीचा घेर ७४ इंचापर्यंत असतो.

जाफराबादी- गीरगाई व  या जातीच्या म्हशी यांचें मूलस्थान दक्षिण काठेवाड होय. या पूर्वी जाफराबाद बंदरांतून रवाना होत असत म्हणून त्यांना 'जाफराबादी' हें नांव प्राप्त झालें असावें. मुंबई इलाख्यांतील दुभत्या जनावरांत हें मोठाड (थोराड) जनावर होय. या म्हशी अवजड असून त्यांच्या कपाळाचें हाड रुंद व पुढें आलेलें असतें. या जातींत शिंगें, कान व डोकें हीं विशेष प्रकारचीं असतात. यांचा पुढचा भाग, मागच्या भागाच्या मानानें जास्त अवजड असतो. ही जात गिरनार प्रदेशांत पुष्कळ दूध देते. परंतु ती बाहेर देशीं नेल्यावर दुधाचें प्रमाण कमी पडतें. या म्हशी फार दिवस भाकड रहातात व लवकर आटतात. त्यांच्या मोठया आकारामुळें त्यांनां खाणें जास्त लागतें व दुधाचें उत्पन्न बेताचेंच असतें. म्हशीची उंची सुमारें ५७ इंच असून छातीचा घेर अजमासें ८८ इंच असतो.

दक्षिणी.- ही जात देशावर, कर्नाटकांत, खानदेश निजामचें राज्य व वऱ्हाड या ठिकाणीं सर्वत्र आढळते. कोंकणांतील म्हशी याच जातीच्या असून त्या ब-याच लहान असतात. दक्षिणी म्हशींचा एकंदरीनें आकार सुरती म्हशींपेक्षां लहान असून शिंगें मात्र फार लांब असतात. कांस लहान असून दुधाचें मानहि फार कमी असतें.

वर्‍हाडी अगर नागपुरी.- या जातीच्या म्हशी मध्य-प्रांतांतील वर्धा, यवतमाळ, इलिचपूर इत्यादि जिल्ह्यांत व लगतच्या निजामच्या राज्यांत गवळी लोक पाळतात. या म्हशी खानदेशांत व सोलापुरांत फार नेतात. वर्‍हाडी म्हशी दक्षिणी म्हशींपेक्षां थोड्या मोठ्या असून त्यांचीं शिंगें दक्षिणीपेक्षां मोठीं, लांब व अणकुचीदार असतात. या दक्षिणीपेक्षां दूध जास्त देतात पण लवकर आटतात. या जातीने टोणगे वसुदेव खरेदी करून छत्तीसगड व तेलंगण येथें नेऊन ज्ञिाकतात.

गवळी व होळेसाळ.- बेळगांव व धारवाड जिल्ह्यांत दोन जातींच्या म्हशी आढळतात. त्यांना गवळाऊ आणि होळेसाळ अगर जवारी (जवारी = गांवठी) म्हणतात.पहिल्या जातीच्या म्हशी सोलापूर, पंढरपूर व निजामच्या राज्यांतून आणतात व दुस-या जातीच्या म्हशींची पैदास कृष्णा व घटप्रभा नद्यांच्या कांठी होते. या दोन्ही जाती आकारांत व ठेवणींत मध्यम असून गवळाऊ, मात्र थोडीशी मोठी असते व तिची शिंगें लांब व पसरट असतात. या म्हशी रंगांत बहुतेक काळ्या असून पुष्कळ जनावरांत कपाळावर पांढरा ठिपका असतो. या जातीच्या म्हशींत घा-या डोळ्याच्या म्हशी फार आढळतात. या म्हशी होळेसाळपेक्षां जास्त दूध देतात.

होळेसाळ यांची ठेवण लहान असून त्या सामान्यतः शेतकरी लोक पाळतात. या दूध थोडें देतात व लवकर आटतात. कृष्णाकाठीं वगैरे जेथें यांनां चरावयास भरपूर मिळतें तेथें त्या बरेंच दूध देतात. या जातीचे टोणगे कोंकणांत शेतकामाला चांगले समजले जातात.

दु भ त्या ज ना व रां चीं ल क्ष णें.- जनावर जातिवंत असून खोडकर किंवा रोगी नसावें. त्याचप्रमाणें तें शांत स्वभावाचें असावें; कारण तापट स्वभावाची गाय अगर म्हैस लवकर बिथरते व दूध देत नाहीं. जनावर अंगानें सडपातळ असून त्याचा आकार पुठ्ठयाकडे जाड व रुंद असून पुढें निमुळता असावा. पुठ्ठयाकडील भाग असा असल्यास गर्भास पोटांत रहाण्यास मुबलक जागा सांपडते. व तेथें त्याची वाढ चांगली होते. तोंड लहान, जबडा मोठा, कपाळ रुंद, मान बारीक, छाती लांबट, कोठा मोठा व मागील भाग जरा उचललेला असावा. मोठ्या जबडयाचीं व मोठ्या कोठयाचीं जनावरें पुष्कळ खातात व पुष्कळ दूध देतात. अंगावरील कातडें पातळ व केंस नरम असणें हें सुद्धां दुभत्या जनावराचें एक चांगलें लक्षण आहे. गुडघ्याखालील पायांचीं हाडें आंखूड असावीं, कांस फार लोंबती नसावी व आंचळांचा एके ठिकाणीं झुबका नसावा. त्यांची ठेवण चार कोंपर्‍यांवर व सारख्या अंतरावर असणें चांगलें. आंचळ मुके नसावे. चारहि आंचळांतून दूध येत असावें. कांही जनावरांनां चोहोंपेक्षां अधिक आंचळ असतात. खडकी (पुणें) येथील गोशाळेंत एका म्हशीला सहा आंचळ असून त्या सर्वांतून दूध येत असे. दुधाचें प्रमाण कांसेवर अवलंबून नसून पोटाखालून जाणाऱ्या दूधवाहिन्यांच्या आकारावर असतें. या वाहिन्या पोटाखालून जात असतांना वांकड्या वांकड्या जात असल्यास चांगलें. हे वर निर्दिष्ट केलेले गुण सर्व दुभत्या जातींत सांपडतात असें नसून त्यांपैकीं बरेच गुण उत्तम दुभत्या जनावरांत आढळून येतात. उदाहरणार्थ सिंधी, एडन गाईंच्या जाती व दिल्ली आणि सुरती म्हशींच्या जाती.

बि या णू (कोळ, सांड, वळू)चीं लक्षणें.- चांगली पैदास होण्यास गाय व विष्णू हीं दोन्हीं जातिवंत व निर्भेळ अवलादीचीं असलीं पाहिजेत. असें असतांहि त्यांतल्या त्यांत पैदाशीच्या दृष्टीनें बैलाचें महत्व अधिक आहे. कारण गाय जर वाईट अवलादीची असेल तर तिचें वासरूं मात्र बाईट निघेल; परंतु जर बियाणू वाईट असेल तर सर्व कळपच वाईट निपजेल. याकरितां बियाणूची पूर्वपिठिका माहित असणें जरूर आहे. तो सुदृढ व बांधेसुद असावा. तो अशक्त अगर रोगी असल्यास त्यापासून होणारी वांसरेहिं तशीच निपजतील. त्याचा पुढील भाग रुंद असावा; असें असल्यानें त्याच्या काळजाला व फुप्फुसाला भरपूर जागा सांपडते. त्याच्या बरगड्या मजबूत असून त्याचीं हाडें कणखर असावीं. त्याच प्रमाणें तो चपळ असून दिसण्यांत सुंदर असावा बियाणूची निवड करतेवेळीं त्याची अवलाद कोणत्या कामाकरितां उपयोग करण्यांत यावयाची आहे त्याप्रमाणें त्याचीं लक्षणें पाहून निवड करावी.

(१) आलताच कामीं बैलांची पैदास करणें असल्यास वळू धष्टपुष्ट, मजबूत बांध्याचा, कणखर खुरांचा व हाडांचा असून त्याची मान व खांदा मजबूत व आखूंड असावीं.

(२) पळण्याच्या किंवा गाडीच्या कामीं उपयोगी पडणा-या बैलाची निपज करावयाची असल्यास बियाणू सडपातळ, लांबट बांध्याचा, जरासा उंच पातळ व नरम कातडीचा व चालण्यास चपळ असावा.

(३) दुभत्या जनावरांची पैदास करावयाची असल्यास बियाणू जास्त दूध देणा-या गाईचा असावा; कारण जास्त दूध देणें हं आनुवंशिक संस्काराचें फल असून, पूर्वी निवड करूनच उत्पन्न झालें असलें पाहिजे. खाण्यापिण्याच्या व्यवस्थेनें सुद्धां दुधांत थोडा बहुत फरक होतो. उत्तम गाय व उत्तम बियाणू असल्यास त्यांची अवलाद उत्तम होऊन त्यांत आईबापांचे गुण जास्त उतरून प्रजा जास्त दूध देते. सुमारें पन्नास गाईंच्या कळपांत एक बियाणू ठेवावा व तो दर पांच वर्षांनीं बदलावा.

का मा च्या बै ला चीं ल क्ष णें.- काम करणारे बैल मजबूत व धष्टपुष्ट असावे. त्यांचा खांदा व मान आंखूड असावी, डोळे पाणीदार असावे, पाय उभे, सरळ, काळ्या खुरीचे कणखर व आंखूड नळीचे असावेत. गाडीच्या बैलांच्या पायाची नळी लांब असावी. पुठ्ठयाकडील भाग उतरता असल्यास बैल बहुतकरून चपळ असतो.

गाडीच्या कामास बैल लांबट असावा. तो बुजरा नसावा, पोळी व बेंबटावरील कातडी फारशी वाढलेली नसावी. कारण ही कातडी चालतांना अडचण करिते. खु-या काळ्या असाव्यात, त्या मजबूत असतात. गाज-या खुरीचे बैल पायांत नाजूक असतात. ते लवकर झिजतात. अशा खुरींचीं जनावरें ढेकळें असलेल्या शेतांत काम करतांना लवकर लंगडीं होतात. गाई म्हशींचे दुध व त्यांचे गुणधर्म यासंबंधानें माहिती 'दूध दुभतें' या लेखाखालीं मिळेल.