विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गाग्रौन- राजपुताना. कोटा संस्थानच्या कनवास जिल्ह्यांतील एक किल्ला; व खेडें. अहू व कालीसिंध नद्यांच्या संगमावर हें वसलेलें आहे. हा किल्ला राजपुतान्यांत सर्वांत भक्कम असून दोड रजपुतांनीं बांधिला आहे. १२ व्या शतकाच्या अखेरीस त्यांच्याच ताब्यांत होता. त्यांच्या नंतर खीची चव्हाण आले. जेठगिंच्या कारकीर्दीत अल्लाउद्दीननें १३०० सालीं वेढा दिला होता तो ह्या लोकांनीं मागें हटविला. राजा अचलदासाच्या कारकीर्दीत माळव्याच्या हुसंगशहानें हें स्थान घेतलें. मुसुलमान इतिहासकार म्हणतात कीं १५१९ मध्यें हा गांव कोणी भीमकरणाच्या ताब्यांत होता; व त्याजवर महंमद खिलजीनें हलज करून त्यास कैद केलें व ठार मारिलें. लवकरच मेवाडच्या राणा संग्रामसिंगानें महंमदाचा पराजय केला व पुढें १५३२ पावेतों गाग्रोन रजपुताकडेच राहिलें. १५३२ मध्यें गुजराथच्या बहाद्दूरशहानें हें गांव घेतलें. पुढें सुमारें तीस वर्षांनीं अकबर माळव्याच्या स्वारीवर जात असतां येथील किल्लेदार त्यास शरण आला. गाग्रोन हा माळव्याच्या सुभ्याचा एक सरकार होता असें ऐने इ अकबरींत म्हटलें आहे. १८ व्या शतकाच्या सुरवाती पर्यंत तो त्याजकडेसच राहिल्या. ह्या वर्षी तो महाराव भीमसिंग (कोटा) ह्यास बादशहाकडून इनाम मिळाला. नंतर ह्याची डागडुजी वगैरे करण्यांत आली. गांवाभोंवतीं व किल्ल्याभोंवतीं एक उंच भिंत असून शिवाय खंदक आहे. हा गांव प्राचीन आहे. ह्यास गार्गशास्तर म्हणत असत. कारण श्रीकृष्णाचा पुरोहित गर्गाचार्य येथें रहात असे अशी समजूत होती. कोणी म्हणतात ह्या गांवास गर्गरातपूर म्हणत असत. गर्गनामक हिंदु ज्योतिषानें येथूनच रेखांश मोजण्यास सुरुवात केली. कोटा दरबारची पूर्वी येथें टांकसाळ होती. येथून आग्नेयीस ११ मैलांवर मऊ नांवाचें खेडें आहे. हें सुरुवातीस खीची रजपुतांच्या राजधानीचें शहर होतें. पश्चिमेस एक मोठा पडका वाडा आहे. तो पृथ्वीराज चव्हाणाचा आहे असें म्हणतात.