विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  
     
गाबती- या जातीची लोकसंख्या (१९११) २४८१८. रत्नागिरी व कानडा जिल्ह्यांतील समुद्रकांठचा प्रदेश व सांवतवाडी संस्थान येथें हे लोक आढळतात. यांचीं गाबीत किंवा ग्राबती अशींहि दुसरी नांवे आहेत. गाबती हें नांव पडावयाचें कारण असें सांगतात कीं शिवाजी महाराजांनीं आरमार तयार केलें. त्यावेळीं त्यांत तिर्कटीतारूं, गलबत, मचवा, पडाव, शिबाड, होडी, डोण, पगार व ग्राब अशीं निरनिराळीं गलबतें होती. ग्राबजहाज हें लढाऊ असे. त्यावर तोफा असत. ग्राब (गुराब) हा आरबी शब्द आहे. त्याचा अर्थ गनबोट होय. या ग्राबावर जे लढाऊ मराठे कोंकणी नोकर राहिले ते हे ग्राबती होत. गाबीत हा शब्द खरा नाहीं (हा सेन्सस रिपोर्टांत येतो.) ग्राबती व गाबती एकच. आम्हीं कोंकणी मराठे असून आमचे पूर्वज पूर्वी शिवाजीच्या आरमारखात्यांत नोकर होते असें हे म्हणतात. म्हणून जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले या पूर्वीच्या आरमाराच्या ठिकाणीं यांची वस्ती जास्त आहे. पेशवाई बुडाल्यानंतर त्यांनीं कोळ्याचा धंदा सुरू केला असें म्हणतात. १७६० च्या अगोदर व त्यानंतर सुमारें ४० वर्षेपर्यंत हे लोक दर्यावर्दीपणाचा धंदा करीत होते. यांच्या बायकामुलांनीं (पुरुष आरमारावर नौकर असल्यामुळें) शेजारी रहात असलेल्या कोळ्यांचा धंदा व मोलमजुरी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळें मराठे व या लोकांचा संबंध दुरावला. साठसत्तर वंर्षापूर्वी मराठ्यांचा व यांचा रोटीबेटीव्यवहार असे पण हल्ली नाहीं. त्यावेळीं मालंडकर परब (ग्राबती) यांची मुलगी विजयदुर्गाच्या धुळपांकडे दिली होती असें म्हणतात. यांचीं आडनांवेंहि मराठ्यांच्या आडनांवांची आहेत. वेंगुर्ले येथें कुबल आडनावांचीं पांच घराणीं असून त्यापैकीं चार मराठे व एक गाबती आहे. मानमरातब पंचांनांहि सारखाच मिळतो. हुद्यांचीं दर्शक आडनांवें यांच्यांत आहेत तीः- तांडेल, साततांडेल, पडतांडेल, फडतांडेल, तिळतांडेल, मायनाक, नाईक, पडनाईक, फडनाईक, महालनाईक, मुकनाईक, सारंग, मोठेसारंग, बुड्ये इत्यादि. या लोकांमध्यें कुळें व देवकें आहेत व त्यावरून ते मूळचे मराठे असण्याचा फार संभव दिसतो. मासे पकडून विकणें व दर्यावर्दीपणा करणें हे त्यांचे परंपरागत धंदे होत. यांमध्यें गोत्रेंहि आहेत. परंतु त्यांचा उपयोग होत नाहीं. विवाहाच्या चालीरीति वेगवेगळ्या आहेत. यांच्या गलबतांवरील विशिष्ट दोर्‍यांचीं नांवे शिवाजी, संभाजी, शाहू, गाई, वासरूं अशीं असतात. पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत यांच्या गलबतावर तोफा असत. त्यावेळीं महादू बुदबाराव कुबल नांवाच्या गृहस्थाच्या हातून तोफेच्या अपघातानें एक बाई मेल्यामुळें तेव्हांपासून तोफा ठेवण्यास बंदी झाली. ग्राब ठेवण्याच्या जागेस गुराब देवणें म्हणतात. यांची कुलदैवतं महादेव व पार्वती होत. यांच्या सर्व चालीरीती मराठ्यांप्रमाणेंच आहेत असें म्हणतात. कुळांवरून लग्नें ठरतात. कळंब, आंबा वगैरें देवकें यांच्यांत आहेत. आतेबहिणीशीं लग्न करण्यास उलट सांखळी म्हणतात. लग्नाच्या वेळीं नव-याच्या डोक्यावर उलट धार करून शस्त्र धरतात. लग्नानंतर वधुवर कोण्या तरी इष्ट मित्राच्या घरीं पाहुणचारास जातात. तेथें रात्रीं एकांतांत वरास आपली अंगठी वधूस द्यावी लागते. लग्नाच्या वेळीं वरास जानवें देतात. पुढें धंद्याच्या गैरसोयीमुळें तें खुंटीस ठेवतात. विवाहादि सर्व संस्कार ग्रामजोशी ब्राह्मण उपाध्याय करतो. या जातीच्या रखेलीपासून झालेली संतति मराठा जातींत मोडते; त्यांची निराळी जात नाहीं. मात्र अशा पहिल्या पिढीस बंदा म्हणतात व त्यापुढील संतति आस्ते आस्ते पक्क्या मराठ्यांत मोडते. त्यांच्यापैकीं कांही वारकरी व रामदासी पंथाचे आहेत. यांच्या गांवोगांवी पंचायती होत्या व सर्वसाधारण पंचायत मालवणास होती. तिचा अध्यक्ष वंशपरंपरेचा असतो. हल्ली फार थोड्या पंचायती शिल्लक आहेत. पूर्वी निवाडे लिहून ठेवण्याची पद्धति होती. निकाल न पाळल्यास गुडगुडी, पाणी, विस्तव, रोटीव्यवहार हे बंद करणें किंवा दंड करणें या शिक्षा असत. कांहीं गांवी जातीचीं मालकीचीं देवस्थानें आहेत. जातीचा कर नाहीं. ब्राह्मण, मराठे व वाणी यांच्या बरोबर यांचा अन्नोदकव्यवहार चालतो. यांच्यांत पोटजाती नाहींत. संकेश्वर मठ हा या जातीच्या धर्मगुरूचा मठ होय. यांच्यांत दोन शिक्षणविषयक फंड आहेत. या जातीबद्दल एन्थॉलॉजिकलसर्व्हे डिपार्टमेंटकडून चौकशी होत असतां ''आमच्या जातीपैकीं कोणाहि गृहस्थाचा सल्ला घेण्यांत आला नाहीं; उलट प्रतिस्पर्धी जातीकडून भलती नालस्ती करणारी चुकीची माहिती मिळवून सरकारनें मोनोग्राफ छापला. तो छापला गेल्यावर जातींतील पुढार्‍यांनीं एन्थॉ. डिपार्टमेंटला अर्ज करून त्यांत केलेल्या खोट्या विधानांबद्दल तक्रार केली व खरीखुरी माहिती पुराव्यानिशीं सादर केली. परंतु मोनोग्राफ पूर्वीच छापून निघाल्यामुळें त्याचा कांहीच उपयोग झाला नाहीं.'' असें रा. कृ. वि. कुबल म्हणतात. (सेन्सस ऑफ इंडिया १९११ व्हॉ. ७; रा. कृ. वि. कुबल यांनीं पुरविलेली माहिती.)