विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गिरसप्पा- होनावर तालुक्यांत होनावर व गिरसप्पा धबधबा यांच्या मध्यावर शरावतीच्या काठी सुंदर जाग्यावर वसलेला एक गांव. हें नारळाचें आगर आहे. येथून जवळच नगरवस्तिकेरे शहराचे अवशेष आहेत. एका काळी तेथें १ लाख घरें व ८८ देवळें होती असें सांगतात. येथे जैनाचें एक फुली (चौफुली?) सारखें देऊळ पहाण्यासारखें आहे. त्यांत ४ मूर्ती आहेत. महावीरस्वामी वर्धमानाच्या देवळांत महावीरांची काळ्या दगडाची मूर्ति विजयानगरच्या राजांनी गिरसप्पा येथील एका जैन घराण्यास अधिकारारूढ केलें. १४०९ मध्यें गिरसप्पाच्या वडेरू इच्छाप्पानें मंकीजवळील गुणवतीच्या देवळाला देणगी दिल्याचा उल्लेख आहे. इच्छाप्पाची नात विजयानगरपासून स्वतंत्र झाली. या घराण्यांत पुष्कळ वेळां स्त्रियांनी अधिकार चालविलेला दिसतो. १७ व्या शतकाच्या अखेरीला बेद्दनूरच्या नाईकानें भैरादेवीचा पराभव केला. १६२३ मध्यें डेलाव्हली हा इटालियन प्रवाशी लिहितो की 'गिरसप्पा ही पूर्वी एका प्रांताची राजधानी व प्रसिध्द शहर असून तेथें राणीचे राज्य होतें.' त्यावेळी कांही झोपड्यांखेरीज तेथे कांही राहिले नव्हतें व अवशेष भाग जंगलात नाहीसा झाला होता. येथें मिरी इतकी होतात की पोर्तुगीज लोक गिरसप्पाच्या राणीला मिर्यांची राणी म्हणत.