विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गुजर- या जातीच्या नांवाच्या उत्पत्तीबद्दल विद्वानांत फार मतभेद आहेत. कनिगहॅम, क्यांबेल, स्मिथ हे पाश्चात्त्य यांना परकीय बाह्म, यूएची, शक, गूर्ग, खजर, जुजू किंवा गोरे हूण म्हणतात व आपल्या इकडील चिंतामणराव वैद्यादि विद्वान त्यांना मूळचे आर्यच म्हणतात.
गुजर म्हणजे गाई राखणारा (गोचिर किंवा गौचरण) अगर गाई चोरणारा (गोचार) अशीहि या नांवाची व्युत्पत्ति परकीय इतिहासकार देतात. फारशी भाषेतील गुर्ग (लांडगा) या नावांचा गुजर नांवाशी संबंध आहे असाहि त्यांचा एक तर्क आहे. हे परकीय बाह्म लोक ख्रि.श.च्या पहिल्या पांच शतकात इकडे आले असावेत. असें वरील तर्कवाद्याचें म्हणणे आहे. कुशान सत्तेचा नाश होईपर्यंत गुजर (किंवा गुर्जर) यांचा कोठेंहि उल्लेख येत नसल्यानें ते कुशानवंशीय होत हें कनिगहॅमचे म्हणणे लटके ठरते. तसेच हुणांच्या विजयांत खजरांचे नांवहि येत नाही म्हणून गुजर हे खजरहि नाहीत. सारांश प्रचलित दंतकथांवरून यांची खरी माहिती फार थोडी मिळते. सिंधुनदी ते गंगानदी व हजारापर्वत ते गुजराथपर्यंतच्या भागांत मुख्यतः यांचा भरणा असून शिवाय वायव्येकडील प्रांत (इ.स.१९११ च्या खानेसुमारीप्रमाणे वस्ती ११३८७१), पंजाब (६१०४७२), संयुक्त प्रांत (३६६१९१), राजपुताना (५०००४६), वर्हाड मध्यप्रांत (५५७९८), मध्य हिंदुस्थान (१८५७२८) अजमेर (३५०५९), याप्रमाणें सर्व देश मिळून यांची एकदंर लोकसंख्या २१,९९,१९८ आहे. दिल्लीच्या दक्षिणेकडील रिवारीचा राजा गुजर आहे. शिखांचा मोठा भरणा या गुजरांपैहीच आहे. गुजर हिंदु व मुसुलमान दोन्हीहि आहेत.
जाट, गुजर व अहीर या जाती एकाच वंशापासून झाल्या असे इवेटसन म्हणतो. कारण हल्ली या तिन्ही जाती एकमेकांच्या हातचें खातात. यांचा रजपुतांशीहि संबंध असावा असें त्यांच्यातील वरागी, चंदेल, चव्हाण व तोमर वगैरे आडनावांवरून वाटतें. त्यावरून पंजाब व पश्चिमेकडील प्रांत इकडील गुजर हे उच्चवर्णीय असावेंत असें दिसतें. गुजर व जाट यांचा दर्जा समान असून त्यांच्या रंगारूपांतहि फरक नसतो. जिप्सी लोक यांच्यापासूनच फुटून निघून पश्चिमेकडे गेले असावे असें त्यांच्या भाषेंतील साम्यावरून दिसतें.
खानेसुमरीवरून त्यांच्यांत अनेक गोत्रें अगर कुळ्या आढळून येतात. हिंदु गुजरांच्या ११७८ व मुसुलमान गुजरांच्या ३८० कुळ्या आहेत. तत्रापि मुख्य कुळ्या ८४ च आहेत. तसेंच भट्टी, तगारी, नदवासी, खाप्राई, राटी, दापू वगैरेहि कुळ्या आहेत.
पंजाबात वड (वडे-मोठे) गुजर व भट्टीगुजर या दोन पोटजाती प्रमुख आहेत. श्रीकृष्ण ज्या कुळींत जन्मले ती आपली वडगुजरांचीच कुळी होय असें हे लोक सांगतात. इकडे मुसुलमान झालेलेहि गुजर आहेत. यांचा धंदा शेतकीचा व गुरे राखण्याचा असून कांही लोक सैन्यातहि दाखल होतात. इकडील शिखांतहि पुष्कळसे गुजर आहेत.
काश्मीरमधील बहुतेक गुजर बाट्ये मुसुलमान असून ते धनगराचा, व शेतीचा धंदा करतात. तिकडे रणबीर-सिंगपुर, रामपुर, राजारी व पंच या प्रांतांत हे राहतात. पंजाबमधील बाट्ये व हे एकच होत.
कच्छ प्रांतांतील गुजर हे तिकडे वाघेल रजपुतांबरोबरच गेलेले आहेत. यांच्याच मदतीनें वाघेलांना तिकडे राज्यप्राप्ति झाली व त्याबद्दल त्यांनी यांना शेतीच्या बाबतीत कांही हक्क दिले. येथील गुजर स्त्रियांना गोषा नांही. इकडे मक्काना, चुनेसर, चावडा, चौहान, गोहेल, डुडिया वगैरे पोटजाती यांच्यात आहे.
राजपुताना- मारवाडांतील भाटी हे मूळचे गुजर असावेत. कारण त्यांना भाटी गुजर असें म्हणतात. इकडे चंदेल, भगरावत, चारण, चाप, चेची, झाल्या, कल्हेणिया, कोर, कुसान गेहलोट, परिहार, खंड्ग, लोर, मेर, नागरी, नेकाडी, रिंद व सिसोदिया या गुजर पोटजाती आहेत. ज्यानें गुजराथीचे दूध प्यालें नाही तो कोल्हा होय अशी राजपुतन्यांत एक म्हण आहेत.
गुजराथेंत तर यांचा भरणा फार आहे. येथील वाणी, लोहार, कणबी यांना गुजर म्हणतात. परंतु ते त्यांना आवडत नाही हें कमीपणाचें दर्शक होय असें ते मानतात. येथील मारवाडी ओसवाल हेहि गुजरच होत. हे गुजर लोक पूर्वी धनुर्विद्येत फार प्रवीण होते. तसेंच सुंदर इमारती व देवळे वगैरे बांधण्यातहि ते तरबेज आहेत; पूर्वी हे दर्यावर्दीपणाहि करीत असत.
खानदेशांतहि हे लोक आहेत. त्यांना तिकडे कुणबी अगर मराठे यांच्याप्रमाणें मानतात. तेथें हे लोक बागाईत करून भाजीपाला विकतात. त्यामुळें कदाचित भाजी बाजारास गुजरी हे नाव मिळालें असावें. हे व्यापारीहि आहेत. गुजंरात गुर्जर ब्राह्मणहि आहेत. हे पूर्वी कोठले रहिवासी होते याच्याबद्दलहि वाद आहेत. पाश्चात्यांच्या मते बाह्म हूणांनी (गुजरांनी) हे आपले उपाध्याय आपल्याच बरोबर आणले. हल्ली हे श्रावक व इतर गुजरांचे उपाध्याय व देवळांतील पुजारी म्हणून आहेत. बुंदी, अलवारकडील रजपूत ब्राह्मण, मारवाडकडील गौड ब्राह्मण व मेर ब्राह्मण यांचा या गुर्जर ब्राह्मणांशी थोडाफार संबंध येतो. तसेंच पुष्कर ब्राह्मण व गुजराथेंतील नागर ब्राह्मण यांचाहि या गुजर ब्राह्मणांशी संबंध आहे. नागर हे बुध्दिवान व देखणे असून, गुजराथच्या राज्यकारभारांत ते गेल्या हजार वर्षांत प्रसिध्दीस आले आहेत. नागर याचा अर्थ वेदाचारतपाने सुधारलेले असा (ते स्वतः) करतात. नेपाळांतहि नागर ब्राह्मण थोडकेसे आढळतात.
गुजर लोक फार धर्मभोळे असून त्यांना चारण किंवा भाट यांचा फार धाक असतो व त्यांच्याविषयी पूज्यबुधीहि असते. राजा लक्ष्मणसिंह म्हणतो की, बुलंद जिल्ह्माकडे पूर्वी (बालहत्याप्रतिबंधक कायद्यांच्या आधी) यांच्यात मुलीना लहानपणी मारण्याची चाल असल्यामुळे-स्त्रियांच्या कमतरतेमुळे बहुपतीत्वाची चाल प्रचारांत होती; कुटुंबात अनेक भाऊ मिळून एकच बायको असे. पंजाबकडील गुजर हे शैव व शाक्तपंथी असून सीतलाभवानी, चामार या देवतांची व प्याराजी आणि बाबा सीमाराम या सांधूच्या समाधीची पूजाअर्चा करितात. इकडील व राजपुताना-गुजराथ इकडील गुजर हे गुरें चोरणें व पुंडाई करणे यांबद्दल प्रसिध्द असत. बाबरनें यांच्या या उपसर्गाचा उल्लेखे करून ठेविला आहे. जाटांनी व यांनी १८५७ मध्ये इंग्रजानी पुष्कच त्रास दिला होता.
अयोध्या व मीरत इकडील मुसुलमान बाट्ये गुजर हे तैमूरलंगाच्या वेळी बाटलेले आहेत. ते सुनी संप्रदायी असून त्यांच्या चालीरीती मात्र अगदी हिंदूसारख्या आहेत. निका लावण्याचा मुहूर्त वगैर ठरविण्याचे काम ब्राह्मण करतो. गाझीमिय्या, मदारशहा या मुसुलमान अवलियांप्रमाणे बुध्दिचंद्रबाबासारख्या हिंदु संताचीहि हे पूजाअर्चा करितात. होळी व नागपंचमी हे सण पाळून दर शुक्रवारी पितरांच्या नावाने अन्नदान करितात.
मध्यप्रांतात नेमाड व हुशंगावादकडे यांची वस्ती जास्त आहे. हे लोक गरीब व मागासलेले असून मुख्यतः शेतीचा धंदा करितात. येथें त्यांच्या लेखा, मुडल (रेवे) व जादम अशा तीन पोटजाती आहेत. लेखा हे जेवताना डोकीवर पागोटे ठेवून जेवतात. जादम हे स्वतःस यादववंशी म्हणवितात. कापूस दाबण्याचे कारखाने निघण्यापूर्वी हे कापूस पिंजण्याचा धंदा करीत असत, त्यामुळें त्याना लोंढारी म्हणत. हुशंगावादेकडील ताग पिंजणारे लोर्हा हे यांच्याचपैकी असावेत. इकडे केकरे अथवा कनवे म्हणून जी पोटजात आहे तिला हलकी समजतात. सोहागपूरकडील लिल्होरिया गुजर म्हणतात की श्रीकृष्णाच्या कपाळाच्या घामापासून आमची उत्पति असून आम्हीच पहिल्यानें मुरली वाजविल्यानें मुरेलिया हे आमचे दुसरे नाव पडलें. बडगुजर हे आपल्यास यांचेच वंशज म्हणवितात. यांच्यातील लग्नविधीत अग्नीऐवजी एका तांब्याच्या पाणी भरलेल्या घागरीभोवती वरास पुढे करून चार, व वधूस पुढें करून तीन, अशा सात प्रदक्षिण घालणें हा मुख्य विधि आहे. पाट लावण्यापूर्वी मालगुजारास सव्वा रू. कर द्यावा लागतो. हे लोक अविवाहितांची प्रेतें पुरतात. लग्नापेक्षां उत्तरक्रियेंत हे फार खर्च करितात. यावेळी जे जेवण होतें त्यास गुजरवाडा म्हणतात. यांच्यातील कुलदेवतेसाठी घरांत एक ओटा तयार करावा लागतो व प्रत्येक घरांत असा ओटा असतो. त्यावरील देवतेची पूजा कुटुंबाहेरील दुस-या माणसास करता येत नाही. अविवाहित मेलेल्यास मुंजा म्हणून त्याचें श्राध्द माघ महिन्यांतील सोमवारी व शुक्रवारी करितात. यांचे गुरू बहुथा गोसावी असतात. गुरू न केलेल्यास नुग्रा (निगु-या) म्हणतात आणि उठल्याबरोबर त्याचें तोंड दिसणें हा अपशकुन मानतात.
नेमाडांत यांचा हिंदुमुसुलमानमिश्रित असा एक पीरजादा पंथ आहे. इकडील गुजरांचा पोशाख हिंदुस्थानी पध्दतीचा असतो. यांच्यापैकी कांही मालगुजारी करितात. म्हैसूर संस्थानात बंगलौर येथे यांची वस्ती असून ते बहुतेक इंग्रजांच्या पलटणीत नौकर आहेत. यांच्यापैकी पुष्कळसे मुसुलमान झालेले आहेत.
[बॉम्बे ग्याझे पु.१,९; आर्किऑलॉजिकल रिपोर्ट पु.२; क्रूक-ट्राइब्ज ऍन्ड कास्टस; सेन्सस रिपोर्ट; १८८१-९१; रोज-ग्लॉसरी २ पु.; इंडियन अंटिक्वरी पु.५; रसेल ऍन्ड हिरालाल-सी.पी.ग्याझे; इबेटसन-पंजाब सेन्सस रिपोट.]