विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गुरखा- नेपाळमध्यें ज्या अनेक राष्ट्रजाती आहेत त्यामध्यें गुरखा ही एक प्रमुख जात आहे. हल्लीचे नेपाळचें राजघराणें याच जातीचें आहे. गंडकी नदीच्या खो-याच्या पूर्वेस त्रिशूलगंगा व मत्स्यगंगा या नद्यांच्या मध्यभागी गुरखा नांवाचा एक जिल्हा असून या जिल्ह्माची राजधानी गुरखा ही होती. हें शहर हल्लीची राजधानी जें खाटपांडु शहर त्या शहरापासून पश्चिमेस ५६ मैलांवर आहे. या गुरखा जिल्ह्यांत रहाणा-या लोकांना गुरखा अशी संज्ञा पडली आहे. 'गुरखा' याचा अर्थ गोरक्षक (गो रक्ष) असा होतो; व गाईचें रक्षण करणा-या लोकांना गुरखा हें नाव पडलें असावें असें दिसतें. कित्येकांच्या मतें, गोरखनाथ या नांवाचा जो नेपाळमध्ये एक प्रसिध्द साधु होऊन गेला त्याच्या नांवावरून गुरखा हे नांव रूढ झाले असावें. गुरखे लोक स्वतःला रजपूत लोकांचे वंशज म्हणवितात. मुसुलमानांनी ज्या वेळी चितोडवर स्वा-या केल्या त्यावेळी त्यांच्या भयाने कित्येक रजपुतांनी नेपाळमधील कुमाऊन प्रांताच्या सभोवतालच्या डोंगराळ प्रदेशाचा आश्रय केला. नंतर त्यांनी आसपासच्या मुलुखावर स्वारी करून गुरखा, नवकोट इत्यादी प्रांत जिंकून घेतले व त्या ठिकाणी त्यांनी आपलें राज्य स्थापन केलें. त्यावेळेपासून तो आजपावेतों नेपाळवर त्यांची सत्ता अबधित चालली आहे.
अशा रीतीनें ज्या रजपूत लोकांनी नेपाळमध्यें गुरखा जिल्ह्यांत वस्ती केली व नेपाळ देश जिंकून घेतला त्यांना गुरखा हे नावं जरी पडलें असलें तरी खश, गुरंग, प्रंगर इत्यादी जातींचाहि समावेश या गुरखे लोकांतच होतो. ब्रिटिशांच्या गुरखा पलटंणीमध्ये विशेषतः याच जातीच्या लोकांचा भरणा आहे. अशा रीतीनें गुरखा हें नाव खास रजपूत लोकांच्या नेपाळमधील वंशजांनांच तेवढे लावण्यांत येत नसून वरील जातीचाहि त्यांत समावेश होतो असें दिसून येतें.
गुरखे लोक नेपाळांतील इतर जातीच्या लोकांपेक्षा दिसण्यांत अधिक चांगले आहेत. हे लोक अंगाने सडपातळ असून उंच असतात. गुरखे लोकांत क्षात्रतेज द्दष्टीस पडतें. त्यांचा पेशा लष्करी शिपायाचा असून सैन्यामध्यें यांचीच संख्या पुष्कळ असतें. कृषिकर्म अगर व्यापार या बाबतींत ते मागासलेले आहेत. ते ऐदीपणात आपला सारा वेळ घालवितांना द्दष्टीस पडतात. इतर लोकांपेक्षा नीटनेटकेपणांत गुरखे लोक श्रेष्ठ आहेत. हे लोक निळ्या रंगाचे कमरबंद गुंडाळतात व त्यांत एक मोठा सुरा लटकावून देतात. या सु-यास 'कुकरी' असें म्हणतात. थंडीच्या दिवसांतहि गुरखे लोक हेच कपडे परिधान करतात. फक्त या कपड्यांच्या आंतील अंगास कापूस लावलेला असतो. श्रीमंत लोक आपल्या कपड्यांचा आंतला भाग बक-याच्या केसांनी मढवून घेतात, व डोक्यास चित्रविचित्र रंगाच्या कापडाच्या तुकड्यांची टोपी घालतात. अधिकारी लोकांच्या टोप्यांनां कलाबतूची फीत लावलेली असते.
गुरखे लोक मांसाहारी आहेत. नेपाळच्या उत्तरेकडील पहाडांतील व तराईंतील बक-यांचें मांस हे लोक मोठ्या आवडीनें खातात. याशिवाय शिकारीचा यांनां फार नाद असल्यानें रानडुकरें, ससे, इत्यादि प्राण्यांची शिकार करून त्यांचें मांस हे लोक खातात. रानडुकरें पाळून त्यांनां धष्टपुष्ट करून नंतर त्यांचें मांस खाण्याची पद्धत श्रीमंत लोकांत आढळते.
गुरखे लोक हिंदूधर्मीय आहेत. अर्थातच यांच्या ब-याचशा चालीरीती हिंदुस्थानांतील लोकांप्रमाणेच आहेत. यांच्यांत जातिभेदाचेंहि थोडे फार वर्चस्व आढळून येतें. बहुपत्नीकत्वाची चाल यांच्यामध्ये आढळून येते. गुरखे लोक आपल्या बायकांवर करडा अंमल गाजवितात. आपली बायको व्यभिचारी आहे असा एखाद्या गुरख्याला संशय आला तर तो तिला भयंकर शासन करतो. जो पुरुष आपल्या स्त्रीशी वाईट संबंध ठेवतांना आढळेल त्याला गुरखा आपल्या सुरीनें ठार मारितो. विधवाविवाहाला गुरखे लोकांत पूर्ण मनाई आहे. नेपाळचें राजघराणे गुरखा जातीचें असल्यानें, या राजघराण्यांतील लोक हिंदूधर्मीय आहेत. अर्थात् नेपाळांत हिंदूधर्मातील उत्सव व यात्रा मोठ्या थाटांत साज-या केल्या जातात. या यात्रांमध्ये इंद्रयात्रा रथयात्रा, शिवरात्र्युत्सव प्रमुख आहेत. याशिवाय दुर्गापूजा, पशुपतिनाथ यात्रा, रामनवमीचा उत्सव व हिंदूधर्मांतील इतर उत्सव गुरखे लोकांत भक्तिभावानें साजरे करण्यांत येतात. [संदर्भग्रंथ-राइट-हिस्टरी ऑफ नेपाल १८७७; ज. रा. आजगांवकर-नेपाळवर्णन १९०६; कॅप्टन व्हॅन्सीटार्ट-नोट्स ऑन दि गुरखाज (१८९८);]