विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गुरू- या विषयावर विवेचन करतांना शिल्पी वर्गाचें शिक्षण देणा-या वर्गाचे विवेचन वगळलें आहे, आणि ब्राह्मण व क्षत्रिय या वर्गाचें शिक्षण देणारा वर्गच अनुलक्षिला आहे. या शिक्षक वर्गाचें ऐतिहासिक विवेचन करतांना मंत्रकालाकडे प्रथम लक्ष जातें. मंत्रकालांत गुरू ही कल्पना फारशी विकसित झालेली दिसत नाही, कां की, मंत्र स्वयंस्फूर्तीने तयार होत किंवा अनुकरणानें होत. परंतु त्याच्या वाढीसाठी पध्दतशीर शिक्षण देणा-या वर्गाचे आस्तित्व शक्य दिसत नाही. बृहतयज्ञसंस्थेचा म्हणजे संहितीकरणाचा काल आला तेव्हा मोठ्या वाड्.मयसंग्रहाचें अध्ययन, पठण, अभ्यास व विनियोग यांचे शिक्षण देणा-या वर्गाची अवश्यकता उत्पन्न झाली. कारण यज्ञांची घटना अशी होऊं लागली की, तींत पुष्कळ दिवस परिश्रमपूर्वक शिकविणारा वर्ग असल्याशिवाय त्या विद्येंत प्रावीण्य शक्य नव्हतें. यामुळे विशिष्ट आचार्याच्या अस्तित्वास अवश्यक अशी परिस्थिति उत्पन्न झाली. यावेळच्या संहितीकरणकालीन अनेक आचार्यांची नांवे आज उपलब्ध आहेत आणि त्यापैकी ज्यांच्या नावांवर विशिष्ट याग किंवा कोणते तरी प्रचलित कर्म रूढ झालें त्यांची नावें वेदविद्या विभागांत २१० व्या पृष्टांत दिली आहेत. त्यांत अंगिरस, गर्ग, अत्रि, कुसुरूबिंदु, बृहस्पति, नाचिकेता, वशिष्ट इत्यादी नांवे प्रामुख्यानें सांगता येतील. या आचार्यवर्गामध्ये होत्याच्या किंवा अध्वर्यूच्या किंवा सामकाच्या कर्माच्या शिक्षणाचा उपक्रम असावा. अथर्व्याची गुरूपरंपरा इतरांच्या गुरूपरंपरेइतकी बलवान दिसत नाही. ज्यावेळी यज्ञसंस्था जोरानें चालू होती त्यावेळेतच वादाचे अनेक प्रसंग येत व शिक्षणहि अधिक कारणमीमांसापूर्वक देणे अवश्य होई. त्यामुळै त्रैविद्यांच्या आचार्यपरंपेंतूनच शिक्षादि सहा वेदांगे निर्माण झाली आणि त्या वर्गातूनच पुढें भारतीय शास्त्रीय शिक्षण देणारांचा वर्ग निघाला व तो आजपर्यंत चालत आला आहे आणि कदाचित् आजचाच वर्ग हा परंपरेचा शेवट म्हणता येईल.
श्रौतकर्माविषयी अनास्था किंवा जुगुप्सा ज्या वर्गात उत्पन्न झाली तो वर्ग म्हटला म्हणजे आरण्यकांचा होय. या वर्गमध्ये अध्यात्म विषयाची जोपसना होऊं लागली आणि अध्यात्मविषय परंपरेने सांगणारे शिक्षक उत्पन्न होऊं लागलें. या शिक्षकांमध्ये जनक, याज्ञवल्क्य, यांची नावें मुख्यत्वें देता येतील. अध्यात्म ज्ञानासंबंधीच्या अशा प्रकारच्या गुरुशिष्य परंपरा ब्राह्मणकालांतहि होत्या हें शतपथ ब्राह्मण, जैमि. उ. ब्राह्मण यांतील मुरूशिष्यपरंपरांवरून दिसून येतें. या परंपरांची माहिती बुध्दपूर्व जग (विभाग ३ पृष्ठ ४३७) या भागांत दिली. या वर्गानेच पूर्वमीमांसेखेरीज इतर दर्शनांची जोपासना केली. व त्यामुळे विशिष्ट दर्शनाचें आचार्य उत्पन्न झाले. श्रौताचा आचार्यवर्ग आणि आरण्यकाचा आचार्यवर्ग हे एकमेकांपासून अगदी पृथक् नव्हते. उदाहरणार्थ याज्ञवल्क्य जैमिनी यांची नांवे दोहीकडेहि येतात. आणि त्याचा परिणाम ज्ञानविकासावर झालाच आहे. तो इतका की, मीमांसा हे शास्त्र जरी श्रौत्यांच्या परंपरेतील आहे तरी तें आरण्यकीयांच्या दर्शनपरंपरेंत योजिलें गेलें. आणि जेव्हा श्रौतसंस्था बंद पडल्या तेव्हां वेदांगे व दर्शने मिळून होणारा शास्त्रसमुच्चय हा एका सामान्य वर्गास अभ्यासविषय झाला आणि श्रौती व पाठ म्हणणारे वैदिक एवढ्यांच्याच हाती श्रौतज्ञानाची परंपरा राहिली. या स्थितीत हे दोन्ही अद्याप चालूं आहेत.
आतां पुराणद्दष्ट गुरूपरंपराविषयी विचार करूं. मात्र संस्कृतीपासून निराळी असलेली जी सूतसंस्कृति त्या संस्कृतींतील वाड्.मयाचें मात्रसंस्कृतीचा स्पर्श होऊन जें रूपांतर झाले ते आज आपणास इतिहासपुराणवाड्.मय म्हणून उपलब्ध आहे. या वाड्.मयाकडे लक्ष्य देतां आपणास दोन, तीन प्रकारच्या गुरूपरंपराची कल्पना येते. सूतवर्ग आपला व्यवसाय गुरूपरंपरेने चालवीत असे याविषयी संशय नाही. परंतु दैत्यगुरू व देवगुरू यांची वर्णनें जी येतात त्यावरून तें गुरूत्व कोणत्या प्रकारचें असावें याविषयी कल्पना करतां येत नाही. ते आध्यात्मिक गुरू असतील असें म्हणवत नाही. आणि असल्यास हे अध्यात्मशिक्षण कोणत्याप्रकारें देत असावेत याची कल्पना होत नाही. दैत्यासुरांच्या अध्यात्मिक परंपरेची ओळख आपणांस इतिहासपुराणें करून देत नाहीत. आणि देवांचीहि जवळ जवळ तीच कथा आहे. देवगुरू जो बृहस्पति म्हटला आहे त्याचें नांव जर एखाद्या विचारपरंपरेशी संयुक्त असेल तर तें लोकायताशी म्हणजे नास्तिक्याशी होय. महाभारतामध्ये गुरूगृहाच्या संघटनेविषयी बरेंच विवेचन आहे. म्हणजे अनेक वर्षे विद्यार्थी गुरूकडे अभ्यास करतो, त्याच्या घरची अनेक कामें करतो आणि विद्यार्जन करून गुरूदक्षिणा देऊन निघून जातो हें चित्र आपणांस धर्मसूत्र कालानेंच दिसतें व यावरून हे सूतसंस्कृतीतील गुरूपरंपरेचें चित्र नसून श्रौतोत्तरकालाचें आहे व श्रौतत्तरकालीन ब्राह्मणांकडून इतिहासवाड्.मयांवर जो संस्कार झाला त्याचें हे द्योतक होय. शिवाय महाभारतांत हजारो शिष्य बाळगणा-या कुलपतीचा उल्लेख आहे. म्हणजे महाभारतांत गुरूकुलघटनेविषयी बरेंच विवेचन दिले आहे. पण शिक्षणक्रमाविषयी विवेचन फारसें नाही. पण असें समजण्यास हरकत नाही की, शिक्षणविषयक जी माहिती सूत्रग्रंथ देतात तोच शिक्षणक्रम महाभारताच्या संपादकांस अभिप्रेत असावा.
षड्दर्शनाचें सूत्रग्रंथ तयार झाले आणि त्यानंतर देशांत विशिष्ट मार्गाने मोक्ष मिळविण्यास साधक असे संप्रदाय तयार झाले. कोणी योगमार्गी तर कोणी भक्तिमार्गी. हे संप्रदाय मुसुलमानी स्वा-यानंतर हिंदुसंस्कृतीचा उच्छेद झाल्यामुळें तर फारच बळावले. कारण हिंदु विद्या शिकावयाची तरी कशाला; तिच्या योगानें राजाश्रय मिळत नाही; असा स्थितीत हिंदु विद्या पारमार्थिक मार्गांचीच उपशाखा बनली व सर्व तर्हेचे ज्ञान हें मोक्षसाधन मार्ग या नात्यानेंच जिंवत राहूं लागलें. या परिस्थितींत गुरूचें महत्व तर फारच बळावलें. शास्त्रीय ज्ञान देणारा गुरूवर्ग मोक्ष साधन करून देण्याचा बाणा बाळगूं लागला. परंपरेंनें जी बादरायण सूत्रें आली, त्यांवर भाष्यें होऊन निरनिराळे पारमार्थिक संप्रदाय त्यांच्याशी संबध्द होऊं लागले. जे संस्कृत ग्रंथ देशी भाषांत होऊं लागले त्यांतूनहि गुरूचें महत्व सांगणारे क्षेप येऊ लागले. उदाहरणार्थ, ब्रह्मोत्तरखंड घ्या. याचाच अनुवाद श्रीधरानें शिवलीलामृत म्हणून केला आहे. ब्रह्मोत्तरखंडांत गुरूचें प्राबल्य नाही पण शिवलीलामृतांत गुरूमुखाशिवाय गति नाही वगैरे वाक्यें उच्चारली गेली आहेत. मोक्षसाधनास विद्वतेची जरूर लागत नाही. आणि व्यक्तीचें मोक्षसाधन हें ध्येय झालें व विद्वत्ता हें ध्येय राहिलें नाही. त्यामुळें लफंग्या लोकांस गुरूपद मिळविण्याची आकांक्षा उत्पन्न झाली. शिष्य विद्वान व सदाचारी असला तरी त्यानें एखादा गुरू हा केलाच पाहिजे, आणि तो गुरू दुराचारी असला तरी हरकत नाही. असलेंहि वाक्यें उद्रीर्ण झालेली दिसतात. लिंगायतांसारख्या व जैनांसारख्या अपसृष्ट संप्रदायांमध्यें तर गुरूचे स्तोम फारच होते. सांप्रदायिक कालामध्यें गुरूचें वाढलेलें महत्व समाजाच्या शैक्षणिक अधोगतीचे दर्शक आहे. सांप्रदायिक गुरुंपैकी फारच थोड्यांस उच्च विचार किंवा ज्ञान यांच्या इतिहासांत स्थान देतां येईल.
गुरू व आचार्य या उपद्दष्ट्यांशिवाय पुरोहित हाहि एक वर्ग अस्तित्वांत होता व याच्याकडे कुलगुरूत्व असे. रामायणकाली वसिष्ठ हा रामचंद्राचा कुलगुरू होता व धनुर्वेद शिकविणारा गुरू विश्वमित्र होता.
गुरू शब्दाचा वैदिक वाड्.मयात सूत्रांपासून उल्लेख आढळतो. पारस्कर गह्मसूत्रांत शिष्यानें गुरूच्या सन्निध उपाकर्म, उत्सर्जनादि कर्मे करावी. व गुरूच्या आज्ञेने समावर्तन करावें वगैरे उल्लेख येतात. बौधायन गृह्यसूत्रांतहि अशाच प्रकारचे उल्लेख येतात. आश्वलायन गृह्मसूत्रांत र्औध्वदेहिकप्रकरणी गुरूचा उल्लेख आहे. पारस्कर गृह्म सूत्रांतील उल्लेखावरून गृह्मसूत्रकाली गुरूगृही अध्ययन करीत असलेली गुरूकुलें बरीच होती असें दिसतें. अध्यापकास गुरू शब्दापूर्वी आचार्य शब्द असावा असें दिसतें. देशोपनिषदापैकी नारायणोपनिषद यामध्यें शिष्यानें गुरूजवळ कसें वागावें व कोणते नियम पाळावें याचा उल्लेख आहे. गुरू कसा असावा याबद्दल मनु, याज्ञवस्क्य या स्मृतींत बरेंच विवेचन आढळतें. पूर्वी उपनयन संस्कार गुरूच करीत असावा. परंतु पुढें गुरूच्या अभावीं पित्यानें तो संस्कार करण्याची चाल रूढ झाली. अध्ययन समाप्तीनंतर गुरूदक्षिणा देण्याबद्दल सूत्रांत उल्लेख येतो. गुरूदक्षिणेच्या पौराणिक गोष्टी उत्तंक, कृष्ण-बलराम वगैरेंच्या प्रसिध्दच आहेत. गुरूच्या शिष्यांवरील अधिकारांसंबधानें विवेचन फारसे स्पष्टपणें करता येत नाही. शिष्याचें गुरूसंबंधी कर्तव्य अमर्यादित दाखविण्याचा प्रयत्न दिसतो. पण त्याचबरोबर शिष्यासंबधी गुरूचें कर्तव्यहि व्यापक दाखविलें आहे. प्राचीन शिक्षणविषयक माहितीसाठी ''शिक्षण'' पहा.