विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
     
गुरूदासपूर, जिल्हा.- पंजाबमधील एक जिल्हा. क्षेत्रफळ १८२६ चौ.मै. याच्या उत्तरेला काश्मीर संस्थान आहे. रावीच्या पश्चिमेकडे जम्मू जवळचा कांही भाग सोडून सर्व प्रदेश ओसाड व रूक्ष आहे. रावी नदी गुरूदासपूर व जाफर संस्थान यांची २५ मैलांची सरहद्दच आहे. लहान मोठे बरेच पाण्याचे प्रवाह डोंगराळ मुलुखांतून वहात गेलेले आढळून येतात. माधववपूरपासून रावीमधून जारीदुआव कालवा काढला आहे. तो डोंगरी मुलुखांतून मैदानांत आल्यावर गुरूदासपूर शहरापाशी त्याचे चार मोठाले विभाग होतात.

हवामान साधारणतः चांगले असतें. पर्वतसान्निध्यानें उष्मा फार होत नाही तरी पठाणकोट तालुक्यांत मलेरिया वगैरे आजार नेहमी असतात.

रावीच्या काठावर फार पुरातन कोरीव लेणी आहेत ती पांडवांची असावी असें सांगतात. पठाणकोट येथें हिंदूचे राज्य होतें. १५५५ मध्यें कलानौर येथेंच बहरामखाननें अकबराला गादीवर बसविलें. अकबरानें सूर वंशापासून हा भाग घेतला व जहांगीरचा बराच काळ याच भागांत जात असे. शहाजहाननें शहानहर (राजकालवा) काढला. डेरानानक या शहराचें नांव नानकावरून पडलें आहे. बंदा यानें आपल्या विक्रमाला सुरवात याच भागांत केली व त्याच्या आणि मोंगलांच्या ब-याच झटापटी झाल्या.

यानंतर हा भाग कांही दिवस अदीनाबेग याच्या हाती होता. त्यानें दिनानगर वसविलें. त्यानें अहमदशहा व दिल्लीचा बादशहा यांनां बरेच चकवलें. शेवटी मराठ्यांच्या आश्रयानें व साहाय्यानें हा लाहोर भागाचा गर्व्हनर झाला. त्याच्यानंतर शीखांच्या विस्ताराला विशेष जोर चढला. शीख संस्थानांत आपसांत बरेच दिवस झगडे चालले होते. कधी हा पक्ष तर कधी तो पक्ष वरचढ होई. शेवटी सर्व भाग रणजितसिंगानें एकत्र केले. १८११ मध्यें कनया संस्थान जप्त झालें व १८४६ मध्यें बराच भाग इंग्रजांस देण्यांत आला. १८४९ मध्यें बाकीचा भाग जप्त झाला व सर्वत्र इंग्रजशाही सुरू झाली. या भागाच्या घटनेंत बरेच वेळा फरक झाले. १८५७ मध्यें येथें काहीहि गडबड झाली नाही. १८६२ मध्यें जिल्ह्याची हल्लीची रचना झाली. कांही अर्वाचीन इतिहासकार म्हणतात की अलेक्झांडरचें संगल व कटईचा किल्ला ही याच जिल्ह्यांत असावीत. पण ही स्थानें निश्चित झाली नाहीत. इतर प्राचीन वस्तू ब-याच आहेत.

या जिल्ह्यांत १० शहरे व २२३४ खेडी आहेत. वस्ती (१९२१) ८५२१९२ गुरूदासपूर, शक्करगड, पठाणकोट व बटाला हे चार तालुके आहेत.

जमीनमहसुलाच्या पध्दती भैयाचारा व पट्टिदारी या आहेत. गहूं, हरभरा, तांदूळ, मका ही मुख्य पिकें आहेत. कालव्यांच्या वाढीबरोबर शेतीचीहि वाढ होत आहे. पण शेतीच्या पध्दतीत बियाण्याचा वगैरे फरक मुळीच होत नाही. गुरेढोरे साधारण प्रतीचीच आहेत. शक्करगड तालुक्यांतले घोडे बरेच चांगले आहेत. एकंदर १३३३ चौ.मै. जमीन वहीत आहे. पैकी ३४४ चौ.मै. पाण्याखाली आहे.

कंकर (एक प्रकारची चुनखडी) व सोरा हेच काय ते खनिज पदार्थ आहेत. पठाणकोटपर्यंत नॉर्थ वेस्टर्न रेल्वेची शाखा जाते. रावी व बियासवरून नेहमी १५/२० ठिकाणी होड्या चालतात, पण त्यायोगें व्यापार फारसा होत नाही. धारिवाल येथे न्यूइनर्टन नांवाची प्रसिध्द लोकरीची गिरणी आहे. हातमागावरहि लोकरीचा बराच माल होतो. शाली व इतर ब्लॅकेटे वगैरे होतात पण यांत्रिक कामापुढें हा धंदा खालावत चालला आहे. सुती, रेशमी व लोकरीचें निर्भेळ व मिश्र अशा जातीचें कापड होतें. साबण, सत्रंज्या व गालीचे, चामड्याचें सामान, जीन वगैरे, साखर, सुतारकाम व दल्टोसी येथील दारू वगैरे माल तयार होतो. धान्य, गळिताची धान्यें, कापूस, लोकरी कपडा, दारू वगैरे माल निर्गत होतो. धान्य, तूप, कापूस, लोखंडी माल व कपडा या मालाची आयात होते, बहुतेक व्यापार रेल्वेनेंच होतो. सिथालकोट, जम्मू याशी सडकेंनें व्यापार होतो. बटाला हें व्यापाराचें मुख्य ठिकाण आहे. हा जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत बराच मागसलेला आहे.

तहसील- पंजाब, गुरूदासपूर जिल्ह्यांतला तालुका. क्षेत्रफळ ४९६ चौ.मै. लो.सं.(१९११) २२४५१५. यांत शहरे तीन व खेडी ६६१ आहेत. सारा व कर मिळून उत्पन्न ५१७ हजाराचें आहे. रावी आणि बियास या नद्यांच्या बाजूची जमीन उत्तम आहे. मधलीहि जमीन सुपीक असून तिच्यावर थोडेबहुत जंगलहि आहे. धारिवालच्या प्रसिध्द लोंकरीच्या गिरण्या याच तालुक्यात आहेत.

शहर- याच नावांच्या जिल्हा व तालुक्याचें मुख्य ठिकाण. उत्तर अक्षांश ३२ ३' व पूर्व रेखांश ७५२५' लो.सं.(१९११) ६२४८. येथील किल्ला शीख लोकांचा नायक बंदा यानें १७१२ च्या सुमारास बांधला. तेथे हल्ली सारस्वत ब्राह्मणांचा मठ आहे. जिल्ह्यांत हें मध्यवर्ती शहर आहे. पण व्यापारधंदा फार थोडा चालतो. बहुतेक व्यापारी घडामोडीचें बटाला हेंच मुख्य ठिकाण आहे. गुरूदासपूर येथे १८६७ पासून म्युनिसिपालिटी आहे.