विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गुलबर्गा, विभाग- हैद्राबादसंस्थानांतील एक विभाग, यालाच दक्षिणविभाग असें म्हणतात. सुभेदार गुलबर्गा येथें रहातो. क्षेत्रफळ २२११० चौ.मैल. लोकसंख्या (१९११) ३६७३१७१. शेकडा ८८ हिंदु, ११ मुसुलमान व बाकी इतर धर्मीय लोक आहेत. ह्यांत गुलबर्गा, उस्मानाबाद, रायचूर व बेदर हे जिल्हे आहेत. या विभागांत ३२ शहरें व ५५२१ खेडी आहेत. गुलबर्गा, रायचूर, ही मोठी शहरें आहेत. गुलबर्गा, रायचूर, लातूर, तुळजापूर वगैरे व्यापराची ठिकाणें आहेत. गुलबर्गा, रायचूर, कल्याणी, उदयगीर, अनागोंदी ही इतिहास-प्रसध्दि शहरे आहेंत.
जिल्हा- हैद्राबाद गुलबर्गा विभागांतील जिल्हा. क्षे.फ. ६७१९ चौ. मैल. मुसुलमानी अमलापूर्वी हा जिल्हा वरंगळच्या काकतीयांच्या अंमलाखाली होता. १४ व्या शतकांत महंमद तघ्लकाच्या ताब्यांत गेला. पुढें बहामनी राज्याचा अंमल काही दिवस राहून ह्याचा समावेश विजापूर बादशाहीत झाला. औरंगजेबाच्या स्वारीनंतर कांही दिवस येथे मोंगलाची सत्ता होती. पुढे असफजहानें त्याचा समावेश हैद्राबाद संस्थानांत केला. गुलबर्ग्याच्या किल्ला राजा गुलचंद ह्यानें बांधला व मुसुलमानांनी त्यांची बरीच सुधारणा केली. हा किल्ला लष्करी द्दष्टया महत्वाचा होता. औरंगजेबानें बांधविलेल्या कांही मशीदी येथे आहेत. चित्तापुर येथे पोर्तुगीजांचें चर्च आहे.
शहरें व खेडी मिळून गांवसंख्या १५९५ आहे. लोकसंख्या ११५०९८३. शेंकडा ८१ हिंदु, १५ मुसुलमान, शेंकडा ५३ कानडी भाषा बोलतात. २५ तेलगु, १४ उर्दु व ६ मराठी भाषा बोलतात. १९०५ मध्यें इतर जिल्ह्यांशी मुलुखांची अदलाबदल झालेली आहे. शेकडा ५८ लोक शेतीवर रहातात. कर्नाटकामध्यें कापसालायक काळी जमीन विपुल आहे. तेलंगणांमध्ये रेताड जमीन बरीच आहे व काळी जमीन थोडी आहे. कर्नाटकांत पांढरी ज्वारी, गहु, हरबरा, कापूस आणि जवस ही पिकतात. तेलंगणात पिवळी ज्वारी, बाजरी, तांदूळ, जवस, एरंड आणि ताग ह्यांचे उत्पन्न होते. तेलंगणांत भातलागवडीकरितां तलावाच्या पाण्याचा उपयोग करितात.
येथे जमाबंदीची रयतवारी पध्दत आहे. २४२८ चौ.मैलापैकी (१९०१ साली) १९५५ लागवडीखाली होती. १३८ मैल लागवडीलायक असून पडीत होती. १२६ मैल जंगलाखाली आणि २०९ लागवडीलायक असून पडीत होती. ज्वारी हें मुख्य पीक असून शेंकडा ६४ इतकी जमीन या पिकाखाली होती. बाजरी, गळिताची धान्यें, कापूस, तांदुळ आणि गहुं ही दुसरी महत्वाची पिकें होत. येथील जनावरें साधारणः बळकट आहेत. आंदोला तालुक्यांतील तट्टे चांगल्या प्रतीची आहेत.
चिंचोली तालुक्यांत ५१ चौ.मैल संरक्षित जंगल आहे. त्यांत साग व इतर इमारती लांकूड आहे. एकंदर जंगल (संरक्षित व इतर मिळून) १२६ मैल आहे. शहाबाद, चितापूर वगैरे ठिकाणी फरशीचे शहाबादी दगड सांपडतात. सुती व रेशमी साड्या आणि जरीचे कपडे व इतर कपडा हातमागावर तयार होतो. अंदोला व चिंचोली तालुक्यांत धनगरलोक टिकाऊ व निगळत्या घोंगड्या तयार करतात. गुलबर्गा येथें कापड तयार होते.
निर्गत माल- ज्वारी, बाजरी इ. धान्य व कडधान्य, कातडी, कापूस गळीताची धान्यें व तरवडाची साल आयात माल.-मीठ, मासे, अफू, सोनें, रूपें, साखर, सुत, धातु (लोखंड) वगैरे माल व्यापाराचें गुलबर्गा हे केंद्र आहे. लिंगाइत वाणी, कोमटी, मोमीन, मारवाडी आणि भाटिया यांच्या हातांत व्यापार आहे. या जिल्ह्यांतून जी. आय. पी. रेल्वे ५० मैल व निजाम रेल्वे ११५ मैल गेली आहे. एकंदर रस्त्याची लांबी ८९ मैल आहे. मुलखाच्या व्यवस्थेकरिता ह्या जिल्ह्यांचे तीन भाग केले आहेत, व त्या प्रत्येकाला दोन तीन तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यावर तहशीलदार आहे. नाझिम इ. दिवाणी हा मदत न्यायाधीश (जॉईट मॅजिस्ट्रेट) आहे. गुलबर्गा हें जिल्ह्यांचे मुख्य ठिकाण आहे. या जिल्ह्यांत साधारणतः मोठाले गुन्हे होत नाहीत. परंतु दुष्काळात घरफोडी व गुरांच्या चो-या होतात. सा-याचें उत्पन्न (इ.स.१९०८) १७ लाख आहे. गुलबर्गा येथे डिस्ट्रिक्टबोर्ड व म्युनिसिपालिटी आहे. इतर तालुक्यांत तालुकेबोर्डे आहेत. पहिला तालुकादार हा पोलिसाचा मुख्य अंमलदार आहे.
गुलबर्गा येथील तुरुंगात संतरज्या, टॉवेल व इतर कपडा आणि तंबू वगैरे सामान तयार होतें. शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा अत्यंत मागासलेला आहे. शेकडा फक्त २ लोकांना (३.८ पु. ४.११ स्त्रिया) लिहितां वाचता येतें.
तालुका- हैद्राबाद संस्थान. गुलबर्गा जिल्ह्यांतील तालुका. क्षे.फ.(१९१) ७७३ चौ.मैल आणि लो.सं.२१२०३४. गुलबर्गा हें तालुक्यांचे मुख्य ठिकाण आहे. तालुक्यांत २४९ गांवे असून ३७ जहागीर आहेत. याचें सा-याचें उत्पन्न २.८ लाख. १९०५ मध्ये महागाव तालुका यांतच सामील करण्यांत आला. या भागांत कापसाची उत्कृष्ट काळी जमीन आहे.
शहर- ही ब्राह्मणीराज्याची राजधानी होती. उ.अ.१७०२१' व पू. रे. ७६०५१'. राजधानी होण्यापूर्वी या गांवाचे नाव कुलबर्गा असें होतें. ते पुढे हसनगंगु या शहानें अहसनाबाद किंवा हसनाबाद असें ठेविले. परंतु कुलबर्गा हेंच प्रसिध्द राहिलें. हल्ली याला गुलबुर्गा-गुलबर्गा असेंहि म्हणतात. फारशी लिपीत 'क' आणि 'ग' यांचा नेहती घोंटाळा होतो. निजामाच्या राज्यांत हल्ली हें गांव असून तिकडील सरकारी कागदपत्रांत गुलबर्गा असेंच लिहितात. कुलबुर्गा आणि कुलबर्गा असे नांवाचे प्रकार आढळतात. मराठे लोक कलबुर्गे असें म्हणत. फिरोझ बहामनीनें येथे पुष्कळ मोठ्यामोठ्या सुंदर इमारती बांधल्या. त्यांत एक प्रख्यात मशीद आहे. ही सा-या हिंदुस्थानांतील मोठी मशीद असून ती स्पेनमधील कार्डोव्हाच्या मशीदीच्या नमुन्याप्रमाणें आहे. फिरोझच्या मरणानंतर (१४२२) कलबुर्गा येथून राजधानी हालली व बेदरास गेली. त्यामुळे तें गाव अनेक शतकें मागे पडलें. हल्ली मात्र ती एक व्यापाराची मोठी उतारपेठ झाल्यामुळें बरेंच भरभराटलेंले आहे.
येथें १७५७ मार्चच्या सुमारांस नबाव सलाबतजंगाचा मुक्काम होता. उदगीरच्या लढाईनंतर १७६० च्या मार्च एप्रीलांत निजाम आपल्या दोन्ही भांवासह कलबुर्ग्याकडे होता व त्यावर दाव म्हणून दादासाहेब गंगाकाठी होते. (रा.खं.१.११३, २७०). स १७९५ त कलबुर्ग्याच्या किल्लेदारानें किल्ला लढविण्याच्या तयारीनें तयार केला होता. खंदकांत पाणी वगैरे सोडून ठेविलें होतें. (खं.५.११३). हें शहद बहामनी राज्याची राजधानी असून तें विजयनगरच्या उत्तरेस व वरंगूळच्या पश्चिमेस ७५ कोसांवर आहे. याचें नाव हसन गंगूनें ''हसनाबाद'' असें ठेविलें होते. येथे सरकारी कचे-या, शाळा, तुरुंग वगैरे असून हें व्यापराचें एक मुख्य ठिकाण आहे. २ मैलांवर रेल्वे स्टेशन आहे. जुन्या इमारती, मसजिदी व किल्ले शहराच्या बाजूनें आहेत. बहुतेक सर्व भाग पडका आहे. बालाहिसार किल्ला व अपुरी राहिलेली मसजिद ही पहाण्याजोगी आहेत. येथे १९२४ साली मुसुलमानांनी मूर्तीची मोडतोड केली व बराच अत्याचार केला. येथे दोन कापसाच्या गिरण्या आहेत. पाण्याची कमताई आहे. येथें महाराष्ट्रीय हिंदूनी एक हायस्कूल चालविलें आहे.