विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गुलामगिरी, उत्पत्ति.- एका मनुष्याला दुस-या मनुष्यावर केवळ मालमत्तेप्रमाणें अधिकार चालविण्यास परवानगी देणारी जी समाजव्यवस्थेंतील पध्दति तिला गुलामगिरी म्हणतात. तथापि मालकाचा गुलामावरील हक्क व अधिकार केवळ मालमत्तेवरील हक्काइतका अमर्यादित नसतो. जुन्या रोमन कायदेपध्दतींत व रोमनोत्पन्न आधुनिक यूरोपीय गुलामपध्दतींत मालकाचा गुलामावर पूर्ण अधिकार नसून केवळ गुलामापासून श्रम किंवा काम करून घेण्याचाच फक्त हक्क आहे. वेस्टर्नमार्कने म्हटल्याप्रमाणें गुलामपध्दति ही केवळ औद्योगिक संस्था आहे. या अर्थाने आद्यकालीन व मागासलेल्या समाजांत विवाहित स्त्रियांची स्थिति गुलामासारखीच असते; आणि या समाजांत स्त्रियांना गुलामाप्रमाणे राबविण्यात येतें त्या समाजांत बहुधा गुलामपद्धतीचें अस्तित्व नसतें. पुढें प्रगत समाजांत एकदा गुलामपद्धति सुरू झाली म्हणजे मात्र स्त्रियांना गुलाम बनविण्यांत मालकाचा हेतू श्रम घेण्याचा नसून स्त्री या नात्यानें तिचा उपयोग करून घेण्याचा असतो. तसेंच प्राचीन व मागासलेल्या समाजांत कुटुबांत जो एक मुख्य कर्ता इसम असतो. तो स्त्रियांप्रमाणे कुटुंबातील मुलांना व इतर कौटुंबिक व्यक्तीनाहि गुलामाप्रमाणेंच वागवितो. तथापि दोहोंत बराच फरक असतो. दुसरी गोष्ट अशी की राजकीयदृष्टया जित देश किंवा मानवसमाज आणि जेता देश किंवा मानवसमाज यांचा संबंधहि केवळ गुलामाप्रमाणें नसतो. तसेंच यूरोपांत प्रचलित असलेली 'सफाइम' व गुलामपध्दति यांतहि बराच फरक आहे. प्राथमिक अवस्थेंतील जनसमाजांत गुलामगिरीची दोन स्वरूपें असतात. एक समाजातंर्गत व्यक्तीनां गुलाम करण्याची पध्दति व दुसरी समाजबाह्य व्यक्तींना गुलाम बनविण्याची पद्धति. यांपैकी समाजबाह्य व्यक्तींना गुलाम करण्याची पद्धति ही कालद्दष्टया अगोदरची होय. कारण प्राथमिक अवस्थेंतील समाज समतेच्या नात्यानें बध्द असतात. ते बहुतेक एकाच हाडामासाचें म्हणजे एकमेकांचे नातेवाईक असतात; आणि एका समांजातील किंवा टोळीतील इसमांनी आपसांत एकमेंकास गुलाम बनवूं नये असा सक्त नियमच केला जातो. अशा स्थितीत प्रथम गुलाम बनविण्याचा प्रसंग युद्धामुळें उत्पन्न होतो. युद्धांत कैद केलेले लोक हेंच प्रथमचे गुलाम होत. मात्र आद्यकालीन मानवसमाज हे सदासर्वदा एकमेंकांत लढत राहात असत. कधीच गुण्यागोविंदानें वागत नसत अशी जी समजूत प्रचलित होती ती मात्र खरी नाही. प्रागैतिहासिक पुराणवस्तुसंशोधनशास्त्र आणि रानटी समाजांचे मानववंशशास्त्र यांतील शोधांवरून असें सिध्द झालें की प्राथमिक अवस्थेंतील समाजहि शांततामय जीवनक्रमाचा उपभोग खास घेत असत. हॉबहाऊस व त्याचे सहकारी यांनी परिश्रमपूर्वक माहिती मिळवून असें सिध्द केलें आहे की, 'अयुष्यमान' समाज या सदराखाली अगदी अप्रगतावस्थेंतील मृगयावृत्तीनें राहणारे समाज येतात. आणि गुलामपध्दतीचे अस्तित्वहि नेमके याच प्रकारच्या समाजांत नसतें असें सिध्द झालेंले आहे. परंतु कालांतरानें निरनिराळ्या मानवसमाजांत लढाया होऊं लागल्यावर युद्धांत कैद केलेल्या लोकांना गुलाम बनविण्याची पध्दति सुरू झाली. अशा तर्हेच्या गुलामांना वागविण्याची रीत जेत्यांना सोयीची पडेल अशी अमलांत आली हेहि उघड आहे. अशा प्रकारच्या कैद्याची जिवंत न ठेवतां कित्येकदा पूर्ण कत्तलहि करून मारून खाणें किंवा खंडणी घेऊन सोडून देणे, किंवा कैद्यांची अदलाबदल करणें किंवा उदारपणानें अजिबात सोडून देणं, किंवा गुलाम बनवून ठेवणे वगैरे अनेक प्रकार सुरू झाले. हल्ली अस्तित्वात असलेल्या रानटी जातीत हे सर्व प्रकार आजहि चालू आहेत.
तथापि कोणताहि मानवसमाज अर्थशास्त्रद्दष्टया एका विशिष्ट प्रकारचा जीवनक्रम आक्रमूं लागल्याशिवाय गुलामपध्दति अमलांत आणीत नाही. उदाहरणार्थ, समाज जेंपर्यंत मृगयावृत्तीने राहणारा आहे तोपर्यंत गुलाम पाळण्याची पध्दति त्या समाजांत क्वचितच द्दष्टीस पडतें. कारण अशा समांजांत कोणतेहि उद्योगधंदे सुरू झालेले नसल्यामुळे गुलामांकडून करून घेण्यासारखें काम काहीच नसतें. उलट उदर भरणाकरतां प्रत्येकाला शिकार करण्यांत जीवापाड श्रम करूनहि स्वतःचे व वायकामुलांचे पोट भरणें जेमतेम शक्य होतें. आणि शिकारीसारखें काम गुलामांकडून करून घेणे अशक्यच असतें. कारण अशा स्थितीत त्याच्यावर देखरेख करणें अवघड असतें. त्यास पळून जाण्यास पुष्कळ संधि असते व उत्तम शिका-याचे गूण त्याच्या अंगी नसतात. यानंतरच्या गोपालवृत्तीच्या समाजांत गुलामपध्दतीची सुरूवात होऊं लागते. जनावरें माणसाळवण्याचें काम करणारांस मनुष्यांनांहि गुलाम बनवून त्यांकडून काम करून घेण्याचें कौशल्य सांधू लागते. प्रत्यक्ष पुराव्यानें ही गोष्ट सिध्द झाली आहे. पृथ्वीच्या पाठीवरील गोपालवृत्ती निम्याहून अधिक समाजांत गुलामपध्दति अस्तित्वांत असल्याचें आढळून आलें आहे. तथापि असे समाज वायव्य व ईशान्य आफ्रिकेच्या भागांत, काकेशसपर्वत व अरबस्थान एवढ्याच देशातं असून सायबेरिया, मध्यआशिया, हिंदुस्थान व दक्षिण आफ्रिका या भागांतील गोपालवृत्ती समाजांत गुलामपध्दति अस्तित्वांत नाही. समाजाच्या प्रगतीतील यापुढची पायरी म्हणजे कृषीवलवृत्ति. या पायरीला पोहोचलेल्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व समाजांत गुलामपध्दति सर्वत्र रूढ असलेली आढळते. तथापि गुलामपध्दति जेथें नाही असेहि शेतकी करणारे पुष्कळ समाज आहेत. शिवाय ज्या देशांत बिनमालकीची पडीत जमीन पुष्कळ आहे तेथे कोणी कोणत्या गुलाम बनून न रहातां स्वतः स्वतंत्रपणें जमीन करून उपजीविका चालवितो. परंतु देशांमध्ये सर्व जमीन खाजगी मालकीची बनून मोठा जमीनदार वर्ग तयार झाला म्हणजे शेतकीचें काम करणा-या मजुरांची किंवा गुलामांची जरूरी भासूं लागली व अत्यंत कमी खर्चाचे मजूर उर्फ गुलाम मिळविण्याची खटपट जमीनदार वर्गात सुरू होते आणि युद्धांत पाडाव केलेल्या लोकांस गुलाम बनविण्याची पध्दति जोरानें सुरू होते. समाजबाह्म व्यक्तीना गुलाम बनविण्याची ही रूढी वाढतां समाजांतर्गत व्यक्तीनांहि गुलाम बनविण्याचा मोह उत्पन्न होतो. असे गुलाम बनविण्याचे मुख्य मार्ग दोन. एक कर्जदारी व दुसरा गुन्हेगारी. कर्ज फेडू न शकणा-या ॠणकोला ठार मारण्याची चाल फार क्वचित आढळतें. उलट अशा ॠणकोनां गुलाम म्हणून सावकाराच्या ताब्यांत देण्याची रूढी पुष्कळ आढळते. अशावेळी ॠणको स्वतः गुलाम न बनतां स्वतःच्या बायकोला किंवा मुलांना गुलाम बनविण्याची रूढी पाडतात. गुन्हेगाराला किंवा त्याच्या नातेवाईकांना गुलाम करणें हा एक मार्ग होय.
गुलामांची स्थिति व वागणूक- तात्विकद्दष्टया मालकाची गुलामावर पूर्ण सत्ता असतें. हें खरें तथापि व्यवहारातः मालमाची ही सत्ता फार मर्यादित झालेली असते. रूढी व लोकमत यांच्या दडपणामुळे गुलांमाच्या कित्येक हक्कांना मान देणे मालकांना भागच पडतें. जिंवत ठेवणे किंवा ठार मारणें या हक्कासंबधानें पाहतां युद्धांतील कैद्यानां गुलाम बनविलेले असल्यास तो हक्क मालकांना न्याथ्यत:च प्राप्त होतो. तथापि मालकाशिवाय इतर कोणासहि गुलामास ठार मारण्याचा अधिकार नसतो, इतकेंच नव्हे तर गुलामाला ठार मारण्याच्या गुन्ह्याबद्दल मालकाला नुकसानभरपाई मागता येतें. पुढे अशा गुलाम स्त्रीपुरुषांपासून जन्मास आलेल्या गुलामांना ठार मारण्याचा अधिकार मालकाकडे उरत नाही. पाहिजे तर असे गुलाम दुस-यास विकून टाकण्याचा हक्क मालकास असतो. यानंतरची पायरी म्हणजे गुलांमाकडून कांही ठराविक मर्यादेपर्यंतच काम करून घेण्यचा अधिकार असतो. पुढे गुलामाला स्वतःच्या मालकीचें असे द्रव्यार्जन करण्याचा अधिकार प्राप्त होतो. इतकी मजल गेल्यावर उपर्जित द्रव्याच्या सहाय्यानें स्वतःचें स्वातंत्र्य गुलाम विकत घेऊ शकतो. कित्येक गुलामपध्दतींत एका मालकाच्या गुलामगिरीऐवजी दुस-या मालकीची गुलामगिरी पत्करण्याचा हक्कहि गुलामांस दिलेला आढळतो. वागवण्यासंबधीनें पाहतां युद्धातील कैद्याचें बनवलेले गुलाम किंवा परकीय समजांतून विकत घेतलेले गुलाम आणि मालकाच्या घरांत जन्मास आलेले गुलाम यांना मालक निरनिराळ्या प्रकारें वागवतात. घरांत जन्मलेल्या गुलामांना इतरापेक्षा फार सौम्यपणानें व सदयतेने वागविण्यांत येतें. तसेंच गृहकार्य करणा-या गुलामांना शेतकाम करणा-या गुलामांपेक्षा फार अधिक सवलती मिळतात. आफ्रिकेतील नीग्रो गुलामांना अमेरिकेंत वागविण्याची अलीकडील रीती सर्वात अधिक क्रूरपणाची असल्याचें सिध्द झालेंले आहे.
गुलामपध्दतीचे परिणाम- गुलामपध्दतीपासून मानवसमाजाला बहुविध फायदे झाले असल्याचें कित्येक लेखक प्रतिपादन करतात. त्यांपैकी एक मोठा फायदा असा झाल्याचें डीली व वॉर्ड हे लेखक सांगतात की, सतत शारिरिक कष्टानें काम करण्याची संवय मनुष्यजातीला गुलामपध्दतीमुळे लागली. मनुष्य स्वभावतः आलस्यप्रिय असल्यामुळें त्याला दीर्घोद्योग करण्याची संवय लावण्याचें काम अत्यंत कठीण होतें, व हें कठीण काम गुलामपध्दतीनें केलें आहे. तथापि गुलामांना सतत परिश्रम करण्याची लागलेली संवय त्यांच्या वंशजांत उतरून आतां मानवजात कष्टाळू बनली आहे हें विधान चुकीचें आहे. कारण जीवितशास्त्राचा असा सिद्धांत आहे की, जे गुण मनुष्यानें उपार्जन केलेले असतात ते वंशजांमध्ये संक्रमण पावत नाहीत. म्हणून दीर्घोद्योगिता हा गुण मानवजातीला गुलामपध्दतीमुळें लाभला हें म्हणणे शास्त्रसमंत नाही. गुलामपध्दतीमुळें अर्थशास्त्रांतील सुप्रसिध्द श्रमविभागाचें तत्व अमलांत आलें. हे म्हणणे खरे आहे. समाजामध्यें सत्ताधारी व मालक वर्ग अणि कामकरी व नोकर वर्ग असे दोन विभाग गुलामपध्दतीमुळें उद्भवले असें म्हणता येईल. तसेंच या गुलामपध्दतीमुळे सत्ताधारी मालक वर्ग उत्तरोत्तर अधिक श्रीमंत होऊन मोठा बलाढ्य बनला. व समाजातील ब-याचशा वर्गांमध्ये प्रत्यक्ष स्वहस्तानें घरकाम किंवा कोणतेंहि उद्योगधंद्याचें काम करण्याचा कंटाळा किंवा तिरस्कार या गुलामपध्दतीनेंच उत्पन्न केला.
विस्तार.- पृथ्वीच्या पाठीवर कोणकोणत्या देशांत गुलामपध्दतीचा प्रसार होता तें आता पाहूं.
हिंदुस्थान- पूर्वकाळी दास होते किंवा नाही हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. अंगमेहनतीची कामे बहुधा दास नांवाच्या विशिष्ट वर्गाकडून घेण्याचा सांप्रदाय सर्व देशांत पूर्वकाळी चालू होता. त्याप्रमाणें हिंदुस्थानांतही वैदिककाळी कदाचित् चालू असेल. ॠग्वेदामध्यें दास व दासी दान दिल्याचे उल्लेख आढळतात. त्रसदस्यूनं सोभरीस ५० स्त्रिया दान दिल्या (८.१९,३६) पण दास हे गुलाम कितपत व केव्हा होते हें प्रत्येक वेळेस पुरावा तपासून ठरविलें पाहिजे.
शूद्राचा विशिष्ट धंदा म्हणजे त्रैवर्णिकांची अथवा जेत्या आर्यांची सेवा करणें हाच ठरविलेला होता. ''परिचर्यात्मक कर्म शूद्रस्यपि स्वभावजम्'' असें भगवत्गीतेंत म्हटलें आहे. याशिवाय आर्य लोकहि जिंकिले गेले म्हणजे दास होत असत असें भारतीययुध्दकाळी दिसतें. मग हें जिंकणें युद्धांत असो किंवा द्यूतांत असो. अर्थात द्यूतांत जिंकणें म्हणजे स्वतःला पणाला लावून जिंकले गेले असतां दास होणें असाच प्रकार असे पांडवांनी आपल्यास स्वतःस पणास लावले तेव्हा ते दास झाले. या रीतीनें पणाला लावण्याचा प्रकार महाभारतकाळीसुद्धा असावा. कारण मृच्छकटिकांतहि असा प्रकार झालेला वर्णिला आहे. युद्धांत जिंकून शत्रूस ठार मारण्याच्या ऐवजी त्यास दास करण्याचीहि चाल क्वचित असावी. कारण वनपर्वात भीमानें जयद्रथास जिंकून बांधून आणला आणि ''यास दास केला आहे असें द्रौपदीस कळवा.'' असा निरोप पाठविला (वनपर्व अ. २७२). अर्थात् असा दास करण्याचा सम्प्रदाय क्कचिंत असावा असें दिसते. क्कचित् म्हणण्याचें कारण असें आहे की, याप्रमाणें आपल्याच भावावंदास दास करण्याची आर्य लोकांस गोडी किंवा इच्छा नसावी. दास झाला म्हणजे त्यास सर्व प्रकारचे सेवारूप कर्म करावें लागे. इतकेंच नव्हें तर त्याची स्वतंत्रताहि जाई. किंबहुना वर्णजातहि भ्रष्ट होत असली पाहिजे. द्रौपदी दासी झाली असें मानलें तेव्हा तिला पाहिजे त्या रीतीनें किंबहुना बटिकेप्रमाणे वागविण्याचाहि हक्क उत्पन्न झाला असें समजलें जात असे. अर्थात् क्षत्रिय लोकांस किंबहुना एकंदर आर्यलोकांस दास करण्याची तर्हा भारतीययुध्दकाळीहि नव्हती. दोन्ही प्रसंगी या जिंकलेल्या आर्य क्षत्रियांस दास्यापासून मुक्त करून सोडून दिलें आहे. यावरून असें दिसते की, भारतीययुध्दकाळी युद्धाचा जरी कडकडीत नियम कोठें कोठें चालू होता तरी तो हळूहळू बंद पडला. महाभारतकाळी पाश्चात्य देशांप्रमाणें परदेशांतील लोकांस व स्वदेशांतील लोकांस जिंकून दास अथवा गुलाम बनविण्याची चाल हिंदुस्थानांत नव्हती. घरकामाकरितां दास व दासी ठेवण्याचा प्रघात प्राचीन काळापासून आपणांस पेशवाईपर्यंत आढळतो. तसेंच भडोच बंदरांत गुलाम व सुंदर स्त्रिया बाहेरून येत असत व येथून बाहेर जात असें. पेरिप्लुसमध्यें वर्णन आढळतें (ज्ञानकोश विभाग १ पृ.२९९). ही चाल ग्रीस, रोम, इजिप्त वगैरे देशांत त्या काळी चालू होती आणि त्या देशाचें इतिहास वाचले म्हणजे आज सुस्थितीत असलेले हजारो स्त्रीपुरुष उद्यां जिंकलें गेल्यामुळें भयंकर दास्यत्वांत किंवा गुलामगिरीत कसे पडत हें वाचून आपल्यास सखेदाश्चर्य वाटतें. कोणत्याहि शहराला वेढा पडून शहर जिंकून हस्तगत झालें म्हणजे तेथील लढवय्ये पुरूषांची कत्तल व्हावयाची व त्यांच्या सुंदर स्त्रिया गुलामगिरीत जावयाच्या असा नियमच असे. होमरमध्येंहि असेंच वर्णन वारंवार येतें आणि ग्रीक लोक आपल्या वीरांस तुम्हांस ट्रॉयमधील सुंदर स्त्रिया उपभोगास मिळतील असें प्रोत्साहन देत असत. प्रसिध्द हेक्टरच्या पत्नीस आपलें शेष आयुष्य दास्यत्वांत घालावें लागलें. असा प्रकार महाभारतकाळी हिंदूस्थांनात मुळीच नव्हता असें म्हटले असता चालेल. हिंदुस्थानांत पाश्चात्य देशांतल्याप्रमाणें गुलामगिरी नव्हती हें पाडून ग्रीक लोकांस आश्चर्य वाटलें आणि त्यांनी आपल्या ग्रंथात ही गोष्ट नमूद करून ठेविली आहे. ''हिंदुस्थानांतील लोक स्वतःस किंवा परदेशांतील लोकांस दास अथवा गुलाम करीत नाहीत. ते स्वतः स्वतंत्र असून दुस-याचें स्वातंत्र्य हिरावून घेण्याची त्याची इच्छा नसे असा ग्रीक इतिहासकाराचा पुरावा आहे. या जोडपुराव्यावरून महाभारतकाळी दास अथवा गुलाम फारसें नसावेत. दास म्हणजे शूद्र असा अर्थ महाभारतकाळी ठरीव दिसतो. (गौवोंढारं धावितारं तुरंगी शूद्रा दासं ब्रह्मणी याचकंच) गाई पुत्रास जन्मेल तर तो ओझेंच ओढील, आणि घोडी प्रसवेल त्यास धावावें लागेल. शूद्र स्त्री पुत्र प्रसवेल तर त्यास दास व्हावें लागेल आणि ब्राह्मणी पुत्र प्रसवेल त्यास भीकच मागावी लागेल. या श्लोकांत वर्णिलेली मर्म फार मजेदार आहे. दास म्हणजे शूद्र म्हणजें यावरून दिसतें, आणि शूद्राचें कामहि परिचयाचें असे ठरलें होतें तरी सर्वच शूद्र सेवा करीत होते असें नाही. ज्याप्रमाणें सर्वच ब्राह्मण भिक्षा मागत नाहीत त्याप्रमाणें सर्वच शूद्र दास नव्हतें. कित्येक स्वतंत्र धंदा करून पोट भरीत असत व त्यांजवळ द्रव्यसंचहि होत असे. ते श्राद्धादि कर्म करण्यासही योग्य आहेत असें ठरलें होतें व दानहि करीत असत. पण त्यांस तपश्चर्या करण्याचा अधिकार नव्हता. सर्वच शूद्र दास नव्हते पण सर्वच दास शूद्र होते ही गोष्ट मात्र खरी होती. शूद्राशिवाय इतराकडून नोकरीची कामें महाभारतकाळी घेत नसत असें दिसतें. ब्राह्मण शूद्रांची कामें करू लागतील हा कलियुगांतील भयंकर प्रसंग होय. अशा रीतीने शूद्राचाहि दरजा पाश्चात्य देशांतील दासांपेक्षा अधिक श्रेष्ठ होता. त्यांस मारहाण करण्याचा मालकास हक्क नव्हता. त्यांचा प्राण घेईपर्यंत पाश्चात्य देशांत हक्क असे, परंतु येथें तशी स्थिती मुळीच नव्हती. किंबहुना येथे दास नव्हतेच असें मानलें पाहिजे. गृहस्थानें नोकरचाकरांस अन्न घालून नंतर आपण जेवावें येथपर्यत नियम महाभारतांत आहेत. शूद्रांस जुनें झालेले वस्त्र द्यावें असा नियम होता. तसेच जोडा, छत्री, पडदे, वगैरे जुन्या वस्तू द्यावें. शूद्राला द्रव्यसंचय करण्याचा अधिकार नाही. त्याचें द्रव्य म्हणजे मालकाचें. ही गोष्ट दासालाच लागू आहे. ब्राह्मणाकडे शूद्र आला असता त्याचें पोषण केलेच पाहिजे; किंबहुना तो अनपत्य मरेल तर त्याला पिण्डहि द्यावा असें सांगितले आहे (शां.पं.अ.६. भा.पु.६ पान १२०). शूद्राने म्हणजे दास नसेल त्यानें अमंत्रक पाकयज्ञ करावा वगैरे वर्णन आहे. अर्थात् दास्याचें स्वरूप शूद्राच्या परिस्थितीचे मुळीच नव्हतें. तथापि दास्य हें दास्यच होय. आणि सप्तर्षि यांच्या कथेंतील (अनु.अ.९३) त्यांचा शुद्र सेवक शपथ बहातांना असें म्हणतो की, ''मी पुन्हां पुन्हां दास जन्मासच येवो, तर अशा घरच्या शूद्र सेवकांस व दासांस कोणतेंच वेतन देत नसत अन्नवस्त्र हें त्याचें वेतन असे.
अशा शूद्र दासांशिवाय अन्य मजूर असलेच पाहिजेत व निरनिराळे धंदेवाले शिल्पीहि असलेच पाहिजेत. कोळी, कोष्टी, सुतार वगैरे कारागीरहि असलेच पाहिजेत. त्यांना वेतन काय देत असत याचा खुलासा होत नाही. बहुधा शेतीच्या कामांत मजूरांचा उपयोग होत नव्हता. महाभारतकाळी शेती करणारे खुद्द आर्यवैश्यच असत. अशाच लोकांपैकी जाट वगैरे हल्लीचें लोक आहेत. व दक्षिणेकडील शेतकरी मराठें हेहि असेच आर्य आहेत. हे वैश्य शूद्रदासांच्या सहवासानें शेताचा सर्व धंदा करीत. उद्यम, शिल्पे व शेती करणारे लोक शुद्र समजलें जाऊ लागण्याचें मुख्य कारण असें की, शूद्रत्व आणि द्विजत्व यांतील भेद कर्ममूलक न रहाता संस्कारमूलकच झाला.
कौटिल्याच्या काळी गुलाम म्हणून स्वतःला किंवा दुस-याला विकता येत असे, पण या गुलामांना चांगल्या रीतीने वागविण्यासंबधी व त्यांचे सर्व वारसाचे हक्क देण्यासंबधी सरकारी नियम असत. गुलामाला स्वतंत्रता मिळविता येई. गुलामाची संतति 'आर्य’ म्हणून समजली जात असे. गुलाम स्त्रीला यजमानापासून मूल झाल्याबरोबर ती व मूल स्वतंत्र म्हणून गणली जात. कोणाहि 'आर्य’ मनुष्याला गुलाम बनविण्याबद्दल कडक शिक्षा असे.
मनुष्य गुलाम बनण्याची कारणे मनुस्मृतीत सात व नारदस्पृतीत पंधरा सांगितली आहेत. त्यांत युद्धांतील कैद, कर्जदारी, गुन्हेगारी, दारिद्र्य, दुष्काळ, गुलाम आईबापाच्या पोटी जन्म ही प्रमुख आहेत. स्वतःच्या मुलांना गुलाम म्हणून विकण्याची चाल प्राचीन समाजांत होती. हिंदुधर्माशास्त्रांतील दत्तकपध्दती ही याच चालीपासून निघाली असावी. गुलामपध्दतीचा दुसरा एक प्रकार म्हणजे हिंदुसमाजातील शूद्र व अतिशूद्र जाति हा होय. याप्रमाणें हिंदुस्थानांत गुलामपध्दति निरनिराळ्या स्वरूपांत ब्रिटिश अमदानीपर्यंत चालू असल्याचें आढळतें ती कायद्यानें बंद करण्याचें काम ब्रिटिश सरकारनें हळूहळू केलें. १८११ मध्यें परदेशांतून आणलेले गुलाम येथे विकण्याची मनाई करण्यांत आली. १८४३ मध्यें सरकारी अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारची गुलामपध्दति कायदेशीर मानूं नये असे ठरलें. आणि १८६० पासून इंडियन पिनल कोडात कोणत्याहि इसमाला गुलाम म्हणून विकणें किंवा खरेदी करणे गुन्हा ठरवून त्याला शिक्षा सांगितलेली आहे. गुलामपध्दतीशी सद्दश असलेल्या मुदतबंदी मजूरपध्दतीची माहिती स्वतंत्र लेखात दिली आहे.
ग्रीस- इतर देशांतल्याप्रमाणे ग्रीसमध्यें गुलामपद्धति दोन कारणांमुळे चालू झाली. एक कारण दारिद्रय व दुसरें युध्द. दारिद्र्यामुळें एकाच समाजांतील व्यक्ती एकमेकांचे गुलाम बनत असत. युद्धामुळें परसमाजातील व्यक्ती गुलाम बनत. युद्धातील कैद्यांना गुलाम बनविण्याची पध्दति समाज मृगयावृत्तीतून कृषीवलवृत्तीत गेल्यावर पडतें. तथापि शेतकीचे कामहि वर्षभर पुरण्यासारखें नसल्यामुळे गुलामांना सतत पोसणें मालकाला फार जड जातें. समाज जेव्हा उद्यमवृत्तीप्रत पोहोचतो, तेव्हांच गुलामांकडून सतत काम घेऊन मालकांना अपार संपत्ति मिळवावयास सापडतें. ऐतिहासिक काळांतील प्राचीन ग्रीस देश कृषिवलवृत्तीतून उद्यमवृत्तीत संक्रमण पावण्याच्या स्थितीत होता. त्यावेळी गुलामपध्दतीचा त्यानें भरपूर उपयोग करून घेतला. शिवाय स्पार्टासारखी कांही ग्रीक समाज सर्वस्वी क्षत्रिय उर्फ लष्करी पेशाचे असल्यामुळे अशा समाजात युध्देत्तर सर्व कामें करवून घेण्याची पध्दत असे. त्यामुळें प्रागैतिहासिक होमरच्या काळांत गुलामपध्दति ग्रीसमध्यें पूर्णपणे अमलांत असल्याचें होमरच्या काव्यांवरून स्पष्ट दिसतें. त्या काळात शेतीचें काम व गुरे संभाळण्याचें काम पुरुष गुलामांकडून व घरकाम स्त्रीगुलामाकडून करून घेत असत. यानंतरच्या ऐतिहासिक काळाबद्दलची माहिती तर भरपूर उपलब्ध आहे. त्यावरून ग्रीसमध्यें पुढील कारणांनी गुलाम बनत असत असें दिसतें-(१) जन्म. तथापि या मार्गानें गुलामांची संख्या भरपूर मिळत नसे, कारण एक तर स्त्रीगुलाम फारसे नसत, व दुसरें गुलाम मुलें जन्मल्यापासून त्यांना पोसून काम करण्याइतकी वयानें मोठी होईपर्यंत वाढविण्यापेक्षां गुलाम आयते विकत घेणे कमी खर्चाचें असे. (२) विक्री. ग्रीक लोक स्वतःची मुलें विकीत असत व अशा मुलांना मरणापेक्षा अधिक त्रासदायक अशा गुलामगिरीत आयुष्य कंठावें लागत असे. शिवाय दरिद्री ग्रीक लोक कर्जाचा बोजा भयंकर वाढला म्हणले धनकोचे गुलाम बनत असत (३) युद्धांतील कैद. गुलामाच्या पैदाशीचा हाच मुख्य मार्ग असे. आशियांतील ग्रीकेतर समांजातील लोकांनाच नव्हे तर प्रत्यक्ष निरनिराळ्या ग्रीक राज्यांतील लोक एकमेकांसहि लढाईत कैद करून गुलाम बनवीत असत. तथापि ग्रीकांनी एकमेकांस गुलाम बनवूं नये असें मत पुढे येऊन कांही अंशी अमलांतहि आलें. (४) चाचेगिरी व चोरी. त्या काळांत समुद्रावरून किना-यावर उतरून लोकांना पकडून पळवून नेणें व परराज्यांत नेऊन विकणें हा भयंकर धंदा चाचेलोक मोठ्या प्रमाणावर करीत असत. मात्र खरेदीची रक्कम रोख किंवा मजुरीच्या रूपानें फेडल्यावर सदरहू इसम पुनः स्वतंत्र समजावा असा अथेएसचा कायदा असे. चोरी करणारे लबाड लोक लहान मुलांना पळवून नेऊन गुलाम बनवीत असत. अशा लोकांच्या तडाक्यांत सापडून कोण केव्हा गुलामगिरीत पडेल याचा काही नेम नसे. (५) व्यापार. लढाईतल्या कैद्यांशिवाय सीरिया, पाँटस, लीडीया व ग्रेस प्रांतातून, शिवाय इजिप्त, इथिओपिया, या देशांतूनहि गुलाम पकडून आणून विकण्याचा व्यापार या काळी चालू होता. सर्वांपेक्षां अशियांतले लोक फार आज्ञाधारक व चैनीच्या कलाकुसरींत निपुण म्हणून त्यांना बाजारांत मागणी फार असे. खुद्द अथेन्स शहरांत गुलामांचा मोठा व्यापार लत असे. शिवाय सायप्रस, सॅमॉस, इफेसस व चिऑस येथें गुलामाचें मोठे बाजार भरत असत.
घरकाम व खासगी शेती, खाणी व कारखाने ही कामे गुलामांकडून करवीत असत. त्याप्रमाणें सार्वजनिक सरकारी कामेंहि गुलामांना सांगत असत. शहराच्या बंदोबस्ताचे पोलीस गुलामच असत. सैन्य व आरमार यांत हलकी कामें करण्यास गुलाम ठेवींत. अथेन्समध्यें गुलामांना पुष्कळ चांगल्या रीतीनें वागवीत असत. क्रू वृत्तीच्या रोमन लोकांना तर हें ऐकून आश्चर्य वाटत असे. ग्रीसमध्यें गुलामांना स्वतःची खासगी मिळकत करण्यास सवड असे. लग्ने करण्यास रूढीने परवानगी असे. कांही खासगी स्वरूपाच्या धर्मिक विधीत त्यांना भाग घेता येत असे. शिवाय कोणी मालक निर्दयपणानें वागवीत असल्यास दुस-या मालकाकडे विकून घेण्याचा गुलामांना कायद्याने हक्क असे. गुलामावर लोभ जडल्यामुळें मरणोत्तर थडगें बांधून चांगलें स्मारक मालकानें केल्याची उदारणेंहि ग्रीसमध्यें घडत असत. शिवास स्वतःचें पैसे जमवून गुलामांना स्वतःची गुलामगिरीतून सुटका करून घेता येत असे. मालक खुष झाल्यास स्वतः होऊन तो गुलामास स्वातंत्र्यदान करीत असे. तथापि अशा प्रसंगी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कांही ठराविक नोकरी ठराविक काळपर्यंत घेण्याची अट मालक घालीत असत.
गुलामगिरीचें तात्विक द्दष्टया समर्थन करणा-या तत्ववेत्यांपैकी खुद्द ऑरिस्टॉटल हा एक होता हें सुप्रसिध्द आहे. पण गुलामांना क्रूरपणानें वागविणें, ग्रीकांनी ग्रीकानांच गुलाम करणें ह्या दोन्ही गोष्टी त्याला संमत नव्हत्या. प्लेटोनें तर या पध्दतीला दोष दिला आहे. एपिक्युरीयन पंथातलें तत्ववेत्ते स्वतःच्या सुखाकरिता व चैनीकरिता गुलाम बाळगावे असे निःशंकपणे प्रतिपादन करीत असत. उलट स्टोईक पंथी तत्ववेत्ते असें म्हणत की, स्वातंत्र्य व गुलामगिरी ही दोन्ही ज्ञानी पुरूषाला सारख्याच किंमतीची. स्वतंत्र किंवा परतंत्र स्थिति असह्म झाल्यास आत्महत्या करणें हा मार्ग प्रशस्त होय.
रोम.- रोमन लोकांची राहणीच अशा प्रकारची होती की, त्यांच्यात गुलामगिरीची पद्धति उत्पन्न होणें स्वाभाविक होतें. त्यामुळें गुलामपध्दतीला सर्व बाबतीत पध्दतशीर स्वरूप येऊन गुलामपद्धति फार विस्तृत प्रमाणावर अमलांत आली. रोमन लोकांनी देश जिंकण्यास आरंभ केला तेव्हापासूनच ते गुलाम पाळूं लागले, परंतु आरंभी त्यांच्या मालकीच्या जमिनी फारशा नसल्यामुळें रोमन इसमाजवळ गुलामांची संख्या अल्प असे. परंतु रोम येथें लोकसत्ता (रिपब्लिक) स्थापन होऊन जेव्हां रोमन साम्राज्य झपाट्यानें वाढूं लागलें त्यावेळी प्रत्येक लढाईत हजारों कैदी पकडून त्यांची विक्री होऊं लागली. एपायरसमध्यें जय मिळविल्यावर एमिलियस पॉलसनें १,५०,००० कैदी गुलाम करून विकले. तसेंच रोमन लोकांनी ट्यूटन लोकांनां जिंकलें तेव्हा ९०,००० व सिब्री लोकांना जिंकलें तेव्हा ६०,००० गुलाम विकण्यांत आले. ज्यूलियस सीझरनें गॉलमध्ये एका प्रसंगी ६३००० कैदी गुलाम विकले. पुढें बादशाही अंमलाच्या वेळी आफ्रिका, स्पेन, गॉल व आशियांतील देश यांमधून गुलाम आणून रोम येथें विकण्याचा व्यापार सतत चालू होता. शिवाय मनुष्याला गुलामगिरींत पाडणारी वर ग्रीससंबंधानें सांगितलेली सर्व कारणें रोममध्यें चालू होतीच.
रोममध्येंहि गुलामांनां पोलीसखाते, न्यायकोर्टे, तुरुंग वगैरे ठिकाणी हलक्या दर्जाच्या कामावर नेमीत असत. रोममध्यें व इतर प्रांतोप्रांतीच्या शहरांत रस्ते तयार करणें, गटारें साफ करणें, वगैरं कामें गुलामांकडून करवीत असत. खाजगी कुटुबांत स्वयंपाक, कपडें धुणें व शिवणे, गुरें सांभाळणें, शेतकाम करणें, इतकेंच काय पण मालकाच्या करमणुकीकरतां गायन, वादन, नृत्य ही कामेंहि गुलाम करीत असत. नाटकें, सर्कसी, द्वंद्वयुध्दे ही सार्वजनिक करमणुकीची कामें गुलामच करीत असत. मोठमोठ्या रोमन अधिकार्यांच्या, सरदारांच्या व धनिकांच्या पदरी हिशेबनीस, गृहव्यवस्थापक, वैद्य, कारागीर, लेखक, वाचक, ग्रंथसंग्रहव्यवस्थापक व यापेक्षाहि मोठ्या योग्यतेचे विद्वान ग्रंथकार, वैय्याकरणी, तत्ववेत्ते असत, ते वास्तविक परतंत्र गुलाम असत. पदुआ येथील विद्यांपीठांतील अध्यापक ग्रीक गुलाम असत. याप्रमाणें एक एका थोर रोमन गृहस्थाजवळ दोन दोन, चारचार हजारपर्यंत गुलाम असत. क्लोडियसच्या कारकीर्दीत इटलीमध्यें एकंदर गुलामांची संख्या २,०८,३२,००० होती असें म्हणतात. अशा गुलामासंबंधाने तारण्यामारण्यासुद्धा सर्व सत्ता रोमन कायद्यानें गुलामाच्या मालकाला दिलेली होती. गुलांमांनां खाजगी धनसंचय करण्याचा हक्क नसे, तसेंच विवाह करण्याचा हक्क नसे, पण मालकाच्या सवलतीनें या दोन्ही गोष्टी गुलाम करीत असत. गुन्ह्याबद्दल गुलामांना इतरांपेक्षा फार कडक शिक्षा असत. गुलामांची संख्या आरंभी कमी होती तेव्हा मालकाचा गुलामांशी प्रत्यक्ष परिचय होऊन स्नेहभाव वाढत असें व गुलामांना सवलतीनें व सौजन्यानें वागविण्यांत येत असे. पण पुढें एकेका मालकाच्या पदरी शेकडो, हजारो गुलाम झाले तेव्हा परस्परांची कधी गाठभेटहि नसे, व गुलामांना संभाळणे हे अवघड काम होऊन त्यांच्या हातापायांत बिड्या पडूं लागल्या. पुढे खाणीतून व कारखान्यांतून स्त्रीपुरुष गुलामांकडून अर्धनग्न स्थितीत व बिड्या अडकवून आणि चाबकाचा उपयोग करून काम करून घेण्यापर्यंत मजल गेली, व रोमन गुलामपध्दतीला फार क्रूरपणाचें स्वरूप आलें. या कारणानें गुलाम आपापसांत गुप्त कट करून मालकाविरूध्द मोठमोठी बंडें व दंगे करू लागले व मालकांच्या ताब्यातून पळून जाऊं लागले. रोमच्या इतिहासांत असे गुलामांच्या बंडाचे प्रसंग पुष्कळ आहेत. तथापि गुलामांना स्वतःचे स्वातंत्र्य पुनः प्राप्त करून घेण्याच्या बाबतींत रोमन कायद्यानें अधिक सवलती ठेवलेल्या होत्या. सवय एवढ्या बाबतींत रोमनपद्धति ग्रीकपेक्षा श्रेष्ठ होती. रोमन मालक पैसे घेऊन गुलामांना स्वतंत्र करीत असत व त्याच पैशांनी दुसरे गुलाम खरेदी करीत. पुढे रोमन बादशाहीच्या काळांत लढायाचें मान कमी होऊन औद्योगिक युगाला आरंभ झाला. तेव्हा रोमन बादशहांनी गुलामांना कायद्याने पुष्कळ सवलती दिल्या. मालकांच्या क्रूरपणाला पुष्कळ आळा घातला व गुलामांना स्वतंत्र करण्याच्या कमी स्वतः प्रत्यक्ष मदत पुष्कळ केली.
ख्रिस्ती धर्माचा परिणाम.- रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यापासून गुलामपध्दतीला सौम्य स्वरूप येऊन गुलामांची संख्यहि उत्तरोत्तर कमी होत गेली. ख्रिस्ती धर्माने खुद्द धर्मग्रंथात गुलामपध्दतीचा निषेध स्पष्टपणें केलेला नाही. तथापि ख्रिस्ती धर्मोपदशेकांनी ख्रिस्ती बनलेल्या रोमन मालकांकडून व विशेषतः ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या रोमन बादशहांकडून गुलामपध्दतीत प्रत्यक्ष उपदेशानें पुष्कळ सुधारणा घडवून आणली पुष्कळ गुलाम पदरी असणें हे मोठेंपणाचे लक्षण न मानणें, द्वंद्वयुद्धासारखें प्राणघातक खेळ गुलामांकडून न करविणें, युध्दकैद्याची खंडणी घेऊन ताबडतोब सुटका करणें, गुलामांना विशेष सवलती देऊन स्वतंत्र होऊं देणे, मनुष्यामनुष्यांमधील समानबंधुत्वाचें नातें ओळखून गुलामांना भूतदयेनें व सन्मानानें वागविणे इत्यादी गोष्टी धर्मोपदेशकांनी हळूहळू घडवून आणल्या. व्हाँन्स्टांटाईन थिओडोशियस व जस्टिनियन या बादशहांनी गुलामाच्या हिताचे असे अनेक कायदे केले.
गुलाम पध्दतीचे कृषीदासामध्यें रूपांतर- तथापि उपर्युक्त सुधारणांनी गुलामपद्धति बंद पडून एक स्वतंत्र समाज न बनतां मध्यंतरी एक 'सर्फडमची' अवस्था उत्पन्न झाली. हें अवस्थांतर पुढील कारणांनी झालें. (१) रोमन साम्राज्य पूर्ण वाढून जेव्हा युध्दे कमी झाली तेव्हा गुलामांच्या संख्येंत भर घालणारे साधन जी युध्दकैद ती बंद पडून गुलामाचा पुरवठा कमी पडला. तेव्हा मालक गुलामाबद्दल जास्त काळजी व आस्था बाळगूं लागले व गुलाम स्त्रीपुरूषांपासून गुलाम संतति उत्पन्न करवून गुलामांची उणीव भरून काढूं लागले. (२) तथापि गुलामांची संख्या एकंदरीनें कमी कमी होत गेल्यामुळें स्वतंत्र मजूरवर्ग उत्पन्न होऊं लागला. प्रथम सरकारी, नंतर खासगी नोकर्यांत हळूहळू स्वतंत्र माणसें शिरुं लागली. श्रीमंत मालक कारखाने, खाणी व शेती यांत कामाला गुलाम लावीत असत. पण शेवटी तेंहि बंद पडले. (३) कारण रोमन साम्राज्याच्या उत्तर कालांत रोमन समाजाची संबंध घडीच बदलली. 'स्वतंत्र' रोमन नागरिकांचा वर्ग व गुलामाचा वर्ग ही पूर्वीची रचना हळूहळू नाहीशी होऊन सर्व समाजांत वंशपरांपरागत धंदेवाईक जाती उत्पन्न झाल्या. हें स्वरूप हिंदुंस्थानांतील जातीभेदासारखेंच होतें. (४) या अवस्थांतराला अनुसरून गुलामांचे अवस्थांतर होऊन त्यांना खंडाने शेती करणा-या कुळांचें स्वरूप प्राप्त झालें. अशी शेती करणा-या लोकांच्या जागोजागी वसाहती वाढल्या. हे गुलामगिरीतून सुटलेले लोक जमिनदाराला दरसाल खंड भरून बाकीच्या शेतीच्या उत्पन्नावर स्वतंत्रपणें उदारनिर्वाह करून राहूं लागले. अशा नवीन वसलेल्या गांवाचा जमीनमहसूल सरकारांत भरण्याबद्दल जमीनदार मालक जबाबदार असे व तो कुळें लावून शेते पिकवीत असे. या कुळाबद्दल पुढें कायद्यानें पुष्कळ बंधनें उत्पन्न केली. कुळानें गांव सोडून जातां कामा नये. इतकेंच नव्हें तर त्यानें विवाहसंबंध स-या जमीनदाराच्या कुळाशी करू नये असा निर्बंध कायद्यानें घातला. तसेंच कुळांनी आपल्या मुलांना वंशपरंपरा तेथेंच ठेवून शेती केली पाहिजे असा कायदाहि झाला. उलट जमिनदारांना खंड वाढविण्याचीहि कायद्यानें मनाई होती. कुळांना खाजगी धनसंचय करण्याचा हक्क होता. याप्रमाणें शेतीच्या बाबतीत गुलामपद्धति बंद पडून कृषिदासपद्धति (सर्फडम) अमलांत आली.
अर्वाचीन गुलामपद्धति.- कृषिदासपद्धति स्थापन झाल्यावर गुलामपद्धति कायमची नामशेष होणार अशी अपेक्षा करणें गैरवाजवी नव्हतें. परंतु दुदैवाने गुलामपद्धति १५ व्या शतकात पुन्हा सुरू झाली; इतकेच नव्हे तर तिला प्राचीन रोमन पध्दतीपेक्षाहि भयंकर क्रूर स्वरूप प्राप्त झालें. हीच अमेरिकेंतील सुप्रसिध्द नीग्रो गुलामपद्धति होय. हिचा थोडक्यांत इतिहास पुढीलप्रमाणे आहे- १४४२त सुप्रसिध्द दर्यावर्दी पोर्तुगालचा प्रिन्स हेनरी यांच्या हुकमतीखाली पोर्तुगीज लोकांनी आफ्रिकेच्या अटलांटिक महासागराकडील किना-याचें संशोधन करीत असतां पुष्कळ मूर लोक पकडून कैद केले. परंतु त्यांच्या मूर देशबांधवानी त्यांच्या मोबदला नीग्रो गुलाम व सोनें देऊन त्यांची सुटका केली. त्यामुळे पोर्तुगीजांची द्रव्यतृष्णा वाढून त्यांनी आफ्रिकेच्या किना-यावर ठिकठिकाणी वसाहती करून नीग्रो लोक पकडून आणून स्पेनमध्यें विकण्याचा क्रम सुरू केला. पुढे हयाटी बेट स्पेनच्या ताब्यांत आल्यावर तेथे त्यांनी निग्रो गुलाम नेले. विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की, अमेरिकेकडील या नूतन संशोधित भूप्रदेशांत निग्रो गुलामपद्धति सुरू करण्यासंबधीने ख्रिस्ती मिशनर्यांनी आक्षेप न घेता उलट या गोष्टीला थोडे फार उत्तेजनच दिलें. या कार्यातला प्रथमारंभापासूनचा चायपाचा सुप्रसिध्द विशप बार्टोलोम डीलास कासस हा होय. याने उच्च नैतिक तत्वाकडे दुर्लक्ष करून हायटी बेटांतील गुलामाचें हाल प्रत्यक्ष पाहिले असूनहि प्रत्येक स्पॅनिश वसाहतवाल्यानें फक्त एकेक डझन गुलाम बाळगावे या अटीवर गुलामांच्या व्यापारास संमति दिली. अशा रीतीनें अमेरिकेंत आफ्रिकन निग्रो गुलामांचा व्यापार सुरू झाला. या व्यापारांत भाग घेणारा पहिला इंग्रज सर जॉन हॉकिन्स हा होय. प्रथम इंग्रज व्यापारी स्पॅनिश वसाहतींनाच गुलाम पुरवीत असत. १६२० मध्यें व्हर्जिनिया या इंग्रज वसाहतीतील जेम्स टाऊनमध्यें प्रथम निग्रो गुलाम डच व्यापार्यांनी आणून विकले. याप्रमाणें ब्रिटिश अमेरिकेंत शेतीकडे निग्रो गुलाम उपयोगांत येऊं लागून उत्तरोत्तर यांचे प्रमाण इतकें वाढलें की, १७९० मध्यें एकट्या व्हर्जिनिया संस्थानांत २,००,००० निग्रो गुलाम होते. इंग्लंडमध्ये प्रथम कांही विशिष्ट कंपन्यांनाच गुलामांचा व्यापार करण्याचा हक्क दिलेला होता. पण तिस-या विल्यम राजानें हा निर्बंध काढून या व्यापाराची परवानगी सर्वांना बिनशर्त दिली. यामुळें इंग्रज व्यापारी स्पॅनिश वसाहतीनांहि गुलाम पुरवूं लागले. हा व्यापार इतका फायदेशीर असे की, मोठमोठ्या युद्धांचे तह ठरतांना या व्यापाराच्या हक्काबद्दल राष्ट्राराष्ट्रांत रणें माजत. १७१३तील युट्रेंटचा तह हे अशा प्रकाराचेंच उदाहरण होय. सर राबर्ट वालपोलला केवळ याच प्रकरणावरून स्वमताविरूध्द स्पेनबरोबर युध्द पुकरावें लागलें. १६८० ते १७०० एवढ्या अवधीत एका आफ्रिकनकंपनी नामक व्यापारी मंडळानें १,४०,००० गुलाम नेऊन विकले व इतर व्यापार्यांनी १,६०,००० गुलाम विकलें. १७०० ते १७८० या अवधीत एकट्या जमेका या इंग्रज वसाहतींत ६,१०,००० गुलाम विकले. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या सुमारास इंग्रजांचा हा व्यापार शिखरास पोहोंचला होता, तो युध्दकालांत जरा मंदावला. युद्धानंतर हा व्यापार पुन्हा जोरांत सुरू झाला. त्यासंबधाने पुढील विश्वसनीय आंकडे प्रसिध्द आहेत. दरसाल ब्रिटिशांन ३८०००, फ्रेंचांनी २००००, डचांनी ४०००, डेन्सानी २०००, व पोतुगीजांनी १०००० याप्रमाणें सालोसाल एकंदर ७४००० निग्रो गुलाम युरोपियनांनी अमेरिकेंत नेऊन विकण्याचा क्रम चालू ठेवला होता व त्यांपैकी निम्याहून अधिक व्यापार ब्रिटिशांच्या हाती होता.
आफ्रिकेतून अमेरिकेंत निग्रो गुलाम नेण्याचे कारण एक तर स्पॅनिश लोकांनी अमेरिकेत वसाहती करतांना तेथील इंडियन लोकांची अत्यंत क्रूरपणानें बरीचशी कत्तल केली होती. आणि दुसरे कारण एक निग्रो गुलाम चार इंडियना इतकें काम करीत असे. निग्रो पकडण्यापासून अमेरिकेंत नेऊन विक्रीपर्यंत सर्वच प्रकार अमानुष निर्दयपणाचा होता. यूरोपियन लोक निग्रोना पकडण्याचें काम निग्रो पुढार्यांकडून करवीत असत. हे लोक खेड्याला प्रथम आग लावून देत आणि तेथील रहिवाशी बाहेर पळूं लागले म्हणजे त्यांना कैद करीत. या झटापटीत कांही निग्रो मरत ते वगळले तरी शेकडा१२॥ जहाजांतून अमेरिकेपर्यंत जातांना वाटेंत मरत शेंकडा ४॥ बंदरात उतरून विक्री होईपर्यत मरत व शेकडा १/४ तेथील हवापाणी न मानल्यामुळें गुलाम बनल्यावर मालकाच्या घरी मरत. प्रत्येक गुलामाला सुमारें २० पौंड किंमत येत असे. हे गुलाम बाजारात विकावयास बहुतेक नग्न स्थितीतच आणीत असत. खरेदी करतांना घोड्याप्रमाणें त्यांच्या तोंडातील दांत व सांधे तपासून पहात असत. निग्रो गुलाम दरसाल आफ्रिकेतून अमेरितेंत न्यावे लागत असत. कारण अमेरिकेंत त्यांची संख्या फारशी वाढत नसे. जमेकामध्यें १६९० साली ४०००० गुलाम होते आणि १८२० पर्यंत ८००००० आणखी गुलाम आले; तरी त्या साली तेथे गुलामांची एकंदर संख्या अवघी ३४०००० कायती होती. निग्रोची संख्यावृध्दि न होण्याचें कारण अर्थात् निग्रो स्त्रीगुलामांची कमतरता हें होय. जमेकामध्यें १७८९ साली स्त्रियांपेक्षा पुरुष निग्रो ३०००० अधिक होते. शिवाय निग्रो गुलामांना त्यांचे गोरे मालक फारच निर्दयपणाने वागवीत असत.
व्यापारबंदीची चळवळ.- वरील एकंदर हकीगत इंग्लंडमध्ये लोकांच्या कानी येऊन गुलामपध्दतीचें भयंकर स्वरूप यांच्या लक्षांत येतांच सर्व थोर मनाच्या लोकांचे मत या व्यापारविरूध्द बनले, अशा लोकांत पुढील प्रमुख इंग्रज होतेः-पोप, थॉमसन, सॅव्हेज, कौपर वगैरे कवी, हचसेन, जॉन वेस्ले, व्हिटफील्ट, आडाम स्मिथ, रार्बटसन, डॉ. जॉनसन, पॅले, ग्रेनरी, गिलबर्ट वेकफील्ड वगैरे लेखक व वक्ते. प्रथम १७२९ मध्यें ग्रेटब्रिटनमध्यें गुलामगिरी कायदेशीर आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होऊन यॉर्क व टालबॉट या अटॉर्नी जनरल व सीलिसिटर-जनरल कायदेपंडितांनी अस्तिपक्षी आणि चीफ जस्टिस होल्ट यांनी नास्तिपक्षी मत दिलें होतें. पुढे एक खटला प्रत्यक्ष कोर्टात चालून १७७२ त सर्व बेंचतर्फ लार्ड मानस्फील्ड यांनी असा निकाल दिला की कोणत्याहि गुलामाचें पाऊल ग्रेट ब्रिटनच्या जमीनीला लागलें की तो त्या क्षणापासून स्वतंत्र होतो. तिकडे अमेरिकेंत गुलामपद्धतिविरूध्द चळवळ क्वेकर लोकांनी अगोदर १६८१ पासूनच सुरू केली होती. तिची हळूहळू प्रगति होऊन १६८३त त्यांनी वेस्ट इंडिज बेटांतील नीग्रो गुलामांना स्वतंत्र करण्याकरतां एक निराळी संस्था काढली. अमेरिकेंतल्या पेनसिल्व्हानियन क्केकर लोकांनी यापेक्षा अगोदर प्रत्यक्ष कामास सुरवात केली होती. त्यांत जॉन बुलमन व ऍन्थॉनी बेनेझेट हे प्रमुख होते. १७७४ नंतर या कार्याकरिता इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. तथापि या चळवळीला प्रथम यश इंग्लंडमध्येंच आले. १७८६ पासून या विषयावर वाड्.मय प्रसिध्द होऊ लागलें. थॉमस क्लार्सननें या विषयावर एक निबंध लिहून बक्षीस मिळविलें व पुढें पुस्तकरूपानें तो निबंध बराच खपला. गुलामांच्या व्यापाराची बंदी करण्याच्या उद्देशानें १७८७ त एक कमेटी स्थापन झाली. तीत विल्यम विलबरफोर्स, जोशिया बेजवूड, बेनेट लँक्टन (डॉ.जानसनचा मित्र), झाकरिया मेकॉले हेन्री ब्रौधम व जेम्स स्टीफन हे इसम होते. पुढे पार्लमेंटकडे पुष्कळ अर्ज गेल्यामुळे गुलामांचा व्यापार या प्रश्नांसंबंधानें चौकशी करण्याकरता १७८८त प्राव्हीकौन्सिलचां एक कमेटी नेमण्यांत आली व कॉमन्ससभेने या प्रश्नाचा विचार करावा असा पिळचा ठरावहि पास झाला. पुढें पार्लमेंटच्या कमेटीनें साक्षी पुरावा घेतला व तदनुसार १७९१ मध्यें वेस्ट इंडिजपैकी ब्रिटिश बेटांत त्यापुढें गुलाम पाठवूं नये अशा अर्थाचा ठराव पार्लमेंटांत आला. पण १६३ विरूध्द ८८ मतांनी नापास झाला. १७९२ पासून सालोसाल विलबरफोर्स व त्याच्या इतर मित्रांनी गुलामाचा व्यापार बंद व्हावा अशा अर्थाचें ठराव पार्लमेंटपुढें मांडलें. पण ते कॉमन्ससभेंत किंवा लॉर्डाच्या सभेत नापास होत गेले. अखेर १८०६ मध्यें लॉर्ड ग्रेनव्हिल व फॉक्स यांचे प्रधानमंडळ असतां बंदीचे ठराव पुढें येऊन अखेर १८०७ मध्यें असा ठराव पास झाला की, ब्रिटिश मुलुखांतल्या कोणत्याहि बंदरातून १ मे १८०७ नंतर गुलाम नेण्याकरिता एकहि जहाज बाहेर जाऊ नये व ब्रिटिश वसाहतीत तारीख १ मार्च १८०८ नंतर कोणीहि गुलाम नेऊन उतरू नयेत. हा कायदा मोडणारास फक्त दंडच ठेवलेंला असल्यामुळें १८०७ च्या बंदीच्या कायद्यानंतरहि गुप्तपणे व्यापार चालू होता. त्याचा बंदोबस्त करण्याकरिता १८११ मध्यें गुलामाचां व्यापार करणें हा मोठा गुन्हा ठरवून त्याला हद्दपारीची शिक्षा ठेवण्यांत आली. या कायद्यामुळे सदरहू बंदी नीट अमलांत आली.
फ्रांस- सेंट डोंमिगों या फ्रेंच वसाहतींत १७९१ साली ४,८०,००० काळे नीग्रो, २४,००० म्युलॅटो (मिश्र) व ३०,००० गोरे लोक होते. १७८८ मध्यें गुलामांचा व्यापार व गुलामपद्धति पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करण्याकरिता काँडार्सेटच्या अध्यक्षतेखाली एक सोसायटी स्थापन झाली. तिला मिराबोची सहानभूति होती. पण त्यांचे प्रयत्न इंग्लंडातल्याप्रमाणे धार्मिक द्दष्टीचें नसून भूतदयेनें प्रेरित होतें. तथापि १७८९ मधील फ्रेंच राज्यक्रांती नंतरच्या फ्रेंच सरकारनें व कायदे मंडळानें सेंट डॅमिगो येथील गो-या वसाहतवाल्यांच्या असंतोषास भिऊन गुलामांचा पक्ष घेण्याचें नाकारले. तेव्हा तेथे म्युलॅटो व नीग्रो लोकांनी मिळून बंड केलें. तेव्हा फ्रान्समधून कमिशनर पाठविण्यांत आले. त्यांचे तेथील गर्व्हनराशी भांडण होऊन त्यांनी नीग्रो लोकांच्या मदतीनें फांक्रॉय शहरांतील रहिवाशांवर हल्ला करून त्यांची जाळपोळ व कत्तल केली, तेव्हा गो-या वसाहतवाल्यांनी ब्रिटिशांची मदत घेतली. पण फ्रेंच रिपब्लिकन सरकारच्या सैन्यानें नीग्रो लोकांच्या मदतीनें ब्रिटिशांना हांकून लाविलें व गुलामपद्धति पूर्णपणे बंद केली. पण पुढें बोनापार्टनें गो-या वसाहतवाल्यांतर्फे नीग्रोनां जिंकण्याकरता सैन्य पाठविलें; पण नीग्रोनी त्याचा पराभव करून तें हांकून लाविलें व आपले राज्य स्थापन केलें. पुढे बोर्बोन राजांनी ते बेट जिंकण्याचा व तेथे गुलामपद्धति सुरू करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश न येतां हें बेट इ.स.१८२५ पासून पूर्णपणें स्वतंत्र राहिलें आहे.
गुलामांना स्वातंत्र्य देण्याची चळवळ.- गुलामांचा व्यापार बंद करण्याचा पहिला मान इंग्लंडला नसून डेन्मार्कला आहे. १६ मे १७९२ रोजी निघालेल्या राजाच्या हुकुमानें डॅनिश वसाहतींत १८०२ पासून या व्यापाराला पूर्ण बंदी करण्यांत आली. पोर्तुगॉलनें १८१५ पासून बंदीच्या कायद्यास आरंभ करून १८२० मध्यें या व्यापारास पूर्ण बंदी केली. डच लोकांनी हा व्यापार १८१४ त बंद केला, व स्वीडिश लोकांनी १८१३ तच बंद केला होता. दक्षिण अमेंरिकेंतले ला प्लाटा, व्हेनेझुएला व चिली या देशांनी स्वतंत्र होताच हा व्यापार बंद केला. याप्रमाणें व्यापार बहुतेक बंद झाल्यावर गुलामगिरीत तत्पूर्वीपासून खितपत असलेल्या नीग्रोंना स्वतंत्र करून गुलामपद्धतिच अजीबात नष्ट करण्याचे उद्योग सुरू झाले. व्यापार बंद होऊन नवीन पुरवठा बंद झाल्यामुळें पूर्वीच्या गुलामाकडून मालक प्रमाणाबाहेर अतिशय काम घेऊं लागले व त्यामुळें गुलामांची मृत्यूसंख्या फार वाढली. वेस्ट इंडीजमध्यें १८०७ साली ८,००,००० संख्या होती ती १८३० मध्ये ७००००० उरली. या सर्व गोष्टीनां उपाय म्हणजे गुलामगिरीतून सर्वांची मुक्तता करणें हाच होय हें स्पष्ट दिसूं लागलें. तेव्हा या दिशेने चळवळ विलबरफोर्स व बक्स्टन यांनीच सुरू केली. ''गुलामांचे हाल दूर करण्याच्या योजना ब्रिटिश वसाहतीनी आपापल्या कायदेमंडळामार्फत अमलांत आणाव्या अशी ब्रिटिश पार्लमेंटची शिफारस आहे.'' इतकाच कॅनिगचा ठराव पास झाला. पण त्यामुळें गुलामांचा गैरसमज होऊन त्यांनी मालकांची कामें करण्याचें एकदम नाकारलें. तेव्हा उभयपक्षांत मारामा-या होऊन लष्करी कायदा लागू करावा लागला व मोठे कडक उपाय योजून गुलामांची बंडें मोडण्यात आली. तेव्हां कांही वर्षे हा प्रश्न मागें पडून पुन्हां १८३३ मध्यें अर्ल ग्रेच्या प्रधानमंडानें द्दढनिश्चयानें गुलामांना स्वातंत्र्य देण्याचा कायदा पास केला व मालकांना नुकसानभरपाई देण्याकरतां म्हणून २ कोटी पौड मंजूर केले पण स्वातंत्रप्राप्तीची तयारी म्हणून सात वर्षे गुलामांनी मालकाची नोकरी दिवसाचे ३/४ तास करावी व त्याचा मोबदला मालकांनी त्यांना अन्नवस्त्र द्यावें असे ठरवण्यांत आलें. सहा वर्षोच्या आंतील मुले मात्र स्वतंत्र ठरवून त्यांना धर्मिक व नैतिक शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यांत आली. तथापि ब्रिटिश कामन्स सभेला ही सात वर्षांचीहि मुदत पसंत नव्हती. सबब तडजोड होऊन १८४० ऐवजी १८३८ मध्येंच सर्व गुलामानां स्वातंत्र्य देण्यात आलें. इंग्लंडचे उदाहरण पाहून फ्रान्सनें १८४८ सालीं, पोर्तुगालनें १८५८ साली व डच लोकांनी १८६३ साली गुलामांना दास्यांतून मुक्त करून स्वतंत्र केलें. मेस्किकोनें तत्पूर्वीच १८२९ साली गुलामांना स्वातंत्र्य दिलें होतें. आर्यसेन त्याच्याहि पूर्वी कायदा करून ३१ जून १८१३ नंतर जन्मलेल्या गुलामांच्या सर्व मुलाना स्वतंत्र समजण्याचें ठरविले व कोलंबियामध्यें १६ जुलै १८२१ नंतर जन्मलेल्या सर्वांना वयांत आल्यापासून म्हणजे अठराव्या वर्षापासून स्वतंत्र समजण्याचा कायदा पास झाला होता. यानंतर गुलामपद्धति चालू असलेले महत्वाचे देश तीनच उरले, ते दक्षिण युनायटेड स्टेट्ट क्युबा व ब्राझिल हे होत.
युनायटेड स्टेट्स.- अमेरिकेंतील संस्थानांचे स्वतंत्र संयुक्त राष्ट्र बनविणारें थोर थोर पुरुष यांना गुलामपद्धति मान्य नव्हती. वॉशिग्टननें आपल्या मृत्यूपत्रांत स्वतःच्या गुलामांना स्वातंत्र्य देण्याबद्दल लिहून ठेविलें होते. जॉन ऍडाम्सनें गुलामपद्धति पूर्ण बंद करण्याची योजना अमलांत यावी असे जाहीर मत दिले होतें. फ्रांक्लीन, मॅडिसन, हॅमिल्टन, पॅट्रिक हेनरी या सर्वांनी गुलामपध्दतीचा निषेधच केलेला होता. जेर्सननें युनायटेडस्टेट्सच्या राज्यपध्दतीसंबधानें जी लेखी योजना तयार केली तीत गुलामपद्धति बंद व्हावी असें स्पष्ट वाक्य घातलें होतें. या मतौघास अनुसरून १८०४ च्या सुमारास युनायटेड स्टेट्समधील उत्तरेकडील संस्थानात व्यक्तिश: गुलामपद्धति बंद करण्याचे कायदे पास झाले होते. पण त्यांचा परिणाम एवढाच झाला की, उत्तरेकडील संस्थानातल्या मालकांनी दक्षिणेकडील संस्थानांत नेऊन गुलाम विकले. त्यामुळें गुलामांना प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालें नाहीच. उलट दक्षिणेकडील संस्थानांत गुलामपद्धति वाढत्या प्रमाणांत चालू होती. सर्व युनायटेड स्टेट्स राष्ट्रांत व्यापाराची बंदी होऊन गुलामांना स्वातंत्र्य मिळावें अशी चळवळ करणारा पहिला इसम बेंजमिन लुंडी (१७८९-१८३९) हा होय. त्याच्याशिवाय विल्यम क्लॉइड गॅरिसन (१८०५-१८७९), एलिजा पी. लव्हजॉय, वेडेंल फिलिप्स, चार्लस सम्नर, जॉन बाऊन हे या कार्यातले प्रसिध्द पुरस्कर्ते होते. आर्. डब्ल्यू. इमर्सन, ब्रायंट, लांगफेलो, व्हिटियर व व्हिटमन हे विद्वान ग्रंथकार व कवी यांनी स्पष्ट शब्दांत सदरहू पध्दतीचा पक्षपात्यांनी निषेधपर मतें प्रसिध्द होऊं नयेत अशाबद्दल भगीरथ प्रयत्न चालविलें होते. दक्षिणेकडील ख्रिस्ती चर्चेहि या पध्दतीचा पुरस्कार करीत असत. तथापि हळूहळू विरूध्द मत प्रगत होत चाललें होतें. आणि १८५२ च्या सुमारास मिसेस हॅरिएट वांचरस्टौ हिनं लिहिलेल्या 'अंकल टॉम्स केबिन' या कादंबरीनें तर लोकमतांत फारच खळबळ उडवून दिली. तथापि दक्षिणेकडील लोकमत बिलकुल वळेना. तेव्हां लढाई शिवाय या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागत नाही असें स्पष्ट दिसूं लागलें. इतक्यांत १८६० मध्यें अब्राहाम लिंकन प्रेसिडेंट निवडून आला. हें पाहून दक्षिणेकडील संस्थानांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या युद्धाचें रणशिंग फुंकलें व उत्तरेकडील संस्थानांनी दुफळी न होतां एकी कायम राहावी अशा हेतूनें शस्त्रे उचलली तथापि युद्धाचा मुख्य हेतू गुलामपध्दतीचें अस्तित्व चालू ठेवणें किंवा बंद करणें हा होता. १८६५ च्या एप्रिल ९ रोजी आपोमाटॉक्स येथें दक्षिणेचें सैन्य शरण येऊन युद्धाचा निकाल लागला. काँग्रेसने तत्पूर्वी १८६२ मध्यें कायद्यानें गुलामांना स्वातंत्र्य देण्याचें जाहीर केलेंच होतें. त्याचा अम्मल १८६३ पासून सुरू होऊन युध्द संपताच १८६५ डिसेंबर पासून सर्व युनायेटड स्टेट्स देशांत गुलामपध्दतीला कायमची मूठमाती मिळाली.
क्यूबा व व ब्राझिल.- क्यूबा या स्पॅनिश वसाहतींत १७८९ मध्यें पास झालेल्या कायद्यानें गुलामांना पुष्कळ सवलती दिलेल्या होत्या. परंतु त्यांचा प्रत्यक्ष अम्मल न होता उलट गुलामांचा व्यापार वाढत होता. जींत १७९२ मध्यें ८४,००० गुलाम होते ती संख्या १८४३ मध्यें ४,३६,००० वर गेली. अखेर १८७० मध्यें स्पॅनिश कायदेमंडाळानें गुलामांना स्वातंत्र्य देण्याचा कायदा केला व तो हळूहळू अमलांत येऊन १८८५ च्या सुमारास सर्व गुलाम स्वतंत्र झाले. ब्राझिलच्या बादशहानें १८८० त गुलामांचा व्यापार बंद करण्याबद्दल हुकूम सोडला. तथापि चोरून व्यापार चालू राहून कित्येक वर्षे दरसाल ३४,००० गुलाम देशांत बाहेरून येत होते. १८५० मध्यें व्यापार पूर्ण बंद पडला. पण त्यामुळे तत्पूर्वीच्या गुलमांवर कामाचा बोजा फार पडून त्यांचे हाल वाढले. कारण पूर्वीचे घरकाम करणारे गुलाम शेतकामाला लावण्यांत आलें. तथापि युनायटेड स्टेटसच्या मानानें ब्राझिलमध्यें गुलामावर जुलूम कमीच होत असे. अखेर १८७० मध्ये ब्राझिलच्या कायदेमंडळानें गुलामांना स्वातंत्र्य देण्याचा कायदा केला. तो हळूहळू अमलांत येऊन १८८८ मध्यें सर्व गुलाम पूर्णपणें स्वतंत्र करण्यांत आले.
मुसुलमानी देश- मुसुलमानी देशांत गुलामपद्धति आहे. पण ते गुलाम शेतकामाकरिता नसून घरकामाकरितां असतात. अर्थात् त्यांना साधारणपणें कुंटुंबातल्या माणसाप्रमाणें समजून दयाळूपणानें व प्रेमानेहि वागवितात. इराणमध्यें गुलामांना इतकें चांगल्या तर्हेने वागवितात की त्यांस स्वतंत्रता देणें हीच शिक्षा वाटते असें विल्स म्हणतो (इन दि लँड ऑफ दि लायन ऍंड सन).खुद्द कुराणांमध्ये गुलामांना इतक्या चांगल्या तर्हेने वागवण्याबद्दल आज्ञा असून शिवाय त्यांना स्वतंत्र करावें अशीहि शिफारस केलेली आहे. गुलाम स्त्रीला झालेलें मूल स्वतंत्र दर्जाचें मानतात व त्या स्त्रीलाहि गुलामगिरीतून सोडवून स्वातंत्र्य देतात. तुर्कस्तानच्या बादशहानें स्वतःच्या राज्यांत गुलामांचा व्यापार करणें हें बेकायदेशीर आहे असे पुनः पुनः जाहीर केलें व १८८९ मध्यें व्यापारबंदीचा कायदाहि केला. पण सरकारी नोकरांच्या सामिलीमुळें व्यापार पूर्ण बंद होऊं शकला नाही. ईजिप्तमध्यें मात्र तो पूर्णपणे बंद झाला आहे.
रशियांतील कृषिदासपध्दति- गुलामगिरीची पद्धति मोडून जिला सर्फडम उर्फ कृषिदासपद्धति म्हणतात ती रशियामध्यें सुरू होऊन ती जवळ जवळ १९व्या शतकाच्या अखेरपर्यंत चालू होती. आरंभी रशियांत शेतकाम करणारे (१) गुलाम, (२) शेतमजूर व (३) शेतकरी असें तीन वर्ग होते; परंतु पुढें १८ व्या शतकाच्या सुमारास वरील तिन्ही वर्गांचें रूपांतर कृषिदासांमध्ये झालें. हे लोक जमीनीच्या मालकांपासून जमीनी खंडानें कायमच्या पत्करून राहूं लागले. या कृषिदासांना जमिनी सोडून देण्याची परवानगी नसे इतकेंच नव्हे तर जनावराप्रमाणें हे दास मालकांना विकतांहि येत असत. पीटर दि ग्रेटनें या दासांवर डोईपट्टी बसविली होती व तिच्या वसुलीबद्दल जमीनदार हे जबाबदार असत. दुस-या कॅथराईनच्या कारकीर्दीत ही पद्धति पूर्णावस्थेप्रत पोहोचली. त्यावेळी हे दास जमीनीबरोबर किंवा स्वतंत्रपणे विकीत असत, बक्षीस देत असत व कोणी बंडखोरपणा केल्यास त्याला दूर हद्दपार करीत किंवा आजन्म खाणीमध्यें कामास लावीत. पुढें पोंलच्या कारकीर्दीत (१७९६-१८०१) त्यांच्या मुक्ततेच्या चळवळीस सुरवात झाली दुस-या अलेक्झांडरच्या कारकीर्दीत दासांना स्वातंत्र्य देण्यासंबधीनें सूचना करण्याकरतां एक कमेटी नेमिली गेली, तिच्या सूचनेंनुसार जमिनदारांचा विरोध असतांनाहि दासांना स्वातंत्र्य देण्याचा कायदा ता.३ मार्च १८६१ रोजी करण्यांत आला. यावेळी सरकारी दासांची एकंदर संख्या २,१६,२५,६०९ होती. याशिवाय सरकारी कामकाजाकरितां व राजघराण्यामध्ये मिळून दोन कोटीपर्यत दास होते. वरील कायद्यानें या सर्वांनां म्हणजे चार कोटी दासांना स्वतंत्र करण्यांत आलें.
आफ्रिका- अमेरिकेमधील वसाहतीच्याकडे पाठविण्यांत येणारे निग्रो गुलाम मुख्यतः आफ्रिकेतल्या कालाबार व बॉनी या दोन नद्यांच्या मुखाजवळील बंदरातून जात असत. या बंदरातून जाणा-या गुलामांची संख्या आफ्रिकेच्या इतर सर्व भागांतून जाणा-या गुलामांच्या संख्येच्या इतकी असे. ईजिप्त, तुर्कस्तान, अरबस्तान व इराण इकडे पाठविण्यांत येणारे गुलाम (१) मध्य सुदान, (२) अपर नाईल नदीचा मोठाल्या सरोवरापर्यंतचा प्रदेश, आणि (३) पोर्तुगीज ईस्ट आफ्रिका या तीन भागांतले असत. मध्य सुदानमधून दरसाल ४००० गुलाम जात असत व त्याबद्दल तेथील सुलतानाला सालीना जकातीचें उत्पन्न ४८०० पौंड होत असे. अलीकडें पश्चिम सुदानवर फ्रेंचांचा अम्मल सुरू झाल्यापासून या भागांतून होणारा गुलामांचा पुरवठा फार कमी झाला आहे. तथापि सुदानच्या सुलतानाच्या साम्रज्यांत गुलामपद्धति अद्याप चालूं आहेच. अपर नाईल नदीच्या प्रदेशांतून चालणारा गुलामांचा व्यापार बंद करण्याचें काम खेदीव इम्मायलनें १८६९ पासून सर सॅम्युअल बेकरला व त्याच्यानंतर १८७४-७९ पर्यंत कर्नल सी. जी. गॉर्डन यास सांगितलें होतें. तथापि माहादी व खलीपा या सुलतानांच्या कारकीर्दीत तो व्यापार पूर्ववत् सुरू झाला. परंतु पुढे पूर्व सुदान ऍंग्लोईजिप्शियन सैन्यानें काबीज केल्यावर हा व्यापार कमी होऊ लागून अखेर १९१० च्य सुमारास मध्य सुदान फ्रेंचांच्या पूर्णपणे ताब्यांत आल्यावर हा व्यापार अगदी बंद झाला. मादागास्कर व कोमोरो बेटांना होणारा गुलामांचा बहुतेक पुरवठा पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेतून होत असे. शिवाय न्यासा सरोवराच्या प्रदेशात सांपडणारे गुलाम झाझिवार बंदरातून जात असत. पुढे झांझिबारला ब्रिटिश प्रोटेक्टरेट स्थापन झाल्यावर आणि बहुतेक पूर्व आफ्रिकेच्या किना-यावरील प्रदेश ब्रिटिश, जर्मन व पोर्तुगीज यांच्या ताब्यांत आल्यावर गुलामांचा व्यापार बंद पडला व या यूरोपीय लोकाच्या ताब्यांतील प्रदेशांत गुलामांना स्वातंत्र्यहि देण्यांत आलें.
कांगो नदीच्या कांठी वेल्जमच्या दुस-या लिओपोल्ड राजानें कांगोफ्रिस्टेट नांवाचें राज्य स्थापल्यावर तेथून व इतर देशी संस्थानांतून गुलाम पकडून रवाना करण्याचा व्यापार पुष्कळ चालू होता. पण पुढें आफ्रिकेच्या पश्चिम किना-यावर ब्रिटिश, जर्मन व फ्रेंच यांची प्रोटेक्टरेट राज्यें स्थापन झाल्यावर व्यापार कमी होत जाऊन १९१० च्या सुमारास तो पूर्णपणे बंद झाला.
गुलामांचा व्यापार व गुलामपद्धति बंद करण्याच्या बाबतींत प्रयत्न करणारांपैकी क्लार्कसन व फूस्टन हे प्रमुख होत. यांना व या बाबतीत प्रयत्न करण्या-या इतर सद्गृहस्थांनां हें पूर्णपणे कळून चुकलें होतें की, गुलामांचा व्यापार व गुलामगिरी बंद पाडण्यांत निग्रो लोकांत शिक्षण, उद्योगधंदे व व्यापार यांचा प्रसार करणें हा रामबाण उपाय होय. सिरिया लिओन व लायबेरिया या मार्फत सदरहू कार्याला चांगला आरंभ होईज असें एकदा वाटत होतें. परंतु अद्यापहि दिशेनें चांगला उपक्रम कोठंहि झालेला नाही.
गुलामपध्दतीचा प्रच्छन्न अवतार- युरोपांतील अनेक देशांच्या वसाहतींत गुलामाचा व्यापार बंद करण्यांत आल्यावर त्याऐवजी मागासलेल्या मानवजातीतील लोकांना मोठमोठ्या मुदतीच्या करारावर मजूर म्हणून आणण्याची पद्धति सुरू झाली. या मुदतबंदी मजूरपध्दतीला हळूहळू इतकें क्रूर स्वरूप प्राप्त झालें की गुलामपध्दतीचा हा नवा अवतारच आहे असें म्हणण्याची पाळी आली. १८६७ च्या सुमारास दक्षिण महासागरांतील बेटांमध्ये न्यू. कॅलेडोनिया व फिजी बेटामध्ये प्रथम या पध्दतीला सुरवात झाली. वास्तविक या मजूरांबरोबर कायदेशीर करार करून त्यांना नेत असत, परंतु मजूर पुरविणा-या व्यापारी कंपन्यांच्या लबाड्या व अत्याचांरामुळे या पध्दतीला पुढें गुलामपध्दतीचेंच हिडिस स्वरूप प्राप्त झालें. मजुरांना कराराच्या अटी सर्व नीट समजाऊन सांगण्यांत येत नसत व कायदेशीर मुदतीपेक्षाहि अधिक मुदतीपर्यंत त्यांना करारानें बध्द करून घेत असत. याविषयीची संपूर्ण माहिती स्वतंत्र लेखांत दिली आहे.
[वाड्मय.- याविषयावर वाड्.मय सपाटून आहे. थोडक्याच पुस्तकांचा उल्लेख येथे करतां येईल. भारतीय दास्यस्थितीसाठी वेद, महाभारत, धर्मशास्त्रे व प्रवासवर्णनें ही पाहिली पाहिजेत. यावर पध्दतशीर पुस्तक नाही. ग्रीसमधील गुलामगिरीवर ए. काल्डोरिनी यांचे पुस्तक आहे (मिलान १९०८). रोमन गुलामगिरीच्या कायद्यावर बक्लंड याचें (कंब्रिज १९०९) पुस्तक चांगले आहे. यूरोपांतील मध्ययुगीन गुलामगिरीवर द्वीपकल्पीय ग्रंथकार पुष्कळ आहेत पण इंग्रजी ग्रंथ चांगले नाहीत. तरी ''स्टब्स'' चें कान्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंग्लंड हें पुस्तक वाचावें. अमेरिकन गुलामगिरीवर एच् विल्सनचें हिस्ट्री ऑफ दि राईझ ऍड फॉल आफ दि स्लेव पावर इन् अमेरिका (बोस्टन १८७२); डयू बाईस-सप्रेशन ऑफ दि आफ्रिकन स्लेव्हस्ट्रेड टु दि युनायटेड स्टेट्स (न्यूयार्क १८९६) ड्यू वाईस हा निग्रो ग्रंथकार आहे.]