विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गोंडार- अबिसीनिया देशांतील एक शहर. पूर्वीं हें अम्हारिक राज्याच्या राजधानीचें शहर होतें. लोखंडा सारख्या काळ्या व वाटोळ्या आकाराच्या दगडांनीं बनलेल्या खडकाच्या एका कड्यावर हें वसलें आहे. या कड्यांतून अँग्रेब व काहा या दोन नद्यां निघून शहराच्या खालीं एकमेकीस मिळतात. नगिस सायसेनियस यानें गोंडार हें १६ व्या शतकाच्या सुरुवातीस आपल्या राज्याच्या राजधानीचें शहर बनविलें. त्यावेळीं हें एक लहानसें खेडें होतें. पुढील बादशहांनीं येथें प्रासाद व दुर्ग बांधले. इ. स. १७३६ च्या सुमारास गोंडार वैभवाच्या शिखरास पोंचलें. तेथून पुढें त्याच्या उतरत्या काळास सुरुवात झाली. १८८७ सालीं माहदीच्या लोकांनीं हें शहर लुटून अग्नीच्या भक्ष्यस्थानी दिलें. १७७० मध्यें १०००० लोकवस्ती होती ती १९०५ सालीं ७००० वर उतरली. रहिवाशांत मुसुलमान लोक प्रमुख होत. कापूस, सोन्याचांदीचीं भांडी, तांब्याचीं भांडीं, उत्तम खोगीर व जोडे इत्यादि वस्तू येथें तयार करण्यांत येतात.