विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गोंदणें.- शरीराच्या कातड्यांवर निरनिराळ्या प्रकारचीं चित्रें, आकृत्या, अक्षरें किंवा शब्द सुईसारख्या तीक्ष्ण टोंकाच्या हत्यारानें किंवा इतर साधनांनीं टोंचून घेणें व त्या आकृतीस कायमचें स्वरूप येण्याकरितां त्यांत तांबडा किंवा काळा रंग भरणें यास गोंदणें असें म्हणतात. ही चाल फार प्राचीन काळापासून जगांतील बहुतेक देशांत प्रचलित आहे. आफ्रिकेंतील किंवा आस्ट्रेलियांतील असंस्कृत लोकांत सर्व शरीरभर चित्रविचित्र आकृती गोंदून घेतात. व याप्रकारें ते आपलीं शरीरें भूषवितात. अगदीं जंगलीं जातीपासून तो आधुनिक सुधारणेच्या शिखरास पोंचलेल्या लोकांपर्यंत या चालीचा प्रसार आहे. हिंदुस्थानांत ब्राह्यणेतर जातीच्या स्त्रियांतः गोंदण्याचा प्रघात फार आहे. देवादिकांचीं नांवें, आपलें स्वतःचें, नव-याचें किंवा प्रेमांतल्या माणसाचें नांव, तुळशीचें झाड वगैरे नाना प्रकारचीं चित्रें हातावर किंवा शरीराच्या निरनिराळ्या भागांवर स्त्रिया गोंदून घेतात.
यूरोपियन, यूरेशियन लोक, विशेषेकरून सोल्जर लोकांस गोंदून घेण्याची फार हौस वाटतें. व त्यांस लढाईमध्यें जखमी अगर मेलेल्या माणसांचा नांव गांव वगैरे पत्ता लावण्यास या गोंदण्याचा उपयोगहि होतो. गोंदण्यांत जपानी लोक फार कुशल आहेत. ते कोणताहि नमुना दाखविला असतां त्यावरहुकूम चित्र अंगावर गोंदतात. ईजिप्त वगैरे प्राचीन देशांत सुद्धां स्त्रियांच्या शरीरांवर गोंदण्याचा प्रघात होता. शिक्षणप्रसारामुळें हिंदुस्थानांतील सुशिक्षित स्त्रियांमध्यें गोंदण्याची चाल बहुतेक बंद होत आली आहे.
गोंदण्याचीं हत्यारें प्रत्येक देशांत किंवा जातींत निराळीं असतात. सुया किंवा बाभळीचा मजबूत कांटा बहुतकरून उपयोगांत आणतात व गोंदल्यानंतर विशिष्ट झाडपाल्याचा रस वरून लावतात. किंवा काजळासारखें काळें रंग कातडींत भरतात. म्हणजे कायमचा हिरवा रंग येतो. अलीकडे विजेच्या साहाय्यानें फार जलद व कमी वेदना करून वाटेल त्या आकृतीप्रमाणें गोंदण्याची सोय झाली आहे.