विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
ग्रँट डफ- याचें सबंध नांव जेम्स फर्ग्युसन ग्रँट डफ असून हा इंग्लंडच्या उत्तरेकडील इडेन गांवचा रहिवासी होता. याचें शिक्षण बेताचेंच झालें होतें; प्रथम हा ईस्ट इंडिया कंपनींत नौकरीस राहिल्यानंतर क्रमानें वाढत वाढत पेशवाई अखेर सातारा येथें रेसिडेंट झाला. प्रतापसिंहाचा व याचा बराच स्नेह होता. साता-यास असतांना यानें आपल्या मराठ्यांच्या (बखरवजा) इतिहासाचीं साधनें गोळा केली होतीं. खास प्रतापसिंहानेंहि आपल्या घराण्यांत व दप्तरांत असलेलीं अस्सल पत्रव्यवहारादि साधनें त्याच्या हवालीं केलीं होती. तो विलायतेस गेल्यानंतर त्यानें आपला मराठ्यांचा इतिहास हा ग्रंथ लिहिला (१८२६). त्या कामीं त्याला फार त्रास झाला. प्रथम तो इतिहास कोणीहि पुस्तकविक्या विकत घेईना; दुसरें त्या लेखनापायीं त्याला कर्जहि बरेंच (१७०० पौंड) झालें. त्याला डोकें दुखण्याची व्यथा असल्यानें पाण्याच्या घड्या डोकीवर ठेऊन त्यानें हें पुस्तक लिहिलें पण इतक्या अउचणींतहि त्यानें जो ग्रंथ लिहिला तो फारसा विश्वसनीय निपजला नाहीं. त्यांत पुष्कळशा चुका राहिल्या आहेत. कांहीं चुक्या अशा आहेत कीं त्यांची सुधारणा त्याचा वेळीं त्याला खास करतां आली असती. परंतु मराठ्यांचा खरा इतिहास देण्याची तीव्र इच्छाच त्याला नव्हती व मराठ्यांसंबंधानें त्याची आदरबुद्धि नव्हती. ज्यांचें राज्य आपण घेतलें त्यांची त्रोटक माहिती आपल्या कांस थोडीफार असावी अशा हेतूनें त्यानें ही बखर रचिली; लिहिण्यांत आत्मीयता नसल्यानें त्याच्या रचनेस विकृत स्वरूप आलें आहे. त्याच्या ग्रंथावर कै. नीळकंठराव कीर्तने यांनीं प्रथम टीका केली व त्यानंतर कै. खरे, राजवाढे वगैरे संशोधकांनीं त्याच्या चुक्यांचें हप्तेच प्रसिद्ध केले. सारांश, त्याच्या इतिहासांत पुष्कळ सुधारणा झाल्याशिवाय तो ग्राह्य मानतां येत नाहीं. विलायतेस गेल्यानंतर तो प्रतापसिंहास तिकडील सामान व निरनिराळ्या चिजा पाठवीत असे; व त्याच्याशीं पत्रव्यवहाराहि ठेवीत असे. पुण्याचा पहिला कलेक्टर रॉबर्टसन यानें एलफिन्स्टनच्या अनुमतीनें शनवारवाड्यांतील पेशव्यांचें सर्व दफ्तर डफच्या स्वाधीन केलें होतें. तसेंच सुरतच्या वखारींतील मुंबई सरकारचीं, गोंवेसरकारचीं, इंडिया हाऊसमधील व इतर पुष्कळ ठिकाणचीं दफ्तरें त्याला मिळालीं होतीं. त्याचां त्यानें भरपूर व खराखरा उपयोग केला असतां तरीहि फारशा चुक्या झाल्या नसत्या. विलायतेस १८२५ च्या सुमारास तो परत गेला. त्यानें गोल्डस्मिथ याला लिहिलेल्या पत्रावरून (१८४६) त्याच्या या लिहिण्याच्या बाबतींतील सर्व माहिती समजून येते. पुढें पुस्तकविक्यांनां नको असलेली माहिती काढून टाकून त्यानें दुसरी आवृत्ति प्रसिद्ध केली होती. त्यानें अखेरचे दिवस शेती करण्यांत घालविले. [डफच्या इतिहास प्रस्तावना; भा. सं. मं. त्रैमासिक व. ४ जोडअंक; राजवाडे खंड, १ प्रस्तावना.].