विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
ग्लाबर- (१६०४-१६६८) हा जर्मन रसायन शास्त्रज्ञ बव्हेरियामध्यें कार्लस्टाड येथें जन्मला. याच्या जीवन चरित्राची फारशी माहिती उपलब्ध नाहीं. हा प्रथम व्हिएन्ना, मग सालझबर्ग, फ्रांकफर्ट, कलोन इत्यादि ठिकाणीं राहून शेवटीं हॉलंडमध्यें स्थायिक झाला. तेथें तो रासायनिक औषधी द्रव्यें गुप्तपणें विकीत असे. याच्या ग्रंथातून जुन्या द्रावकांचींच वर्णनें आढळतात. तरी यानें ख-या रसायनशास्त्राच्या ज्ञानांत थोडीशीं भर टाकली आहे. साध्या मिठाशीं उज्जगंधकाम्लचा संयोग करुन उद्हराम्ल तयार करण्याच्या कृतीचा यानेंच शोध लावला. मिठाच्या ऐवजीं सोडा वापरल्यांस नत्राम्ल तयार होतें हेंहि यानेंच दाखविलें. यानें शिसें, कथील, लोखंड, जस्त, ताम्र, ताल व अज्ज यांचीं हरिदें व इतर पुष्कळ क्षार तयार केले. शिवाय द्वित्तपृथक्करणाचे कांहीं प्रयोग यानें करुन पाहिलें. औषधें तयार करुन किंवा रंग वगैरे औद्योगिक उपयोगाचे जिन्नस तयार करुन किंवा जमिनीकरितां खतें तयार करुन आपल्या ज्ञानाचा व्यवहारांत उपयोग करतां यावा अशी त्याची फार इच्छा होती. याचा एक ट्रशलंड वूलफर्थ नांवाचा ग्रंथ आहे. त्यांत त्यानें फार आग्रहानें सांगितलें आहे कीं, जर्मनींतील नैसर्गिक संपत्तीचा राष्ट्रानें आपल्या फायद्याकरितां शक्य तितका उपयोग करावा. एतदर्थ त्यानें अनेक उपायहि आपल्या ग्रंथात सुचविले आहेत.
त्याचे सरासरी ३० ग्रंथ फ्रांकफर्ट येथें १६५८ त प्रसिद्ध झाले; अँमस्टर्डाम येथें १६६१ त प्रसिद्ध झाले व त्यांचे पॅकेनें इंग्रजींत भाषांतर करुंन लंडन येथें १६८९ त प्रसिद्ध केले. हा अँमस्टर्डाम येथें इ. स. १८६८ सालीं मरण पावला.