विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चातुर्वर्ण्य - समाज चार प्रकारच्या वर्गानें पूर्ण होतो आणि त्या चार वर्गांत अन्योन्यश्रय आहे अशी कल्पना. या कल्पनेचा भारतीय समाजशास्त्रावर बराच परिणाम झाला आहे. समाज चार वर्णांनीं संयुक्त आहे ही कल्पना फारच जुनीं म्हणजे मूलगृहकालीन असावी. कां कीं या कल्पनेचे अवशेष प्राचीन ग्रीक व इराणी लोकांत आढळून येतात.
ऋग्वेदमंत्रकालांत चार वर्गांचें अस्तित्व अनेकदां सूचित व उल्लेखित आहे पण त्या वर्गांस वर्ण ही संज्त्रा नव्हती. ऋग्मंत्रकालीं वर्ण या शब्दाचा अर्थ यजनवैशिष्ट्यामुळें पडलेला वर्ग असा असावा. वर्ण हा शब्द पर्शुभारतीय आहे आणि त्या शब्दाचा अर्थ प्रांतिक वैशिष्ट्य आणि संप्रदाय या दोन अर्थांच्यामध्यें दिसतो. ‘कातडीचा रंग’ या अर्थानें वर्ण या शब्दाचा उपयोग ऋग्वेदांत नाहीं आणि चातुर्वण्यांतील वर्गभिन्नत कातडीच्या रंगावर रचलें गेलें नाहीं.
चातुर्वण्याची कल्पना मुख्यत: हीच कीं, समाजांत याजनशिक्षण, रक्षण, व्यापार व दास्य या क्रिया आहेत आणि त्यांच्या अन्योन्याश्रयावर समाज रचला गेला आहे. हे चार वर्ण वर्गस्वरूपाचे होते. तथापि ब्राह्मणवर्ण कुरू. युद्धाच्या सुमारारस जातिरूप पावला आणि पुढें ब्राह्मणादि हजारों जाती लोकांस दिसूं लागल्या. तेव्हां वर्ण आणि जाति हीं एकच असावींत, मूळ चार जाती असाव्यात आणि पुढें चारांच्या शेंकडों जाती संस्कारकर्मलोपानें किंवा मिश्रणानें उत्पन्न झाल्या असाव्यात अशा कल्पना उत्पन्न झाल्या. या कल्पनांचा परिणाम अनेक धर्मग्रंथांत दिसून येत आहे. समाजांत चार वर्ण चार क्रियांच्या स्वरूपांत होते. पुढें चारहि वर्णांनां भिन्नभिन्न संस्कार चालू झाले. तेव्हां चातुवर्ण्य केवळ भिन्नकर्मांकित न रहातां भिन्नसंस्कारांकित झालें. आणि त्यामुळें कर्मदृष्ट वर्ण आणि संस्कारदृष्ट वर्ण यांमध्यें असंगति उत्पन्न होऊं लागली. म्हणजे संस्कार ब्राह्मणाचे व कर्म शूद्राचे अशी परिस्थिति उत्पन्न झाली, आणि यामुळें धर्मशास्त्रांत आपद्धर्म हें प्रकरण उत्पन्न झालें. वर्णसंस्कार याचा खरा अर्थ भिन्न वर्गांत विवाह होणें. पण वर्ण आणि जाति यांजविषयीं झालेल्या घोंटाळ्यामुळें वर्णसंकर म्हणजे निरनिराळ्या जातींनीं एकमेकांशीं लग्न लावणें अशी कल्पना प्रचलित होऊन या क्रियेला मोठा धार्मिक अपवाद आहे अशी भावना उत्पन्न होऊं लागली.
चातुवर्ण्याचें तात्विक अस्तित्वहि टिकलें नाहीं. बौद्ध, जैन, चार्वाक इत्यादि मतें सूत्रकालांतच उत्पन्न झालीं आणि त्यामुळें क्षत्रियवैश्यादिकांमध्यें वैदिक परंपरेचा म्हणजे स्मार्त संस्कारांचा प्रसार पुरा झाला नाहीं एवढेंच नव्हे तर लोपहि झाला, त्यामुळें ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण देशांत आहेत अशी कल्पना प्रसृत होत गेली. शूद्र राजांचें अस्तित्व मनस्मृतीच्या काळींहि होतें. राजे जर क्षत्रिय आहेत तर ते शूद्र कसे होतील. पण त्या राजांनां स्मृतिकार शूद्र म्हणतात याचा अर्थ एवढाच कीं त्या राजांनां वैदिक संस्कार नसावेत.
चातुर्वर्ण्याच्या तत्वाचा शासनशास्त्रावर परिणाम कितपत झाला असावा हें सांगतां येत नाहीं. ब्राह्मणांनां कांहीं अधिकार मिळाले असतील एवढेंच. नीतिशास्त्रवेत्ते व धर्मशास्त्रकार यांनीं राजानें प्रत्येक वर्ण आपल्या वर्णानुसार कर्म करीत आहे किंवा नाहीं हें पहावें म्हणून सांगितलें आहे. पण तें कितपत अमलांत आलें याविषयीं संशय आहे. त्या गोष्टी अमलांत आणण्यासाठीं कार्यपद्धति कोणीहि निर्माण केल्याचें दिसत नाहीं.
चातुर्वण्याच्या तत्वाच्या दृष्टीनें अस्पृश्य वर्गाचें निराळें अस्तित्व झाली पाहिजे. [ वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, दास, जातिभेद, इत्यादि लेख पहा. शिवाय, ब्राह्मण्याचा इतिहास ( विभाग ३ ), वैदिक वाङ्मय ब्राह्मण जाति व यज्त्रसंस्था ( विभाग २ ), चातुवर्ण्य संस्थापना ( विभाग १ ) हीं प्रकरणें पहा. ]