विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चित्ता.— सिंह व बिब्याबाघ यांच्यासारखा दिसणारा हा प्राणी प्राचीनकाळीं सर्वांस ठाऊक असून मध्ययुगीन लोक सिंह व चित्ता यांच्यांतील फरक चित्त्याचें चित्रांतील पूर्ण तोंड पाहूनच ओळखीत असत. मोठ्या ठिपक्याचें मांजर म्हणून हा प्राणी जुन्या लोकांस माहीत असे. हिंदुस्थानांतील चित्त्याच्या पाठीवर काळे ठिपके असून डोक्याच्या बाजूला हे ठिपके जास्त ठळक असतात. केंसाळ इराणी चित्ताहि अशाच प्रकारचा असतो. मँच्युरियांतील चित्ते जास्त केंसाळ असून त्यांच्या पाठीवर फार मोठे ठिपके असतात. पश्चिम आफ्रिकेंतील चित्ते रंगानें फार काळे असल्याचें दिसून येते.
चित्त्यांच्या आकारांत बराच फरक असलेला नजरेस पडतो. त्याचे डोकें व शरीर यांची साधारणतः लांबी ३॥ ते ४॥ फूट असून शेपूट २॥ ते ३ फूट लांब असतें. मोठ्या चित्त्यापेक्षां लहान चित्त्याचें केंस मोठे असतात. दक्षिणआशिया व आफ्रिका यांमध्यें अगदीं काळ्या रंगाचे व कमी ठिपके असलेले चित्ते आढळतात. क्रूरपणांत या प्राण्याचा इतर हिंस्त्र पशूपेक्षां वर नंबर लागेल. चित्ता हा अत्यंत चपळ व सावध असतो आणि एखाद्या झुडुपांत दबा धरून उडीच्या आटोक्यांत भक्ष्य येतांच अकस्मात तो त्याजवर झडप घालतो व पंज्यानें व दांतांनीं त्यास पकडतो. काळवीट, हरीण, मेंढी, बकरें, वानर, व विशेषत: कुत्रीं वगैरे प्राण्यांची शिकार करणें त्यास आवडतें. हिंदुस्थानांत हा मनुष्यभक्षक प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे. संधि मिळतांच जरुरीपेक्षांहि जास्त प्राण्यांचा तो संहार करितो. या गोष्टीस त्याचा क्रूरपणा किंवा ताजे रक्त पिण्याची लालसा यांपैकीं एखादें कारण असावें. चित्त्यांची वस्ती अरण्यांत, रानावनांत झुडुपांत व खडकाळ डोंगरांत असते. चित्त्याची शिकार करूं लागले तर त्याप्रसंगीं हा प्राणी झाडावरहि सहज चढूं शकतों. आफ्रिका, पॅकेस्टाईन ते चीन व मँचुरिया, सिलोन, मलाया बेटें व जाव्हा इतक्या ठिकाणीं चित्त्याची वस्ती असल्याचें प्रसिद्ध आहे.