विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
जमरुड - वायव्य सरहद्दप्रांत, पेशावर जिल्ह्यापलीकडचा एक किल्ला व लष्करी छावणी. पेशावर शहराच्या पश्चिमेस दहा मैलांवर खायवर घाटाच्या तोंडाशींच हें वसलें आहे. पेशावर ते जमरुड रेलवे-फांटा आहे. लो.सं. (१९११) १४५२. १८३६ त रणजितसिंगाचा सेनापति हरिसिंग यानें हें जिंकून घेतलें; पण पुढील सालीं दोस्तमहमदानें त्यावर हल्ला चढविण्यासाठीं एक अफगाण पलटण पाठविली. पण शेवटी शीखांचाच मोठा जय झाला. १८७८-७९ च्या अफगाण युध्दांत व १८९७-९८ च्या टिर्हा मोहिमेंत लष्करीदृष्ट्या जमरुडला फार महत्त्व होतें.