प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या 
 
तांबें— फार प्राचीन काळापासून उपयोगांत असलेली एक धात. तांबें व कथील यांच्या मिश्रणानें झालेली ब्रांझ धातु हा मनुष्य जातीनें वापरलेल्या धातूचा पहिला संयुक्त पदार्थ होय; व त्यावरून ऐतिहासिक कालापूर्वीच्या युगाला ब्रांझ युग हीं संज्ञा मिळालेली आहे.

तांबें ही विशिष्ट प्रकारच्या तांबड्या रंगाची व चकचकींत धातू आहे. शुद्ध तांब्याच्या नुकत्याच घांसलेल्या भागावर गुलाबी किंवा पिंवळट छटा असते; परंतु तांब्यांत ताम्रस प्राणिद असेल तर तीं जांभुळसर असतें. त्यांचें विशिष्ट गुरुत्व ८.९१ ते ८.९५ पर्यंत असतें. बाजारी तांबें थोडेसें सछिद्र असल्याकारणानें त्यांचें विशिष्टगुरुत्व ८.२ ते ८.५ पर्यंत असतें. तांबें वितळण्याचें उष्णमान निरनिराळ्या शास्त्रज्ञांच्या मतें १००० ते १२०० सें. पर्यंत आहे. वितळलेल्या धातूचा रंग समुद्राच्या पाण्याप्रमाणें असतो; व उष्णमान वाढविल्यास (विद्युत्स्फुल्लिंगामध्यें) त्याची वाफ होऊन जळूं लागते. त्या ज्वालेचा रंग हिरवा असतो. वितळलेल्या तांब्यांत कर्वैकप्राणिद, उज्ज, गंधकद्विप्राणिद वगैरे वायू शोषिले जातात, परंतु तांबें थंड होत जाईल त्याप्रमाणें ते पुन्हां मोकळे होतात. यामुळें विशेष काळजी न घेतल्यास, ओतीव पदार्थ सछिद्र बनतात. ( उष्णतेचें मान ०० इतकें असतां त्याची विशिष्ट उष्णता ०.०८९, व १००० असतां ०.९४२ असते ). विद्युद्वाहकांत याचा नंबर दुसरा लागतो. रुप्याची वाहकशक्ति १०० आहे असें मानिल्यास शुद्ध तांब्याची वाहकशक्ति ( उ. मा. १३० सें. ) ९६.४ आहे असें माथिएसेन यानें ठरविलें आहे.

कोरड्या हवेचा तांब्यांवर परिणाम होत नाहीं, परंतु कर्बाम्लमिश्रित ओलसर हवेंत त्यावर कर्बिताचा हिरवा थर बसतो. उष्णमान नेहमीचें असल्यास त्यावर गंधकाम्ल किंवा उज्जहराम्ल याचा बहुतेक मुळींच परिणाम होत नाहीं, परंतु तापविल्यानंतर पहिल्या अम्लाच्या योगानें ताम्रगंधकित (मोरचूद) व गंधकद्विप्राणिद आणि दुसर्‍याच्या योगानें ताम्रसहरिद व उज्ज हीं द्रव्यें मिळतात. तीव्र नत्रिकाम्लाचाहि त्यावर परिणाम होत नाहीं; परंतु पातळ अम्ल वापरलें असतां जोरदार प्रतिक्रिया सुरू होते. व तीपासून प्रथम ताम्रनत्रित व नत्रप्राणिद, आणि ताम्रनत्रिताचें निवेशन वाढेल तसतसें नत्रसप्राणिद व अखेर केवळ नत्र हीं तयार होतात.

तांबें सांपडण्याचें ठिकाण — निसर्गांत तांबें पुष्कळ विखुरलेलें असून, तें बहुतेक जमीनींत, लोहांश असलेल्या खनिज पाण्यांत आणि अशोधित धातूंत सांपडतें. तें समुद्रांतील गवत व जमीनीवरील गवत तसेंच अंडीं, मांस, यकृत व मूत्रपिंड, मनुष्याचें व इतर प्राण्याचें रक्त व ट्यूरेको नांवाच्या पक्ष्याच्या पंखांतील रंगित द्रव्य यांत आढळून आलेलें आहे. आर्य वैद्यकांत मोरांच्या पिसांच्या राखेपासून तांबें काढीत.

वितळून तयार केलेल्या धातूचे सर्व गुणधर्म अंगीं असलेलें नैसर्गिक तांबें खनिज रूपानें आढळतें. त्याचे स्फटिक घनाकृति असतात. तांब्याच्या खाणींत नैसर्गिक तांबें बहुधां वरच्या भागांत, म्हणजे ज्या ठिकाणच्या द्रव्यावर वातावरणाचा परिणाम होत असतो तेथें सांपडतें. ह्या धातूच्या क्षाराच्या द्रव्यावर कार्य (रिडक्षन) होऊन, खाणींतील लांकडावर किंवा लोखंडी वस्तूवर धातूचे थर बसतात. कधीं कधीं तें खडकांतील भेगांतून बसतें. तांब्याची सर्वांत मोठीं खाण मिचिगानमध्यें, केबीना पॉइंटजवळ, सुपीरियर सरोवराच्या प्रदेशांत असून तेथें ४०० टनांपेक्षां जास्त माल सांपडलेला आहे. कांहीं ठिकाणी तांब्याबरोबर नैसर्गिक रुपेंहि सांपडतें.

अशोधित धातु — तांब्याचे मुख्य अशोधित धातू म्हटले म्हणजे क्युप्राइट व माल्कोनाइट हीं प्राणिदें, मालकाइट व चेसिलाइट हीं कर्बितें, अ‍ॅटॅकॅमाइट हें हरिद, क्रायसोकोल हा सिलिकेट, व चाल्कोसाइट, चाल्कोपायराइट, एरुबेसाइट व टेट्राहेड्राइट हें गंधकिद हे होत. क्युप्राइट हें फार प्रमाणांत आढळत नाहीं. तेनसी व मिसीसिपीच्या खोर्‍यांतील खाणीमध्यें माल्कोनाइट पुष्कळ सांपडतें. मालकाइटमध्यें धातूचें प्रमाण शेंकडा ५६ असतें. तें दक्षिण आफ्रिका, सैबिरिया वगैरे ठिकाणीं पुष्कळ मिळतें. अ‍ॅटॅकॅमाइट मुख्यत्त्वेंकरून चिली व पेरू या देशांत आढळतें. शुद्ध क्रायसोकोलमध्यें धातूचें प्रमाण शें. ३० असतें. ही धातु चिली, विस्कोनसिन व मिसोरी ह्यांत पुष्कळ सांपडतें. परंतु तांब्याचे गंधकाबरोबर होणारे संयुक्त पदार्थ हे आर्थिक दृष्ट्या सर्वांत महत्त्वाचे होत. चाल्कोसाइटमध्यें तांब्याचें प्रमाण शें. ८० व चाल्कोपायराइटीमध्यें शेंकडा ३४.६ असतें.

धातुविद्या — अशोधित धातूपासून तांबें मिळविण्याच्या तीन रीती आहेत. (१) कोरडी किंवा सुकी किंवा अनार्द्र; (२) ओली किंवा आर्द्र व (३) वैद्युतिक.

अशोधित धातु घेतली असेल त्याप्रमाणें व स्थानिक परिस्थितीप्रमाणें कामाच्या रीती भिन्न असतात. ज्या अशोधित धातूंत तांब्याचें प्रमाण शें. ४ पेक्षां कमी असतें तींतून तांबें काढण्याकरितां अनार्द्र रीत फायदेशीर पडत नाहीं. यासाठीं अशा धातूकरितां आर्द्रपद्धतीचा उपयोग केला जातो.

तांबें गाळणें — प्रथम, अनार्द्र रीतीनें तांबें गाळण्याच्या पद्धतीचीं सामान्य तत्त्वें सांगून, मग उपयोगांत आणल्या जाणार्‍या यंत्रसामुग्रीचें वर्णन देऊ. तांब्याच्या गंधकीकृत अशुद्ध धातूंत (आर्थिक दृष्टीनें ह्याच अत्यंत महत्त्वाच्या आहेत) बहुधां अर्सेनिक व अँटिमनी यांचें मिश्रण असल्यामुळें, शक्यतर हीं परकीं द्रव्यें प्रथम काढून टाकणें जरूर असतें. याकरितां भाजून भस्मीकरण केल्यानंतर त्यांचा रस करतात. याला मॅट असें म्हणतात. या रसांत तांबें व लोह यांच्या गंधकिदांचें मिश्रण असतें, परंतु अर्सेनिक, अँटिमनी किंवा सिलिका हीं द्रव्यें बहुतकरून मुळींच नसतात. आतां त्या मिश्रणांतील लोखंड काढून टाकण्याकरतां, त्यांत कोक व द्रवकारक सिलिकायुक्त द्रव्यें मिसळतात. तयार झालेल्या धातूस तींत अद्यापहि लोखंड राहिलेलें असल्यास ''निळी धातु'', निराळें तांबें व तांब्यांचें प्राणिद असल्यास ''पिंपल धातु'', व तांब्याचें शुद्ध गंधकिद राहिलेलें असल्यास ''पांढरी धातु'' अशीं नांवें दिली जातात. ह्या धातूचा पुन्हां रस करून मग ती शुद्ध केली जाते.

इंग्लिश पद्धतींत पुढील क्रिया करतात. (१) अनाम्लीकरण, (२) भट्टींत ( परावर्तक भट्टी ) घालून रस करून मॅट बनविणें; (३) मॅट भाजणें; (४) पांढरी धातु करण्याकरितां, पुन्हां भट्टींत टाकून वितळविणें; (५) पांढर्‍या धातूची पुन्हां मॅट अथवा अशुद्ध धातु करणें; (६) अशुद्ध धातूचें शुद्धीकरण इत्यादि.

जर्मन किंवा स्विडिश पद्धत:— ह्या पद्धतींत प्रतिध्वनिक किंवा परावर्तक भट्टीच्या ऐवजीं झोताच्या भट्टीचा उपयोग केला जातो; हा तिचा विशेष आहे. तींत पुढील क्रिया करतात: (१) भस्मीकरण; (२) मॅट तयार करण्याकरतां झोताच्या भट्टीमध्यें रस करणे; (३) मॅट भाजणें; (४) कोक व द्रवकारक पदार्थांबरोबर झोताच्या भट्टीमध्यें रस करून काळी किंवा अशुद्ध धातु तयार करणें; व (५) अशुद्ध धातूचें शुद्धीकरण.

अशुद्ध धातूंत मुख्यतः लोह, शिसें, जस्त, कोबल्ट, निकेल, बिस्मथ, अर्सेनिक, अँटिमनी, गंधक, सेसेनियम व टेल्यूरियम ह्या परक्या धातू असतात. त्या काढून टाकण्याकरतां प्राणिदीकरण करणार्‍या पदार्थाच्या योगानें तिचा रस करून, वरील मळी काढून घ्यावी अगर, वरील कृतीनें तयार झालेला पदार्थ उडून जाऊं द्यावा; किंवा वैद्युतिक रीतीनें तांबें निराळें करावें. प्राणिदीकरण करतांना नेहमी थोडेंबहुत ताम्रसप्रणिद बनतें; व तांब्याबरोबर वितळून त्याचा मऊपणा व चिवटपणा कमी करितें. यास्तव प्राणिदाची पुन्हां धातु करणें जरूर असतें; हें करण्याकरतां धातूचा रस ओल्या लांकडाच्या दांड्यानें ढवळावा म्हणजे लांकडांचें ज्वलन, अभिषव यांच्यापासून तयार होणार्‍या पदार्थांच्या योगानें प्राणिदाचें संस्करण होऊन, सर्व क्रिया चांगल्या तर्‍हेनें झाली असल्यास, मऊ, घनवर्धनीय व चकचकीत तांबें मिळतें.

आर्द्रपद्धति:— आर्द्रपद्धतीचा उपयोग फक्त कमी प्रतीच्या अशोधित धातूंतून, व ज्यांच्याबरोबर सोनें किंवा रुपें असतें अशा धातूंतून तांबें काढण्याकरतां केला जातो. या पद्धतींतील मुख्य तत्त्व म्हणजे अशोधित धातूचें द्रावण करून तींतून, सांक्याच्या रूपानें तांबें निराळें करणें, हें होय. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या अशोधित धातूंत प्राणिद, कर्बित, गंधकित किंवा गंधकिदाच्या रूपानें तांबें असतें. पैकीं प्राणिद व कर्बित हे गंधकिक किंवा उज्जहरिक अम्ल, लोहस हरिद, लोहिक गंधकित, अमोनियायुक्त संयुक्त पदार्थ व सोडियम् थायोसल्फेट यांमध्यें द्रवतात. परंतु आर्थिक दृष्टीनें गंधकिक किंवा उज्जहराम्ल उपयोगांत आणणें फायद्याचें असतें.

अशोधित धातु, शिसें, विटा किंवा दगड यांच्या खोज्यांत ठेवून त्यावर गंधकाम्ल टाकावें; किंवा गंधकद्विप्राणिद, नत्रस धूर ( सोरा व गंधकाम्लापासून तयार केलेला ) व वाफ यांचें मिश्रण सोडावें. बहुतेक तांब्याचा मोरचूद झाल्यावर, अशोधित धातूंतील क्षार काढून टाकण्याकरतां ती धुतात. उज्जहराम्ल वापरलें असता अनाम्लक्षार बनत नाहींत, परंतु त्यांत लोहसप्राणिदें द्रवातात ही गोष्ट अनिष्ट आहे.

अनाम्लीकरण— अनाम्लीकरणाची ( भाजण्याची ) क्रिया अशा रीतीनें चालविली पाहिजे कीं; त्यामुळें शक्य तेवढें अर्सेनिक व अँटिमनी निघून जाऊन, अनाम्लीभूत धातु वितळवितांना तांब्याशीं संयोग पावण्याला जरूर तेवढाच गंधक शिल्लक रहावा.

ताम्रगंधकित किंवा ताम्रस व ताम्रिक हरिद्राच्या द्रावणांतून सांक्याच्या रूपानें तांबें निराळें करण्याकरितां लोखंडाचा उपयोग करितात. तांब्याच्या  सांक्याचा आकार व सांका निराळा होण्याला लागणारा वेळ, लोखंड, शुद्ध-अशुद्ध लोखंडाचा कीस किंवा कांड्या यांपैकीं ज्या स्थितींतील घेतलें असेल त्यावर अवलंबून असतो. लोखंडाची पूड घेतली असतां क्रिया सर्वात जलद होते. लोखंडाचा उपयोग करितांना द्रावण अगदीं शिथिल असावें; व त्यांत लोहिक क्षाराचें प्रमाण शक्य तेवढें कमीं असावें, नाहीं तर स्वतंत्र अम्लाचा लोखंडावर परिणाम होऊन लोहिक क्षारांचें संस्करण होईल.

गंधकिदाच्या स्वरूपांतील अशुद्ध तांब्यापासून, आर्द्र पद्धतीनें धातुरूप तांबें काढतांना पुढील क्रिया कराव्या लागतात: (१) तांब्याचें द्रवणीय स्वरूपांत रूपांतर करणें, (२) तांब्याचे क्षार द्रवविणें व (३) सांक्याच्या रूपानें तांबें निराळें करणें. ताम्रगंधकिदाचें गंधकित केल्यास तें पाण्यांत द्रवतें; अम्लप्राणिद केल्यास गंधक किंवा उज्जहराम्लांत द्रवतें; ताम्रिक हरिद पाण्यांत द्रवणीय आहे, व ताम्रस हरिद धातूंच्या हरिदांच्या द्रवणांत विरतें.

उघड्या हवेंत ठेवणें, भाजून अनाम्ल करणें, व लोखंडाचें नत्रित अगर लोहिक गंधकित यांबरोबर तापविणें, यांपैकीं एखादी क्रिया करून गंधकिदांचें गंधकितांत रूपांतर केलें जातें. पहिल्या रीतींत वेळ फार लागतो. अशुद्ध धातूंत लोहाचें प्रमाण जास्त असल्यास मात्र दुसर्‍या रीतीचा उपयोग करण्यास हरकत नाहीं. तरी ह्या रीतीनें थोडें बहुत गंधकिद तसेंच कायम रहातें. लोहस गंधकिताबरोबर भाजून भस्म केल्यास सर्व गंधकिताचें प्राणिद तयार होतें. लोहिक गंधकिताचा उपयोग, उघड्या हवेंत ठेवण्याच्या कृतींत जोड किंवा पुरवणी म्हणून करितात.

उज्जहर किंवा गंधकाम्ल स्वस्त असेल तर गंधकिदाचें प्राणिद तयार करण्यांत येतें. त्यावेळीं अनाम्लीकरणाची क्रिया परावर्तक किंवा धातूवर ज्वाला परत फिरविणार्‍या भट्टींत करितात. किंवा गंधक परत पाहिजे असल्यास बंद तोंडाच्या भट्टीं (मफल फरनेस) मध्यें करितात.

ताम्र गंधकिदाचें हरिद करावयाचें असल्यास, अशोधित धातू मिठाबरोबर भाजतात; परंतु सर्पण महाग असेल तर किंवा कोणत्याहि प्रकारचे अपायकारक असून धूर हवेंत मुळींच जाऊं द्यावयाचे नसतील तर, अशुद्ध धातूवर लोहसहरिद आणि उज्जहराम्ल, किंवा लोहिकहरिद घालतात. दोन्ही रीतींती ताम्रिकहरिद तयार होतें व नंतर त्याच्या द्रावणांतून वर दिल्याप्रमाणें लोहाच्या योगानें तांबें निराळें काढितात.

याप्रमाणें मिळालेल्या धातूंत शें. ५५ पेक्षां जास्त तांबें असेल तर तिचें एकदम शुद्धीकरण करितात; पण हें प्रमाण कमी असेल तर मॅटबरोबर ते पुन्हां वितळविलें जातें. इतर पदार्थांत मुख्यतः लोहाचें अनाम्ल क्षार, लोह, ग्राफाइट, व कधीं कधीं सिलिका, अँटिमनी आणि लोहाचे आर्सेनेटस असतात. धुण्यानें हे पदार्थ निघून जातात. तांब्यांत कर्बयुक्त द्रव्यें जास्त असल्यास (सांका पाडण्याकरितां लोखंडाची पूड वापरली असतां तांब्यांत कर्बयुक्त द्रव्यें बहुतकरून रहातात.) तांबें हवेंत तापवितात; त्यामुळें कर्ब जळून जातो. त्याबरोबरच थोड्याशा तांब्याचें प्राणिदीकरण होतें; याकरितां त्यांचें पुन्हां संस्करण करावें लागतें.

वैद्युतिक शुद्धीकरण — तांब्याबरोबर असलेल्या इतर धातूपासून मग त्या सोनें किंवा चांदी याप्रमाणें मौल्यवान असोत किंवा अर्सेनिक, अँटिमनी, सेलेनियम व टेल्युरिमप्रमाणें हीण धातू असोत, वैद्युक्तिक रीतीनें तांबें निराळें करण्याचीं तत्त्वें पुष्कळ दिवसांपूर्वी माहित झालेलीं होतीं परंतु डायनॅमोंत सुधारणा होऊन विद्युच्छक्ति कमी खर्चांत मिळूं लागेपर्यंत तांब्याचें विद्युद्विघटन मोठ्या प्रमाणावर करणें (व्यापारी दृष्टीनें) शक्य नव्हतें. हल्ली विजेचे उपयोग वाढल्यामुळें, विद्युद्विघटनानें तयार केलेल्या व उत्तम प्रकारची विद्युद्वाहक शक्ति असलेल्या तांब्याची मागणी वाढत चालल्यामुळें त्या तांब्याला वितळवून शुद्ध केलेल्या तांब्यापेक्षां किंमतहि चांगला येते. तांब्याची किंमत वाढल्यामुळें त्याबरोबर असणारी मौल्यवान धातु (सोनें किंवा रुपें) २५ किंवा ३० रुपयांपेक्षां जास्त किंमतीची नसली तरी वैद्युद्विघटनानें तांबें तयार करणें फायद्याचें पडतें.

मोठ्या प्रमाणावर तांबें शुद्ध करण्याचा प्रयत्‍न जी. आर. एलकिंगटन यानें करून, पहिलें पेटंट १८६५ सालीं घेतलें. त्यानें अशुद्ध तांब्याच्या जाड पत्र्याच्या धनध्रुवाकरितां व वैद्युतिक रीतीनें तयार झालेल्या तांब्याचा थर ज्यावर बसला आहे अशा पत्र्यांचा ऋण ध्रुवाकरितां उपयोग केला. पंचपात्रीसारख्या आकाराच्या अग्निमृत्तिकेच्या मोठ्या भांड्यांत ताम्रगंधकिताचें संपृक्त द्रावण घालून, त्यांत सहा धनध्रुवांच्यामध्यें चार ऋणध्रुव (दोन धनध्रुवांच्यामध्यें १ ऋणध्रुव याप्रमाणें) ठेवण्यांत येऊन सर्व धनध्रुव एकमेकांशीं व त्याचप्रमाणें सर्व ऋणध्रुव एकमेकांशीं जोडलेले होते. याप्रमाणें १०० किंवा अधिक बरण्यांची मालिका तयार केली होती (म्हणजे एका बरणीच्या धनध्रुवाचीं टोकें दुसर्‍या बरणीच्या ऋणध्रुवाशीं जोडलेलीं होतीं). प्रवाहाची घनता दर चौ. फुटास ५ किंवा ६ अँपिअर असे. याप्रमाणें प्रवाह चालू झाल्यानंतर धनध्रुवावरील तांबें ऋणध्रुवावर जाऊन बसल्यामुळें तें वाढत जाते, व धनध्रुव कमी होत. ऋणध्रुवांची जाडी बरीच झाल्यानंतर त्याचे पत्रे करीत किंवा तसेंच बाजारांत पाठवून देत. चांदी व इतर अद्राव्य पदार्थ बरणीच्या तळाशीं बसत. विद्युद्विघटनार्थ घेतलेल्या द्रावणांत लोहाचें प्रमाण फार होईपर्यंत त्याचा उपयोग केला जात असे; परंतु त्यांत वरचेवर गंधकम्लाचें अगदीं पातळ मिश्रण घालीत असत. ही पद्धत ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची आहे; व अद्यापहि खर्च आणि त्रास कमी करून, धातु जास्त करण्याकरितां व ती लवकर मिळण्याकरितां थोडे बहुत फेरफार करून हीच पद्धति प्रचारांत आणली जाते.

प्रवाहाच्या घनतेवर तांब्याचे स्वरूपगुण अवलंबून असतात. म्हणजे प्रवाह अगदीं दुर्बल असतां तांबें फिकट रंगाचें व ठिसुळ असतें. जसजसा प्रवाह जोरदार होत जाईल तसतसे कांहीं एका मर्यादेपर्यंत तांब्याचे गुणधर्म चांगले होत जातात. पण पुढें त्याचा रंग काळसर होत जातो. व त्याच्या परमाणूंतील आकर्षकशक्ति कमी कमी होत गेलेली आढळून येते. तांबें शुद्ध करितांना सामान्यपणें, प्रवाहघनता ७.५ ते १२ किंवा १५ अँपियरपर्यंत असते व द्रावणांत, १ ग्यालन पाण्यामध्यें ११/२ ते २ पौंड ताम्रगंधकित व ५ ते १० औंस गंधकाम्ल असतें.

तांबें गाळून शुद्ध करण्याच्या अर्वाचीन पद्धतीनें पुष्कळ वेळ व श्रम हीं वांचतात; त्यामुळें जगांतील तांब्याचें उत्पन्नहि पुष्कळ वाढलें आहे. गंधकीकृत तांब्याची अशुद्ध धातूची सकाळीं भठ्ठी लाविल्यास संध्याकाळपर्यंत, तांब्याचें प्रमाण शें. ९९ असलेल्या पट्टया बाहेर पाठविण्याकरितां तयार होतात. ह्याच कामाला पूर्वी चार महिनेहि पुरत नसत. जगांत तयार होणार्‍या तांब्यापैकीं, शें. ७० चें वैद्युतिक रीतीनें शुद्धीकरण केलें जातें. १९०७ सालीं अमेरिकेंत ४६१५८३ टन तांबें शुद्ध करण्यांत आलें; त्याबरोबर १३९९५४३६ औंस चांदी व २७२१५० औंस सोनें मिळालें. अलीकडे अमेरिकेमध्यें तांब्याची पैदास वाढत असून इतर देशांत कमी होत आहे.

तयार झालेल्या सर्व मालाला तीन महिन्याच्या आंत मागणी येते व तो बहुधां एक महिन्यापेक्षां जास्त पुरतहि नाहीं, यावरून पैदाशीबरोबर त्याचा खपहि वाढला आहे हें उघड आहे. हल्लीं जहाजांना बाहेरून लावण्याकरितां तांब्याच्या पत्र्यांचा उपयोग करित नाहींत तरी वैद्युतिक उपकरणें आणि विद्युद्वाहक करण्याकडे तांब्याचा उपयोग होऊं लागल्यामुळें तांब्याचा एकंदर खप कमी झालेला नाहीं.

तांब्याच्या मिश्रधातू:— बहुतेक दुसर्‍या सर्व धातूबरोबर तांब्याचें मिश्रण होऊन महत्त्वाच्या मिश्रधातू बनतात. त्यांपैकीं ज्यांत तांब्याचें प्रमाण बरेंच आहे अशा मुख्य मिश्रधातू म्हटल्या म्हणजे पितळ, ब्रांझ व जर्मनसिल्व्हर या होत. त्यांचे गुणधर्म व उपयोग त्या त्या धातूच्या वर्णनांत दिले आहेत.

तांब्याचें अस्तित्व शोधून काढण्याच्या रीती:- तांब्याच्या संयुक्त पदार्थांच्या योगानें बुनसेन बर्नरच्या ज्वाळेला हिरवा रंग येतो. तांब्याच्या क्षाराच्या द्रावणांत अमोनिया मिळविला असतां त्याला एक प्रकारचा निळा रंग येतो. पोट्याशम फेरो सायनाइडच्या योगानें तपकिरी रंगाचा सांका मिळतो, व द्रावण फार पातळ असेल तर नुसता तपकिरी रंग होतो. या प्रतिक्रियेनें ५००००० पट पाण्यांतील १ भाग तांब्याचेंहि अस्तित्व शोधुन काढितां येतें.

औषधाकरितां उपयोग:— ताम्रगंधकिताचा ( मोरचुदाचा ) वांतिकारक म्हणून उपयोग केला जात असे. परंतु त्यामुळें मागून ग्लानि येते व त्यापासून अपेक्षित क्रिया न झाल्यास पोटांतील श्लेष्मल त्वचेवर त्याचे फार हानिकारक परिणाम होतात, या कारणास्तव हल्ली त्याचा उपयोग या कामाकरितां क्वचित् केला जातो. तथापि बाह्यतः, दाहक व कौथघ्न म्हणून तें उपयोगी आहे. तांब्याचे संयुक्त पदार्थ विषारी असतात.

चिटें छापण्याकामीं व हिरवे रंग करण्याकरितां मोरचूदाचा फार उपयोग करतात. पेरणीच्या बियाला कीड लागू नये म्हणून तें मोरचुदाच्या पाण्यांत भिजवितात.

तांबें गाळण्याचे कारखाने हिंदुस्थानांत बरेच जुने असावे. हल्लीं बंगाल प्रांतांत सिंधभूम व दारभूम येथें हे कारखाने सुरू झाले आहेत. दार्जिलिंग चांदा, गढवाल, आसाम व बलुचिस्तान इत्यादि ठिकाणीं तांब्यासंबंधीं महत्त्वाचे शोध लागले आहेत. दक्षिण हिंदुस्थान, राजपुताना व हिमालयाच्या बाह्य प्रदेशांतील पुष्कळसे भाग यांमध्यें पूर्वी तांबें गाळीत असत. पुष्कळ यूरोपियन कंपन्यांनीं तांबें खणून तें गाळण्याचे प्रयत्‍न या प्रांतांत केले परंतु ते निष्फळ ठरले.

तरी कच्चें तांबें खाणींतून काढून शुद्ध करण्याचे कारखाने काढण्यास कौलनामे व परवाने दिले जातात. हल्ली हिंदुस्थानांत परदेशांतून तांबें फार येतें. परंतु हिंदुस्थानांतील चांगल्या खाणीचें तांबें शुद्ध केलें तर बरीच अडचण दूर होईल. पूर्वी तांबें शुद्ध करण्याचीं साधनें सुधारलेली नसल्या कारणानें खाणी खणणारे लोक पायराटीसपर्यंत पोंचतच नसत. कारण मध्येंच पाणी लागत असे; यामुळें वरच सांपडणारीं तांब्यांचीं प्राणिदें व कर्बितें यांपासूनच ते लोक तांबें काढीत असत.

तांबें व पितळ यांचे कारागीर — हे कारागीर तीन प्रकारचे आहेत (१) गाळणारे, (२) ओतणारे व (३) तांबट. लोखंड व तांबें यांच्या कारखान्यांची संख्या एकत्र दिलेली असते. १९०५ त हिंदुस्थानांत असे २४३०० कारखाने होते. अलीकडे तांबें पितळ यांचे कारखाने शहरांत जास्त प्रमाणावर निघू लागले आहेत. इतर उद्योगधंद्यांशीं सरकारी रिपोर्टांत तुलना करून पहातां हा धंदा चांगल्या स्थितींत आहे. कारण या कारखान्यांतील बहुतेक काम हलकें असतें.

तांबें व पितळ्यांचीं भांडीं — प्रत्येक प्रांतांत दोन किंवा त्याहून जास्त कारखाने आहेत त्यामुळें प्रत्येक प्रांतांतील भांड्यांचे आकार, घडण व डौल हीं वेगळालीं असतात. पितळ हें तांबें व जस्त यांचें २:१ किंवा ४:३ याप्रमाणें मिश्रण करून तयार होतें. हें हिंदुस्थानांत बहुधां करीत नाहींत. परदेशांतून याचे पत्रे येतात. कांसें हें, तांबें व जस्त यांचें ७:२ या प्रमाणांत मिश्रण करून करतात. हें हिंदुस्थानांत तयार होतें. धालिया किंवा भारिया हे लोक कांसें तयार कारतात व कांसार हें कांसें विकतात.

हिंदू लोक सोन्याच्या खालोखाल तांबें व रुपें या धातूंनां शुद्ध समजतात. पितळ हें त्याहूनहि खालच्या दर्जाचें मानिलें जातें. मुसुलमान लोक पितळेला हलकी मानतात; परंतु कल्हई केलेली तांब्याचीं भांडीं हे वापरतात; कांशाच्या भांड्यांत अंबट पदार्थ कळकत नाहींत.

हिंदी कारागिरांनां पूर्वी तांबें व पितळ व त्यांच्या मिश्रणानें झालेल्या धातूंचें कुशल काम व उपयोग यांचें चांगलें ज्ञान असावें असे त्यांच्या भांड्यांवरून व इतर जिन्नसांवरून दिसतें. ब्रह्मदेशांतील पितळेच्या मूर्ती इतक्या कमी श्रमानें व साहित्यानें केलेल्या आहेत कीं आंग्ल कारागिरांनां त्या तितक्या कमी श्रमानें व साहित्यानें करतां येणार नाहींत. राजपुताना व इतर ठिकाणीं तांब्याच्या बांगड्या फार स्वस्त मिळतात.

या धातूंचीं घरगुतीं भांडीं अगदीं साधीं असून त्यावर नक्षीदार काम नसतें. हिंदु लोकांमध्यें या धातूचे लोटे व मुसुलमान लोकांत झार्‍या वापरतात.

या धातूंच्या पंचपात्रीं, आचमनी (संध्येची पळी), धूपदाणी, सिंहासन, आर्ती, घंटा इत्यादि पूजेची भांडीं व उपकरणीं व कृष्ण, विष्णु इत्यादिकांच्या मूर्ती या जिनसा तयार करतात.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .