प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या   

तामिळ वाङ्‌मय, प्राचीन — पाश्चात्य पंडितांच्या मतें इ. सनाच्या नवव्या शतकापूर्वी तामिळ वाङ्‌मय मुळींच अस्तित्वांत नव्हतें. पण श्री. कनकसभेच्या मताप्रमाणें वस्तुस्थिति अशी दिसते कीं, तामिळांचें स्वतंत्र व उत्कृष्ट असें वाङ्‌मय नवव्या शतकापूर्वीच लिहिलें गेलें होतें, व त्यानंतरचे वाङ्‌मय म्हणजे बव्हंशीं संस्कृत ग्रंथांचें रूपांतर व अंधानुकरण आहे असें म्हणण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. याचा अर्थ कनकसभेस कांहीं अगदीं निराळे ग्रंथ सांपडले असा नाहीं तर कांहीं ग्रंथकारांस तो ख्रिस्तपूर्व काळापासून नवव्या शतकापर्यंत घालतो व इतर अभ्यासक या कवींस बरेच अर्वाचीन समजतात. प्राचीन तामिळ काव्यांचा मननपूर्वक अभ्यास करितां असें दिसून येणार आहे कीं, कांहीं जुनाट ग्रंथ दोन हजार वर्षांपेक्षांहि जास्त पाठीमागचे असून त्या प्राचीन काळीं तामिळांचें अरब, ग्रीक, रोमन आणि जाव्हानी यांसारख्या राश्ट्रांशीं व्यापारी दळणवळण असल्याकारणानें तामिळ लोक संपत्तिमान व सुसंस्कृत होते. भौतिक उत्कर्षाच्या विकासाबरोबर वाङ्‌मयीन चळवळीलाहि एकदम उत्तेजन मिळालें. तामिळी वाङ्‌मयाचा अत्युकृष्ट काळ ख्रिस्तशकाच्या पहिल्या शतकांतला होय; आणि उग्रपाण्ड्य या तामिळ राजाच्या दरबारीं मदुरेस भरलेलें कविसंम्मेलन शेवटचें होय. या काळांतील पन्नासाहून ज्यास्त कवींच्या कृती आज आपल्यापर्यंत आल्या आहेत हे कवी अनेक भिन्न भिन्न जातींचे, धर्मांचे व तामिळ देशांतील निरनिराळ्या भागांतील आहेत. यांत कांहीं निग्रंथ आहेत, कांहीं बौद्ध आहेत, तर कांहीं ब्राह्मणी धर्माचे आहेत. त्यांच्यांत राजे, आचार्य, व्यापारी, वैद्य, शेतकरी आणि कारागीर असे अनेक पेशाचे लोक आहेत. या देशाचा प्राचीन इतिहास अंधकार व अनिश्चितता यांनीं बराच आवृत आहे तरी एकाच काळांतील इतक्या अनेक कवींचे ग्रंथ, त्यांवर इष्टप्रकाशाचा मोठा झोत पाडतात यांत संशय नाहीं.

प्राचीन काव्यग्रंथ ( स. ५०-१५० पर्यंतच्या काळांतील ):- मुप्पाल किंवा कुरला, मणि-मेखलाइ, व शिल्प-अधिकारम् या काव्यग्रंथांशिवाय या काळांतील दुसरा एक विशेष नामनिर्देश करण्याजोगा ग्रंथ म्हणजे ''कलिथ-थोकई'' होय. यांत कलि छंदांतलीं १५० प्रेमगीतें मदुरेंतील नल्लन्थुवनर नांवाच्या एका तामिळी पंडितानें संकलित केलेलीं आहेत. या गीतांचे निर्माते दिले नाहींत, तथापि यांतील विविध पद्यरचना व विषय पाहिले असतां हीं सर्व गीतें एका माणसाचीं नाहींत असें लागलीच दिसून येतें. गीतें बव्हंशीं संवादात्मक असून, वक्ते बहुधां एक युवती, तिची दासी आणि तिचा प्रियकर दिसतात. या गीतांतून शुद्ध व पवित्र प्रेम उत्तम तर्‍हेनें दिग्दर्शित केलें असून, पुढील काळांतील तामिळ शृंगारिक पद्यांत दिसून येणारा अश्लीलपणा व ग्राम्य शृंगार यांत कोठें सांपडत नाहीं. यांतील प्रेम-दृश्यें तामिळांतील स्त्रीपुरुषसंबंध, आणि अनुनय व विवाह यांसंबंधीची त्यांची विशिष्ट तर्‍हा अगदीं हुबेहूब आपणांसमोर ठेवितात. यांपैकीं कांहीं दृश्यें पुढें मांडिलीं आहेत:- शिकारीला जात असलेल्या एका युवकाला राईत झोल्यावर झोके घेत बसलेली, किंवा ओढ्यावर अंग धूत असलेली अथवा शेतांत माळ्यावर बसून पाखरें हांकीत असलेली एक कुमारिका आढळून येते व तिच्या सौंदर्याला मोहित होऊन शिकारीचा पाठलाग करण्याच्या निमित्तानें तो वारंवार त्या ठिकाणीं येतो. जर तिच्या डोळ्यांत तो भरला तर ती त्याला आपल्या घरीं भेटूं देते, आपल्याबरोबर लांब फिरावयास येऊं देते, नदीला जाण्यास त्याची सोबत घेते, इतकेंच काय पण आपल्या मंडन ( वेणी-फणी वगैरे ) कार्यांत त्याची मदत स्वीकारते व शेवटीं तो तिच्याशीं लग्न लावितो. पण जेव्हां ती युवती फार भिडस्त असल्यांकारणानें आपल्या अनुनयाला थारा देत नाहीं तेव्हां तो तिच्या दासीशीं बोलणें लावितो, तिच्या ( दासीच्या ) मालकिणीच्या अतुल सौंदर्याची तारीफ करतो, आणि एकदां तिची गांठ घालून देण्याबद्दल त्या दासीच्या हातापायां पडतो. नंतर ती दासी यजमानिणीजवळ हळूच बोलणें काढून, मोठ्या अभिमानानें तिच्यावर मोहित झालेल्या त्या तरुण व सुंदर तिर्‍हाइताच्या उदात्त चेहर्‍याचें वर्णन करते. तेव्हां हें प्रणयी जोडपें गांवाबाहेरच्या राईंत संमीलित होतें; प्रथम दिवसां गांठीं पडतात, पण पुढें पुढें तीं दोघें रात्रींहि चोरून गांठी घेतात. मग प्रियकर तिच्या बापाकडे मागणी घालून त्याची संमति मिळवितो; किंवा आपल्या प्रियकरिणीला असें सांगतो कीं मला दूर प्रवासाला जावयाचें असल्यानें थोडे दिवस तरी आपला वियोग होणार. युवतीची दासी त्याला रहाण्याविषयीं गळ घालते, वाटेत हिंस्त्र पशू व पाशवी मनोवृत्तीचे चोर आहेत, तेव्हां तुमच्यावर अनेक संकटें ओढवतील अशा प्रकारची त्याला भीति घालते; व तारुण्य भराभर जात आहे, तें पुन्हां कोणालाहि प्राप्‍त होत नाहीं. शिवाय आयुष्यांतील सुखें अनुभवण्याचा हा काळ आहे, वगैरेंची त्याला आठवण देते. एक दिवस जर तुम्हीं संकेतस्थानीं आला नाहीं तर बाईसाहेब किती दुःखी होतात, तेव्हां आपण जर त्यांनां सोडून गेलात तर वियोगदुःखामुळें त्यांचा अंत होणार आहे अशी स्वतःला भीति वाटंत असल्याचें ती दासी त्याला सांगते. याउप्परहि जेव्हां तो प्रियकर आपला हेका सोडीत नाहीं तेव्हां ती तरुणी आपल्याला बरोबर नेण्याविषयीं प्रियकराची विनवणी करिते; पण तो तिला असें समाजावतो कीं तूं नाजूक व भित्री असल्यानें तुला इतका लांबचा व कठिण प्रवास होणार नाहीं. यावर ती उत्तर देते कीं, अरण्यांत देखील हरणाच्यामागून हरिणी जाते. आपण मला सोडून गेलात तर मी खाणेंपिणें वर्ज करीन व आपला निजध्यास घेऊन मरेन. आतां माझें हृदय आपल्या हृदयाशीं बद्ध झालें आहे, तें तेंथें तसेंच असूं द्या; त्याला माझ्याकडे परत पाठवूं नकां. कारण तें मला दुःखदायक होईल या उत्तरानें ती प्रियकराला निरुत्तर करते, व त्याच्याबरोबर पळून जाते. या तरुणीची आई तिला शोधीत फिरते व जो प्रवासी भेटेल त्याला, एक मुलगी एका तरुण मनुष्याबरोबर जातांना रस्त्यांत तुम्हीं पाहिली कां ? असें विचारीत सुटते. वाटसरू तिचें समाधान करून सांगतात कीं, ''आपल्यावर प्रेम करणार्‍या युवकाबरोबर जाण्यांत तुमच्या मुलीनें गैर तें काय केलें ? मोत्याला जन्म देणार्‍या सागराला त्याचा उपयोग काय ? ज्या गिरीवर चंदन उगवतो त्याला त्यापासून काय फायदा ? पोवळीं ज्या खडकावर बनतात त्याला त्यांचा काय उपयोग होतो ? जो त्यांनां धारण करील त्यालाच त्यांचा उपयोग. याचप्रमाणें आपल्या आवडीच्या मनुष्याबरोबर तुझी मुलगी गेली आहे.'' कांहीं दिवसांनीं मुलगी आपल्या प्रियकरासह आईकडे परत येते व या तरुण जोडप्याचें नेहेमींच्या रिवाजाप्रमाणें लग्न लागतें. जर राजाच्या नोकरीनिमित्त तो प्रियकर दूर देशीं गेला तर ती युवती खिन्न होते, आपल्या मैत्रिणींची संगत टाकिते, एकदां रडते, एकदां हंसते. आपल्या भोंवतालच्या निर्जीव वस्तू देखील आपल्या शोकांत भाग घेतात अशी ती कल्पना करते; उदाहरणार्थ, सागर रडतो, वाळूचे डोंगर कंप पावतात, झाडांचीं पानें खालीं माना घालितात. ज्याची नौका समुद्रांत फुटली आहे अशा अगतिक नाविकाप्रमाणें आपली स्थिति आहे असें तिला वाटतें. इलवू वृक्षावर किरमिजी फुलें व कोंगूवर सोन्याचीं फुलें बहरलीं आहेत व नदीतीरावरील सर्व झाडें फुललीं आहेत; मधुकर गुंजारव करीत एका फुलावरून दुसर्‍यावर उडत आहेत; कोकिळ शब्द करीत आहेत आणि सर्व सृष्टी मजेंत आहे पण प्रियकराच्या वियोगामुळें आपलें हृदय मात्र शोकपूर्ण आहे असें ती पाहते. तिला असें स्वप्न पडतें कीं, आपला प्रियकर परत आला आहे व आपलें म्लान वदन पाहून त्याला गहिंवर येतो व तो आपले पाय धरून क्षमायाचना करीत आहे मग आपण विनोदानें पुष्पमालांनीं त्याला प्रहार करीत आहों. तेव्हां तो आपला अपराध समजावून देण्याविषयीं कांपर्‍या आवाजांत आपणाला विनंति करतो. अशा तर्‍हेचें स्वप्न पडल्यामुळें आपल्या प्रियकराची लवकरच भेट होईल या आशेनें दुसर्‍या दिवशीं सकाळीं ती प्रफुल्लित असते. तिची दासी तिच्या प्रियकराच्या श्रेष्ठ गुणांची तिला आठवण करून देते व तो तुला टाकणार नाहीं असें आश्वासन देते. याप्रमाणें कलिथ-थोकईचा थोडक्यांत गोषवारा वर दिला आहे. मुप्पल, शिलप्प-अथिकरम्, मणिमेकलाई या काव्यांचीं कथानकें कनकसभेनें ('दि तामिळस १८००, इयर्स अ‍ॅगो' ) या ग्रंथांत दिलीं आहेत.

आतां यापुढील लहान काव्यें कवींच्या नांवाखालीं क्रमवार दिलीं आहेत.

कलथ-थलई ( इ. स. ३०-६० ):- या कवीबद्दल स्वतंत्र लेख १० व्या विभागांत आला आहे.

उरिथ्थिरंक - कन्ननर ( इ. स. ४०—७० ):- यानें दोन काव्यें लिहिलीं; एक पिरुंपनरुप-पदइ आणि दुसरें पदिनप्पलइ. पहिलें सुमारें इ. स. ५० त लिहिले. त्यावेळीं कांचीचा राजा जो थिरयन याच्या ताब्यांत चोलप्रदेश होता. जरी थिरयन हें काव्य राजप्रशंसापर असलें तरी गोपगीताच्या धर्तीवर हें बनलें आहे. या राजाच्या मुलुखांतील निरनिराळे देखावे यांत प्रतिबिंबित केले आहेत; उदाहरणार्थ, मिठाचे व्यापारी सहकुटुंब ज्यांतून प्रवास करतात त्या बैलगाड्यांच्या लांबलचक मालिका; मिर्‍यांचीं पोतीं वाहून नेणार्‍या गाढवांचे तांडे; ज्यांवर शिपाई राखण आहेत अशीं जकात-नाकीं; शिकारी, धनगर व शेतकरी यांची वस्ती असलेलीं गांवें; जहाजांनीं भरलेलीं बंदरें आणि कांची हें राजधानीचें शहर इत्यादि. दुसरें काव्य इ. स. ७० च्या सुमारास कारिकल चोलाच्या कारकीदींत रचलें गेलें असावें. कारिकल चोलाच्या कविरिप्पद्दिनम् नांवाच्या राजधानीचें यांत वर्णन आहे.

मुदथ-थामक-कन्नियर ( इ. स. ६०-९० ):- यानें कारिकल चोलाच्या स्तुतिपर पोरुनर-आरप-पदइ हें काव्य रचिलें. त्यांत, कारिकलचें लहानपणींच तुरुंगांतून पलायन; बेन्सिलच्या संग्रामांत त्याला लाभलेला जय; राजा व योद्धा या दृष्टीनें त्याची पुढील कारकीर्द; त्याच्या दरबारीं येणार्‍या भाटांशीं व कवींशीं त्याची असलेली सभ्य व उदार वागणूक वगैरे विषय येतात.

कपिलर ( ९०-१३० ):- ज्ञानकोश, विभाग १० पहा.

नक्कीरर ( इ. स. १००-१३० ):- हा मदुरेंतील एका शिक्षकाचा मुलगा होता. आपल्या कवितांतून त्यानें कारिकल व किल्ली-वलवन हे चोल राजे, पांड्य राजा नेडुनचेलियन आणि चेर राजा वान-वर्मन् उर्फ अथन यांचा उल्लेख केला आहे. तिरु-मुरुग रुप्पउइ व नेडु-नल-वडइ हीं त्यांची दोन काव्यें कायतीं सध्यां उपलब्ध आहेत. पहिल्यांत सहा तोंडें, बारा हात असलेली युद्धदेवता मुरुग (कार्तिकस्वामी) याची स्तुति आहे, व दुसर्‍यांत मदुरेंतील मोठी हिमरात्र वर्णिलेली आहे. थंडगार उत्तरवायु ताडाच्या झाडांमधून येऊन मदुरेंतील रुंद रस्त्यांवरून वहात आहे; गार वारा आंत येऊं नये म्हणून दारें व खिडक्या गच्च लावून घेऊन शय्यागारांत अग्नि प्रदीप्‍त केले आहेत; पांड्य प्रासादांत, शेजारच्या राजांशीं लढण्याकरितां ससैन्य गेलेल्या आपल्या पतीविषयीं विचार करीत राणी मंचकावर पडली आहे व तिचे नेत्र अश्रूंनीं भरले असून गालांवर त्यांचे ओघळ वहात आहेत, इकडे पांड्य राजा शत्रूच्या हद्दींतल्या आपल्या गोटांत जागाच आहे, पण तो. राणीविषयीं विचार करीत नसून जखमी झालेल्यांनां भेटण्यांत व त्यांच्या शुश्रूषेसंबंधीं आणि गोटाच्या संरक्षणासंबंधीं हुकूम सोडण्यांत गुंतलेला आहे वगैरे. हीं दोन्हीं काव्यें उत्तम वठली असून त्यांचा विषयहि हृदयंगम आहे. या कवीचीं किरकोळ पद्यें पुरननुरु, अकननुरु, कुरूंथोकइ आणि नररिइन या काव्यसंग्रहांतून सांपडतात.

नक्कीरर याच्या काव्यांत त्याच्या समकालीन गोष्टींबद्दल उल्लेख आढळतात. कारिकल चोलानें कुरुंब नांवाच्या भटक्या जातींनां स्थिर केलें; पांड्य राजानें चेरदेशावर हल्ला करून पश्चिम किनार्‍यावरील मुचिरीपर्यंत तो गेला; किल्लीवलवननें जेव्हां पांड्य राजावर चाल केली तेव्हां पलयन मारननें त्याचा मदुरेच्या तटाखालीं पराभव केला, इत्यादि निक्किररच्या काव्यांतून इतिहास आढळतो. याची शब्दयोजना व कल्पनाचित्र अति मार्मिक असून धाटणी प्रौढ व मनोरम असते; पण आपली विद्‍वत्ता प्रदर्शित करण्याचा प्रयत्‍न केल्यामुळें कधीं कधीं पांडित्य फाजील डौलाचें दिसतें. वर उल्लेखिलेल्या दोन काव्यांखेरीज लहान लहान नऊ पद्यें त्याच्या नांवावर घालतात; पण या पद्यांची भाषा इतकी अर्वाचीन दिसते कीं कोणीहि त्यांनां बनावट म्हणण्यास कचरणार नाहीं. ११ व्या शतकांतील ''हालस्य महात्म्य'' नांवाच्या मदुरेच्या शिवमंदिराच्या बखरींत या पद्यांची उगमकथा आलेली आहे. ही बखर संस्कृतांत आहे व तीवरून कवीला प्राचीन तामिळी वाङ्‌मयाचें मुळीच ज्ञान नव्हतें असें दिसतें.

मामूलनार ( इ. स. १००-१३० ):- याच्या पुष्कळशा कविता अकननुरूमध्यें व कांहीं थोड्या कुरुंथोकइ व नररिनइमध्यें आढळतात. या कवितांवरून असें दिसतें की तो मोठा प्रवासी असून, चेर, चोल आणि पांड्य राष्ट्रे, पनननडु, तुलु-नाड ( दक्षिण कानडा ) आणि एरुमइ-नडु ( म्हैसूरप्रांत ) या भागांतून तो फिरला; तो नेहमीं वेंकडम् ( अर्वाचीन तिरुप्पत्ति ) या संपत्तिमान व सुशोभित शहराचा उल्लेख करतो. पेरुंज-चोरुं-उटियंन-चेरल, चेरल-अथन, पोथिय डोंगरावर सैन्य घेऊन येणारे अनौरस मौर्य राजे, इत्यादि प्राचीन राजांचा त्यानें उल्लेख केलेला आहे.

कल्लादनार ( स. १००-१३० ):- ज्ञानकोश विभाग १० मध्यें या कवींसंबंधीं स्वतंत्र लेख आहे.

मानकुडि-मरुथनार ( इ. स. ९०-१३० ):- अथवा मानकुडीचा मरुथनार. हा तामिळ वाङ्‌मयांत उल्लेखिलेला पहिला कविचूडामणि होय. नेडुंज-चेलियन हा पांड्य राजा आपल्या दरबारांतील सर्वश्रेष्ठ कवि म्हणून याचा उल्लेख करतो. याचीं कांहीं पद्यें पुरनानुरूमध्यें आढळतात; पण याची ज्याविषयीं ख्याति आहे तें काव्य म्हणजे मदुरैककांची होय; हें नडुंज-चेलियन राजाला उद्देशून लिहिलें आहे. हें नीतिपर असूनहि ज्याकरितां लिहिलें आहे त्या विजयोत्फुल्ल, महत्त्वाकांक्षी व स्वतः कवीचा यजमान आणि राजा याला रुचण्यासारखी त्याची धाटणी आहे. काव्याचा आरंभ प्राचीन पांड्यवंशाची संग्रामकीर्ति, न्याय व बुद्धिमत्ता यांच्या उठावदार वर्णनांत करून, नंतर नडुंज-चेलियनचे विविध पराक्रम ओजस्वी शब्दांनीं सांगितले आहेत. राजाच्या अंगचे गुण, सत्य व न्याय यांविषयीं त्याची प्रीति, विश्वासू मैत्री आणि निर्भय शौर्य, मानासंबंधींची त्याची उच्च कल्पना आणि अमर्याद दानशीलता यांबद्दल कवीनें पुष्कळ प्रशंसा करून राजाला अशी आठवण दिली आहे कीं, पांड्यांच्या सिंहासनावर तुझ्यापूर्वी अधिष्ठित झालेल्या अनेक महान् व श्रेष्ठ राजांपैकीं आतां कोणीहि उरला नाहीं ! यापुढें, पांड्यसाम्राज्याखालीं असणार्‍या सुपीक जमीनी, कुरणें, अरण्यें, डोंगराळ मुलूख, समुद्रकिनारा आणि त्यावरील ज्यांत लाखों मिठागरें व केळीं आहेत, मोती काढणारे वगैरे लोक व्यापार करीत आहेत अशीं बंदरें यांचें सविस्तर वर्णन दिलें आहे. नंतर मदुरा शहरांतील दृश्यें रेखाटून शेवटीं राजाला पूर्वजांचा नांवलौकिक संभाळून, धर्माच्या ठिकाणीं निष्ठा ठेवून, प्रजेचें अक्षय हित पाहण्याचा उपदेश केला आहे. या काव्यावरून असें दिसतें कीं कवि मोठा निसर्गप्रेमी, व लोक आणि लोकरीती यांचें नीट निरीक्षण करणारा होता. यानें केलेलीं वर्णनें वस्तुस्थितिदर्शक आहेत; पण त्याची भाषासरणी नक्किररासारखी प्रगल्भ व श्रेष्ठ नाहीं.    

तिरु-विलु-वर ( इ. स. १००-१३० ):- तामिळ भाषा जोंपर्यंत अस्तित्वांत आहे तोंपर्यंत कुरल किंवा मुप्पल याचा कर्ता म्हणून याची कीर्ति अखंड राहील. याच्या समकालीन ग्रंथकारांनीं-उदाहरणार्थ चीथलई-चट्टनार आणि इलंकोआडिकल यांनीं-कुरलमधील उतारे उघ्दृत केले आहेत. १८०० वर्षे झालीं तरी तामिळी लोकांवरील कुरल काव्याचा पगडा कमी झालेला नाहीं व भाषा किंवा विचार यांच्या दृष्टीनेंहि कोणी संशय व्यक्त करण्यास धजावत नाहीं. दहापेक्षां जास्त टीका याच्यावर लिहिल्या गेल्या आहेत, पण हल्लीं जास्त अभ्यासली जाणारी टीका म्हणजे परिमेल-अलकर यानें लिहिलेली होय.

कोवुर-किलर ( इ. स. १००-१३० ):- हा संग्रामकवि चाल राजांच्या दरबारीं प्रख्यात होता. पुरननुरूमध्यें चेड-चेन्नी-नलंक-किल्ली-वलवन यांच्या प्रशंसापर केलेलीं अनेक पद्यखंडें आढळतात. नलंक-किल्लीच्या कारकीर्दीत तो व त्याचे धाकटे भाऊ यांच्यामध्यें जेव्हां लढाया चालल्या होत्या त्यावेळीं कोवुर-किलर, नेढुंक-किल्लीच्या गोटांत होता. तेव्हां नलंककिल्लीनें प्रथम उरैय्यूर व मागाहून अवूर यांनां वेढा घातला, त्यावेळीं कोदूरनें भावांभावांत सख्य घडवून आणण्याचा प्रयत्‍न केला. एकदां नेडुंक-किल्ली हा एका गरीब कवीला हेर समजून ठार मारीत असतां कोवूरनें त्याला जीवदान देवविलें. किल्ली-नलवनाच्या कारकीर्दीत जेव्हा राजानें मलयमनाचे दोन पुत्र पकडून हत्तीच्या पायांखालीं त्यांनां तुडविण्याचा हुकूम सोडला, तेव्हां यानेंच त्याच्या पूर्वजांच्या प्रख्यात दयाशील कृत्यांची त्याला आठवण देऊन तो हुकूम रद्द करविला. जेव्हां या राजानें चेर राष्ट्रावर स्वारी करून करूर या राजधानीला वेढा घातला तेव्हां कोवुर-किलर आणि दुसरे दोन कवी चोल छावणींत होते.

इरैय्यनार (इ. स. १००-१३०):— इरैय्यनार-अकप्पोरुल नांवाच्या शृंगारकाव्यावरील एका व्याकरणाचा हा कर्ता होता. पुढील काळांत या ग्रंथकर्त्याचें नांव व शिवाचें नांव एक करून याची साठ सूत्रांची एक लहान पोथी प्रत्यक्ष शिवानें लिहिलेली आहे असें मानण्यांत आलें.

परनर (इ. स. १००-१३०):— या काळांतील बहुतेक भाटांप्रमाणें यानेंहि चेर, चोळ आणि पाण्ड्य राष्ट्रांतून हिंडून मोठमोठ्या राजांच्या दरबारांनां व लहान लहान संस्थानिकांच्या वाड्यांनां भेटी दिल्याचें दिसतें. नऊ राजांच्या जुटीचा उल्लेख हा करतो. हे राजे बहुधा कुरुंब असावेत व त्यांचा पराभव कारिकल चोलानें केल्याविषयीं इतिहास आहे. कारिकल चोलाचा नातू चेन कुडुव चेर यानें आर्य राजांचा पराभव केल्याचेंहि हा लिहितो. उरैयुरचा राजा थिट्टन, सोन्याच्या खाणी जेथें चालू होत्या त्या पली देशचा राजा उठ्ठियन आणि पोथ्य डोंगरांतील संस्थानिक थिथियन यांचें शौर्य व दातृत्व यांविषयीं परनरनें त्यांची स्तुति केली आहे. पथिरु पट्टुमध्यें चेनकुडव या चेन राजाच्या स्तुतीपर यानें रचलेलीं दहा पद्यखंडें आढळतात. अव्वैयर ही कवियित्री असें लिहिते कीं, जेव्हां अथियरचा राजा नेडुमन अंचि यानें करीची राजधानी कोवलुर उध्वस्त केली त्यावेळीं हा तेथें हजर असून त्यानें विजयी वीराची स्तुति गाइली. पण तीं स्तुतिपर पद्यें आज उपलब्ध नाहींत. ज्या रणभूमीवर नेडुमन अंचीचे दोघे राजशत्रू नेडुंज चेरल अथन आणि पेरु विरल किल्ली हे भयंकर रणसंग्राम करून पतन पावले त्या रणभूमीवर उभा राहून गाइलेल्या पद्यांपैकीं एकाचें भाषांतर खालीं देत आहों:—

''बाणांनीं विद्ध झालेले सर्व हत्ती कायमचे जायबंदी झाले आहेत. सर्व उमदे घोडे आपल्या स्वारांसह मारले गेले. रथांतून जाणारे सेनापती आपलीं तोंडें ढालांनीं झांकून सर्व मृत्युमुखीं पडले, मोठी मेघगर्जना करणारे नगारे जमीनीवर लोळत पडले आहेत; कारण ते वाजविणारा कोणीहि हयात नाहीं.  शत्रुपक्षाकडील दोन्ही राजे, लांब भाल्यांनीं त्यांचीं सुगंधित अशीं वक्षस्थलें विद्ध झाल्याकारणानें धारातीर्थी पतन पावले आहेत. अरेरे ! ज्यांतील शीतल नद्यांतून कमलांच्या देंठांचीं कंकणें हातांत घालून कृषिवलांच्या मुली नाचतात व बागडतात त्यांच्या सुपीक प्रदेशांची काय वाट होईल बरें ?''

पेरुंक कौशिकनार ( इ. स. १०० ते १३० ):- हा पेरुंकुनरुरचा रहिवासी होता. यानें चेनकन्माचा राजा नन्नन याचा पुत्र नन्नन याची प्रशंसा मलैपडुकडाम काव्यांत केली आहे. याच्या काव्यांत नविराम पर्वतावरील उत्कृष्ट देखावा मोठ्या सुंदर रीतीनें वर्णिला आहे. खडकावर आदळणार्‍या धबधब्यांच्या गर्जनेनें डोंगराच्या बाजूंवर होणारा दणदणाट हस्तिपांचें ओरडणें, सांवे कांडीत असतांना बायका म्हणत असलेलें गाणें, गुर्‍हाळाची करकर आणि बायकांसह आनंदानें नाचणार्‍या दारुड्या डोंगरी लोकांनीं बडवलेल्या नगार्‍यांचे आवाज; परलोकवासी योद्ध्यांच्या स्मरणार्थ उभारलेले लेखांकित दगड; रस्त्यांच्या चौकांत अमुक रस्ता कोठें जातो हे दाखविण्यांकरितां उभारलेले खुणेचे खांब; डोंगरी जातींचें आदरातिथ्य; डोंगरावरून खालीं वळत वळत वाहणार्‍या चेयर नदीचा जोराचा ओघ; तरवारी व भाले घेऊन सज्ज असलेल्या पहारेकर्‍यांकडून संरक्षिले जाणारे किल्ल्याचे दरवाजे; नन्नन राजाकडून भाटांचें होणारें सुस्वागत, डोंगराच्या त्रासदायक चढणीमुळें त्यांनां झालेल्या श्रमाबद्दल राजाचें दुःखप्रदर्शन, त्यांचें गाणें संपेतोंपर्यंत राजाचें त्याठिकाणीं थांबणें व शेवटी त्यांनां उत्तम जेवण देऊन पुष्कळ नजराण्यासह राजानें त्यांची केलेली बोळवण हा काव्यविषय आहे.

अवैय्यर ( इ. स. १०० ते १३० ):- ही अति विख्यात तामिळ कवयित्री तेरुवलुवरुपेक्षांहि जास्त लोकमान्य आहे. कारण तेरूवलुवरच्या काव्याचा अभ्यास जास्त शिकलेले पंडितच फक्त करितात. पण अवैय्यरचें काव्य वर्णमाला शिकल्यानंतर लगेच प्रत्येक तामिळ विद्यार्थी हातीं घेतो. अट्टिचूडि आणि कोनरैवेंथन हे तिचे दोन सूत्रग्रंथ तामिळ अकारविल्ह्यानें लिहिले असून त्यांनां तामिळी सुवर्ण वर्णमाला या अन्वर्थक नांवानें संबोधिलें आहे. भाटाचा धंदा असल्यानें लहानपणींच काव्यांत आपले विचार मांडण्याची उत्तम कला तिनें पैदा केली; आणि काव्यकल्पना आणि वाङ्‌मय यांकडे तिचा स्वाभाविक कल असल्यानें, बराच अभ्यास करून आपल्या गुणांचा तिनें इतका विकास केला कीं, तिचे समकालीन कवी तिला विदुषी, कवियत्री असें मानूं लागले. दैदीप्यमान कपाळ, कज्जलरंजित पापण्या, आणि कमरेला रत्‍नजडित कमरपट्टा असें तिनें स्वतःचें वर्णन केलें आहे. थस्कडूरचा राजा अथियमन अंची याच्या दरबारीं तिच्या आयुष्यांतील तारुण्याचा काळ गेला; व राजाकडूनहि तिची वहावा होत गेली. ती असें सांगते कीं, अथियमनच्या राजवाड्यांतील दिवाणखाने आणि सौधप्रांत हे डमरूवर आपण गाइलेल्या चिजांनीं दुमदुमून जात असत. अथियमनशीं तिची सलगी तिनें स्वतःच खालीलप्रमाणें प्रगट केली आहे:- ''ज्याप्रमाणें अवाढव्य हत्ती पाण्यांत बसून जेव्हां गांवातींल तरुणांना आपले पांढरे सुळे धुवूं देतो. तेव्हां तो त्यांनां जितका सुखकर असतो, तितकाच हे राजा, तूं आम्हांला सुखकर आहेस. पण तोच हत्ती मदोन्मत्त झाला असतां जितका क्रूर असतो, तितकाच तूं आपल्या शत्रूंनां आहेस.'' जेव्हां एकदां आयुर्वर्धक गुण असणारें नेल्लि नांवाच्या झाडाचें फळ कोणीं एकानें राजाला अर्पण केलें तेव्हां त्यानें तें स्वतः न खातां अवैय्यरला दिलें तेव्हां ही कृतज्ञ कवयित्री पुढील शब्दांत राजाचें आभार मानिती झाली.

''हे अंचि ! अथियरपते ! संग्रामदुर्धरा ! ज्याच्या गळ्यांत सुवर्णमाला आहेत, व ज्याच्या कंकणविभूषित बलवान हातांमध्यें विजयी तरवार परजलेली आहे, असा. तूं प्रत्येक रणांगणावर शत्रूंचा धुव्वा उडवितोस. ज्याचा कंठ निळा आहे, आणि ज्याच्या डोक्यावर चंद्रकोर आहे, त्या अतुल्य शिवाप्रमाणें तूं अक्षय श्रेष्ठ रहा. कारण उंच पर्वतावर उगवणार्‍या नेल्लीवृक्षाचें मधुर फळ मृत्यूपासून माझें रक्षण व्हावें म्हणून तूं मला अर्पण केलें आहेस.'' एकदां अयिथमनानें कांचीच्या थौडेमन राजाकडे तिला वकील म्हणून पाठविलें होतें. कदाचित् आपल्या शत्रूंविरुद्ध त्या राजाची मदत मागण्याकरितां ही वकिलात असावी. हिचा शेवट काय झाला हें जरी माहीत नाहीं तरी थोड्याच दिवसांनीं अथियमन लढाईत मारला गेला, हें खरें. या प्रसंगीं अवैय्यरनें जीं पद्यें गाइलीं तीं अतिशय हृदयस्पर्षी अशीं आहेत. ''थोडें जरी मद्य असलें तरी तो आम्हाला पिवूं देई. पुष्कळ असलें तर आम्ही त्याप्रीत्यर्थ गात असतांना तो आनंदानें आमच्याबरोबर तें घेई. जेवण साधें असो किंवा मोठ्या मेजवानीचें असो, तो पुष्कळ अतिथींसमवेत भोजनास बसे. जेथें म्हणून हाडांमांसाची समृद्धि असे, तेथें तो आम्हांला ठेवी, व जेथें बाण व भाले रोखले जात असत तेथें आपण स्वतः उभा राही. आपल्या सुगंधित हस्तांनीं तो माझ्या डोक्यावर थापट्या मारी. हाय ! हाय ! ज्या वेळीं भाल्यानें त्याचें अति प्रिय वक्षस्थल विदारण केलें, त्याचवेळीं त्यानें भिक्षापात्र, राजाचे आश्रित अशा गरीब लोकांचे हात आणि त्याच्या दरबारांतील विद्वान कवींच्या जिव्हा छेदून टाकल्या ! रडून रडून त्याच्या आश्रितांचे डोळे अंध झाले ! अहो, तो आमचा प्रियकर राजा कोठें गेला ? आतां गाणरे भाट किंवा त्यांनां बक्षीस देणारे यजमान लयाला गेले ! पण जगाला निरुपयोगी अशा नद्यांच्या शीतल तीरावर उगवणार्‍या पण अनुपभोज्य अशा पहनरई फुलांसारखे अनेक लोक हयात आहेत !'' अथियमन अंचि याच्या मृत्यूनंतर तिनें तौडिनाडांत प्रवास केला. आणि कांहीं वर्षांनीं थकडूर येथें ती परत आली. त्याठिकाणीं नेडूमन अंचीच्या एलिनी नांवाच्या मुलानें तिचा चांगला सत्कार केला. तेथील सत्काराविषयीं तिच्या काव्यांत वर्णन आहे.

चोल राजा पेरुनर किल्ली यानें जेव्हां मोठा यज्ञ केला, त्यावेळीं ही आली होती, आणि हिनें त्या प्रसंगीं एकत्र बसलेल्या उग्र-पेरु-वलुथी, पेरु-नर-किल्ली आणि चेर-मनिंको या तिघां तामिळ राजांनां उद्देशून भाशण केलें. 'आपल्या सर्व आयुष्यांत चांगलीं कृत्यें करा. तींच पुढें तुम्हांला उपयोगी पडतील.' तिनें उपदेशिलेलीं शुद्ध तत्त्वें आणि व्यावहारिक वेदांत यांचा एक नमुना म्हणून अट्टीचोडींतील आठ ओळींचें भाषांतर पुढें दिलें आहे:-
( १ ) दान करण्याची इच्छा धर.
( २ ) क्रोध आवरला पाहिजे.
( ३ ) तुला जितकी मदत करतां येणें शक्य असेल तेवढी करण्यास चुकूं नकोस.
( ४) भिक्षा देत असतांना आड येऊं नकोस.
( ५ ) तुझ्याजवळ जें असेल तें फोडूं नकोस.
( ६ ) श्रमांत कसूर करूं नकोस.
( ७ ) संख्या आणि अक्षरें यांच्याकडे दुर्लक्ष्य करूं नकोस.
( ८ ) भिक्षा मागणें लाजिरवाणी गोष्ट आहे. इत्यादि.

इडैय काडनार ( इ. स. १०० ते १३० ):- ऊसीमूरी काव्याचा हा कर्ता. हें काव्य सध्यां उपलब्ध नसलें तर यप्पअरुंककलय यावरील गुणसागराच्या भाष्यांत ह्याचा उल्लेख आढळतो. चोल राजा किल्ली-वल-वन यानें चेर राजधानी करूर हिला वेढा दिला त्यावेळीं यानें तेथें जाऊन राजाची भेट घेतली होती.

चीट्ट-लैच चाट्टनर ( इ. स. ११० ते १४० ):- हा मदुरेंतील भुसार्‍याचा मुलगा होता. हा बौद्धधर्मी असून कवि, तत्त्वज्ञानी आणि परमार्थज्ञानी म्हणून प्रख्यात होता. त्याची कीर्ति तामिळी पांच आदिमहाकाव्यांपैकीं मणिमेकलै या काव्याचा कर्ता म्हणून आहे. हा लेखनाचा उत्कृष्ट नमुना असून यांत अतिसुंदर असे अनेक उतारे आहेत. धाटणी साधी व डौलाची आहे आणि योजिलेलीं वाक्यें चांगलीं घडीव व अर्थपूर्ण आहेत. सृष्टिवर्णनांत तर याचा हातखंडा आहे. मणिमेकलै नायिकेचें स्वभावचित्र यानें फारच उत्तम रेखाटलें आहे. सुंदर, तरुण व एका नटीची मुलगी असूनहि ती आपणाला धर्मकृत्याला वाहून घेते व एक बौद्ध भिक्षुणी बनते. प्रत्यक्ष सुंदर युवराज तिच्यावर प्रेम करीत असतांना ती आपलें व्रत सोडीत नाहीं, आणि खोटा लज्जाविर्भाव दाखविणार्‍या सोंगडणीप्रमाणें न वागतां आपल्या प्रियकराविषयीं तिला सतीप्रमाणें प्रेम वाटतें, आणि त्याला कामुकतेपासून परावृत्ता करण्याचा आणि त्याचें जीवित पवित्र व आध्यात्मिक करण्याचा ती प्रयत्‍न करते. या महाकाव्याच्या शेवटच्या चार प्रकरणांत वेदांताच्या सहा शाखांविषयीं विवेचन असून त्या ठिकाणीं कवि तात्त्विक सूक्ष्मतेंत आणि अध्यात्माच्या चक्रव्यूहांत आपली पारंगतता दर्शवितो. मणिमेकलै संपल्यानंतर तो करूर येथें गेला, आणि पुष्कळ दिवस राजाचा पाहुणा म्हणून राहिला.

इलंको अडिकल ( इ. स. ११० ते १४० ):- हा चेर राजा अथन याचा पुत्र आणि चोल राजा कारिकल याचा पौत्र होता. लहानपणींच खालील गोष्टीमुळें संन्यास घेऊन निग्रंथ पंथाचा हा एक साधु बनला. एके दिवशीं तो आणि त्याचा वडील भाऊ चेंक-कुडुनन करून येथें दरबारच्या दिवाणखान्यांत सिंहासनाच्या पायरीशीं बसलें असतां एक साधु चेरल अथन राजापुढें आला, आणि कांहीं वेळ राजा व त्याचे दोन पुत्र यांच्याकडे पाहून त्यानें असें स्पष्ट सांगितलें कीं, धाकट्या राजपुत्राच्या अंगावर मोठा सम्राट होण्याचीं सर्व चिन्हें दिसतात. हें भविष्य ऐकून चेंक-कुडुनन रागावला असें जेव्हां धाकट्या भावानें पाहिलें तेव्हां आपलीं राजवस्त्रें व अलंकार काढून सिंहासनाधिष्ठित होणें अगदीं अशक्य व्हावें म्हणून त्यानें निग्रंथ संप्रदायाची दीक्षा घेतली तेव्हांपासून शहराच्या पूर्वदरवाजाबाहेरील एका मंदिरांत तो राहिला. सर्व राज्यचिंता दूर झाल्याकारणानें त्यानें आपला फावला वेळ संगीत व वाङ्‌मय यांकडे लावला. पुढें पुष्कळ वर्षांनीं जेव्हां कविचीट्टलैच्च चाइनार चेर दरबारीं आला आणि राजापुढें आपण रचलेलें मणिमेकलै काव्य त्यानें म्हटलें तेव्हां या राजर्षीच्या मनांत मणिमेकलैच्या मातापितरांचें, कोविलन आणि कन्नक्कि यांचें चरित्र स्मरणार्थ पुढें मांडावें म्हणून दुसरें एक महाकाव्य रचण्याची कल्पना उद्‍भवली. तदनुसार चीट्टलैच चट्टनार याच्या देखत त्यानें चिलप्प अथिकरम् ( शिल्प अधिकरम् ? ) रचिलें. काव्यसरणीच्या सौदंर्यात हें मणिमेकलैच्या तोडीचें आहे, पण याच्यांत वर्णिलेले विविध देखावे व समाजांतील निरनिराळ्या वर्गांविषयीं भरपूर माहिती लक्षांत घेतां, विद्यार्थ्यांनां आणि सामान्य वाचकांनां हें जास्त आवडणारें आहे यांत शंका नाहीं. गायन व नृत्यकला यांचें आपणाला असलेलें सर्व ज्ञान कवीनें पुढें मांडलें आहे. निरनिराळ्या छंदांत प्रेम व लीला यांवर गाणीं आणि स्तोत्रें या ग्रंथांत घालून त्याला अत्यंत शोभा आणिली आहे; यांत नायक आणि नायिकेचा स्वभाव फार चांगला रंगविला आहे. कोविलन नांवाच्या एका धनाढ्य व्यापार्‍याचा मुलगा आनंदी पण मूर्ख असे. फार लहानपणींच त्याचें एका सद्‍गुणी व सुस्वभावी मुलीशीं लग्न झालें, पण संगीत व नृत्य यांचा फार शोकी असल्यानें तो वारंवार नाटकांनां वगैरे जाऊं लागला व साहजिकच त्यावेळच्या एका अतिशय सुंदर नटीच्या प्रेमपाशांत सांपडला. आपली सर्व संपत्ति यानें तिच्या पायीं ओतली, शेवटीं आपल्या कर्माची लाज वाटून आपल्या तरुण पत्‍नीसह गांव सोडून तो मदुरेला पळाला. त्या ठिकाणीं आपल्या बापाच्या ओळखीच्या व्यापार्‍याजवळ मदत न मागतां एका धनगरणीच्या घरी तो उतरला, व आपल्या बायकोचा एक दागिना विकण्याकरितां एकटाच बाहेर पडला असतां राजवाड्यांतील अलंकार चोरल्याचा त्याजवर आरोप ठेवण्यांत येऊन एका राजरक्षकाकडून त्याला ठार मारण्यांत आलें. कन्नकीं पतिव्रता असून आपल्याला न मानणार्‍या पतीवरहि तिचें अलोट प्रेम होतें. तिचा स्वभाव इतका गोड होतां कीं, त्याला रागें भरण्याचें तर राहोच, पण त्याची बारिकसारिक इच्छा सुद्धां ती लक्षपूर्वक पाहून सर्वस्वी त्याच्या सेवेला ती आपणाला वाहून घेता असे. नवर्‍यानें आपली सर्व संपत्ति उधळल्यावर त्याच्या मागोमाग तीहि परक्या देशांत गेली. चोरीचा आरोप ठेवून आपल्या पतीला मारण्यांत आलें, असें जेव्हां तिनें ऐकिलें, तेव्हां तिनें मोठ्या धिटाईनें त्या शहरच्या राजाकडे जाऊन आपल्या पतीचा निरापराधीपणा सिद्ध केला. आपण अत्यंत शोकाकुल होऊन चेर देशाकडे जाणार्‍या रस्त्यानें ती भटकूं लागली, आणि पतिनिधनानंतर चौदाव्या दिवशींच मृत्यु पावली.

आरिसिल-किला ( इ. स. ११० ते १४० ):- अटीयमान एलिनीची राजधानी थकडूर हस्तगत करणारा जो चेर राजा पेरून चेरल तिरुम पोरइ याच्या प्रशस्तीपर आरिसिल् किलारनें दहा पद्यें रचिलीं आहेत. थकडूर याथीरईमध्येंहि याचीं अनेक पद्यें आलेलीं आहेत.

पोनमुडियार ( इ. स. ११० ते १४० ):- हा संग्रामकवि चेर राजा, पेरूनचेरल तिरुमपोरुम् यांचें सैन्य थकडूरवर जेव्हां चालून गेलें, त्यावेळीं त्याच्यासमवेत होता. याचीं पद्यें वीररसात्मक असून रणांगणावरील थरारून सोडणारे देखावे हुबेहूब दृष्टीपुढें उभे करतात.

पेरुंक कुनरुल किलर ( इ. स. १२० ते १५० ):- पेरुन चेरल तिरुम पोरइ याचें वर्णन ज्या याच्या दहा पद्यांत आलें आहे तीं पट्टिरू-पट्टूमध्यें जतन करून ठेविलीं आहे.

खालील यादींत इ. स. ५० ते १५० यांच्या दरम्यान रचलेल्या तामिळ काव्यांचीं नांवें आणि त्यांतील ओळींची संख्या दिली आहे.

काव्याचें नांव काव्याच्या ओळी
मुप्पाल किंवा कुरल २६६०
मणिमेकलै ४८५७
चिल्लप अणिकरन् ४९५७
कलिथ थौकइ ४३०४
इन्ना नारपटु १६०
पेरुंक कुरिंची २६१
कुरिंची ( ऐंकरु मिरूमध्यें कपिलरनें रचलेलें ) ४००
तिरू पुरुकारुप्पडई ३१७
नेडुनल वडई १८८
पोरू नर अरूप पडई २४८
पेरूपपान आरूप पडई ५००
पड्डिनप पालै ३०१
मदुरक्कै कांची ७८२
मलै पडु कडम ५८३
पट्टिरू पट्टू ( ४१-५० ) अदमासें १५०
''        ( ६१-७० )   '' १५०
''        ( ७१-८० )   '' १५०
''        ( ८१-९० )   '' १५०
पुरनानुरू, आक्कननुरू,
करुन् टोकै आणि नरिनैमध्यें आढळणार्‍या या काळांतील
कवीचीं अदमासें ३०० पद्यें    अदमासें
४०००
एकूण २५११८


वरील यादीवरून असें दिसून येईल कीं, इ. स. ५० ते १५० मध्यें होऊन गेलेल्या कवींच्या काव्यांतील २५००० पेक्षां ज्यास्त ओळी आज उपलब्ध असून, प्राचीन तामिळांचें वाङ्‌मय व इतिहास अभ्यासिण्याला त्या पुष्कळ साधनें पुरवितात. दगडावर किंवा धातूवर कोरून ठेविल्यापेक्षां जास्त टिकाऊ असें त्यांच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीचें तसेंच त्यांच्या चालीरीतींचें अगदीं हुबेहुब चित्र आपणाला या पद्यवाङ्‌मयांत आढळेल. उत्तर हिंदुस्थानांत राहणार्‍या आर्य जातींच्या धर्मेतिहासावर प्रकाश पाडणारे असे प्राचीन आर्यग्रंथाबद्दलचे उल्लेख या वाङ्‌मयांत अनेक आढळतात. चार वेद हे बहुधां, नानमर ( वार गुप्‍त ग्रंथ ) या नांवानें ओळखले जात, व त्यावरून असें स्पष्ट दिसून येते कीं, ब्राह्मणांनीं तामिळापासून वेदज्ञान चोरून ठेविलें होतें. ''चार गुप्‍त ग्रंथांचे मालक'', ''सहा शास्त्रांमध्यें पंडित'' अशा तर्‍हेचें ब्राह्मणांचें वर्णन केलें आहे. हल्लीं उपलब्ध नसलेलें इंद्रव्याकरण नामक प्राचीन व्याकरण त्यावेळीं सर्व ब्राह्मण अभ्यासीत व इंद्रव्याकरणांत पाण्डित्य श्रेष्ठ पण्डिताचें लक्षण समजलें जाई. रामायण-महाभारतांतील कथांशीं तामिळांचा परिचय होता. त्यांनां बौद्धांचे पिटक ग्रंथ, निगम आगम आणि आजीवक पंथाचा संस्थापक मरकलै याचे पवित्र ग्रंथ त्यांनां अवगत होते. वेदांताच्या सहा शाखा त्यांनां माहीत होत्या. लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पाणिनीच्या व्याकरणाचा किंवा पतंजलीच्या योगाचा कोठेंही उल्लेख नाहीं.

हिंदु धर्मग्रंथांचा तामिळ वाङ्‌मयावर परिणाम:- तामिळ लोक ''तुराणी'' वंशांतले असून ते आर्य लोकांपर्वीच हिंदुस्थानांत रहात होते; त्यांचा देश हिंदुस्थानच्या अगदीं दक्षिण टोंकाला आहे व यामुळें या भागांत ब्राह्मणवर्गांचें पूर्ण वर्चस्व कधींहि नव्हतें असें डॉ. काल्डवेल म्हणतो. ज्या द्राविडी लोकांवर आर्य संस्कृतीचा परिणाम झाला नाहीं त्यांच्यामध्यें भिक्षुकवर्ग, मूर्तिपूजा, स्वर्गनरककल्पना, आत्मा, पापपुण्य वगैरे संबंधींच्या कल्पना आढळत नाहींत. देवांचें अस्तित्व ते मानतात, व त्याला ते को म्हणजे राजा असें नांव देतात. या देवाचीं देवालयें ते बांधीत पण त्याची पूजाअर्चा ते करीत नसत. ते भुताखेतांची ( डेव्हिल ) पूजा करीत व त्यांनां प्राण्यांचे बळी देत. भुताखेतांचीं पूजा करण्याची पद्धत शानर सारख्या जातीमध्यें अद्यापहि आहे. हल्लीं ते ज्या दैवताला फार भितात त्याचें नांव पालेवेशम् असें असून तो मुसुलमानांच्या अमदानींत एक मोठा प्रसिद्ध दरोडेखोर होता. कॅप्टन पोल हा इंग्रज ऑफिसर त्रावणकोर काबीज करतांना १८०९ सालीं मारला गेला. त्याची पूजा शानर लोक करूं लागले आणि त्याला दारू व चिरूट नैवेद्य म्हणून अर्पण करीत असत. वेदग्रंथात ज्या देवतांनां पूज्य मानिलें आहे त्या अग्नि, सूर्य, इंद्र वगैरे देवतांची पूजा तामिळ लोकांत नाहीं असें डॉ. कॉल्डवेल म्हणतो. परंतु हिंवाळ्याच्या दिवसांत जो एक मोठा उत्सव तामिळ लोक करतात. त्या पोंगल नामक उत्सवांत पहिल्या दिवशीं इंद्राची आणि दुसर्‍या दिवशीं सूर्याची पूजा करतात.

बौद्ध व जैन धर्माचे अनुयायी तामिळ लोकांत अनेक होते आणि जैनांनीं लिहिलेले बरेच ग्रंथ उपलब्ध आहेत. बौद्ध धर्माच्या प्रसाराकरितां अशोक सम्राटानें या देशांत धर्मंप्रचारक पाठविले होते. इ. स. ८०० च्या सुमारास कांजीवरम् येथील बौद्धधर्मी राजा हीमसीतल याच्या दरबारीं बौद्ध व जैन पंडितांमध्यें मोठा वाद होऊन बौद्ध पंडितांचा पराभव झाला; तेव्हां कांहीं बौद्ध पंडितांनां ठार मारलें व कांहीं सिलोनांत पळून गेले. याप्रमाणें जैनांचें जें वर्चस्व झालें होतें तें १० व्या शतकांत शैवपंथी लोकांनीं नष्ट केलें. त्रिऊविलिअदलपुराणम् यामध्यें असें सांगितले आहे कीं, ८००० जैन पंडितांनीं स्वधर्मत्याग करण्याऐवजी मरण पत्करलें. आद्यशंकराचार्यांनीं हिंदुधर्मांचें वर्चस्व तामिळ देशांत स्थापण्याचें काम बरेंच केलें. शैव पंथाचा प्रसार सुंदरर व अप्पर व त्यांचा गुरु संबंदर या तिघांनीं केला. पुढें १२ व्या शतकांत वैष्णव पंथाचा प्रसार रामानुजांनीं केला आणि १३ व्या शतकांत मध्वाचार्य उर्फ आनंदतीर्थ यांनीं वैष्णवांचाच एक पोटपंथ तामिळ देशांत स्थापिला.

ब्राह्मणी धर्मांतील शिव ही तामिळ देशांत प्रस्थापित झालेली पहिली देवता होय. या पंथाचें लिंगपूजा हें एक प्रमुख चिन्ह आहे. कपाळावर तीन काळ्या रेघा आणि अंगाला भस्म हें शैवपंथी लोक ओळखण्याचें मुख्य साधन आहे. शैवपंथामध्येंच वीरशैव नांवाचा एक पोटभेद आहे, त्याची स्थापना बसव यानें केली. वीरशैवपंथी लोक अंगावर एक धातूच्या डबींत ठेवलेलें लहानसें लिंग बाळगतात, म्हणून त्यांनां लिंगायत असेंहि म्हणतात. वीरशैवपंथाचे तामिळ भाषेंत पांच मुख्य ग्रंथ आहेत. (१) अपिशेकमलई, (२) नेदुंगकलिनेदिल, (३) कुरुंगकलिनेदिल, (४) निरंगण मलई, व (५) कैट्टलमलई. हे ग्रंथ १७ व्या शतकांतील शिव पिरकस तेसीकर यानें लिहिलेले आहेत.

शैवपंथांतील दुसरा जो पोटभेद त्याला शाक्तपंथ म्हणतात. याचा प्रसार बंगाल्यांत फार आहे. दुर्गापूजा हा शाक्त पंथाचा मुख्य उत्सव होय. तामिळांतहि शाक्तपंथी लोक आहेत. वासनात्याग हें जें हिंदुधर्मी माणसांचें ध्येय असतें तें इतर हिंदु धर्मपंथांतलें लोक इंद्रियदमन करून साध्य करण्याचा प्रयत्‍न करतात तर, उलट शाक्तपंथी लोक इंद्रियभोग भोगून तेंच ध्येय गांठण्याचें तत्त्व प्रतिपादितात.

धार्मिक ग्रंथ:- हिंदु धर्मासंबंधीची सामान्य माहिती देणारा ग्रंथ विवेकचिंतामणी हा आहे. तो मूळ कानडी भाषेंत होता. तो तामिळमध्यें निसकुनयोकी यानें लिहिला. त्याच्यामध्यें हिंदुधर्मांतील निरनिराळ्या पंथांसंबंधानें माहिती दिली आहे. पेरियातिरूमोली नांवाच्या ग्रंथांत वेदग्रंथांचें सर्व सार आहे असें वैष्णव म्हणतात, पण तें चूक आहे. वेदासंबंधींची माहिती देणारा तामिळ भाषेंतील ग्रंथ वेतपोरुल विलक्कम हा होय. हा काशीविश्वनाथ मुदलीयर यानें लिहिला. या ग्रंथाचाच एक भाग 'पिरयसित्त निरुनय सत्तिर संगकिरकम्' या नांवाचा आहे, त्याच्यामध्यें निरनिराळ्या प्रकारचीं पापें व त्यांचीं प्रायश्चित्तें दिली आहेत. ब्राह्मणानें कांदा खाणें या पापाबद्दलचें प्रायश्चितहि त्यांस सांगितलें आहे.

शैवपंथी लोकांची मुख्य देवता शिव, हिच्याबद्दलचे पुष्कळ ग्रंथ तामिळ भाषेंत आहेत. शिव हें नांव वेदग्रंथांत नाहीं, रामायण व महाभारत यांत शिव याचा महादेव ( मुख्य देव ) म्हणून उल्लेख आहे. १८ पुराणांपैकीं १० पुराणांवर शैव लोक हक्क सांगतात पण स्कंदपुराणासंबंधीचा एक संक्षिप्‍त ग्रंथ मात्र तामिळ भाषेंत छापला आहे. अरुणाचलपुराणम् या नांवाचा १७ व्या शतकांतला एल्लप्पा नवलर यानें केलेला ग्रंथ आहे. अरुणाचल किंवा अरुणगिरि ही टेंकडी मद्रासच्या नैऋत्येस सुमारें १०० मैलांवर आहे. या टेंकडीवर एक शिवलिंगाचें देवालय आहे व तेथें पूजा केल्यानें काय फळ मिळतें तें या ग्रंथांत सांगितलें आहे. 'अत्तिसुदिपुराणम्' हा गद्यग्रंथ असून त्यामध्यें शिवाच्या ६३ भक्तांच्या कथा दिल्या आहेत. अत्ता नांवाच्या झाडाच्या पानांच्या माळा हे शिवाचे भक्त घालतात. यावरून त्यांनां अत्तिसुदी हें नांव पडलें आहे. काशीखंडम् हा स्कंदपुराणाचाच एक भाग आहे व त्यांत काशी ( बनारस ) संबंधींची स्तुति व तेथील भक्तांच्या कथा आहेत. पेरियपुराणम् उर्फ तिरुत्तोंदरपुराणम् हा १४ व्या शतकांतला ग्रंथ आहे. यामध्यें शिवाच्या ६३ भक्तांचीं चरित्रें दिलीं आहेत. पेरियपुराणसारम् हा १५ व्या शतकांतील ग्रंथ असून तो वरील पुराणाचें सार आहे. परियपुराणवसनम् हा अरुमुकनवलर यानें १९ व्या शतकांत लिहिलेला गद्यग्रंथ आहे. पिरमोत्तिरखंडम् हा ग्रंथ १२ व्या शतकाच्या सुमारास एका पांड्य राजाचा भाऊ वरतुंगक रामपांड्य यानें लिहिला. स्कंदपुराणांतील एका भागाचें अनुकरण करून हा लिहिला आहे. संपंतसुवमीतेवरम् हा १८ व्या शतकाच्या सुमाराचा ग्रंथ असून त्याच्यामध्यें शिवविषयीचीं ३८४ स्तोत्रें आहेत. शैवसमयविलक्क विन-वियाई हा १९ व्या शतकांतला ग्रंथ असून त्यांत शैव पंथासंबंधानें प्रश्नोत्तर रूपानें माहिती दिली आहे. सेक्किलरपुराणम् हा १७ व्या शतकांतला उमापतिशिव सरियर यानें लिहिलेला ग्रंथ आहे. यांत पेरियपुराणम् नामक ग्रंथाच्या कर्त्यासंबंधानें १०० कविता आहेत. सेत्तिरकोवई या ग्रंथांत शैव लोकांच्या १०८ पवित्र स्थानांसंबंधीची माहिती आहे. सुतसंगकितयीपुराणम्, तिरुक्कलुर्नपुराणम्, तिरुस्सितमंपरपुराणम् उर्फ कोइलपुराणम्, तिरुवतउट्टुरपुराणम्, तिरुवेंकरपुराणम्, तिरुविलैयदलपुराणम्, विरुत्तावलपुराणम्, विरिंचपुराणम् वगैरे शैवपंथाचे ग्रंथ आहेत.

पार्वती ही शिवाची बायको दुसर्‍या अनेक नांवानें देवता म्हणून पूजिली जाते. अंबिका, उमा, काली, दुर्गा, भवानी हीं तिचीं नांवें प्रसिद्ध आहेत. मदुरा येथें ही देवता मीनाक्षी या नांवानें पूजिली जाते. या देवतेच्या स्तुतिपर कांहीं लहान लहान काव्यें तामिळ भाषेंत आहेत. त्यांपैकी सौतरीय लकरी हें १०४ कवितांचें काव्य विशेष प्रसिद्ध आहे. या काव्याचे दोन भाग असून पहिल्या भागांत पार्वतीची कथा सांगितली आहे व दुसर्‍या भागांत तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचें बारकाईनें वर्णन केलेलें आहे.

स्कंद किंवा कार्तिकेय हा शिवाचा दुसरा मुलगा असून त्याला तामिळ देशांतील शैव लोक देवतांमध्यें बरेंच उच्च स्थान देतात. त्याला सुब्रह्मण्यम् मुरुगण व आरुमुगण अशींहि नांवें आहेत. त्याला इंद्राची मुलगी देवयानीं ही एक बायको व दुसरी वल्लीनची ही बायको आहे असें म्हणतात. कांतपुराणसुरुक्कम्, कातिरकममलयी, कुमारतलट्टू, मुरूकलअनुफति, मुरुकरअंतति वगैरे ग्रंथ या देवतेसंबंधानें आहेत व वल्लियम्मई वेंप हा स्कंदाच्या दुसर्‍या बायकोच्या स्तुतिपर ग्रंथ आहे. गणेश हा शिव व पार्वती यांचा थोरला मुलगा होय. त्याचीं गणपति, पल्लयर, विनायकर, इत्यादि दुसरीं नांवें आहेत. गणपती अकबल, गणपति अंतता, गणपति कंदम, गणपति विरुत्तम्, विनायक अकवल, विनायकर कवचम् वगैरे स्तुतिपर ग्रंथ आहेत.

विष्णु ही एक महत्त्वाची देवता तामिळ देशांत आहे. विष्णूची बायको लक्ष्मी, वाहन गरुड आणि तुळशीवृक्ष यांनांहि तामिळ लोक पूज्य मानतात. पेरूमल हें विष्णूचें नांव दक्षिण हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहे. विष्णूच्या दहा अवतारांसंबंधींच्या कथाहि सर्वश्रुत आहेत. कुरूपरंपरा पिरापवम् या गद्यग्रंथांत विष्णूचे बारा अलवार व इतर भक्तांची माहिती आहे. मुमुद्स-प्पदि हा १५ व्या शतकांतील संकृत व तामिळ भाषेंतला ग्रंथ आहे; यामध्यें वैष्णव लोकांनीं कशा प्रकारें आचरण करावें व कोणत्या मार्गानें स्वर्ग मिळवावा तें सांगितलें आहे. नलइर पिरपंतम् हा ग्रंथ फार जुना आहे. त्याचा शेवटला भाग इयरप हा कलियुग लागण्यापूर्वी लिहिला आहे असें मानतात. कधीं कधीं याला तामिळ वेद असेंहि म्हणतात. याच्यांत एकंदर चार हजार कविता आहेत व त्याचे चार भाग आहेत. यांपैकीं पहिल्या भागांत कृष्णाच्या बाळपणच्या गोष्टी, दुसर्‍या भागांत वैष्णव देवालयासंबंधाची माहिती, तिसर्‍या भागांत विष्णु या देवतेसंबंधींची माहिती आणि चौथ्या भागांत विष्णूच्या प्रार्थनापर पद्यें आहेत. भागवतपुराणवचनम् हा १८ व्या शतकांतला गद्यग्रंथ असून त्यांत भागवत पुराणाचें सार गद्यामध्यें दिलेलें आहे. यांतील मुख्य भाग कृष्णकथेसंबंधी असल्यामुळें हा ग्रंथ फार लोकप्रिय आहे. विष्णुपुराणवचनम् हें विष्णुपुराणाचें गद्यामध्यें सार आहे.

हनुमान हा वानरांचा राजा शिवाचा पुत्र आहे असें मानतात. हनुमारशतकम्, हनुमारअनुपति हे हनुमान देवतेच्या स्तुतिपर ग्रंथ आहेत. याशिवाय सरस्वती व इतर स्थानिक दैवतें यांच्या स्तुतिपर काव्यें आहेत. तामिळ मुलुखांत वैष्णव ग्रंथकार आणि कवी यांची एकत्वानें माहिती दिली पाहिजे. महाराष्ट्रांतील संतकवींप्रमाणेंच त्यांच्याकडे स्थिति आहे. तथापि आपल्या वैष्णव वीरांपेक्षां त्यांच्याकडे वैष्णव साधूंचा काल अगोदरचा आहे. तर त्यांपैकीं कांहींचा वृत्तांत येथेंच देतों.

तामिळवैष्णवसाधूंच्या कथा.— हे वैष्णव साधू आळवार या नांवानें प्रसिद्ध आहेत. या आळवारांचे कालानुक्रमें तीन गट पडतात ( 'आळवार' पहा ). यांच्यासंबंधीं अनेक दंतकथा भाविक लोक सांगतात व ग्रंथांतूनहि सांपडतात. त्यांपैकीं कांहीं आळवारांच्या कथा पुढें दिल्या आहेत.

(१) यगयी आळवार:- याला शंख अवतार मानितात. कांजीवरमजवळील एका विहिरींतील कमळांत तो दृश्य झाला. त्या मानवी देहांत त्याचा आत्मा मूर्तिमंत होता. विष्णूचा शंख ज्या मानससृष्टींतून उत्पन्न झाला तीमध्येंच याचा जन्म दैवी रीतीनें झाला.

(२) भूतत्तार आळवार:- विष्णूची गदा ज्या मानससृष्टींतून उत्पन्न झाली तीमध्येंच दैवी रीतीनें याचा जन्म झाला. तिरुकदलमल्लि येथील कुरुकत्ति नांवाच्या फुलांत तो सांपडला.

(३) पेय आळावार:- विष्णूचें खड्ग ज्या मानससृष्टींत निर्माण झालें त्याच सृष्टींत दैवी रीतीनें याचा जन्म झाला, व मैलापुर ( मद्रास ) येथील एका विहिरीतील एका कमळांत हा सांपडला.

ईश्वराच्या कृपेमुळें हे तिघेजण आळवार रजोगुण व तमोगुण यांतून मुक्त होऊन फक्त शुद्ध सत्त्वमय बनले व केवळ ईश्वरसेवेकरितां राहिले. त्यांच्यामध्यें ज्ञानभक्ति व ऐहिक वस्तूंविषयीं वैराग्य वाढलें. त्यांनीं खाणेंपिणें वर्ज्य केलें व ईश्वरप्रीति हीच त्यांचा आधार बनली. संसारी मनुष्यांचा सहवास ते टाळीत असत व कोठेंहि दोन दिवसांहून जास्त वेळ न राहतां जातांना गांवोगांव लोकांनां उपदेश करीत ते देशपर्यटन करीत. परंतु हा वेळपर्यंत त्यांची एकमेकांशीं गांठ पडली नव्हती. पुढें ईश्वराची इच्छा, त्यांचा खरा स्वभाव लोकांच्या नजरेस आणून त्यांच्या शिक्षणाचा लोकांस जास्त फायदा देण्याची झाली. म्हणून त्यानें एका मोठ्या वादळांत दक्षिण अर्काट जिल्ह्यांतील तिरुकोवळूर येथें त्या तिघा आळवारांची गांठ घातली. त्यांच्यापैकीं एकजण वादळांत एकटा सांपडल्यामुळें एका ब्राह्मणाच्या घराच्या बाहेरच्या खोलींत गेला व दार बंद करून जमिनीवर पडून राहिला. नंतर दुसरा देखील वादळांत सांपडल्यामुळें त्याच खोलीजवळ येऊन त्यानें दार ठोठावलें. तेव्हां आंतल्या गृहस्थानें येथें एका माणसास फक्त निजण्यापुरती जागा आहे असें ओरडून सांगितलें, तेव्हां दुसरा म्हणाला, जर एकजण निजूं शकतो तर दोघे बसूं शकतील. तेव्हा हा ज्ञानी पुरुष आहे असें जाणून पहिल्यानें त्याला आंत घेतलें. नंतर कांहीं वेळानें तिसरा तेथें आला व त्यानें दार ठोठावलें. तेव्हां दोघांनीं ओरडून सांगितलें कीं येथें फक्त दोघांनां बसण्यापुरती जागा आहे. तेव्हां तिसरा म्हणाला जर दोघें बसूं शकतात तर तिघे उभे राहूं शकतील. हें ऐकून हा ज्ञानी पुरुष आहे अशी त्यांची खात्री होऊन त्यांनीं त्याला आंत घेतलें. यथोचित नमस्कार झाल्यावर त्यांनीं एकमेकांस प्रश्न विचारले; पहिला म्हणाला, ''मी ईश्वराचा नित्यसहवर्ती सेवक आहे.'' दुसरा म्हणला, ''मी वासुदेवाचा सेवक आहे'', व तिसरा म्हणला, ''ज्ञान व आनंद असा जो परमात्मा त्याशीं मी युक्त आहे.''

हे तिघे एकत्र झाल्यावर विष्णूला त्यांच्याजवळ जाण्याची इच्छा होऊन तो तेथें गेला. काळोख असल्यामुळें तेथें चौथा इसम असल्याचा त्यांनां भास झाला. ते योगी असल्यामुळें परमेश्वर येथें आल्याचें त्यांनां अंतर्दृष्टीनें समजलें. नंतर तेथें एकाएकीं मोठा उजेड पडून त्यांनां विष्णु व लक्ष्मी यांचें दर्शन झालें व हर्षोत्फुल्ल होऊन त्यांनीं प्रत्येकीं ईशस्तवनाचे १०० श्लोक, त्याच ठिकाणीं बनविले. एकाच्या श्लोकाचा शेवट दुसर्‍याच्या श्लोकाचा आंरंभ होत असे.

(४) तिरुमळिशायी आळवार:- हा साधु दैविकरीतीनें जन्मला. हा एका बोरूच्या झुडपांत तिरुवलन नांवाच्या इसमास सांपडला. त्यानें त्याला घरीं नेऊन वाढविलें. तो सात वर्षांचा असतांनां त्याला योगसाधनाची इच्छा झाली. योगाभ्यासांत ध्यान करण्याकरितां कांहीं साधन पाहिजे म्हणून त्यानें त्या काळच्या निरनिराळ्या भाषांतील तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांचें अध्ययन ४०० वर्षेपर्यंत केले. नंतर तो वैष्णव वनला. नंतर परमेश्वरानें त्याला क्षणभंगुर व अविनाशी असे दोन्ही लोक दाखविले व सृष्टीची रचना देखील दाखविली. त्यानें नंतर गागेंद्र सरोवराजवळ ७८० वर्षेपर्यंत योगाचरण केलें.

शिवपार्वती व सिद्धपुरुष, किमया जाणणारा, हे लोक त्याच्या जवळ आले व आश्चर्यचकित होऊन निघून गेले. नंतर तो एका गुहेंत योगांत निमग्न झाला. तेथें त्याची व तिरुकोरलूरच्या तिघां आळवारांची भेट झाली व ते चौघेजण मैलापुरला गेले. येथें तिरुमळीला सोडून पहिले तिघे आळवार यात्रेकरितां निघून गेले.

कांजीवरम् येथें पोयगयीच्या जन्माच्या वेळीं जाऊन तिरुमळिशायी ७०० वर्षे राहिला. राजा कनिकननला त्यानें चमत्कार दाखविला. नंतर तो कुंभकीणमला जाण्यास निघाला. वाटेंत पेरब्मुलियूर खेड्यांत वेदपठण करणार्‍या ब्राह्मणांनां त्यानें थक्क करून सोडलें.

नंतर कुंभकोणमला जाऊन त्यानें नम्भाळवर याचा तिरुवोरमोलि ग्रंथ पाहिला व आपले ग्रंथ कुचकामाचे समजून त्यानें कावेरीमध्यें फेकून दिले. परंतु त्यांतील दोन ग्रंथ ओघाबरोबर वाहूं लागले. तेव्हां ते उपयोगी आहेत असें समजून त्यानें पाण्यांतून ते काढून घेतले व तदनुरूप् लोकांनां उपदेश करूं लागला. तो ४७०० वर्षांचा होऊन स्वर्गाला गेला.

नम्माळवार, कुलशेखर, अंदाळ या दुसर्‍या गटांतील आळवारांची माहिती स्वतंत्र त्या त्या नांवाखालीं दिलेली आहे.

(१) तोंडरडिपोडी आळवार:- श्रीरंगमजवळील मंदन्गुडि खेड्यांत विष्णूच्या वनमाला नांवाच्या पुष्पमालासृष्टींत हा जन्मला. याला प्रथम विप्रनारायण म्हणत असत. त्याच्या बापानें त्याला उत्तम शिक्षण दिलें होतें, व तो श्रीरंगमला नित्य जात असल्यामुळें तेथील देवाचा भक्त बनला. विष्णुचित्ताप्रमाणें हा देखील फुलें मिळवून देवाकरितां त्यांचे हार बनवीत असे.

एके दिवशीं बागेंत काम करीत असतांनां एक देवदासी वेश्या व तिची बहीण, उरय्यूर राजाच्या लवाजम्यांत परत येत होती. ती फार थकल्यामुळें बागेंत थोडीशी विश्रांति घेत बसली. इतक्यांत तिला विप्रनारायण दिसला. परंतु त्याच्या मनावर या वेश्येला पाहून कांहींच परिणाम झाला नाहीं. तेव्हां ती म्हणाली कीं, हा अजागळ असावा. त्यावर तिची बहीण म्हणाली की तो असामान्य पुरुष आहे; तूं जर त्याला वश करशील तर मी तुझी सहा महिने दासी होईन. यावर देवदासी म्हणाली न जिंकल्यास मी तुझी सहा महिने दासी होईन.  लागलीच ती स्त्री भक्तवेषानें विप्रनारायणाजवळ जाऊन नमस्कार करून म्हणाली मी वेश्या आहे व पापाचरणामुळें नरकांत जाण्याची मला फार भीति वाटते, तर आपल्याजवळ आश्रय देऊन माझा आपण उद्धार करावा. विप्रनारायणानें तें कबूल केलें हळू हळू देवदासीनें त्याला मोहित करून देवळांतून आपल्या घरीं नेलें व त्याचें द्रव्य हरण करून त्याला हांकून दिलें. नंतर तो तिच्या घराभोंवतीं घिरट्या घालीत असे. एके दिवशीं लक्ष्मी व विष्णु रस्त्यानें जात असतां विप्रनारायणाची कष्टावस्था पाहून लक्ष्मीला कींव आली व तिनें विष्णूला विनविलें व त्याच्या कृपेमुळें विप्रनारायणाचा मोह निघून गेला. तो पूर्वीपेक्षां जास्त भक्त झाला व त्यानें आपलें नांव बदलून तोंडरडिमोडी म्हणजे देवाच्या सेवकाच्या चरणाची धूलि असें ठेविलें.

(२) तिरुप्पाण आळवार:- हा विष्णूच्या वक्षस्थलावरील श्रीवत्स चिन्हाच्या सृष्टींत दैविक रीतीनें जन्मला व उरय्यूर मधील एका शेतांत पंचम जातीच्या इसमास सांपडला. या वेळेस चोळराजा धर्मवर्मा हा राज्य करीत होता. तिरुप्पाणाला चांगलें धार्मिक शिक्षण मिळालें व तो फार चांगला गवयी बनला. हा नेहमीं वीणा जवळ बाळगीत असे. नित्य सूर्योदयापूर्वी कावेरींत स्नान करून वाळूची देवतामूर्ति करून तीपुढें तो गात असे व ब्राह्मण लोक येण्यापूर्वी ती मोडून घरीं जात असे.

एके दिवशीं तिरुप्पाण पूजेंत इतका गढून गेला कीं त्याला वेळेचें मुळीच भान राहिलें नाहीं. ब्राह्मण या पंचमाला पाहून फार रागावले व मुख्य उपासक श्रीलोकसरंगमहामुनिचंद्र यानें त्याला गोटा मारला. तेव्हां तो जखमी होऊन पळून गेला. हा लोकसरंग नंतर देवळांत गेला तेव्हां त्याला देवळाचा दरवाजा उघडतां येईना. त्यानें देवाची क्षमा मागितली तेव्हां आंतून ध्वनि निघाला कीं तिरुप्पाणला खांद्यावर घेऊन ये. नंतर लोकसरंगनें दुसर्‍या दिवशीं प्रातर्विधि आटोपून तिरुप्पाणाला आपल्या खांद्यावर घेऊन देवाच्या मूर्तीजवळ आणलें. तेव्हां देवानें प्रगट होऊन त्यास दर्शन दिलें. आनंदभरित होऊन तिरुप्पाणानें देवाच्या नखशिखांत वर्णनात्मक दहा श्लोक केले व वीणेवर गायन केलें. हें झाल्यावर कोणतीहि वस्तु डोळे उघडून पाहण्याचें त्यानें नाकारलें तेव्हां सर्वांसमक्ष तो देवाच्या मूर्तीत अदृश्य झाला.

(३) तिरुमंगयी आळवार:- चोल देशांतील तिरुवलि तिरुननगिरीजवळ कुरयलूर नांवाच्या ठिकाणीं म्लेच्छ मातापितरांपासून विष्णूच्या धनुष्यसृष्टींत हा निर्माण झाला. याच्या पित्याचें नांव नील होतें व याला प्रथम नीलानिरत्तन म्हणत असत. हा चोलराजाचा सैनिक होता. येथें यानें इतकें शौर्य दाखविलें कीं अखेरीस राजानें याला मुख्य सेनापति करून राज्याच्या कांहीं भागाचा अधिकार यांजकडे सोंपविला.

तेथें दक्षतेनें राज्य करीत असतां त्याच्या राजधानीच्या शहराजवळील एका तळ्यांत कांहीं अप्सरा स्नानाकरितां आल्या. पैकीं एक दुसर्‍या तळ्याकडे निळीं कमळें तोडण्याकरितां गेली असतां बाकीच्या अप्सरा निघून गेल्या व ती अप्सरा मात्र तेथें मानववेषानें राहिली. एके दिवशीं एक वैष्णवभक्त तेथें स्नानास गेला असतां त्याला ती सांपडली.  कपीलाचार्याच्या शापामुळें आपण येथें आहों असें तिनें त्याला सांगितलें व नीलानिरत्तनला वैष्णव करून त्याशीं लग्न केल्यास तिचा उद्धार होईल असा तिला शाप होता. तेव्हां त्या वैष्णवानें तिला घरीं नेऊन मुलीप्रमाणें पाळलें व तिचें नांव कामलवल्ली ( निळें कमळ ) असें ठेविलें.

तिचें सौंदर्य पाहून नीलानिरत्तान मोहित झाला व तिच्या सांगण्यावरून वैष्णव होऊन तिच्याशीं त्यानें विवाह केला व आपलें नांव तिरुमंगथा असें बदलून रोज हजार वैष्णवांनां अन्नदान करूं लागला.  परंतु या खर्चामुळें त्याला राजाची खंडणी देतां येईना तेव्हां राजानें त्याच्यावर स्वारी केली, परंतु तिरुमंगयीनें त्याचा पराभव करून त्याचें राज्य घेतलें. पुढें राजानें ब्राह्मणाचा कपटवेष धारण करून तिरुमंगयीपासून सर्व राज्य परत मिळविलें व नंतरं त्याला कैद करून तिरुनरयूर देवळांत पाठविलें. तेथून त्याला कंडी येथें पाठविलें व तेथें वेगवती नदीच्या कांठीं देवाच्या सांगण्यावरून त्याला द्रव्य मिळालें व तें राजाला देऊन त्यानें आपली सुटका करून घेतली.

पुढें तो व त्याचे अनुयायी वैष्णव लोकांनां अन्नदान करण्याकरितां दरोडे घालून द्रव्य मिळवूं लागले. त्यांनीं एक बुद्ध देवळांतील सुवर्णमूर्ति नेली व साक्षात लक्ष्मी व विष्णु यांनीं नवरदेवनवरीचें रूप धारण केलें होतें, त्यांच्या अंगावरील दागिने नेले परंतु हें द्रव्य पुरलें नाहीं. तेव्हां तिरुमंगयीनें श्रीरंगम् येथील देवळाचें काम करणार्‍या लोकांनां एका जहाजांत घालून खोल समुद्रांत नेलें व त्यांनां विचारलें द्रव्य पाहिजे कीं स्वर्ग पाहिजे. तेव्हां त्यांनीं स्वर्ग पाहिजे म्हणून उत्तर दिलें. तिरुमंगयीनें हें ऐकून तें जहाज बुडविलें व आपण एकटाच परत आला. बुडालेल्या लोकांच्या नातलगांनीं त्यांच्याबद्दल तिरुमंगयीजवळ मागणी केली त्यावेळीं देवाच्या सांगण्यावरून त्यानें त्या लोकांनां हांक मारावयास त्यांच्या नातलगांस सांगितलें. तेव्हां त्या बुडालेल्या लोकांनीं आपण स्वर्गसुखांत आनंद करीत असल्याचें सांगितलें. यानंतर तिरुमंगयीनें कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत सर्व तीर्थें पाहिलीं व वाटेनें वैष्णव धर्माचा प्रसार केला. परत आल्यावर श्रीरंगमच्या देवळांत गेला तेव्हां देवानें त्याला स्वतः मूर्ति होऊन देवाचे पराक्रम अनुभवण्यास सांगितलें व तिरुमंगयीची मूर्ती त्याच्या जन्मठिकाणीं स्थापली गेली. या मुर्तीची पूजा लोक अद्याप करतात. [इं. अँ. पु. ३४, पृ. २७३-२८६.]

ज्योतिष शास्त्र, शकुन व जादूमंत्र.— तामिललोकांचा ज्योतिष, शकुन, जादूटोणा, वगैरेंवर फार भरंवसा आहे. प्रत्येक इसमाची जन्मपत्रिका बहुतकरून तयार केलेली असते व प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगीं ज्योतिषाचा सल्ला घेण्यांत येतो. सुदमनी उल्लमुदैय्यन हा १७ व्या शतकाच्या सुमाराचा ज्योतिषशास्त्रांवरील ग्रंथ सर्वमान्य समजला जातो. पोरुत्तनुल या ग्रंथांत विवाहसंबंधीं, ऋतुनुल या पुस्तकांत स्त्रियांच्या ऋतुप्राप्रीसंबंधीं ज्योतिषशास्त्रीय विचार दिलेले आहेत. शुभाशुभ शकुन पाहण्यासंबंधानें बरींच पुस्तकें आहेत. कनविन नुल या पुस्तकांत स्वप्नावरून शुभाशुभ पाहण्याची माहिती दिली आहे. शास्तिरभ या पुस्तकांत सामुद्रिकाविषयीं माहिती आहे. पंचपत्सि शास्तिरम् या ग्रंथामध्यें गिधाड, घुबड, कावळा, कोंबडा व मोर या पांच पक्ष्यांवरून शुभाशुभ ठरविण्याचे नियम सांगितले आहेत. सरनुल शास्तिरम् यामध्यें श्वासोच्छ्वासावरून ( डाव्या उजव्या नाकपुडींतील सुरावरून )  शकुन पाहण्याची रीत सांगितली आहे. तुदिनुल यामध्यें शरीरावयवांच्या स्फुरणावरून ( डोळ्यांच्या पापण्या लवणें वगैरे ) शुभाशुभ पाहण्याचे नियम दिले आहेत. तामिळ लोकांचा जादूटोण्यावरहि फार विश्वास आहे ही गोष्ट, त्यांच्यामध्यें जी एकंदर ६४ शास्त्रें व कला आहेत त्यांपैकीं २० जादूगिरीबद्दल आहेत यावरून दिसून येते. जादूमंत्रांच्या साहाय्यानें माणसामाणसांमध्यें शत्रुत्व उत्पन्न करणें, माणसाचें मन वळविणें, विषाची बाधा नाहींशीं करणें, मनुष्यानें हवेमध्यें मिसळून अदृश्य होणें, हवेमध्यें निराधार चालणें, स्वतःचा जीव स्वतःच्या शरीरांतून काढून दुसर्‍याच्या मृतशरीरांत प्रविष्ट करणें, तरवार किंवा इतर हत्यार शक्तिहीन करणें, वगैरे गोष्टी करतां येतात व या सर्वांबद्दलचीं माहिती देणारीं पुस्तकें आहेत. कोंगकनर कदईकंदम या पुस्तकांत जादूचीं वर्तुळें कशीं काढावीं, बळी कोणते द्यावे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत. 'पुलिपनी मुनिवर पलतिरदुजल सितंपरम्' या पुस्तकांत जादू व नजरबंदी वगैरे संबंधींची माहिती आहे. 'सुंतर नंतर केसरी' या पुस्तकांत दीर्घायुष्य प्राप्‍त होण्याचें औषध करण्याची कृति सांगितली आहे. हें औषध ४० दिवस घेतल्यास मनुष्य १०० वर्षे जगतो, ८० दिवस घेतल्यास ४०० वर्षे जगतो वगैरे या पुस्तकांत सांगितलें आहे.

ऐतिहासिक वाङ्‌मय:- तामिळ भाषेंत ऐतिहासिक ग्रंथ नाहींत. तथापि चरित्रकाव्यग्रंथांमुळें प्राचीन काळाची माहिती देणारे ग्रंथ नाहींत असें नाहीं. प्राचीन काळा पासून तामिळ लोकांचा आयुष्यक्रम चित्रित करणारे उल्लेख काव्यग्रंथांत प्राचुर्यानें आहेत. तसेंच समकालीन राजांच्या उल्लेखामुळें तामिळ ग्रंथकारांचा काळ अधिक निश्चितपणें काढतां येतो व राजेलोकाची कुलपरंपरा निश्चित करातां येतें तथापि प्राधान्यानें ऐतिहासिकता ज्यांत आहे असे ग्रंथ उपलब्ध नाहींत. काव्यग्रंथांचें स्वरूप असलेले ग्रंथ ऐतिहासिक उपयोगाचे कसे होतात हें दाखविण्यासाठीं कांहीं उदाहरणें देतों:-

तंजावर येथील सरस्वतीमहालमध्यें ( पुस्तकालय ) 'विक्रम चोलन युला' हा तामिळ भाषेंतील ग्रंथ आहे. तामिळ भाषेमध्यें ज्याला युला म्हणतात त्या छंदामध्यें लिहिलेलीं ही एक कविता आहे. या कवितेंत नायकाच्या पूर्वजांचें वर्णन देऊन नंतर नायक, आपले सरदार व परिवार यांसह जेव्हां बाहेर निघतो त्यावेळच्या त्याच्या स्वारीचें वर्णन दिलेलें आहे. या कवितेंत चोल राजांची वंशावळी आहे, (१) शेंगत-चोल यानें चेर राजास पोयागी कवीची कलवली कविता ऐकवून बंधमुक्त केलें. (२) विक्रमचोल या कवितेचा नायक शेंगतचोल याचा मुलगा होता. या राजाच्या स्वारींत त्याच्या भोंवतीं असलेले मांडलिक राजे पुढें दिले आहेत:- (१) तोंडैमान पल्लव राजा, (२) मुनैयर-कोन अथवा मुनैचा राजा, (३) चोल कोन अथवा चोल राज्याचा राजप्रतिनिधि, (४) कन्नन ब्राह्मण, (५) वानन अथवा बान राजा, (६) कालिंगर कोन अथवा कलिंगचा राजा, (७) कादवन शेंजी डोंगरी किल्ल्याचा राजा, (८) वेनाडुचा राजा, (९) अनंतपालन, (१०) वत्तवन, (११) चेदिनाडुचा राजा, (१२) आनैक्काव्हळचा राजा, (१३) अदिगन, (१४) वल्लभन व (१५) तिरिगत्तन. या राजाचे पूर्वज ब्रह्मा, सूर्य इत्यादी देवतांपासून उत्पन्न झाले असें या कवितेंत वर्णिलें आहे. ही कविता कोणी व केव्हां केली ही माहिती उपलब्ध नाहीं.

कलंबगं:- हा तामिळ वाङ्‌मयांतील पद्याचा एक प्रकार आहे. यांत निरनिराळ्या वृत्तांत व निरनिराळ्या तर्‍हेनें नायकाची स्तुति केलेली असते. हें स्तवन जर ईशस्तवन असलें तर १०० कवितांत असले पाहिजे आणि साधूचें ९५ कवितेंत, राजाचें ९० कवितेंत, प्रधानाचें ७० कवितेंत, वैश्याचें ५० किंवा ३० श्लोकांत असलें पाहिजे. यांतील मागील श्लोकाचें अंत्याक्षर व पुढील श्लोकाचें आद्याक्षर एकच असावें लागतें.

नंदि-कलंबगं:- हें काव्य नंदि नांवाच्या राजाच्या स्तुतिपर असून त्यांत ११० कविता आहेत. ही गोष्ट अनियमित अतएव जरा चमत्कारिक आहे. हें काव्य नायकाच्या धाकट्या भावानें लिहिलेंले असावें. या काव्यांत या राजाला पल्लव राजा म्हटलें आहे व हा सोमवंशीय होता असाहि यांत उल्लेख आहे. याच्या राजधानीसंबंधीं निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळे उल्लेख आहेत. कोठें याची राजधानी कांची म्हणजे कांजीवरम्, कोठें मल्ले म्हणजे अर्वाचीन महाबलपुर, व कोठें मयिले अथवा मैलापुर म्हणजे अर्वाचीन मैलापुर आहे असा उल्लेख आहे. नंदि राजाच्या राज्याचा विस्तार (१) तोंडे नाडु, (२) कावेरी नदीच्या कांठचा प्रदेश, (३) चेरा प्रदेश, (४) कोंगु प्रदेश, (५) अळगै नाडु व (६) पश्चिम प्रदेश ह्या भागांवर झालेला होता. बाण राजे व उत्तरवेंकटाचे राजे हे त्याचे मांडलिक होते. नंदि राजानें तेक्कारु, कुरुकोडु, पळैयारु, वेळ्ळारु व नळ्ळारु येथें लढाया जिंकल्या; या राजाला चेर, चोल व पांड्य हे राजे खंडणी देत होते. हा राजा तामिळ वाङ्‌मयाचा भोक्ता होता या काव्यांत नंदि राजाला निरनिराळीं आडनांवें दिली आहेत. शिलालेखांतील माहितीवरून असें दिसतें कीं बाहूर लेखांत उल्लेख असलेला दंतिवर्भ्याचा पुत्र नंदि हाच या काव्यांतील नायक असावा. दंतिवर्मा हा राष्ट्रकूटच्या गोंविद राजाचा ( इ. स. ७८२-८१४ ) समकालीन होता. म्हणजे नंदि राजा हा नवव्या शतकाच्या मध्यभागांत झाला असावा.

नंदिराजाचे शिलालेख चोल व तोंडिनाडु येथें सांपडतात. या  राजाच्या शिलालेखांवरून बाण राजांचा हा सार्वभौम असावा असें उघड उघड दिसतें व याचा बाप बाण राजांचा सार्वभौम होता असाहि पुरावा सांपडतो. नंदीच्या ज्या आडनांवांचा उल्लेख काव्यांत आहे त्यांपैकी कांहीं त्याच्या शिलालेखांत व त्याच्या बापाच्या शिलालेखांत सांपडतात. बाहूर येथील शिलालेखांत दंतिवर्मा व नंदीचा मुलगा नृपतुंगवर्मा हे दोघे कट्टे विष्णुभक्त होते असा उल्लेख आहे. परंतु नंदि-कलंबगं काव्यांत नंदि हा कट्टा शिवभक्त होता असें म्हटलें आहे.

इरैयण्णार-अगप्पोरुळ:- हें काव्य म्हटलें म्हणजे प्रणय विषयावरील एकच प्रबंध होय. प्रणयाबरोबरच या काव्यांत विवाह, सवल्लभपलायन वगैरे विषयांची चर्चा केली आहे. या काव्यांत ६० सूत्रें असून त्याला सुंदर तामिळ भाषेंत लिहलेली उत्कृष्ट टीका जोडलेली आहे. टीकेच्या ''पायिरम्'' भागांत हें काव्य मदुरेच्या शिवानें लिहिलेलें आहे, असा उल्लेख आहे.

तामिळ भाषेच्या तिसर्‍या संघाला आश्रय देणार्‍या ४९ राजांपैकीं शेवटचा राजा उग्रप्पेरुवाळुदि याच्या कारकीर्दीत जबर दुष्काळ पडल्यामुळें त्यानें आपल्या पदरच्या विद्वानांना रजा दिली. पुढें १२ वर्षानंतर त्यानें पुन्हां या लोकांनां बोलाविलें. परंतु आलेल्या लोकांत ''पोरुळडिगारमा'' मध्यें (प्रणयामध्यें ?) कोणीहि तरबेज नव्हता, यामुळें राजाला वाईट वाटलें, तेव्हां सोमसुंदरदेवानें ताम्रपटांवर हीं ६० सूत्रें लिहिलीं व देवळांत ते ताम्रपट ठेविले. राजाकडे हे ताम्रपट आणल्यावर त्यानें विद्वान लोकांनां त्यांचा अर्थ सांगण्यास सांगितलें. परंतु ते परस्परविराधी अर्थ सांगावयास लागले. तेव्हां याचा निकाल कसा लावावा याचा राजाला विचार पडला असतां आकाशवाणी झाली कीं, रुद्रशर्मा नांवाच्या आंधळ्या मुलाला व्यासपीठावर बसवून त्याजपुढें निरनिराळ्या पंडितांनीं आपापले अर्थ सांगावे म्हणजे जो अर्थ सांगत असतां या आंधळ्या मुलाच्या डोळ्यांतून अश्रू येतील त्याचा अर्थ खरा असें समजावें. त्याप्रमाणें केलें असतां नक्कीवरची टीका सुरू झाली असतां प्रत्येक शब्दाबरोबर त्या आंधळ्या मुलाच्या डोळ्यांतून अश्रु येऊं लागले. यावरून त्याचीच टीका खरी असें सिद्ध झालें. ही टीका पुढें मुशिरिय अशिरियन नीलकंटण्णार यानें लिहून काढली.

इरैयण्णारांत ४०० पेक्षां जास्त स्पष्टीकरणात्मक कविता आहेत. त्यांपैकीं ३१५ कविता नेडुमारण राजाच्या स्तुतिपर आहेत. यांत हा राजा पांड्य वंशांतील आहे असें म्हटलें असून त्याचीं १३ उपपदें दिलेलीं आहेत. हा राजा काळ्या वर्णाचा होता व हा तामिळ भाषेचा फार चहाता होता. यानें समुद्रमंथन करून देवांनां अमृत दिलें असें या काव्यांत आहे. यावरून कवि राजाला विष्णूचा अवतार समजत असावा असें वाटतें. त्यानें २० लढाया मारल्या त्यांपैकीं बर्‍याच चेर राजांशी झाल्या. त्यानें एक जलयुद्धहि केलें होतें. नेडुमारण यास वाणवण, शेंबियाण, सोलण व तेण्णावाण अशीं नांवें आहेत. नेडुमारणानें शंगमंग व नेलवेलि येथें एका शत्रूशीं लढाई केली असें या काव्यांत आहे, शंगमंग हें पल्लव राजाची राजधानी कांजीवरम् याच्याजवळ आहे. यावरून ही लढाई पल्लव राजाशीं झाली असावी. कांहीं उपलब्ध शिलालेखांवरून ही लढाई नंदिवर्मन पल्लवमल्लाशीं झालीं असावीं असें दिसतें, व नंदिवर्मन् पल्लव राजा ७६० सालीं वारला. यावरून नेडुमारण हा इसवी सनाच्या ८ व्या शतकाच्या मध्यांत झाला असावा.

इरैयण्णार— अगप्पोरुळमधील सूत्राच्या लेखनाचा काल इ. स. ५०० पासून ७०० यांच्या दरम्यान असावा. त्या काव्यांत उल्लेखिलेलीं स्थळें हल्लींहि सांपडूं शकतात.

दंतकथेवरून मदुरा येथें व मदुरेच्या आसपास तीन तामिळ संघ झाले असें दिसतें. पैकीं तिसर्‍यासंबंधींचीच माहिती उपलब्ध आहे. या संघांतील सभासदांमध्यें ४९ कवी व टीकाकार होते. पांड्य राज्यांपैकीं मुडतिरुमारन व उग्रपेरुवळुधि यांनीं या संघाला आश्रय दिला. यांपैकी दुसर्‍याच्या कारकीर्दीतच तिरुवळळुवर याच्या कुरळ या काव्याच्या प्रसिद्धीस अनुज्ञा मिळाली. तिरुवळ्ळुवर याची बहीण अव्वैयार हिच्या काव्यांत उग्रपांड्यन् राजाचें वर्णन आहे; यावरून तिरुळ्ळुवर हा उग्रपांड्यन् याचा समकालीन असावा.

परनर याच्या काव्यावरून सेंगुट्टन सेर, अदियमान अंजि, अवैय्यार व स्वतः कवि हे एकाच वेळीं किंवा निदान एकाच पिढींत होऊन गेले असावे असें दिसतें. सेंगुट्टनसेर हा राजा फार मोठा असून त्याच्या दरबारीं शिल्पाधिकारम् व मणिमेखलै हे ग्रंथ तयार झाले.

संघातील दुसरा प्रख्यात कवि कपिलर हा होय. हा वेळपारि राजाच्या आश्रयाखालीं होता. यानें ऐगुरुनुरु काव्याचा कुऋंजि हा भाग, दशदशकाचा ( टेन टेन्स ) सातवा भाग, कुऋंजिपाट्टु व इङ्न हे ग्रंथ लिहिले.

सेंगुट्टन याच्या काळांत दोन महाकाव्यें झालीं. पैकीं एक पैंजणकाव्य हें शिल्पाधिकारम् या नांवानें प्रसिद्ध आहे. त्याचा सारांश:- पूहार येथील कोवलन नांवाच्या वैश्य पुत्राचें लग्न तेथील कण्णहि नांवाच्या वैश्य कन्येशीं झालें, हें जोडपें आईबापांपासून दूर रहात असतां कोवलन याची प्रीति एका नर्तकीवर जडली व तो बहुतेक वेळ तिच्याच सहवासांत घालवी. तरीहि त्याच्या स्त्रीचें त्याच्यावर असलेलें प्रेम यामुळें कमी झालें नाहीं. कोवलनपासून नर्तकीला एक मुलगी झाली. पुढें नर्तकी व कोवलन यांनां परस्परांच्या प्रेमाबद्दल संशय आला. कोवलन हा पुन्हां आपल्या पत्‍नीच्या सहवासांत दिवस घालवूं लागला व व्यापाराच्या उद्देशानें तो श्रीरंगमकडे जाण्यास निघाला. त्याच्या पत्‍नीनें त्याला व्यापाराकरितां आपल्या पैंजणाची जोडी दिली. पैकीं एक पैंजण घेऊन तो विकावयास गेला असतां एका सोनारानें तो आपण विकत घेतों असें सांगून त्याला बसवून ठेविलें व स्वतः जाऊन राजाला सांगितलें कीं राणीचे पैंजण चोरणाराला मी पकडलें आहे. राजानें त्याला मारण्याचा हुकुम दिला, तेव्हां कोवलन मारला गेला. पुढें त्याच्या पत्‍नीनें राजाची कोवलनच्या शुद्धतेबद्दल खात्री करून मदुरा शहर जळेल असा शाप दिला व एका देवतेच्या प्रसादानें तिला तिचा पति पुन्हां मिळाला.

दुसर्‍या काव्यांत वरील काव्याचा पुढला भाग आहे तो असा:- कोवलनाचें जिच्यावर प्रेम होतें ती माधवी नांवाची नर्तकी कोवलनच्या निधनाची वार्ता ऐकून बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन ऐहिक सुखाचा त्याग करून कालक्रमण करूं लागली. तिची कन्या मणिमेखला हिचें नांव या काव्याला दिलेलें आहे व त्यांत तिचा ऐहिकसुखत्याग व बौद्ध धर्म स्वीकरण्याकरितां तिनें केलेले प्रयत्‍न व पूहारच्या राजपुत्राच्या प्रेमयाचनेचा तिनें कसा अव्हेर केला वगैरे गोष्टींचें वर्णन आलेलें आहे.

या कथानकाच्या वेळीं पूहार येथें कारिकल नांवाचा राजा राज्य करीत होता असें त्यांतील वर्णनावरून दिसतें. तसेंच मणिमेखलै या काव्यावरून कारिकालनंतर किल्ली नांवाचा राजा पूहार येथें राज्य करीत होता असें दिसतें.

पैंजण काव्यांत नेडुम चेलियन नांवाच्या पांड्य राजाचा उल्लेख असून त्याचा कोर्कै येथील प्रतिनिधि इळंचेलियन याचाहि उल्लेख आहे. या पांड्य राजाच्या कारकीर्दीत संघांतील पुष्कळ प्रख्यात कवी उदयास आले व तो स्वतःहि तामिळ वाङ्‌मयांत बराच प्रख्यात आहे. या दोन काव्यांवरून असें दिसतें कीं त्यांत वर्णिलेल्या कथानकाच्यावेळीं पूहार येथें कारिकल व त्याचा नातू कोक्किळ्ळी हे राज्य करीत होते. कारूर येथील चेर राजा सेंगट्टुव चेर हा होता व हाच पैजण काव्याच्या लेखकाचा भाऊ व मणिमेखलै काव्यकर्त्याचा आश्रयदाता होय. त्याचा पिता व चुलता हे अनुक्रमें दशदशकाच्या २ र्‍या व ३ र्‍या भागांतील नायक होत.         

वर दिलेल्या कवींशिवाय या कालांत दुसरेहि प्रख्यात कवी झाले, त्यांत तिरुवळ्ळुर, इंळंगोवडिगाल, शिध्धले, शट्टनार, रुडिरांगण्णनार, मुडथामक्काण्णियार. मांगुडि मरुडनार, नर्फीरर वगैरे मुख्य होत व यांचे ग्रंथ आजतागायत तामिळ वाङ्‌मयांत सर्वोत्तम मानले जातात.

यांपैकीं पैंजण व मणिमेखलै काव्यांवर बौद्ध धर्माचा बराच परिणाम झालेला दिसतो व त्यावरून या काव्यांचा काळ बौद्ध काल होता असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं व बौद्ध धर्माचा र्‍हास इ. स. च्या ७ व्या शतकाच्या सुमारास झाला. हीं काव्यें ज्याच्या दरबारीं झालीं तो सेंगट्टुव राजा सिलोनच्या गजबाहूचा समकालीन होता असें दिसतें. कारण पत्तिनी देवीच्या देवळाच्या शुद्धीच्या वेळच्या यज्ञाला सिलोनचा गजबाहू राजा आला होता. सिलोनमध्यें दोन गजबाहू झाले. पहिला गजबाहू इसवी सन ११३-१३५ पर्यंत होता आणि दुसरा इ. स. ११४२-११६४ पर्यंत होता. यावरून वरील गजबाहू पहिलाच असला पाहिजे असें दिसतें. या पुराव्यावरून असें दिसतें कीं तामिळ वाङ्‌मयाचा विशेष भरभराटीचा काल अगदीं अलीकडे म्हटला तरी निदान इ. स. चें २ रें अथवा ३ रें शतक असला पाहिजे. गजबाहूशिवाय पैंजण काव्यांत दुसर्‍या कांहीं राजांचा उल्लेख आहे व त्यांच्या कालनिर्णयावरूनहि असें दिसतें कीं तामिळ वाङ्‌मयाचा भरभराटीचा काल इ. स. २ रें व ३ तें शतक असला पाहिजे.

मदुरैकांची हें पत्तुपाट्टु नांवाच्या दहा काव्यांच्या समुच्चयांतील एक आहे. हें काव्य तामिळ भाषेंत आहे व मांगुडि मरुडणार हा त्याचा कर्ता आहे. हें काव्य त्या वेळच्या देशाची समाजाची, लोकांची व तसेंच राजांची ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीनें फार महत्त्वाचें आहे. नच्चिणारक्किनियार नांवाच्या तामिळ विद्वानानें त्या काव्यावर टीका केली आहे. पांड्य राजा नेडुञ्जेळियन ह्याचें व त्यानें युद्धांत दाखविलेल्या पराक्रमाचें वर्णन ह्या काव्यांत आहे. तेलैयालंगाणम् येथें नेडुञ्जेळियन ह्यानें दोन पराक्रमी राजांनां व पांच संस्थानिकांनां लढाईत जिंकलें व ह्यानें नेळ्ळूरहि घेतलें असें म्हणतात. वदिम्बलंबनिन्न पाण्डियन आणि पल्यागशालैमुडुकुमि पेरुव्हळुडि हे त्याच्या पूर्वजांपैकीं दोघे आहेत.

मुदुरैकांची आणि त्यातील नायक यांचा कालनिर्णय करण्याकरितां लागणारी माहिती शिन्नमनूर ताम्रपटांत आणि वेळविकुडि शासनपत्रांत सांपडते. वेळविकुडी शासनपत्रांत काडुङ्गोन नांवाच्या पहिल्या पांड्य राजापासून त्याच घराण्यांतील शेवटल्या जटिलवर्मनपर्यंत सर्वांचीं नांवें दिलीं आहेत. जटिलवर्मन् आणि परांतक शडैयन हे दोघेहि एकच होते, कारण ह्या दोघांचाहि मधुरकवि हा प्रधान होता असें ताम्रपटांत आणि शासनपत्रांत दिलें आहे. परांतक शडैयन ह्याच्या कारकीर्दीत अनैमलै डोंगरावरील नरसिंह पेरुमाळ नांवाचें मंदिर बांधलें. म्हणून परांतक शडैयन किंवा जटिलवर्मन् याचा इ. स. ६७९-७० हा काल ठरतो. वेळविकुडि शासनपत्रात दिलेल्या पांड्य राजांच्या वंशावळीप्रमाणें शेळियन हा कडुङ्गोन ह्याचा नातू आहे. शेळियन आणि तलैयालंगाणम् येथें विजयी झालेला पांड्य राजा ( नेडुञ्जेळियन ) हे दोघेहि एकच असावेत असें दिसतें. कारण पांड्य राजांच्या वंशावळींतील दुसर्‍या कोणत्याहि राजाचें नांव शेळियन नाहीं आणि सिन्नमनुर ताम्रपटांत शेळियनच्या नंतरच्या राजापासून पांड्य वंशांतील राजांची वंशावळ दिलेली आहे व त्यांत तलैयालंगाणम् येथें झालेल्या लढाईचाहि उल्लेख केला आहे. ह्या कारणांवरून असें वाटतें कीं नडुञ्जेळियन आणि कडुङ्गोन हे दोघेहि एकच होते असें मानण्यास थोडाबहुत आधार आहे. वर दिलेंच आहे कीं पांड्य घराण्यांतील शेवटचा राजा जटिलवर्मन् हा इ. स. ७६९-७७० मध्यें होता. जटिलवर्मनचा प्रधान मधुरकवि त्याच्या कारकीर्दीच्या तिसर्‍या वर्षी जिवंत होता. पण अनैमलै मंदिराची स्थापना झाली त्यावेळीं नव्हता. म्हणून इ. स. ७६९-७७० हीं जटिलवर्मनच्या कारकीर्दीचीं शेवटलीं वर्षे असावीं असें धरून चालण्यास हरकत नाहीं. वेळविकुडि शासनपत्रांत दिल्याप्रमाणें नेडुञ्जेळियन हा पांड्य घराण्यांतील तिसरा व जटिलवर्मन् ( इ. स. ७७० ) हा शेवटचा म्हणजे सातवा राजा होता. प्रत्येक राजाची कारकीर्द जरी तीस वर्षांची धरली तरी नेडुञ्जेळियनच्या कारकीर्दीच्या सुरवातीपासून जटिलवर्मनच्या कारकीर्दीपर्यंत १५० वर्षे होतात. म्हणून नेडुञ्जेळियन याच्या कारकीर्दीस इ. स. ६२० ( ७७०-१५० ) पासून सुरवात झाली. इतर सबळ पुरावा मिळेपर्यंत मदुरैकांची हें काव्य आणि नेडुञ्जेळियन हें सातव्या शतकाच्या आरंभीं झालें असें मानण्यास हरकत नाहीं.

वर काढलेला नेडुञ्जेळियन याचा काल व (तो आणि सेलियन हे दोघेहि एकच होते) ह्या दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत असें मानण्यास आणखी एक आधार आहे. वेळविकुडि शासनपत्रांत नेडुञ्जेळियन राजाचा मुलगा अरिकेसरी मारवर्मन् यानें नवेली येथील लढाई जिंकली असें म्हटलें आहे (इ. स. ६५०-६८०). शैवमहात्मा ज्ञानसंबंदर याचा नेडुमारन नांवाचा पांड्य राजा समकालीन होता. ह्या राजानेंहि नवेलि येथें जय मिळविला अशी आख्यायिका आहे. ज्ञानसंबंदर इ. स. सातव्या शतकाच्या मध्यकाळांत होता, म्हणून नवेली येथील लढाई देखील त्याच सुमारास म्हणजे इ. स. ६५०-६८० च्या दरम्यान झाली असली पाहिजे. नेडुञ्जेळियन याच्या मुलाचेंहि नांव नेडुमारन असें होतें. या गोष्टीनेंहि नेडुञ्जेळियन हा इ. स. ६२०-६५० मध्यें होता हें जें वर म्हटलें आहे त्याला पुष्टि मिळते.

कोयिलोलुगु:- या ग्रंथांत श्रीरंग बेटांतील श्रीरंगनाथाच्या देवळाला दिलेल्या देणग्या व त्या देवळाची केलेली दुरुस्ति व सुधारणा यांची हकीकत पुरातन काळापासून दिलेली आहे व हें काव्य तामिळ गद्यांत लिहिलें आहे. यांत इ. स. १३ ते १६ व्या शतकांतील दक्षिण हिंदुस्थानांतील राजांचा इतिहास दिला आहे. पुरातन काळच्या महत्वाच्या गोष्टींचा यांत उल्लेख केलेला आहे. दक्षिणेच्या इतिहासाचा शोध लावणार्‍या पंडितांस याची माहिती होती. या ग्रंथाची पूर्ण तपासणी झाली नाहीं. शिलालेख व ताम्रपट यांवरून हा ग्रंथ बनविला आहे. यामुळें त्यांतील माहिती ऐतिहासिकदृष्टया कुचकामाची नाहीं. वरील देवालयांतील मूर्तीचा पूर्वेतिहास असा:-

रंगनाथदेवाची पूजा कांहीं काळपर्यंत ब्रह्मा करीत होता, त्याजपासून इक्ष्वाकूनें अयोध्येला मूर्ति नेली. नंतर रामानें कृपाळू होऊन ती मूर्ति बिभीषणाला दिली; त्यानें कावेरीच्या दोन फांट्यांमधील श्रीरंगम् बेटांत ही मूर्ति स्थापिली. येथें किल्ली चोलाचा पूर्वज धर्मवर्मा यानें मुख्य देऊळ (तिरुवुण्णालिगै) व इतर जरूरीच्या इमारती बांधल्या. यानंतर बर्‍याच काळानें किल्ली चोल राजाच्या कारकीर्दीत हें देऊळ रेतीनें झांकून गेलें होतें व बेटावर जंगल वाढलें होतें. किल्लीनें हें देऊळ पूर्वीच्या स्थितींत आणलें. किल्लीनंतर राजमहेंद्रानें देवळाच्या आंतील भागास फरसबंदी केली व कित्येक इमारती व रस्ता बांधला. निचुलापुरी येथें राज्य करणार्‍या नंद-चोल राजास एक कमलपत्रावर वहात आलेली मुलगी मिळाली. त्यानें या देवळाला मोठ्या देणग्या दिल्या.

एका चोल राजाच्या पापाचरणामुळें कांहीं वर्षांनंतर रेतीची भर पडली व या गोष्टीमुळें उरैयूरचा नाश झाला, व राजधानी गंगैकोंडमला नेली. कांहीं वर्षांनंतर चोलराजानें उरैयूर येथें एक लहानसें देऊळ बांधून त्यांत ( नाच्चियार ) देवाची मूर्ती स्थापन केली.

कलि, वर्ष ५० मध्यें कुलशेखर-पेरुमल चेर. चोल व पांड्य राज्यांचा नायक झाला. याची मुलगी शोलकुलवल्ली हिनें श्रीरंगमच्या देवळांत कांहीं सुधारणा केल्या. कलि, वर्ष ३६० मध्यें गौडदेशाच्या राजानें देवास विपुल संपत्ती नजर केली. कलि, वर्ष ४४५ मध्यें वैष्णवसाधु तिरुमंगयी-अळवार हा येथें रहात होती. यानें देवळाची दुरुस्ती केली.

कोशग्रंथ - यांकडे तामिळ पंडितांचें लक्ष अत्यंत प्राचीनकाळीं देखील लागलें होतेंसें दिसतें. शूळामणि निगण्डु हा तामिळ शब्दकोश गुणभद्र याचा शिष्य मण्डलपुरुष यानें लिहिला. यानें असा उल्लेख केला आहे कीं, किरुत्तिवराय ( कृष्णराय ) यानें त्यास पुष्कळ देणग्या दिल्या. आतां मण्डलपुरुष हा गुणभद्राचा शिष्य असल्यामुळें व गुणभद्र हा राष्ट्रकूट राजांच्या आश्रयास असल्यामुळें हा कृष्णराय विजयानगरचा राजा नव्हे हें सिद्ध होतें. तेव्हां हा उल्लेख अकालवर्ष राष्ट्रकूटराजा कृष्ण ( दुसरा ) याच्याबद्दल असावा. अकालवर्ष कृष्ण ( दुसरा ) याचा काल इसवी सन ८८८ ते ९११-१२ हा आहे व गुणभद्र आणि मण्डलपुरुष हे अकालवर्षाच्या आश्रयाखालीं होते. यावरून शूळामणि निगण्डु या शब्दकोशाचा काल इ. स. ८७५ ( सुमारें ) हा येतो.

कायदेग्रंथ - या विषयासंबंधानें पुस्तकें थोडीं आहेत व त्यापैकीं बहुतेक अलीकडील आहेत. मनुनितिशास्तिरम् हें मनुस्मृतीचें सार आहे. तरुमनुल हें स्मृतिचंद्रिका या हिंदु कायदे पुस्तकाचें सार आहे. पिनलकोड, क्रिमिनलप्रोसिजर, दिवाणीकोर्टाचा कायदा, पुराव्याचा कायदा वगैरे अलीकडील कायद्यांचीं भाषांतरें तामिळ भाषेंत झालीं आहेत. तसेंच पोलीसअ‍ॅक्ट, रेल्वेकंपनीचे नियम वगैरेसंबंधीं पुस्तकें तामिळ भाषेंत झालीं आहेत.

तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ — या विषयांतहि संस्कृत तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांचा पूर्ण परिणाम तामिळ ग्रंथांवर दिसतो. तर्कशास्त्राबद्दल तीच स्थिति आहे. तामिळ भाषेंतील तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाला बहुधां एक प्रस्तावना जोडलेली असते व तिच्यांत ग्रंथकार ज्या तर्कशास्त्रपद्धतीचा अवलंब करणार तिचा परिचय करून दिलेला असतो व त्यांत निरनिराळ्या प्रकारची प्रत्यक्ष, अनुमान, साक्षात्कार, अभाव वगैरे प्रमाणें, त्यांचे अर्थ व त्यांचे पोटभेद, हेत्वाभास व त्याचे प्रकार इत्यादिकांचें स्पष्टीकरण असतें. तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांत जग, ईश्वर, आत्मा, मन, ज्ञानेंद्रिय, जगाचें मिथ्यात्व वगैरे अनेक प्रश्नांचें तामिळ ग्रंथांत केलेलें तात्त्विक विवेचन आर्यन् संस्कृतींतील मतांनां धरून असतें, हें पुढील उदाहरणावरून दिसून येईल. सदरहू माहिती 'सिवग्नानपोथम्' ह्या ग्रंथांतील आहे. हा ग्रंथ अत्यंत पवित्र व फक्त पंडितांनांच कळण्यासारखा आहे असें मानतात; कारण त्याची भाषा सोपी नाहीं व सर्व ग्रंथ वादविवादात्मक व अध्यात्मिक स्वरूपाचा आहे. त्यांत एकंदर बारा सूत्रें असून प्रत्येक सूत्राचा विषय एकेका स्वतंत्र प्रकरणांत विवेचिला आहे. बारा विषय आहेत ते (१) ईश्वराचें अस्तित्त्व; ( २) जग व आत्मे यांशीं ईश्वराचा संबंध; (३) आत्म्याचें अस्तित्व; (४) अन्त:करणाशीं आत्म्याचा संबंध; (५) पंचज्ञानेंद्रियें; (६) मिथ्याजग व सत्य परमेश्वर यांमधील भेद; (७) सिवनपुढें सर्व वस्तू मिथ्या होत; (८) आत्म्याच्या ज्ञानप्राप्‍तीची तर्‍हा; (९) कर्मफलापासून ज्ञानचक्षूंच्या द्वारें आत्म्याची मुक्ति;  (१०) आणव कनमम् मायै या मलमूच्या नाशाच्या रीती; (११) ईश्वरपदीं लीन होणारा आत्मा व (१२) अचिंत्य, अवर्णनीय अशा सिवनचें मनन, दर्शन व पूजन आतां या ग्रंथांतील तत्त्वज्ञानाचा कांहीं मासला येथें देतों.

देवांचें अस्तित्त्व:- ज्यांत तो, ती, तें असे तीन्ही लिंगी प्राणी असून ज्यावर उत्पत्ति, स्थिति व नाश ह्या तिहींचा व्यापार चालतो असें हें जग ज्याप्रमाणें उत्पन्न झालें त्या प्रमाणें विलयास जाईल व मूळापासून त्याची पुन्हां उत्पत्ति होईल. सर्व वस्तूंच्या शेवटीं ईश्वराचें अस्तित्व असतें असे ज्ञानी म्हणतात ( म्हणजे जगदुत्पत्तीचें तो ईश्वर म्हणजे एक असें निमित्तकारण आहे. )

जग व आत्मे यांशीं परमेश्वराचा संबंध:- वर सांगितलेलें जग म्हणजे देव असून ईश्वर अपेथम् म्हणजे त्या ईश्वरांत व जगांत भेद नाहीं. परंतु  ज्या अर्थी जग असिक्त ( म्हणजे असत् ) आहे व ईश्वर सूत्तीयम ( सद्रूप ) आहे त्याअर्थी ईश्वर भेदम् म्हणजे जगापेक्षां निराळा आहे. त्याप्रमाणें तो ईश्वर पेथम् व अपेथम् असा दोन्हीहि असल्यामुळें त्याला पेथापेथम् ( भेदाभेदम् ) ही संज्ञा प्राप्‍त झाली आहे. म्हणून जगाच्या दृष्टीनें ईश्वर अपेथम् पेथन् व पेथापेथन् असा असतो. ईश्वर सर्व विश्व व्यापून उरला आहे. त्याच्या आज्ञेप्रमाणें आत्म्यांनां स्वकनमम ( कर्मा ) नुसार जननमरण प्राप्‍त होतें. वेदामध्यें सांगितलें आहे कीं, ईश्वर एक, अनंत, शुद्ध असा असून त्याच्या तोडीचा दुसरा कोणी नाहीं, व ईश्वर-आत्मा एक आहे असें म्हणणारा आत्मा आहे. आत्मा पाशयुक्त असल्यामुळें अपवादन्यायानें ईश्वर स्वतंत्र ठरतो. ज्याप्रमाणें अ या स्वराशिवाय नुसतीं अक्षरें निरुपयोगीं झालीं असतीं त्याप्रमाणें ईश्वराशिवाय आत्मा व्यर्थ ठरला असता. परआत्मा व आत्मा यांचा निकट संबंध व ईश्वरावांचून असलेलें आत्म्याचें व्यर्थत्व स्वरावांचून होणार्‍या अक्षरांच्या व्यर्थत्वावरून ठरविलेलें आहे. परमात्म्याबरोबर आत्म्याचा द्वैत नष्ट करणारा संयोग एका श्लोकांत वर्णिलेला आहे.

आवाज व आलाप यांचा जो संबंध तसाच ईश्वर व जग यांचा संबंध. आलापांतील सर्व स्वरांत ज्याप्रमाणें आवाज भरलेला असतो त्याप्रमाणें ईश्वर विश्वाच्या सर्व दृश्यांत भरलेला असतो. संगीतशास्त्रज्ञाशिवाय आवाजाला व आलापाला अस्तित्व नसतें. त्याप्रमाणेंच तीन अनन्त अशीं द्रव्यें असावयास पाहिजेत. जसें फळ व त्याचा स्वाद, त्याचप्रमाणें जग व जगन्नियन्ता. जसे तीळ व तिळाचें तेल तसा ईश्वर व जग. तिळापासून जसें तेल भिन्न असतें तसें जग ईश्वरापासून भिन्न आहे. ईश्वराच्या सत्तेनें हें विश्व अशा तर्‍हेनें व्यापिलें आहे कीं, त्याच्यामधील अद्वैत नष्ट झालेलें आहे तरी सत्ती विश्वापासून भिन्न आहे. म्हणून वेदांत ते एक आहेत असें न वर्णितां त्यांच्यांत अत्तुविथम् ( अद्वैत ) आहे असें वर्णन केलें आहे. ईश्वर व आत्मा अगर विश्व यांच्यामधील संयोगाच्या बाबतींत अद्वैतम् या शब्दाचा अर्थ एकम् असा घ्यावयाचा नाहीं. कारण अद्वैत या शब्दाचा अर्थ एकसमता एकपणा असा नाहीं. ईश्वर व आत्मा यांचा संबंध इतका निकट असतो कीं, ते दोन दिसत नाहींत एवढाच अर्थ घ्यावयाचा.

जो मनुष्य त्या संबंधाबद्दल अद्वैत म्हणजे एकसमता असें म्हणतो त्याच्या अस्तित्वावरूनच ईश्वर व तो हे एक नाहींत हें सिद्ध होतें. ह्यावरून ते दोन आहेत असें सिद्ध न होतां व भिन्न न दिसतां त्यांचा निकट संबंध आहे असा अर्थ घ्यावयाचा.

आत्म्याचें अस्तित्व:- यंत्राप्रमाणें असणार्‍या व मायेपासून निर्माण होऊन विकास पावणार्‍या शरीरांत आत्मा असतो. अपवादन्यायानें आत्म्याचें अस्तित्व ठरतें. ज्याप्रमाणें एखादा माणूस ह्या वस्तू माझ्या आहेत असें म्हणून त्या वस्तूंपासून निराळा ठरतो त्याप्रमाणें आत्मा तो ज्या शरीरांत असेल त्या शरीराला आपलें म्हणून त्यापासून भिन्न ठरतो. पंचेंद्रियांपासून आत्म्याला ज्ञानलाभ होतो म्हणून पंचेंद्रियांपासून आत्मा भिन्न आहे. अवत्तै ( अवस्था ) मुळें आत्म्याला प्रगतीचें ज्ञान होतें म्हणून अवत्तौहून आत्मा भिन्न आहे. ज्याअर्थी सुषुप्तावस्थेंत अन्नसेवन अगर चलनक्रिया नसतात त्याअर्थी शरीरापेक्षां निराळें असें आत्म्याचें अस्तित्व आहे. ज्याअर्थी आत्म्याला संवेदनांचें ज्ञान असतें त्याअर्थी त्याला निराळें अस्तित्व आहे असें ठरतें.

अन्त:करणमशीं आत्म्याचा संबंध:- ह्या अन्तकरणम् पैकीं आत्मा नसून त्या सर्वांशीं आत्म्याचा निकट संबंध आहे. ज्याप्रमाणें वर चढलेल्या गंजाच्या आंत तांब्याचें भांडें असतें त्याप्रमाणें आणव मळमच्या आंत आत्मा असतो. ह्यामुळें त्याला ऐहिक ज्ञान नसतें. विकास पावल्यानंतर आत्मा पांच अवत्तैमध्यें प्रविष्ट होतो. बाह्य तत्तुवमबद्दल पूर्वी विवेचन येऊन गेल्यामुळें सूत्रकार ह्या ठिकाणीं तुरणम् अथवा आन्तर तत्तुवम् ( अन्तकरणम् ) बद्दल बोलतो. ज्याप्रमाणें एखादा राजा आपल्या प्रधानासमवेत दौर्‍यावरून जाऊन येतो व प्रत्येक दरवाज्यावर द्वारपाळ नेमतो व नंतर अन्तर्महालांत जातो तसा आत्मा प्राणवायूला द्वारपाळ नेमून अवत्तैमध्यें जातो.

पंचज्ञानेंद्रियें:- वर सांगितल्याप्रमाणें पंचज्ञानेंद्रियें केवळ आत्म्याचीं निमित्तें म्हणून वस्तुज्ञान अनुभवितात, स्वतः त्यांनां त्यांच्या विषयांचें ज्ञान नसतें. त्याचप्रमाणें जो आत्मा त्यांनां त्या ज्ञानग्रहणासाठीं उद्युक्त करतो त्या आत्म्याचेंहि त्यांनां ज्ञान नसतें. अतएव जें जें म्हणून आत्म्यांनां सुबोध होतें तें तें अनुपमेय ईश्वराच्या अरुळ ( अरुळ सत्ती ) मुळें त्यांनां सुबोध होतें अशी जरी वस्तुस्थिति आहे तरी त्यांनां ईश्वराचें ज्ञान नसतें. ज्याप्रमाणें लोहचुंबकासन्मुख असलेल्या लोहाला आपणांवर कोणाची आकर्षक शक्ति चालली आहे हें कळत नाहीं त्याप्रमाणें आत्म्याची स्थिति असते. लोहाकर्षणापासून लोहचुंबकांत ज्याप्रमाणें बदल होत नाहीं, त्याप्रमाणें आत्म्याच्या आकर्षणापासून परमात्म्यांत फरक होत नाहीं.

पंचज्ञानेंद्रियें ज्याप्रमाणें विषयज्ञानाचीं निमित्ते होत व त्यांनां ज्याप्रमाणें आत्म्याचें-तोच त्यांनां व्यावृत करणारा असतो तरी-ज्ञान नसतें त्याप्रमाणें आत्म्याला ईश्वराचें ज्ञान नसतें. पंचेंद्रियें ज्याप्रमाणें जड असून आत्म्याशिवाय त्यांनां विषयज्ञान होणार नाहीं, त्याप्रमाणें आत्माहि ह्या बाबतींत जडासारखा असून ईश्वरानें त्याला उद्युक्त केल्याशिवाय तो व्यापारवान् होणार नाहीं.

कर्मफलापासून ज्ञानचक्षूंच्या द्वारें आत्म्याची मुक्ति:- पासुग्नानम् ( म्ह. आत्म्याचें ऐहिक ज्ञान ) अथवा पासग्नानम् ( शरीराचें ऐहिक ज्ञान ) यांनीं समजत नाहीं अशा सिवनचें अरुळच्या मदतीनें दर्शन घेणें हें ईप्सित आहे. म्हणून अन्तर्यामी ईश्वर आहे तो ज्ञानचक्षूंच्या साहाय्यानें पहा. अशा रीतीने शोधणार्‍याला पासम् मृगजलवत् भासून ईश्वर ( सिवन् ) रखरखीत प्रदेशांत हिंडणार्‍याला ज्याप्रमाणें शीतल प्रदेश त्याप्रमाणें वाटेल. पंचाक्षराचा उच्चार केल्यावर हें घडून येईल.

आणव कनमम् मायै या मलमच्या नाशाच्या रीती:- स्वतःच आत्मा असल्याप्रमाणें सिवन् आत्म्यांत असतो; त्यावरून आत्मा सिवनबरोबर असेल. त्यावरून आत्म्याची अशी जीं जीं कर्मे म्हणतों तीं तीं सिवनचीं ठरवील. तसें ठरल्यावर आणव मलम् माया मलम् व अपरिहार्य कननम् नष्ट होतील म्हणजे आत्म्याला त्यांपासून उत्पन्न होणारीं फलें चाखावीं लागणार नाहींत. ज्यावेळीं आत्मा सिवनशीं एकरूप होईल त्यावेळीं मी अमुक केलें त्यानें तमुक केलें असें तो म्हणणार नाहीं व अरुळसत्ती त्याच्या मदतीस येईल.

ईश्वरपदीं लीन होणारा आत्मा:- ज्याप्रमाणें आत्मा नेत्रांनां व्यापारवान् करतो त्याप्रमाणें ईश्वर मुक्तशरीर आत्म्याला पहातो व स्वतःचें त्याला दर्शन देतो. ह्याप्रमाणें तो त्या आत्म्याला स्वपदाचा लाभ करून देतो व ह्या प्रसादापासून आत्मा कधींहि परतत नाहीं.

ज्याप्रमाणें मुक्त आत्मे अरुळच्या साहाय्यानें ईश्वराला पहातात त्याप्रमाणें शरीरांत कोंडलेले आत्मे इंद्रियाचा ताबा स्वतःवर न चालूं देतां अरुळच्या सहाय्यानें मुक्त होतात. तदनंतर अनुभवानें त्यांनां सिवनचें ज्ञान होऊन ते सिवनचरणीं लीन होतील. कनमममुळें जो कामें करतो त्याला 'हें मी केलें तें अमक्यानीं केलें' असें वाटतें. म्हणून या कनममचा नाश झाल्याशिवाय ज्ञानाचा उदय होणार नाहीं. हें ज्ञान प्राप्‍त झाल्यावर कनममचा नाश करण्यासाठीं प्राणी ज्यावेळीं सिवनची भक्ति करूं लागतो त्यावेळीं सिवन त्याच्यावर अनुग्रह करतो. म्हणून शिवभक्त शिवलिंग व सिवन हे सर्व एकच आहेत असें समजून ईप्सित मनांत धरून सिवनची पूजा करा.

सिवन् गुरू व शास्त्रें एकच समजून शिवाजी पूजा करावी. सर्व आत्म्यांचा जीवनधार जो सिवन् त्याच्याशीं विग्नाना कलर ( ज्यांच्यावर एक मलमचाच ताबा चालतो असे आत्मे ) आत्मे तद्रूप झाल्यावर त्यांनां पुन्हां जन्म येत नाहीं. पिरळ्या कलर ( म्ह. ज्यांच्यावर दोन मलमचा ताबा चालतो असे ) आत्मे शिवरूपी झाले व त्यांच्यावर शिवाचा अनुग्रह झाला तर तेहि जननमरणाच्या फेर्‍यांतून चुकतील. सकलर ( म्ह. ज्यांच्यावर तिन्हीहि मलमचा ताबा चालतो असे ) आत्मे शिवस्वरूप गुरूपासून ज्ञान शिकल्यावर शिवाच्या कृपेनें व शास्त्रांच्या मदतीनें तेहि जननमरणाच्या फेर्‍यांतून मुक्त होतात.''

वरील माहितीवरून तामीळ ग्रंथांतील तत्त्वज्ञानाचें आर्यांच्या संस्कृत ग्रंथांतील तात्त्विक विचारांशीं किती साम्य आहे हें दिसून येईल. सिवग्नान पोथम् ह्या ग्रंथाच्या उत्पत्तीबद्दल त्याच ग्रंथांत पुढीलप्रमाणें माहिती आहे. सिवननें आपला सेवक जो नन्ती ( न्दी ) त्याच्या करवीं आपला भक्त जो सनत्कुमारन् त्याला ग्नाननुळ ( पवित्र धर्मग्रंथ ) सांगितला. सनत्कुमाराच्या तिसर्‍या पिढींतला ज्याला संस्कृतमधील द्वादशसूत्रें अवगत झालीं होतीं, जो शिवभक्त होता, ज्यानें सत्तु व असत्तुमधील भेद कळून असयूचा त्याग केला होता अशा गुरुभेयकण्डाननें ह्या ग्रंथाचें तामिळ भाषेंत भाषांतर केलें. त्याचें टीकेसह सर्व लोकांनां कळावें म्हणून पक्ष, हेतु व तिरुत्तान्तम (दृष्टान्त) चा नैयायिक पद्धतीनें निवारण केलें आहे.

तर्कशास्त्र, अतींद्रिय विज्ञान आणि नीतिशास्त्र या तिन्ही विषयांवर तामिळ भाषेंत ग्रंथ आहेत. तर्कसंगकिरकम् हें संस्कृतवरून भाषांतर केलेलें तर्कशास्त्रासंबंधींचें पुस्तक आहे. निययइलक्कनम् या पुस्तकामध्यें अ‍ॅरिस्टॉटल व बेकन यांच्या तर्कशास्त्रासंबंधानें माहिती दिलेली आहे. अतींद्रियविज्ञान या विषयाचा हिंदू तत्त्वज्ञानासंबंधींच्या ग्रंथांत अंतर्भाव होतो. नीतिशास्त्रासंबंधाचे ग्रंथ पुष्कळ आहेत कुरल हा ग्रंथ फार लोकप्रिय असून त्याच्या पुष्कळ आवृत्त्या निघाल्या आहेत. या पुस्तकांत १३३ प्रकरणें आहेत, व त्यांचे मुख्य तीन भाग पाडले असून सद्‍गुण संपत्ति व सुख यांपैकीं प्रत्येकाला एकेक भाग दिला आहे. या पुस्तकाचें लॅटिन, जर्मन, इंग्लिश वगैरे भाषांत भाषांतरहि झालें आहे. नलदियर हा ग्रंथ कुरल ग्रंथाच्या खालोखाल महत्त्वाचा आहे. तो मदुरा विद्यापीठांतील विद्वानांनीं लिहिला असें म्हणतात. त्याच्या अनेक सटीक आवृत्त्या निघाल्या आहेत. ईरगकेस वेंप ऊर्फ नीतिचुडामणी, कैलासनतरशतकम्, कोविंतशतकम्, कुमारेशशतकम्, मनवलनारायणशतकम्, नीतिनेरिविलक्कम्, नीतिचरणम्, नीतिचिंतामणी, तिरिकदुकम्, तंडलय्यरशतकम्, उपतेससंगकिरकम्, उदरक्कुरूवन्नम्, वेरिवेर्कैं, विरिंगसेसर शतकम् वगैरे नीतिपर ग्रंथ आहेत.

वैद्यकशास्त्र — तामीळ लोकांमध्यें हा विषय फार प्रिय आहे, त्यामुळें या विषयावरील ग्रंथांचा प्रसार फार आहे. आयुर्वेद हा वैद्यकविषयक ग्रंथ अथर्ववेदाचा एक भाग आहे असें मानतात. हा ग्रंथ हल्लीं संपूर्ण उपलब्ध नाहीं. चरक व सुश्रुत हे वैद्यकावरचे फार जुने ग्रंथ आहेत. वैद्यक, जादूचे मंत्र व किमया या तीन विषयांवर मिळून अगस्तिऋषीनें तामिळ भाषेमध्यें ५० हून अधिक ग्रंथ लिहिले आहेत असें मानतात. वास्तविक हे ग्रंथ निरनिराळ्या काळांत लिहिलेले असून त्यांपैकी कित्येक यूरोपियन लोक हिंदुस्थानांत आल्यानंतर लिहिलेले आहेत. जाफना येथील डॉ. ग्रीन नांवाच्या एका मिशनरी डॉक्टरानें वैद्यकावरील ११७ तामिळ ग्रंथांची यादी केलेली आहे. मृतशरीरविच्छेदनाविरुद्ध लोकमत असल्यामुळें शारीरविज्ञानशास्त्रांत हिंदु वैद्यांची फारशी प्रगति झालेली नाहीं. उलटपक्षीं तामिळ भाषेंतले वैद्यक ग्रंथ बर्‍याच भ्रामक समजुतींनी भरलेले आहेत. जादू-टोणा व मंत्रतंत्र या गोष्टीहि वैद्यकावरील ग्रंथांत असतात.

भौतिकशास्त्रें. - हिदूंमध्यें शास्त्रें व कला मिळून ६४ आहेत. तथापि भौतिकशास्त्रांमध्यें यूरोपांतल्यासारखे शोध इकडे लागलेले नाहींत. भौतिकशास्त्रांपैकीं वैद्यक, रसायन आणि पाहण्यापुरतें ज्योतिषशास्त्र एवढ्याच शाखा इकडे प्रगत झाल्या आहेत.

गणित— ही शास्त्रशाखा तामिळ लोकांमध्यें फारच थोडी अभ्यासिली जात असे असें दिसतें. अंकगणित किती अप्रगत स्थितींत होतें हें तामिळ संख्यापद्धतींत शून्य नाहीं यावरून दिसून येईल. बीजगणित व भूमिती यांवर प्राचीन ग्रंथ मुळींच नाहींत. अलीकडे शाळेंत शिकविण्याकरितां कांहीं पुस्तकें तयार झालीं आहेत. कनक्कतिकरम् हें अंकगणितशास्त्र, भुवनदीप व इतर कांही संस्कृत ग्रंथ यांच्या साहाय्यानें रचले आहे.

ललितकला- हिंदूंमध्यें ज्या ६४ कला आहेत, त्यांच्यांपैकीं पांच संगीतविषयक आहेत. पण तामिळ भाषेमध्यें संगीतावर जुना असा एकहि ग्रंथ झालेला नाहीं. तसेंच चित्रकला, खोदकला आणि शिल्पकला यांवरहि तामिळ भाषेंत एकहि जुना ग्रंथ नाही. हिंदू देवतांचीं चित्रें व मूर्ती पुष्कळ आढळतात. लांकडांच्या व धातूंच्या मूर्ती करण्याची कला बरीच सुधारलेली आहे. ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतर स्कूल ऑफ आर्ट्स ही संस्था मद्रास येथें स्थापन होऊन या कलांनां आतां चांगलें उत्तेजन मिळालें आहे.

व्याकरण ग्रंथ- व्याकरण हा विषय हिंदूचा आवडता आहे. तामिळ भाषेंतले पहिलें व्याकरण अगस्ति ऋषीनें लिहिलें आहे. पण तें त्याचा शिष्य तोलक्कपियनर याच्या शापामुळें नष्ट झालें अशी दंतकथा आहे. या शिष्यानें लिहिलेला तोलक्कपियम् नांवाचा सर्वात जुना व्याकरणग्रंथ हल्लीं उपलब्ध आहे. त्यामध्यें १२७६ सूत्रें उर्फ कविताबद्ध नियम आहेत. पवनंती यानें नंदुल नांवाचें तामिळ व्याकरण लिहिलें. त्यांत ४६२ सूत्रें असून तो ग्रंथ प्रमाण मानला जातो. या ग्रंथांतील सूत्रांत वाजवीपेक्षां अधिक असें एकहि अक्षर नाहीं. अशी प्रौढी तामिळ लोक सांगतात. तामिळ व्याकरणांत पांच प्रकरणें असतात- (१) वर्णविचार, (२) शब्दविचार, (३) विषयरचना, (४) वृत्तें व (५) अलंकार. नंदुल ग्रंथ १० व्या शतकाच्या सुमारास लिहिलेला आहे. नेमिबतमूलम् हा १६ व्या शतकांतील ग्रंथ असून तो कुमविरपंडितर यानें लिहिलेला आहे.

उत्तर कालीन काव्यवाङ्‌म - बहुतेंक तामिळवाङ्‌मययांतील गणितशास्त्र, वैद्यक, व्याकरण व शब्दकोश वगैरे विषयाचें ग्रंथसुद्धा कविताबद्ध आहेत. काव्यग्रंथावर भाष्यात्मक जे जुनें ग्रंथ आहेत ते गद्यात्मक आहेत. ते खेरीजकरून गद्यलेखनाचा परिपाठ यूरोपीयांच्या परिचयानंतर सुरू झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. तामिळ काव्याविषयीं दोन तीन यूरोपीय विद्वानांनीं आपलें मत प्रदर्शित केलें आहे. रेव्हरंड एच्. बॉवर म्हणतो ''बेसची यानें आपल्या तामिळ व्याकरण या ग्रंथाच्या परिशिष्टांत तामिळ काव्यकलेविषयी स्वतःचे विचार दिले आहेत. तो म्हणतो तामिळ कवी काव्याला साजेल अशी चांगली भाषा वापरतात. कोणत्याहि वस्तूचा उल्लेख करतांना ते त्याला गैरवापर विशेषणें नेहमीं योजितात. वृक्षाचा उल्लेख करतांना हिरवा, फुलांनीं लावलेला, शीतळ छाया देणारा भव्य किंवा असलें एखादें सुंदर विशेषण अवश्य योजतात. पर्वताचा उल्लेख करतांनाहि तो दाट वृक्षांमधून वर आलेला किंवा त्यावरून ओढे वहात असलेला किंवा फुलांनी सुशोभित केलेला वगैरे एखादें तरी विशेषण लावल्याशिवाय ते कधींहि रहात नाहींत. त्यांचें वर्णन नेहमीं रूपक, मालारूपक वगैरे अलंकारांनी भरलेलें असतें. अतिशयोक्ति अलंकारहि पुष्कळ योजलेला आढळतो. नैषध नामक तामिळ काव्यांत दमयंतीचें वर्णन करतांना तिच्या सौंदर्याला एकच प्रतिस्पर्धीं होता व तो चंद्र होय. हें पाहून ब्रह्मदेवानें दमयंतीला चंद्रापेक्षांहि अधिक सुंदर बनविण्याकरितां चंद्राच्या चेहर्‍यावरील मूठभर सौंदर्य घेऊन तें दमंयतीच्या चेहर्‍यावर अधिक घातलें आणि त्यामुळें चंद्र तसा कलंकयुक्त विद्रुप बनला अशा तर्‍हेचें वर्णन आहे. तामिळ कवीनां उपमालंकार योजण्याची इतर हिंदु कवींप्रमाणेंच फार आवड आहे. या बाबतींत ते वस्तुस्थितींकडे दुर्लक्ष करून कल्पनेच्या वाटेल तशा भरार्‍या मारीत सुटतात. गणपति व सरस्वती या विद्येच्या देवता ते मानतात व काव्य करतांना प्रथम त्यांच्या कृपेची याचना करतात. करूणरस आणि माधुर्य हे भारतीय काव्याचे मुख्य गुण आहेत. जोरदारपणा हा गुण कमी असतो.

डॉ. कॉल्डवेल म्हणतो '' तेलगू  व तामिळ काव्यामध्यें सौदर्य व माधुर्य अप्रतिम असतें आणि विशेषत: अर्थमाधुर्यापेक्षां शब्दमाधुर्याकडे जास्त लक्ष असतें. कोणत्याहि काव्यांत विशेष हेतु व अंत:करणांत खळबळ उडवून देणारे विचार आढळत नाहींत. त्यामुळें तामिळ काव्यांतील कांही निवडक भागांचें भाषांतर इंग्रज वाचकांनां आवडतें परंतु कोणत्याहि काव्याचें अथपासून इतिपर्यत सर्व भाषांतर केलेलें वाचणें अगदी कंटाळवाणें वाटतें. हा त्यांत महत्त्वाचा दोष आहे व त्याच्या जोडीला काव्याविषयींची पूर्वपरांपरागत पद्धति व नियम केवळ गुलामाप्रमाणें पाळणें हाहि मोठा दोष तामिळ कवींत आढळतो. हे दोष ज्यामध्यें आहेत त्या वाङ्‌मयाचा अधिकाधिक उत्कर्ष होत जाणें अशक्य आहे.''

तामिळ भाषेंतलें चिंतामणि हें काव्य कंबनाच्या रामायणापेक्षांहि आधिक सरस आहे असें तज्ज्ञ परीक्षकांचे मत आहे. हें काव्य १० व्या शतकांत एका जैन कवीनें लिहिलें आहे. रेव्हरंड एच्. बॉवर म्हणतो हें नीत्युपदेशपर महाकाव्य सर्वांहून अधिक योग्यतेचें आहे. याच्या कर्त्याचें नांव जरी अज्ञात असलें तरी त्याला सर्व तामिळ कवीचा राजा असें म्हणण्यास हरकत नाहीं. चिंतामणी हें त्या काव्यांतल्या नायकाचें नांव आहे. तामिळ भाषेंत लोकप्रिय झालेलीं लहान लहान पद्येंहि पुष्कळ आहेत. ही पद्यें रामायणाच्या आधारें रचलेल्या नाटकांतून व दुसर्‍या कित्येक काव्यांतून निवडून घेतलेलीं आहेत. हिंदू देवतांच्या स्तुतिपर पद्येंहि पुष्कळ आहेत. अशा पद्यांचा दुसरा एक विशेष आढळणांरा विषय म्हटला म्हणजे प्रेम हा होय. अशा प्रेमविषयक पद्यांत प्रथम गणपति व सरस्वती यांची स्तुती असते व विष्णू, शिव व पार्वती यांचीहि सहाय्य करण्याबद्दल प्रार्थना केलेली असते व नंतर पुढील प्रकारचें वर्णन आढळतें. एक तरूण स्त्री बाजारांत जात आहे, तिच्याबरोबर जाण्याची परवानगी एक तरूण मागतो पण ती नापसंति दर्शविते व म्हणते, ''माझ्या पाठीमागून तूं येणें चांगलें नाहीं. जर तूं येशील तर मी तुला शिव्या देईन. तूं माझया मागे कां येत आहेस ?'' त्याला उत्तर ''मी तुझ्या मागें येत आहे कारण माझी तुझ्यावर प्रीति जडली आहे.'' ''माझ्यामागें येणें हा मोठा दांडगेपणा आहे. माझ्यामागें येण्यांत तुझी काय इच्छा आहे ती मला सांग.'' ''सुंदर वेलबुट्टीचें वस्त्र परिधान केलेल्या हे सुंदरी, तूं माझ्याशीं एकहि दयेचा शब्द बोलत नाहींस कां ?'' ''मला तुजबरोबर बोलण्यास वेळ नाहीं. तूं असा विनाकारण कां बडबड करतो आहेस ? असें खोडसाळपणाचें शब्द बोलूं नकोस. तूं येथून दुसरीकडे जावें हें अधिक बरें.'' ''तुझ्यापासून दूर जावें असें माझ्या मनांत मुळींच येत नाहीं, तूं मयूरीसारखी आहेस मी तुझ्या पाठीमागून येणार व तुझ्याशीं बोलणार,'' ''तुला मजबरोबर काय बोलावयाचें तें दूर दूर उभा राहून बोल, तुझें बोलणें ऐकण्याची मजवर जबरदस्ती करणें हें तुला योग्य आहे काय ?'' ''केवळ प्रेमामुळें मी तुझ्या पाठीमागून येत आहे; तर याप्रमाणें माझ्याशीं भांडणें हें तुला बरें दिसत आहे काय ?'' इत्यादि.

दुसर्‍या एका पद्यामध्ये लेखक म्हणतो ''हे स्त्रिये, तुं मला गरम गरम दुधासारखी आहेस आणि मी तुला साखरेसारखा आहे, तर मग दूध व साखर यांच्यामध्यें भांडण काय असणार ? तूं मला चंदनाच्या विलेपासारखी आहेस व मी तुला कस्तुरीसारखा आहे. तर मग या दोघांमध्ये कांहीं विरोध आहें काय ?'' इत्यादि

तथापि तामिळ लोकांचीं बरींचशीं गाणीं अनीतिप्रचुर असतात. तामिळ कवीपैकीं पुष्कळ कवींत हा दोष आढळतो मात्र जैनपंथी काव्यामध्यें हा दोष नसतो. रेव्हरंड पी. पर्सीव्हल या मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेलमधील देश्यभाषांच्या प्रोफेसरानें हिदुस्थानांतील वाङ्‌मयसंबंधानें पुढील मत नमूद केलें आहे. ''अद्भुतरसात्मक ( रोमँटिक ) गोष्टी देशी भाषांतील वाङ्‌मयांत इतक्या सुरेख आहेत कीं, भाषाशैली व वर्णनशैलीबद्दल त्यांचे कौतुक करणें प्राप्‍त आहे. तथापि अशा गोष्टींमध्यें अगदी स्पष्टपणें अनीतिकारक प्रवृत्तीला पोषक होणारा प्रकार पुष्कळ ठिकाणीं आढळून येतो. नल व दमयंती यांची सुंदर गोष्ट त्या जगद्विख्यात भारतीय कवीनें अगदीं अप्रतीम व अनुकरणीय रीतीनें लिहिलेली असून ती उपर्युक्त दोषांपासून अगदीं अलिप्‍त आहे. असे असतांहि त्या गोष्टीचें तामिळ भाषेंतील रूपांतर तामिळ कवींच्या अश्लीलतादि दोषांनीं इतकें भरलेलें आहे कीं शाळेंतील विद्यार्थ्याच्या उपयोगाकरितां बराचसा भाग गाळून तयार केलेल्या प्रतींतूनहि प्रत्यक्ष तें काव्य शिकवूं लागल्यानंतर मला एकंदर ११०० कवितांपैकीं ५०० हून अधिक कविता वगळाव्या लागणें भाग पडलें. अश्लील वर्णनांची आवड केवळ हिंदू कवींतच आढळते असें नाहीं तर यूरोपांतील सर्व देशांतल्या व इंग्लंडातल्या देखील कांदबरीकार आणि नाटककार यांच्या लेखनांत अश्लीलतेचा भाग आढळून येतो. पण सभ्यपणाच्या सर्व मर्यादांचें उल्लंघन करण्याच्या कामांत हिंदू कवी यूरोपीय कवींच्या फारच पुढें गेलेले आहेत. कित्येक हिंदू काव्यांत हे दोष किती जास्त प्रमाणांत आहेत हें नुसत्या कल्पनेनें समजण्यासारखें नाहीं'' सदरहू आरोपाच्या समर्थनार्थ तामिळ काव्यांतून भरपूर उतारे देणें मुद्रणनियंत्रणाच्या कायद्याच्या आडकाठीमुळें शक्य नाहीं.

तान्ह्या मुलांकरितां स्त्रियांनीं म्हणावयाचीं गाणीं व लहान मुलांच्या खेळण्यांतलीं गाणींहि तामिळ भाषेंत आहेत. असलीं कांहीं गाणीं मद्रास लिटररी सोसायटीच्या जर्नलमध्यें प्रसिद्ध झालीं होतीं. रामायणासंबंधानें बालकांडम्, अयोद्धीयकांडम्, अरणीयकांडम्, किष्किंघाकांडम्, सुंदरकांडम्, युद्धकांडम्, वगैरे निरनिराळीं काव्यें आहेत. रामायणाचें तामिळ भाषेंत रूपांतर कंबन या कवीचें आहे. तो ११ व्या शतकांत होऊन गेला असें मानतात. यानें रामायणाचें बरोबर भाषांतर न करतां रामायणांतली गोष्ट स्वंतत्रपणें व मूळांत फारसा फरक न करतां सांगितली आहे. कंबन कवीच्या तामिळ रामायणाची इंग्रज कवि पोप याच्या भाषांतरित ईलियडशीं तुलना करतां येईल. मूळ वाल्मिकीच्या रामायणांत २४००० कविता आहेत आणि कंबनाच्या काव्यांत चार चार ओळींच्या १२०१६ कविता आहेत. याशिवाय रामायणयेलपद्दू, रामायणकोमैपद्दू वगैरे रामायणासंबंधींचीं काव्यें आहेत.

नैदतम् हें काव्य १२ व्या शतकांतील अतिविररम पंडियन यानें लिहिलें असें म्हणतात. यांत नलदमयंतीकाव्याचें अनुकरण केलें आहे. त्याचे २९ सर्ग असून एकंदर कविता ११७१ आहेत. या काव्याला तामिळ लोकांत फार मान देतात, पण नैतिकदृष्ट्या यांतील बराचसा भाग आक्षेपार्ह आहे. नस्सुपोयकै, परतकद्दियम्, पांडववनवासम्, पनलक्कोदिमलै, पुलंतिरणकलवूमलै, सुपत्तिरैमलै, वित्तुवनकुरम, वगैरे काव्यें महाभारातांतील कथांस अनुसरून आहेत. पंचत्तंतिरकतैपदल यांत पंचतंत्रांतील गोष्टींवरून रचलेलें काव्य आहे. याशिवाय जिंजीचा राजा व त्याचा घोडा, शिवगिरीच्या राजाचा पराक्रम, कलिंग किंवा तेलगू देशावरील विजय वगैरे ऐतिहासिक विषयांवर व स्त्रिया, प्रेम दारू वगैरे विषयांवर इतर लहान लहान काव्यें आहेत.

नाट्य वाङ्‌मय — या जातीच्या वाङ्‌मयाचा प्रसार फार आहे. वाङ्‌मयाच्या या शाखेसंबंधानें रेव्ह. डब्ल्यू. टेलरच्या कॅटलागाच्या प्रस्तावनेंत पुढीलप्रमाणें म्हटलें आहे. '' प्राचीन नाटकांपैकीं उत्तम नाटकांचें भाषांतर तामिळ व इतर भाषांत झालेलें आहे. अशा नाटकांतले कांहीं भाग लग्नसमारंभांच्या वेळीं नाट्यप्रयोगरूपानें नाचाबरोबर कधीं कधीं करून दाखविण्यांत येतात. तथापि सामान्यत: नाइकिणींचे नाच, गाणेंबजावणें यांच्या मानानें नाटकांबद्दलची आवड तामिळ लोकांत फार कमी आहे. याचें एक कारण असें दिसते कीं, तामिळ लोकांत भपकेदार मिरवणुकी, रात्रीच्या वेळच्या देवलयांतील उत्सव वगैरे प्रकारांची आवड विशेष आहे. नाट्यप्रयोगापासून आनंद होण्याइतकी रसिकता अंगी येण्याकरितां लागणारी बौद्धिक उन्नति अद्याप तामिळ लोकांची झाली नाहीं.

रामनाटकम् हें १८ व्या शतकांत अरूणसल कवीरयर यानें रामायणांतील गोष्टीवरून लिहिलेलें नाटक आहे. शंकुतलैविलसम्, समुत्तिरविलसम्, महाभारतविलसम्, मन्मथविलसम्, मार्कंडविलसम्, पद्मासुरविलसम् वगैरें नाटकें संस्कृत पौराणिक कथांवर रचलेलीं आहेत. तसिलतर विलसम् या १९ व्या शतकांतील नाटकांत लोकांपासून पैसे उकळण्याच्या तहशिलदाराच्या युक्त्या, लांच खाण्याचे प्रकार वगैरे गोष्टी दाखविल्या आहेत. नोंदीनाटकम् हें एका दरोडेखोरासंबंधाचें नाटक असून त्यांत त्याचे हातपाय तोडले गेल्यानंतर त्यानें एका देवालयांत देवाची पूजा केल्यामुळें त्याचे हातपाय पुन्हां कसे प्राप्‍त झाले त्याचा देखावा आहे. अल्लीपादशहानाटकम् हें एका मुसुलमान राजाविषयींचें, व अल्लीयारसनीनाटकम् हें मदुरा येथील एका राणीविषयींचें नाटक आहे. हरिश्चंदिरविलसम् हें हरिश्चंद्राच्या गोष्टीवर रचलेलें नाटक आहे. दंभचरियरविलसम् हें गर्विष्ठ लोकांच्या उपहासपर नाटक आहे.

गद्य कादंबर्‍या व कथा.— या जातींचीं पुस्तकें पुष्कळ आहेत व त्यांचा प्रसारहि फार आहे. या वाङ्‌मयशाखेचें महत्त्व विल्सननें पुढीलप्रमाणें दाखविलें आहे :— ''वाङ्‌मयाच्या या अंगाचे निरीक्षण केल्यानें हिंदु लोकांच्या जुन्या चालीरीती, त्यांच्यावर परकीय यूरोपीय लोकांच्या परिचयानें होणार्‍या परिणामापूर्वी कशा प्रकारच्या होत्या हें समजून घेतां येतें. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. या चालीरीतीसंबंधींची माहिती इतर सामान्य वर्णनापेक्षां तामिळ कांदबर्‍या व कथा यांवरून अधिक स्पष्ट व यथातथ्य मिळते. परकीय यूरोपीय लोकांनीं हिंदी देश्य लोकांचें केलेलें अवलोकन केवळ बाह्य व बरेंच अपूर्ण असतें, त्यामुळें ते खरें विश्वसनीय मानतां येत नाही. हिंदु चालीरितींची व विचारांची खरी माहिती होण्यास त्यांच्या कथा-कांदबर्‍या यापेक्षां अधिक योग्य असें दुसरें कोणतेंहि साधन नाहि. या वाङ्‌मयशाखेच्या अध्ययनाचा आणखीहि एक फायदा आहे. यूरोपमधल्या चालीरीतींवर पौर्वात्य चालीरींतीचा काय काय परिणाम झालेला आहे हें समजून येण्यास या कथा-कांदबर्‍या चांगल्या उपयोगी पडतात. पौर्वात्य देशांतील या कथांमुळेंच यूरोपीय लोकांच्या पूर्वजांची वाङ्‌मयाच्या या शाखेमध्यें प्रवृत्ति प्रादुर्भूत होऊं लागली ही गोष्ट हल्ली सर्वसामान्य झालेली आहे.

हिंदुस्थानांतील कल्पित कथा - ग्रंथांपैकीं पंचतंत्र हा सर्वात जुना ग्रंथ होय. तो इ. स. च्या ६ व्या शतकांत लिहिलेला असावा. दुसरा ग्रंथ हितोपदेश, हा त्यापेक्षांहि अधिक सरस आहे. अशा प्रकारच्या कथाग्रंथांमध्यें वेताळपंचविशी हें पुस्तकहि फार प्रख्यात आहे. सिंहासनबत्तिशी या नांवाचें विक्रमादित्त्याच्या सिंहासनाबद्दलच्या गोष्टींचें आणखी एक पुस्तक आहे. या प्रकारच्या गोष्टींमध्यें एक हा विशेष दिसून येतो की, हिंदुस्थानांतील स्त्रिया शिक्षणविहीन आणि अज्ञानी असतात आणि त्यांच्याबद्दल पुरूषवर्गाचा आदर फारच कमी असतो. हिंदु समाजामध्यें ही जी स्थिति दिसून येते ती कायम ठेवण्यास अशा कल्पित गोष्टींच्या पुस्तकांनीं आजवर मदत केलेली आहे. यासंबंधानें जॉन मुरडॉक म्हणतो ( क्लासिफाइड कॅटलॉग ऑफ तामिळ प्रिंटेड बुक्स, मद्रास १८९५) ''अशा गोष्टींपैकीं बर्‍याचशा गोष्टी स्त्रियांचा दुष्ट स्वभाव, चैनीची आवड, अनीतीचें आचरण आणि ठकबाजी वगैरे स्त्रियांतील दुर्गुणांसंबधानें असतात. या सर्व दुर्गुणांचा आरोप बहुधां बराचसा पुरूषवर्गाच्या तिरस्कारयुक्त बुद्धीमुळें उत्पन्न झालेला असतो. ही तिरस्कारबुद्धी व या प्रकारच्या कथा पौर्वात्य देशांतच आहेत असें नाहीं तर त्यांचें अनुकरण, दक्षिण यूरोपांतील देशांत ख्रिस्ती समाजामध्येंहि अधिक प्रमाणांत केलें गेलें आहे. यूरोपांतील मध्ययुगापूर्वीच्या म्हणजे ख्रिस्तोत्तर १० व्या शतकापूर्वीच्या काळांतील कल्पित कथा आणि मध्ययुगांतील स्त्रीदाक्षिण्याच्या काळांतील अद्भुतरसात्मक कथा यांमध्यें फार लक्षांत घेण्यासारखा फरक आहे. या मध्ययुगांतील कथांत स्त्रीवर्गाच्या सौदर्याची आणि गुणांची जी स्तुति व तरफदारी केलेली दिसते ती उत्तर यूरोपांतील ट्युटानिक लोकांच्या परंपरागत प्रवृत्तीनें दक्षिण यूरोपांतील लोकांत प्रेरित झालेली दिसते.

''हिंदुस्थानांतील कल्पित कथांमध्यें दुसरा एक महत्त्वाचा दोष दिसून येतो तो हा कीं, त्यांत ठकबाजीनें प्रतिपक्षाचा पाडाव करण्याच्या रीतीला उघड उघड उत्तेजन दिलेलें असतें. हिंदूंचें अखिल राष्ट्रच कोल्ह्याप्रमाणें लुच्चेगिरीचें आचरण करण्यांत पौढी मिरवितें. लुच्चेगिरी, ठकबाजी करणें हें हलकेपणाचें निंद्य-कर्म आहे असें लोकांना पटल्याशिवाय हिंदु राष्ट्राची सदसद्विवेकबुद्धि खरी सुधारली आहे असें म्हणतां येणार नाहीं. पंचतंत्रामध्यें वर सांगितलेल्या प्रकारच्या आक्षेपार्ह कथा पुष्कळ आहेत व त्या काढून टाकल्याशिवाय पंचतंत्र हें पुस्तक शाळेंत विद्यार्थ्यांना शिकविणें योग्य होणार नाहीं.''

कथाचिंतामणि हें कल्पित कथांचें पुस्तक फार लोकप्रिय आहे. नरसिंगरायर याचा सुप्रसिद्ध दिवाण अप्पाजी याच्या संबंधींच्या या कथा आहेत. महाभारतवाचनम् हें महाभारताचें तामिळ भाषेंत गद्यात्मक भाषांतर आहे. सबंध ग्रंथाची किंमत १५ रूपये असून त्याचे निरनिराळे भागहि विकत मिळतात. उदा:- महाभारत, आदिपर्वंवाचनम्, महाभारत सभापर्वंवाचनम्, महाभारत विराटपर्वंवाचनम् वगैरे. नलचक्करवर्ती (नलदमयंतीची कथा), पुरुरवचक्करर्तीकतै ( पुरुरवा राजाची कथा), रामायणवाचनम्, रामायणउत्तरकांडम्, अश्वमेधपर्वम् (महाभारतांतील अश्वमेधासंबंधी कथा), कमरजनकनै (कामदेवासंबंधीची कथा), वगैरे कथांची पुस्तकें संस्कृत पुराणांच्या आधारानें तयार केलेलीं आहेत. याशिवाय अरेबियन नाइट्स, हितोपदेश, पंचतंत्र, पार्शियन कथा वगैरे गोष्टींच्या पुस्तकांच्या आधारें तामिळ भाषेंत पुस्तकें झाली आहेत.

मुसलमानांनी लिहिलेले तामिळग्रंथ - तामिळ मुसुलमानांच्या संख्येच्या मानानें त्यांनी लिहिलेले ग्रंथ बरेच आहेत. त्यांचे बरेचसे ग्रंथ धर्मविषयक आहेत. कुराणाचें मात्र तामिळ भाषेंत भांषातर केलेलें नाही., कारण तसें करणें पाप आहे अशी त्यांची समजूत आहे. तामिळ मुसुलमानांनी लिहिलेल्या ग्रंथांत हिंदुस्थानी शब्द बरेच असतात. आइर्मसल या ग्रंथात जगाची उत्पत्ति स्वर्ग, नरक, सप्‍तलोक, जीझसचें आगमन, महंमद वगैरेसंबंधीची माहितीं आहे. सिरकीर्तनम् या ग्रंथात महंमद पैगंबराची हकीकत असून अनेक अद्भुत चमत्कारांच्या गोष्टी दिल्या आहेत. पेनपुत्तिमलई या पुस्तकांत स्त्रियांना नित्युपदेश केलेला आहे. वैत्तियरातकम् यामध्यें वैद्यकासंबंधीं माहिती आहे, व ती आर्यवैद्यक पद्धतीप्रमाणें दिली आहे.

तामिल वाङ्‌मय व ब्रिटिश काल.- ब्रिटिश राज्य प्रथम तामिळ मुलखांत सुरू झाले. त्यामुळें तामिल वाङ्‌मयाच्या अर्वाचीन काळास जरा अगोदर सुरूवात होणें स्वाभाविक आहे तथापि त्याचा परिणाम एवढाच झालेला दिसतो कीं तामिळमध्यें ख्रिस्ती वाङ्‌मय बरेचसे झालेले आहे. पण हें उत्तेजन सर्व तामिळ राष्ट्रावर परिणामकारी झालें नाहीं. खरी तामिळ वाङ्‌मयाच्या वाढीस सुरवात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तारांर्धात झाली. इ.स. १८५३ सालापर्यंत मराठी भाषेचा पगडा तामिळ मुलुखांत होता. तालुक्याच्या दप्‍तराची भाषा तामिळ व जिल्ह्याच्या दप्‍तराची भाषा मराठी व लिपी मोडी अशी स्थिति होती. यावेळेस माघ्व मंडळी विशेषेंकरून मराठी शिकत. ते महाराष्ट्रीय ब्राह्मणांच्याकडे शार्गीदपणा करीत आणि त्यांच्या मार्फतच दप्‍तरीं प्रविष्ट होत. पूर्वी तामिळ ब्राह्मण सरकारीं नोकरीत थोडेच होते. सरकारी कारकुनी खालच्या प्रतीची, ती मुदलियारांनी करावी आणि वरच्या प्रकारची महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी करावी अशी त्यावेळी स्थिति होती. १८५३ सालीं मराठी बंद होऊन जिल्ह्यांतून तामिळ सुरू भाषा झाली. तेव्हा तामिळ ब्राह्मणच पुढें अधिक सरसावले. मद्रास युनिव्हर्सिटी १८५७ सालीं स्थापन झाली. तिच्या योगानें तामिळ ब्राह्मणांचाहि राजव्यवहारांत प्रवेश वाढत गेला. कुंभकोणम् येथें एक कॉलेज स्थापन झालें, तेथें अगोदर संस्कृत विद्या वास करीत होतीच, पण तेथें कॉलेज स्थापन झाल्यानंतर जो वर्ग केवळ संस्कृत विद्येकडे जावयाचा तो इंग्रजी विद्येकडे वळून त्याचाहि राजदरबारांत अधिकाधिक प्रवेश झाला. युनिव्हर्सिटीची तामिळ भाषेवर पुढील परिणामकारी गोष्ट म्हणजे तामिळ भाषेचा अभ्यास युनिव्हर्सिटीनें ती दुय्यम भाषा म्हणून मान्य करून वाढविला ही होय.

तामिळ भाषेंचें प्रथमत: अभ्यासग्रंथ म्हणून महत्त्व पावलेलें पुस्तक म्हटलें म्हणजे प्रताप मुदलियार याचें आत्मचरित्र होय. हे चरित्र फार साध्या भाषेंत लिहिलें गेलें असल्यामुळें बरेचसें लोकप्रिय झालें होतें.  हा प्रताप मुदलियार ईस्टइंडिया कंपनींत कारकून होता आणि यांत अव्वल इंग्रजीच्या व जुन्या हिंदु रहाणीच्या गोष्टी आल्यामुळें हें तामिळ भाषेच्या यूरोपीय अभ्यासकांसहि आकर्षक झालें आहे व मुलकी परीक्षांसाठी अभ्यासपुस्तक म्हणून हेंच नेमलें जाई.

आजच्या तामिळ वाङ्‌मयाचें महत्त्व अखिल भारतीय महत्त्वाच्या दृष्टीनेंहि थोडेंच आहे. नाटकें, कादंबर्‍या, काव्यें, क्रमिक पुस्तकें, शालोपयोगी पुस्तकें, शास्त्रविषयक अत्यंत प्राथमिक स्वरूपाचीं पुस्तकें, ख्रिस्ती पुस्तकें, संस्कृत धार्मिक ग्रंथाचीं भांषातरें, हीं सर्व तामिळमध्यें झालीं आहेत. तथापि यांमध्यें महत्त्वाचीं पुस्तकें नाहींत म्हटलें तरी चालेल. कांदबर्‍यांमध्यें रेनाल्डच्या कांदबर्‍यांचीं भाषांतरे तर सपाटून आहेत. ऐतिहासिक कांदबर्‍याहि कांही झाल्या आहेत. एक महाराणा प्रतापसिंहावर, एक पद्मीनीवर, व एक तशीच विजयनगरच्या विनाशावर कांदबरी आहे. पी. संबंधम् मुदलियार हायकोर्ट वकील हे कादंबरीकार म्हणून पुढें आलेले गृहस्थ आहेत. तसेंच डिटेक्टिव्ह कांदबर्‍यांचा सुळसुळाट पुष्कळच आहे. आजचें कांदबरीवाङ्‌मय मराठी कांदबरी वाङ्‌मयापेक्षां कमी योग्यतेचें आहे असें तेथील महाराष्ट्रभाषापरिचित लोकांचें मत आहे.

नाटकें तामिळमध्यें होत आहेत. तामिळ मंडळी आपल्या इतकीच नाटकांची शोकी आहे. तेथें नाटककंपन्यात स्त्रिया देखील शिरत आहेत. अर्थात् या सर्व देवदासी वर्गातल्याच आहेत. तथापि देवदासी या वर्गास एक निराळा धंदा करावयास मिळाला म्हणून हीहि एक महत्त्वाची प्रगतीचीच गोष्ट म्हटली पाहिजे. नाटक कंपनीकडे महाराष्ट्रापेक्षां तामिळनाडूंत अधिक भांडवल घातलें जातें. सध्या तेथील प्रमुख नाटक कंपन्यांमध्यें ''कन्नया'' च्या नाटक मंडळीचें नाव देतां येईल. नाटकें संगीत आहेत तशीं गद्यहि आहेत. ऐतिहासिक संगीत नाटकांत व्ही. जी. सूर्यनारायणराव शास्त्री यांचे ''मनविजयं'' व बहादूर पी. सुंदर पिले यांचे ''मनोन्मणीयं'' यांनी नांवे देतां येतील. मनोन्मणीयं याचें संविधानक बरेचसें शांकुतलाच्या धर्तीवर आहे.

अर्वाचीन तामिळ वाङ्‌मयावरून तामिळ जनतेचें बुद्धिमर्यादेचें चित्र रंगवतां येणार नाही. कांकी इतर भागांपेक्षां तामिळ नाडूमध्यें इंग्रजी भाषेचा प्रवेश अधिक झाला आहे व प्राथमिक शाळांतून देखील इंग्रजी भाषेंचें शिक्षण देतात. मुंबई कलकत्त्यासारख्या शहरांत हिंदुस्थानीला जें प्रामुख्य येते तें मद्रासला इंग्रजी भाषेंत आहे. गाडीवाले, रिक्षावाले, बूट दुरूस्त करणारे, मोची, शिंपी या सर्वामध्यें इंग्रजीचा प्रचार अधिक झाला आहे आणि सर्व हिंदुस्थानांत इंग्रजी पुस्तकांचे मद्रास हेंच मुख्य मुद्रणस्थान झालें आहे. यामुळें तामिळ भाषेंतील ग्रंथसंपत्तीकडे फारसें लक्ष गेलें नाहीं व तामिळ लोकांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकलेखांहून तामिळ पुस्तकलेखांची योग्यता कमी आहे. निरनिराळ्या हिंदुस्थानाच्या भागांतील इंग्रजी पत्रांसाठीं मद्रासहून लेखक आणले जातात. खुद्द मद्रासमध्यें देशीं लोकांनी चालविलेल्या इंग्रजी पत्रांचेंच महत्त्व अधिक आहे. तामिळ दैनिक स्वराज्य, स्वदेशमित्र वगैरे आहेतच. नॉनकोआपरेशनवाल्यांचें मुख्य मुखपत्र म्हटलें म्हणजे देशभक्त होय. तामिळमध्यें चांगल्या मासिकांचेहि दुर्भिक्ष्यच आहेत. तामिळांचे एका काळी अत्यंत प्रसिद्ध असलेलें पण सध्यां दिवंगत झालेलें मासिक म्हटलें म्हणजे ''विवेकचिंतामणिं'' हे होय. सध्या थोडे पुढें आलेलें मासिक म्हटलें म्हणजे ''विवेकबोधिनी'' होय. याचें स्थूलपणें स्वरूप मनोरंजनासारखें आहे. आतां मोठ्या काव्याचें उत्पादन जवळ जवळ नाहिंसें होऊन तुटक स्फुट कविता बरीच वाढूं लागली आहे. व ती मासिकांत बरीच दृष्टीस पडते. गणपतीच्या मेळ्यांत ज्याप्रमाणें जोरदार गाण्यांस अवकाश सांपडतो त्याप्रमाणें तेथेंहि अनेक उत्सांवात व मेळ्यांत सांपडतो. या प्रंसगी जीं जोरदार ''राष्ट्रीय'' गाणीं म्हटलीं जातात त्यांत सुब्रह्मण्य भारती ब्यारिस्टार यांच्या गाण्यांचा उल्लेख केला पाहिजे. हा कवि विनायकराव सावरकरांच्या व चिदंबरम् पिल्लेच्या संगतींतला म्हणून प्रख्यात आहेत. जुन्या कवींची म्हणजे भाटांची परंपरा अजून नष्ट झाली नाहीं. अनेक मोठ्या जमीनदारांस ''पुलवर'' नांवानें प्रसिद्ध असलेले गायक ठेवावे लागतात व त्यांच्या या हक्कास थोडीशी सरकारकडूनहि मान्यता मिळाली आहे.

तमिळभाषेंतील ख्रिस्ती धर्म-ग्रंथ.— असले धर्मग्रंथ देश्य भाषांत तयार करण्याचें काम प्रॉटेस्टंट व रोमन कॅथॉलिक या दोन्ही ख्रिस्ती धर्मपंथांच्या लोकांनी केलें आहे. त्यांपैकी प्रॉटेस्टंट लोकांच्या कामगिरीची हकीकत प्रथम दिली आहे. हिंदुस्थानांतील सर्व भाषांपैकी प्रथमत: तामिळ भाषेंत बायबलचें भाषांतर झालें. स. १६८८ मध्यें सिलोनमध्यें राहणार्‍या डच लोंकानीं बायबलच्या उत्तारार्धांचें ( न्यू टेस्टॅमेंट ) भाषांतर सुरू केलें आणि स. १६९४ मध्यें पूर्वार्धाचें (ओल्ड टेस्टॅमेंटचें) सुरू केलें. पाहिले प्रॉटेस्टंटपंथी मिशनरी १७०६ मध्यें हिंदुस्थानांतील ट्रंक्वीबार बंदरी उतरले. त्यांच्यापैकी झीगेनबल्ग यानें न्यू टेस्टॅमेटचें भाषांतर तामिळमध्यें सुरू केलें. तें १७११ सालीं पुरें झालें. त्याच सालीं छापण्याचें यंत्र हिंदुस्थानांत येऊन १७१५ सालीं या भाषांतराची पहिली आवृत्ति प्रसिद्ध झाली. स. १७१३ मध्यें झीगेनबल्गनेंच ओल्ड टेस्टॅमेंटचें भाषांतर सुरू केलें व तें दोघातिघांच्या मदतीनें स. १७२८ मध्यें पुरें झालें. स. १७२४ मध्यें ख्रिस्ती सूक्तें (साम्स) यांचे एक पुस्तक छापलें गेले. यानंतर मद्रास ऑग्झिलिअरी-बायबल सोसायटी, जॉफना ऑग्झिलिअरी बायबल सोसायटी व दुसर्‍या कित्येक मिशनरी सोसायट्यांनीं बायबलच्या सुधारलेल्या आवृत्या छापून प्रसिद्ध केल्या.  स. १८२९ मध्यें छापलेल्या तामिळ भाषेंतील बायबलचें पांच मोठाले व्हॉल्यूम्स तयार झाले होते.  स. १८३१ मध्यें लहान टाइप वापरून संपूर्ण न्यू टेस्टॅमेंट एका भागांत प्रसिद्ध करण्यांत आलें.  स. १८४० मध्यें संपूर्ण बायबल एका भागांत प्रसिद्ध करण्यांत आलें.  स. १८५८ मध्यें अमेरिकन मिशन प्रेसनें अगदीं लहान टाइप वापरून संपूर्ण बायबलची अगदीं लहान आकाराची प्रत प्रसिद्ध केली.  इंग्लिश बुक ऑफ कॉमन प्रेअर याचें डॉ. रॉल्फरनें भाषांतर स. १८१९ मध्यें, दी लेडीज तामिळ बुक याचें भाषांतर डॉ. ईफ्रुलसें स. १८५९ मध्यें डच रिफॉर्म लिटर्जी याचें भाषांतर रेव्हरंड डॉ. एच्.एम. स्कूडरनें स. १८६२ मध्यें, प्रेअर्स फॉर फॅमीलीज याचें भाषांतर १८२८ सालीं प्रसिद्ध झालें. जर्मन भाषेंतील व इंग्लिश भाषेंतील ख्रिस्ती सामांची भाषांतरे बरींच प्रसिद्ध झालीं पण पाश्चात्य संगीत चालींची ही भाषांतरें तामिळी लोकांना पंसत पडलीं नाहीत. म्हणून तामिळी संगीत चालीवर ख्रिस्ती गाणीं तयार करण्यांत आली. पण असल्या गाण्यांचा सार्वजनिक प्रार्थनेमध्यें उपयोग करण्याला पुष्कळ मिशनर्‍यांनी प्रथम विरोध केला. देश्य वृत्तांतील ख्रिस्ती गाणी सुरू करण्याचा उपक्रम प्रथम अमेरिका-मदुरा मिशनच्या रेव्हरंड इ. वेबनें केला.  तंजावर येथील वेथनयगशास्त्री या ख्रिस्ती झालेल्या कवीनें सार्वजनिक प्रार्थनेला योग्य अशीं बरींच ख्रिस्ती गाणीं तयार केली. हीं देश्य वृत्तांतलीं गाणीं पुस्तकरूपानें स.१८५३ मध्यें प्रसिद्ध झाली. तीं इतकी लोकप्रिय झाली कीं असल्या गाण्यांचा मोठा संग्रह प्रसिद्ध करण्याचें वेबरनें ठरविले; व असलीं गाणीं तयार करण्याला उत्तेजन म्हणून बक्षिसेंहि लाविलीं. असल्या २८१ गाण्यांचा ग्रंथ स. १८६० मध्ये ' ख्रिश्चन व्हर्न्याक्यूलर एज्युकेशन सोसायटी' नें प्रसिद्ध केला.  त्याची १५०० प्रतीची पहिली आवृत्ति लवकरच खपल्यामुळें २००० प्रतींची दुसरी आवृत्ती १८६४ सालीं काढण्यांत आली.

' दि वे टु साल्वेशन' याचें भाषांतर ट्रांक्विबार येथें १७४७ सालीं, आर्ट्स टू ख्रिश्च्यानिटी याचें भाषांतर १७५० सालीं दी पिलग्रीम्स प्रोग्रेसचें भाषांतर १७९३ सालीं, बोगात्स्कीच्या गोल्डन ट्रेझरीचें भाषांतर १८०० सालीं प्रसिद्ध झालें. सन १८५० नंतर ख्रिस्ती धर्मासंबंधाच्या निरनिराळ्या विषयांवर पुष्कळ ग्रंथ् प्रसिद्ध झाले आहेत. धर्मप्रसाराचें काम सुलभ होण्याकरितां ख्रिस्ती मिशनर्‍यांनीं धर्मविषयक लहान लहान पुस्तकें प्रसिद्ध करण्याचें काम सुरू केलें. अशा प्रकारच्या पुस्तकांतील मजकूर स्थानिक लोकांची मनोरचना लक्षांत घेऊन लिहिलेला असतो आणि आकार लहान व किंमत थोडी यामुळें असल्या पुस्तकांचा प्रसार थोड्या शिकलेल्या व गरीबगुरीब लोकांत फार होतो. ही गोष्ट लक्षांत घेऊन असली लघुधर्मपुस्तकें लिहिण्याचा उपक्रम झीगेनबल्गनें १७१३ सालीं केला. त्यानें आपलें पुस्तक तामिळ भाषेंत तामिळ लोकांना उद्देशून लिहिलेल्या पत्राच्या स्वरूपांत तयार केलें होतें. अशा पुस्तकांच्या प्रसारासंबंधानें जॉफना येथील रेव्हरंड एल्. स्पॉल्डिंग म्हणतों:- '' स. १८२० मधील अशा पुस्तकांच्या प्रसारासंबंधींच्या जॉफना येथील गोष्टी मला आठवतात. त्या काळांतील सर्व मिशनरी लोकांची अशी पद्धत असे कीं दररोज संध्याकाळी ४ वाजल्यापासून सूर्यास्तापर्यत खेडेगांवातील लोकांच्या घरोघर जावयाचें व त्यांच्याशी गप्पागोष्टी बोलत त्यांच्यामध्यें लघुधर्मपुस्तकांचा प्रसार करावयाचा. स्वतः मी असल्या तर्‍हेचीं शंभर पुस्तकें थोडक्याच दिवसांत खपविलीं. त्यावेळीं जाफना मिशनमध्यें अमेरिकेहून आलेल्या प्रिंटरला सिलोनच्या गव्हर्नरनें तें बेट सोडून जाण्याचा हुकूम केला. तेव्हां हस्तलिखित लघुधर्मपुस्तकें आम्हीं तयार करविलीं. त्या कामाकरितां चांगलें हस्ताक्षर असलेल्या शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा आह्मी उपयोग करीत होतों, व त्यांना चार पानें लिहिण्याबद्दल एक पैसा मजुरी देत होतों. अशीं लघुधर्मपुस्तके प्रसिद्ध करणार्‍या मद्रास रिलिजस ट्रॅक्ट सोसायटी (स्थापना १८१८),तिनेवेल्ली ट्रॅक्ट सोसायटी (१८२२), साउथ त्रावणकोर ट्रॅक्ट सोसायटी (१८५५), नेयूर ट्रॅक्ट सोसायटी, जॉफना ट्रॅक्ट सोसायटी (१८२३), तंजावर ट्रॅक्ट सोसायटी वगैरे अनेक सोसायट्या स्थापन होऊन त्यांनी ग्रंथप्रकाशनाचें काम पुष्कळ केलें आहे.

रोमनकॅथॉलिपंथाचे ग्रंथ.— रोमन कॅथॉलिक मिशनरी, पोर्तुगीज भूसंशोधकांबरोबर प्रथम हिंदुस्थानांत आले व त्यांनीं धर्मप्रसाराच्या कामास जोरानें सुरवात केली. रोमन कॅथोलिक मिशनचा तामिळ देशांतील आद्य संस्थापक झेवियर हा होय. रॉबर्ट डी नोबिली नांवाचा मिशनरी मदुरा येथें स.१६०६ मध्यें आला. त्याला संस्कृत व तामिळ या दोन्ही भाषा येत होत्या; त्यानें पुष्कळ पुस्तकें तामिळ भाषेंत लिहिली. त्याचें तामिळ लोकांनी तत्तुव पोटकर (खरा शिक्षक) असें नांव ठेविलें होतें. त्यानें निनोपतेस कंदम (आध्यात्मिक उपदेशाचें पुस्तक), मंत्तिर वियकेक्वियनम (प्रार्थनांचें स्पष्टीकरण), अत्तुम निरनयम (आत्म्याच्या अस्तित्वाचीं प्रमाणें), सत्यवेतलसनम (खर्‍या वेदाचें लक्षण), सकुननिवरनम् (शकुनांचें निवारण), कदकुल निरूनयम् (ईश्वराच्या अस्तित्वाचीं प्रमाणें), पुनर्जेन्म अत्तछेपम् (आत्माच्या पुनर्जन्मविषयक सिद्धान्तावर आक्षेप), नित्तियसिवनसल्लपम् (अमर्त्यत्वाबद्दल संभाषण), सेसुनतर सरित्तिरम् (जीजस ख्राइस्टचा इतिहास), ग्रॅनतिपिकेयी (ज्ञानाचा दिप), नीतिस्सोल (ह्मणी), वगैरे पुस्तकें तामिळ भाषेंत लिहिलीं.

रेव्हरंड सीजबेसची हा जेसट मिशनरी १७ व्या शतकाच्या आरंभी हिंदुस्थानांत आला. त्यानें तामिळ भाषेंचा व वाङ्‌मयाचा अभ्यास केला इतकेंच नव्हे तर खाणेपिणे पोषाक वगैरे बाबतींतहि त्यानें तामिळ लोकांची पद्धति उचलली आणि हिंदू लोकांच्या गुरूप्रमाणें मोठा भपकेदार देखावा केला. बोटांत आंगठ्या घालून तो पांढर्‍या घोड्यावर बसून किंवा पालखीमध्यें बसून प्रवास करीत असे. त्याच्या डोक्यावर रेशमी छत्री धरण्यास माणूस असें. तो वाघाच्या कातड्यावर बसत असे. इ.स. १७३६ मध्यें त्याला एका संस्थानांत दिवाणहि नेमण्यांत आलें होतें. मदुरा कॉलेजनें बेसचीला वारमामुनी अशी पदवी दिली होती. त्यानें तरूण तामिळी लोकांत शिक्षणाचा प्रसार पुष्कळ केला व गरीब विद्यार्थ्यानां पुष्कळ मदत केली व शिकलेल्या इसमांनां त्यांच्या योग्यतेनुसार नोकर्‍या मिळवून दिल्या. बेसची हा खंदा लेखक होता. त्यानें एकंदर तेवीस ग्रंथ लिहिले असें म्हणतात. त्यांची नांवे:- वेदांचे तेज, लूथर, न कोमेजणारी माला, मधुर माला वगैरे. पाँदेचरी येथें रोमन कॅथॉलिक प्रेसनें छापण्याचें काम १८४० सालीं सुरू करून पुष्कळ ग्रंथ प्रसिद्ध केले.

शाळांतील क्रमिकपुस्तकें.— शाळांमध्ये लेखन व वाचन एकदम शिकवण्यांत येतें. चांगला दिवस पाहून मुलाला शाळेंत घालतात. त्याला प्रथम मूळाक्षरें शिकवितात. नंतर अत्तिसुदी शिकवितात. या पुस्तकांतील विषयाचा अर्थ मुलांना मुळींच समजत नाहीं व बर्‍याचशा शिक्षकांनांहि समजत नाहीं. या पुस्तकांतील कोणत्याहि धड्याचा अर्थ समजावून सांगत नाहींत. मुलांनीं फक्त तें पुस्तक घोकून पाठ करावें अशी पद्धत आहे. गणित हा विषय हिंदुस्थानांत सर्वत्र फार लोकप्रिय आहे. पण गणित शिकण्याचा मुख्य उद्देश बाजारांतल्या देवघेवीचे हिशोब मुलांनां नीट करतां यावेत हा असतो. त्यामुळें अंकगणितांतील ह्या विषयासंबंधाचीं प्रकरणेंच शिकवितात. अलीकडे यूरोपीय शिक्षणपद्धतीवर चाललेल्या शाळांमध्ये बीजगणित, भूमिति, त्रिकोणमिति वगैरे निरूपयोगी गणिताच्या शाखांकडे विशेष लक्ष देऊन रोजच्या व्यवहारांत विशेष उपयोगी पडणार्‍या  अंकगणिताकडे दुर्लक्ष केलें जातें अशीं सामान्य लोकांची तक्रार आहे. प्राथमिक शाळांमध्यें उजळणी पाठ करून घेण्याकडे विशेष कटाक्ष असे.  दररोज सकाळसंध्याकाळ मुलांनां एका ओळींत उभे केल्यावर एक विद्यार्थी प्रथम उजळणी सांगतो व नंतर इतर मुलें अगदीं मोठ्या आवाजांत तो भाग (पर्वचा) म्हणतात.

प्रथम क्रमिक पुस्तकें त्रांक्कीबार व इतर ठिकाणच्या मिशनर्‍यांनीं स्वतःच्या ताब्यांतील शाळांकरितां तयार केली. १८१७ सालीं कलकत्ता स्कूलबुक्स सोसायटी स्थापन झाली व त्यानंतर लवकरच तसली एक सोसायटी मद्रास येथें स्थापन झाली. तथापि मद्रासची सोसायटी बरींच वर्षे केवळ नांवाला अस्तित्वांत होती.  पुढें स. १७५० च्या सुमारास ही सोसायटी पुन्हां जोमानें कार्यप्रवृत्त होऊन तिनें ठरविलेल्या विषयांवर उत्तमोत्तम पुस्तके लिहिणारांना बक्षिसे देऊं केलीं. यामुळें अनेक विषयांवर चांगली क्रमिक पुस्तकें निर्माण झालीं. त्यापैकींच एच्. मॉरिशी याचें हिस्टरी ऑफ इंडिया हें पुस्तक होय. मिशनर्‍यांच्या शाळेंत शिकविण्याकरितां कांहीं ख्रिस्ती धर्मपर पुस्तकें मद्रास ट्रॅक्ट सोसायटीच्या कमिटीनें तयार केलीं. १७५४ सालीं साउथ इंडिया ख्रिश्चियन स्कुलबुक्स सोसायटी स्थापन झाली पण पुढें ती सोसायटी १८५९ सालीं स्थापन झालेल्या ख्रिश्चन व्हर्न्याक्युलर एज्युकेशन सोसायटीच्या मद्रास शाखेमध्यें समाविष्ट झाली. ब्रिटिश सरकारचें पब्लिक इनस्ट्रक्षन डिपार्टमेंट स्थापन झाल्यावर सरकारी शाळांकरितां क्रमिक पुस्तकांचा पुरवठा करणारी दुसरी एक संस्था अस्तित्वांत आली. अशा रीतीनें तामिळ भाषा व व्याकरण, भूगोल, हिंदुस्थानचा व इंग्लंडचा इतिहास, अंकगणित, बीजगणित, भूमिती वगैरे विषयांवर तामिळ भाषेंत क्रमिक पुस्तकें तयार झालीं.

क्रमिक पुस्तकांपैकीं हिदुस्थानचा इतिहास लिहितांना एक महत्त्वाची अडचण उत्पन्न होते ती तमिळ किंवा द्राविडी लोकांच्या प्राचीन इतिहासलेखानासंबंधीची. यासंबंधी कॉल्डवेल म्हणतो, ''तामिळ किंवा द्रविडी लोक मूळ कोणत्या मानववंशातले आहेत. यासंबधानें हिंदु समाजांतहि कोणत्याहि वर्गाला कांही एक माहिती नाहीं, तसेंच संस्कृत वाङ्‌मय किंवा द्राविडी भाषांचे वाङ्‌मय यांमध्येंहि या विषयासंबंधाने कोणतीहि ऐतिहासिक माहिती किंवा नुसत्या दंतकथाहि दिलेल्या नाहींत; ही एक लक्षांत घेण्यासारखी गोष्ट आहे. तामिळ लोक दगडांच्या राशींनां (या राशी थडग्यांच्या चिन्हदर्शक असतात) पांडुकुरी असें म्हणतात. कुरी म्हणजे खड्डा आणि पांडु म्हणजे महाभारतांतील पांच पांडव. कोणतेंहि कृत्य पांडवांनी केलेलें आहें असें म्हणणें म्हणजे त्यासंबंधानें कांहींच माहिती नाहीं असें म्हणण्यासारखें आहे. एखादी इमारत पांडवांनीं बाधलेली आहे याचा अर्थ एवढाच कीं ती फार प्राचीनकाळीं बांधलेली आहे आणि ती कोणत्या लोकांनी बांधली तें माहीत नाहीं. 'पांडुकरी' कुणी बांधल्या असा प्रश्न केल्यास त्या फार पूर्वी येथें रहाणार्‍या लोकांनीं बांधल्या असे तामिळ लोक सांगतात. पण हे प्राचीन लोक तामिळांचेच वंशज होते किंवा दुसर्‍या एखाद्या परकी वंशाचे लोक होते हें तामिळ लोकांना सांगता येत नाहीं. सदाहू प्रश्नास एखाद्या वेळीं असेंहि उत्तर देण्यांत येतें की, थडगीं फार प्राचीनकाळीं रहाणार्‍या एका ठेंगू (ड्वार्फ) जातीच्या लोकांनी बांधलीं. हे लोक एक हातभर उंच असूनहि त्यांच्या अंगी राक्षसासारखी शक्ति होती.''

प्राचीन इतिहासासंबंधींच्या तामिळ लोकांच्या कल्पना रामायण व महाभारत या ग्रंथांवरूनच मुख्यत: बनल्या आहेत. कॉल्डवेल याला शिलालेखावरून जो पुरावा मिळालेला आहे त्यावरून तो म्हणतो कीं, मदुरा येथील राजांची कर्णमधुर अशीं जीं संस्कृत नांवे आढळतात तीं सर्व काल्पनिक असलीं पाहिजेत. तामिळ लोकांचा प्राचीन इतिहास समजण्याकरितां मद्रास इल्याख्यांत सांपडणारे सर्व ठिकाणचे शिलालेख एकत्र करून त्यांचा ऐतिहासिक दृष्ट्या अभ्यास व्हावयास पाहिजे. शिलालेखांतील माहिती हाच प्राचीन इतिहासाची इमारत उभारण्यास खरा विश्वसनीय आधार होय.

मासिकें.— १८६५ च्या सुमारास तामिळ भाषेंमध्यें बारा मासिकें प्रसिद्ध होत होतीं. त्यापैकीं दोन खेरीज बाकीचीं ख्रिस्ती लोकांनी चालविलेलीं होतीं. हिंदुस्थानांत सुरू झालेलें अगदीं पहिलें मासिक ''तामिळ मॅगेझीन'' हें असावें असें वाटतें. तें स. १८३१ मध्यें मद्रास रिलिजस ट्रॅक्ट सोसायटीनें सुरू केलें. पण वरचेवर संपादक बदलल्यामुळें त्याला सुस्थिति प्राप्‍त झाली नाही. शिवाय ख्रिस्ती धर्मविषयक लांबलांब धर्मोपदेश (सरमनस) त्या मासिकांत प्रसिद्ध होत असल्यामुळें त्याच्या खपावर बराच अनिष्ट परिणाम झाला. स. १८४६ मध्यें त्या मासिकाला पाक्षिक बनवून दि ट्रूथफुल मेसेंजर या नांवाचे मासिक सुरू करण्याचें ठरलें, पण तेंहि सहा महिन्यानंतर बंद पडलें. हल्लीं हयात असलेल्या तामिळ मासिकामध्यें मिशनरी ग्लीनर हें नागेर कॉईल येथें छापलें जाणारें आणि फ्रेंडली इन्स्ट्रक्टर हें पालंकोटा येथें निघणारें हीं दोन मासिकें सर्वात जुनी आहेत. मिशनरी ग्लीनर हें मासिक स. १८४० च्या सुमारास सुरू झालेलें असून मिशनरी कार्यांचे वृत्ता देणें हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. स.१८५४ मध्यें दि तामिळ क्वार्टर्ली रिपॉझिटरी या नांवाचे मासिक अमेरिकन-मदुरा मिशननें रेव्हरंड. ई. वेब याच्या संपादकत्वाखालीं सुरू केलें. याचा उद्देश मिशनच्या एजंटांनां अभ्यासाकरितां लागणारीं पुस्तके हप्‍त्याहप्‍त्यानें प्रसिद्ध करणें हा होता. तदनुसार चर्चचा इतिहास, भौतिकतत्वज्ञान वगैरे विषयांवर लेख प्रसिद्ध झाले. पुढें ही योजना गैरसोईची वाटल्यावरून एकेक स्वंतत्र पुस्तकच प्रसिद्ध करण्याचें मिशनंने ठरविलें. स. १८६१ मध्यें ख्रिश्चन व्हर्न्याक्युलर एज्युकेशन सोसायटीनें देशोपकारी या नांवाचे सचित्र मासिक सुरू केलें व तें हिंदू लोकांच्याहि वाचनांत येईल असें धोरण राखलें. त्याचा संपादक रेव्हरंड एफ्. बेलीस हा होता. याच्या या मासिकाच्या सुमारें एक हजार प्रती खपत असत. पण मुख्यत: त्याचा खप ख्रिस्ती लोकांतच होत असे. मद्रास येथील फ्री चर्च मिशनचा रेव्हरंड आर.एम्.बाबू यानें दी लँप ऑफ लाइट या नांवाचें मासिक बरींच वर्षे चालविलें. त्याचा मुख्य खप मद्रास शहरांतच असे. हिंदूमध्यें धार्मिक ज्ञानाचा प्रसार करणें हा त्याचा मुख्य उद्देश असे. स.१८६३ मध्यें दि साऊथ त्रावणकोर ख्रिश्चन मेसेंजर या नांवाचे पत्र नॉगेर कॉईल येथें सुरू झालें. त्यामध्यें लहान लहान पण खोंचदार लेख असत. स.१८६३ मध्येंच लुथेरन मिशननें अरूणोदयम् नांवाचें मासिक सुरू केलें. मद्रास शहरांत स. १८६५ मध्यें अमिर्थवचनी नांवाचे सचित्र मासिक हिंदु स्त्रियांकरितां सुरू करण्यांत आलें. त्यांत लेख लिहिणार्‍या मुख्यत: नेटिव्ह ख्रिस्ती स्त्रियाच असत.

वरील सर्व मासिकें मोठ्या माणसांकरितां आहेत पण केवळ लहान मुलांकरितां म्हणून स्वतंत्र मासिकें निघतात. बालदीपिकै नांवाचें त्रैमासिक स. १८४० मध्यें नॉगेर कॉईल येथे सुरू होऊन बरींच वर्षे चाललें. पण तें स. १८५२ त बंद झालें. शिरूपीलैन नेसतोलन (मुलांचा मित्र) या नांवाचें दुसरें एक त्रैमासिक मुलांकरितां स. १८४९ मध्यें पालंकोटा येथें सुरू झालें व अनेक वर्षे चालू राहिलें. १८५८ सालीं साउथ इंडियन ख्रिश्चन स्कूलबुक्स सोसायटीचें मिशन स्कूल मॅगेझिन आणि त्याच्या पुढल्या वर्षी जाफना येथें पालियर्नेसन नांवाचें मासिक सुरू झालें. स. १८६५ सुमारास फक्त दोन मासिकें हिंदू लोकांनीं चालविलीं होतीं.  त्यांपैकीं एक मद्रास वेद समजाचें वत्तुवबोधिनी हें एक होय.  या मासिकांत धार्मिक प्रश्नींची चर्चा करतांना मतभेद इतकें माजले कीं लवकरच तें मासिक विक्रीला निघालें.  तेव्हां एका सभासदानें तें विकत घेऊन त्यांत फक्त सामाजिक सुधारणा व वाङ्‌मय या विषयांवरच लेख मुख्यत: देण्याचें ठरविले. यामुळें १८६५ साली विवेक विलक्कम् या नांवाचें दुसरें मासिक निघून त्यांत धार्मिक विषयांचीहि चर्चा येऊं लागली.

वृत्तपत्रे.— आरंभी सुमारें २५ वर्षे वयाच्या तामिळ लोकांनी कित्येक तामिळ वृत्तापत्रें एकामागून एक सुरू केलीं. पण तीं थोडथोडा काळ टिकून बंद पडत गेलीं. १८५५ सालीं रेव्हरंड पी. पर्सिव्हलनें तिनवर्तमणी नांवाचें तामिळ साप्ताहिक सुरू केले. त्याची वार्षिक वर्गणी मद्रासमध्यें नेटिव्हांना ३ रूपये, यूरोपियनांनां पांच रुपये आणि बाहेरगांवच्या लोकांना पोस्टेजसह पांच रुपये असे. हें पत्र थोडक्या वर्गणींत फार चांगले लेख देऊं लागल्यामुळें इतर पत्रांनां त्याची स्पर्धा करणें अशक्य झालें. अगदीं सुरवातीपासूनच त्यानें पुष्कळ ग्राहक मिळविले. त्यामध्यें वाङ्‌मय व शास्त्रे यांवर लेख असून शिवाय बातमीहि असे आणि मधून मधून उत्तम तामिळ लेखकांच्या लेखांचे इंग्रजी भाषांतरात्मक लेखहि प्रसिद्ध होत. शिवाय या पत्रांत देश्य लोकांतील बातमीदारांची पत्रेंहि बिनहरकत प्रसिद्ध होत असत. एकंदरीत या पत्रानें चांगली कामगिरी बजाविली. मद्रास इलाख्यांत प्रत्येक कलेक्टर ऑफिसमार्फत डिस्ट्रिक्ट गॅझेट प्रसिद्ध होत असे. यामध्यें इंग्रजी व देशी दोन्हीं भाषेंतत्या त्या जिल्ह्यासंबंधीचे सरकारी हुकूम, हवामानासंबंधीची माहिती, बाजारभाव, आठवड्याचें कॅलेंडर व इतर बरीच उपयुक्त माहिती उपलब्ध होत असे. यांशिवाय या गॅझेटामध्यें ज्यांना संपादकीय लेख म्हणतां येईल असे त्या त्या जिल्ह्यासंबंधीं विषयावर लेख येत असत. याच गॅझिटला जोडून साप्‍ताहिक पोलिससर्क्युलरहि प्रसिद्ध होऊ लागलें. या गॅझेटाची मासिक वर्गणी तीन आणे व २५ रुपयांहून कमी पगाराच्या सरकारी नोकरांना २ आणे असें. किरकोळ प्रतीला एक आणा किंमत असे. खाजगी जाहिराती गॅझेटच्या धोरणाला अविरोधी अशा एका ओळीला अर्धा आणा या दरानें घेण्यांत येत असत. हीं गॅझेटें १८५६ सालीं सुरू झालीं, या जिल्हा गॅझेटांना पुढीलप्रमाणें वर्गणीदार मिळाले होते. बेल्लारी १२९५; मदुरा २१५; तिनेवेल्ली ६२; कोइमतूर ४१९; तंजावर २१३; विजगापट्टण ४७; दक्षिण अर्काट २२६; त्रिचनापल्ली १५७; मद्रास २४१; सालेम १६०.

अमेरिकन जाफना मिशनकडून पुष्कळ वर्षे दर महिन्यास दोनदां जाफना मॉर्निंग स्टार या नांवाचें वृत्तपत्र प्रसिद्ध होत असे. त्यांचे धोरण ख्रिस्ती असे, तरी पत्र चांगले चालविले होतें. त्याची वर्गणी सुद्धां दीड रुपया होती.

अलीकडे तामिळ नाडूमध्यें शिक्षणविकास आणि मुद्रणविकास झाल्यामुळें लोकसंख्येच्या मानानें तामिळ पुस्तकांचा संग्रह गुजराथीखेरील इतर भाषेंतल्यापेक्षां संख्येनें अधिक आहे. तथापि तामिळ वाङ्‌मय मराठीइतपतहि उच्च विचारांचे किंवा लेखनकौशल्याचें किंवा पांडित्याचें आश्रयस्थान नाहीं.

तामिळसुभाषितें — सुभाषितें हा एक वाङ्‌मयाचा प्रकार असून त्यावरून लोकांचे विचार व रहाणी चांगली कळून येते. उदा. आंग्लभाषेंतील बहूतेक म्हणी हवामान व ऋतू यांसंबंधी आहेत; कारण हवामानांतील फरक हा तिकडे फरक असा वाटतो पण हिंदुस्थानांत तो परिपाठांतला असतो त्यामुळे इकडील फारच थोड्या म्हणी हवेसंबंधी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे इकडील स्त्रीदास्यत्वाची. या विषयावर तामिळींत बर्‍याच म्हणी आहेत, पण आंग्लस्त्रियांनां बराच मान असल्यानें इंग्रजींत अशा म्हणी सांपडणार नाहीत.  इंग्रजी म्हणींत स्त्रियांचा पोशाख आणि शिंपी, तर आपल्या म्हणींत स्त्रियांचे दागिने सोनार यांचा परामर्ष घेतलेला दिसेल. गर्व व पोकळ डौल यासंबधीच्या म्हणी तामिळींत फार आहेतं. तामिळ-किंवा द्रविडी म्हणाना -म्हणींतील एक विशेष म्हणजे त्यांतील प्राणी निर्बुद्ध व मुके दिसतात. आर्यानीं ज्याप्रमाणें (उदा. पंचतंत्रांत) प्राण्यांच्या ठिकाणीं बुद्धि, चैतन्य व कांही मानवी गुण कल्पिले तसे द्रविडांनी केलेले दिसत नाही. भारतीय सुभाषिते, भारतीय वाङ्‌मयाप्रमाणेंच चैतन्योत्पादक व प्रवृत्तिमार्गी नाहीत; तीं आपणाला निराश करतात; तेव्हां तामिळी सुभाषितें याच प्रकारचीं असणार. तामिळ सुभाषितें संख्येनें फार मोठीं (सात आठ हजारांवर) व अत्यंत सुंदर आणि हृदयंगम आहेत. इतर कोणत्याहि भारतीय वाङ्‌मयांत इतका उत्कृष्ट सांठा सांपडणार नाही. त्यांची कल्पना येण्याकरितां कांही निवडक सुभाषितें पुढें दिलीं आहेत.

ईश्वरासंबंधी:- (१) तिळांतल्या तेलाप्रमाणें ईश्वर सर्वव्यापी आहे. (२) नरकाचीं द्वारें बंद करण्याचा जो अडसर तीच ईश्वरोपासना होय. (३) जर ईश्वर म्हणून कोणी नाहीं असें म्हणशील तर शेणाकडे पहा; औषध कसलेंहि नाहीं म्हणशील तर दारूकाम पहा; जर कोणतेंहि रेचक नाहीं म्हणशील तर जेपाळाचें बीं पहा. (४) ईश्वर आपल्याला एखादा मार्ग दाखवील, पण तो आपल्या तोंडांत अन्न आणून घालील कां ?

भवितव्यता:- (१) ईश्वरलिखितांत एक अणूचाहि फरक होणार नाहीं. (२) मळ झाडून टाकतां येईल पण जन्माबरोबर आलेलें कर्म नाहींसें होणार नाहीं. (३) जरी एखादी बाई किल्ल्यांत (राजघराण्यांत) जन्माला आली असली, तरी तिच्यामागें नशीब लागलेलेंच आहे. (४) नशीबप्रमाणें तुम्हाला बायको व उपाध्याय मिळत असतो.

चांगले नशीब:- (१) सौंदर्याच्या ठिकाणीं रड व नशीबाच्या ठिकाणीं खाद्य ठेविलेलें म्हणून समजावें. (२) तुम्हाला सौंदर्य खाऊं घालील कीं नशीब घालील? कमनशीब:- (१) दुर्दैवी माणसाला पुष्कळ दूध जरी मिळालें तरी तें मांजर पिऊन टाकील. (२) जिच्यामागें शनि लागलेला आहे ती मोठ्या गर्दीच्या बाजारांत गेली तरी तिला नवरा मिळणार नाहीं. पांढर्‍यापायाची:- (१) तरूण व भाग्यवती मुलगी म्हणून मी तिला घरांत घेताच माझ्या सोन्याचें गवत कींहो बनलें! (१) सीतेच्या जन्मानें सिंहलद्वीव नाश पावलें (सासू सुनेला उद्देशून म्हणते).

दोष व दुर्गुण:- (१) निरसें दूधहि अशुद्धच व नवीन जन्मलेलें मूलहि अशुद्धच. (२) घरोघरी मातीच्याच चुली, सोन्याची चूल कोठेंहि नसतें. दुसर्‍याला नांवे ठेवणें - (१) थोरल्या बहिणीला नांवें ठेवणारी आपण स्वतःच वेश्या बनते. (२) एकडोळ्या चकण्याला हंसतो. वड्याचें तेल वांग्यावर:- (१) मृत्यूची बातमी आणणाराला तुह्मी दोष द्यावां कां? (२) को-गांवच्या बाईनें बदकर्म केलें म्हणून गुंटूरगांवच्या बाईला शिक्षा मिळाली. (३) तुमचा चेहराच जर कुरुप असेल तर आरसा काय करील ?  ढोंग:- (१) शैव भिक्षूबरोबर तो शिवासंबंधीं बोलतो व वैष्णव भिक्षूबरोबर विष्णूसंबंधीं बोलतो. (२) मूर्ख स्त्रीच्या पापण्यांत अश्रू तयार असतात.

स्वार्थीपणा:- (१) वडील भावाला मुलगी झाली म्हणजे त्याला आपली बहीण परकी वाटूं लागते. (२) तूप गांवाचें आहे पण माझी बायको वाढणारी आहेना.

कुटुंबासंबंधी:- (१) तुझा थोरला भाऊ तुझ्या स्वतःच्या आईच्या पोटीं आला म्हणून त्याची बायको आली कीं काय ? (२) तुमच्या गांवचा जांवई व नांगरचा बैल एकाच किंमतीचे. (३) कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ. आई:- (१) आईला जर तुम्ही तळ्यावर पाहिलें तर मुलाला घरीं पहाण्याचें कारण नाहीं. (२) त्याची आई त्याच्या पोटाकडे पाहील पण बायको धोतराकडे पाहील. मुलें:- (१)हत्तीला पकडून भांड्यांत कोंबणें ही मुलांची वेडी भाषा असते. (२) लहान मूल जितका वेळ निजतें तो सर्व वेळ आईला फार उपयोगी पडतो. (३) नेहमीं हातांखांद्यावर असणारें मूल आणि मांडीवर घेऊन लावलेली पत्रावळ कधींही चांगली होणें नाहीं (इंग्रजी- ''मदर्स डार्लिंग्स मेक बट् मिल्क- सॉप हीरोज'').

बायका:- (१) स्त्री तरूणपणीं आनंददायक असते पण म्हातारापणीं त्रासदायक वाटते. (२) भर ज्वानींत असतांना एखादी चक्किल्ली (चांभार जातीची) मुलगी व नाचणीचें कणीसहि सुंदर दिसतें (संकृत- प्राप्तेतु षोडशे वर्षे गर्दभी अप्परा भवेत्). (३) जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीचा नवरा अगोरदरच जन्मलेला असतो (इंग्रजी-मॅरेजेस आर मेड इन् हेवन). (४) बायकांचें शहाणपण चुलीपुरतें. (५) सौंदर्य तिच्यांतून गळतें आहे; कुत्रें तें चाटींत आहे, तर एक फुटके भांडे तें भरावयास आण! (एखाद्या सौंदर्याचा दिमाख दाखविणार्‍या कुरुप स्त्रीसंबंधी बोलतांना). (६) एखादी रंभेसारखी वेश्याहि बायको करा, पण लिहितां येणारी मुलगी पत्करूं नका. (७) एखाद्या बाईच्या अंगावर दागिने घाला व तिच्याकडे बघा, आणि एखाद्या भिंतीला गिलावा करा व तिच्याकडे बघा.
(इंग्रजी:- नो वूमन ईज अग्ली व्हेन् शी ईज ड्रेस्ड). (८) राजे, बायका आणि लता जवळ असेल त्याला कवटाळतील. (९) बायकांनां आपण धर्मादाय म्हणून अन्न घालीत नाहीं. (१०) गरीबाची बायको म्हणजे कोणाचेहि प्रीतिपात्र म्हणावें. (११) चोराची बायको नेहमी विधवा असते. लग्न:- (१२) ज्या घरांत लग्न होईल त्यांत पुढें सहा महिने दुष्काळ पडेल. (१३) माकडाप्रमाणें कुरुप असली तरी आपल्याच जातीची मुलगी करा. (१५) मुलगी दहा वर्षे वयाच्यावर लग्नाशिवाय ठेवूं नंये, मग ती एखाद्या परिया अस्पृश्या) ला सुद्धां द्यावी (इंग्रजी-डाटर्स अँड डेड् फिशेस आर नो कीपिंग वेअर्स).

नवराबायको:- (१) लाकडे ! तूं स्वंयपाक करु नकोस कीं कढींचें पीठ दळूंहि नकोस; माझ्या डोळ्याप्रमाणें प्रिय असलेली तूं माझ्याजवळ असलीस म्हणजे पुरे. (२) लग्नानंतर साठ दिवस इच्छा राहील, तीस दिवस विषय राहील व नव्द्व दिवस झाले कीं, ती केरसुणीसारखी होऊन बसेल (इंग्रजी- व्हेन् ए कपल आर न्यूली मॅरिड, दि फर्स्ट मन्थ ईज हॉनिमून ऑर स्मिक्-स्मॅक; दि सेकेंड इज हीदर अँड दीदर; दि थर्ड ईज ट्विकटॅ्वक; दि फोर्थ- दि डेव्हिल टेक देम दॅट् ब्रॉट दी अँड मी टुगेदर). (३) दोन बायकांच्या नवर्‍यानें लांब केंस कां ठेवावेत ? (४) नवर्‍याजवळ पैसा नसला म्हणजे प्रत्यक्ष त्याची बायकोहि त्याचा मान ठेवीत नाही. (इंग्रजी:- व्हेन पॉव्हर्टी कम्स इन् अ‍ॅट् दि डोअर, लव्ह लीप्स आऊट दि विंडो).(५) आपल्या बायकोला मारण्यास गांवच्या पाटलाची परवानगी पाहिजे कां काय? (६) संशयी नवर्‍याच्या बायकोला चाळीस नवरे असतात. (७) घरांतली स्वतःची बायको मरगोसा (कडू) झाडाप्रमाणें वाटते पण बाहेरची उंसाप्रमाणें वाटते.

स्त्रीदोष:- (१) जी आपल्या बापाशीं कर्म करते तिला मोठा किंवा लहान भाऊ सारखाच (इंग्रजी शी ईज अ‍ॅज कॉमन अ‍ॅज ए बार्बर्स चेअर). (२) रडक्या माणसावर किंवा हंसक्या बाईवर विश्वास ठेवूं नका. (३) पतिव्रत्याखेरीज सौंदर्य, सुवासरहित पुष्पाप्रमाणें आहे. (४) कुमार्गाला जाण्याची संधि मिळाली नाहीं म्हणून ती पतिव्रता आहे (संस्कृत.—तुरगब्रह्मचर्य) सासू:- (१) माझ्या मुलीला मी आडवड्यांतून दोनदा न्हावूं घालीन पण सुनेला फक्त दिवाळींत. (२) फुटलेलें मडकें एकवेळ जडवितां येईल पण सासुसुनेचें कधीं एकत्र जमणार नाहीं. (३) माझा मुलगा मेला तरी मरूंदे, पण त्याच्या मरण्यानें सुनेचा ताठा कमी झाल्याचें पाहून मला समाधान वाटेल. (४) सासूच्या हातून भांडें फुटलें तर तें मातीचें होतें, पण सुनेच्या हातून फुटलें तर मात्र तें सोन्याचें होतें.

[संदर्भग्रंथ:- मुरडॉक-क्लासिफाईड कॅटलॉग ऑफ तामिळ प्रिंटेड बुक्स; गोव्हर-फोक-साँग्स ऑफ सदर्न इंडिया; काल्डवेल-कंपॅरिटिव्ह ग्रामर ऑफ दि द्रविडियन लँग्वेजेस; एस्.सी.चिट्टी-दि तामिळ प्लटार्च; पोप-फर्स्ट लेसन्स इन् तामिळ; अर्नोल्ड-गॅलक्सी ऑफ तामिळ पोएट्स; क्वाटर्ली लिस्ट ऑफ बुक्स इन् मद्रास प्रेसिडेन्सी. कनकसभे-तामिळ्स, १८०० ईयर्स अ‍ॅगो. हर्मन जेनसेन - तामिळ प्राव्हर्ब्स; लाझारस-डिक्षनरी ऑफ तामिळ प्राव्हर्ब्स; सत्यनेसन-हँडबुक ऑफ तामिळ प्राव्हर्ब्स अँड फ्रेजेस.]

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .