प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या        
 
तुर्कस्तान, पश्चिमेकडील- यांत आशियांतील व यूरोपांतील दोन्ही तुर्कस्तानांचा समांवेश होतो आणि तुर्की साम्राज्यांत यूरोपांतील तुर्कस्तान, आशियांतील तुर्कस्तान, ट्रिपोली व बारका (बेंगझी) वगैरे आफ्रिकेंतील प्रांत आहेत. याशिवाय कांहीं मांडलीक संस्थानें व परकीय अमलाखालीं असलेले प्रांत येतात. (ही महायुद्धपूर्वीची स्थिति होय,. नंतरचे फेरफार लेखाच्या शेवटीं दिले आहेत).

यूरोपांतील तुर्कस्तान हें बाल्कन द्वीपकल्पाच्या मधोमध आहे. ह्याच्या उत्तरेस सर्व्हिस व बल्गेरिया; पूर्वेला काळा समुद्र व बास्फरस, दक्षिणेला मार्मोराचा समुद्र, डार्डानेल्स्, ईजियन समुद्र व ग्रीस; पश्चिमेला आयोनियन व आड्रियाटिक समुद्र आहेत. आशियांतील तुर्कस्तानच्या उत्तरेस काळा समुद्र, पश्चिमेस ईजियन समुद्र, पूर्वेस इराण व ट्रान्सकाकेशिया आणि दक्षिणेस अरबस्तान व भूमध्य समुद्र आहे.

बाल्कन द्वीपकल्पांतील बास्फरस ते आड्रियाटिकपर्यंतच्या भूभागावर तुर्क सुलतानाची मालकी आहे. १८९८ त ग्रेटब्रिटन फ्रान्स, इटली व रशिया यांच्या संरक्षणाखालीं क्रीट बेटाला स्वातंत्र्य दिलें सुलतान हा केवळ क्रीट बेटाचा नांवाचा मालक आहे. आशियांतील तुर्कस्तानांत मुसुलमानी धर्माचें अतिशय वर्चस्व असल्यामुळें ओटोमन घराण्याचा मुख्य आधारस्तंभ साम्राज्यांतील हाच भाग होय. यांत अनाटोलियाचें डोंगरपठार (आशिया मायनर), आर्मिनिया व कुर्दिस्तानचा डोंगराळ प्रदेश, मेसापोटेमियाचा सखल प्रदेश, सीरिया व पॅलेस्टाईनचा डोंगरी भाग व अरबस्तानचा किनारा इत्यादिकांचा समावेश होतो. तुर्की अरबस्तानांत एल-हसा, तेहामा, हजाझ व येमेन इत्यादि भाग येतात.

आफ्रिकेंतील ट्रिपोली व बारका हे फक्त तुर्कस्तानच्या अंमलांत आहेत. तुर्कसत्तेखालीं ईजिप्‍त देश होता. पण १८४१ त तो स्वतंत्र झाला व १८८१ पासून ब्रिटिशांच्या संरक्षणाखालीं आला. नाममात्र तुर्क अंमलाखालीं असलेला ईजिप्‍त व इतर प्रांत धरून तुर्क साम्राज्याची एकंदर लोकसंख्या १९१० सालीं सुमारें ३६३२३५३९ भरली. खास तुर्क अंमलाखालील लोकसंख्या २५९२६००० होती.

जाती व धर्म— येथें इस्माली अथवा तुर्क सुमारें १ कोट आहेत. ह्यांच्यापैकीं १५ लाख यूरोपीय तुर्कस्तानांत आहेत. सेमिटिल शाखेपैकीं अरब, यहुदी व सीरियन लोक आहेत. आर्य शाखेपैकीं स्लाव्हसर्ब, बल्गेरियन, पोमक, कोसाक व ग्रीक लोक आहेत. १९१० सालच्या खानेसुमारीवरुन असें दिसतें कीं, शेंकडा ५० मुसुलमान व शेंकडा ४१ रुढधर्म पंथाचे असून बाकीचे इतर लोक आहेत. इतर धर्मीय लोकांनां स्वतःच्या धर्मसंस्था स्थापण्यास परवानगी असून, स्वतःच्या शाळा, मठ व रुग्णालयें यांवर त्यांची देखरेख आहे.

राज्यकारभार— १९०८ सालची राज्यक्रांति होईपर्यंत तुर्कस्तानची राज्यपद्धति धर्मसत्तायुक्त (थिऑक्रॅटिक) अनियंत्रितराज्यसत्ताक (अ‍ॅब्सोल्यूट मॉनर्की) होती. सर्व सत्ता सुलतानाच्या  हातांत असून त्याची राज्यपद्धति एकतंत्री तर्‍हेची होती. सुलतान हा महंमदाच्या गादीवर बसणारा खलिपा असा मुसुलमान लोकांचा समज असल्यामुळें धार्मिक बाबतींत त्याचें वजन मुसुलमान लोकांत फार आहे.

खलिफ ओमार याच्या राज्यपद्धतीमुळें जित ख्रिस्ती व जेते तुर्की मुसुलमान यांच्यांत ऐक्य घडून आलें नाहीं. त्यामुळें ओटोमन राष्ट्र कधींच बनलें नाहीं असें म्हटलें तरी चालेल. तिसर्‍या सेलिम (१७८९-१८०७) पासून ऐक्य घडवून आणण्याकरितां बरेच प्रयत्‍न झाले. सर्वांत दांडगा प्रयत्‍न अबदुल मजीद (१८३९-६१) यानें केला. परंतु तो अकालीं झाल्यामुळें फसला. उलेमा व जवळचे मंत्री यांच्या प्रतिगामीं धोरणामुळें गादीवर बसल्यानंतर लगेच सुलतान हमीद यानें ''मिधतराज्यपद्धती'' चें अवलंबन केलें; हा देखील प्रयत्‍न फसला. उलेमा ही एक दांडगी संस्था आहे. हिचा मुख्य हा वजीराच्या दर्जाचा असतो. राज्यपद्धतींत फेरफार व सुधारणा होण्याच्या मार्गांत उलेमानें बरेच अडथळे केलें. सुधारणा करणार्‍या ''तरुण तुर्क'' नांवाच्या पक्षाचा छळ झाला. यामुळें साम्राज्यांत जुन्या राज्यपद्धतीविरुद्ध चळवळ सुरु झाली. या चळवळीचा स्फोट १९०८ सालच्या राज्यक्रांतींत झाला. स. १९०९ मध्यें पुन्हां क्रांतिकारक पक्षाचा जय झाला. यावेळीं शेव्हकेट पाशानें कान्स्टांटिनोपल घेतलें व अबदुल हमीद पदच्युत होऊन त्याच्यानंतर त्याचा धाकटा भाऊ रशेद एफेंदी हा पांचवा महंमद या नांवानें गादीवर बसला. या वेळेपासून एका नवीन राज्यपद्धतीचा पुरस्कार करण्यांत आला. सुलतान हा सनदशीर पद्धतीवर झालेला राजा होता. याला कार्यकारी मंत्रिमंडळाचें साहाय्य असतें. या मंडळांतील प्रत्येक मंत्र्याच्या ताब्यांत एकेक खातें होतें. सर्व प्रजेस राजकीय व दिवाणी हक्क सारखेच होते व लष्करी नोकरीच्या निर्बंधास फांटा दिला. सुलतान हा धार्मिक बाबतींत मुख्य समजला जात असे. सरदार आझम किंवा मुख्य वजीर यांची नेमणूक सुलतान करी व हा मजलिची-ह-खासचा सरकारी अध्यक्ष असे. यांत अंतरराष्ट्रीय व परराष्ट्री मंत्री, युद्धमंत्री, फडणीस, व्यापारमंत्री, शिक्षणमंत्री वगैरे असतात. साम्राज्याचे व्हिलाएता (प्रांत), संजाक (जिल्हा), व संजाकचे काझा वगैरे विभाग होते.

शिक्षण— सरकारी व खाजगी अशा दोन तर्‍हेच्या शाळा येथें आहेत. प्राथमिक, दुय्यम व वरिष्ठ हे शिक्षणाचे प्रकार होत. प्राथमिक शिक्षण फुकट व सक्कीचें आहे. वरिष्ठ शिक्षण मोफत किंवा शिष्णवृत्तीनें मिळतें. दुय्यम शिक्षणासाठीं शाळा आहेत. वरिष्ठ शिक्षणासाठीं कान्स्टँटिनोपलचें विश्वविद्यालय, शिक्षकांची शाळा, कला व वैद्यक शाळा येथें आहेत.

साधारण समज आहे त्यापेक्षां येथें शिक्षणाचा जास्त प्रचार झाला आहे, याचें बहुतेक श्रेय ख्रिस्ती समाजाकडे आहे. चांगल्या शिक्षणसंस्था स्थापन करण्यासाठीं व ज्या स्थापन झालेल्या आहेत त्यांच्या मदतीसाठीं मोठमोठ्या रकमा देणगी म्हणून मिळतात. अमेरिकन विद्यालयानें देखील बरेंच शिक्षणाचें काम केलें आहे.

सैन्य— पूर्वी लष्करी नोकरी मुसुलमानांत सक्तीची होती. परंतु ख्रिस्ती लोकांनां कांहीं कर देऊन मुभा मिळत असे. नवीन पद्धतीप्रमाणें सर्व ''आटोमन'' लोकांनां लष्करी नोकरी करावी लागे. तरी पण कांहीं अटीवर व कांहीं कर देऊन मुभा मिळते. १९१० सालीं लष्करी पद्धतीची पुनर्घटना झाली. लष्करी नोकरी वयाच्या २० व्या वर्षापासून ४० व्या वर्षापर्यंत म्हणजे सुमारें २० वर्षें असे. १९०४ सालीं एकंदर ओटोमन सैन्य १७९५८३५० होतें. यांत पायदळ, घोडदळ, रेडिफ घोडदळ, तोफखाना व यांत्रिकदळ इत्यादि आहेत.

आरमार— तुर्कीची समुद्रावरील सत्ता निरनिराळ्या कारणांमुळें संपुष्टांत आली. अबदुल अझीनें ब्रिटिश आरमारावरील अधिकार्‍यांच्या मदतीनें इंग्लिश व फ्रेंच गोदींत तयार केलेलीं चिलखती जहाजें तुर्की आरमारांत भरती केली. परंतु सुलतान अबदुल हमीद यानें आरमार वाढविलें नाहीं. परंतु उलट आरमारी सत्ता कमी करण्याचा प्रयत्‍न केला. नूतन अंमलाखालीं तुर्की सरकारनें आरमाराची सुधारणा व घटना करण्याकडे चांगलें लक्ष पुरविलें. १९१० सालीं दरसाल ५००००० पौंड खर्चाची मंजुरी तुर्की पार्लमेंटनें दिली. ही रक्कम वर्गणी करुन जमवावी व तिची हमी सरकारनें घ्यावी असें ठरलें होतें. कागारांनां आरमारी शिक्षण मिळावें व आरमाराची सुधारणा व्हावी म्हणून ब्रिटिश आरमारी अधिकार्‍यांनां नोकरीस ठेविलें होतें.

दळणवळणाचे मार्ग— येथील दळणवळणाचे मार्ग चांगले नसल्यामुळे साम्राज्यांतील सांपत्तिक वाढ झाली नाहीं. जरी साम्राज्यांत चांगल्या सडका नाहींत तरी अलीकडे रेल्वे, कालवे, नदींतील जलमार्ग इत्यादि गोष्टीची वाढ बरीच झाली आहे. १८८५ सालीं १२५० मैल रेल्वे होती ती १९०९ त ४४४० मैल झाली. अबदुल हमीदच्या कारकीदींत हेजाझ रेल्वे तयार झाली. ह्या रेल्वेंत भांडवल, देखरेख वगैरे गोष्टी परकीयांच्या मदतीशिवाय झाल्या.

उत्पन्न व उद्योगधंदे— तुर्की साम्राज्याची सुपीकता बरीच प्रसिद्ध आहे. हा गुण धाडस व कौशल्य यांच्या अभावी व्यर्थ होय. १८९२ सालीं एक शेतकी खातें निर्माण करुन त्याला खाणी व जंगलखातीं जोडण्यांत आलीं. ह्याच वेळीं एक शेतकरी पेढी स्थापन झाली. ती शेतकर्‍यांनां रकमा कर्जाऊ देते. शेतकी शाळा व नमुन्याचीं शेतें देखील आहेत. जंगलाचा नाश होऊं नये म्हणून जंगलशाळा स्थापिलेल्या आहेत. गहूं, मका, ओट, जंव व राय हीं मुख्य धान्यें होतात. कापसाची वाढ होत असून तंबाखू सर्वत्र होते. पॅलेस्टाईनमध्यें संत्रीं व बसरा येथें (तुर्की अरबस्तानांत) खजूर यांचा व्यापार चालतो. द्राक्षांचे मळेहि साम्राज्यांत आहेत. मीठ पुष्कळ तयार होतें. परदेशांत जाणार्‍या १/४ मिठापैकीं ३/४ मीठ हिंदुस्थानांत येतें. मासे धरण्याचीं ठिकाणें पुष्कळ आहेत. गुलाबी अत्तर येथें तयार होतें. खनिज पदार्थ पुष्कळ सांपडतात. परंतु ते खणून काढण्यासाठी भांडवलाची जरुर आहे. येथील मुख्य उद्योगधंदे म्हणजे कातडीं कमावणें, मलमल, रेशीम, गालीचे व नक्षीदार शस्त्रें इत्यादि तयार करणें हे होत.

जमाबंदी— पूर्वी तुर्क सरकारचें बजेट प्रसिद्ध होत नसे. परंतु अलीकडे तें प्रसिद्ध होऊं लागलें आहे. एकंदर उत्पन्नाच्या सात बाबी आहे. त्या अशा— (१) अपरोक्षकर (२) स्टाम्पची फी (३) परोक्ष कर (४) कुलहक्क (५) व्यापार व उद्योगसंस्था (६) सरकारी मालकीची जमीन (७) खंडणी. यांपैकीं पहिल्या बाबीपासून एकंदर उत्पन्न १३७२५८९२ पौंड, दुसर्‍या बाबीपासून १११३४५२ पौंड, तिसर्‍या बाबीपासून ४८२५८१२ पौंड, चवथ्या बाबीपासून ३२६२४२५ पौंड, पांचव्या बाबीपासून ४०२८८९ पौंड, सहाव्या बाबीपासून ५१३६५१ पौंड, व सातव्या बाबीपासून ८७१३१६ पौंड असें उत्पन्न होतें. सर्व साम्राज्याचें एकंदर उत्पन्न २५८४८३३२ पौंड आहे.

खर्चाच्या बाबतींत प्रथमस्थान सार्वजनिक कर्ज फेडण्याला दिलें जातें. खाजगीकडील नेमणुकीसाठीं ४४३८८० पौंड, जमाबंदीखात्याला २९८९६०० पौंड, परोक्ष खर्च अथवा जकातीबद्दल ५१२६७० पौंड, अंतर्राष्ट्रीय खात्याला ११५८७२३० पौंड, लष्करी खात्याला ८२८०४५२ पौंड, आरमारखात्याला १०००३२७ पौंड व व्यापार वगैरे खात्याला ८८३१६१ पौंड, अशा तर्‍हेनें खर्चाची विल्हेवाट होते. तुर्क सरकारला अल्प मुदतीचें कर्ज सुमारें २५०००००० पौंड असावें असा अंदाज १९१०-११ सालीं करण्यांत आला.

पेढ्या— १८५६ सालीं कान्स्टांटिनोपलला आटोमन बँक नांवाची पेढी स्थापन झाली. नंतर हिचेंच रुपांतर इंपीरियल आटोमन बँकेंत झालें. तीच नॅशनल बँक ऑफ टर्की होय. दुसर्‍या पुष्कळ पेढ्या आहेत. यांपैकीं इंपीरियल बँकेलाच फक्त नोटा काढण्याचा बक्क आहे.

चलनी पद्धति— पिआस्टर (२ १/८ पेन्स) हें नाणें मुख्य आहे. एका सुवर्णाच्या पौंडाबरोबर (१८ शि.२ पे.) १०० पिआस्टर असतात. ५ पौंड (तुर्की), १ पौंड, १/२ पौंड, १/४ पौंड, अशीं सोन्याचीं नाणीं आहेत. चांदीचें नाणें मेजिदी नांवाचें आहे. याची किंमत २० पिआस्टरच्या बरोबर होते. यांच्या शिवाय अल्टिक, बेशलिक, मेटेलिक या नांवाचीं चलनी नाणीं वेगवेगळ्या राजांच्या वेळेस पाडण्यांत आली.

धारापद्धति— चार तर्‍हेची आहे. (१) मुल्क. ह्यांत जमिनीची वाटेल ती विल्हेवाट लावण्याचा मालकास अधिकार असतो. (२) एमिरिये, ही सार्वजनिक मालकीची जमीन असून धार्‍यानें लाविली जाते. (३) वकुफ, देवाला अर्पण केलेल्या जमिनी; याचें उत्पन्न गरीब लोक व धर्मदाय याजकडे लावितात. (४) कलिये अथवा मेवाद, यांत डोंगरावरील खडकाळ व जंगल असलेल्या जमिनी येतात. जंगल कापून जमीन नांगरण्यास फुकट दिली जाते. परंतु त्यानंतर तिला शेतकी कायदे लाविले जातात. खाणी खणण्यासाठीं परवाने घ्यावे लागतात. शहरें, खेडीं, गांवें, जंगलें यांत शोध करण्याची मनाई आहे.

इतिहास— ओटोमन तुर्कांचा मूळ पुरुष काराखाना याचा मुलगा ओघूझ हा होय, अशी एक दंतकथा आहे. हे लोक इ.स १२२७ च्या सुमारास ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्धीस आले. या वर्षी दोन हजारांपासून चार हजारांपर्यंत तुर्की लोक मोंगलांच्या भीतीनें सोडलेल्या आपल्या मातृभूमीस परत जात होते. वाटेंत त्यांनी कोनियाचा अल्लाउद्दीन कैकोवाद यास मदत करण्याविषयीं पुष्कळ विनंति केली पण ती सर्व व्यर्थ गेली. याप्रमाणें ते युफ्रेटीस नदीपर्यंत येऊन पोहोंचले. ही नदी ओलांडीत असतां त्यांचा नायक पाण्यांत बुडाला. पुढें ज्यांनीं या वेळेस नदी ओलांडिली होती असा ४०० घोडेस्वारांनीं (काहींच्या मतें २०००) आपल्या नायकाचा मुलगा एर्तोघ्रल याच्या नेतृत्वाखालीं वागण्याचें ठरविलें. यानंतर अल्लाउद्दिनानें अंगोराजवळील काराजा डाघ हा प्रदेश या लोकांस रहावयास दिला. आणखी कांहीं दिवसांनी सेल्जुक बादशहा एंर्तोघ्रल यानें केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून त्यास सुगुट प्रांत जहागीर दिला. १२८८ त एर्तोघ्रल मरण पावला व त्याच्या मागून त्याचा मुलगा ओसमान हा तुर्की लोकांचा नायक झाला. यानें सेल्जुक साम्राज्याच्या आपत्कालीं आपली साम्राज्यनिष्ठा ढळूं न देतां साम्राज्यास बरीच मत केली. यानें ग्रीक लोकांचा पाडाव केला व १२९५ सालीं काराजाहिसर काबीज केलें. दुसर्‍या अल्लाउद्दीन कैकोबादनें, यानें जिंकलेले प्रदेश याच्या स्वाधीन केले व याचा मोठा गौरव करुन याला स्वतंत्र सेनापतित्वाचा अधिकार दिला. पुढें यानें ग्रीक लोकांपासून आयनेग्यूएल, बिलेजिक व यारहिसर प्रांत काबीज केले. यानंतर दुसरा अल्लाउद्दीन कैकोबाद मेल्यावर एर्तोघ्रल स्वतंत्र राजा झाला. यानें १२३६ पर्यंत राज्य केलें. याच्या राज्यंत सकरिआ व अड्रानोस या खोर्‍याचा समावेश होत असून दक्षिणेस व उत्तरेस त्याची मर्यादा कुटाइह व सामोंराच्या समुद्रापर्यंत जाऊन भिडली होती. याच्या मागून ओरखान गादीवर आळा. यानें सन १३२६-१३५९ पर्यंत राज्य केलें. यानें ब्रुसा येथें आपल्या सैन्याची तयारी करुन ग्रीक लोकांवर चाल केली व त्यांपासून १३२८-३८ च्या दरम्यान आयडॉश, निकोमेडिया, हीरीकी, निकाइ, पराक्ली, गेम्लीक व कार्टालपर्यंत सर्व मार्मोंरा समुद्राचा केनारा काबीज केला. यानंतर यानें मुसुलमानांपासून कारासी हें शहर घेतलें. १३४१ सालीं यानें जॉन पालेलोगस याच्या विरुद्ध कॅन्टाकुझेनस याला मदत करण्याकरतां आपला मुलगा सुलेमान पाशा याची रवानगी केली. यानें वाल्कनपर्यंत चाल करुन कॅन्टाकुझेनस याच्या शत्रूचा बीमोड करुन १३५५ सालीं यानें (सुलेमान पाशानें) गॅलिपोली केल्ला व बुलायर मालगार, इप्साला व रोडोस्टो हीं शहरें घेतलीं. ओरखान मेल्यावर त्याचा मुलगा पहिला मुराद हा गादीवर बसला. यानें १३५९-१३८९ पर्यंत राज्य केलें. यानें १३६१ सालीं यूरोपवर स्वारी केली व ग्रीक सम्राटापासून अ‍ॅड्रिआनोपल पर्यंतचा मुलूख ताब्यांत घेतला. यानंतर बाल्कनपलीकडील राजेलोकांस याची भीति उत्पन्न होऊन त्यांनीं सर्व्ह, हंगेरियन, वालेशियन व मोल्डेव्हियन लोकांची ६ लक्ष फौज यांच्या विरुद्ध पाठविली पण त्याचा सेनापति हाजी अलबेई यानें फौजेनिशीं पाडाव केला. यानंतर याला सर्व्हिया किवुस्टेंडिल, निकोपोलिस, सिलिट्रिया या देशांचे राजे लोक खंडणी देऊं लागले. पुढें यांनीं पर्लेपी, बोस्निया व हर्जेगोव्हिना यांचा कांहीं भाग काबीज केला. कांहीं दिवसांनीं हा यूरोपांत नाहीं ही संधि साधून करामानियन राजा अली बे यानें पहिल्या मुरादाविरुद्ध युद्ध पुकारलें. परंतु त्याचा कोनिया येथे पराभव होऊन त्यास हार खावी लागली. याच सुमारास बोस्त्रियाच्या राजानें मुरादाच्या सेनापतीचा पराभव करुन त्याच्या फौजेची दाणादाण केली. यामुळें पूर्वी जे राजे मुरादास खंडणी देत होते त्यांस धैर्य येऊन त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केलें, याचा मुरादास फार राग आला व त्यानें बल्गेरियाचा पराभव करुन सर्व्हियनांवा कासोव्हो येथें ता. २७ ऑगस्ट १३८९ रोजीं पाडाव केला. पुढें हा लवकरच मरण पावला. याच्यानंतर त्याचा मुलगा पहिला बायेझिद हा राज्यपदारुढ झाला. यानें १३८९-१४०३ पर्यंत राज्य केलें. याला ग्रीक राजपुत्र अ‍ॅड्रोनिकस यानें ३० हजार डुकाट देऊं करुन आपल्या बापास पदच्युत करुन आपल्यास गादीवर बसविण्याविषयीं त्याची प्रार्थना केली. बायेझिद यानें त्याच्या म्हणण्याप्रमाणें घडवून आणल्यावर त्याचा बाप जॉन पालेलोगस यानेंहि अशीच मागणी करून ३० हजार डुकाट शिवाय या कामास १२ हजार फौज देण्याचें कबूल केलें. या मदतीस आलेल्या फौजेनें अला शेहर किल्ला काबीज केला. आयदिन, मेन्टेशी, सरुखान, केरमेन हीं संस्थानें बायेझिद याच्या राज्यास जोडण्यांत आलीं. या वेळी तुर्की फौज उत्तम समजली जात असून तींत ग्रीक राजपुत्र मॅनुअल पालेलोगस हा नोकरीस राहिला होता. पुढें वायेझिद हा आशियांत परत आल्यावर त्यानें कारामानियाच्या बंडखोर राजाचा पराभव केला. या शिवाय आशियांत यानें आणखी विजय मिळवून कायसराएह, सिव्हास, टोकाट, सिनोप, कास्टामुनी, सामसुन हे प्रदेश काबीज केले. १३९१ त जॉन पालेलोगस याच्या मरणानंतर त्याचा मुलगा मॅनुअल हा न विचारतां सैन्यांतून निघून जाऊन राज्यपदारुढ झाला. याबद्दल त्यास शासन करण्याकरितां बायेझिद यानें ग्रीस देशावर स्वारी केली. या स्वारींत यानें ग्रीसच्या मदतीस आलेल्या हंगेरी व पोलंड यांच्या फौजेचा निकोपोलिस येथें पाडाव केला. पुढें १४०२ सालीं जगप्रिसद्ध तैमूरलंग या मोंगलानें याचा अंगोरा येथें पराजय करुन याला कैद केलें. यानंतर हा लवकरच मरण पावला. हा मेल्यावर स. १४१३ पर्यंत मोंगल स्वारीनें उत्पन्न केलेली अस्वस्थता कायम होती. १४१३ सालीं याचा मुलगा पहिला महम्मद हा सिंहासनारुढ झाला. यानें १४२१ पर्यंत राज्य करुन पुन्हां साम्राज्य स्थापना केली. याच्यानंतर याचा मुलगा दुसरा मुराद हा राजा झाला. यानें १४२१-१४५१ पर्यंत राज्य केलें. हा वारल्यावर याचा मुलगा जेता दुसरा महम्मद हा गादीवर बसला यानें १४५१-१४८१ पर्यंत राज्य केलें. यानें ता. ३ मे १४५३ रोजीं कॉन्स्टांटिनोपल काबीज करुन बाल्कनद्वीपकल्प जिंकलें. १४८६ सालीं यानें बेलग्रेड शहरास वेढा घातला परंतु या प्रयत्नांत याला यश आलें नाहीं व यामुळें हंगेरीचा बचाव झाला. याच वर्षी यानें पिलोपोनेसस घेतलें. पुढें १४७०, १४७४ व १४७८ सालांत अनुक्रमें अल्बानिया, क्रिमिया व मोल्डेव्हिया हे प्रदेश काबीज केले. यानें आपल्या राज्यांतील फौज वाढवून दहा हजार केली. याशिवाय जेनेसरीज लोकांचा पगार वाढवून त्यांची संख्या १२ हजार केली. नवीन जिंकलेल्या प्रदेशांपैकीं कांहीं प्रदेश हा जहागीर देऊन बाकीचा मस्जीदी, विश्वविद्यालयें, शाळा व इतर धार्मिक संस्थांस देत असे. यानें पुष्कळ शिक्षणविषयक व  पारमार्थिक संस्था स्थापन केल्या.  तुर्कस्तानांत उलेमाचा वर्ग यानेंच निर्माण केला. याच्यानंतर याचा मुलगा दुसरा बायेझिद हा गादीवर आला. यानें १४८१-१५१२ सालपर्यंत राज्य केलें. हा मेल्यावर पहिला सेलिम गादीवर आला. यानें १५१२-२० पर्यंत राज्य करुन आशियाचा नैॠत्येकडील व आफ्रिकेचा उत्तरेकडील भाग काबीज करण्यांत आपलें सर्व लष्करी सामर्थ्य खर्च केलें. याच्या मागून दुसरा सुलेमान यानें १५२०-१५६६ सालपर्यंत राज्य केलें. याच्या कारकीर्दीत उस्मानली साम्राज्याचा उत्कर्ष कळसास पोहोंचून त्याची सर्व ख्रिस्ती यूरोपास दहशत बसली. १५५१ सालीं यानें हंगेरी देशांत शिरण्याचें नाकें बेलग्रेड शहर हें काबीज केलें. १५२२ सालीं र्‍होडस घेतलें. व २९ ऑगस्ट १५२६ रोजीं मोहाक्य येथें याचें व हंगेरियन मग्यार लोकांचें तुमुल युद्ध होऊन मग्यारांचा पाडाव झाला. यामुळें ते आपल्या स्वातंत्र्यास मुकून मध्यहंगेरी देश तुर्कांच्या ताब्यांत आला. यानंतर १५२९ साली यानें व्हिएन्ना शहरावर चाल करुन वेढा दिला. परंतु तेथें त्याला हार खावी लागली. यानें अल्जीरिया व आफ्रिकेचा पूर्वेकडिल उत्तर किनारा काबीज करुन भूमध्यसमुद्रावर आपलें स्वामित्व स्थापन केलें. याच्यानंतर दुसरा सेलिम गादीवर आला. यानें १५६६-१५७४ सालपर्यंत राज्य केलें. याच्या कारकीर्दीत सायप्रस व बरींच आयोनियन बेटें काबीज करण्यांत आलीं. हा मेल्यावर तिसरा मुराद (१५७४-१५९५), तिसरा महम्मद (१५९५-१६०३) व पहिला अहंमद (१६०३-१६१७) या तीन राजांनीं राज्य केलें. या राजांच्या अमदानींत तुर्की सांम्राज्यास उतरती कळा लागली.

१६ व्या शतकांतील ओटोमन राजनीति— बादशाही दिवाणखान्यांत मोठमोठे अमीर उमराव जमून राजकीय गोष्टींचा खल करीत असत. पहिल्यानें चर्चा करण्याच्या वेळेस स्वतः बादशहा येथें हजर राहून अध्यक्षस्थान स्वीकारीत असे. परंतु पुढें सुलेमानाच्या कारकीर्दीपासून बादशहा फक्त कांहीं विवक्षित प्रसंगीं या सभांस जाऊं लागला.

सरकारी अधिकार्‍यांचे (१) राज्यकारभार पहाणारे, (२) धार्मिक, (३) चिटनिशीचें काम पाहाणारे व (४) लष्करी असे चार वर्ग असत. कझ्यांचा अथवा परगण्यांचा राज्यकारभार कादी व मोठमोठ्या जहागिरदारांवर सोंपविला असे. निरनिराळ्या खात्यांवर देखरेख ठेवण्यास अलाइबे अथवा मिर-ई-लिव्हा (कर्नल अथवा ब्रिगेडियर) नांवाच्या पाशांची नेंमणूक केली होती. प्रांतांचा बंदोबस्त ठेवण्याकरितां यांपेक्षां वरिष्ठ पाशांची योजना केली होती. यांनां बेलरबेन अथवा मिर-ई-मिरान म्हणत असत. हे सर्व लष्करी अधिकारी असून यांच्याकडे राज्यकारभाराशिवाय लढाईच्या वेळीं सरंजामी फौजा जमा करुन त्यांचें नायकत्व स्वीकारण्याचेंहि  काम असे. मंत्र्यांची संख्या ७-८ असून त्यांवर एक मुख्य प्रधान असे. हे मंत्री वर सांगितलेल्या मसलतीच्या बैठकीस हजर रहात. सर्व अधिकार मुख्य प्रधानाच्या हातांत असून त्याला बादशाही शिक्कामोर्तब बाळगण्याचा मान असे. प्रारंभीं धार्मिक अधिकार्‍यांकडे फक्त न्याय देण्याचें काम असे पण पुढें सर्व धार्मिक बाबतींचा निकाल लावण्याचें काम त्यांच्यावरच सोपविण्यांत आलें. लष्करी अधिकार्‍यांचे पगारी व बिन पगारी असे दोन वर्ग असत. पगारी अधिकारी लष्करी छावणींत राहत असत. त्यांनां ''राजवाड्यांतील गुलाम'' ही संज्ञा होती. जेनेसरीज यांचा पहिल्या वर्गांत समावेश होत असे. जाहागिरी वतनाच्या सनदा स्वतः बादशहा देत असून त्या वंशपरंपरा चालत नसत. कोणताहि नवीन प्रदेश जिंकल्यावर विशांजी अधिकारी त्याची खास, झिआमत, टिमार व वकूफ या चार सदरांखालीं जहागीरी विभागणी करीत असत. १ लक्ष अस्पार उत्पन्नाच्या जहागिरीस खास म्हणत व या जहागिरीच्या मालकास दर ५ हजार अस्पारामागें एक हत्यारबंद शिपाई लढाईस द्यावा लागे. २ लक्ष ते एक लक्ष उत्पन्नाच्या जहागिरीस झिआमत म्हणत. ३ हजार ते २० हजार उत्पनाच्या जहागिरीस टिमार म्हणत, व हिच्या मालकास दर ३ हजार अस्पारामागें एक हत्यारबंद शिपाई द्यावा लागे. जहागीरदारास आपल्या जहागिरीच्या ठिकाणींच रहावें लागत असें.

पहिल्या अहंमदानंतर १६४८ सालपर्यंत पहिला मुस्तफा (१६१७-१८ व  १६२२-२३), दुसरा उस्मान (१६१८ ते २२), चवथा मुराद (१६२३-१६४०) व इब्राहिम (१६४०-४८) हे राजे झाले; व १६४८ सालीं चवथा महंमद गादीवर आला. यानें १६४८-१६८७ पर्यंत राज्य केलें. याच्या कारकिर्दीत मुख्य प्रधान महम्मद व त्याचा मुलगा अहंमद कोप्रिली या दोघांनीं आपल्या बौद्धिक सामर्थ्यानें व कर्तबगारीनें तुर्की साम्राज्यास पुन्हां चांगले दिवस आणले. यांनीं क्रीट, पोडोलिया व युक्रेन काबीज केलें. स. १६८३ त यांनीं व्हिएना शहरास वेढा दिला. परंतु त्यांनां यश आलें नाहीं. अहंमदनंतर दुसरा सुलेमान (१६८७-९१) व दुसरा अहंमद (१६९१-१६९५) या राजांनीं राज्य केलें. यांच्या मागून दुसरा मुस्तफा गादीवर आला. यानें १६९५-१७०३ पर्यंत राज्य केलें. याच्या कारकिर्दीत स. १६८३ च्या वेढ्याबद्दल ऑस्ट्रियन सम्राटाशीं अपमानकारक तह करावा लागला. या तहाच्या कलमान्वयें तुर्की लोकांस बनातशिवाय सर्व हंगेरी देश ऑस्ट्रियनांस द्यावा लागला. याशिवाय मोरियास व्हेनिस, पोलंडला पोडोलिआ व रशियाला अझोव्ह द्यावे लागले. याच्या नंतर तिसरा अहम्मद राज्यपदारुढ झाला. यानें १७०३-१७३० सालपर्यंत राज्य केलें. याच वेळेस रशियांत पिटर दि ग्रेट हा राज्य करीत होता. यानें रशियापासून अजोव्ह पुन्हां परत घेतलें. यानें ऑस्ट्रियाशींहि युद्ध केलें पण त्यांत त्याला अपयश आलें. स. १७१८ त यानें ऑस्ट्रियाशीं सारोविट्झ येथें तह केला. या तहान्वयें तुर्कांस लहान वालेशिया, बोस्निया व सर्व्हिया यांचा बराच भाग ऑस्ट्रियाला द्यावा लागला. तिसर्‍या अहंमदानंतर पहिला महंमूद गादीवर आला. यानें १७३०-१७५४ सालपर्यंत राज्य केलें. याच्या कारकिर्दीत तुर्कांनीं रशिया व ऑस्ट्रियाविरुद्ध फ्रान्सला मदत केली. व ऑस्ट्रियाचा पराजय केला. पुढें १७३९ सालच्या बेलग्रेडच्या तहांत तुर्कांस, त्यांच्यापासून स. १७१८ त घेतलेला बहुतेक मुलूख परत दिला. याच्यानंतर तिसरा उसमान गादीवर आला. यानें १७५७ सालपर्यंत राज्य केलें. हा मेल्यावर तिसरा मुस्तफा गादीवर आला. यानें १७५७-१७७३ पर्यंत राज्य केलें. याच्या कारकीर्दीत रशियाशीं पोलंडबद्दल लढाई सुरु झाली. ही लढाई १७६८-१७७४ पर्यंत चालली होती. या लढाईंत तुर्कांस अपयश येऊन त्यांनां रशियास कुबान व दक्षिण रशियांतील कांहीं शहरें द्यावीं लागलीं. याच्यानंतर पहिला अबदुल हमीद गादीवर आला. यानें १७७३-१७८९ पर्यंत राज्य केलें. याच्या कारकीर्दीत ऑस्ट्रिया व रशिया यांनीं तुर्कांवर पुन्हां चाल केली. यानें त्यांस परतवून लावण्याचा पुष्कळ प्रयत्‍न केला पण तो यशस्वी न झाल्यामुळें याची हिंमत खचली व तो मरण पावला. पुढें याचा पुतण्या तिसरा सेलिम (१७८९-१८०७) हा गादीवर आल्यावर इ.स. १७९२ त जेसी येथें तह झाला. या तहान्वयें तुर्कांस दक्षिण रशियांतील ठाणीं व क्रिमिया यांवरील आपला हक्क सोडावा लागला. या पराजयामुळें तुर्की सरकारची सत्ता डळमळित होऊन साम्राज्यांत वंडाळी माजली. याच सुमारास तिसरा सेलिम व त्याच्या मागून गादीवर आलेला चवथा मुस्तफा याचे खून झाले (स.१८०८). यानंतर दुसरा महंमूद यानें १८०८-१९३९ सालपर्यंत राज्य केलें. यानें  १८२६ त जेनेसरीज लोकांचा पाडाव करुन व बंडाळी मोडून राज्यांत सर्वत्र शांतता राखण्याचा प्रयत्‍न केला. याशिवाय यानें आपल्या सैन्याची मांडणी यूरोपियन पद्धतीबरहुकूम केली होती. ग्रीक बंडखोर लोकांस क्रूरतेनें वागविल्याबद्दल सर्व यूरोप याच्यावर क्रुध्द झाला. याच वेळेस रशियन लोकांनीं तुर्की आरमाराचा १८२७ सालीं नॅव्हॅरिनो येथें पाडाव करुन अ‍ॅड्रिआनोपलपर्यंतचा मुलूख काबीज केला. यानंतर १८२९ सालीं तह होऊन तुर्कानीं सर्व्हिया व डान्यूब नदीथडीवरील संस्थानास कांहीं विशेष हक्क देऊन ग्रीस देशास स्वातंत्र्य दिलें. याच्या साम्राज्यएकीकरणाच्या प्रयत्नांचा अगदीं उलट परिणाम होऊन साम्राज्यास ईजिप्‍त देश अंतरावा लागला व पुढें अबदुल मज्जीद (१८३९-१८६१) गादीवर आल्यावर यूरोपियन राष्ट्रें मध्यस्थी पडल्यामुळेंच ईजिप्‍तच्या महंमदअलीपासून साम्राज्याचें रक्षण झालें. याच्या नंतर अबदुल मज्जीद यानें एक जाहीर पत्रक काढून आपल्या सर्व प्रजाजनांस सारखे हक्क दिले; व स. १८४१ मधील लंडनच्या तहान्वयें बॉसफरस व डार्डानेल्स सामुद्रधुनींत लढाऊ जहाजांस येण्याची मनाई केली. १८५३ त पॅलेस्टाईन मधील ख्रिस्ती लोकांस रशियन सम्राट निकोलस यानें सांगितलेले हक्क न दिल्यामुळें रशियाशीं पुन्हां युद्ध सुरु झालें. या युद्धांत तुर्की शिपायांनीं चिकाटी धरुन डान्यूब नदीवर स्वयंरक्षण केलें व तु्र्कांनां मदत करणार्‍या यूरोपियन राष्ट्रांनीं क्रिमियांत रशियाचा समाचार घेतला. स. १८६१ त अबदुल अझीझ गादीवर आला यानें १८७६ पर्यंत राज्य केलें. याच्या कारकीर्दीत बेसुमार उधळेपणानें तुर्की सरकारास बरेंच कर्ज झालें. याशिवाय रशियाचें वर्चस्व पुन्हां प्रस्थापित होऊन त्याच्यामुळेंच अब्दुल अझीझ पदच्युत झाला (१८७६). याच्यानंतर पांचवा मुराद राज्यपदारुढ झाला. याच सुमारास रशियाच्या चिथावणीवरुन बल्गेरियन लोक मुसुलमानांस बल्गेरियांतून हांकून देऊं लागले; परंतु हें बंड मोडण्यांत आलें. पुढें मुराद याला राज्यव्यवस्था चालवितां न आल्यामुळें त्याचा भाऊ दुसरा अब्दुल हमीद गादीवर आला. याच वेळेस इंग्लंडनें ओटोमन साम्राज्य कायम राखून बाल्कन प्रदेशांतील शासनसत्ता कशी चालवावी हें ठरविण्याकरितां कांस्टांटिनोपल येथें एक परिषद भरविली परंतु तिचा कांहीं उपयोग झाला नाहीं. पुढें १७८७ त रशियानें साम्राज्याशीं पुन्हां युद्ध सुरु केलें. पहिल्यानें तुर्की सैन्यापुढें रशियनांचा टिकाव लागेना. पण त्यांनां रूमानियन लोकांची मदत मिळाल्यावर त्यांनीं तुर्कांचा पाडाव केला व त्यासं सॅन स्टेफनो येथें मार्च ३, १८७८ रोजीं तह करावयास लाविलें. या तहान्वयें तुर्कांनीं रुमानिया व सर्व्हिया या दोघांस पूर्ण स्वातंत्र्य दिलें, व सर्व्हिया, मॉन्टेने नीग्रो यांचा त्यांनीं जिंकलेल्या भागावरील ताबा कबूल केला. याशिवाय बल्गेरिया स्वसत्ताक करुन रशियास डोब्रुजा प्रांत दिला. यानंतर पौरस्त्य प्रश्नांचा निकाल लावण्याकरितां बर्लिन शहरीं तहपरिषद भरली. या परिषदेनें स्वसत्ताक बल्गेरियाची मर्यादा उत्तरेस वाल्कन जिल्ह्यापर्यंत ठरवून दक्षिणेकडील भागाचा एक निराळा प्रांत बनविला व तो तुर्कांच्या ताब्यांत दिला. बोस्निया व हर्जेगोव्हिना हे प्रांत आस्ट्रियास जोडले. व ग्रीस देशास आपल्या सरहद्दींची हितावह दुरुस्ती करुन घेण्यास सवलत दिली. १८८१ सालीं टर्कीनें ग्रीसला थेसले व आर्टा हे दोन प्रांत दिले. १८८० सालीं जर्मन अधिकार्‍यांनीं तुर्की फौजेची पुनर्घटना करुन सर्व साम्राज्याकरितां लष्करी कायद्याचा मसुदा तयार केला. या मसुद्यांतील कायदे १८८७ सालीं अमलांत आले यानंतर १० वर्षें तुर्की सरकारचें धोरण शांतता राखण्याचें होतें. १८९७ त ग्रीस देशानें तुर्कांविरुद्ध लढाई पुकारली. व एटेमपाशा यानें ग्रीसचा सहजगत्या पाडाव करुन थेसली प्रांत काबीज केला. अलीकडे तुर्की सरकारच्या दुर्वर्तनामुळें तुर्की साम्राज्यांत असंतोष उत्पन्न झाला असून ''तरुण तुर्क'' या नांवाचा एक पक्ष निर्माण झाला असून याला पुष्कळ समंजस अधिकार्‍यांचा पाठिंबा आहे. या पक्षांतील लोकांस बंडखोर समजून तुर्की सरकारनें दाबून टाकण्याचा प्रयत्‍न केला पण बल्गेरियांत मॅसेडोनियाच्या मुक्ततेबद्दल जेव्हां चळवळ होऊं लागली तेव्हां तुर्की सरकारास अतिशय त्रास पडला व यूरोपियन राष्ट्रांनीं आपलीं लढाऊ आरमारें पाठवून त्यांची चांगली कानउघाडणी केली (१९०५). ट्रिपोलींतील ओसाड मैदानांतील जॅनेट नांवाचा ओलसर प्रदेश घेतल्याबद्दल फ्रान्स देशाशीं, व र्शियन सरहद्दीवरील कांहीं जिल्हे तुर्की साम्राज्यास जोडल्याबद्दल इराण देशाशीं तुर्कीसाम्राज्याचा बेबनाव झाला. परंतु ह्या दोन्हीहि बाबतींत तुर्कांस हार खावी लागली. १९०७ सालीं मॅसेडोनियांत जिकडे तिकडे रक्तपात व लुटालूट सुरु झाली होती. १९०८ सालीं ''तरुण तुर्क'' पक्षानें आपलें ठाणें पॅरिसहून उठवून सालोनिका येथें आणलें व जुनी बेबंदशाही राज्यपद्धती काढून टाकण्याबद्दल जिकडे तिकडे जारीनें चळवळ सुरू केली. या चळवळीस सैन्यांतील असंतोषाचा दुजोरा मिळाल्यामुळें तुर्की सरकारानें पार्लमेंट स्थापन करण्याकरितां एक सभा भरविली व ता. २४ जुलै १९०८ रोजीं नियंत्रित राज्यपद्धति अमलांत आणण्यांचे जाहीर केलें. नवी पार्लमेन्ट सभा १७ डिसेंबर १९०८ रोजीं उघडण्यांत येऊन तिच्या अध्यक्षाचा मान अहंमदरिझा या ''तरुण तुर्क'' पक्षाच्या पुढार्‍यास मिळाला. पण यानंतर लवकरच तुर्की सरकारनें याच्या अगदीं उलट धोरण स्वीकारलें. ता. २४ एप्रिल १९०९ रोजीं मॅसेडोनियन सैन्यानें कान्स्टांटिनोपलमध्यें जबरदस्तीनें शिरकाव केला. याच महिन्याच्या २६ व्या तारखेस प्रधानमंडळानें राजीनामा दिला व दुसर्‍या दिवशीं राष्ट्रीयमंडळाचें अधिनिवेशन झालें. या मंडळानें सर्वानुमतें अब्दुल हमीद यास पदच्युत करुन पांचवा मुहम्मद याच्या नांवानें द्वाही फिरविली, कान्स्टांटिट नोपल येथें १९१० पर्यंत लष्करी कायदा अमलांत आणण्याचें ठरविलें. १९०९ सालीं तुर्की साम्राज्यांत जिकडे तिकडे अस्वस्थता व बंडाळी माजली होती. साम्राज्यांत या प्रकारें धामधूम चालली असतां १९०८ सालीं ऑस्ट्रियानें बोस्निया व हर्जेगोव्हिना हे प्रान्त आपल्या राज्यास जोडले व १९०९ सालीं पार्लमेन्टसभेनें यास संमति दिली. कांहीं दिवसांनीं बल्गेरियासहि स्वातंत्र्य देण्यांत आलें. १९१० सालीं साम्राज्यांत एक मोठें बंड झालें व याच वर्षाच्या सप्टेंबर महिन्यांत टर्की, रुमानिया व ग्रीस, आणि क्रीट यांच्यामध्यें युद्ध सुरू झालें. १९११ हें वर्ष साम्राज्यानें मोठ्या संकटांत घालविलें. सप्टेंबर महिन्याअखेर ट्रिपोलींत अंधाधुंदी चालू असून तुर्की सरकार त्याकडे लक्ष पुरवीत नाहीं या सबबीवर इटलीनें साम्राज्याविरुद्ध लढाई पुकारली. ५ आक्टोबर रोजीं इटालियनांनीं ट्रिपोली शहर काबीज केलें.

तुर्कस्तान व बाल्कनयुद्ध (१९१२-१९१३)— इटली व तुर्कस्तान यांजमध्यें अशा प्रकारें झगडा चालला असतां व त्यांत तुर्कस्तानचा पराभव होऊं लागला असतां दुसरीकडे तुर्कस्तानवर आणखी एक संकट ओढवूं पहात होतें. १९१२ सालीं तुर्कस्तानविरुद्ध व मॅसिडोनियाचें तुर्कस्तानापासून संरक्षण करण्याकरितां ग्रीस, बल्गेरिया, सर्व्हिया इत्यादि राष्ट्रांनीं आपापसांत ''बाल्कन अलायन्स'' नामें जूट केली. तुर्कांनीं मॅसिडोनियामधील स्त्रियांची कत्तल केल्यामुळें बाल्कनराष्ट्रांनीं लढाई पुकारली. यूरोपिंयन प्रमुखराष्ट्रांनीं एकदम युद्ध न पुकारण्याची बाल्कन राष्ट्राला धमकी दिली, तथापि तिला न जुमानतां युद्ध पुकारलेंच. या युद्धांत तुर्कांचा चोहोंकडून पराभव होत गेल्यामुळें १९१२ सालीं तुर्कस्ताननें तहाचें बोलणें सुरु केलें. पण बाल्कनराष्ट्रांनीं मांडलेल्या तहाच्या अटींनां तुर्कस्तान मुळींच संमति देईना. अ‍ॅड्रियानोपल बल्गेरियाला व ईजीयन बेटें ग्रीसला देण्याचें तुर्कस्ताननें साफ नाकारलें. यूरोपियन राष्ट्रांनीं बाल्कराष्ट्राच्या अटी मान्य करण्याबद्दल तुर्कस्तानला परोपरीनें विनंति केली, पण तरुण तुर्की पक्षानें ती जुमानली नाहीं व लढाईला सुरुवात होऊन तुर्कांचाच पराभव झाला. पुढें लंडन येथें तह होऊन, तुर्कस्तानच्या ताब्यांतील यूरोपमधील मुलूख यूरोपीयांच्या ताब्यांत गेला. त्यामुळें बाल्कनराष्ट्रांत कलागत होऊन सर्व्हिया, माँटेनीग्रो, ग्रीस, रुमानिया या राष्ट्रांनीं गल्गेरियावर शस्त्र उपसलें. तुर्कस्ताननें धूर्ततेनें बल्गेरियाविरुद्ध ग्रीस वगैरे राष्ट्रांच्या बाजूनें लढाई पुकारली. हींत बल्गेरियाचा पाडाव झाला. पण या लढाईनंतर झालेल्या तहांत तुर्कस्तानला कांहींच वाटा मिळाला नाहीं. हें पहातांच तुर्कस्ताननें मागील तहाला न जुमानतां आड्रियानोपल ताब्यांत घेतलें. बल्गेरियाहि अगदीं हतबल झाला असल्याकारणानें त्यानें तें तुर्काच्या हातीं राहूं दिलें. या बाल्कन युद्धामुळें तुर्कस्तानची यूरोपमधील सत्ता पुष्कळ अंशी नष्ट झाली; व आस्ट्रिया हंगेरीचें या मुलुखांत जें प्रस्थ होतें तें कमी करण्याकडे इंग्लंड, फ्रान्स, रशिया इत्यादि यूरोपीयन राष्ट्रांचें लक्ष्य वेधलें.

१९१४ सालीं ज्या जगड्व्याळ महायुद्धाला सुरुवात झाली. त्यामध्यें सर्वच यूरोपियन राष्ट्रांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हितसंबंध गुंतले गेले. तुर्कस्तानहि त्याला अपवाद नव्हता. तुर्कस्तानचे जे हितशत्रू, ग्रीस, रशिया वगैरे देश त्यांनां आंतून इंग्लंडच पाठिंबा होता व याच्या उलट, जर्मनीनें तुर्कस्तानच्या महत्त्वाकांक्षांनां आपली सहानुभूति दर्शविली होती. अर्थात तुर्कस्तान हें जर्मनीच्या बाजूनेंच महायुद्धांत पडणार अशी सर्वांची अपेक्षा होती. पण महायुद्ध सुरु झाल्यावर तुर्कस्ताननें एकदम कोणतीहि गोष्ट न करण्याचें ठरविलें. इंग्लंडशीं जाहीर तर्‍हेनें वैर पत्कारण्याला तुर्कस्तान सहजासहजीं धजावेना. तरी पण तुर्की सैन्याचीं सर्व सूत्रें जर्मन अधिकार्‍यांच्या हातीं असल्यामुळें तुर्कस्तानची फौज बाल्कन प्रदेशांत लढण्याला आपल्याला खास मदत करील अशी कैसरची अपेक्षा होती व ज्यावेळीं जर्मनीनें व आस्ट्रियानें बाल्कनच्या मोहिमेला सुरुवात केली त्यावेळीं तुर्कस्ताननें जर्मनीच्या बाजूनें युद्धांत पडण्याचें ठरविलें.

महायुद्ध— महायुद्धमध्यें तुर्कस्तानानें जो भाग घेतला होता त्याचें विवेचन करावयाचें म्हणजे त्याचे चार भाग पडतात. (१) कॉकेशमधील लढाया, (२) मेसापोटेमियांतील लढाया, (३) सिनाई टापूंतील लढाया (४) व सीरियामधील लढाया.

(१) कॉकेशमधील लढाया— कॉकेशसच्या टापूंतील लढायांचें वर्णन देण्यापूर्वी, रशिया व तुर्कस्तानच्या मधील सरहद्दीची स्थिति काय होती हें सांगणें जरुर आहे. या सरहद्दीच्या टापूमध्यें एकहि रेल्वे नव्हती व युद्धाचा दारुगोळा, मोठमोठ्या तोफा वगैरे सामान नेण्याला दळणवळणसाधनांची कोणतीच सोय नव्हती. त्यामुळें लहान लहान रस्ते व वाहतुकीचीं जनावरें यांशिवाय दुसर्‍या कोणत्याहि तर्‍हेनें, लढाईचें सामान नेतां येत नसे. अशी स्थिति असल्यामुळें या टापूंतील लढाया फार जाचक होत असत. अर्झेरुम ते अंगोरा एवढ्या टापूंतच काय ती आगगाडी होती व तेथून कॉकेशसच्या टापूंत उंटाच्या साहाय्यानें सर्व दारूगोळा न्यावा लागत असे. दुसरा एक मार्ग म्हटला म्हणजे, कान्स्टांटिनोपलपासून ट्रेबिझांडपर्यंत समुद्रमार्गानें युद्धसामुग्री नेऊन नंतर अर्झेरुमपर्यंत रस्त्यानें ती न्यावयाची हा होय. म्हणून काळासमुद्र आपल्या ताब्यांत ठेवणें तुर्कस्तानला आवश्यक होतें. पण थोड्या काळापर्यंतच तुर्कांच्या हातून हा समुद्र ताब्यांत ठेवणें शक्य झालें.

१९१४-२८ च्या दरम्यान या टांपूंतील लढायांचें क्षेत्र तुर्की आर्मेनिया हें होतें. हा टापू लष्करी दृष्ट्या मुळींच सोयीचा नाहीं. या टापूंत अनेक लहान मोठ्या पर्वतांच्या रांगा पसरल्या असून, येथील थंडी फार कडक असते. तुर्कांपेक्षां रशियनांच्या ताब्यांत जो थोडाबहुत टापू आहे तो विशेष सोईचा आहे. युद्ध सुरु होतांच रशियानें आर्मेनियाचा बराचसा भाग आपल्या ताब्यांत आणून तुर्कांच्या सरहद्दीपर्यंत ताप्तुरती रेल्वे तयार केली व चांगले रस्तेहि बांधून काढले. त्यामुळें रशियाला या टापूंत लढाई चालविणें बरेंच सोपें झालें. तुर्कांचा लष्करमंत्री एनवर पाशा याला या रशियाच्या लष्करी हालचालींचें मर्मच समजलें नाहीं. तो आपल्याच घमेंडींत होता. कॉर्सचा किल्ला आपल्या ताब्यांत घेऊन रशियाला कैचींत धरण्याचा त्यानें बेत केला. एवढेंच नव्हे तर त्यानं अफगाणिस्तानच्या मार्गानें हिंदुस्थानावर स्वारी करण्याचाहि घाट घातला. पण रशिया हें सर्व जाणून होता. रशियन सैन्यानें अर्झेरुमच्या किल्ल्यावर चाल करण्यासाठीं कूच केलें. तुर्की सैन्यानें कोप्रूक्यूई येथें रशियन सैन्यावर हल्ला केला. प्रथम प्रथम तुर्कस्तानच्या सैन्याला कांहीं ठिकाणीं जय मिळाला. पण पुढें रशियन सैन्याच्या पुढें तुर्की सैन्याचा टिकाव लागणें अशक्य झालें. त्यामुळें हसन इजत पाशा या तुर्कांच्या सेनापतीनें रशियन सैन्यावर हल्ला करण्याचा बेत रहित केला.

एनवर पाशानें काळ्या समुद्राच्या मार्गानें आपलें सैन्य नेऊन रशियांत घुसण्याचा व रशियन सैन्यावर हल्ला करण्याच बेत केला. त्याप्रमाणें तुर्की सैन्य अर्दहन येथें आलें. तेथें रशियन सैन्याची व तुर्की सैन्याची गांठ पडून त्यांत तुर्कांचा पराभव झाला. एनवर पाशानें धीर न सोडतां अर्झेरुमकडें स्वतःच्या देखरेखीखालीं आपलें तुर्की सैन्य नेलें व आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या करुन, अर्झेरुमच्या टापूंत रशियाला घेरून टाकण्याचा बेत केला. पण तुर्की सैन्याची स्थिति फार वाईट असल्यानें या सैन्याच्या हातून हें अवघड काम तडस जाणें शक्य नव्हतें व त्याप्रमाणें तुर्की सैन्याला त्यांत अपयशच आलें. यापुढें एनवरपाशानें या महायुद्धांत फारसा भाग घेतला नाहीं. तुर्कस्तानच्या ग्रँड वझीरानें, महमद केमाल याला सेनाध्यक्ष नेमलें. अर्झेरुम येथें तुर्कांचा पराभव झाल्यानंतर ताबडतोब रशियनांनीं तुर्कांनां सतावण्यास प्रारंभ केला असता तर तुर्की सैन्याची वाताहातच झाली असती पण पोलंडच्या टापूंत रशियनांनां आपलें सैन्य गुंतविणें जरुरीचें झाल्यामुळे कॉकेशसटापूंत मुबलक सैन्य पाठवणें रशियाला शक्य नव्हतें. त्यामुळें रशियन सैन्याचा या टापूंत जितका जोर असावा तितका नव्हता. त्यामुळें महंमद केमालला आपल्या तुर्की सैन्याची संघटना करणें सोपें गेलें. जर्मनांचीं गोबेन व ब्रेस्ला हीं जहाजें काळ्या समुद्राच्या रक्षणासाठीं येथें येऊन बसलीं होतीं पण त्यांनां डार्डानेल्सच्या संरणासाठीं जावें लागल्यामुळें, रशियाला काळ्या समुद्रांत धुडगूस घालण्याला आयतीच संधि मिळाली. रशियन सैन्यानें झंगुलडक व एरग्ली येथील कोळशांच्या खाणीं उध्वस्त करुन टाकल्य व ट्रेबिझांड बंदरावर तोफांचा मारा सुरु केला.

इकडे महंमदकेमालनें आपलें सैन्य वाढवून अर्झेरुमच्या टापूचें संरक्षण करण्यासाठीं त्या सैन्याला आज्ञा केली. या टापूंत लढाई करण्याची धमक रशियन सैन्याच्या अंगीं नव्हती. तेव्हां रशियन सैन्यानें ओल्टिच्या घाटानें, टर्टम येथें कूच केलें. त्याचप्रमाणें अधीदघच्या घाटानें मेलासगर्टपासून बिट्टिसकडे आपल्या सैन्याची एक तुकडी रशियानें पाठवून दिली; या सैन्यानें बिट्टिस काबीज केलें. याचवेळीं रशियानें या बाजूला आपलें अधिक सैन्य पाठवून देऊन मोसलकडे चाल करुन तैग्रिस नदी गांठली असती, अगर युफ्रेटिसच्या मार्गानें खरपूतकडे आपला मोर्चा वळविला असता तर येथील तुर्की सैन्याचा पराभव होऊन, इंग्लंडला तुर्कस्तानला शह देतां आला असता. पण रशियाच्या ताब्यांत इतका सैन्याचा पुरवठा नव्हता. त्यामुळें अर्झेरुमच्या बाजूला फारशी भीती उरली नाहीं अशी स्थिति पहातांच केमालनें आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या, बगदादकडे पाठविल्या. पण याच सुमारास रशियन बादशहा निकोलस यानें काकेशसच्या टापूंतील सैन्याचें आधिपत्य आपल्या ताब्यांत घेऊन, अर्झेरुमचा किल्ला काबीज करण्याचा निश्चय केला. रशियन सैन्यानें अर्झेरुमच्या आसपासचा टापू थोडाक्याच दिवसांत काबीज केला. या टापूंतील तुर्की सैन्याचा अधिपति अबदुल करीमपाशा हा होता. याच्या अंगात लष्करी सेनापतीचे गुण नव्हते त्यामुळें त्याच्या सैन्याला रशियन सैन्यापुढें हार खावी लागली व अर्झेरुमचा किल्ला १९१६ च्या फेब्रुवारी महिन्यांत रशियनांच्या हातीं पडला. एवढ्यानेंच निकोलसचें समाधान न होतां, त्यानें तुर्की सैन्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन, पुढें कूच करुन ममखटन शहर काबीज केलें व थोडक्याच दिवसांत ट्रेबिझांडहि आपल्या ताब्यांत आणिलें. ट्रेबिझांड ताब्यांत आल्यामुळें रशियनांच्या ताब्यांत काळ्या समुद्राचें नाकें आल्यासारखें झालें व रशियन सैन्य खुद्द कॉन्स्टांटिनोपलवरहि चाल करुन येईल अशी अकारण भीति तुर्कांनां वाटूं लागली. तेव्हां मात्र तुर्कोचे डोळे उघडले. या रशियनांच्या प्रगतीला आळा घालण्याची आवश्यकता तुर्कांनां वाटूं लागली व त्याप्रमाणें या टापूंत त्यांनीं आपले सर्व सैन्य एकवटण्यास सुरुवात केली; व या सैन्याच्या साहाय्यानें अर्झेरुमच्या मागून व पुढून रशियनांना शह देण्याची तुर्कांनीं तयारी केली. पण तुर्की सैन्याची व्यवस्था फार वाईट होती; व त्यामुळें त्यांचा हा बेत त्यांनां सिद्धीस नेतां आला नाहीं. इकडे तुर्की सैन्याच्या दुसर्‍या एका तुकडीनें ट्रेबीझांडच्या पूर्वेस कांहीं ठिकाणें सर केलीं व ट्रिबिझांड शहर काबीज करण्याचा घाट घातला. पण या बेताची बित्तंबातमी रशियनांनां अगाऊच समजल्यामुळें त्यांनीं तुर्की सैन्याची डाळ शिजूं दिली नाहीं. एर्झिझन व बैबर्ट येथील लढायांत तुर्की सैन्याचा पूर्ण पराजय होऊन तुर्की सैन्य रानोमाळ धांवत सुटलें. अशा रीतीने सर्वं बाजूंनीं तुर्की सैन्याला अपयशच येत गेलें.

याच सुमारास अ‍ॅड्रिया येथें वहाबी पाशा तुर्की सैन्याची उत्कृष्ट तर्‍हेनें संघटना करण्यासाठीं खटपट करीत होता. मुस्ताफा केमाल पाशा याला सैन्याचें आधिपत्य देण्यांत आलें होतें. या सैन्याकडे आर्मेनियाचा टापू ताब्यांत घेण्याचें काम देण्यांत आलें होतें. पण आर्मेनियांतील लष्करीदृष्ट्या सर्व महत्त्वाचीं ठाणीं रशियाच्या ताब्यांत होतीं. शिवाय काळा समुद्र देखील रशियाच्याच ताब्यांत होता. अशा स्थितींत तुर्की सैन्यानें रशियन सैन्यावर चढाई करूं पाहणें म्हणजे शुद्ध वेडेपणाचें होतें, उलट रशियन सैन्यानेंच चढाई करण्याची तयारी चालविली होती. बगदादच्या टापूंत इंग्लिश सैन्यालाहि जय येत चालला होता. पण खुद्द रशियांत दुसरीकडे व्होलिनिया येथें ब्रूसिलाव्ह सेनापतीनें जर्मनीविरुद्ध चढाई करण्याचा घाट घातल्यानें, रशियन सैन्य या बाजूला गुंतविणें भाग पडूं लागले. अर्थातच कॉकेशस टापूंतील बरेंच सैन्य तेथून काढून नेणें रशियाला आवश्यक झालें. शिवाय रशियांतच बंडाळी सुरु झाली. व रशियाचें लक्ष अंतःस्थ परिस्थिति सुधारण्याकडे लागलें. या कठिण परिस्थितीचा फायदा तुर्कस्ताननें घ्यावयाला पाहिजे होता. पण उत्कृष्ट सैन्याच्या अभावीं व चतुर सेनापतीचें साहाय्य नसल्यानें हा फायदा तुर्कांनां घेतां आला नाहीं. पण जर्मनीला मात्र तुर्क सेनापती धडधडीत खोटे संदेश पाठवीत होते व आपल्या पराक्रमाच्या थापा मारून त्यांनीं जर्मनीला झुलवित ठेवलें होतें.

बगदाद इंग्लंडच्या ताब्यांत आलें त्यावेळीं रशियनांनीं मोसल काबीज करण्याचा प्रयत्‍न केला असता तर त्यांत त्यांनां सहज यश मिळालें असतें. पण रशियांतील अंतःस्थ परिस्थिति फारच बिघडल्यामुळें रशियाला युद्धापासून पराङ्मुख होऊन मध्य यूरोपीयन राष्ट्रांशीं तह करावा लागला. त्यामुळें आपलें सर्व सैन्य कॉकेशस टापूंतून काढून घेणें रशियाला भाग पडलें. त्यामुळें तुर्की सैन्यानें हा टापू काबीज करण्याची पुन्हां उमेद धरली. अर्थांत या टापूंत कोणाचाच विरोध नसल्यामुळें हा टापू काबीज करणें फारसें अवघड नव्हतें पण कॉकेशसच्या टापूचा नसता वागुलबोवा करुन तुर्कांनीं आपलें सैन्य याच ठिकाणीं एकत्र केलें. या तुर्की सैन्यानें थोडक्याच दिवसांत सर्व कॉकेशसचा टापू आपल्या ताब्यांत घेऊन तो आपल्या साम्राज्याला जोडून घेतला.

या कॉकेशस टापूंतील विजयामुळें तुर्कांनां आतां स्वर्ग दोन बोटें उरला. पण अध्यापि दुसरीं युद्धक्षेत्रें तुर्कांनां लढवावयाचीं होतीं. पण तिकडे लक्ष द्यावयाचें सोडून तुर्की सैन्य याच टापूंत मजा मारीत बसलें. जर्मनीसारख्या मुत्सद्दी राष्ट्रालाहि या तुर्की सैन्याच्या विजयाचा उन्माद चढला. अशा वेळीं खरा मार्ग म्हणजे कॉकेशियामधून सर्व सैन्य काढून नेऊन ज्या ठिकाणीं सैन्याची जरुरी असेल त्या ठिकाणीं त्याचा उपयोग करावयाचा; पण कॉकेशमध्येंच जर्मनांनीं आपलें सैन्य पाठविण्यास सुरुवात केली. अंतःस्थ हेतु हा कीं या टापूमध्यें आपलें वर्चस्व पूर्णपणें प्रस्थापित करुन हिंदुस्थानावर स्वारी करावयाची. असल्या पोरकट कल्पनेला एनवरपाशानें थारा दिला यांत विशेष आश्चर्यकारक कांहींच नाही, पण जर्मन मुत्सद्यांनीं या कल्पनेचे देव्हारे माजवावेत यांपरतें आश्चर्य तें कोणतें ?

मेसापोटेमियामधील युध्दें— महायुद्धांत मेसापोटेमियाच्या भागांत इंग्लिश व हिंदी सैन्यानें जीं युध्दें केलीं त्या युद्धांच्या मुळाशीं तीन हेतू होते. (१) करुन येथील अ‍ॅंग्लोपर्शियन तेलाच्या कोठारांचें रक्षण करणें, (२) ब्रुसाच्या भोंवतालचा प्रदेश ताब्यांत घेऊन, इराणच्या आशाताभोंवतालच्या टापूंत आपला ताबा प्रस्थापित करणें व (३) आटोमन साम्राज्याच्या व हिंदुस्थानच्या दरम्यानच्या टापूंत आपला वचक बसविणें. तुर्कांनीं ज्यावेळीं दोस्तराष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलें त्याच वेळीं इंग्रजांनां खात्रीपूर्वक असें वाटत होतें कीं, जर्मनांच्या चिथावणीनें तुर्की सरकार आपलें सैन्य इराण व अफगाणिस्तान येथें धाडून देऊन या भागांत पुष्कळ धुमाकूळ घालील. त्यामुळें हिंदी सैन्याच्या ६ व्या तुकडीला या भागांत पाठवण्याची कामगिरी ब्रिटिश सरकारनें अगोदरच करुन ठेविली होती.

सर ए. बॅरेटचया हाताखालीं सैन्य देऊन त्यास या भागांत रवाना केल्यानंतर थोडक्याच दिवसांत बगदाद हें शहर ब्रिटिशांच्या ताब्यांत आलें. पण तुर्की सैन्य या टापूंत मोठ्या प्रमाणावर येऊं लागलें होतें व त्यापैकीं कांहीं अहवाझ शहराजवळ व उरलेलें नासीरियाच्या आसपास जमूं लागलें होतें. अर्थातच या टापूंत आपली सत्ता असणें हिंदुस्थान सरकारला अवश्य वाटल्यावरून या सरकारनें आपलेंहि सैन्य वाढविण्यास प्रारंभ केला. निक्सन यास बॅरेटच्या जागीं सेनाध्यक्ष करण्यांत आलें व सहाव्या तुकडीवर जनरल टाउनशेंड याची नेमणूक करण्यांत आली. तुर्की सैन्याची अहवाझ येथें अ‍ॅग्लोइंडियन सैन्याशीं लढाई झाली तींत तुर्की सैन्याचा पराभव झाला व नसीरिया येथील तुर्की सैन्याला ब्रिटिश सैन्यापुढें हार खावी लागली. यामुळें उमेद येऊन निक्सननें अमरा शहर काबीज केलें व नसीरिया शहरहि थोडक्याच दिवसांत आपल्या ताब्यांत घेतलें.

अशा रीतीनें हिंदुस्थान सरकारला या टापूंत जय मिळत गेल्यामुळें मेसापोटेमियाचा बहुतेक भाग काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा या सरकारच्या मनांत प्रादुर्भूत झाली; व त्याप्रमाणें कुट येथें जाऊन तें शहर काबीज करण्याचें निक्सननें ठरविलें. कुस येथें नूरउद्दिनबेच्या आधिपत्याखालीं तुर्की सैन्य जमत आहे अशी बातमी निक्सन यास समजली होती. निक्सननें कुट येथें जाणार्‍या अ‍ॅग्लोइंडियन सैन्यावर टाऊनशेंडची नेमणूक केली होती. त्याप्रमाणें तो कूच करीत कुचपासून १५ मैलांवर येऊन ठेपला. तेथें असलेल्या तुर्की सैन्याचा त्यानें पराभव करुन नुरउद्दीनबेशीं लढाई देण्यासाठीं तयारी देण्यांत कांहीं दिवस घालविले. १९१४ सालच्या आक्टोबरच्या अखेरीस त्यानें नूरउद्दिनच्या सैन्यावर हल्ला करुन तुर्की सैन्याचा पराभव केला.

कुट हें शहर लष्करीदृष्ट्या महत्त्वाचें होतें. येथें तैग्रीस युफ्रेटीस नद्यांच्या प्रदेशांत जाणारे रस्ते एकत्र मिळाले होते. बगदाद, नासिरीया अगर अमदा या शहरांकडे जाणारे रस्ते याच शहरांवरुन जात होते. अशा या महत्त्वाच्या ठिकाणचा टाउनशेंडनें कबजा घेतला. पण तो ताबा राखणें फार कठिण काम होतें. तुर्की साम्राज्याच्या खास टापूंतच या सैन्यानें आपला तळ दिला होता. जवळपास या सैन्याला मदत मिळण्याची आशाहि नव्हती. त्यामुळें कुट राखणें म्हणजे फारच प्रयासाचें काम होतें. पण ब्रिटिशांचा हेतु कुटपासून बगदादवर चाल करुन तें शहर ताब्यांत घेण्याचा होता. त्याचप्रमाणें हिंदुस्थान सरकार व ब्रिटिश सरकारनें परस्पर खल करुन टाउनशेंड यास बगदादकडे कूच करण्याचा हुकूमहि दिला होता, त्याप्रमाणें कूच करीत करीत टाउनशेंड हा टेसीफॉन शहराच्या जवळ येऊन पोहोंचला. या ठिकाणीं तुर्की सैन्यानें आपला तळ दिला होता व शत्रूंशीं युद्ध करण्यासाठीं कडेकोट तयारी केली होती. या भागांत रोज तुर्की सैन्य नवें नवें जमा होत होतें. शेवटीं या दोन्हीं सैन्यांची एकदांची गांठ पडून चकमक झडली. त्यांत प्रथम ब्रिटिश सैन्याचा जय झाला. पण उत्तरोत्तर तुर्की सैन्याची संख्या फुगूं लागल्यामुळें टाउनशेंडला आपल्या बळाबद्दल संशय उत्पन्न होऊं लागला व मागें परतण्यांतच आपलें हित आहे असें वाटूं लागलें व त्याप्रमाणें त्यानें मागें पाय घेण्यास सुरुवात केली.

टाउनशेंडनें पिछेहाट सुरु केली एवढें तुर्की सैन्याला कळतांच मग काय विचारतां ? या सैन्यानें टाउनशेंडला हर तर्‍हेनें सताऊन सोडण्यास सुरुवात केली. तथापि अनेक संकटांनां तोंड देऊन टाउनशेंड कसाबसा कुट येथें येऊन पोहोंचला. पण तेथें येतांच त्याच ठिकाणी मुक्काम करण्याचा हुकूम त्याच्या हातांत पडला. त्यामुळें त्याला आपल्या कमकुवत झालेल्या सैन्याच्या बलावर विसंबून तेथेंच रहाणें भाग पडलें. टाउनशेंडला कुमक मिळावी यासाठीं ब्रिटिश सरकारनें आइलमीरच्या हाताखालीं बरेंच सैन्य देऊन रवाना केलें. या सैन्याची मध्यंतरीं एक दोनदां तुर्की सैन्याशीं चकमक झडून त्यांत तुर्की सैन्याला हार खावी लागली. पण हन्ना येथें मात्र ब्रिटिश सैन्याचा पराभव झाला. पुढें आइलमीरच्या जागीं गॉरिंजची नेमणूक झाली. त्यानें हन्ना शहर आपल्या ताब्यांत घेतलें पण पुढें कुच करतांना त्याला तुर्कांच्या पुढें हार खावी लागली. इकडे कुट ठाणें तुर्की सैन्यानें घेरल्यामुळें कुट येथील सैन्याला तुर्कांनां शरण जाणें भाग पडलें.

ब्रिटिशांनीं हा आपला अपमान नाहींसा करण्यासाठीं आतां कंबर बांधली. जनरल मॉड याला अ‍ॅग्लोइंडियन सैन्याचा अधिपति नेमण्यांत आलें. यानें मागील सेनापतींनीं आपल्या आवांक्याबाहेरच्या कामगिरीसाठीं हात घातलेला होता तसें न करतां त्यानें आपल्या सैन्याची कडेकोट तयारी केली व नंतर तो आपल्या सैन्यासह सन्नाइमत येथें आला. तेथील तुर्की सैन्याचा त्यानें पराभव करुन त्यांनां पिटाळून लावलें. लगेच त्यानें पुढें कूच करुन कुट शहरावर हल्ला केला व तेंहि शहर काबीज केलें. यानंतर त्यानें बगदादला शह देण्याची तयारी चालविली. कांहीं दिवस विश्रांति घेऊन त्यानें आपल्या सैन्याला बगदादकडे कूच करण्याचा हुकूम फर्मावला. वाटेंत त्यानें एक दोनदां तुर्की सैन्याचा पराभव करून बगदाद गांठलें. तेथील तुर्की सैन्यानें भीतीनें आपला पाय अगोदरच काढला होता. त्यामुळें बगदाद हें शहर बिन प्रयासानें मॉडच्या हातीं पडलें. अशा रीतीनें अवघ्या चार साडेचार महिन्यांच्या अवधींत मॉडनें बगदादवर ब्रिटिश निशाण फडकाविलें व अशा रीतीनें ब्रिटिशांचा झालेला अपमान पार धुवून टाकण्याच्या कार्यांत त्यानें यश मिळविलें.

बगदाद शहर हातीं आल्याबरोबर मॉडनें कुट ते बगदाद पर्यंत रेल्वे तयार केली. यानंतर त्यानें पर्शियामध्यें घुसण्याचा निश्चय केला. इकडे तुर्क व जर्मन सैन्यानें बगदाद शहर परत मिळविण्यासाठी तयारी चालविली होती. पण तिकडे लक्ष न देता मॉडनें युफ्रेटीस नदीच्या कांठचें रमडी हें शहर काबीज करुन घेतलें. पुढें तैग्रिस नदीवर तिंक्रिट हेंहि ठाणें त्याच्या हातीं पडलें. पण याच सुमारास मॉड हा कॉलर्‍यानें आजारी पडून मरण पावला व त्याच्या जागीं मार्शल याची नेमणूक झाली.

कॉकेशस टांपूंतील लढाईंत बाक हें तुर्कांच्या हातीं लागल्यामुळें मार्शल यास बगदादकडून मोसलकडे चाल करुन जाण्याचा हुकूम झाला. त्याप्रमाणें मार्शल हा सैन्यासह मोसलकडे निघाला. या प्रांतांत तुर्की सैन्य मोठ्या प्रमाणावर जमा झाललें होतें; व लष्करीदृष्ट्या महत्त्वाचीं ठाणीं तुर्कांच्या हातीं होतीं. त्यामुळें मार्शलनें वळणावळणानें तुर्की सैन्याला शह देण्याचा बेत केला. त्यानें कॉब सेनापतीच्या हाताखालीं सैन्य देऊन मोसलकडे रवाना केलें व स्वतः त्यानें आपलें सैन्य फथाच्या बाजूकडे आणलें. अशा रीतीने दोन्ही बाजूस तुर् सैन्याला जेरीस आणले. अशी परिस्थिति पहाताच तुर्कांचा सेनापति इस्माइल हक्की पाशा यानें पिछेहाटीचें धोरण स्वीकारून, तो लेसरझाब नदीच्या कांठीं आला. पण आंग्लोइंडियन सैन्यानें त्या ठिकाणांतहि तुर्की सैन्याला गांठून त्याचा पराभव केला. पुढें मोसलच्या आसपासहि या दोन्ही सैन्यांची लढाई होऊन शेवटीं त्यांत तुर्की सैन्याचा हिरमोड झाला. मोसल ब्रिटिशांच्या ताब्यांत पडलें पुढें दोनच दिवसांनीं दोस्त राष्ट्रें व जर्मनी यांच्यामध्यें युद्धतहकुबीच्या खलित्यावर सह्या झाल्याचें वर्तमान जाहीर झालें.

सिनाई टापूंतील लढाई— इ.स. १९१६ च्या जानेवारी महिन्यांत डार्डानेल्सची स्वारी शेवटास गेली व या टापूंतील सैन्याला ईजिप्‍तकडे जाण्याचा हुकूम झाला. ईजिप्‍तवर तुर्कांची स्वारी झाल्यास ईजिप्‍तचें संरक्षण करण्यासाठींच ब्रिटिशांनीं ही आगाऊ तरतूद केली होती. या सैन्यावर सर अर्चिबाल्ड मरे याची नेमणूक झाली होती. मरेच्या हाताखालीं यावेळीं मुबलक सैन्य होतें पण थोडक्याच दिवसांत त्यापैकीं निम्याहून अधिक सैन्य, फ्लँडर्सच्या टांपूंत जरुरी असल्यामुळें नेण्यांत आलें. उरलेल्या थोड्या सैन्याच्या सहाय्यानें मरे याला ईजिप्‍तचें संरक्षण करणें भाग पडलें. लगेच मरेनें, सुवेझच्या कालव्यापासून २५ मैल अंतरावर उत्तरसिनाई पर्वताच्या आश्रयानें आपली सेना कडेकोट तयारींत ठेवण्याचा उद्योग सुरु केला. रोमानी येथें त्यानें आपलें सैन्य एकत्र केलें होतें. या ठिकाणापासून जवळच शत्रुसैन्याची छावणी होती.

कांहीं दिवस विश्रांति घेतल्यानंतर त्यानें ईजिप्‍तच्या सरहद्दीकडे आपला मोर्चा वळविला. १९१६ च्या ऑगस्ट महिन्यांत तुर्कांनीं ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला पण या चकमकींत तुर्की सैन्याचा पराभव झाल्यामुळें, तुर्कांनां कोटिया शहर सोडावें लागून डोंगरांचा आश्रय घेणें भाग पडलें. पण या ठिकाणींहि ब्रिटिश सैन्यानें त्यांनां सतावून टाकण्यास सुरुवात केली. प्रथम तुर्कांनीं ब्रिटिशांनां दाद दिली नाहीं. पण पुढें त्यांनां आपली जागा सोडून पिछेहाट करणें जरूरीचें झालें व त्याप्रमाणें तुर्की सैन्य एलरिझच्या आसपास येऊन राहिलें. पण कांही काळानंतर येथेंहि ब्रिटिशांनीं त्यांचा पठलाग केला व त्यांच्या सैन्याची दुर्दशा करुन टाकली. त्यामुळें तुर्कांनांस या टापूंतून आपला पाय काढूनच घेणें भाग पडलें. आतां या टापूंत तुर्की सैन्य जवळ जवळ २ हजार उरलें होतें व पॅलेस्टाईच्या आसपास त्या सैन्याचा तळ होता. या सैन्याला हुसकून लावण्याचें काम जनरल चेटवुडकडे देण्यांत आलें होते. झेलाल येथें दोन्ही सैन्यांची तुंबळ लढाई होऊन मोठ्या मुष्किलीनें ब्रिटिशांचा जय झाला, व सिनाई टापूंतील तुर्की सैन्य जवळ जवळ नाहीसेंच झालें.

गाझा व बीरशेबा यांच्या दरम्यानचा टापू अद्यापि तुर्कांच्या ताब्यांत होता. ईजिप्‍तहून पॅलेस्टाईनवर स्वारी करावयाची असल्यास या मुलुखाचा ताबा असणें अत्यावश्यक होतें. पण यासाठीं जितकी फौज असावयास पाहिजे तितकी फौज ब्रिटिशांजवळ नव्हती. शिवाय इतक्यांत या प्रांतांत चढाईचें धोरण स्वीकारूं नये असें युद्धमंडळानें मरे यास कळविलें होतें. त्यामुळें मरेला स्वसंरक्षणाच्या पलीकडे कांहींच करतां येत नव्हतें.

गाझा येथें तुर्कांचें सैन्य जवळ जवळ ७००० होतें व इतकेंच सैन्य, टेलेश शरिया व बीरशेबा या ठिकाणीं होतें. त्यामुळें या सैन्याला तोंड दिल्याशिवाय तर मरेला गत्यंतर नव्हतें. तेव्हां त्यानें चढाईचें धोरण स्वीकारण्याबद्दल कशी बशी परवानगी युद्धमंडळाकडून मिळविली व सैन्यावर हल्ला करण्याच्या कामीं जनरल डोबेल व जनरल चेटवुड यांची नेमणूक केली.

गाझाला जाणारा रस्ता फार खराब होता. शिवाय डोबेल व चेटवुड यांच्या जवळचें सैन्यंहि पुरेसें नव्हतें. तेव्हां अशा अपुर्‍या सैन्याच्या सहाय्यानें गाझा येथील तुर्की सैन्याला हांकून लावावयाचें म्हणजे त्यांच्यावर अचानक छापा घालून त्यांनां पळावयास लावणें एवढाच उपाय होता व त्याप्रमाणेंच डोबेलनें करावयाचें ठरविलें. आपल्या सैन्याला अगदीं आवश्यक अशा सामानसुमानासकट त्यानें रात्रीच्या वेळीं प्रवास करुन सकाळीं तो एकदम गाझाजवळ येऊन धडकला. त्यामुळें तुर्की सैन्याची धांदल उडून गेली. तरी पण त्यांतल्यात्यांत तुर्कांनीं व्यवस्थितपणें इंग्रजांबरोबर लढाई सुरु केली. तुर्की सैन्यानें या लढाईंत चांगला पराक्रम गाजविला. पुष्कळदां डोबेल यास माघार घ्यावी लागली. भरपूर सामानाच्या अभावीं इंग्रज सैन्याचे फार हाल झाले. तथापि संकटाला न जुमानतां, लष्करी डावपेचांच्या साहाय्यानें एक दिवस लढाई करून आपलें असंख्यात सैन्य बळीं देऊन, डोबेलनें गाझा शहर आपल्या ताब्यांत घेतलें.

पण गाझा शहराच्या आसपासचा टापू अद्यापि इंग्रजांच्या ताब्यांत आला नव्हता व तो आल्याशिवाय नुसतें गाझा शहर जिंकण्यानें कांहींच कार्यभाग होण्यासारखा नव्हता. पण आसपासचा टापू जिंकावयाचा म्हणजे, इंग्रजांची फौज पुष्कळच वाढावयाला पाहिजे होती. नवीन दळवळणाचीं साधनें तयार करणें जरुर होतें. यासाठीं मरे यास पुष्कळ दिवस स्वस्थ बसावें लागलें. शेवटीं तयारी झाल्यानंतर मोहिमेला पुन्हां सुरुवात झाली. तुर्कांनींहि आपली तयारी जय्यत केली होती. त्यामुळें इंग्रजांनां तुर्कांबरोबर लढतांना पुष्कळवेळां हटावें लागलें. त्यामुळे पुष्कळ दिवस लढाई करुन इंग्रजांच्या हातीं फारसा मुलूख लागला नाहीं. जेवढा मुलूख मिळेल तेवढ्याची पूर्ण व्यवस्था लावून मग पुढें जावयाचें असा इंग्रजी फौजेचा क्रम होता. पण उत्तरोत्तर मरेच्या सैन्याचे तुर्कांच्या पुढें कांही चालेना व मिळालेल्या मुलुखावरच या टापूंतील लढाई ब्रिटिश सैन्याला बंद ठेवावी लागली.

पॅस्टाईनमधील लढाया— १९१७  च्या एप्रिल महिन्यांत जर्मनीच्या प्रचंड हल्ल्याविरुद्ध इंग्रजांनीं गाझा शहराचें रक्षण केलें. हें पहातांच जर्मनांनीं तुर्कस्तानच्या गाझा बीरशेबा टापूमध्यें पुष्कळ सैन्य जमवून गाझा शहरांतून इंग्रजांनां हांकून लावण्याचें ठरविलें. पण या सुमारास तुर्कस्तानांत विश्वेस्लाम (पॅन इस्लाम) पक्ष जोरांत असल्यानें तुर्कांचें लक्ष्य बगदाद, मक्का इत्यादि धर्मदृष्ट्या पवित्र मानलेलीं शहरें पुन्हां परत मिळण्याकडे लागलें होतें. त्यामुळें जर्मन सैन्याच्या वरील विनंतीला मान देण्याइतकें तुर्कस्तानला स्वास्थ्य नव्हतें. कॉन्स्टांटिनोपल मधून इराक परत मिळविण्यासाठीं एकसारख्या सैन्याच्या तुकड्याच्या तुकड्या रवाना होत होत्या. पण थोडक्याच दिवसांत, तुर्क सरकारला समजूं लागलें कीं पॅलेस्टाइनमध्यें जर आपली सेना ताबडतोब पाठविण्यांत न येईल तर, त्या भागांत शत्रूंची सत्ता प्रस्थापित होऊन, त्याचे भयंकर परिणाम झाल्याशिवाय राहाणार नाहींत. पण विश्वेस्लाम पक्षाच्या विरोधामुळें, तुर्कस्तानला बराच काळ आपली फौज पॅलेस्टाइन टापूंत पाठवितां आली नाहीं व ज्यावेळी पाठवली त्यावेळीं तिचा फारसा उपयोग झाला नाहीं. उशीरानें कां होईना पण जी फौज पॅलेस्टाईनमध्यें पाठविण्यांत आली, त्या फौजेचा सेनापति मार्शल फाकेन हाइन होता. त्यानें ब्रिटिशांच्या हल्ल्यापूर्वीच ब्रिटिश फौजेवर चढाई करण्याचा घाट घातला पण या भागांत दळणवळणाचीं मुबलक साधनें नसल्याकारणानें व हैदरपाशाचा सुभेदार अहंमद जमालपाशा हा जर्मनांचा पक्षपाती नसल्यानें, या तुर्की फौजेला चढाई करण्याला फार विलंब लागला. या टापूंतील इंग्रज सैन्याचा सेनापति जनरल अलेनबी हा होता. तुर्की फौजेचा उद्देश ध्यानांत येतांच त्यानें तोंड देण्याच्या हेतूनें कडेकोट तयारी केली. आक्टोबरच्या ३०-३१ तारखेला या दोन्ही सैन्यांमध्यें रणकंदनाला सुरुवात झाली. शेवटीं भयंकर कत्तलीनंतर इंग्रजांनीं बीरशेबा हें शहर काबीज केलें.

त्यानंतर अलेनबीनें गाझा शहराकडे आपलें लक्ष्य दिलें. त्याच्या पूर्वी इंग्रज सैन्यानें ''अब्रेला हिल'' हें ठिकाण काबीज केलें. पुढें काहीं दिवसानंतर कुबिलेफ हें शहर काबीज केलें. अशा रीतीनें तुर्कांनां गाझाच्या टापूंत कोंडून, अलेनबीनें गाझा शहरावर हल्ला करण्याचा बेत केला. तुर्कांनीं तर या ठिकाणीं कडेकोट तयारी केली होती. त्यामुळें अलेनबीला गाझा शहर ताब्यांत येणें फार अवघड गेलें. पण सैन्यांतील शिस्तीच्या जोरावर व लष्करी डांवपेचानें त्यानें शेवटीं गाझा शहर आपल्या ताब्यांत घेतलेंच. याच्या पुढचा अलेनबीचा बेत जेरूशलेम हें तुर्कांचें पवित्र स्थान काबीज करणें हा होता. त्यामुळें त्यानें तिकडे मोर्चा वळविला. तुर्कांनींहि हें धर्मक्षेत्र राखण्याचा अटोकाट प्रयत्‍न करण्याचें ठरविलें. अलेनबीचें सैन्य हळू हळू एकेक ठिकाण काबीज करीत पुढें चाललें. तुर्कांनींहि जागजागीं त्यांनां विरोध करण्याचा सपाटा चालू ठेवलाच होता. पण विरोध सहन करुनहि इंग्रज फौज हळू हळू पुढचा मार्ग आक्रमीत होतीच. कुस्तुल, सोभा, तेबी समविल इत्यादि महत्त्वाचीं ठिकाणें तुर्कांनां सोडावीं लागलीं होतीं. पण तेबी समावेल येथें इंग्रज सैन्य येतांच अलेनबीनें तेथेंच कांही दिवस विश्रांति घेण्याचा बेत केला. सारखे महिनेच्या महिने विश्रांतीशिवाय इंग्रज फौजेला लढावें लागल्यामुळें, विश्रांतीची अत्यंत आवश्यकता भासणें साहजिकच होतें. पण या विश्रांतीच्या काळांत तुर्कांनींहि आपल्या सैन्याची व्यवस्था लावली व कांहींहि करून जेरुशलेमचें रक्षण करण्याची त्यांनीं प्रतिज्ञा केली.

विश्रांति घेऊन झाल्यानंतर पुन्हां हालचालीला सुरुवात झाली. इंग्रज सैन्यानें कूच करुन मोठ्या मुष्किलीनें हिरात शहर काबीज केलें. त्यानंतर पुन्हां इंग्रजी सैन्यानें लिफ्टा शहरावर हल्ला केला, व तेंहि शहर काबीज केलें. लिफ्टा शत्रूंच्या ताब्यांत पडतांच तुर्की सैन्याचें धाबें दणाणलें; व त्यांनीं जेरुशलेमपासून मागें हटण्यास प्रारंभ केला. याच वेळेस अलेनबीनें तुर्कांचा पाठलाग केला असता तर तुर्कांची दाणादाण उडून गेली असती. पण जेरुशलेम आपल्या हातीं सहज पडणार अशी अलेनबीला खात्री वाटत असल्यानें त्यानें शांततेनें तें शहर काबीज करण्याचा निश्चय केला. थोडक्याच दिवसांत जेरुशलेम हें इंग्रजांच्या हातीं कांहींहि भानगड न होतां पडलें. यरुशेलेम हातीं आल्यानंतर त्याची बंदोबस्ती करण्यास अलेनबी लागला. जेरुशलेम काबीज करण्याचा तुर्क खात्रीनें प्रयत्‍न करणार असें अलेनबीला वाटत होतें व त्यासाठीं त्यानें आसपासच्या मुलुखामध्यें बंदोबस्त ठेवून तुर्कांच्या स्वारीला तोंड देण्याच्या तो तजविजीला लागला.

अलेनबीच्या अंदाजाप्रमाणें तुर्की सैन्यानें जेरुशलेम ताब्यांत घेण्याचा प्रयत्‍न केलाच. पण ब्रिटिश फौजेची जय्यत तयारी असल्यामुळें बिचार्‍या तुर्कांचें कांहींच चाललें नाहीं. माऊंट एफ्राहिम येथील लढाईंत तुर्कांचा पूर्ण पराभव झाला. पण अद्यापिहि जोरिच व जॉर्डनचा टापू तुर्कांच्या ताब्यांत होता. तो हस्तगत केल्याशिवाय हा टापू निर्धास्त झाला असें म्हणतां येत नव्हतें. यासाठीं जोरिचवर ब्रिटिश सैन्य पाठवण्यांत आलें. या सैन्यानें जोरिच काबीज केलें. पुढें अलेनबीनें जॉर्डन ताब्यात घेऊन, घोरनियेंचा पूल ताब्यांत घेतला. नंतर एससाष्टा शहर जिंकण्यांत आलें, पण उत्तरोत्तर तुर्कांचा विरोध अधिक होऊं लागल्यामुळें अलेनबीला जलदी करतां येईना. तशांत फ्रान्सच्या रणक्षेत्रावर सैन्याची जरुरी भासूं लागल्यामुळें अलेनबीच्या सैन्यांतील जवळ जवळ निम्में सैन्य तिकडे पाठवावें लागलें व त्याच्या बदली हिंदुस्थानांतील सैन्य अलेनबीला देण्यांत आलें. या सैन्याला शिक्षण देण्यांत अलेनबीचा बराच वेळ मोडला. अशा रीतीनें कांहीं दिवस व्यर्थ गेल्यानंतर पुन्हां मोहिमेला सुरुवात झाली. अलेनबीच्या सैन्यानें तुलकेरम आपल्या ताब्यांत घेतलें. त्यानंतर कार्मेल टेंकडी आपल्या ताब्यांत घेऊन, मेगोडोच्या घांटानें नाझरेथवर चाल करुन तें शहर अलेनबीनें जिंकून घेतलें. यानंतर नॅबुलस शहर इंग्रजांच्या हातीं लागलें. अम्मन शहराजवळ तुर्कांनीं जोराचा विरोध केला पण त्या ठिकाणींहि शेवटीं तुर्कांना हार खावी लागली.

यानंतर अलेनबीनें दमास्कसवर हल्ला करण्याचें ठरविलें. अक्रे आणि हैफ येथें तुर्कांनीं ब्रिटिश सैन्याला पुष्कळ वेळ थोपवून धरलें पण शेवटीं तुर्कांची फळी फोडून इंग्रज फौजेनें जय मिळविला. अशाच प्रकारचा विरोध जिस्त्र बनत याकुब येथें ब्रिटिशांनां झाला. पण तुर्कांची कांहीं मात्रा चालली नाहीं. शेवटीं दमास्कसवर ब्रिटिश फौजेनें चढाई करुन तुर्कांची दाणादाण करुन सोडली व दमास्कस शहर आपल्या ताब्यांत आणलें. या लढाईंत बरेंच तुर्की सैन्य ब्रिटिश सैन्याच्या हातीं लागलें.

अशा रीतीनें दक्षिण व मध्य सीरिया अलेनबीच्या हातांत पडला. या सर्व प्रदेशाची पूर्ण व्यवस्था लावल्यानंतर, तुर्की सैन्याचा पाठलाग करण्याच्या बेतास अलेनबी लागला. अलेनबीनें आपल्या सैन्याचा कांहीं भाग टायरकडे पाठवून तें शहर जिंकलें त्यानंतर बैरुट, ट्रिपोली हेहि टापू इंग्रजांच्या ताब्यांत आले. दुसर्‍या तुकडीनें अलेप्पोवर स्वारी करुन तें शहर आपल्या ताब्यांत घेतलें व अलेक्झांड्रेटा मार्गांत तुर्कांचा पराभव करुन त्यांनां बगदादच्या पलीकडे पार पिटाळून लावलें.

महायुद्ध संपल्यानतंर— तुर्कस्तानमधील राष्ट्रीय पक्षानें इसवी सन १९१९-२० मध्यें राष्ट्रीय तुर्कस्तान नांवाचें एक स्वतंत्र संस्थान स्थापन केलें. दोस्त राष्ट्रांनीं आपल्या विजयानंतर, तुर्कस्तानवर ज्या अटी लादल्या त्या राष्ट्रीय तुर्कांनां मान्य झाल्या नाहींत. या अटींप्रमाणें तुर्की अरबस्तान, पॅलेस्टाइन, मेसापोटेमिया इत्यादि प्रदेशांनां तुर्कस्तान मुकावयाचा होता. तुर्कस्तानच्या जमाबंदीवर परराष्ट्रांनीं देखरेख रहावयाची होती. एजियन ते काळा समुद्र या टापूमधील प्रांतावर सर्व राष्ट्रीय ताबा रहावयाचा होता. अशा प्रकारच्या जाचक अटी देखील तुर्कांनां मान्य झाल्या असत्या पण मना स्मर्ना व थ्रेस हे प्रांत ग्रीसला देण्यांत आल्यानें मात्र तुर्कस्तानचें पित्त खवळून गेलें. ग्रीसनें ज्यावेळीं हे प्रांत आपल्या ताब्यांत घेतले त्यावेळीं तुर्कस्तानमध्यें भयंकर खळबळ उडून तुर्क राष्ट्रीय पक्षाला आपली चळवळ जोरानें फैलावण्यास नामी संधि मिळाली.

मुस्ताफा केमाल पाशा यानें १९१९ च्या जून महिन्याच्या १९ व्या तारखेस खवसा येथील जाहीर सभेंत, राष्ट्रीय पक्षाच्या चळवळीची घटना पुढें मांडली व त्या दिवसापासूनच जाहीर तर्‍हेनें ही चळवळ सुरु झाली असें मानण्यास हरकत नाहीं. या घटनेच्या अन्वयें आशियामायनरमध्यें तरुण तुर्कांची मोठी सेना उभारावयाचें ठरून तुर्कस्तानच्या ताब्यांतील प्रदेशाची फाळणी होऊं न द्यावयाची असें ठरविण्यांत आले. अर्मिस्टिसच्या अटीप्रमाणें जो भाग सार्वराष्ट्रीय देखरेखीखालीं रहावयाचा होता त्यावर कोणत्याहि एका राष्ट्रानें देखरेख ठेवावी असें या पक्षानें जाहीर केलें. ही राष्ट्रीय चळवळ तरुण तुर्कांमध्यें हां हां म्हणतां पसरली. ऑगस्टमध्यें एर्झेंस येथें या पक्षानें एक तात्पुरतें सरकार स्थापन केलें. सप्टेंबरमध्यें सिवस येथें राष्ट्रीय पक्षाची कांग्रेस भरून ऑटोमन साम्राज्याचे हितसंबंध पूर्णपणें राखावयाचे व खलीफा व सुलतान पद यांचें रक्षण करावयाचें असें त्यांत ठरलें. कांहीं आठवड्यानंतर अंगोरा येथें सरकार नेण्यांत आलें. १९१९ सालच्या अखेरीस ही चळवळ आशियामायनरभर पसरली होती व तुर्की सरकारीच सत्ता जवळ जवळ नामशेषच झाली होती.

या राष्ट्रीय चळवळीस तुर्की सैन्याचा पूर्ण पाठिंबा होता. व त्याशिवाय ''ऐक्य व प्रगति'' नांवाची एक गुप्‍त कमिटीहि याला मनोभावें साहाय्य करीत होती. तलातपाशा, एनवरपाशा, जेलमपाशा, हलीमपाशा इत्यादी बडीं बडीं धेडें या चळवळींत प्रामुख्यानें भाग घेत होतीं. यांनीं या राष्ट्रीय चळवळींच्या ध्येयांत विश्वेस्लामप्रसाराचें तत्त्व घुसडून दिलें. त्यामुळें या चळवळीचा ब्रिटिश हिंदुस्थानांतील मुसुलमानांवरहि फार परिणाम होऊन खिलापत चळवळ येथें सुरु झाली; व खिलापत कमिटीतर्फे एक प्रतिनिधिमंडळ लंडन येथें पाठविण्यांत आलें. शांततापरिषदेच्या वेळीं कॉन्स्टांटिनोपल तुर्कांच्या हातीं ठेवण्यांत यावयाचें ठरविलें गेलें. याच सुमारास तुर्क राष्ट्रीय पक्षानें, सायलेशियामध्यें लष्करी हालचाल करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर थ्रेसमध्येंहि त्यानें ग्रीक लोकांनां विरोध करण्यास सुरुवात केली.

राष्ट्रीय पक्षाची चढती कमान होत चाललेली पाहून तुर्की सरकारला भय उत्पन्न झालें. व सरकारनें तुर्कस्तानमधील मवाळ लोकांनां आपल्या पंखाखालीं आणून व राष्ट्रीय पक्षाला बंडखोर ठरवून त्या पक्षाला दडपून टाकण्यास सुरुवात केली. येवढ्यावरच न थांबतां सरकारनें ब्रुसा ताब्यांत घेण्याकरतां अंझहूरपाशाच्या ताब्यांत सैन्य दऊन त्याला पाठविलें. पण ब्रूसाला पोहोंचण्यापूर्वीच हें सैन्य राष्ट्रीय पक्षाला जाऊन मिळालें.

इकडे सुप्रीन कौन्सिलांत तुर्कस्तानसंबंधींचा खलिता तुर्की सरकारच्या ताब्यांत दिला गेला. तो खलिता राष्ट्रीय पक्षाच्या पसंतीला न उतरल्यामुळें त्यांनीं या खलित्याप्रमाणें न वागण्याचें ठरविलें व तुर्कस्तानसरकार जर त्या खलित्याला मान्यता देईल तर या सरकारला देखील जुमानावयाचें नाहीं असें राष्ट्रीय पक्षानें ठरविलें. अर्थांतच या राष्ट्रीय पक्षाला या अटी मानण्यास लावण्याची दोस्त राष्ट्रांवर मोठीं जबाबदारी येऊन पडली. ग्रीक लोकांनां आशियामायनरमध्यें चढाई करण्यास दोस्त राष्ट्रांनीं परवानगी दिली. त्याचप्रमाणें ग्रीक सैन्यानें आशियामायनरमध्यें स्वारी करुन त्यांतींल बराच भाग आपल्या ताब्यांत घेतला. पण राष्ट्रीय पक्षहि लेचापेचा नव्हता. त्यानेंहि रशियाशीं आपलें कारस्थान रचण्यास सुरुवात केली व रशियानें बोल्शेव्हिक मताचा प्रसार करण्याच्या लोभानें या राष्ट्रीय पक्षाला सैन्य व दारूगोळा पुरविण्याचें अभिवचन दिलें. यामुळें राष्ट्रीय पक्षाला जोर चढला. हें पाहून तुर्की सरकारनें या पक्षांशी समेट करण्याची खटपट करुन पाहिली पण ती साधली नाहीं.

इकडे रशियानें आशियामायनरमध्यें राष्ट्रीय पक्षाला साहाय्य करण्याकरितां सैन्य पाठविण्याचें ठरवलें व त्या निमित्त सुलभ दळणवळणाचीं साधनें तयार करण्यास सुरुवात केली. पण तुर्कस्तान व अझरबिजन या टापूंच्यामध्यें एरिव्हनचें प्रजासत्ताक राज्य व आर्मेनियन संस्थान होतें; व हीं संस्थानें तर राष्ट्रीय पक्षास विरोधी होतीं. त्यामुळें एरिव्हनच्या राज्याला नमतें घेण्यास भाग पाडल्याशिवाय गत्यंतरच उरलें नाहीं. यासाठीं रशियानें या राज्यावर स्वारी करुन तें राज्य जवळ जवळ उध्वस्त करुन आपल्या ताब्यांत घेतलें व एरिव्हनकडून तुर्कस्तानला कार्स व अर्दहन हे प्रांत देवविले. पण १९२० च्या अखेरीस व्हेरिझोलायचें मंत्रिमंडळ पदच्युत होऊन कॉन्स्टंटाइन राजा राज्यारुढ झाला. अर्थातच या राजाविरुद्ध दोस्त राष्ट्रें असल्यानें दोस्त राष्ट्रांनीं ग्रीकला मदत करण्याचे रहित केलें. पण तुर्कस्तानचा प्रश्न सोडविणें अत्यावश्यक असल्यामुळें दोस्त राष्ट्रांनी हा प्रश्न मिटवून टाकण्यासाठीं ग्रीस व तुर्कस्तान यांच्या प्रतिनिधिमंडळाला लंडनमध्यें बोलावलें. त्यांत अंगोरा सरकारच्या प्रतिनिधींनां घ्यावयाचें ठरविण्यांत आलें. दोस्त राष्ट्रांनीं आपापसांत खल करुन या प्रतिनिधिमंडळापुढें आपल्या अटी ठेवल्या. या अटींमध्यें ज्या प्रमुख अटी होत्या त्या म्हणजे तुर्कस्तानला कॉन्स्टांटिनोपल मिळावयाचें, तुर्कस्तानला सैन्यवाढीची परवानगी द्यावयाची, स्मर्ता टापूवर तुर्कांचें स्वामित्व रहावयाचें या होत. या अटी ग्रीसनें नाकारल्या; व राष्ट्रीय पक्षाविरुद्ध स्वारी करुन अंगोरा गांठण्यासाठी व राष्ट्रीय पक्ष चिरडून टाकण्यासाठीं ग्रीसनें आपलें सैन्य रवाना केलें. पण कर्मधर्मयोगानें १९२१ सालच्या मार्चच्या अखेरीस एस्कीशेहर येथें ग्रीक सैन्याचा प्रचंड पराजय होऊन ग्रीस सैन्याला ब्रूसा व डशकच्या टापूंचा आश्रय घेणें भाग पडलें. जुलै महिन्यांत ग्रीसनें मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली सुरु करुन तुर्की सैन्याचा पराभव करण्याचा प्रयत्‍न केला. त्याप्रमाणें करहिसर, कुटहिया, एस्कीशेहर हीं शहरें त्यांनीं जिंकूनहि घेतलीं. पण ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस रुकरिया नदीच्या कांठीं जी मोठी लढाई झाली तींत ग्रीक सैन्याला हार खावी लागून त्या सैन्याला पाठीमागें हटावें लागलें.

याप्रमाणें ग्रीकांच्या पराजयामुळे त्याच सालीं पॅरिस येथें भरलेल्या दि निअर ईस्ट परिषदेनें तुर्को-ग्रीकांमध्ये त्रैमासिक युद्धतहकुबी असावी या गोष्टीस आपली संमति दिली. आर्मेनियन प्रांताचेंच संरक्षण व्हावें ही योजना बदलून, सार्वत्रिक संरक्षणाची योजना पास झाली. लष्करी दोस्त अधिकार्‍यांकडून रॉडॉसटो हें टर्कीस द्यावें व बाबा एस्की व किर्ककिलिसे ग्रीकांनां द्यावेत अशी शिफारस करण्यांत आली. ग्रीकांच्या हातीं असलेले पूर्वीचे प्रांत टर्कीला मिळावे व भूमध्यसमुद्रापासून काळ्या समुद्रापर्यंत आणि ट्रॅन्सकॉकेशिया व पर्शिया  यांच्या सरहद्दीपासून इजियनसमुद्रापर्यंत आणि आशियामायनरमधील तुर्की सत्तेचें क्षेत्र असावें असें शेवटीं ठरून गेलें. ग्रीकांची पैशानें भरपाई करावी व सुलतानची सत्ता अबाधित रहावी अशा दोस्तांच्या मागण्या कांहीं अटीवर मान्य करण्यांत आल्या. आक्टोबर १९२२ सालीं म्यूडॅनिया येथें एक परिषद भरली होती. तुर्कांनीं पूर्व थ्रेसमध्यें आपली पूर्ण सत्ता पुन्हां प्रस्थापित करावी अशी लॉर्डकर्झन व एम्. पाइंकारें यांनीं कबुली दिली. ब्रिटन व टर्की यांमध्यें ११ आक्टोबर १९२२ रोजीं तह झाला. त्यांतील मुख्य मुद्दे खालीं दिल्याप्रमाणें आहेत—

(१) परकीयांनीं पंधरा दिवसांत थ्रेस प्रांत सोडावा व तुर्कांनीं आपली सत्ता तेथें एक महिन्यांत स्थापन करावी. (२) तुर्की सैन्याची (जेंडारमेरी) मर्यादा ८ हजार पर्यंत असावी. (३) मारिटझच्या पश्चिम किनार्‍यावर दोस्तांचें सैन्य असावें. (४) स्ट्रेटस हें तटस्थ ठिकाण (न्यूट्रल झोन) मानावें व उभय पक्षांनीं लष्करी दळणवळण व किल्ले बांधण्याचें काम करूं नये. स्मर्नाच्या यशामुळें तुर्की लोक अधिक मागण्या करतील असें दोस्तांनां भय वाटत होतें. इस्मिद्कडे फ्रेंच व इटालियन सैन्य पाठविण्यांत आलें.

इकडे खुद्द तुर्कस्तानांत राज्यक्रांति होऊन सुलतानपद रद्द करण्यांत आलें आहे असें ग्रँड नॅसनल असेंब्लीनें नोव्हेंबर १९२२ सालच्या पहिल्या तारखेस प्रसिद्ध केलें. यापुढें खलीफ पदाकरितां उस्मान घराण्यांतील राजपुत्रांची निवडणूक करावयाची असें ठरलें. अंगोरासरकारच्या वतीनें ता. ४ नोव्हेंबर १९२२ रोजीं रफेत पाशानें कॉन्स्टांटिनोपलचा कारभार आपल्या हातीं घेतला, व त्याच दिवशीं कॉन्स्टांटिनोपल येथील प्रधानमंडळानें राजीनामा दिला. सुलतान तेथून ब्रिटिश जहाजांत बसून निघाला व त्याचा पुतण्या अबदुल मजीद याची खलिफा म्हणून नेमणूक झाली. परंतु मार्च १९२४ सालीं खलिफा हें पदच अजिबात रद्द करण्यांत आलें. आक्टोबर १९२३ सालीं ग्रँड नॅशनल अ‍ॅसेंब्लीनें प्रजासत्ताक राज्याची द्वाही फिरविली व केमालपाशा हा अध्यक्ष झाला. अंगोरा तुर्कस्तानची राजधानी झाली व सर्व खातीं त्या ठिकाणीं नेण्यांत आलीं. ग्रँड नॅशनल अ‍ॅसेंब्लीच्या  सदस्यांची निवडणूक दोन वर्षांनीं होत असते. १९२४ सालापासून प्रजासत्ताक राज्याचा अध्यक्षच कौन्सिलच्या अद्घक्षाची निवडणूक करतो व कौन्सिलचा अध्यक्ष इतर कमिशनर नेमतो. इस्मतपाशा यानें पहिलें प्रजासत्ताकमंत्रिमंडळ आक्टोबर १९२३ सालीं स्थापन केलें.

नोव्हेंबर १९२२ सालीं केमालिस्ट पक्षानें अशी मागणी केली कीं, सर्व राष्ट्रांच्या लढाऊ जहाजांनीं स्ट्रेट्समधून  जाण्याबद्दल तुर्कांची परवानगी घेतली पाहिजे. त्याच वेळीं लॉसेन परिषदेंत. १९१३ सालीं ज्या सरहद्दी होत्या त्यांच्या संबंधीं तुर्कांनीं मागणी केली. बल्गेरियास ईजिअनसमुद्रावर व्यापार करण्याची परवानगी मिळावी असें ठरलें. तुर्कांचा हल्ला होईल या भयानें इंग्लंडनें कॉन्स्टांटिनोपल येथील आपलें लष्करी सामर्थ्य वाढविलें. स्ट्रेट्सच्या स्वातंत्र्यासंबंधीं तुर्क लोक व बाल्कन संस्थानें यांमध्यें डिसेंबरांत एक करार झाला परंतु तुर्कस्तान मागणी केली; परंतु बगदाद व इराक हीं ठिकाणें निराधार होतील म्हणून दोस्तांनीं ही मागणी नाकारली. त्यानंतर इस्मतपाशानें दोस्तांची मुख्य मागणी मान्य केली व स्टेट्समधील परकी जहाजांनां पूर्ण स्वातंत्र्य दिलें. ख्रिस्ती अल्पसंख्याकांच्या लष्करी नोकरीसंबंधीं तुर्कांनीं आपली सम्मति देण्याचें नाकारिलें.

लॉसेनपरिषदेच्या वाटाघाटीनंतर शांततेचा सहनामा तुर्कांनां ता. १ फेब्रुवारी १८२३ रोजीं सादर करण्यांत आला. आर्थिक प्रश्नाच्या सबबीवर तुर्कांनीं त्यावर सही करण्याचें नाकारिलें. बर्‍याच आर्मेनियम लोकांची सोय जॉर्जियामध्यें करण्याचें रशियानें कबूल केलें. लॉसेनपरिषदेंत फारच तडजोडीचें धोरण स्वीकारल्याबद्दल अंगोरा सरकारनें इस्मतपाशास दोष दिला. मार्च अखेर लॉसेनच्या अटी पुन्हां तुर्कांनां सादर करण्यांत आल्या. चेस्टर सवलतींचा स्वीकार अंगोरा असेंब्लीनें केल्यामुळें फ्रान्समध्यें मोठी खळबळ उडाली. मे १९२३ मध्यें लॉसेन येथें पुन्हां असें ठरलें की आर्थिक तह रद्द व्हावा व तुर्की आणि परस्थ यांच्यावरील कराबद्दल समानत्वाचें धोरण असावें. कॉन्स्टांटिनोपल येथील बँक ऑफ अथेन्स व इतर परकीय बँका, तुर्कस्ताननें जबरदस्तीनें बंद केल्यामुळें फ्रेंच भांडवलावर त्याचा परिणाम झाला व दोस्त सरकार व फ्रान्स यांकडून निषेध करण्यांत आला. टर्की व ग्रीस यांमध्ये तडजोड झाली. सैन्याबरोबरच आरमारी दळ हलवावें या गोष्टीवर तुर्कांनीं भर दिला. नंतर २४ जुलै १९२३ रोजीं लॉसेनच्या तहावर सह्या झाल्या. फ्रेंच रेल्वे व व्हिकर्स आर्मस्ट्राँग या बाबतींत समान वागणुकीचें धोरण ठरविण्यांत आलें. या तहान्वयें इराक व पॅलेस्टाइन येथील ब्रिटिश सैन्य कमी करण्यांत आलें. अमेरिका व तुर्कस्तान यांमध्येंहि एक सामान्य तह झाला. मिळविलेलें सर्व घालविलें असें हा तह पाहून कांहीं ब्रिटिश लोकांनां वाटूं लागलें. तथापि ब्रिटिशांचें तुर्कस्तानांतील वर्चस्व कायमच राहिलें. १९२४ सालीं तुर्कांचा जर्मनांशीं स्नेहाचा तह झाला व मेमध्यें हंगेरीशीं झाला. मोसलचा प्रश्न लीग ऑफ नेशन्सकडे सोंपविण्याबद्दल तुर्की लोक विरुद्ध होते. सप्टेंबर १९२४ मध्यें मोसलवर स्वारी करुन टर्कीनें ब्रिटिशांशीं केलेला तह मोडला. यामुळें इंग्लंडास राग आला. कॉन्स्टांटिनोपलहून कॉन्स्टंटाइनची उचलबांगडी करण्यांत आल्यामुळें ग्रीस व टर्की यांच्यांत लढा सुरु झाला. हेग कोर्टाकडे ग्रीसनें गार्‍हानें नेलें. इतर राष्ट्रांनीं मध्येंच उगीच लुडबुड केली व ब्रिटननें दोन मोसल तज्ज्ञांच्या वागणुकीबद्दसल निषेध केला. या तिन्ही बाबतीसंबंधीं तुर्कांनीं आपली नापसंति व्यक्त केली. थ्रेसकडे तुर्की सैन्याची हालचाल होत असलेली पाहून ग्रीसमध्यें अस्वस्थता उत्पन्न झाली. कुर्दिश संस्थानांत खिलाफतीची पुन्हां स्थापना व्हावी या हेतूनें ७००००० कुर्द लोकांनीं बंड केलें. परंतु हें बंड मोडण्यांत आलें, पुढार्‍यांनां ठार करण्यांत आलें. बंडखोरांनीं बर्‍याच तुर्की अधिकार्‍यांचे खून केले. मार्च १९२५ सालीं जहालांच्या चळवळीमुळें फेथिबेच्या प्रधानमंडळानें राजीनामा दिला.

शिक्षण— १९१३ सालच्या कायद्यान्वयें ७ ते १६ वर्षाच्या मुलांस सक्तीचें प्राथमिक शिक्षण देण्यांत येतें. कॉन्स्टांटिनोपल विश्वविद्यालयांत पुष्कळ तुर्की विद्यर्थिनी शिक्षण घेत असतात. १९२३ सालापासून तुर्की इतिहास, भूगोल व भाषा यांचें शिक्षण तुर्की शिक्षकांकडून देण्याची योजना करण्यांत आली आहे.

सामाजिक सुधारणा— लुटारू लोकांचा नायनाट करण्याचे प्रयत्‍न करण्यांत येत आहेत. लुटारु लोकांच्या शासनाबद्दल एक कायदा १९२३ सालीं करण्यांत आला होता परंतु तो असेंब्लींत पास झाला नाहीं. ''न्यू टर्किश कंपनीज अ‍ॅक्ट'' प्रमाणें धंद्याच्या प्रत्येक शाखेप्रीत्यर्थ १५ हजार टर्किश पौंड अनामत ठेवावे असें प्रसिद्ध झाल्यामुळें तुर्कस्तानांतील ब्रिटिश विमा कंपन्यांनां धंदा आटपावा लागला होता. १९२३ सालच्या फेब्रुवारींत एक वैवाहिक कायदा पुढें आला. आशियामायनरची लोकसंख्या वाढवावी अशा अर्थाचें एक बिलहि पुढें आलें परंतु तें अंगोरा नॅशनल अ‍ॅसेंब्लीनें पास केलें नाहीं. १९२४ सालीं एकविवाहव्रताचें तत्त्व सामान्यतः मान्य करण्यांत आलें व दुसर्‍या लग्नास मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी असें कायद्यानें ठरविण्यांत आलें. केमालपाशाची बायको इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांत चांगली शिकलेली आहे. जुन्या लोकांची निंदा सोसूनहि केमालची स्त्रियांच्या चळवळीस चांगली मदत होत आहे.

रात्रीं ११॥ चे पुढें नाटकगृहें व इतर करमणुकीचीं ठिकाणें बंद ठेवावीं असा कायदा करण्यांत आला. यासंबंधानें कॉन्स्टांटिनोपल येथें बराच वाद झाला. हा कायदा रद्द होईल असें दिसतें. जवळजवळ वीस वर्षें सतत युद्ध चालल्यामुळें कामकरी वर्गाची स्थिति फार खालावलेली आहे. उद्योगी व कसबी ग्रीकांचें उच्चाटण झाल्यामुळें मजुरांचा प्रश्न जास्त बिकट झाला आहे.

लोकसंख्या— तुर्कस्तानची (१९२५) सध्याची लोकसंख्या सुमारें एक कोटीपेक्षां जास्त नाहीं. सर्वांत मोठीं शहरें कॉन्स्टांटिनोपल व स्मर्ना हीं आहेत व त्यांची लोकसंख्या अनुक्रमें ८८०९९८ व ९८८४६ इतकी आहे.

(संदर्भग्रंथ— ग्रेझीकृत ''हिस्टरी ऑफ दि ओटोमन टर्क्स''; लेनपूलकृत ''टर्की''; सरलंडमेंझीकृत '' टर्की,ओल्ड अ‍ॅड न्यू.'')

तुर्की वाङ्‌मय— ओटोमन तुर्कांच्या वाङ्‌मयाचे, नवा व जुना असे दोन संप्रदाय असून जुना संप्रदाय अभिजात पर्शियन वाङ्‌मयाच्या वळणावर गेलेला आहे, आणि नव्या संप्रदायानें यूरोपिय वाङ्‌मयाचें अनुकरण केलें आहे. जुन्या काव्यसंप्रदयाचे तीन विभाग पडतात. साम्राज्यस्थापनेपासून पहिल्या सुलेमानपर्यंत (१३०१-१५२०); सुलेमानपासून पहिला महंमदापर्यंत (१५२०-१७३०) आणि महंमदापासून अबदुल अझीझपर्यंत (१७३०-१८६१) अशीं ओटोमन वाङ्‌मयाचीं तीन युगें पडतात.

जुनें काव्य पर्शियन थाटाचें असून इराणी कवीचे गुणदोष त्यांत आढळतात. अद्भुतरसोत्पादक काव्यांत त्यांनीं, मझनून व लैली, खुश्र व चिरीन, यूसफ व झूलेखा असे फारसी काव्य-विषय घेऊन ते बहारीनें वर्णन केले आहेत. शाहनामा नामक फारसी ग्रंथांतील अनेक कथानकें त्यांच्या प्रतिभाशक्तीनें संजीवित झालेलीं आहेत. तुर्की कवींनीं पारसी वृत्तेंच उचललेलीं असून मेरुतेवी, कासिद व गझल हीं वृत्तें जुन्या ओटोमन कवींनां फार प्रिय असत. त्यांचें गद्यपद्यात्मक वाङ्‌मय बरेंच मोठें आहे.

पहिल्या उस्मानच्या कारकीर्दीत सुलतान वल्लद हा कवि होऊन गेल्यावर आशिकपाशा हा गूढ कवी, आपल्या ''दिवाण'' या काव्यावरून प्रसिद्धीस आला. ''खुश्र वशिरिन'' या विषयावर कर्मियानच्या शेखीनें एक काव्य रचलें आहे. ''महमदीया'' नांवाचें मोठें काव्य याझिजी यानें लिहिलें आहे. ''चाळीस वजीरांची कथा'' तुर्क वाङ्‌मयांत प्रसिद्ध आहे. ओटोमन तुर्कांच्या हातीं कॉन्स्टांटिनोपल पडल्यानंर, मिरअल्लीशीर यानें गझल लिहिण्याची पद्धत प्रचारांत आणली. ''तझारुआत'' हा धार्मिक गद्यग्रंथ सिनातपाशा यानें लिहिला. नेजती व झती हे दोन कवी उत्कृष्ट भावनात्मक काव्याबद्दल विख्यात आहेत. झेनाब वि मिहिरी या कवयित्रींनीं चांगलीं काव्यें लिहिलीं आहेत. दुसरा महंदम हा मोठा रसिक होता व त्यानें बर्‍याच कवींनां आश्रय दिला. पहिल्या सेलीमच्या काळीं केमलपाशा झादा हा उदयास आला. ''निगारिसान'' हा याचा काव्यग्रंथ सादीच्या गुलिस्तानच्या धर्तीवर लिहिलेला आहे. पहिल्या सुलेमानच्या कारकीर्दीपासून तुर्की अभिजातवाङ्‌मयास सुरुवात होते. या काळांत उत्कृष्ट कवी व गद्यलेखक होऊन गेले. फुझूली हा अत्यंत प्रतिभासंपन्न कवि होता. ''दिवाण'' या काव्यांत त्याची स्वतंत्र कल्पनाशक्ति दृग्गोवर होते. ''मझबून आणि लैली'' हें त्याचें काव्यहि अत्यंत हृदयंगम असेंच आहे. बाकी नामक कवीनें पहिल्या सुलेमानावर एक शोकगीत रचलें आहे. ओटोमन कवींचा या बाबतींत हातखंडा आहे. रुट्टी, लामी, नेव्ही, याबेग, मुफ्ती, एबुसुद व दुसरा सेलीम या सर्वांनीं कवी या नात्यानें चांगला लौकिक मिळविला आहे. नबी कवीनें साबीचें उत्कृष्ट अनुकरण केलें आहे. तिसर्‍या अहंमदाच्या वेळेचा नेदीम हा कवी सर्व जुन्या कवींत श्रेष्ठ होय. अलीचेलेबाबीनें ''हुमायून नामा'' म्हणून एक मोठा गद्य ग्रंथ लिहिला आहे. सादुद्दिननें ''ताजत् तत्रारिक'' नांवाचा एक साम्राज्याचा इतिहास लिहिला आहे. नाइमा व एलिया नांवाच्या दोन इतिहासज्ञांनीं अनेक ग्रंथ लिहिले आहेत. हाजी खलिफा हा तुर्की राज्यांतींल अत्यंत मोठा विद्वान मनुष्य होऊन गेला. यानें इतिहास, चरित्र वगैरे अनेक विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. इब्राहिम म्हणून नांव धारण करणार्‍या एका हंगेरियन मनुष्यानें टर्कीमध्यें पहिला छापखाना काढला असें म्हणतात.

अभिजात युगानंतर तिसर्‍या सेलीमच्या राजवटींत पर्लेव, नेशत् व शेख घालीम असे कवी होऊन गेले. राशद व असिम हे या काळचे मोठे गद्यलेखक होत. कामस नांवाचा अरेबिक भाषेंतील ग्रंथ व ''बुर्हानी काटी'' नांवाचा पर्शियन  भाषेंतील ग्रंथ तुर्की भाषेंत आणण्याचें श्रेय वरील लेखकांनीं संपादिलें. जुन्या कवींत कानी नांवाच्या मोठ्या विनोदी गद्यलेखकाची गणना करण्यातं येते.

ओटोमन इतिहासांतील संक्रमणकालास दुसर्‍या महंमदाच्या कारकीर्दीपासून सुरुवात होते व या काळांत पाश्चात्य सुधारणेचे किरण पौररस्त्यावर पडूं लागलेले दिसून येतात. फाझिलबे, वासीफ, इझतमुल्ल, आकीफ पाशा वैगेर कवी आणि फितने व लैला प्रभृति कवयित्रि अभिनव काव्यसंप्रदायाच्या प्रवर्तक म्हणून गणल्या जातात. पाश्चात्य वाङ्‌मयाचा विशेषतः फ्रेंच वाङ्‌मयाच्या या आधुनिक कवींवर बराच परिणाम झाला. रशीद व आकीफपाशा यांच्या राजकीय लेखांतहि हा बदललेला मनु पहावयास मिळतो. शिनाशीनें यूरोपीय लेखनशैली उचलली व उत्तरोत्तर ओटोमन वाङ्‌मयाचें स्वरुप बदलूं लागलें. पाश्चात्यांच्या निरनिराळ्या काव्यरीतींचें अनुकरण करण्यांत येऊं लागलें. नवीन नाटकें अस्तित्वांत येऊं लागलीं, व पाश्चात्य भौतिक शास्त्रांचाहि अभ्यास सुरू झाला. झियापाशा, एकरमबे, हमीदबे, केमालबे यांची नवयुगीन वाङ्‌मयेतिहासांत प्रसिद्धि आहे. ''झेमझेमा'' हा एकरमबेचा काव्यसंग्रह उत्कृष्ट आहे, केमालबे यानें नाटकें, इतिहास, नीतिशास्त्र, काव्य वगैरे विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले असून या विद्वान  गृहस्थाचें तरुण तुर्कांवर बरेंच वजन आहे.

तुर्कस्तान, पूर्वेकडील— उत्तरेस सायबेरिया, व दक्षिणेस तिबेट. हिंदुस्थान व अफगाणिस्तान यांच्यामधील मध्य आशियांतील प्रदेशास हें नांव साधारणपणें लावतात. या प्रदेशाची पश्चिम मर्यादा कास्पीयन समुद्र व पूर्वमर्यादा मंगोलिया व गोबीचा निर्जनप्रदेश होय. तुर्कस्तान याचा खरा अर्थ तुर्क जातीचें स्थान असा असला तरी सध्यां तेथें तुर्क व इतर जाती देखील राहतात. या प्रदेशाचे नेहमीं रशियन तुर्कस्तान व चिनी तुर्कस्तान असे दोन विभाग करण्यांत येतात.

रशियन तुर्कस्तान— तैबेरिया खेरीजकरुन आशियांत जेवढा रशियाचा मुलुख आहे त्याचा या तुर्कस्तानांत समावेश होतो. यांत फरघन, समरकंद, सिरदर्या वगैरे प्रांतांचा अन्तर्भाव होतो. ट्रान्सकास्पियन भाग आणि बुखारा व खावी हीं अर्धस्वतंत्र संस्थानें देखील रशियन तुर्कस्तानांत येतात.

रशियन तुर्कस्तानचें एकंदर क्षेत्रफळ अंदाजें १२९०००० चौरस मैल आहे. या प्रदेशाच्या भूगर्भांत फारच प्रचंड क्रांति घडून येत आहे. नद्यांनीं आपले पूर्वीचे प्रवाह, व सरोवरांनीं पूर्वीच्या मर्यादा बदलल्या आहेत. पूर्वीच्या नद्या व खाड्या-ज्यांच्या कांठचा प्रदेश एकेकाळीं भरभराटींत होता त्या आतां नाहींशा झाल्या आहेत, आणि या नद्या सरोवराबरोबरच पूर्वीच्या सुधारणा व संस्कृती नामशेष झाल्या.

रशियन तुर्कस्तानची हवा फारच रुक्ष आहे. या ठिकाणीं वनस्पतींचा अभाव असल्यामुळें येथें उष्णता फारच असते. व उलटपक्षीं हिवाळ्यांत कडाक्याची थंडी पडते. पाऊस तर बहुधा पडतच नाहीं. ऑव्हिस पोली नांवाचा भव्य प्राणी पामीर डोंगरांत सांपडतो. हा प्राणी मेंढ्यांचा पूर्वज असावा असा तर्क आहे. रानटी घोडा, रानउंट, वाघ, कोल्हे वगैरे प्राणीहि सांपडतात. सिरदर्या नदीच्या दक्षिणेकडील लोक राय व गव्हांची लागवड करितात. त्याचप्रमाणें अ‍ॅपल, अ‍ॅप्रिकॉट, बदाम वगैरे फळांच्या लागवडीलाहि बरेंच महत्त्व आहे. खोजंद व फरघन यांच्या आसमंतांत शेती व बागाईत फारच पूर्णत्वारा पोंचली आहे. कापसाची लागवड सारखी वाढत्या प्रमाणांत आहे. सुधारलेल्या यंत्रांच्या योगानें चालणारे कारखाने तुर्कस्तानांत नाहींतच म्हटलें तरी चालेल, पण तांबें, पिंतळ, लोखंड, चांदी इत्यादि धातूंची नकशीदार कामें या ठिकाणीं पुष्कळ होतात. व्यापार फारच जोरांत चालू आहे. काश्गर, व बुखारा, हीं व्यापाराचीं मुख्य ठिकाणें होत.

लोकवृत्त— लढाया, देशान्तर यांमुळें याठिकाणीं बरेच परदेशीय लोक आल्यामुळें तुर्कस्तानच्या लोकसंख्येंत विलक्षण प्रकारची भेसळ झालेली आहे. आर्यन व मंगोल या दोन्ही जाती या ठिकाणीं आढळतात. उग्लू अल्ताइकांचें लोकसंख्येंत प्रमाण जास्त असून इर्कोमन, किरगिझ, उझबेग, व सार्ट या लोकांचाहि त्यांत अन्तर्भाव होतो. कराकल्पाक हे लोक मध्य व्होल्गा वरील बल्गेरियन साम्राज्यांतून सिरदर्याच्या कांठीं अगदी अलीकडील काळांत आले असावेत असा समज आहे. या लोकांचा स्वभाव शांत असल्यामुळें किरगिझ लोकांनीं यांच्यावर स्वार्‍या करुन त्यांनां या जागेवरुन त्याच जागेवर असें नाचावयास लाविलें. शेवटीं १७४२ सालीं यांनां रशियन अंमलापुढें मान वाकवावी लागली. येथील विस्तीर्ण माळरानाचे व डोंगर पठारांचे मालक किरगिझ लोकच आहेत. या लोकांचेहि दोन भाग आहेत, एक कोझॉक अथवा कोसॅक किरगिझ व दुसरा काळा अथवा ब्लॅक किरगिझ. उझवेग लोकांचींहि पुष्कळ घराणीं आहेत. रशियाच्या ताब्यांत हा प्रदेश जाण्यापूर्वी हे लोक राजकारणांत बराच प्रमुख भाग घेत असत. सार्ट लोकांत इराणी रक्ताची भेसळ फार आढळते. कालमक व टारगॉड ह्या जाती मंगोल वंशापैकीं आहेत. गालचा लोक हे आर्यवंशज होत. वेस्ट तुर्कस्तानांत बुद्धिमान जर कोणी लोक असतील तर ते हेच होत. थोडे बहुत इराणी, हिंदी व रशियन लोकहि येथें आहेत. रशियन तुर्कस्तानची लोकसंख्या १९०६ सालीं ५७४६६०० होती.

शिक्षण— शिक्षणाच्या बाबतींत नांवाजण्यासारख्या सुधारणा अशा अजून झालेल्या नाहींत. ताश्कंद येथें एक औद्योगिक शिक्षणाची शाळा व शेतकीप्रयोग शाळा आहे. तुर्कस्तानांत फक्त दोन लोहमार्ग आहेत. एक ट्रान्सकॅस्पियन रेल्वे व दुसरा ओरेंबर्ग ताश्कंद रेल्वे. इस्लामधर्माचा प्रसार झाल्यानंतरच्या आरंभींच्या शतकांत तुर्कस्तानची सुधारणा फारच उच्च दर्जाची होती. तो काल आतां राहिला नाहीं. जुन्या काळच्या भव्य मशिदी, प्राचीन कालचीं विद्यालयें, अरबी शिल्पपद्धतीनें बांधलेलीं स्मारकें, सुंदर सुंदर टोलेजंग इमारती, ह्या सर्व आतां गतकालच्या गोष्टी झाल्या आहेत. मुसुलमान संस्कृति व यूरोपीय संस्कृति यांचा जात्याच विरोध असल्यामुळें रशियाचा अंमल राष्ट्रीय उन्नतीच्या दृष्टीनें येथें कितपत यशस्वी होईल हा एक प्रश्नच आहे. जमिनीचा सर्वस्वी मालक प्रासादिक पुरुष असून या सर्वांच्या साधारण मालकीची अशी मुसुलमानांची धार्मिक भावना असल्यामुळें त्यांनां जमिनीवरील अनियंत्रित मालकीचें युरोपीय तत्त्व अर्थांतच मान्य नाहीं. रशियानें येथील गुलामगिरीला पायबंद घातला आहे व इतरहि कांहीं सुधारणा केल्या आहेत. पण अगणित असे नवीन प्रकारचे कर बसविल्यामुळें लोक फार गांजले आहेत.

अलीकडील माहिती— रशियांतील राज्यक्रांतीनंतर पश्चिम तुर्कस्तानचा समावेश सोव्हिएट प्रजासत्ताक राष्ट्रसंघांत होऊं लागला. रशियन तुर्कस्तानमध्यें सेमीरपेशिया, सिरदर्या, फरधन, समरकंद, व ट्रान्सकास्पिया हे प्रांत होते. बुखारा व खीवा हे प्रांत मात्र पुढें सोव्हिएट सरकारनें आपल्या ताब्यांत घेतले. वरील पांचहि प्रांतांचा कारभार प्रजासत्ताक राष्ट्रसंघाच्या ठरावाप्रमाणें प्रांतिक कार्यकारी मंडळामार्फत चालविला जातो व हीं कार्यकारी मंडळें प्रजासत्ताक राज्यसंघाच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळांत आपापले प्रतिनिधी निवडून पाठवितात. या मध्यवर्ती कमीटींत ७५ सभासद असतात व या मध्यवर्ती कमीटीकडून मास्को येथील अखिल रशियन प्रजासत्ताक संघाच्या बैठकीला प्रतिनिधी पाठविले जातात. मास्को येथील या कमीटीनें आपल्यावर वर्चस्व गाजवावें हें तुर्कस्तानला मनांतून नको आहे. तुर्कस्तानमधील मध्यवर्ती कमिटी आपलें छोटेसें मंत्रिमंडळ बनविते व त्या मंत्रिमंडळामार्फत निरनिराळ्या खात्यांचा कारभार चालविला जातो. कम्यूनिस्ट पक्षाच्या सभासदांनांच कायतो मतदानाचा अधिकार आहे; व त्यामुळेंहि या कमीटीचा कारभार सुलतानशाही पद्धतीच्या वळणावरच चालतो असें म्हणण्यात हरकत नाहीं. कारण पश्चिम तुर्कस्तानमध्यें शेंकडा ५ एवढीच रशियन लोकांची वस्ती असतांना, व बाकीची सर्व वस्ती मुसुलमानांची असतांना, फक्त रशियन अल्पसंख्याकांनांच कायतो मतदानाचा अधिकार आहे.

या रशियन तुर्कस्तानांत खोकंद, तमंजव, समरकंद, तइकेंट हीं मोठीं शहरें असून त्यांची लोकसंख्या प्रत्येकीं लाखाच्या पुढें आहे. बोल्शेविझमच्या धुमाकुळीनें १९२१ सालीं येथील व्यापार जवळ जवळ बंदच होता म्हटलें तरी चालेल. फरघन प्रांतांत कापसाचें पीक मोठें आहे. वास्तविक तुर्कस्तान हा गव्हाबद्दल फार प्रसिद्ध आहे. असें असून सुद्ध कापसाला भाव चांगला येत असल्याकारणानें गव्हाऐवजीं कापसाचें पीकच करण्यांत येऊं लागलें असून खुद्द तुर्कस्तानला धान्यासाठीं मात्र परराष्ट्राकडें तोंड पसरण्याची पाळी येऊं लागली आहे. कापूस पिंजणें व कपाशीचें तेल काढणें यासाठीं फरघन प्रांतांत पुष्कळ गिरण्या निघालेल्या आहेत. या गिरण्या क्रूड ऑईलच्या साहाय्यानें चालतात. कापसाशिवाय तइकेंट व समरकंद प्रांतांत द्राक्षांचें उत्पन्न मोठें असून त्यापासून उत्तम दारू तयार करण्यांत येते. ही दारू मुख्यतः रशियामध्यें निर्गत होते.

पश्चिम तुर्कस्तानांत नारिंगें, पीयर, पीच, अ‍ॅप्रिकॉट इत्यादि पुष्कळ जातींच्या फळफळावळांची लागवड होत असून मध्य यूरोपमध्यें यांचा खप आहे. तुर्कस्तानांत खनिजसंपत्ति पुष्कळ आहे. पण दळणवळणाच्या साधनांच्या अभावीं, व यांत्रिक साधनांच्या अभावी खनिखोदनाचें काम होत नाहीं. फरघनमधील कोळशाच्या व तेलाच्या खाणी खोदण्याचें काम चालू झालें आहे. बुखारामध्यें कर्कुल नांवाच्या कातड्यांची फार पैदास होते व त्यांची परदेशीं मोठ्या प्रमाणावर निर्गत होते. तुर्कस्तानमध्यें चांगले रस्ते नाहींत, त्यामुळें व्यापाराला फार प्रतिबंध होतो. रेल्वे देखील फारच लहान टापूंत आहे. सेमीरये-चेनसकय रेल्वे बांधण्याची योजना चालू आहे. कगन ते करशी करकी, टर्बेझपर्यंत, व अंडीजान जलालबादी कोळशाच्या खाणीपर्यंत रेल्वे पसरलेली आहे.

चिनी तुर्कस्तान— हा मध्य आशियांतील प्रदेश असून त्यास कधीं कधीं कासगारिया असेंहि म्हणतात. या प्रदेशाच्या उत्तरेस थिअनशान पर्वताच्या रांगा असून दक्षिणेस कुएनलन पर्वत आहे. हा चीनचा मुलुख असून सिनकिअन नांवानें प्रसिद्ध आहे.

लोक— चिनी तुर्कस्तानमध्यें राहणारे लोक, आर्यनें. यूरल अलताई वंशाचे व मिश्र रक्ताचे असे आहेत. झुंगारियांतील झुंगन व डुंगन लोक ही एक तुर्को तार्तर जात असून ते मुसुलमान धर्माचा अभिमान बाळगतात. कुलजातमध्यें तार्तार, मोंगल, डुंगन वगैरे जाती आहेत. जगताइ टर्किश हीच चिनी तुर्कस्तानांतील सार्वत्रिक भाषा होय. बहुतेक सर्व व्यापार चिनी लोकांच्या ताब्यांत आहे. कुलजा व झुंगारिया सोडून एकंदर लोकसंख्या सुमारें २०,००,००० आहे. झुंगारियाची संख्या ६००००० आणि कुलजाची संख्या १२०००० इतकी आहे. यारकंद, खोतान, काश्गर, अक्सू, केरिया, कुलजा, झुंगारिया वगैरे मुख्य शहरें आहेत. महम्मदी हाच अखिल चिनी तुर्कस्तानचा एक धर्म होय. राजकीय दृष्ट्या हा देश चीनच्याच ताब्यांत आहे.

व्यापार व उद्योग— कृषिकर्म, गुराची जोपासना व मासे धरण्याचा धंदा या ठिकाणीं चांगला चालतो, सोने, जस्त, तांबें, पेट्रोलियम, कोळसा, मीठ वगैरे खनिज पदार्थ विपुल सांपडतात. खोताना येथें रेशीम गालिचे तयार होतात; काशगर येथें कापसाचा व्यापार चालतो; फाराशार येथें कातड्याचा धंदा चांगला चालला आहे. लोंकर, कातडीं, कापूस, गालिचे, रेशीम, धान्य, मेंढ्या व फळें इत्यादि मालाची निर्गत होते. चहा, रुपें व अफु चीनमधुन आणली जाते. किराणा माल हिंदुस्थानांतून तेथें नेला जातो व कापड, साखर, काड्याच्या पेट्या व कातडें वगैरे वस्तू रशियन तुर्कस्तान व रशियामधून या ठिकाणीं आणल्या जातात. उंट, घोडे, बैल वगैरे बाळगणार्‍या कारवान लोकांकडूनच साधारणतः व्यापारी दळणवळण ठेवलें जातें.

इतिहास— स्लाव ट्यूटानिक वंशाचे मूळ पुरुष असे जे आर्य लोक ह्यांचीं वस्ती चिनी तुर्कस्तानांत अत्यंत प्राचीन काळीं होती व तारिम प्रदेशांत बॅक्ट्रियाशीं समान अशा तर्‍हेची सुधारणा फैलावली होती. ख्रिस्ती शकाच्या आरंभीं तारिम प्रदेशांत आर्य व यूरल अल्ताई लोक रहात होते असें दिसतें. आर्यांची एक टोळी वाखन येथें गेली; वैदिक व झेंद भाषांची फारकत होण्यापूर्वीच्या कालाइतकी प्राचीन अशी वाखन येथील विद्यमान भाषा असावी असें दिसतें. पांचव्या व सातव्या शतकांत तेथें बौद्धंचा चांगलाच पगडा बसला. त्या काळीं खोतान येथें शंभर मठ व पांचशे भिक्षू असून हिंदी वाङ्‌मय प्रस्तृत झालें होतें. ७९० सालीं पूर्व तुर्कस्तान तिबेटी लोकांच्या ताब्यांत होतें. अकराव्या शतकांत मोंगलांच्या टोळ्या चिनी तुर्कस्तानांत प्रवेश करूं लागल्या . १२२० सालीं चेंगीझखान यानें तुर्कस्तान व कासगारिया हे प्रांत काबीज केले. चौदाव्या व पंधराव्या शतकांत बुखारा व समरकंद हीं ठिकाणें विद्यास्थानें बनलीं होतीं. व तेथून बरेच विद्वान लोक कासगारियास गेले होते. चोंहोकडे धर्मस्वातंत्र्य देण्यांत आलें होतें. बुखारा येथील मुल्लांनीं चिनी तुर्कस्तानांत एक प्रबळ खोजा वर्ग निर्माण केला व नंतर अंतस्थ बंडाळी माजू लागली. चिनी लोकांनीं या संधीचा फायदा घेतला व सर्व चिनी तुर्कस्तान जवळ जवळ आपल्या ताब्यांत घेतला; १८५७ त मोंगलांनीं चिनी सत्ता उधळून लावण्याचा प्रयत्‍न केला होता. पण तो फसला व अशा रीतीनें चिनी तुर्कस्तान हा भाग चीनचा एक प्रांत बनला.

प्राचीन अवशेष— खोतानपासून फार दूर नसलेल्या एका वाळवंटांत १८९६ सालीं डॉ. व्हेन हेडिन यांस कांहीं जुनीं रत्‍नें, बुद्धाच्या मूर्ती व नाणीं सांपडलीं. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकांतील या वरील वस्तू असाव्या असें म्हणतात. टकला माकन नामक एक जुनें शहरहि सांपडलें आहे. मातीचीं भांडीं मूर्ती, पुतळे, नाणीं, संस्कृत ब्रह्मी; व चिनी लिपींत लिहिलेले जुने लेख, वगैरे वस्तू डॉ. स्टेन यास सांपडल्या आहेत. यांचा काळ ख्रिस्त शकारंभ असावा असें म्हणतात. डॉ. हेडिन यास १९०१ सालीं तिसर्‍या शतकातले लौलन शहर सांपडलें. १९०४ सालीं डॉ. व्हॉन ली कॉक यासहि बरेच जुने लेख व वस्तू सांपडल्या १९०६-१९०८ सालीं डॉ. स्टेन यानें चिनी तुर्कस्तानांत ठिकठिकाणीं बरेंच संशोधन करुन अनेक जुन्या वस्तू मिळविल्या व विविध माहिती गोळा केली.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .