विभाग पंधरावा: तपून - धमन्या
दिलीपसिंग, महाराजा- अनेकदां यूरोपियन इतिहासकारांनीं यास चुकीनें’धुलीपसिंग’असें नांव दिलेलें आढळतें. महाराज रणजितसिंह व चांदकुंवार राणीचा हा मुलगा. इ. स. १८४५ त हा आपल्या वयाच्या ५ व्या वर्षी पंजाबचा नामधारी राजा बनला. यावेळीं शिखांनीं इंग्रजांविरुद्ध लढाई पुकारली होती. प्रथम लुधियाना, फिरोजपूर वगैरे ठिकाणीं शिखांचा जय झाला परंतु पुढें त्यांचा पराजय होऊन थोड्याशा प्रांताखेरीज बाकीचा सर्व पंजाब व काश्मीर इंग्रजांनां मिळाला (१८४६). दिलीप हा नांवाचा राजा झाला व सर हेनरी लॉरेन्स हा रेसिडेंट म्हणून खरा सत्ताधारी (रिअल रूलर) बनला. त्याचा कारभार राणी व प्रजा यांनां आवडेना म्हणून त्यांनीं तक्रारी केल्या व फौजहि जमविली. तेव्हां इंग्रजांनीं राणीला हद्दपार करण्याचें ठरविलें. डोग्रा जातीच्या एका सरदाराला इंग्रजांनीं आपल्या पंखाखालीं घेऊन काश्मीर संस्थान त्याला दिलें. शिखांचें प्राबल्य फार वाढल्यामुळें (रणजितसिंहाचें घोडदळ ८८ हजार, पायदळ ५३ हजार आणि ७०० लहान मोठ्या तोफा होत्या). अराजकतेच्या नांवावर इंग्रजांनीं त्यांच्यावर स्वा-या करून सर्व पंजाब खालसा केला. डलहौसीनें दिलीपसिंगास पंजाबच्या राज्यहक्काचा राजीनामा देण्यास भाग पाडून पंजाब खालसा केला (१८४९ मार्च). या कृत्यास त्यानें कलकत्त्याच्या कौन्सिलची व कोर्ट ऑफ डायरेक्टरांची अनुज्ञा मुळींच मिळविली नाहीं. त्यांनां कांहीं एक न कळवितां हें सर्व त्यानें आपल्या जबाबदारीवर केलें आणि त्याचें समर्थन पुढीलप्रमाणें केलें.’‘पंजाबांत मुळीं राज्यच नव्हतें व मीं जर वरीलप्रमाणें धोरण लवकर पत्करिलें नसतें तर सारा पंजाब देश १ महिन्याच्या आंत बंडाळींत व अंदाधुंदींत सांपडला असता आणि मग स्थीरस्थावर करण्यास वर्षेच्या वर्षे पुरलीं नसतीं आणि म्हणूनच आवश्यकता जाणून मी हें कृत्य केलें.'' रेसिडेंट लॉरेन्सहि या खालसातीच्या विरुद्ध होता. यानंतर दिलीपनें ख्रिस्ती धर्म स्वीकारला व तो कांहीं वर्षें इंग्लंडांत जाऊन राहिला. एका इजिप्शियन बाईशीं त्यानें लग्न लाविलें होतें व तिजपासून त्यास अपत्यहि झालें होतें. पुन्हां हिंदुस्थानांत येण्यास त्यास इंग्रजांनीं परवानगी दिली नाहीं. पुढें दिलीपसिंगानें ख्रिस्ती धर्माचा त्याग करून तो इंग्रजांचा कट्टा शत्रू बनला. अमेरिकेंत तो स. १८९० पर्यंत होता असें म्हणतात. दिलीपसिंगाची एक मुलगी प्रिन्सेस सोफिया ही आतांपर्यंत जिवंत होती.