प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ

धार, सं स्था न.- मध्यहिंदुस्थानांत भोपावर एजन्सीपैकीं एक संस्थान. उ.अ.२१ ५७' ते २३ १५' आणि पू. रे. ७४ ३७' ते ७५ ३७'. क्षेत्रफळ १७८३ चौरस मैल, पैकीं १४४६ चौरस मैल खालसा म्हणजे खास दरबारच्या अंमलाखालीं असून बाकीचा जहागीरदारांकडे आहे. दुसऱ्या संस्थानांचे भाग आंत आल्यामुळें हा प्रदेश बराच तुटलेला आहे. यांत २ शहरें व ६७० गांवें आहेत. परमार रजपुतांची प्रसिद्ध राजधानी जें धार शहर त्यावरून या संस्थानचें नांव पडलें आहे. याचे विंध्यामुळें दोन स्वाभाविक भाग बनले आहेत. माळवा पठारावरचा १५ ते २५ शें फूट उंचीचा प्रदेश (क्षेत्रफळ ८६९ चौरस मैल), व विंध्यपर्वताच्या दक्षिणेकडे डोंगराळ मुलुखांतील जिल्हे संस्थानच्या उत्तरेस रतलाम, दक्षिणेस वढवाणी व इंदूर, पूर्वेस इंदूर व ग्वालेर आणि पश्चिमेस झाबवा, इंदूर व ग्वालेर हीं संस्थानें आहेत. या संस्थानांतून नर्मदा, मही, चंबळ, काली सिंध व यांनां मिळणारे पुष्कळ प्रवाह वाहतात. निमनपूर परगण्यांत धार्डी गांवाजवळ नर्मदा नदीचा मोठा धबधबा आहे त्यामुळें तेथें भोंवरे पडले आहेत. या भोवऱ्यांत एकमेकांवर घासून गळगळीत झालेले बिजावर जास्पर, अगेट, डायराईट वगैरे प्रकारचे पाषाणाचे फार सुंदर बाण सांपडतात. यात्रेंकरू लोक हे बाण नेऊन देवांत ठेवतात. या संस्थानांत एकंदर २२ जहागिऱ्या असून त्यांपैकी १३ जहागिरदारांची जिम्मेदारी इंग्रजांनीं पत्करलेली आहे. या संस्थानांत साग, शिसू, तेंडू, सादडा, अंजन वगैरे झाडें होतात. जंगलांत वाघ, चित्ता, सांबर वगैरे प्राणी आढळतात. खनिजसंपत्ति फारशी नाहीं. यांत विंध्य व सातपुडा हे दोन पर्वत आहेत.माळवा पठराची हवा समशोतोष्ण आहे. विंध्यपर्वताच्या खालीं नेमाड भागांत उन्हाळ्यामध्यें उष्णमान थोडें जास्त असतें व हिवाळा फार थोडा असतो. माळव्यापेक्षां नेमाडांतील गुरेंढोरें जास्त दुध देणारीं व अंगानें जास्त मोठीं आणि सुरेख असतात. नेमाडांतील धान्यें व माणसेंहि माळव्यापेक्षां जास्त सकस असतात. माळव्यांत वार्षिक पाऊस सरासरी २६ इंच व नेमाडमध्यें २५ इंच होतो. निमनपूर परगण्यांत मोठें जंगल आहे. येथील लोकसंख्या (१९२१) २३०३३३. असून त्यांपैकीं ६११४ लोक साक्षर आहेत; व शेंकडा ६६ हिंदू आहेत.

येथें भिल्ली, हिंदी व नेमाडी, या माळवी भाषा चालत असून मुख्य भाषा हिंदी आहे. शेंकडा ५६ शेतकीवर, १३ मोलमजुरीवर व शें. २० उद्योगधंद्यावर पोट भरतात. माळव्यांतील जमीन उत्तम व नेमाडांतील मध्यम जातीची आहे. येथें ज्वारी, गहूं, मका, हरभरा, तीळ, बाजरी, तांदूळ वगैरे धान्यें पिकतात. धान्य, कापूस व अफू हे व्यापाराचे मुख्य जिन्नस आहेत. धार येथें अफू वजन करण्याचा सरकारी डेपो आहे. १९०४-०५ सालीं या डेपोंत ५७८ पेट्यांचें वजन झालें. धारच्या आसपास व मांडव आणि नालाछा येथें पुष्कळ तलाव आहेत. स. १९०१ पर्यंत संस्थानचें निराळें पोस्टखातें होतें; पण नंतर तें ब्रिटिश पोस्टखात्यांत सामील झालें.

राज्यव्यवस्थेकरितां या संस्थानचे ७ परगणे केलेले आहेत;  त्यांचीं मुख्य ठिकाणें धार, बदनावर, सुंदरसी, कुक्षी, मांडव, निमनपूर व धरमपुरी हीं आहेत. संस्थानचे जमीनबाब, जंगल टाका, अबकारी व इतर बाबी मिळून एकंदर उत्पन्न हल्लीं १८-१९ लाखांचें आहे. इंग्रज सरकारास ६६०० रुपये वार्षिक खंडणी मिळते. संस्थानच्या जहागिरदारांकडून ७६५०० रुपये टाका (खंडणी) दरसाल संस्थानिकास मिळते. बदनावर परगण्यांतहि हे टाकेदार आहेत. धारमध्यें चांदीचें नाणें कधीच पाडलें जात नव्हतें. येथें इंदुरी किंवा उज्जनी रुपये चालत असत. स. १८८७ पर्यंत संस्थानचें तांब्याचें नाणें चालू होतें पण तेव्हांपासून "धार संस्थान" हीं अक्षरें असलेलीं ब्रिटिश नाणीं चालतात.

कायमच्या सैन्यांत ५३ घोडेस्वार, २०० पायदळ, १९ तोफखानेवाले व ५ तोफा आहेत. स. १८७२ त शिक्षणखातें स्थापन झालें. स १९०४ मध्यें दरबारच्या ४० व खासगी ३० शाळा असून त्यांत एकंदर २२७० विद्यार्थी शिक्षण संपादन करीत होते. धारला १ हायस्कूल आणि मराठी, हिन्दी, उर्दू, व संस्कृत पाठशाळा आहेत. परगण्यांतींल मुख्य मुख्य गांवीं पाठशाळा असून हिन्दी व इंग्रजी तेथें शिकवितात. प्राथमिक शिक्षण मोफत आहे. मोठ्या गांवीं पुस्तकालयें स्थापिलीं आहेत. धारेस मुलींची पाठशाळा आहे. संस्थानांत रुग्णालयें व दवाखाने मिळून १३ वैद्यकीय संस्था आहेत. छापखाने, जिनिंग कारखाने, ओव्याच्या फुलांचे कारखाने वगैरे उद्योगधंदे चालतात; मुख्य धंदा शेतीचा आहे. मुलकी कामाकरितां पहिली मोजणी स. १९०२-०४ मध्यें करण्यांत आली. संस्थानांत ५-६ वर्षांपासून पंचायतपद्धति सुरू झाली आहे. घोड्यांची उत्तम अवलाद काढण्याचा प्रयत्न संस्थानकडून सुरू आहे. संस्थानांत अद्यापि आगगाडी नाहीं.

इतिहास:- येथील संस्थानिक पवार आडनांवाचे मराठे असून, ९ ते १३ शतकापर्यंत माळव्यावर राज्य चालविणाऱ्या परमार रजपुतांचे ते वंशज आहेत. स. १६५० त धार अकबराच्या हातांत गेलें व त्याचा समावेश माळव्याच्या सुभ्यांत करण्यांत आला. १६९४ सालीं मराठ्यांनीं नर्मदा नदी ओलांडून ह्या प्रदेशांतील धरमपुरी जिल्हा व गांव लुटलें. यानंतर येथें एकसारख्या परकीय स्वाऱ्या येत गेल्या. १७२३ सालीं निजामानें माळव्याच्या सुभेदारीचा राजीनामा दिल्यावर त्याच्या जागीं गिरिधर बहादूर हा आला. त्यानें मराठ्यांनां जोराचा विरोध करून, मध्य हिंदुस्थानांत त्यांची सत्ता कांहीं वेळपर्यंत बसूं दिली नाहीं.

सांप्रतच्या धारच्या पवार घराण्यानें शिवाजीपासून पुढें दीडशे वर्षें मराठी राज्यांत अनेक लहान मोठ्या कामगिऱ्या केल्या आहेत. शिवाजीच्या वेळीं यांचा मूळ पुरुष साबूसिंग (साबाजी अथवा शिवाजी) यानें कल्याण काबीज करतांना आंबेगांवच्या घाटांत मुसुलमानांशीं लढाई दिली, तींत तो जखमी झाला. साबूसिंगानें नगर जिल्ह्यांतील सुपें गांव हें आपलें मुख्य ठाणें केलें; तेव्हां शेजारच्य हंगे गांवच्या दळव्याची झटापट होई. अशा एका झटापटींत (जांभुळ ओढ्यांत) साबाजी मारला गेला: हल्लीं तेथें एक चबुतरा बांधलेला आहे. साबाजीच्या मरणानंतर त्याचा मुलगा कृष्णाजी हा लहान असल्यानें आजोळीं संगमनेरास राही. कृष्णाजी हा मोठा झाल्यावर त्यानेंहि शिवाजीच्या पदरीं नौकरी धरली यानें आदिलशाहींतील आपल्या शेजारच्या प्रांतांत स्वाऱ्याशिकाऱ्या केल्या व एका ब्राह्मणाच्या मुलीस मुसुलमानांच्या हातून सोडविलें. कृष्णाजीस बुवाजी, रायाजी व केरोजी अशीं तीन मुलें होतीं;  कृष्णाजीचें व बुवाजीचें नांव शिवाजीच्या सरदारांच्या यादींत आहे. बुवाजी, रायाजी व केरोजी यांनीं राजारामाच्या वेळीं मोंगलांनां तोंड देऊन तापी तीरापर्यंत आपला अंमल बसविला, आणि मोठमोठीं मसलतीचीं कामें पार पाडलीं म्हणून राजारामानें यांनां विश्वासराव हा किताब व सरंजाम दिला. केरोजी याला सेनाबारासहस्त्री मनसब दिली. चाकणप्रांत त्याजकडे वहिवाटीस होता. केरोजी हा शाहूच्या कारकीर्दीतहि होता. त्याला चंद्रसेन जाधवावर शाहूनें एकदां धाडलें होतें (१७२४). बुबाजी, केरोजी व रायाजी यांचीं तीन निरनिराळीं घराणीं विद्यमान आहेत. बुवाजीपासूनच धार व देवास ही संस्थानें उगम पावलीं.

बुबाजीचे पुत्र दोन, काळोजी व संभाजो. संभाजीस रामचंद्रपंत अमात्यानें योग्यतेस चढविलें (ज्ञा. को. वि. ९ यांत संभाजीस शिवकालीन म्हटलें आहे, तें गोडबाले यांच्या हिंदुस्थानांतील ऐ. वि. राज्यें या पुस्तकाच्या आधारें म्हटलें आहे.). पुढें १६९४-१७०० पर्यंत मराठ्यांच्या माळव्यांतील स्वाऱ्यांत ही पवारमंडळी असावींत. कारण स. १६९६ मधील मांडवगडच्या स्वारींत त्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. संभाजी हा शाहूच्या वेळीं बराच पुढें आला;  तो दीर्घायु होता. त्याचें ठाणें मलठण येथें असून त्यानें नगर जिल्ह्यांत बऱ्याच पाटिलक्या खरेदी केल्या. संभाजीस उदाजी, आनंदराव व जगदेव अशीं तीन मुलें होती (उदाजीबद्दलची माहिती ज्ञानकोश विभाग ९ मध्यें पहा;  आंनदरावाबद्दलची माहिती विभाग ८ मध्यें पहा. त्याविरहित माहिती येथें दिली आहे).

उदाडीनें स. १७०९ त मांडवगड सर केला. त्यानें गुजराथेंतहि बरींच ठाणीं घातलीं, तीं आपल्याकडे घेण्याची खटपट पिलाजी गायकवाडानें केली, परंतु ती साधली नाहीं. नारो शंकर यास (१७२०-२१) यावेळीं उदाजीच्या दिमतीस दिलें होतें. बाजीरावानें उदाजीस १७२२ सालीं माळवा व गुजराथ प्रांताचा निमा मोकासा सरंजामी करून दिला. यापुढें बहुधा दरसाल उदाजीनें माळव्यांत स्वाऱ्या केल्या. गुजराथबद्दल मात्र उदाजी व गायकवाड यांच्यांत नेहमीं संटे होत. ते शाहूनें तोडून, उदाजीस गुजराथमाळव्याची चौथाईसरदेशमुखी दिली (१७२६). यानंतर पालखेडच्या लढाईंत उदाजी लढला होता, व माळव्यांतील मोंगली सुभ्यावरहि त्यानें चढाई केली होती (१७२८). खानदेश, सोंधवाडा, काठेवाड, मेवाड, मारवाड, कच्छ वगैरे भागांतील मोकासावसुली उदाजीकडेच होती (१७३० पर्यंत). मात्र यावेळीं तो चिमाजीआप्पाच्या दिमतीखालीं होता. शाहूराजा हा उदाजीची सल्लामसलत घेत असे. सवाई जयसिंगाशीं या सालीं (१७३० मार्च) जी मसलत चालली होती तींत उदाजी हा होता. त्याचा व गुजराथचा निकट संबंध इ. स. १७३४ पासून सुटला असावा पेशव्यांचें व याचें वांकडें आलें असतां होळकरानें त्यांची समजूत केली होती. मध्यंतरीं (१७३५) शाहूची त्याच्यावर गैरमर्जी झाली होती, ती ब्रह्मोंन्द्रस्वामीच्या खटपटीनें नाहींशीं झाली (१७३५). उदाजी शूर व मुत्सद्दी असल्यानें माळव्यांत "जिधर उदा उधर खुदा" अशी म्हण लोकांच्या तोंडून अद्यापि ऐकूं येते. उदाजी ब्रह्मोन्द्राच्या प्रेमांतील होता. तो तापट व आग्रही असल्यानें आणि पेशव्यांच्या विरुद्ध तेढीनें वागत असल्यानें सन १७३६ नंतर त्याच्या उत्कर्षास आळा बसत गेला. उदाजी हा उदगीरच्या लढाईंत निजामाकडून लढत असतां वारल्याचा उल्लेख (इचलकरंजीकराचा इतिहास पृ. ५३) येथें आढळतो (१७६०). पुढें १७६३ मध्यें एका उदाजीरावाचा उल्लेख येतो. तो दुसरा एखादा उदाजी असावा. याच्या वंशाकडे अद्यापि मलठणची जहागीर चालते.

आनंदराव:- (ज्ञानकोश विभाग सातमध्यें याची माहिती आली आहे, तिच्याशिवाय जास्त येथें दिली आहे.) उदाजीच्या तापट स्वभावानें काम बिघडल्यास आनंदराव तें सावरून घेई. हा उदाजीबरोबर नेहमीं स्वाऱ्या शिकारींत असे. तो माळव्यांतून मोकासा (१७२९ पूर्वीपासून) वसूल करीत असे. उदाजीप्रमाणें हाहि दाभाड्यास मिळाला होता पण त्यानें पेशव्याशीं कायमची तेढ ठेविली नाहीं. त्यानें चिमाजीआप्पाकडून पेशव्याशीं स्नेह जुळविला. पुढें (१७३२) माळवा, गुजराथ, नेमाड, खानदेश वगैरे प्रांतांतून मोकासा वसूल करण्याचा याला पेशव्यांनीं स्वतंत्र अधिकार दिला. याच्याकडे १५ हजार स्वारांचें पथक होतें. माळव्याच्या वांटणींत धारप्रांत व आसपासचे कांहीं परगणे आणि रजपूत राजांकडील खंडणीचा कांहां हिस्सा या पथकासाठीं सरंजाम आनंदरावास मिळाला. या वेळेपासून तो धार येथें राहूं लागला. माळव्याचें रक्षण करून दिल्लीपर्यंत आपला अंमल बसवावयाचा हें काम हा शिंदे-होळकरांच्या मदतीनें करी. पुढें थोड्याच वर्षांनीं तो उज्जनीस सर्पदंशानें वारला (१७३६ जून). उज्जनीस मंदाकिनी घाटावर मंगळेश्वरानजिक त्याची छत्री आहे.

जगदेव:- हाहि उदाजीचाच भाऊ, मराठी लष्करांत एक सरदार होता. हा सुद्धां मोहिमांत भावांबरोबर हजर असे. तिरला येथील लढाईंत यानें पराक्रम केल्याचा (व एका कैफियतींत यानेंच दयाबहाद्दरचा वध केल्याचा) उल्लेख आहे (१७३१). यापुढील याची माहिती सांपडत नाहीं.

यशवंतराव:- धारच्या राज्याचा संस्थापक आनंदराव याचा हा पुत्र होय. माळव्याबाहेरील मराठी राज्याचा विस्तार करणाऱ्या मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे, पिलाजी जाधव यांमध्येंच यशवंतराव हाहि होता. सन १७३४-३५च्या माळव्याच्य मोहिमेत हा होता. यावेळीं पठारी, लालगड इकडील गिराशांचा बंदोबस्त यानें केला. (हल्लींचा धार संस्थानांतील निमनपर परगणा म्हणजे लालगड होय). पुढल्या सालीं (१७३६) चिमाजीआप्पाबरोबर हा कोंकणांत गेला. बाप वारल्यावर याला पुण्यास सरदारीचीं वस्त्रें मिळालीं. (आगस्ट १७३६) व नियमाप्रमाणें परमुलुखांतील वसुलावर शेंकडा १६ रक्कम यास मिळूं लागली. झील तलावावरील लढाई (नोव्हेंबर), भोपाळची लढाई (१७३७ डिसेंबर), वसईची मोहीम (१७३९), या प्रसंगांत यशवंतरावानें चांगला पराक्रम गाजविला. पेशवे धारजवळ आले असतां (आक्टोबर १७३९). यानें धार व सोनगड त्यांच्या हवालीं केला. ढवळपूरच्या मुक्कामीं नानासाहेब पेशवे व सवाई जयसिंग यांच्या दरम्यान भेटीच्या वेळीं राजकारण होऊन माळव्याबद्दल जो ठराव झाला, त्यांत पूर्वीपासून यशवंतराव होता (१७४१ मे). जयसिंह व जोधपूरचा अभयसिंग यांचा समेटहि यशवंतरावानें करून दिला. यापुढील दोन तीन वर्षांत पेशव्यांनीं बुंदेलखंडापासून बंगालपर्यंत जो धुमाकूळ घालून चौथाई वसूल केली त्यांत शिंदे होळकरांप्रमाणें यशवंतरावहि होता. पातशहानें माळव्याचा सुभा पेशव्यानां दिला असतां त्याला (शिदें, होळकर, जाधव) यशवंतराव यानें जामीनकतबा लिहून दिला (१७४३). पेशव्यानीं १७४४-४६ सालीं बुंदेलखंडांत स्वाऱ्या केल्या. त्यांत हा हजर असे. पुढील सालीं याची व सदाशिवराव भाऊसाहेब यांची कांहीं बोलाचाली होऊन यानें सरकारच्या डेऱ्यावर तोफा डागल्या. त्यामुळें याच्या सर्व सरंजामाची जप्ती झाली (१७४७), ती स. १७५१ (आगस्ट) त मोकळी झाली. मध्यंतरीं याला अतोनात कर्ज झालें व त्यामुळें त्यानें निजामाकडेहि संधान बांधलें; निजामानें याला जहागीर व पंचहजारी मनसब कबूल केली. परंतु पुढें रामचंद्रबाबा शेणवी यानें व यशवंतरावाचा दिवाण काशीपंत यानें यशवंतराव व पेशवे यांचा समेट घडवून आणला. पेशव्यांनीं त्याची सर्व बाकी माफ केली व सरंजामजप्ती मोकळी झाली. यानंतर पेशव्यांच्या बहुतेक (घोडनदी, कुकडी, भालकी, होळीहुन्नुर, धारवाड) मोहिमांत यशवंतराव हा हजर असे (१७५१-५३). कुंभेरीच्या (१७५४) वेढ्यांत दादासाहेबाबरोबर हा व याचा धाकटा भाऊ रायाजीहि होता. रायाजीला स. १७५० च्या सुमारास सरदारी मिळाली होती. श्रीरंगपट्टण (१७५७), शिंदखेड, उदगीर (१७६०) वगैरे लढायांतहि यशवंतरावानें चांगला पराक्रम दाखविला. यावेळच्या लुटींतून पेशव्यानीं याला एक राजराजेश्वराची मूर्ति व चौघडा, जरीपटका आणि २५ शें स्वारांचें पथक दिलें. ही मूर्ति सांप्रत धारच्या राजवाड्यांत पवारांची कुलदेवता म्हणून पूजिली जाते. चौघडाहि तेव्हांपासूनच वाजविला जात असतो यशवंतरावानेंहि घोडनदीच्या कांठीं या गोष्टींच्या स्मरणार्थ फत्तेश्वर महादेवाचें देऊळ बांधलें आहे. या वंशांत राजा हें पद प्रथम यालाच मिळालें. शेवटीं हा पानिपतांत गारद झाला (१७६१). त्यानें २७ वर्षें कारभार केला. यशवंतराव शूर, दयाळू, साहसी व बेफिकिरी होता. पुढें (१७७४) याचा एक तोतया निघाला होता.

खंडेराव:- हा यशवंतरावाचा पुत्र: बापाच्या मृत्यूच्या वेळीं हा लहान होता. त्यामुळें सरकारच्या स्वाऱ्यांबरोबर पवारांचें पथक घेऊन यशवंतरावाचा लेकवळा महिपतराव हा जाई. त्यामुळें तो थोरल्या माधवरावांचा आवडता होऊं लागला. तेव्हां खंडेरावानें राघोबादादाचा आश्रय घेतला. त्याचा व महिपतरावाचा नेहमीं तंटा पडे. खंडेरावाची आई गहिनाबाई व तिची सवत सकवारबाई यांचीहि चुरस असे. खंडेरावानें आनंदीबाई पेशवे हिला धारच्या किल्ल्यांत आश्रय दिला. त्यामुळें कारभारीमंडळाचा (पुणें येथील) त्याच्यावर रोष होऊन त्यांनीं याचा सरंजाम जप्त केला. पुढें मध्यस्थी वगैरे होऊन जप्ती मोकळी झालीं (१७७८). आनंदीबाई धारच्या किल्ल्यांत सुमारें पांच वर्षें होती यांतर खंडेराव महादजी शिंदे याच्याबरोबर मोहिमांवर जाई. पुढें चार वर्षांनीं खंडेराव वारला (१७८३).

आनंदराव दुसरा:- (याची हकीकत ज्ञानकोशाच्या ७ व्या विभागांत आहे; तिच्यापेक्षां जास्त येथें दिली आहे.) हा आजोळी बडोद्यास दरमहा १ हजाराच्या नेमणुकीवर असतां राज्यकारभार रंगराव ओढेकर दिवाण पाहत असे. खर्ड्याच्या लढाईंत आनंदरावाचें पथक होतें; त्याचप्रमाणें सरकारच्या मोहिमांतहि याचें पथक हजर असे. उत्तरेकडे अल्लीबहाद्दरच्या हाताखालीं आनंदरावाचें सैन्य जाई. असईच्या लढाईंत आनंदराव लढत होता (१८०३). रंगराव ओढेकरानें आपला अधिकार गेलासें पाहून होळकराच्या दरबारचा आश्रय घेतला. होळकरानें त्याला थापा देऊन धारकराचा मुलुख लुटला. तेव्हां रंगराव दौलतराव शिंद्याकडे गेलाच; शिंद्यानें त्याच्या मदतीनें नऊ वर्षें धारच्या राज्यावर स्वाऱ्या करून पुष्कळ प्रांत व पैसाहि उकळला. इतक्यांत आनंदराव वारला. त्यामुळें संस्थानांत जास्त घोंटाळा झाला. आनंदरावाची बहीण वाईट चालीची असून तिनें त्याला विषप्रयोग केल्याचें सांगतात. याबद्दल तिला व तिच्या साथीदारांनां पुढें योग्य शासन मिळालें.

रामचंद्रराव:- हा आनंदरावाचा पुत्र. आनंदरावांच्या पश्चात त्याची स्त्री मैनाबाई हिनें कारभार हातीं घेतला. ती यावेळीं गरोदर होती. मुरारराव नांवाच्या एका लेकवळ्यानें राज्यांत यावेळीं धुमाकूळ उडविला होता. मैनाबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला, त्याचें नांव रामचंद्र ठेविलें. नंतर बाईनें हळू हळू मुराररावाची धुमाळी बंद केली; तरीहि त्याची कटकट चालूच असे. बडोद्याची फौज बाईनें आपल्या मदतीस ठेविली होती. इतक्यांत रामचंद्रराव वारला. तेव्हां बाईनें शिंदेहोळकरांच्या संमतीनें आपला भाचा दत्तक घेऊन त्याचेंहि नांव रामचंद्रराव ठेवून कारभार चालविला. परंतु राज्यावर चोंहोकडून संकटें आलीं. यावेळीं शिंदेहोळकरांनीं धारच्या राज्यांतील बराच मुलुख आपले ताब्यांत घेतला. मैनाबाई फार दक्ष व शूर असल्यानें तिनें राज्य अजीबात बुडूं दिलें नाहीं. स. १८१७ त इंग्रज जेव्हां पेंढाऱ्याच्या उच्छेदाकरितां माळव्यांत शिरले तेव्हां मैनाबाईच्या ताब्यांत केवळ धार शहरच होतें व तिला सारा २०-२५ हजार वसूल येई. पुढें इंग्रजांचा व धारकर यांचा तह होऊन इंग्रजांनीं राज्याचें रक्षण करण्याचें काम पत्करून ३५ हजार वसुलाचा मुलुखहि मिळवून दिला. धार, बदनावर, नालछा हे प्रांत रजपूत संस्थानिकांकडून जी खंडणी मिळे त्याऐवजीं १ लक्ष १० हजारांची रक्कम परभारें इंग्रजांकडून दरसाल मिळूं लागली. संस्थानांत व्यवस्था लागून १८२ सालीं २ लक्ष ६७ हजार रुपये वसूल आला. रामचंद्ररावाची पहिली बायको अन्नपूर्णाबाई ही दौलतराव शिंद्याची (कोण?) होती. इंग्रजांबरोबर १८२८, १८३१ व १८३५ सालीं आणखी तहनामे झाले;  त्यांत विशेष फरक नव्हता. मध्यंतरीं (१८३२) अवचितराव नांवाच्या एका माणसानें आपण मुराररावाचा पुत्र म्हणून बंड केलें व त्याला पुष्कळ भिल्लांनीं साहाय्य केलें. संस्थानाकडून तें मोडलें जाईना म्हणून इंग्रज मध्यें पडले आणि दरमहा २०० रु. ती नेमणूक अवचितरावास करून देऊन त्याची समजूत घातली. पुढल्या वर्षी रामचंद्रराव वारला (१८३३). रामचंद्ररावास पुत्र नसल्यानें मलठणचा उदाजीच्या वंशांतील मुलगा दत्तक घेऊन त्यास गादीवर बसविलें (१८३४).

यशवंतराव, दुसरा:- याच्या कारकीर्दीत धारचा जुनां व नांवाजलेला दिवाण बापू रघुनाथ हा वारला. याची बायको नानाबाई नांवाची होती. याला मूल झालेंच नाहीं व मुलगा नसल्यानें त्याचा अल्पवयस्क सावत्रभाऊ दत्तक होऊन गादीवर आला. यशवंतरावानें २३ वर्षें शांतपणें राज्य केलें होतें. हा १८५७ सालीं वारला. या सालीं धार येथेंहि बंड झालें. वास्तविक राजा लहान होता, त्याचा बंडांत कांहीं हातहि नव्हता; पण इंग्रजांनीं संशयामुळें धार संस्थान खालसा केलें. पुढें चौकशी करून राज्य सोडलें,मात्र बेरसिया नांवाचा एक प्रांत जप्त करून भोपाळच्या बेगमेस दिला.

आनंदराव, तिसरा:- हा मोठा झाला तरी पोलिटिकल एजंट याच्या मतें तो राज्य चालविण्यास लायक नसल्यानें स. १८६४ पर्यंत त्याला मुखत्यारी मिळेना. यावेळीं गव्हर्नर जनरल लॉरेन्स यानें त्याला मुखत्यार केलें मात्र त्याच्याकडून कांहीं अटी कबूल करवून घेतल्या. यानें इ. स. १८९८ पर्यंत शांतपणें राज्य कारभार केला.

उदाजीराव. दुसरे:- आनंदराव निपुत्रिक असल्यानें त्यांच्या पश्चात् दत्तक मुलगा घेऊन गादी चालविली. मुलाचें नांव उदाजीराव ठेविलें. हेच सांप्रतचे धारचे महाराज आहेत. यांचें सबंध नांव मेजर हिज हायनेस महाराज सर उदाजीराव पोवार साहेब बहादूर, के.सी. एस. आय; के. सी. व्ही. ओ; के. बी. ई. असन, यांचा जन्म इ. स. १८८६ त झाला. यानां १५ तोफांची सलामी आहे.

या घराण्यांतील (बुबाजी, दारकोजी, मनौजी, गोविंदराव, चंदरराव, दुसरा गोविंदराव, दुसरा दारकोजी व यशवंतराव हे) आठ पुरुष सरकारकामीं ठार झाले. सन १७६८-६९ चा एक हिंदुस्थानचा झाडा महाल उपलब्ध आहे, त्यांत उत्तर हिंदुस्थानांतील महाल पुढीलप्रमाणें त्या त्या सरदाराकडे होते.होळकर १४।, शिंदे १८।।।, आणि पवार मंडळीकडे (धारकर १८।, देवासकर ७।, अहमदाबादकर २ मिळून) २७।। होते. [फडके- परमार घराण्याचा इतिहास; का. कृ, लेले व शि. का. ओक यांनीं पुरविलेली माहिती; सप्तप्रकर्णात्मक बखर; मावजी-कैफियती; राजवाडे खंड, ३, ६, ८, १५; शाहू महाराजाची रोजनिशी; देवास ग्याझे; मालकम; डफ; होळकराची कैफियत; पेशवे शकावली.]

गांव.- धार संस्थानाच्या राजधानीचें ठिकाण. राजपुताना माळवा रेल्वेच्या महू स्टेशनपासून ३३ मैल, व समुद्रसपाटीच्या वर १९०८ फूट आहे. धार हें नांव "धारानगरी" या नांवापासून आलें आहे. उत्तरेस तांबड्या दगडांचा किल्ला आहे. जुन्या गांवाभोंवती हिंदूच्या वेळीं बांधलेला धुलकोट, आहे. हें गांव जुनें असून ५ शतकेंपर्यंत माळव्याच्या परमार रजपुतांच्या राजधानीचें ठिकाण होतें. ह्या घराण्याची पहिली राजधानी उज्जनी येथें होती; पण त्या घराण्यांतील पांचवा पुरुष, दुसरा वैरिसिंह याने ती या ठिकाणीं आणली. भोजराजा गादविर बसल्यानंतर धारचें महत्त्व वाढून त्याला पहिलें स्थान प्राप्त झालें. मुंज बाक्पति (९७४ ते ९९५), सिंधु राजा (९९५-१०१०) व भोज यांच्या कारकीर्दीत धार हें सर्व हिंदुस्थानांत विद्येचें मुख्य ठिकाण समजलें जात असे आणि येथील राजे, स्वत: लेखक व चांगले विद्वान होते. १३०० सालीं अल्लाउद्दीनानें धारपर्यंत सर्व माळवा जिंकला, त्यावेळीं धारमध्यें मुसुलमानांचा प्रथम प्रवेश झाला. यानंतर १० वर्षांनीं, मलिक काफूर यानें येथें मुक्काम केला होता. स. १३४४ च्या दुष्काळां महमद तघलख येथें आला असतां त्याला सर्व प्रदेश ओसाड आढळून आला; स. १३९९ त धारचा सुभेदार दिलावरखान हा बहुतेक स्वतंत्र झाला; त्याचा मुलगा होशंगशहा हा माळव्याचा पहिला मुसुलमान राजा होय. त्यानें मांडू ही आपली राजधानी केल्यामुळें धारचें महत्त्व अर्थातच कमी झालें. अकबराच्या कारकीर्दींत, धार हें माळवासुभ्यांत, मांडू सरकारींतील एका महालाचें मुख्य ठिकाण होतें. स. १५९८ त दक्षिणेंस स्वारीवर जातेवेळीं अकबरानें येथें मुक्काम केला होता, ही हकीकत तेथें असलेल्या लोखंडी लाटेवर लिहिलेली आहे. स. १६५८ त येथील किल्ला दारा शिकोहच्या ताब्यांत होता, परंतु औरंगझेब जवळ आल्याबरोबर किल्ला मोकळा करून तो यशवंतसिंगास जाऊन मिळाला. हा किल्ला १७३० सालीं मोंगलाकडूच मराठ्यांकडे आला.

लोकसंख्या, (१९११) ७४७२ पैकीं शे. ७५ हिंदु, व १९ मुसुलमान आहेत. धार हें या संस्थानांत व्यापाराचें मुख्य ठिकाण असून येथून धान्य व अफू हे जिन्नस मुंबई व इतर ठिकाणीं पाठविण्याकरितां महूस रवाना होतात. येथें अफूचा सरकारी डेपो आहे. येथें दोनतीन मुसुलमानी काळांतील इमारती असून त्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. गांवाच्या उत्तरेस उंचवट्यावर असलेला लाल दगडांचा किल्ला महंमद तुघलखाच्या वेळीं (१३४४) बांधलेला असावा. देवगिरीची खंडणी सुखरूप दिल्लींस जाण्यासाठीं हा बांधला. धाकट्या बाजीरावचा जन्म या किल्ल्यांत झाला; स. १८५७ च्या बंडांत रोहिले व संस्थानच्या नोकरींत दुसरे भाडोत्री शिपाई यांनीं हा किल्ला काबीज केला होता. तो महू येथील सैन्यानें ६ दिवसपर्यंत तोफांचा भडीमार करून परत घेतला. किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्यावरील एका लोखंडी पत्र्यावर औरंगझेबाचा एक फारशी शिलालेख आहे (१६८३ चा). लाल मशीद ही माळव्याचा पहिला सुलतान दिलावरखान यानें हिंदू देवालयांच्या अवशेषांपासून १४०५ सालीं बांधिली. तिच्या बाहेर असलेल्या लोहस्तंभा (लाट)वरून हिला लाल मशीद हें नांव पडलें. पूर्वीचें नांव जामी मशीद ह्या स्तंभावरील लेखांत अकबरानें आपल्या कारकीर्दीच्या ४४ व्या वर्षी (१६००) येथें मुक्काम केल्याचें लिहिलें आहे. हा स्तंभ भोज परमार (१०१०-१०५५) च्या कारकीर्दीत त्रिपुरीचा भेदिराज गांगेयदेव व तेलंगणचा राजा यांच्यावरील विजयाचें स्मारक म्हणून उभारण्यांत आला. गुजराथच्या सुलतान बहादूराच्या मनांत हा स्तंभ घेऊन जाण्याचें होतें. तो मोडून त्याचे तीन तुकडे झाले व तेव्हांपासून हा जमीनीवर पडलेला आहे अशी हकीगत व जहांगिरानें आपल्या रोजनिशींत नमूद केलेली आहे. ह्याची मूळची लांबी ४४।४५ फूट होती, पण आतां त्याचे चार तुकडे झालेले आहेत. एक तुकडा जो मशीदीजवळ पडला आहे त्याची लांबी २४ फूट लांब व ४ फूट घेंर असून तो चौकोनी आहे. याला तेलणीची लाट ह्मणतात. मशीदीच्या पूर्वेच्या व उत्तरेच्या दरवाजावर दोन फारशी शिलालेख (१४०५ चे) आहेत. मशीदीच्या नैर्ऋत्येस दीड कोसावर सिंहासन बत्तिशीच्या कथा जेथें घडल्या ती सिंहासनटेंकडी आहे. कमाल मौला हें लहानसें आवार असून त्यांत चार थडगी आहेत.त्यापैकीं एक पहिल्या महमद खिलजीचें (१४३५-६९) आहे. दरवाज्यावर निळ्या रंगांत क्रुफिक लिपीक एक लेख आहे. या आवाराजवळच भोजशाळा नांवाची इमारत हल्ली. मशीदीच्या रूपांत आहे. ही मशीद १४ व्या किंवा १५ व्या शतकांत हिंदू देवळांच्या विशेषत: तेथील सरस्वति मंदिराच्या अवशेषापासून तयार केलेली आहे. प्रख्यात राजा भोजानें (१०१०-१०५५) शहराच्या एका मध्यचौकात हिंदुस्थानांतील निरनिराळ्या शास्त्रीपंडितांशीं वादविवाद करण्यास हें सरस्वति मंदीर बांधलें. यांत विद्यार्थ्यांस राहण्याचीं व शिकण्याची सोय होती. हेंच मंदीर हल्लीची मशीद होय. धारेमध्यें ८४ चौक होते त्यांत मधोमध हें मंदीर होतें. येथील भिंतीच्या दगडांवर फुटकळ संस्कृत लेख होते ते मुसुलमानांनीं फरसबंदीस लावून टाकीनें खोडून टाकले आहेत.

येथील दोन खांबांवर संस्कृतांतील विभक्तिप्रत्यय सर्पाच्या आकृतिप्रमाणें कोरलेले आहेत. खांब व इतर ठिकाणीं हिंदु पद्धतीचीं चित्रें वगैरे आहेत. गांवाच्या नैर्ऋत्येस, जुन्या हिंदु तटबंदीवर अब्दल्ला शहा चंगाल (दुसऱ्या भोजच्या वेळचा १३१० मधील एक मुसुलमान साधू) याचें थडगें आहे.त्यावर एक स. १४५५ चा शिलालेख आहे. गांवाच्या दक्षिणेस तळ्याच्या कांठच्या टेंकडीवर कालिका देवीचें सुंदर देवालय आहे. देवीच्या खर्चासाठीं स्वतंत्र जहागीर तोडून दिली आहे. येथून जवळच मुंज राजानें बांधलेला मुंजसागर नांवाचा तलाव व राजघराण्याच्या छत्र्या व धारेश्वराचें देऊळ आहे. [आर्कि-सर्व्हे रिपोर्ट १९०२-०६; धारचा इतिहास-लेले व ओक.]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .