प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ 
       
नाणकशास्त्र- एकंदर शास्त्रीय वाढीचा आजमितीस विचार करतां नाणकशास्त्र हें नुकतेंच उदयास आलें आहे असें दिसेल; कारण प्राचीन लोकांनीं नाण्यांचे सार्वजनिक संग्रह केले असल्याचें दृष्टोत्पत्तीस येत नाहीं, कदाचित् उत्तम कौशल्याचे नमुने म्हणजे व्यक्तिशः कांहीं लोकांजवळ नाण्यांचा खासगी संग्रह असण्याचा संभव आहे. नाण्यांचा छोटा संग्रह करण्याचा मान पेट्रार्क् यास देण्यांत येतो, आणि त्यावरून पेट्रार्कच्या कालांत प्राचीन नाण्यांबद्दल लोकांची जिज्ञासा उत्पन्न झाली असण्याचा संभव आहे. त्या कालापासून उपलब्ध अशा अनेक नाण्यांसंबंधीं परिश्रमपूर्वक संशोधन करणें हें महत्त्वाचें काम असून त्या बाबतींत शास्त्रज्ञांनीं आजपर्यंत पुष्कळ प्रयत्नहि केले आहेत.

ह्या नाणकशास्त्राचा उपयोग जगाचा इतिहास, त्यांत प्रचलित असलेल्यां धर्मसमजुती, निरनिराळ्या लोकांचे आचारविचार, त्यांनीं प्रगल्भ दशेस आणलेल्या विविध कला यांच्या ज्ञानास अत्यंत उपकारक होतो. इतकेंच नव्हे तर शिल्पासारख्या कलेचा सांप्रत शास्त्रशुद्ध अभ्यास करूं इच्छिणार्‍यास देखील ह्या शास्त्राचें महत्त्व फार आहे. निरनिराळ्या ऐतिहासिक युगांत ह्या शिल्पकलेच्या कोणत्या पद्धती प्रचलित असाव्या हें प्राचीन नाण्यांवरून स्पष्ट कळून येऊन पुढेंहि ह्या कलांची वाढ कशी करावयाची याची दिशा कळते. तसेंच सध्याच्या नाण्यांतील निरनिराळ्या उणीवा कळण्यास ह्या शास्त्राचा उपयोग होणार आहे.

सध्यां उपलब्ध असलेल्या नाण्यांत अत्यंत प्राचीन नाणीं ख्रि. पूर्व सातव्या शतकांत ग्रीक लोकांनीं पाडिलेलीं होत. इ. सनाच्या चौथ्या शतकांत सर्व सुसंस्कृत जगांतील निरनिराळ्या राष्ट्रांत पैशाची देवघेव चालत असून नाण्यांचा प्रसार झाल्याचें सिद्ध झालें आहे.

वर्गीकरण पद्धतिः- ह्या नाण्यांचें वर्गीकरण करण्याबद्दल कांहीं सर्वसामान्य पद्धति अद्याप निघालेली नाहीं, तरी पण सध्यां ठोकळमानानें ह्या नाण्यांचे तीन वर्ग करण्यांत येतात, तेः-(१) प्राचीन ग्रीक व रोमन नाणीं, (२) मध्ययुगीन व अर्वाचीन कालांतील नाणीं, व (३) पौर्वात्य नाणीं. ह्या ठोकळ वर्गांतील नाण्यांचें त्यांतल्यात्यांतच पोटवर्गीकरण कसें करावयाचें याबद्दल कांहीं नियम ठरलेले नाहींत. परंतु ग्रीक नाण्यांचें वर्गीकरण प्रथम भौगोलिक क्रमानें म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रांतवार व नगरवार करण्यांत येतें व नंतर कालक्रमानुसार करण्यांत येतें; रोमन नाण्यांचें वर्गीकरण मात्र भौगोलिक क्रम लक्षांत न घेतां केवळ कालक्रमानुसार करण्यांत येतें; मध्ययुगांतील व अर्वाचीन कालांतील नाण्यांचें वर्गीकरण ग्रीक नाण्यांसारखेंच करण्यांत येतें; पौर्वात्य नाण्यांचें वर्गीकरण ग्रीक नाण्यांसारखेंच परंतु जरा ठोकळ रीतीनें करण्यांत येतें.

प्राचीन ग्रीक व रोमन नाणीं

या ग्रीक नाण्यासंबंधानें भौगोलिक क्रमानुरूप वर्णन देण्यापूर्वी त्यांचें सामान्य स्वरूप, प्रमुख संज्ञा, त्याच्यावरील सुबक अक्षरें इत्यादि गोष्टींविषयी प्रथम विचार केला पाहिजे. या ग्रीक नाण्यांचा काल ख्रि. पूर्व ७०० पासून इ. स. २६८ पर्यंत म्हणजे जवळ जवळ हजार वर्षांचा ठरतो. आकार, घडण व सामान्य स्वरूप ह्या दृष्टीनें वर्गीकरण करूं लागलें तर ह्या नाण्यांचे (१) पुरातन, (२) सामान्य, आणि (३) ग्रीको-रोमन पद्धतीचीं असे तीन भेद पडतात. पहिल्या वर्गातील नाणी रुपें, सोनें किंवा इलेक्ट्रम या धातूंचीं केलेलीं असून दिसण्यांत ओबडधोबड व एका बाजूस कांहीं तरी अक्षरें व दुसर्‍या बाजूस चौकोनी अगर लंबचौकोनी आकाराचा ठसा असलेलीं असतात. दुसर्‍या वर्गांतील नाणीं, सोनें, रुपें, इलेक्ट्रम व कांसें ह्यांचीं केलेली असून, पहिल्यापेक्षां बरींच पातळ असतात, व तिसर्‍या प्रकारचीं बहुतेक काशाचीं असून अगदीं सपाट, रुंद परंतु पातळ व पुढील बाजूस रोमन बादशहाचा मुखवटा असलेलीं असतात.

याशिवाय त्यांची पुढीलप्रमाणें आणखी वर्गवारी होतेः- (१) नगरराज्यांतील प्रचलित, मुखवटा नसलेलीं, (२) बादशाही मुखवट्यांची, (३) बादशाही, मुखवट्याचा ठसा नसलेलीं अगर असलेलीं ग्रीको-रोमन बादशाही नाणीं.

ह्यांपैकीं पहिल्या वर्गांतील नाण्यांवरील ठसे पुढील प्रकारचे असतः- (१) एखाद्या विशिष्ट नगरांतील किंवा विशिष्ट लोकांच्या उपास्य देवतेचें मस्तक अगर आकृति, (२) विशिष्ट देवतांस प्रिय समजण्यांत आलेले घुबड, कांसव ह्यांसारखे प्राणी, ऑलिव्हसारख्या वनस्पतीची फांदी, देवतांचीं हत्यारें; (३) स्थानिक नदी किंवा पर्वत यांच्या देवतेचें मस्तक अगर आकृति; (४) एखाद्या कल्पित दैत्याचें अगर देवाचें मस्तक; (५) कल्पित प्राण्यांच्या आकृती; (६) युलिसेस्, टॉरस् ह्यांसारख्या योद्धयांचीं किंवा वंशप्रस्थापकांचीं मस्तकें अगर आकृती; (७) ह्या योद्ध्यांशीं संबंध असलेले प्राणी अगर पदार्थ; (८) देवतांचीं सुप्रसिद्ध अशीं खरीं किंवा कल्पित पर्वत, टेंकड्या वगैरे निवासस्थानें व (९) सार्वजनिक व धार्मिक उत्सवांचे देखावे, जत्रा वगैरे.

नाण्याच्या पुढील व मागील बाजू निरीक्षण करून त्यांतील परस्पर संबंध शोधून काढणें हें अत्यंत महत्त्वाचें काम आहे. बहुतेक एकाच नाण्याच्या दोन्ही बाजूंस असलेल्या दोन्हीं पदार्थांत कांहीं तरी संबंध आढळून येतो. उदाहरणार्थ, कॅमॅरिन्ना येथील रुप्याच्या ''डिड्रॅच'' ह्या नाण्याच्या एका बाजूस ''हिप्परिस्'' या नदीदेवतेचें मस्तक असून मागील बाजूस हंसावर बसून पाण्यांतून चाललेली एक तडागदेवता दाखविली आहे. कधीं कधीं नाण्याच्या पुढील बाजूस यावेळी एखाद्या देवतेचें मस्तक असतें. त्याच्या मागील बाजूस त्या देवतेचा संबंध असलेले पदार्थ आढळून येतात. उदाहरणार्थ, अथेन्समधील सामान्य 'टेट्रॅड्रॅकम्' या नाण्याच्या पुढील बाजूवर अथेनी देवतेचें मस्तक असून मागील बाजूस त्याच देवतेचा प्रिय असा घुबड पक्षी किंवा ऑलिव्हची खांदी दिसून येते. नाण्यांवरील वीरपुरुषांच्या ठशांमध्येंहि अशाच प्रकारचा संबंध आढळून येतो. निरनिराळ्या राज्यांच्या नाण्यांवर बहुधां स्थानिक माहिती दर्शविणारे ठसे आढळून येतात, ह्याचें कारण तत्कालीन लहान लहान राज्यांचा विस्तार फार नसून कांहीं राज्यांची मर्यादा तर त्या शहरापुरतीच असे.

ह्या बादशाही मुखवट्यांच्या नाण्यांचें निरीक्षण केलें असतां निराळा प्रकार दृष्टीस पडतो. ज्या नाण्यांवर देवतेचे ठसे असतात त्यांवर बराच कालपर्यंत राजे बादशहा वगैरेंच्या आकृती उमटवीत नसत कारण मनुष्यें व त्यासंबंधीं माहिती नाण्यावर खोदणें अयोग्य आहे अशी तत्कालीन धार्मिक समजूत होती. पुढें राजाला देवाचा अवतार मानून मग त्याची प्रतिमा नाण्यावर घेऊं लागले. उदाहरणार्थ, लिसि मॅकस् येथील नाण्यावरील अलेक्झांडरची आकृति, ही येथें तो झूस् अमन ह्या देवतेचा पुत्र म्हणून त्याची आकृति दिली आहे. हा प्रकार पुढें इतका वाढला कीं, ग्रीक साम्राज्याचा मोड झाल्यानंतर निरनिराळ्या वंशांतील प्रत्येक राजानें आपला मुखवटा नाण्यावर खोदविला. अलेक्झांडरनें निरनिराळ्या ठिकाणच्या नाण्यांतील स्थानिक भेद काढून टाकून सरसकट आपल्या स्वतःच्या बादशाही नाण्यांचा प्रचार सुरू केला. त्याच्या वंशजांनीं हीच पद्धति पुढें चालविली व अशा नाण्यांत स्थानिक खुणा (शहरांचीं नांवें वगैरे) त्यांच्या मागील बाजूस असतात. ग्रीको-रोमन नाणीं मात्र, रोमन लोकांनीं ग्रीक राज्यांचा पाडाव केल्यावर निरनिराळ्या देशांत भिन्न भिन्न काळीं प्रचारांत आलीं. हीं बहुतेक सर्व कांशाचीं आहेत. ह्यांच्यावर सुप्रसिद्ध पुरुषांचे मुखवटे खोदलेले आहेतच, शिवाय कांहींवर 'आशा, वगैरे देवता कोरलेल्या आढळतात. ह्या वर्गांतील नाण्यांवरील ठसे तीन प्रकारचे असतातः- (१) होमर कवीसारख्या सुप्रसिद्ध किंवा हिरोडोटस सारख्या अज्ञात विभूतींच्या आकृती; (२) अथेनी देवता आपली दुहेरी सनई वाजवीत आहे हा किंवा असेच दुसरे देखावे, (३) 'आशा' वगैरे देवता. ह्यांखेरीज एक ग्रीको-रोमन नाण्यांचा प्रकार म्हणजे रोमकालीन वसाहतींत प्रचारांत असलेली लॅटिन लेखांकित नाणीं होय. ह्याशिवाय सर्व गोष्टींत हीं नाणीं ग्रीक बादशाही नाण्यासारखींच दिसतात.

ह्या ग्रीक नाण्यांचे स्थानभेदानें ३ वर्ग असून त्यांमध्येंहि कित्येक पोटभेद आहेत. 'मध्यग्रीस वर्ग'; हा पहिला असून, त्यांत थ्रेस व मॅसिडोनिया प्रांतांतील उत्तरेकडील पोटभेदांचा समावेश करण्यांत येत असून 'पेलोपोनेसिस' येथील दक्षिणेकडील आण क्रीट व सीरेन या दूरच्या ठिकाणचे विशिष्ट पोटभेद समाविष्ट होतात. दुसरा आयोनियन वर्ग; ह्यांत आयोनिया, मायसिया, एओलिस, र्‍होड्स व केरिआ या प्रांतांतील नाण्यांच्या पोटभेदांचा व शिवाय आशिया मायनर, इराण, फिनिशिया, इत्यादि देशांच्या नाण्यांच्या पोटभेदांचाहि समावेश केला जातो. पश्चिम ग्रीस वर्ग; यांत इटाली व सिसिली या दोन देशांतील नाण्यांच्या पोटभेदांचा समावेश होतो.

या वर्गांची कालमर्यादा, इराणी लोकांचा पराजय व अलेक्झांडरचा राज्यस्वीकार या गोष्टींवरून ख्रि. पू. ४८० ते ३३२ च्या दरम्यान नियमित झाली आहे. यापूर्वीची स्थिति बरीच अज्ञात आहे. ह्या प्रत्येक वर्गांतील नाण्यांचा अभ्यास करावयाचा म्हणजे त्या वर्गांचा मूलभूत विशेष काय व मागाहून निरनिराळ्या शिल्पकलाभिज्ञ कारागिरांनीं केलेल्या कार्यांचे त्याजवर काय काय परिणाम झाले हें पाहिलें पाहिजे. मध्यग्रीस या वर्गाचें शिल्पक्षेत्र फार विस्तृत आहे. फीडिअसच्या शिल्पकामाशीं तुलना करतां येण्याजोगे नमुने ह्याच वर्गांत सांपडतात. ह्या वर्गांतील प्रथम प्रथम तयार झालेल्या कामांत एक प्रकारचा साधेपणा व उच्च दर्जाचें आत्मसंयमन दिसून येतें. ह्यानंतर शिल्पकलानिष्णात लोकांच्या शिल्पकामांत उठाव, व उच्च प्रकारचें वैभव दिसून येतें. एखाद्या क्षुल्लक प्राण्याच्या खोदकामांत देखील नमुनेदार सुबकपणा आढळून येतो. यानंतरच्या 'प्रक्झाटेलीस' व 'स्कोप्स' यांच्या कामांत चित्रकलेचा शिरकाव झाल्याचें दिसतें. आयोनियन वर्गाची सांखळी मात्र इराणच्या अनिष्ट परिणामामुळें थोडी तुटल्यासारखी दिसते, आणि त्यामुळें ह्या कालांत पहिले व शेवटचे नमुनेच उपलब्ध होतात. ह्यांपैकीं फक्त शेवटचीं नाणीं मात्र मध्यग्रीस वर्गांतील नाण्यांबरोबर तुलना करण्यालायक आहेत. यांचा विशेष शिल्पकौशल्यांत नसून भावनाविष्करण करण्यांत आहे. याकाळीं हेलॉस या ठिकाणी ज्याप्रमाणें उत्तमोत्तम शिल्पकार जन्मले त्याचप्रमाणें प्रश्चिम आशियामायनर प्रांतांत, रंगकामामध्यें अत्यंत सुप्रसिद्ध अशा पॉलिग्नाटससारखे पुष्कळ लोक उदयास आले.

पश्चिम वर्गांतील नाण्यांची अत्यंत पूर्ण अशी वाढ इटली देशांत झालेली दिसते व ह्या वर्गाचें विशेष स्वरूप सिसिली या बेटांत जास्त एकवटलेलें दिसतें. या वर्गाच्या पूर्वावस्थेंत देखील एक प्रकारचें सौंदर्य व सफाई आणण्याचा प्रयत्न केलेला दिसते, व इतर वर्ग नामशेष झाले असतां देखील मागाहून बराच कालपर्यंत ह्या वर्गाचा वरील विशेष गुण आढळून येतो. त्याचप्रमाणें योग्य आकार व शेवटची सफाई देणें यासंबंधींचें ज्ञान ह्या वर्गांत पूर्णपणें आढळून येतें. ह्यापैकीं अत्यंत महत्त्वाचा वर्ग म्हणजे 'क्रीटन' होय. या वर्गांतील सर्व काम पूर्ण कलाविकासाच्या वेळीं झालेलें असून त्याच्या शिल्पकामांत एक प्रकारचा जिवंतपणा व स्वतंत्र वातावरण आढळून येतें.

ह्यानंतर एकेलच्या विभागणीप्रमाणें प्रत्येक देशाचीं नाणीं क्रमवारीनें पाहतां प्रथम स्पेन, गॉल व ब्रिटन हे देश येतात. ह्या वर्गांतील नाणीं एकाच जातीचीं नसून निरनिराळ्या विशिष्ट गुणांनीं युक्त अशा अनेक पोटभेदाचीं आहेत. ह्या वर्गांतील प्राथमिक नाणीं म्हणजे मासिडोनच्या दुसर्‍या फिलिपच्या सोन्याच्या व रुप्याच्या नाण्यांच्या नकलाच होत. ह्यानंतरचीं नाणीं रुप्याच्या रोमन नाण्यांच्या बरहुकूम आहेत.

स्पेनः- गॉल, स्पेन या देशांत, वरील नाण्यांच्या बरोबरीनें वसाहतींतील ग्रीक नाणींहि चालू असलेलीं आढळून येतात. अर्वाचीन स्पेन व पोर्चुगाल देशांशीं जुळणार्‍या प्राचीन हिस्पॅनिया प्रांतांतील नाण्यांचे सरासरी दोन वर्ग पडतात. पहिला वर्ग प्राचीन असून जास्त प्रचलित असावा. ह्या नाण्यांवरून आयोनिअन लोकांचें समुद्रावरील वर्चस्व सिद्ध होतें. स्पेनमधील कार्थेजी नाणीं वरील नाण्यांच्या वेळींच प्रचलित झालेलीं दिसतात. ऐतिहासिक व भौगोलिक माहितीच्या दृष्टीनें ह्या नाण्यांस फार महत्त्व आलें आहे. हिस्पॅनियाच्या प्रांतिक बादशाही नाण्यांचे दोन वर्ग पडतात. मोठा वर्ग ग्रीक बादशाही नाण्यांचा असून, दुसरा वर्ग रोमन वसाहतींतील नाण्यांचा होता. यांच्या पुढील बाजूस बहुतेक बादशहाचा किंवा बादशाही कुटुंबांतील दुसर्‍या एखाद्या पुरुषाचा मुखवटा आढळतो व मागील बाजूस, बैलांनी ओढला जाणारा नांगर चालविणारा उपाध्याय किंवा बैल, किंवा एखादें देऊळ वगैरे प्रांतिक जातीचे ठसे मारलेले दिसतात.

गॉल देशः- गॉल देशाचें नाणें त्या देशाचें म्हणण्यापेक्षां तेथील लोकांचें समजावें. ह्या नाण्यांचा उत्तर इटलींतील नाण्यांवर बराच परिणाम झाला. ह्या प्रांतांत चार वर्गांचीं नाणीं आढळून येतात. ह्यांचा कालानुक्रम ठरविला असतां हीं नाणीं मॅसिलीआ (मार्सेलीस) येथील ग्रीक वसाहत, आणि मध्य व पश्चिम यूरोपखंड यांतील लोकांमध्यें चालू होतीं असें दिसतें.

इटलीः- इटलींतील प्राचीन नाणीं ६ व्या शतकाच्या आरंभापासून नंतरच्या ५०० वर्षांच्या पाडलेलीं दिसतात. ह्यापैकीं पुष्कळशीं नाणीं रोमन सत्तेच्या विस्तारापूर्वीचीं आहेत. रोमन सत्तेच्या विस्तारानंतर सर्व इटलीमध्यें रोमन नाणीं सर्रास चालू झालीं. ह्या नाण्यांचे खरीं इटालियन व ग्रीको इटालियन असे दोन वर्ग पाडण्यांत येतात. खरीं इटालियन नाणीं सोनें, रुपें, कांसे यांचीं आहेत. इटालियन नाण्यांवरील शिल्पकला ग्रीक चालींची आहे व लेख लॅटिन व ऑस्कन भाषेंत आहेत. ग्रीको इटालियन वर्गांतील नाण्यांमध्येंहि सोन्याचीं, रुप्याचीं व कांशाचीं नाणीं आढळतात. ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं इटालियन कांशाचीं नाणीं व ग्रीक रुप्याचीं नाणीं ह्या दोन्ही प्रकारच्या नाण्यांचा उपयोग सर्वसम्मत झाला.

सिसिलीः- सिसिली बेटाचें नाणें ग्रीक असून ख्रि. पूर्व ६ व्या शतकापासून रोमन लोकांनीं तें बेट हस्तगत करून घेईपर्यंत चालू असलेलें दिसून येतें, कारण ह्यानंतर कांहीं थोड्या नगरराज्यांनीं बादशाही किंवा वसाहतींतील नाण्यांचा उपयोग केला आहे. सिसिलीच्या मुख्य नाण्याचें नांव टेरॅड्रॅकम (द्रम्म) आहे. येथील सर्व प्रकारचीं नाणीं एक प्रकारची उत्तम सफाई व चतुर कारागिरी दिग्दर्शित करतात. ह्या नाण्यांचा एक विशेष असा आहे कीं बहुतेक सर्व नाण्यांवर कारागिरांच्या सह्या असून हें कौशल्य जडावकाम करणारांचें दिसतें. ह्या बेटांतील प्रमुख अशा सायराक्यूझ शहरांतील नाण्याविषयीं विचार करतां ह्या ठिकाणी घडून आलेल्या राजकीय उलाढालींवर चांगलाच प्रकाश पडतो.

थ्रेस व मॅसिडोनियाः- थ्रेसमधील नाणीं अत्यंत चित्ताकर्षक आहेत. थ्रेस व मॅसिडोनिआ या ठिकाणींच प्रथम रानटी स्थितींतील जातींनीं खाणींतून काढलेल्या रुप्याचीं नाणीं पाडलेलीं दिसतात. अत्यंत जुनीं नाणीं ख्रि. पू. ५ व्या शतकाच्या आरंभांतील असून, तेथपासून पुढें वरील प्रदेश स्वतंत्र असतांच्या, व नंतर रोम लोकांच्या हस्तगत झाले असतांच्या, ह्या सर्व काळांतील नाणींहि सांपडलीं आहेत. ह्यापैकीं कांहीं नाणीं उत्तम कौशल्याचीं निदर्शक असून, थ्रेसवरील रोमन सत्तेचा व कांहीं कालपर्यंत मॅसिडोनियन राजांचा इतिहास दिग्दर्शित करतात.

मॅसिडोनियांतील नागरिक व बादशाही अशीं दोन्ही प्रकारचीं नाणीं त्यांतील वैचित्र्य व चित्ताकर्षकता सिद्ध करतात. ह्यांचा आरंभ ख्रि. पू. सहाव्या शतकांत झालेला दिसतो. अत्यंत जुनीं नाणीं रुप्याचीं व कांशाचीं असून ख्रि. पू. ४ थ्या शतकाच्या मध्यकालापासून सोन्याचींहि नाणीं दिसून येतात. एकंदर मॅसिडोनियन नाण्यांची तर्‍हा सिसिलियन नाण्यांसारखीच असून बरींच प्राचीन नाणीं फिनेशियन, बाबिलोनियन व अटिक पद्धतीचीं दिसतात. ह्यांपैकीं सर्वांत मोठीं नाणीं पहिल्या अलेक्झांडरच्या वेळचीं (ख्रि. पू. ४९८-४५४) असून तीं, एकंदर व्यापारी चळवळीपेक्षां ह्या प्रदेशांतील खनिज संपत्तीची उत्तम साक्ष देतात.

थेसलीः- उत्तर ग्रीस, थेसली, एपायरस, कॉर्सीरा, अकनेंनिया व एटोलिया ह्या प्रांतांतील सर्व नाणेपद्धती मूळांत ईजायनेटन असून त्यांच्यावर पश्चिमच्या बाजूस कॉरिंथियन पद्धतीचा व नंतर रोमन पद्धतीचा परिणाम झाला असें म्हणतात. प्राचीन थेसली नाणीं फारच थोडीं आहेत. हीं बहुधा सिसिली व इटली ह्या प्रदेशांतील उत्तम नमुन्यांचीं पण जास्त साधीं आहेत. यावर घोडा व घोडेस्वार यांचे ठसे सर्वसामान्य आढळून येतात. कांहींवर ओक वृक्षाचें शिरोभूषण घातलेलें 'झ्यूस' देवतेंचे मस्तक, किंवा युद्ध करीत असलेल्या अथेना इटोनिया या देवतेचें चित्र कोरलेलें आढळतें.

बिओशिआः-बिओशिआमधील नाणीं अलेक्झांडरच्या स्वारीनंतरचीं असून, निरनिराळ्या नगरराष्ट्रांनीं पाडलीं; ह्यांपैकीं प्राचीन नाणीं म्हणजे ख्रि. पू. ६०० ते ५०० च्या दरम्यान पाडलेले 'ड्रॅम्स' होत.

अथेन्सः- अटिकामध्यें अथेन्स येथील नाणकपरंपरेचें वर्चस्व आहे. अथेनियन नाणेपद्धति सोलन यानें अमलांत आणली असून प्रारंभीचें डिड्रॅकम युबोइक धर्तीचे असूनहि अथेनियन नाण्यांच्या प्रसिद्धीमुळें त्यांनांहि अटिक हें नांव मिळालें. ह्या नाण्यांवरून ऐतिहासिक माहिति फारच थोडी आढळते, परंतु अथेनियन लोकांनीं आपल्या नाण्यांत जी कृत्रिम प्राचीनता उत्पन्न केली, तिचें कारण अथेन्सचा जगाशीं चाललेला व्यापार हें आहे.

इजायनाः- 'इजायना' बेटांतील नाणीं म्हणजे प्रथमचीं खरीं ग्रीक नाणीं अझी होत. ख्रि. पू. सातव्या शतकापासून ह्यांचा आरंभ आहे. ह्यांपैकीं अत्यंत प्राचीन नाणीं म्हणजे प्राथमिक अवस्थेंतील डिड्रॅकम असून त्यांच्यावर समुद्रकांसवाचें चित्र असतें.

कॉरिंथः- कॉरिंथमध्यें एक मोठी नाणकपरंपरा सांपडते. ह्यांचें वजन अटिक नाण्याइतकेंच असून स्वरूप अटिक डिड्रकमसारखेंच आहे. शिल्पकलेच्या भरभराटीचें युग व उतरतो काळ ह्यांतील बरेंचसें कारागिरीचें काम कॉरिंथमध्यें आढळतें. कॉरिंथ ही एक वसाहत झाल्यावर तेथें एक निराळी नाणकपरंपरा अस्तित्वांत आली.

क्रीटः- क्रीट बेटांतील अत्यंत प्राचीन नाणीं ख्रि. पू. ५०० च्या सुमाराचीं आहेत. ह्यानंतरच्या १०० वर्षांत फारच थोड्या नगरांनीं नाणीं पाडलीं. यानंतर मात्र एकदम नाण्यांची विपुलता आढळते. ह्यांत कांहीं अत्यंत सुंदर तर कांहीं अगदींच रानटी तर्‍हेचीं दिसतात. यांच्यावर स्थानिक विशेष पुष्कळ आहेत. यांवरील मुख्य देवता म्हणजे झ्यूस, हेरा, फोसीडन् वगैरे असून सिसिलीप्रमाणें येथील नाण्यांवर सृष्टिपूजेचे उल्लेख (विशेषतः वृक्ष) वारंवार आढळतात. ह्या प्रकारचें शिल्पचातुर्य क्रीटन नाण्यावर जास्त दिसतें.

आशियामायनरः- आशियाखंडांतील नाणकसंप्रदायाचा आरंभ आशियामायनर प्रांतांतील नाण्यापासून होतो. ह्या नाण्यांचे मुख्यतः सरासरीनें मोठमोठे असे तीन वर्ग पाडतात. (१) सोनें व इलेक्ट्रमचीं प्राचीन नाणीं, (२) लीडियन् व ग्रीक नाणीं, (३) व नंतरचीं इलेक्ट्रम, सोनें व रुपें यांचीं नाणीं. सत्रपांच्या चांदीच्या नाण्यांत इराणी छाप उघड दिसते; ग्रीक नाणीं फक्त पश्चिम किनार्‍यावरील कांहीं नगरांत चालू होती असें दिसतें. परंतु ख्रि. पू. १९० वर्षाच्या सुमारास झालेल्या मॅग्नेशियाच्या स्वारीनंतर जसजसे रोमन लोकांच्या अमलाखालीं एक एक संस्थान जाऊं लागलें व त्या सर्वांचा मिळून एक प्रांत बनला, तसतशी मोठमोठ्या शहरांची स्वशासनसत्ता अगदींच कमी झाली. तथापि ह्यावेळचीं असंख्य बादशाही नाणीं प्राचीन ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर असून पुराणकथाभ्यासास उत्कृष्ट अशीं आहेत. त्यापैकीं जुनें नाणें लीडिया प्रांतांतील इलेक्ट्रम असून ह्याचा प्रचार ख्रि. पू. ७ व्या शतकापासून सुरू झाल्याचें दिसतें. ईजायनेटिक व इलेक्ट्रम ह्या दोन्ही नाण्यांचा उद्भव एकाच वेळीं झाला असेल.

बोस्परस, कॉल्विस व पाँटसः- आशियामायनरमधील पहिले प्रदेश बॉस्परस, कॉल्चिस हे असून त्यामानानें इकडील नाणीं अगदीं थोडीं व कमी महत्त्वाचीं आहेत. पाँटसमधील नाणीं मात्र पुष्कळ आहेत. ऍमिसस् नामक नगरामध्येंच बरीचशीं वरील नाणीं पाडलीं गेलीं. ह्या काशांच्या नाण्यांवरील शिल्पकामाचा सर्वसाधारण विषय म्हणजे ह्या प्रदेशांतील लोकांच्या आवडत्या परसिअस व मेडूसा या विषयींच्या कथा होत.

मायसियाः- आशियाखंडांतील सर्वांत उत्तम ग्रीक नाणेंपद्धति मायसिया देशांत सुरू झाली. इकडील सीझिमस् नांवाचें नगर नाणकशास्त्राच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचें आहे. ही पद्धति ख्रि. पू. ६ व्या शतकांत सुरू होऊन सुप्रसिद्ध इलेक्ट्रम् मिझिकेन नाणीं सुमारें दीड शतकपर्यंत पाडलीं गेलीं. हीं नाणीं नुसत्या आशियामायनरमध्यें नव्हे तर ईजियनच्या दोन्ही किनार्‍यांवर सामान्यपणें चालू असत. ट्रोड् नगरांतील नाण्यांचें महत्त्व त्या नाण्यांवरील ट्रोजन युद्धातील प्रसंगांच्या चित्रांमुळें आहे.

आयोनियाः- येथील नाणीं सुंदर असून पुष्कळ आहेत व तीं ख्रि. पू. ७००-५४५ च्या काळांत पाडलीं गेलीं. ह्या नाण्यावरून ख्रि. पू. ४९४ मधील आयोनिक् बंड, रोम साम्राज्याचा विस्तार वगैरेंचा बोध होतो. ह्यांपैकीं मुख्य महत्त्वाचीं नाणीं म्हणजे सोन्याचें ड्रकम् व टेट्रॅड्रॅकम् यांवर अपोलो देवतेचा दोन प्रकारचा मुखवटा खोदलेला असून त्याखालीं आशियांतील सुप्रसिद्ध शिल्पकार थिओडोटस् ह्याची सही आहे.

इफेससः- इफेसस् येथील नाणीं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचीं आहेत, परंतु त्यांतील सौंदर्यकल्पनेचा अभाव पाहतां शिल्पकलेच्या दृष्टीनें यांनां फार थोडें महत्त्व आहे. यांवरील ठसा मधमाशीचा असून, कधीं कधीं काळवीट किंवा 'अर्टेमिस्' देवतेचा मुखवटा कोरलेला असतो. ख्रि. पू. चवथ्या शतकांत स्मर्नामध्यें अपोलो देवतेचा चेहरा व वीणा कोरलेलीं दुर्मिळ नाणीं पाडलीं गेली. ह्या ठिकाणाच्या बादशाही नाण्यावर अनेक ठसे आहेत व त्यांतच अलेक्झांडर यास स्वप्नांत दिसलेल्या दोन नेमिसेस् देवताहि खोदल्या आहेत.

केरियाः- केरियाच्या नाण्यांत परंपरा अशी कसलीच नाहीं. प्रथमप्रथमचीं चांदीचीं नाणीं अगदीं थोडीं असून त्यांचा घाटहि चांगला नाहीं. हेकॅटोम्नस्, मॉसोलस् यावरील खोदलेलीं नांवें पहातां त्यांच्यावरून केरियन् सत्रपांच्या संपत्तीची खात्री पटते. केरियाच्या ताब्यांतील "कॅलिम्ना" व "कॉस्" ह्या बेटांतहि नाणीं सांपडलेलीं आहेत.

र्‍होडसः- र्‍होडस् बेट व्यापार व कलाकुसरीच्या कामांत सुप्रसिद्ध असल्यामुळें अर्थातच ह्याची नाणकपरपंरा फार उच्च दर्जाची आहे. र्‍होडस् शहर, ख्रि. पू. ४०८ या वर्षी, कॅमिरस्, इअलिसस् व लिंडस् ह्या तीन शहरांतील लोकांनीं तीं शहरें सोडून दिल्यावर स्थापन झालें, त्यामुळें इकडे तिन्हीं प्रकारचीं नाणीं सांपडतात.

लीसियाः- लीसियांतील प्राचीन नाण्यांवरून आशियातील देवता, कला व वाङमय यांच्याबद्दल कल्पना येऊं लागते. ख्रि. पू. ५२० च्या सुमारास असलेली नाणीं अथेनियन धर्तीचीं आहेत. लीसियन अक्षरें आशियामायनरमधील प्राथमिक मूलवर्णांपैकीं असून त्यांत ग्रीक वर्णांखेरीज इतर तद्देशीय परंतु अद्यापहि न उगमलेल्या वर्णांचें मिश्रण असावें. ह्या नाण्यांवरील शिल्प ठराविक असून त्यावर निरनिराळ्या प्राण्यांचे आकार आढळतात. कांहीं कांहीं नाण्यांवर स्वस्तिकासारखीं त्रिकोणीं चिन्हें आहेत. ह्या ठिकाणीं निरनिराळ्या प्रसंगांच्या दर्शक अशा बर्‍याच नाण्यांच्या मालिका आहेत, व शिवाय ह्या सर्वसामान्य नाण्यांशिवाय लीझियन संघांतील नगरांची स्वतःपुरतीं भिन्नभिन्न नाणीं आहेतच.

पँफीलिया, सिलिसियाः- पँफीलियांतील नाण्यांत आशियाटिक शिल्पांचे कांहीं नमुने मिळतात. परंतु ह्यापेक्षां सिसिलिया प्रांत, बहुतेक किनार्‍यालगतच असल्यामुळें नाणकशास्त्रदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. सिसिलियामध्यें पूर्वकालीं चालू असलेलीं पुष्कळ नाणीं आहेत.

सीरियाः- सीरियन नाण्यांच्या परंपरेंत सेल्युसिड् राजवंश व टॉलेमी राजवंश येतो. टॉलेमी नाणीं मुखवट्यांच्या ठशामध्यें जास्त सुंदर आहेत, परंतु सोन्याचीं नाणीं व ईजिप्शियन, मोठ्या आकाराचीं व उत्तम कौशल्याचीं कांशाचीं नाणीं मात्र अगदीं कमी आहेत. सेल्युसिड् नाण्यांतहि ठशांचें काम फार सुबक असून एकंदर मुखवट्याचा विचार केला तर त्यांपासून ख्रि. पू. १-२ शतकांचा संपूर्ण इतिहास तयार होईल.

फिनेशियाः- फिनेशियांतील नाणीं अत्यंत चित्ताकर्षक व विपुल आहेत. किनार्‍यावरील व्यापारी नगरांची संपत्ति ह्यावरून चांगलीच सिद्ध होते. ख्रि. पू. ५ व्या शतकाच्या मध्यांत ह्या नाण्यांस सुरवात झाली व ह्यांच्यावरील लेख फोनेशियन वर्णांतच खोदलेले आहेत. ह्या नाण्यांचीं एकंदर तीन युगें पडतातः- (१) अलेक्झांडरपूर्वयुग, (२) अलेक्झांडरटॉलेमीसेल्युसिड् युग, आणि (३) साम्राज्यसत्तायुग. पहिल्या युगांत अरेंडस् शहराचें नाणें बाबिलोनी पद्धतीचें असून इतर सर्व शहरांचीं नाणीं फिनेशियन पद्धतीचीं आहेत; त्यापैकीं बरीचशीं नाणीं पहिला व दुसरा स्ट्रेटो, टेनेस्, व मॅश्यूस नांवाचे सत्रप यांनीं पाडिलेलीं आहेत. दुसर्‍या युगांतील अलेक्झांडरचीं रुप्याचीं नाणीं व टॉलेमी व सेल्युसीडस् या राजांचीं बादशाही नाणी यांखेरीज कांहीं मोठी व महत्त्वाची अशीं चांदीचीं टेट्रॅड्रकम्स् नाणीं असून तीं निरनिराळ्या नगरांनीं आपल्या स्थानिक सत्ताधिकारांत पाडलेलीं आहेत. तिसर्‍या साम्राज्ययुगांत कांशाचीं कांहीं मोठीं नाणीं आढळलीं आहेत.

पॅलेस्टाइनः- पॅलेस्टाइनच्या निरनिराळ्या प्रांतांत भिन्नभिन्न तर्‍हेचीं बादशाही व स्थानिक नाणीं असल्याचें दिसतें, परंतु सर्वांत जूडिया प्रांतांची नाणकपरंपरा फारच चित्ताकर्षक आहे. जेरुसलेम येथील नाण्यांमध्यें, सातवा अँटिओकस याचीं कमळाची आकृति असलेलीं नाणीं मॅकॅबिअन यांनीं पाडलेलीं नाणीं, रोमन वकिलांचीं नाणीं, अशी विविध नाणीं आहेत. गाझा येथील नाण्यांसहि बरेंच महत्त्व आहे. ह्यांतील प्रथमप्रथमचीं नाणीं म्हणजे रानटी पद्धतीचें अथेनियन नमुन्याचें अटिक ड्रॅकम्स असून, ह्याठिकाणच्या बादशाही नाण्यावर मनी, मिनोस व इओ ह्या देवतांचीं नावें खोदलीं आहेत.

यहुदी नाणकपद्धतिः- स्वतंत्र यहुदी नाणेपद्धतीचा आरंभ 'शेकेल' नाण्यांनीं होतो. ऐतिहासिक पुराव्यावरून हीं नाणीं सातवा अँटिओकस यानें दिलेल्या अधिकाराप्रमाणें सॉयमन मॅकॅब्यूस यानें पाडलीं असें दिसतें. शेकेल किंवा 'अर्धशेकेल' नाणीं फिनेशियन टेट्रॅड्रकम् व डिड्रॅकमच्या वजनाचीं आहेत. ह्यांपैकीं कांहीं नाण्यांवर १, २, ३, ४, ५ असे हीं नाणीं पाडलेल्या वर्षांचे आंकडे आहेत. ह्याशिवाय जेरुसलेम येथें इ. स. ६६-७० व इ. स. १३५ च्या सुमारास ज्या दोन बंडाळ्या उद्भवल्या त्यावेळचीं तद्देशीय पद्धतीचीं नाणी आहेत.

अरेबिया, मेसापोटेमिया व बाबिलोनियाः-रोमन अरबस्तानांत कांशाचीं बादशाही नाणीं सांपडतात. मेसापोटेमियांतील 'एडेसा' शहरानें पाडलेलीं चांदीचीं व कांशाचीं नाणीं बरींच महत्त्वाचीं आहेत.

आफ्रिकेंतील नाणीः- इतर दोन खंडांपेक्षां आफ्रिका खंडांतील नाणीं फार थोडीं आहेत. कारण ग्रीक, फोनेशियन व रोमन संस्कृतीचा प्रवेश ह्या खंडांत, ईजिप्त व पश्चिमच्या बाजू-उत्तर किनारा ह्यापलीकडे झाला नाही. ईजिप्तमधील परंपरेमध्यें एक प्रकारचा भौगोलिक क्रम आढळतो, तेथें अद्यापि अलेक्झाडरच्या मागाहूनचीं कोणतींच नाणीं उपलब्ध नाहींत. इराणी सत्ता ईजिप्तमध्यें सुरू झाल्यावर इराणीं नाणीं या ठिकाणीं चालू झालीं असलीं पाहिजेत. सत्रप अर्यंडेस ह्यानें चांदीचीं नाणीं प्रचलित केलीं असें म्हणतात. अलेक्झांडरपासून ग्रीक नाणकपद्धति सुरू झाली. अलेक्झांडरचीं कांहीं नाणी ईजिप्त येथील टांकसाळींत पाडलेलीं आहेत. ह्या ठिकाणीं टॉलेमी राजाबरोबर सुरू झालेली नाणकपद्धति सुमारें तीन शतकेंपर्यंत चालली. ह्या पद्धतींतील विशेष म्हणजे सोन्याचीं अत्युत्कृष्ट नाणीं व कांशाच्या नाण्यांचा मोठा आकार हा होय. पुढें ज्यावेळीं सेल्युसिड राजांनीं उत्तम नाणीं पाडण्याचा उपक्रम सुरू केला, त्यावेळी टॉलेमी नाणीं सौंदर्य व कलां या बाबतींत खालावत चाललीं.

रोमन अम्मलांतील नाण्यांमध्यें अलेक्झांड्रियामधील बादशाही नाणीं व साम्राज्यांत अंतर्भूत झालेल्या ईजिप्त प्रांतांतील नाणीं विस्तार व नमुन्यांची विविधता ह्या दृष्टीनें सुप्रसिद्ध आहेत. ह्या नाण्यांचा आरंभ ऑगस्टपासून व शेवट अकिलिस ह्याच्या अमदानींत होतो. ह्यांपैकीं बहुतेक नाण्यांवर बादशाही कारकीर्दीचीं वर्षे L ह्या अक्षरानें दर्शित केलीं आहेत. ह्या नाण्यांमध्यें (१) ग्रीक, (२) ग्रीकोरोमन, व (३) ग्रीको-ईजिप्शियन; असे तीन वर्ग पडतात. ग्रीको-ईजिप्शियन नमुन्यांचें महत्त्व, हीं नाणीं ईजिप्तमधील दैवतकथांचें मागाहूनचें स्वरूप दर्शवितात ह्या दृष्टीनें आहे.

आफ्रिकेंतील ग्रीक नमुन्याची "सिरेनैका" नाणेपरंपरा ७ व्या शतकांत बॅटस वंशांत सुरू होऊन पुढें रोमन बादशहा ऑगस्टसपर्यंत हीं नाणीं चालू होतीं. ह्या नाण्यांवरील शिल्पकाम अगदीं स्पष्ट असून संक्रमणयुगांतील व भरभराटीच्या कालांतील नाण्यांत ग्रीक नाण्याचे सर्व गुण एकत्र झाले आहेत.

रोमन नाणीः- रोमन नाणकपद्धतीचे प्रथम दोन मोठे वर्ग पडतात; (१) रोमन प्रजासत्ताक राज्याच्या वेळचीं व (२) रोमन साम्राज्याच्या वेळचीं नाणीं. ह्यांपैकीं प्रजासत्ताक राज्यांतील नाण्यांचा कल, रोममधील नाण्याच्या उद्भवापासून ख्रि. पू. १६ व्या सालांतील ऑगस्टस बादशहाच्या सुधारणेपर्यंत होय; व दुसरा साम्राज्यकला ख्रि. पू. १६ पासून स. ४७६ मध्यें पश्चिमेकडील साम्राज्याचा नाश होईपर्यंतचा होय. अत्यंत प्राचीन रोमन नाण्याचा आरंभ ख्रि. पू. ४ थ्या शतकांतील मध्यापासून होतो. इटालियन लोक इतिहासपूर्वकालापासून देवघेवीकरतां तद्देशीय तांबें वापरीत. ख्रि. पू. ३३८ ते १६ पर्यंतच्या प्रजासत्ताक राज्यासंबंधीं नाण्यांच्या इतिहासाचे मुख्यतः दोन कालविभाग पडतात, व ह्या विभागांपैकीं दुसर्‍या कालविभागास ख्रि. पू. २९६ मध्यें दिनारी नाणकपद्धतीच्या उपक्रमानें विशेष महत्त्व आलें. पहिल्या कालविभागावरून इटलीची मध्यवर्ती सत्ता कसकशी परिणत होत गेली ह्याचें दिग्दर्शन होतें. प्रथमपासून रोमन नाणीं रोम व कॅपूआ ह्या दोन्ही टांकसाळींत पाडलीं जात. वरील पहिल्या कालविभागांत कांशाचें ओस्कोलॅटिन व चांदीचे डिड्रॅकम् ही नाणीं रोम येथील टांकसळींत पाडली जात असून कॅपूआ येथील टाकसाळीत लहान, कांशाचीं नाणीं व चांदीचे डिड्रॅकम् पाडले जात. दुसर्‍या कालविभागांत कॅपूआ येथील टांकसाळींतील नाणें पाडण्याचें काम जोरांत चाललेलें दिसतें व शेवटच्या पोटकालविभागांत दोन्हीं टांकसाळींतील नाण्यांत सारखेपणा दिसतो व पूर्वीपेक्षां कांशाच्या नाण्याचें महत्त्व व किंमत कमी झालेली दिसते.

ह्यानंतर (ख्रि. पू. २९६) चांदीचीं दिनेरियस, त्याची अर्धी क्विनेरियस व पांव सिस्टेरिटस ह्या नाण्यांचा व्यवहारांत प्रवेश झाल्यावर मग मात्र नाणकपद्धतींत कोणत्याच तर्‍हेचे फेरबदल, हें प्रजासत्ताकराज्ययुग संपेतोंपर्यंत झाले नाहींत.

नंतर लौकरच 'दिनेरियस्' नाण्यांनीं बाकीच्या सर्व नाण्यांस मागें टाकून आपलें वर्चस्व थोडक्या काळांत स्थापन केलें. प्रजासत्ताक काळाच्या अखेरपर्यंत सोन्याचीं नाणीं फार क्वचित पाडण्यांत येत. रोमन प्रजासत्ताक राज्यकालीन नाण्यांचे नमुने फारच चित्ताकर्षक आहेत. परंतु त्यामानानें त्यांवरील शिल्पकाम अगदीं मध्यम तर्‍हेचें आहे. अति प्राचीन दिनारी, क्विनारी व सेस्टरेटी ह्या नाण्यांवर शिरस्राण घातलेला असा 'रोमा' देवतेचा मुखवटा खोदलेला असतो. ख्रि. पू. १९० च्या पुढील नाण्यावर रथांत बसलेल्या डायना देवतेचें चित्र आढळतें. शिवाय कांहीं नाण्यांवरील न समजणारे देखावे, रोमन दैवतकथांतील बारीक सारीक गोष्टींचें ज्ञान झाल्यावांचून समजणार नाहीं.

रोमन साम्राज्यकालीन नाण्यांचा इतिहास जास्त भानगडीचा आहे. ऑगस्टस (ख्रि. पू. १६-१५) बादशहानें सोन्याचीं नाणी बादशहानेंच पाडावयाची व रोमन सीनेट सभेनें फक्त कांशाचीं नाणीं पाडावयाचीं अशा अटी ठरविल्या. त्याचा परिणाम असा झाला कीं सीनेटला बादशहाच्या लहरीवर अवलंबून राहवें लागलें. ऑगस्टसच्या कारकीर्दीत ही पद्धति सर्व साम्राज्यांत राजमान्य झाली. बादशहाच्या परवानगीशिवाय कोणत्याहि स्थानिक टांकसाळीचें अस्तित्त्वच शक्य नव्हतें. ह्या बादशाही नाण्यावरील ठसे बहुतेक बादशाही व्यक्तींचे असत. ज्यावेळीं ही व्यक्ति पुरुष असेल त्यावेळीं डोक्यावर मुकुट किंवा उघडें डोकेंच दाखविण्यांत येतें, व स्त्री असते त्यावेळीं डोकें कधीं कधीं बुरख्यानें आच्छादित किंवा उघडें दाखविण्यांत येतें. नाण्यांवर बादशाही व्यक्तींचीं नांवें किंवा स्तुतिपर वाक्यें असतात. ह्याच वेळीं हलकें हलकें क्रॉससारखीं ख्रिस्ती चिन्हें न कळत नाण्यावर खोदलेलीं दिसूं लागतात.
मध्ययुगीन व पश्चात्कालीन

यूरोपियन नाणीः- यूरोपीय नाण्यांच्या मध्ययुगास आरंभ रोमन साम्राज्याच्या नाशापासून होतो.

बायझंटाइन साम्राज्यः- बायझंटाइन नाण्यांचा आरंभ अनॅस्टॅशिअस (इ. स. ४९१-५१८) राजाच्या कारकीर्दीत झाला. बायझंटाइन नाणीं तिन्हीं धातूंचीं आहेत, परंतु चांदीचीं तुरळक आहेत. प्रथमचीं सोन्याचीं व चांदीचीं नाणीं सुबक आहेत परंतु साम्राज्याच्या अखेरचीं बरीच हिणकस धातूचीं आहेत. तेराव्या शतकांत इटालियन सोन्याच्या नाण्यांचा प्रवेश होईतोपर्यंत सर्व ठिकाणीं सोन्याचीं बायझंटाइन् नाणीं चालू होतीं. ह्यांच्या वजनांत अनेक फरक झाले. ह्यांचे ठसे बहुतेक धार्मिक आहेत. जुन्या नाण्याच्या मागील बाजूवर क्रॉस हातांत धरलेली विजयदेवता आहे, परंतु मागाहूनच्या नाण्याच्या मागील बाजूस "तारक प्रभु" किंवा "कुमारी मेरी" हिचें चित्र आहे. लेखांची लिपी प्रथम लॅटिन होती, पुढें हेरेक्लसपासून ग्रीक झाली. तत्कालीन धर्मोपदेशकांतील शिल्पकलाज्ञानाची कल्पना ह्या नाण्यांवरून चांगली होते, पण घाट व सुबकपणा या दृष्टीनें हीं नाणीं कमीं दर्जाचीं आहेत.

इतर यूरोपीय नाणक परंपराः- इतर पश्चिमेकडील देशांच्या नाण्यांचे ठळक ठळक असे कालदृष्ट्या पांच वर्ग पाडतां येतात, ते वर्गः- (१) संक्रमणयुग, रोमन साम्राज्यनाशापासून खर्‍या मध्ययुगापर्यंत-म्हणजे शार्लमेनच्या राज्यारोहणापर्यंत; (२) मध्ययुग, शार्लमेनच्या राज्यारोहणापासून स्वेबिअन् घराण्याच्या नाशापर्यंत; (३) पूर्वपुनरुज्जीवनयुग, फ्लॉरेन्समध्यें सन १२५२ मध्यें फ्लारिन् नाण्याच्या सुरवातीपासून; (४) पुनरुज्जीवनयुग, स. १४५० पासून १६०० पर्यंत व (५) अर्वाचीन युग.

(१) संक्रमणयुगः- पश्चिमेकडील देशांतील ह्या कालांतील नाण्यांचा विचार करतां असें दिसून येतें कीं, हीं नाणीं ५ ते ८ शतकांचा इतिहास समजण्यास अत्यंत महत्त्वाचीं आहेत. ह्या नाण्यांवरील कोरीव कामाचे नमुने एकाच तर्‍हेचे (रोमन बादशहा व स्थानिक सत्ताधारी यांचे छातीपर्यंत मुखवटे, कांहीं विशिष्ट तर्‍हेचे क्रॉस) आहेत. ह्यांचें शिल्प अगदीं असंस्कृत असून, रोमन किंवा बायझंटाईन नाण्यांच्या नक्कलबरहुकूम तयार केलेल्या ह्या प्राचीन नाण्यांचें वर्गीकरण करणें कठिण आहे.

(२) मध्ययुगः- रोजच्या जीवनास लागणार्‍या आवश्यक गोष्टींच्या संबंधानें सोन्याच्या नाण्याची किंमत जास्त असल्यामुळें त्यामुळें गैरसोय होऊन सोन्याच्या नाण्याबद्दल चांदीच्या नाण्याचा उपयोग सुरू केला. याचा प्रसार फ्रान्स, जर्मनी, इटली, इंग्लंड, स्कँडिनॅव्हिआ, कॅस्टाइल व अरॅगान इत्यादी सर्व देशांत झाला. ह्या नाण्यावरील ठसे बहुतेक नवे (क्रॉस, ख्रिस्ती प्रार्थनामंदिर) आहेत.

(३) पूर्वपुनरुज्जीवनयुगः- बादशहा दुसरा फ्रेड्रिक हाच या युगाचा प्रवर्तक होय. ह्यानें जरी पश्चिमेकडील मुसुलमानी प्रदेशांत प्रचारांत असलेलीं अरबी नाणींच चालू ठेवलीं तरी देखील त्यानें (१२१५-१२५०) आपल्या स्वतःच्या नांवाचीं 'सॉलिडी', वगैरे रोमन सोन्याचीं नाणीं पाडलीं. शिल्पाच्या दृष्टीनें मध्ययुगांतील अत्यंत सुबक नाणीं हींच होत. पुढें फ्लॉरेन्सला आलेलें व्यापारी महत्त्व व १२५२ पासून पाडण्यांत आलेल्या नव्या "फ्लॉरिन्" नामक सोन्याच्या नाण्याची शुद्धता ह्यामुळें सर्व यूरोपखंडांतील प्रदेशांत अशा पद्धतीचीं नाणीं पाडण्यास सुरवात झाली. अर्थात व्हेनिस्, जिनोआ इत्यादि शहरांत व इंग्लंड, फ्रान्स ह्या देशांतहि फ्लारिनसारखींच अनेक नाणीं पाडण्यांत येऊं लागलीं. जड अशा चांदीच्या नाण्यांची गरज भासूं लागल्यामुळें १४ व्या शतकापासून मोठ्या आकाराचे दिनार पाडण्यास सुरुवात झाली. यानंतरच्या नाण्याचें शिल्प धार्मिक कक्षेंतून निघून स्वतंत्र बनलें.

(४, ५) पुनरुज्जीवनयुग आणि अर्वाचीनयुगः- पुनरुज्जीवन कालापासूनच अर्वाचीन तर्‍हेच्या कल्पनांस सुरवात झालेली दिसते. यूरोपखंडांतील अनेक राष्ट्रांच्या शोधपूर्वक तयार झालेल्या नाणकपद्धतीचा आरंभ ह्याच कालांत व्हावयाचा. १५१८ सालीं जर्मनीमध्यें डॉलर नाणें पाडण्यास सुरवात झाल्यापासून चांदीच्या नाण्यांनां सार्वत्रिक महत्त्व आलें. डॉलरचीं निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळीं वजनें व आकार असल्यामुळें रोमन दिनारासारखा त्याचा सार्वत्रिक प्रचार झाला नाहीं. ह्या कालांतील शिल्प उत्तम असून ह्या नाण्यांनीं एक प्रकारचें सौंदर्य उत्पन्न केलें. शिल्पकलेनें पूर्वीच्या युगांत घातलेली बंधनें झुगारून देऊन एक प्रकारचा स्वाभाविकपणा धारण केला. मोठमोठे शिल्पकलाकुशल लोक उत्पन्न होऊन त्यांनीं उत्तम उत्तम पदकें व नाणीं तयार केलीं, परंतु ज्यावेळीं ह्या धंद्यांत व्यापारी दृष्टी उत्पन्न झाली त्यावेळीं अर्थातच शिल्पसौंदर्य नाहींसें होऊन नाण्यांत पूर्वीचा असंस्कृतपणा येऊं लागला. ह्या वेळच्या कलेंत नांवाजलेले देश म्हटले म्हणजे इटली व जर्मनी हे होत.

अर्वाचीन कालातील नाणीं पोर्तुगाल व स्पेनः- पोर्तुगाल देशांतील नाण्यांचा आरंभ, पहिल्या अल्फान्झोपासून (१११२) होतो. पोर्तुगाल, स्पेनमध्यें बाराव्या शतकाच्या मध्यांत सोन्याचीं नाणीं पाडण्यास सुरवात झाली. १४७९ सालीं ज्यावेळीं दोन्ही देशांची शासनसत्ता संयुक्त बनली तेव्हांपासून पुष्कळ नाणीं पाडण्यांत आलीं व १७-१८ व्या शतकांतील स्पॅनिश डॉलर पाश्चात्य देशांतील प्रमुख नाणें होतें. सध्यांचें स्पेनमधील प्रमुख चलन 'पेसोटा' नांवाचं असून तें सोनें व रुपें ह्या दोन्ही धातूंचें पाडण्यांत येतें. पोर्तुगॉल देशांतील चलन सोन्याचें 'क्राऊन', रुप्याचें 'टेस्टून' व निकलचें व कांशाचें 'री' नाणें होय.

फ्रान्सः- इ. स. ७५५ मध्यें पिपिन् यानें पूर्वीचीं सोन्याचीं नाणीं बंद करून चांदीचें दिनार नाणें उपयोगांत आणलें. यानंतर शार्लमेननें इटली, जर्मनी वगैरे अनेक देशांतील नाणीं प्रचारांत आणलीं. पुढें नाण्यांत पुष्कळच विविधता आली. चवदाव्या लुईनें उपयोगांत आणलेली नाणकपरंपरा शिल्पसौंदर्याच्या दृष्टीनें निरुपयोगी होती. फ्रान्समधील सांप्रतचें प्रमाणभूत चलन 'फ्रँन्क' नाणें असून तें सोनें व रुपें या दोन्ही धातूंमध्यें पाडलें जातें.

ग्रेटब्रिटनः- इंग्लंडमध्यें चांदीचें 'पेनी' नाणें प्रथम मर्सियाचा राजा ओफा यानें स. ७५७ च्या सुमारास प्रचारांत आणलें. पुढें हें मर्शियन चलन मागें पडून कँटरबरीच्या आर्चबिशपनें नाणीं पाडण्याचें काम १० व्या शतकाच्या आरंभापर्यंत चालू ठेवलें होतें. तिसर्‍या एडवर्डनें १३४३ सालीं सोन्याचीं 'फ्लोरिन' व 'नोबल' हीं दोन नाणीं नवीनच प्रस्थापित केलीं. ह्यानंतर इंग्लिश सोन्याच्या व चांदीच्या चलनास इतकें महत्त्व आलें कीं ह्या नाण्याच्या बर्‍याच प्रतिकृती देशांत होऊं लागल्या. १५६२ सालीं यांत्रिक सामग्रीनें नाणीं तयार करण्यास सुरवात झाली. परंतु पूर्वीचीं हातोड्याच्या साहाय्यानें नाणीं तयार करण्याची पद्धत नाहींशी होण्यास एक शतक लागलें. इंग्लिश चलनाचा अत्युत्कृष्ट नमुना म्हणजे दुसर्‍या चार्लस् राजाच्या कारकीर्दीत पाडलेला "पिटिशन क्राऊन" होय.

स्कॉटलंडः- येथील नाणीं प्रथमपासून इंग्लंडच्या नाण्यासारखींच परंतु जास्त ओबडधोबड अशीं असत. चांदीचीं पेनी नाणीं हीं प्रथमचीं असून पुढें तर स्कॉटलंड व आयर्लंड ह्या दोन्ही देशांत इंग्लंडचें नाणेंच सुरू झालें.

१८३६ सालीं नवीन सोन्याचीं व चांदीचीं नाणीं पाडण्यास आरंभ होऊन बहुतेक थोड्याफार बदलांत तींच नाणीं आजमितीस प्रचारांत आहेत. ह्यांपैकीं सोन्याच्या 'सॉव्हरिन' नाण्याच्या नमुन्यांत १८८७ सालीं व्हिक्टोरियाच्या जुबिलीसमारंभानिमित्त थोडा फेरबदल करण्यांत आला. परंतु हा नवीन फेरबदल सर्वसम्मत न झाल्यामुळें पुन्हां सातव्या एडवर्डच्या कारकीर्दीत पूर्वीसारखी सॉव्हरिन नाणीं पाडण्यांत आलीं. स्कॉटलंड व आयर्लंड ह्या देशांत त्याचप्रमाणें अमेरिकेंत व हिंदुस्थानांतहि ग्रेटब्रिटनच्या साम्राज्य स्थापनेमुळें ह्या नाण्यांनां सार्वत्रिक महत्त्व मिळालें. सांप्रत जगावरील सर्वसामान्य नाणेंपद्धति इंग्लिश आहे.

बेलजम व हॉलंडः- बेलजमच्या नाण्यांचा आरंभ ११ व्या शतकापासून झाला आहे. बेलजमच्या नाण्यामध्यें विशिष्ट असा स्वतंत्र गूण कांहींच नसून बहुतेक नाणीं परकीयच आहेत. बेलजमची नाणकपद्घति एका बाजूनें फ्रेंच व दुसर्‍या बाजूनें जर्मन पद्धतीच्या अगदीं जवळ जवळ आहे. ह्यापैकीं महत्त्वाचीं नाणीं बर्गंडीच्या घराण्यानें पाडलीं. प्रथम हॉलंडचीं नाणीं ह्याच पद्धतीचीं असून डच "डॉलर" नाणीं १६ ते १८ व्या शतकापर्यंत बरीच महत्त्वाचीं व सार्वत्रिक प्रचार असलेलीं अशीं होतीं. डच ऐतिहासिक पदकें अत्यंत महत्त्वाचीं असून त्यांवरून स्थानिक गोष्टींचा इतिहास कळतो, इतकेंच नव्हे तर मुख्य यूरोपियन शासनसत्तांसंबंधीं पुष्कळ माहिती मिळते. १८३२ सालीं मात्र बेलजमनें पूर्णपणें फ्रेंच नाणेपद्धतीचा स्वीकार केला.

स्वित्झर्लंडः- या देशांत प्रथम प्रथम फ्रँकिश राजांचीं सोन्याचीं नाणीं व शार्लमेन बादशहानें प्रचारांत आणलेलीं चांदीचीं 'दिनार' नाणीं, चालू होतीं. १० ते १३ शतकांपर्यंत निरनिराळ्या धार्मिक संस्था, निरनिराळे धर्माधिकारी ह्यांनां आपापलीं स्वतंत्र नाणीं पाडण्याचा हक्क मिळाला होता. चवदाव्या शतकांत सुप्रसिद्ध 'स्विसराष्ट्रसंघ' निर्माण झाला आणि निरनिराळ्या परगण्यांनीं आपापलीं नाणीं पाडण्यास सुरवात केली. परंतु धार्मिक संस्थांनीं व ह्या निरनिराळ्या परगण्यांनीं पाडलेल्या अनेक प्रकारच्या नाण्यांमध्यें गोंधळ उडाल्यामुळें १८४८ सालीं हीं सर्व नाणीं बंद करून सर्व देशांत एक चलन सुरू करण्यांत आलें. हें चलन अर्थातच फ्रेंच होतें. सध्याचें स्वित्झर्लंडमधील नाणें निकलचें 'सेंटिम' व सोन्याचांदीचे 'फ्रँक' होत.

इटली व सिसिलीः- ह्या दोन्ही देशच्या चलनी नाण्यांत कांहीं विशेष गोष्टी साधारणपणें आढळतात. प्रथमप्रथम असंकृत नाणीं व पौर्वात्य साम्राज्याचें पुनःस्थापन दिग्दर्शित करणारीं बायझंटाइन नाणीं ह्यांची भेसळ आढळून येते. पुढें सिसिलि येथील नॉर्मन लोकांच्या पौर्वात्य नाण्यांवर अरबी वर्चस्वाचा परिणाम झालेला दिसतो. ह्यानंतर शार्लमेन व त्याच्यामागाहूनच्या बादशहांनीं पाडलेलीं 'दिनार' नाणीं आणि दुसरा फ्रेडरिक व नॉर्मन लोकांचीं सोन्याचीं नाणीं प्रचारांत होतीं. इटलीमध्यें झालेल्या पुनरुज्जीवनाचा तेथील नाण्यांवर परिणाम झाला, ह्या नाण्यांवर प्रगतीच्या प्रत्येक लाटेचा थोडाबहुत ठसा उमटलेला दिसतो.

ह्याच वेळे(७७२-७९५)पासून पोप धर्मगुरूंनीं बायझंटाइन लाँबर्डियन पद्धतीचे दिनार पाडण्यास सुरुवात केली. या नाण्यावर पोप व रोमन बादशहा ह्यांचीं नावें उठविलेलीं आहेत. शिल्पकामापेक्षां ऐतिहासिक दृष्टीनें ह्या नाणकपरंपरेस महत्त्व आहे. सिसिली म्हणजे सध्यांच्या नेपल्स व सिसिली ह्या दोन्ही ठिकाणच्या नाण्यांचा आरंभ नॉर्मन लोकांपासून होतो. ह्यावेळच्या शिल्पकलेचा विचार केला तर इटालियन शिल्पकारांनीं ह्या मध्ययुगांत तयार केलेलीं पदकें ग्रीक कलेच्या खालोखाल महत्त्वाचीं आहेत. ह्या शिल्पकारांचें उत्कृष्ट काम १५ व्या शतकांत व १६ व्या शतकाच्या प्रारंभींच्या ओतीव पदकांवर दिसून येतें. ह्या पदकावरील चित्रकला चेहर्‍याचा ठसा हुबेहुब वठविते. ऐतिहासिक दृष्ट्या असें म्हणतां येईल कीं फ्लॉरेन्स व रोम येथील नाण्यांमध्यें जे दोष आढळतात त्यांची भरपाई ह्या इटालियन पदकांनीं केली आहे.

१८६५ सालीं तेथील प्रमाणभूत चलन, १०० सेंटिसिमिची किंमत असलेलें फ्रँकच्या बरोबरीचें "लीयर" नामक नाणें हें ठरविण्यांत आलें. अर्थातच हें नाणें सोनें, चांदी व कांसें या तिन्ही धातूंमध्यें पाडण्यांत येतें.

जर्मनीः- इटलीप्रमाणें जर्मनींतील नाण्याचा विस्तार बराच आहे. फ्रँकिश कालांत मेंझ, स्टास्बुर्ग वगैरे अनेक शहरांतील टांकसाळींत दिनार व ऑबोल नाणीं पाडण्याचें काम चालत असे. पुढें ज्यावेळीं रोमन साम्राज्यांतर्गत प्रदेशास आपापलीं स्वतंत्र नाणीं पाडण्याचे अधिकार मिळाले त्यावेळीं जर्मनींतील नाण्यांमध्यें इतके स्थानिक भेद उत्पन्न झाले कीं त्यायोगानें बादशाही नाण्यांमध्यें देखील एकसूत्रता बिलकुल राहिली नाहीं. सोन्याचे फ्लॉरिन व ग्रोसस ह्या नाण्यांचा १४ व्या शतकांत प्रवेश झाल्यापासून जर्मनीच्या अर्वाचीन युगास प्रारंभ होतो. प्रथम 'ब्रेक्टेटे' व 'थेलर' ही सॅक्सन नाणीं ११ व्या शतकापर्यंत प्रचारांत असलेलीं दिसतात. नंतर १५ व्या शतकाच्या शेवटीं शेवटीं सोन्याच्या नाण्याचा झालेला बराच प्रसार ह्या ठिकाणच्या सोन्याच्या विपुलतेची साक्ष पटवितो. याशिवाय धार्मिक संस्थांनीं पाडलेलीं निरनिराळीं नाणीं आहेतच. जर्मन पदकांमध्यें शिल्पकलेच्या दृष्टीनें कमी गुण आहेत; तरी इटलीच्या खालोखाल जर्मन पदकांचें बरेंच महत्त्व आहे.

इ. स. १८७१ पासून जर्मन साम्राज्याच्या चलनाची बरीच पुनर्घटना करण्यांत आली. ह्यावेळीं एक नवीन चांदीचें 'मार्क' नाणें प्रमाणभूत चलन मानण्यांत आलें व त्यावरूनच १० मार्क व २० मार्क किंमतीचीं "क्राऊन" व "डबल् क्राऊन" अशीं सोन्याचीं नाणीं पाडण्यांत आलीं. सर्व नाण्यांच्या मागील बाजूस साम्राज्याचें चिन्ह गरुडपक्ष्याचें चित्र असून पुढील बाजूस राज्यावर असलेल्या राजा व राणी यांचे मुखवटे असतात.

आस्ट्रियाहंगेरीः- १८५५ सालीं अस्ट्रियाचा जर्मनीबरोबर तहनामा झाला व त्यानंतर अस्ट्रियानें "फ्लोरिन्" चांदीचें नाणें प्रमाणभूत धरून आपली नाणकपद्धति आंखली. पुढें १८६८ सालीं आस्ट्रियानें संघ सोडला. परंतु तींच नाणीं कायम ठेविलीं. आस्ट्रियन् सोन्याच्या नाण्यावर बादशहाचा मुखवटा व दोन शीर्षांचा गरुड याचें चित्र असतें. परंतु हंगेरियन नाण्यावर बादशहाची उभी प्रतिमा व राष्ट्रीय ढाल यांचे ठसे असतात.

रशियाः- प्राचीन रशियन नाण्यांचा आरंभ १० व्या शतकाच्या अखेरीस होतो. ह्या नाण्यावर बायझंटाइन सत्तेचा परिणाम झाल्याचें दिसतें. पिटर दि ग्रेट ह्या बादशहानें सोन्याचीं नाणीं पाडण्याचा उपक्रम करून नाणेपद्धतींत बरीच सुधारणा केली. इ. स. १८२५ च्या सुमारास पहिल्या निकोलसनें नाणकपद्धतींत प्लॅटिनम धातू उपयोगांत आणली. इ. स. १८८५ च्या पूर्वीच्या रशियन 'रूबल' नाण्याचें वजन २७८ ग्रेन होते तें १०० करण्यांत आलें. ह्या सोन्याच्या व चांदीच्या नाण्यावर बादशहाचा मुखवटा व गरुड असतो.

अमेरिकेंतील संयुक्त संस्थानेः- अमेरिकाखंडाच्या नाण्याविषयीं कांहींएक लिहिण्यासारखे नाहीं. कारण हीं सर्व वसाहतीचीं नाणीं मातृदेशच्या पद्धतीचीं असून ह्या सर्वांत मुख्य नाणें 'डॉलर' होय. डॉलर प्रथम चांदीचा असून त्याचें वजन ४१२-ग्रेन होतें. पुढें १८७३ सालीं सोन्याचा 'डॉलर' पाडला जाऊन त्याची किंमत २५.८ ग्रेन करण्यांत आली. याशिवाय चिनी व्यापाराच्या सोईकरितां पुढें ४२० ग्रेन वजन चांदीचा एक "ट्रेड् डॉलर" पाडण्यांत आला.

पौर्वात्य नाणीं.

पौर्वात्य नाण्यांचे एकंदर चार वर्ग पाडण्यांत येतात ते असेः- (१) प्राचीन इराणी व अरबी नाणीं, (२) मध्ययुगांतील इराणी व अफगाणी नाणीं, (३) जपानी, चिनी व इतर पौर्वात्य नाणीं आणि (४) भारतीय नाणीं.

वरीलप्रमाणें वर्गवारी करण्याचें कारण ऐतिहासिक आहे. या नाण्यांत पहिल्या प्रतीचीं नाणीं प्राचीन इराणी साम्राज्यांतील 'पार्थियन' व 'सस्सानियन' लोकांचीं होत, व ह्यानंतर अरबी सत्तेच्या वर्चस्वाबरोबर नव्या अरबी चलनास प्रारंभ झाला. अर्वाचीन इराणी व अफगाणी नाण्यांचा एक दुसरा स्वतंत्र वर्ग पाडण्याचें कारण इतकेंच कीं हीं दोन्हीं प्रकारचीं नाणीं प्राचीन अरबी चलनापासून उत्पन्न झालीं असून दोन्ही नाण्यांवरील हस्तलेखांत अरबी व इराणी भाषेचें मिश्रण आहे. चीन, जपान, कोरिया इत्यादि देशांतील नाण्यांमध्यें एक प्रकारचा परस्परसंबंध असल्यामुळें त्या सर्वांचा एक वर्ग पाडण्यांत येतो व भारतीय नाण्यांचा इतिहास फारच विविध तर्‍हेचा असल्यामुळें हा वर्ग निराळाच करण्यांत आला आहे.

प्राचीन इराणी व अरबी नाणीः- पहिल्या दरायस राजानें इराणी साम्राज्याची ज्यावेळी प्रांतविभागणी केली, त्यावेळीं करवसुलीकरितां सर्व साम्राज्यांत सारखें चलन राखण्याची जरुरी भासूं लागली, व ही उणीव दूर करण्याकरितां ग्रीक लोकांतील सोन्याचें ८.४ ग्रॅम वजनाचें 'शेकेल' नाणें व चांदीचें ५.४८ ग्रॅम वजनाचें 'ड्रॅकम्' नाणें अशीं नाणीं निवडण्यांत येऊन त्याबरहुकूम सोन्याचीं 'डेरिक्' नाणीं व चांदीचीं 'सिग्लॉस्' नाणीं पाडण्यांत आलीं. हीं सोन्याचीं नाणीं पाडण्याचा अधिकार राजाचा असून चांदीचीं नाणीं प्रांताधिकार्‍याकडून पाडण्यांत येत. ह्या नाण्यांचे पुढील पोटविभाग होते- (१) बादशाही, (२) प्रांतानिहाय पाडलेलीं सत्रपी, (३) व इतर मांडलिक शासनसंस्थांनीं पाडलेलीं. ह्यांपैकीं बादशाही नाणीं 'डेरिक्' व 'सिग्लॉस्' अशीं दोन्हीं प्रकारचीं असून, त्यांच्या पुढील बाजूवर हातांत धनुष्य घेतलेल्या राजाची प्रतिमा व मागील बाजूवर चौकोनी खूण असते. सत्रपी नाणीं अत्यंत महत्त्वाचीं व चित्ताकषर्क आहेत. ह्यांपैकीं नमुनेदार नाण्यावर, दाढी असलेल्या चेहेर्‍याची प्रतिमा असून मागील बाजूस विविध प्रकारचे ठसे आहेत. ह्याखेरीज टार्सस् येथें पाडलेलीं सिसिलियन नाणींव टिरिबेझस् येथें पाडलेलीं डॅटॅमिस् नाणीं चांगल्यापैकीं आहेत. पार्थियन काळातील ख्रि.पू. इराणी नाणीं ग्रीक पद्धतीचीं असून त्यांवरील प्रत्येक राजाचें नांव `आर्सेकस' असें आढळतें. ह्यानंतर ख्रि.पू. तिसर्‍या शतकाच्या उत्तरार्धांत पर्सिसची नाणकपद्धति चालू असून त्यानंतर इ.स. २२० च्या सुमारास सस्सनियन लोकांनीं अर्देसरच्या नेतृत्वाखाली पार्थियन लोकांपासून राज्य बळकावलें. ह्या घराण्यानें पौर्वात्य चलनांचा उपक्रम सुरू केला. अर्देसरनें झरथुष्ट्र धर्माचा स्वीकार केला असल्याची साक्ष ह्या कालांतील नाण्यावरील ठशांवरून व पह्लवी भाषेंतील लेखावरून स्पष्ट पटते.

अरबी चलन पौर्वात्य चलनांत प्रमुख असून हा काल साडेबारा शतकांचा आहे व ह्याचा विस्तार भूगोलशास्त्रदृष्ट्या मोरोक्कोपासून चीन देशाच्या सरहद्दीपर्यंत झालेला आढळतो. जेव्हा अरब लोक जास्त जास्त मुलुख आपल्या सत्तेखाली आणूं लागले, तेव्हां त्यांनां चलनाची आवश्यकता भासूं लागली. प्रथम त्यांनी ठिकठिकाणची पूर्वीचींच इराणी आयर्झटाइन नाणीं प्रचारांत आणलीं. खरें मुसुलमानी नाणें बसरा येथें ६६० सालीं `अली' नामक खलिफानें पाडलें व पुढें (६९५) अब्दुलमलिकनें एक टांकसाळच पौर्वात्य तर्‍हेची स्वतंत्र नाणीं पाडण्याकरितां स्थापन केली. ह्यावेळीं मुख्य तीन नाणीं होतीं. ह्यापैकीं सोन्याचे `दिनार' नाणें रोमन डिनेरियम् नाण्याची प्रतिकृति असून, चांदीचें `डिर्‍हेम्' नाणें ग्रीक `ड्रॅकम्' नाण्याची सुधारलेली आवृत्ति होय. त्याचप्रमाणें तांब्याची ``फेल्स्'' नाणीं ग्रीक साम्राज्यांतील ``फॉलीस्'' नाणीं होत. ह्या नाण्यांवर सहसा कोणतेच ठसे नसून बहुतेक दोन्ही बाजूंवर धार्मिक लेख आहेत. पुढें पुढें नाण्यावर खलिफाचीं नावें आढळतात. कांहीं कालपर्यंत सर्व घराण्यांतून मुख्य खलिफाचें धार्मिक वर्चस्व औपचारीकरीत्या मानण्यांत येत असे, व त्याप्रमाणें नाण्यावरहि बराच कालपर्यंत मुख्य खलिफाचें नांव घालण्यांत येत असे. खिलाफतीचा नाश झाल्यानंतर दिनार व डिर्‍हेम् यांपेक्षां जास्त वजनाची नाणीं प्रचारांत आली. परंतु इटलींतील संस्थानांच्या वाढलेल्या व्यापारी वर्चस्वामुळें तुर्क, मूर इत्यादि लोकांनां व्हेनेशियन सोन्याचें नाणें उपयोगांत आणणें भाग पडलें, व नंतर अर्वाचीन कालांत भूमध्यसमुद्राच्या सीमेवरील संस्थानांत डॉलर नाण्यांचा प्रवेश झाला. ग्रीक नाण्याप्रमाणें अरबी नाण्याचें शिल्पकाम उत्तम नाहीं हें उघड आहे, परंतु ह्या नाण्यावरील लेखामध्यें एक प्रकारचें मध्ययुगीन सौंदर्य दिसून येते.

मध्ययुगीन इराणी व अफगाणी नाणीं- उमाईद नाण्यांचें ऐतिहासिक दृष्ट्या इतकेंच महत्त्व आहे कीं ह्या चांदीच्या नाण्यावरून त्यावेळच्या अरबी साम्राज्याचा विस्तार किती होता ह्याचा पुरावा सांपडतो. ह्या साम्राज्याची पहिली विभागणी इ.स. ७५० च्या सुमारास झाली. बगदाद येथील घराण्याकडून दिनार नाणीं उत्तम प्रकारें पाडण्यांत येत, परंतु स्पॅनिश उमाईदं घराणें फक्त चांदीचीं नाणीं पाडीत असे. इ.स. ९६२-११८६ च्या दरम्यानकाळांत अफगाणिस्तानमध्यें गझनी घराण्याची सत्ता प्रबळ झाली व ह्यावेळीं सोन्याचीं व चांदीचीं नाणीं पाडण्यांत आली. ह्यानंतर सेल्जुक घराण्यानें साम्राज्यस्थापना केली व ह्याच वेळीं आधुनिक अरबी नाणीं प्रथम पाडण्यांत आलीं.

सेल्जुक साम्राज्याचीं पुढें अनेक संस्थानें झालीं व ह्यावेळीं मध्यवर्ती संस्थानावर १२ व्या व १३ व्या शतकांत आताबेग व उर्तुक घराण्यांतील तुर्क लोक राज्य करीत. ह्या लोकांनीं पाडलेली नाणीं बहुतेक तांब्याचीं असून त्यांच्यावर ग्रीक, रोमन व बायंझाटाईन पद्धतीचे ठसे आढळतात. ह्याच काळांत ख्वारिझम येथील महत्त्वाचें परंतु अल्पायुषी साम्राज्य होऊन गेलें. पुढें स्पेनची खिलाफत मोडली. फातिमाइट घराण्याच्या जागीं सलादिनाचा आयुबाइट वंश ईजिप्त, सीरिया व मेसापोटेमिया ह्यांच्यावर राज्य करूं लागला. तैमूरलंगाच्या वंशानें चांदी, कासें व तांबे या तिन्हीं धातूंचीं नाणीं पाडलीं आहेत. ह्यानंतरची आटोमन् लोकांनीं पाडलेली सोनें, रुपें, कासें ह्या धातूंचीं नाणीं ऐतिहासिकदृष्ट्या निरुपयोगी आहेत.

इराण:- इराणच्या शहांनीं पाडलेल्या नाण्यांचा आरंभ स. १५०२ मध्यें राज्य करीत असलेल्या इस्माईलपासून होतो. हीं नाणीं तिन्हीं धातूंमध्यें पाडलेलीं असून त्यांच्यावरील लेख फारच सुंदर असून अरब व इराणी अशा दोन्हीं लिपींत आढळतात. अफगाणिस्तानांतील अमीरांच्या नाण्यांचा एक निराळा वर्ग पडतो व ह्या नाण्यांचा आरंभ इ.स. १७४७ मधील अहमदशहा दुराणी याच्यापासून होतो. ह्या नाण्यांवरील लेख इराणी लिपींतच असून काव्यमय भाषेंत आहेत. इराणच्या अर्वाचीन नाणकपद्धतीचा आरंभ सन १८७९ त होतो. त्या वेळेपासून `लॅटिन चलनसंघ' ह्यांतील तत्त्वाप्रमाणें इराणानें क्रान नांवाच्या `फ्रँक' नाण्याच्या बरहुकूम नवीन नाणें पाडलें. इराणी सोन्याचें नाणें `टोमन' हें असून त्याची किंमत १० क्रानबरोबर आहे व १ चांदीचें `क्रान' नाणें तांब्याच्या २० शाही नाण्यांबरोबर आहे.

चिनी, जपानी व इतर पौर्वात्य नाणीं, चीन:- चीनच्या नाण्यांचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. प्राचीन चिनी वाङ्मयांतील उल्लेखावरून असें दिसतें कीं ख्रि.पू. ३र्‍या सहस्रकापासून तेथें कोणत्या तरी चलनाचा उपयोग होत असावा, परंतु ख्रि.पू. ७ व्या शतकापूर्वी चालू असलेलें चलन, बिन ठशाच्या धातूचे तुकडे, रेशमी, कूर्मकवच, कवड्या अशांसारख्या ओबडधोबड स्वरूपांत असावें. मागाहूनच्या कालांतहि शिंपांच्या चलनाचा बराच प्रचार आढळून येतो. ख्रि.पू. ३३५ मध्यें हें चलन बंद करण्यांत आलें, परंतु हॅनवंशीय `बंगमंग' नामक राजानें ह्याचें पुनरुज्जीवन केलें. सध्यां सांपडलेल्या नमुन्यावरून अत्यंत प्राचीन अशीं धातूंचीं चिनी नाणीं ओतीव काशाचीं होतीं. ह्या कांशाच्या नाण्यांचे साधारणत: दोन वर्ग पडतात. ह्यांपैकीं पहिला वर्ग प्राचीन नाण्यांचा असून त्याच्यावर कुदळी, सुर्‍या, इत्यादि हत्याराचीं चित्रें कोरलेली असून, दुसर्‍या वर्गांतील मागाहूनचीं नाणीं धातूचींच परंतु वर्तुलाकार असून मधोमध त्यांस एक चौकोनी भोंक असतें, व हीं नाणीं दोरींत एकत्रित ओवतां येतात. ख्रि.पू. २२१ च्या सुमारास ``त्सिन'' राजवंशाची स्थापना झाल्यापासून पहिल्या प्रकारचीं नाणीं पाडणें बंद झालें. तथापि एकंदर चिनी चलनाचा इतिहास म्हणजे संशयात्मक अर्थशास्त्रीय युक्त्या, हिणकस धातूची भेसळ इत्यादींनीं परिपूर्ण आहे. नाण्यांचीं किंमत त्यांच्या वजनावर अवलंबून असल्याचें मानण्यांत येत असे, परंतु नाण्यावर लिहिलेलें वजन नेहमीं खरेंच होतें असें नाहीं. मधून मधून लोहनाणींहि पाडण्यांत आलीं होतीं. स. ६२२ मध्यें तअंग राजवंशाच्या अमदानींत कयुऑन नमुन्याची नाणीं पाडण्याचा उपक्रम झाल्यापासून अर्वाचीन नाण्यास सुरुवात होते असे म्हणण्यास हरकत नाहीं. ९ व्या शतकांत कागदी चलनाचा उपयोग करण्यांत आला. सांप्रतच्या `कॅश' ह्या तांब्याच्या चिनी नाण्यावर पुढील बाजूस कारकीर्दीचे नांव व ``टंगपाओ'' (प्रचलित नाणें) हीं अक्षरें असून मागील बाजूवर टांकसाळीचें नांव असतें. मँचू राजघराण्याच्या अमदानींत हीं नाणीं ठराविक मुदतीनें पाडली जात. सर्वांत महत्त्वाचीं चिनीं नाणीं प्रतिस्पर्धी राजघराण्यांची व बंडवाल्या लोकांची असून चीनच्या इतिहासांतील अज्ञात गोष्टीवर प्रकाश पाडण्यास ह्या नाण्यांचा बराच उपयोग होणार आहे. कोरिया व आनाम ह्या देशांतील नाणीं चिनी नाण्यांसारखींच असून `जावा' बेटांतहि बराच कालपर्यंत चिनी नाणीं प्रचारांत होतीं. परंतु अलीकडे मुसुलमानी नाण्यांचा प्रसार त्या ठिकाणीं सुरू झाला आहे.

इ.स. १८९० मध्यें चीननें अमेरिकन संयुक्त संस्थानांतील चांदीच्या डॉलरबरहुकूम व जपानी `येन' नाण्याबरहुकुम चांदीचा `डॉलर' पाडण्यास सुरवात केली; तसेंच २ शि. ११-३/४ पेन्स किंमत असलेलें एक ``टलै' नाणें असून ह्याशिवाय ५०, २५, १०, ५ सेंट अशींहि नाणीं पाडण्यांत आली आहेत. ह्या नाण्यांवर पुढील बाजूस चिनी ड्रॅगन व लेख, टांकसाळ व किंमतीची खूण इंग्लिशमध्यें असते व मागील बाजूस चिनी भाषेंत किमतीची खूण व `मँचू' नांव असतें. स. १८६६ मध्यें हाँगकाँग बंदरीं अमेरिकन संयुक्त संस्थानच्या धर्तीवर चांदीचा ``ट्रेड डॉलर'' पाडण्यांत आला. ह्या नाण्याच्या पुढील बाजूवर हातांत त्रिशूल व ढाल घेतलेली ``ब्रिटानिया'' व मागील बाजूस चिनी व मलाया भाषेंत नाण्याचें नांव आहे.

जपान:- साम्राज्यांतील नाण्याचा उगम चिनी नाण्यापासून आहे, परंतु जपानी नाण्यामध्यें एक प्रकारचें स्वातंत्र्य आढळून येतें. धातूच्या चलनास पांचव्या शतकांत आरंभ झाला. अत्यंत प्राचीन जपानी नाणीं म्हणजे ओबडधोबड वर्तुलाकार असे चांदीचे तुकडे असून त्यांमध्यें एक भोंक असतें. सातव्या शतकापासूनचीं तांब्यांचींहि अशाच नमुन्याचीं नाणीं सांपडतात. ७००-९५८ च्या अडीच शतकांच्या अवधींत पाडलेल्या बारा प्रकारच्या नाण्यांनां ``सेन'' अशी संज्ञा आहे. सोळाव्या शतकाच्या शेवटीं म्हणजे `टेनशू' कालांत, सोने, रुपे, तांबें व लोखंड ह्यांचें सुव्यवस्थित चलन सुरू करण्यांत आलें. ह्याशिवाय १६०१ ते १८५९ च्या दरम्यान हिणकस धातूचीं नाणीं पाडण्यांत आलीं. इचिबू व निबू नांवाचीं लहान चौकोनी नाणीं १९ व्या शतकातींल आहेत. त्याचप्रमाणें ओबान व कोबान नांवाचीं मोठ्या व लहान आकाराचीं सोन्याची तबकडीवजा नाणीं १६ व्या शतकापासून अगदी अर्वाचीन कालापर्यंत पाडण्यांत आलीं आहेत. परंतु इ.स. १८७० मध्यें, २० `येन' पासून खालीं सोन्याचीं नाणीं, १ `येन'पासून खालीं रुप्याचीं, निकलचें ५ `सेन्' व तांब्याचें २ `सेन' अशी यूरोपीय नमुन्यांची चलनपद्धति जपाननें स्वीकारली. सध्याच्या सर्व नाण्यांच्या पुढील बाजूवर `ड्रॅगन'चें चित्र असून मागील बाजूस फुलांची माळ व किमतीची खूण असते.

कोरियाची प्राचीन नाणीं चिनी पद्धतीची असून स. १९०५ पासून जपानी पद्धतीबरहुकूम नवीं नाणीं पाडण्यांत आलीं.

भारतीय नाणीं

हिंदुस्थानांत प्राचीन कालीं प्रसिद्ध किंवा माहीत असलेल्या अशा नाण्यांचें ऐतिहासिक दृष्टीनें वर्णन देतांना पुरातन आणि मध्यकालीन नाण्यांचें मुख्यत: तीन विभाग पडतात : (१) प्राचीन भारतीय नाणीं, (२) उत्तरेकडील म्हणजे ज्या नाण्यांवर परकीय पद्धतीचा बराच परिणाम झाला अशीं व (३) दक्षिणेकडील म्हणजे जीं नाणीं निव्वळ हिंदुस्थानांतील पद्धतीलाच अनुसरून काढिली अशीं.

अत्यंत प्राचीन भारतीय नाणें:- हिंदुस्थानांतील सर्वांत जुनें नाणें मनुस्मृतींत (अ. ८, श्लोक १३२) वर्णिलेल्या भारतीय (किंवा संस्कृत) पद्धतीस अनुसरून आहे व त्याच्यावर परकीय पद्धतीचा परिणाम झालेला दिसत नाहीं. या पद्धतीचें मूलमाप, रति (रक्तिका) अथवा गुंज हे होय. एका गुंजेचें वजन अजमासें १.८३ ग्रेन= ११८ ग्रॅम्स इतकें आहे. ८० रतींचें सोन्याचें नाणें (सुवर्ण= १४६ ग्रेन अथवा ९.४८ ग्रॅम) याचा नमुना कोठें आढळत नाहीं. परंतु ३२ रतीचें चांदीचें पुराण अथवा धरण = ५८.६६ ग्रेन

किंवा ३७९ ग्रॅम, व ८० रतींचें तांब्याचें कार्षापण किंवा अशाच प्रकारचीं इतर नाणीं यांचे नमुने हिंदुस्थानांत पुष्कळ ठिकाणीं सांपडले आहेत. या पद्धतींतील नाण्यांपैकीं अत्यंत जुनाट नाणें ख्रि.पू. निदान चवथ्या शतकाच्या आरंभीचें तरी असलें पाहिजें.

ख्रि.पू. दुसर्‍या शतकामध्यें वायव्येकडून आलेल्या ग्रीक वसाहतवाल्यांमुळें या पद्धतींत बराच फरक पडला; परंतु हिंदुस्थानांतील इतर भागांमध्यें मात्र हीच पद्धत चालू राहिली. या नाण्यांचा आकार साधारणत: समचौकोन किंवा लांबट चौकोन असून तीं जवळ जवळ धातूचें विशिष्ट वजनाचे तुकडेच होत. त्यांच्यावर त्यांचा खरेपणा दाखविणारे निरनिराळ्या वेळचे निरनिराळे छाप मुद्रित केलेले आहेत; यांवरून त्यांनं ठसे (पंच) नाणीं असें म्हणतात. बुल्हर हा ज्यांनां निरनिराळ्या धंद्याच्या संघांची चिन्हें असें म्हणतो तीं याच कालानजीकचीं नाणीं होत; तशींच हिंदुस्थानांतील पूर्वीच्या पद्धतीचीं अक्षरें किंवा चिन्हें वर असलेली हीं ओतीव तांब्याची नाणीं याच वेळेची होत.

हिंदुस्थानांतील प्राचीन परकीय नाणीं- प्राचीन इराणी नाणीं एकिमेनियन साम्राज्याच्या (ख्रि.पू. ५०० ते ३३१) अमदानींत पंजाबांत आलीं. सोन्याचीं, दोन्हीं बाजूंनीं मुद्रित अशीं स्टेटर्स नाणीं ख्रि.पू. ४ थ्या शतकांत हिंदुस्थानांत पाडलीं गेली. चांदीच्या सिग्लोइ नाण्यांपैकीं बर्‍याच नाण्यांत व ठसेमुद्रित भारतीय नाण्यांत पुष्कळसें साम्य आहे; या वरून तीं दोन्हीं एकाच वेळी प्रचलित असावी असें दिसतें. शिवाय सिग्लोईवर ब्राह्मी व खरोष्ठी या लिपींतील अक्षरें दिसून येतात, यावरूनहि वरील गोष्ट सिद्ध होते. प्राचीन इराणी नाण्यांचें जें प्रमाण (सिग्लोस= ८६४५ ग्रेन्स अथवा ५६०१ ग्रॅम्स) तेंच पुढें ग्रीक राजांच्या नाणें पाडण्याच्या पद्धतींत स्वीकारलें गेलें.

अथीनियन नाणी:- अगदीं प्रथमत: व्यापाराच्या ओघांत अथेन्सचें `औत्स' नांवाचें नाणें हें पूर्वेकडे गेलें; आणि अथीनियन टांकसाळींतून पुरवठ्याचा जेव्हां तुटवडा पडूं लागला (ख्रि.पू. ३२२ च्या अगोदर एक शतकापासून) तेव्हां उत्तर हिंदुस्थानांमध्यें त्या नाण्यांसारखीं नाणीं होऊं लागलीं. यांपैकीं कांहीं नाणीं अगदी अस्सलबरहुकूम आहेत; पुढें निघालेल्या काहीं नाण्यांमध्यें एका बाजूला घुबडाच्या ऐवजीं गरुड आहे. सोफायटिस् (संस्कृतसौभूति) चीं नाणीं ही बहुधां याच नाण्यांची प्रतिकृति असावी. (हा राजा अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळेस असेसिन्सच्या म्हणजे असिग्नी उर्फ चिनाब नदीच्या तीरावरील प्रदेशावर राज्य करीत होता.)

अलेक्झांडरची नाणीं:- हिंदुस्थानांतील समचौकोनी आकाराचीं तांब्याची कांहीं नाणूं बहुतकरून अलेक्झांडरनेंच पाडलीं असावीं. (तीं मूळची ओतीव नाणी असावीं असे कित्येकाचें म्हणणें आहे).

हिंदुस्थान व सेल्युकस:- सेल्युकसच्या पूर्वेकडील स्वार्‍यांपासून ख्रि.पू. ३०६ या वर्षी चंद्गगुप्ताशीं त्याचा तह झाल्यापासून सिरियामधील सेल्युकसचें राज्य व उत्तरहिंदुस्थानांतील मौर्याचें साम्राज्य यांमध्यें सारखें दळणवळण सुरू झालें, ही गोष्ट मेगॅस्थिनीस व डायामेकस हे पाटलिपुत्र येथील दरबारीं वकील ठेवले होतें यावरून व अशोकाच्या शिलालेखामध्यें ग्रीक राजांचीं नांवें आलीं आहेत यावरूनहि सिद्ध होतें. सेल्युकिड नाण्यावरील हत्तीचें चित्र, व सेल्युकस आणि सोफाएटिस यांच्या नाण्यांतील सारखेपणा याहि गोष्टींचें कारण वरील दळणवळणच होय.

ग्रीको-बॅक्ट्रियाचा परिणाम:- ख्रि.पू. दुसर्‍या शतकाच्या आरंभापर्यंत परकीय अंमलामुळें हिंदुस्थानांतील नाण्यांमध्यें विशेषसा फरक पडला नाहीं. उत्तर हिंदुस्थानांतील नाण्यांचें रूप व आकार यांमध्यें विशेष असा फरक डायोडोटसनें स्थापिलेल्या बॅक्ट्रियाच्या राज्याच्या अंमलामुळेंच झाला.

पार्थियन परिणाम:- बॅक्ट्रियामधील शक आणि पार्थियन यांच्यामधील संघट्टणामुळें हिंदुस्थानांतील शक-नाण्यामध्यें बरींच पार्थियनविशिष्ट चिन्हें सांपडतात; यांतील प्राचीन म्हणजे मॉईसची (ख्रि.पू. दुसर्‍या शतकांतील) आहेत. रोमन नाणीं दक्षिण व उत्तर हिंदुस्थानामध्यें पुष्कळ सापंडतात.

रोमन पद्धतीचा परिणाम:- (१) कुशान घराण्याच्या तांब्याच्या नाण्यांपैकीं `कोझोला कडाफीस' अशी लिपि असलेल्या नाण्यांवरील मुखवटा हें रोमन बादशहा ऑगस्टस याच्या मुखवट्याचें अनुकरण आहे. (२) कुशान राजांच्या सोन्याच्या नाण्यांचें वजनीमाप व रोमन नाण्याचें वजनीमाप हीं एकच आहेत.

सस्सानियन पद्धतीचा परिणाम:- इराणचें सस्सानियन राज्य व काबूलचे कुशान राज्य यांच्यामधील इ.स. ३०० ते ४५० या सुमारास दळणवळण होतें व त्याचा परिणाम ऑक्सस नदीच्या प्रदेशांत निघालेल्या सायथो-सस्सानियन नांवाच्या नाण्यामध्यें दिसून येतो.

नंतर ५ व्या शतकामध्यें हुणांनीं जेव्हां स्वारी केली तेव्हां सस्सानियन खजिन्यांतील बरीचशी लूट व नाणीं त्यांनीं हिंदुस्थानांत आपणांबरोबर आणलीं. त्यांनीं यांपैकीं कांहीं पुन्हां तशींच नाणीं टांकसाळींत पाडलीं. व कांहीं चलनी नाणीं म्हणून तशींच राहिलीं आणि यांच्या नमुन्यावरूनच हूण व इतर हिंदुस्थानी नाणीं पाडलीं गेलीं. याप्रमाणें एकीकडे राजाचा मुखवटा, व दुसरीकडे अग्निकुंड असा सस्सानियन नाण्याचा नमुना हिंदुस्थानांतील कांहीं भागांमध्यें रूढ झाला व तो कित्येक शतकेपर्यंत चालला. ७ व्या शतकामध्यें सुद्धां नाण्यांच्या प्रसारावरून असें सिद्ध होतें कीं, सस्सानियन राज्य मुलतान व सिंध या प्रांतांत होतें.

ग्रीक हिंदुस्थानी नाणीं, युथिडिमस् आणि डिमिट्रियस्:- हिंदुस्थान देशावर ग्रीक लोकांच्या पहिल्या स्वार्‍या युथिडिमसच्या कारकीर्दीत झाल्या आणि त्या बहुतेक त्याचा मुलगा डिमिट्रियस याच्या नेतृत्वाखाली झाल्या. याचा पुरावा म्हणजे डिमिट्रियसच्या नांवाचें एक नाणें आहे आणि तें ग्रीक व हिंदुस्थान यांच्या नाण्यांच्या पद्धतींतील एकीकरण दर्शविणारें पहिलेंच उदाहरण आहे. त्या नाण्यामध्यें ग्रीक पद्धत अनुसरली आहे, परंतु हिंदुस्थानी पद्धतीप्रमाणें आकार समचौकोन आहे, आणि त्यावर एका बाजूला दुसर्‍या बाजूवरील ग्रीक लेखाचें खरोष्ठीं लिपीमध्यें भाषांतर आहे.

यूक्रेटाइडीस:- याच्या हिंदुस्थानावर स्वार्‍या ख्रि.पू. १९०-१६० वर्षे यांमध्यें झाल्या. त्याचीं नाणीं बल्ख, सीस्तान, काबूल व क्वचित् पंजाब या ठिकाणीं सांपडतात.

ग्रीक-हिंदुस्थानी नाण्यांवरील तारखा:- यांचा काल समजण्याला प्लेटोचें टेट्रॅड्रॅम् (चतुर्द्रम्म) पदक (युक्रेटाइमडीच्या टेट्रॅड्रॅम्पासून घेतलेलें) हें एक महत्त्वाचें साधन आहे. त्यावर सेल्युसिड् शकाचें १४७ वें वर्ष (ख्रि.पू. १६५) हा काल आहे. दुसर्‍या बॅक्ट्रियन नाण्यांचा काल इतका निश्चित नाहीं.

पँटालिऑन अगॅथोक्लिस:- हें युक्रेटाइनडीनच्या वेळेस होतें आणि यांचीं नाणीं काबुल व पश्चिम-पंजाब या प्रांतांत सांपडतात. सर्व ग्रीक राजांच्या नाण्यांपैकीं यांच्याच नाण्यांवर कायती ब्राम्ही लिपी लिहिलेली आहे. अगॅथॉक्लिसच्या कित्येक तांब्याच्या नाण्यांवरील दोन्ही बाजूंवर खरोष्ठीमध्यें लेख आहेत.

अगॅथॉक्लिस:- बॅक्ट्रियन कारागिरीचीं कित्येक पदकें अगॅथॉक्लिसनें केली आहेत. आणि त्यांच्यावर ऍलेक्झांडर दि ग्रेट, अँटिओकस् निकेटर, डायोडोटस, युथिडिमस यांच्या नाण्याबरहुकुम मुखवटे, नमुने व नांवनिशी आहेत. बॅक्ट्रियन राजा अँटिमेखस याच्या पदकांवरहि डायोडोटस व युथिडिमस यांच्या वरीलप्रमाणें प्रतिमा वगैरे आहेत.

अँटिमेखस:-
अँटिमेखसच्या नाण्यावरील चित्रांचे प्रकार त्यानें सिंधू किंवा दुसर्‍या कोणत्यातरी मोठ्या दर्यावर मिळविलेल्या जयाचे निदर्शनात्मक आहेत.

हेलिओक्लिस:-
(ख्रि.पू. १६०-१२०) या राज्याच्या कारकीर्दीत पुष्कळ ग्रीक राजांनीं बॅक्ट्रिया व हिंदुस्थान या दोन्ही देशांवर राज्य केलें होतें, आणि त्यांनीं ग्रीक अक्षरांनीं मुद्रित बॅक्ट्रियन कारागिरीची नाणीं, आणि द्विभाषामुद्रित हिंदुस्थानी कारागिरीचीं नाणीं अशीं दोन्हीं प्रकारचीं नाणीं पाडलीं होतीं. यावेळेपर्यंत सर्व रुप्याची नाणीं पूर्वीच्या जुन्या ऍटिकप्रमाणेंच पाडली जात असत. (ड्रॅम= ६७.५ ग्रेन= ४.३७ ग्रॅम). यानंतर हळू हळू इराणी वजन सुरू झालें. हेलिऑक्लिस, पहिला अपोल्लोडोटस् व अँटिआल्किडस् यांच्या नाण्यांत दोन्हीप्रमाणें वापरतात. नंतरचे सर्व ग्रीक राजे फक्त इराणी प्रमाणाचा उपयोग करीत.

हिंदुस्थानावर स्वार्‍या करणार्‍या सिथियन लोकांची नाणीं सिथियन लोकांचीं दोन निरनिराळी घराणीं व कांहीं अनिश्चित स्वरूपाचे इतर सिथियन सत्ताधारी व कांहीं हिंदु राज्यें हीं ख्रि.पू. २ र्‍या शतकांत उत्तर हिंदुस्थानांत एकाच कालीं अस्तित्वांत होतीं असें नाण्यांवरून समजते.

हिंदुस्थानांतील शतकांच्या पूर्वीच्या नाण्यांवर पार्थियन चिन्हें आहेत याचें कारण बहुधां ही त्यांची मैत्रीच असेल. नंतर ख्रि.पू. १० व्या वर्षी युएची लोकानीं बॅक्ट्रियावर स्वारी करून तें राज्य आपल्या कबजात घेतलें. शकांच्या ताब्यांतील मुलुख युएची लोकांनीं हिसकावून घेतल्यामुळेंच शकांच्या हिंदुस्थानांतील पहिल्या स्वार्‍या झाल्या असाव्यात. नंतर अजमासें एका शतकांत युएची लोकांच्या पाच जातीपैकी कुशान या जातीचे लोक सर्वांत श्रेष्ठ झाले व पॅरोपँविस् पर्वत ओलांडून काबूलमध्यें ग्रीक सत्तेचा जो अवशेष राहिला होता त्याचा त्यांनीं समूळ नाश केला आणि सबंध हिंदुस्थान ताब्यांत घेतलें.

जुन्या नाण्यांचें शकांकडून अनुकरण:- शक लोक बॅक्ट्रियामध्यें राज्य करीत असतानांच मॅसिडोनियन, सेल्युकिड् बॅक्ट्रियन व पार्थियन नाणीं यांचें अनुकरण करण्यांत आलें. या नाण्यांवरील नांवनिशी वगैरे ग्रीक नांवनिशीची विकृत अशी प्रतिकृतीच आहे. परंतु कित्येकांवर कांहीं लेख आहेत. ते तुर्कस्थानांतील अरेमियन लेखनपद्धतीचीं अत्यंत जुनाट उदाहरणें म्हणून गणिलीं गेलीं आहेत.

मॉईस किंवा मोआ:- हिंदुस्थानांत शकांपैकी सर्वांत पहिलें घराणें मॉईस किंवा मोआचें आहे. तक्षशिला येथें तांब्याच्या पत्र्यावर भोज नांव आहे तें व हें नांव बहुतकरून एकच असावें आणि त्याचा काल ख्रि.पू. १२० वर्षांपूर्वीचा असावा. शकाच्या नाण्यांच्या कारागिरीवरून सुद्धां हेंच सिद्ध होतें; कारण ती कारागिरी नंतरच्या ग्रीक राजांच्या कारागिरीपेक्षां उत्कृष्ट आहे आणि त्यांपैकीं कांहीं नाण्यांत डिमिटियस्, अपोलोडोटस् वगैरेंसारख्या पूर्वीच्या ग्रीक राजांच्या नाणकपद्धतीचें अनुकरण केले आहे. ही प्रथम पहिल्या मिथडेटिसच्या नाण्यावर दिसून येतें. मॉइसच्या घराण्याचीं नाणीं फक्त पंजाबमध्यें सांपडतात. (अफगाणिस्तानांत सांपडत नाहींत). यावरून असा तर्क निघतो कीं शकाची ही जात हिंदुस्थानांत काराकोरम घाटाने शिरून काश्मीरमधून पंजाबमध्यें आली.

व्होनोनीस:- या घराण्याचीं नाणीं कंदाहार, गझनी व सस्तन यांसभोवतालच्या प्रदेशांमध्यें सांपडतात. या राजांची नावें पार्थियन नांवांसारखींच लागतात (म्हणून त्यांनां कधी कधी इंडो-पार्थियन असेंहि म्हणतात). हाच प्रदेश पहिल्या शतकामध्यें एका (गोंडो फेरीज या) पार्थियन घराण्याच्या अमलाखाली होता. यावरून हे मूळचे पार्थियन होते हें सिद्ध होतें. मात्र मॉइस हा शक होता व व्होनोनीस हा पार्थियनच होता असें विधान करणें बरोबर नाहीं.

व्होनोनीस व अझीझ:- ज्याअर्थी व्होनोनीस व मॉइसच्या नंतरचा राजा अझीस हे एकत्र मिळून नाणीं पाडीत असत त्याअर्थी त्या नाण्याचा काल ख्रि.पू. पहिलें शतक हा असावा. या दोन घराण्यांमध्यें संबंध कोणता होता हें सांगता येत नाहीं; परंतु एवढें मात्र दिसतें कीं त्यांचीं जेव्हां एकत्र नाणीं निघत तेव्हां बहुश: व्होनोनीसच्या घराण्यांतील मंडळींचीं नांवें नाण्याच्या एका बाजूस असून दुसर्‍या बाजूस मॉइसच्या घराण्यांतील मंडळींचीं नांवें असत. असल्याच दुसरीकडे आढळलेल्या उदाहरणांच्या प्रमाणांवरून कशी कल्पना करतां येईल कीं व्होनोनीसच्या घराण्याचा एक प्रकारचा या दोहोंमध्यें वरिष्ठपणा असला पाहिजे. अझीस एक कीं दोन, व ते मॉइसच्या घराण्यापैकींच आहेत कीं काय, या गोष्टी निश्चित नाहींत.

मथुरेचे सत्रप:- मथुरेचे सत्रप यांनां शकसत्रपच बहुधां समजतात. ते बहुधां ख्रि.पू. ५० पासून ख्रिस्ती शकाच्या आरंभापर्यंत होते. त्यांच्या इतिहासावर मथुरेंतील सिंहाच्या मूर्तीवरील लेख व इतर नजीकचे शिलालेख यांनीं बराच उजेड पडतो.

रंजुबुल:- पहिला सत्रप रंजुबुल हा ग्रीक राजा दुसरा स्ट्रेटो याच्या नाण्यांसारखें नाणें पाडीत असे. सिंह-लेखांतील मोठा सत्रप कुसुलअपतिक आणि लियककुसुलुकाचा मुलगा सत्रपपतिक हे एकच असले पाहिजेत. रंजुबुलाच्या नाण्यांचा दुसरा एक वर्ग (यांच्यावर राजुबुल हें नांव ब्राह्मीमध्यें लिहिलेलें आहे) आणि मथुरेच्या सत्रपांचीं नाणीं यांचा व पंचालांची (शुंगांचीं) व मथुरेच्या हिंदु राजांचीं नाणीं यांचा, कारागिरी व प्रकार यांच्या दृष्टीनें पाहतां साधारणत: परस्परसंबंध दिसून येतो.

दुसरे शकसत्रप:- कुशान सत्तेच्या पूर्वीच्या कालांत अस्तित्वांत होते अशी ज्यांच्याविषयीं साधारणपणें समजूत आहे अशा दुसर्‍या कांहीं सिथिक राजांच्या नाण्यांचा काल सध्यां अनिश्चित आहे. त्यांपैकीं कांहीं माडझनंतरचे राजे- एझिस आणि एझिलिसिस यांच्या नाण्यांवरून घेतली आहेत, आणि त्यांच्यावर `सत्रप’ हें नांव असल्यामुळें तीं बहुधां याच घराण्यांतील सत्रपांनीं पाडली असावींत. यांपैकीं सत्रप झीओनिसिस् याचा काल बहुधा ख्रि.पू. ८० वर्षे हा असावा. अर्तासचा मुलगा खरभोस्ट याचीं ओबडधोबड नाणीं या कालानंतरच्या कालांतील होत.

अनिश्चित वर्ग:- पुढील सिथिक राजे कोणत्या देशाचे अथवा जातीचे तें अनिश्चित आहे (त्यांची नाणीं ख्रि.पू. पहिल्या शतकांतील उत्तर भागांतलींच असावींत असें दिसतें.)

मायस किंवा हिरेअस:- प्रथम हा शक असावा असें मानण्यांत आलें होतें आणि त्याच्या पदकावरील लेख वाचून त्याचा अर्थ शकांचा राजा असा केला होता. परंतु कोणी त्याला दुसर्‍या जातीचा मानतात. द्विभाषायुक्त असें एक तांब्याचें नाणें मायसनेंच पाडलें असें कोणी म्हणतात; पण हें कितपत खरें आहे याची जबरदस्त शंका आहे. मायसच्या नाण्याची कारागिरी व वरील चित्र हीं हिरकोडिसच्या नाण्यांच्यासारखींच आहेत. (ही नाणीं ख्रि.पू. १२० वर्षांनंतर बॅक्ट्रियामध्यें कुशान किंवा युएची यांनीं पाडलेल्या नाण्यांपैकींच असावींत). नन्नैया देवीचें नांव असणारीं सपलीझिसची नाणीं याच वर्गांतली होत.

हिंदु- चिनी नाणीं:- काशगरच्या आसमंतात कांहीं तांब्याचीं नाणीं सांपडली आहेत, त्यांच्यावर खरोष्ठी व चिनी लिपींतील अक्षरें आहेत. चिनी लिपीमध्यें नाण्यांचें वजन किंवा किंमत दिलेली आहे. खरोष्ठीमध्यें लिहिलेली अक्षरें अपूर्णच आहेत. परंतु ती राजांचीं नांवें आहेत यांत शंका नाही.

स्थानिक नाणी (इ.स. ५० पर्यंतची) अल्मोरा:- हिमालयांत अल्मोरा जिल्ह्यांत तीन प्रकारचे नमुने आढळले आहेत. रुपें व इतर कांहीं धातूं यांच्या मिश्रणापासून नाणीं बनविलेलीं दिसतात व हिंदुस्थानांतील इतर नाण्यांपेक्षां ती जड आहेत. त्यांच्यापैकीं दोन्हींवर शिवरत व शिवपालित हीं नांवें ब्राह्मी लिपीमध्यें लिहिलीं आहेत. पंचालांच्या नाण्यांप्रमाणें उलट्या बाजूला चैत्याचा कठडा आहे आणि सुलट्या बाजूला कुणिंदाच्या नाण्याप्रमाणें एक हरिण दिसते.

अपरान्त:- या नाण्यांवर `महाराजस अपलातस’ हीं अक्षरें आहेत. ज्याअर्थी ती मथुरेच्या क्षत्रपाच्या नाण्यांसारखी व नजीकच्या हिंदु राजांच्या नाण्यांसारखीं आहेत त्याअर्थी त्यांचा काल ख्रि.पू. १ ल्या शतकाचा उत्तरार्ध अथवा इ.सनाच्या १ ल्या शतकांतील पूर्वार्ध हा असावा.

आर्जुनायन:- हीं नाणीं वरील नाण्यांच्या वर्गांतलीच आहेत आणि त्यांचा कालहि तोच आहे. या नांवाचा उल्लेख अलाहाबाद येथील समुद्गगुप्ताच्या स्तंभावरील शिलालेखांत सांपडतो.

औदुम्बर अथवा ओदुम्बर:- पठाणकोट प्रांतामध्यें सांपडलेली नाणीं ग्रीक राजा अपोलोडोटस् याच्या हेमिड्रॅम्स (अर्धद्रम्म) सारखीं आहेत व तीं व ही दोन्हीं एकत्रच सांपडतात. म्हणून त्यांचा काल बहुधां ख्रि.पू. १०० वर्षे हा असावा. त्याचप्रमाणें औदुंबर नाणें व अझिलिसिसचें एक नाणें यांमध्येंहि तसाच सारखेपणा आहे. कुनिंदांच्या प्रमाणेंच औदुम्बरांच्यावर ब्राह्मी व खरोष्ठी लिपींतील अक्षरें आहेत.

अयोध्या:- येथील जुनाट नाणीं केवळ ओंतीव तुकडेच आहेत. त्यांचा काल बहुधां ख्रि.पू. २०० वर्षे हा असावा. बरीचशी ओतीव समचौकोनी नाणीं ख्रि.पू. २ र्‍या शतकांतील असून याच किंवा यानंतरच्या शतकांतील मित्र हीं अक्षरें शेवटीं असलेल्या नांवांनीं युक्त अशीं दुसरीं नाणीं असावींत. या मित्र नाण्यांचा व उत्तरपंचालांतील नाण्यांचा संबंध व दोन्हींचाहि शुंग घराण्याशीं संबंध यांविषयीं सध्यां बरीच अनिश्चितता आहे.

बारान:- संयुक्तप्रांतांतील बुलंद शहराचें हें जुनें नांव होतें असें कनिंगहॅम म्हणतो व त्या नाण्यांवरील नांवाचा पाठ `गोमितस बारानाया’ आहे असें कित्येकांचें म्हणणें आहे; परंतु बुल्हरनें दाखविल्याप्रमाणें या गांवाचें पहिलें नांव वरण होतें, हा गोमित्र व मथुरेच्या राजांपैकीं एक गोमित्र हे एकच समजले जातात. परंतु त्यांच्या नाण्यांची तर्‍हा निराळी आहे आणि त्यांवरील ब्राह्मी लिपी अधिक पुरातनकालाची दिसते.

एरण-ऐरकिन:- मध्यप्रांत, सागर प्रदेशांतील या शहरांत सांपडलेलीं नाणीं म्हणजे शुद्ध भारतीय नाण्यांचा नमुना म्हणून प्रसिदध आहेत. ठसेपद्धतीची पुढें सांचापद्धत कशी केली हें येथें समजतें. प्रथम कांहीं चिन्हें किंवा खुणा नाण्यांवर वेळोंवेळी ठसा मारून करीत असत. नंतर ठशामधून काढून या सर्व चिन्हांचा एक सांचा बनविला. परकीय पद्धतीचा ज्या भागांमध्यें प्रसार झालेला नव्हता, अशाच भागांमध्यें वरील प्रकार बहुधां घडत असे.

जनपद:- [राजम (राजन्य) अशा नांवाचे हे लोक असावेत] जनपद अशीं अक्षरें लिहिलेल्या नाण्यांबद्दल कांहीं समाधानकारक माहिती नाहीं (हीं अक्षरें कधीं ब्राह्मींत तर कधीं खरोष्ठींत लिहिलेलीं असत) राजसत्ता असा त्यांपासून अर्थ निघतो असें कित्येकांचें म्हणणें आहे. खरोष्ठींत लिहिलेलीं नाणीं अधिक पूर्वीचीं असावींत असें दिसतें.

काड:- काड हीं ब्राह्मींमध्यें लिहिलेलीं अक्षरें ज्यांच्यां वर आहे तीं ओंतीव तांब्याचीं नाणीं कोणी केली हें निश्चित नाही. `काड राजाचें’ असा कित्येक त्याचा अर्थ बसवितात.

कोसाम्बी किंवा वत्स-पट्टण:- (अलाहाबाद जिल्ह्यांमधील एक जुने शहर) मोठी ओंतीव नाणीं (ज्यांची वर वर्णिलेल्या `काडस’ नांव असलेल्या नाण्यांशीं तुलना करतां येईल) ख्रि.पू. ३ र्‍या शतकांतील असावींत; दुसरीं पुढच्या दोन शतकांतील असावीत. पंचालांची नाणीं व अयोध्येचीं नाणीं यांच्याशी त्यांची तुलना करतां येईल.

कुनिंद:- सतलजच्या दोन्ही बाजूंवरील डोंगराळ प्रदेश हा कुनिंदांचा प्रांत असावा (त्या प्रांतांत हल्लीं कुनेत किंवा कुनाईत लोक राहतात). या नाण्याचे दोन निरनिराळे काल होतात; त्यांपैकीं प्रथमच्या कालांतल्या (ख्रि. पू. १०० वर्षे) नाण्यांवरील अक्षरें औदुंबरच्या नाण्यांप्रमाणें ब्राह्मी व खरोष्ठी या दोन्ही लिपीमध्यें आहेत, व तीं अपोलोडोटेसच्या अर्धद्रम्म बरोबरच सांपडतात. नंतरची नाणीं बहुतेक इ.स. ३ किंवा ४ यांमधील असावींत. त्यांवरील ब्राह्मी लिपी अलीकडल्या पद्धतीची आहे आणि त्यांच्यावर कुशानांच्या तांब्याच्या नाण्यांचा परिणाम झालेला दिसतो. यौधेयांच्या नाण्यांचे सुद्धा असेच वर्ग पडतात; यावरून हीं हिंदु घराणीं ग्रीक कुशानांच्या नंतर उदयास आली.

मालव:- `मालवानां जय’ अशी अक्षरें असलेलीं नाणीं पूर्वी जुनीं म्हणून समजली जात; त्यांच्या नांवनिशीची तर्‍हा व पद्मावतीच्या नागांच्या नाण्यांप्रमाणें त्यांची कारागिरी यावरून इ.स. ५ वें शतक या पूर्वीचा त्यांचा काल नसला पाहिजे असें दिसतें.

मथुरा:- मथुरेच्या आसपास ख्रि.पू. निदान तिसर्‍या शतकापूर्वीचें एक जुनाट नाणें सांपडलें, त्यावर उपातिक्या हीं अक्षरें ब्राह्मी लिपीमध्यें आहेत. बलभूतींच्या नाण्यांवर ख्रि.पू. २ र्‍या शतकातील ब्राह्मी लिपीचीं अक्षरें आहेत. कित्येकांच्या मतें मथुरेंतील इतर दुसर्‍या नाण्यांचा काल म्हणजे मथुरेंतील इतर शकांच्या र्‍हासाचा काल होय. परंतु रामदत्ताचीं कांहीं नाणीं नि:संशय यापूर्वीचीं दिसतात, कारण त्यांच्यावर पंचालांच्या नाण्यांचा विशेष जो चतुष्कोणी खोल ठसा तो एका बाजूला आहे. बलभूतींचीं नाणीं व बहसतिमिताचीं (सं. बृहस्पतिमित्र) नाणीं यांच्यावर एक चैत्य-वृक्ष आहे आणि त्यांच्यावरील अक्षरें सारखीं आहेत. यावरून असें दिसेल कीं त्या हिंदु राजांपैकीं कांहींजण तरी शक-क्षत्रपांच्या पूर्वी झाले असले पाहिजेत व शकांनीं हिंदु राजांच्यासारखींच नाणीं पाडलीं असावींत.

पंचाल:- हीं नाणीं शुंग किंवा `मित्र’ घराण्यांतील राजांनीं पाडलीं असें समजतात; परंतु यांत अडचणी अशा आहेत :- (१) हीं बरींचशीं नाणीं पूर्वीच्या पंचाल देशांत म्हणजे सध्यांच्या रोहिलखंडामध्यें सांपडतात; आणि दुसर्‍या अनेक गोष्टींवरून असें दिसतें की शुंगांचें राज्य पूर्व माळव्यामध्यें होतें. (२) नाण्यांवर एकंदर १२ नांवें आहेत आणि त्यांपैकीं एकच (अग्निमित्र) पुराणामध्यें दिलेल्या शुंग घराण्याच्या यादींत सांपडतें. परंतु पुन्हां दोन्हींतील नांवांचीं अंत्याक्षरें `मित्र’ हीं आहेत; आणि पुराणांवरून कल्पिलेला शुंगांचा काल (ख्रि.पू. १७६-६६) आणि नाण्यांच्या पद्धतींवरून वगैरे दिसून येणारा त्यांचा काल एक आहेत. या नाण्यांमध्यें व अयोध्येंतील मित्रांच्या नाण्यांमध्येंसुद्धां कांहीं तरी संबंध असावा. या पंचालनाण्यांवर ब्राह्मी अक्षरें आहेत.

पुरी व गंजम:- ओरिसांतील पुरीमध्यें आणि त्यालगतच्या मद्रासमधील गंजम जिल्ह्यांत ब्राँझ (कांसें) धातूचीं कांहीं चमत्कारिक नाणीं सांपडतात. त्यांच्यावर नांवनिशी वगैरे कांहीं नाहीं; परंतु त्यांची धाटणी कनिष्काच्या वेळेच्या कुशानांच्या कांशाच्या नाण्यापासून घेतलेली दिसते. म्हणजे एका बाजूवर राजाची उभी मूर्ति आणि दुसर्‍या बाजूवर कोणत्यातरी देवतेची मूर्ति असते. हीं नाणीं पुरीमध्यें सांपडली म्हणून जेव्हा प्रसिद्ध झालीं त्यावेळी तीं व साधीं ब्राँझ धातूचीं कुशान नाणीं हीं एकत्र आढळलीं. यावरून ती दोन्ही एकाच वेळीं प्रचलित होतीं असें दिसतें. एवढें खरें कीं, कुशान नाणीं साधारणत: पुरी किंवा गंजमपर्यंत आलीं नाहींत. यावरून खर्‍या नाण्यांसारखीं जीं ओंतीव नाणीं केलीं तीं बहुतेक त्याच कारणास्तव केलीं असावींत; म्हणून तीं नाणीं अशी न गणतां अलीकडील `रामटंकां’प्रमाणें देवाला द्यावयाच्या भेटी म्हणून समजली जावीं. कसेंहि असलें तरी कनिष्काची कारकीर्द व कुशान राज्याचा शेवट यांच्यामधल्या कालांत तीं असावींत.

सिबी:- हे चितोडच्या आसपासचे रहिवाशी असून यांचीं नाणीं चितोडजवळ नगरी (प्राचीन `मध्यमिका’) येथें सांपडतात.

तक्षशिला:-
(रावळपिंडीप्रांत, हल्लींची शाहढेरी किंवा ढेरीशाहान) ठशांनीं नाणें पाडण्याची कला हिंदुस्थानांत येथेंच प्रथम माहीत झाली. अगदीं प्रथमच्या नाण्यांवर एकाच बाजूला छाप आहे आणि धातु अर्धवट तापविलेल्या स्थितींत असतांना छाप मारला आहे. यामुळें ठशाचा छाप नाण्यावर खोल पडला असून ठशावरील चिन्हें स्पष्ट उमटलीं आहेत. या तक्षशिलेंतील समचौकोनी नाण्याप्रमाणें, ग्रीक राजे पँटालिऑन व अगॅथॉक्लिस (ख्रि.पू. १९०) यांनीं ताब्यांचीं नाणीं पाडलीं; यांच्यावर दोन्हीं बाजूला ठसे होते.

त्रिपुरी किंवा त्रिपुरा:- जबलपुर, तेवारचें जुनें नांव; या नाण्यांवर ख्रि.पू. ३ र्‍या शतकांतील ब्राह्मी लिपीचीं अक्षरें आहेत.

उज्जनी:-
पूर्वीच्या नाण्यांवर ख्रि.पू. २ र्‍या शतकांतील ब्राह्मी लिपीमध्ये `उजेनिय’ असें नांव आहे. सध्यां माहीत असलेल्या दुसर्‍या नाण्यांवर कोणती नांवनिशी नाहीं. परंतु त्यांच्यावर या प्रांताला विशिष्ट असलेलें एक चिन्ह आहे.

वटस्वक:- पँटालिऑन व अगॅथॉक्लिस यांच्या तांब्याच्या समचौकोनी नाण्यांप्रमाणें यांच्यावरील नांव ब्राम्हीमध्यें आहे. हीं नाणीं पूर्वीच्या एका ठशाच्या नाण्यापासून घेतली असल्यामुळें वटस्वक नाण्यांचा काल ख्रि.पू. २०० वर्षांचा असावा.

यौधेय:-
हल्लीचे भावलपूरचे जोहिये व हे एकच असें समजतात, परंतु पूर्वी त्यांचा देश यापेक्षां अधिक विस्तृत होता. यांच्या नाण्यांचे दोन भाग पडतात. (१) लहान तांब्याचीं नाणीं; जरी यांची कारागिरी ओबडधोबड होती तरी त्यांची इतर बाबतींत पूर्वीच्या औदुंबर व कुणिंद यांच्या नाण्यांशी तुलना करतां येईल. (२) मोठी तांब्याचीं नाणीं; यांची कारागिरी व प्रकार पाहातां यावर कुशानांचा परिणाम झालेला दिसतो; या नाण्यांवर सहा डोक्यांच्या देवतेचा- कदाचित कार्तिकेयाचा- ठसा आहे. तीं त्यांतल्यात्यांत नंतरच्या काळांतील असावींत; पहिली ख्रि.पू. १०० सुमारचीं आहेत.

इंडो-पार्थियन नाणीं:- इंडो-पार्थियन या घराण्यांतील गोंडोफेरीज हा पुरुष फार प्रसिद्ध झाला.

गोंडोफेरीज:- तख्त-इ-बाहि येथील लेखांतील १७३ हें विक्रम संवत् धरून अशी माहिती मिळते कीं, गोंडोफेरीजच्या कारकीर्दीतील सन २१ हें पहिलें वर्ष होतें. याचा व नाण्यांवरील ग्रीक नांवांवरून वगैरे मिळणार्‍या पुराव्याचा मेळ बसतो. अस्पवर्मा हा प्रथम एझीस याचा व नंतर गोंडोफेरीज याचा मांडलिक किंवा सत्रप (सुभेदार) होता असें नाण्यांवरून सिद्ध होतें. या गोष्टीनें या दोन घराण्यांचा संबंध जुळतो. गोंडोफेरीजच्या अगर त्याचा पुतण्या अब्दगेसीस याच्या वेळेच्या सुमारास त्यांचे तक्षशिलेच्या आसपास सुभेदार किंवा मांडलिक असलेले `सस्सन, सपेदन, सतवस्त्र’ इत्यादि राजांचीं रुप्याचीं नाणीं तक्षशिला येथील उत्खननांत अलीकडे उघडकीस आलेलीं आहेत. सस्सानियन कारागिरीच्या कांहीं नाण्यांनां इंडोपार्थियन असें कित्येकांनीं चुकीनें म्हटलें आहे. परंतु ती बहुतेक उत्तरहिंदुस्थानांतील कोणत्यातरी घराण्यानें केलीं असावीं; त्यांचा काल इ.स. ६ वें शतक असावा.

कुशान नाणीं:- ख्रि.पू. १२० या वर्षाच्या सुमारास युएची लोक हे बॅक्ट्रिआ व पॅरोपॅनिससचा उत्तरेकडील प्रदेश, यांमध्यें फार बलाढ्य होऊन बसले.

हरमेऑस:- कुजुल कडफिसेस व हरमियसचें राज्य कुशानांनीं कसें घेतलें याचा पुरावा नाण्यांवरून मिळतो. प्रथम हरमेऑसचीं एकट्याचींच नाणीं होतीं मग कुजुल कडफिसेस व हरमेऑस यांचीं व नंतर फक्त कुजुल कडफिसेस याचीं होती. हिंदुस्थानावरील स्वारी त्याच्या नंतरच्या राजानें केली असें म्हणतात. या राजानें कोणतीं नाणीं पाडलीं यासंबंधीं तितकी खात्री नाहीं. ऑगस्टसच्या दिनारासारखीं त्याचीं नाणीं होतीं.

पंजाब, कंदाहार व काबुल या ठिकाणीं सर्वत्र एका निनांवीं राजाचीं पुष्कळशीं नाणीं सांपडतात, यावरून त्याच्या राज्याचा विस्तार दिसून येतो. त्या नाण्यांवरील कारागिरी व अक्षरें यावरून कित्येक गोष्टी सिद्ध करतां येतात. त्यांचा व मिऑसच्या नाण्यांचा ठसा सारखा आहे. म्हणजे उलट्या बाजूला घोडेस्वार आहे आणि कडेला नक्षीहि सारखी आहे. शिवाय तो निनांवी राजा जी खूण वापरतो तीच खूण हिम्कडफिसेस व त्याच्यानंतरचे राजे यांचीहि आहे; एका नाण्यावर एका बाजूस दोन तोंडें असलेला मुखवटा आहे व एका तोंडापुढें निनावी राजाचें व दुसर्‍यापुढें हिमकडफिसेसचें अशीं चिन्हें आहेत; यावरून हे दोन्ही राजे एकाच कालांतले असावेत. फॉन गुशमिडच्या मतें तो हिंदु राजा आग्निवेश्यच असावा. निनांवीं राजा व विक्रमादित्य हे एकच असाहि कित्येक संशोधकांचा तर्क आहे. (कनिगहॅमच्या मतें खरोष्ठीमधली `वि’ हे विक्रमादित्याचे आद्याक्षर असावें आणि हा निनावी राजा जर विक्रमादित्यच असेल तर विक्रम-संवत् हा त्याच्या जन्मदिवसापासूनच सुरू झाला असें धरलें पाहिजे.).

हिमकफिसेस यानेंच सुवर्णाचीं नाणीं प्रथम काढली व पुढें उत्तरहिंदुस्थानची मालकी गुप्तांच्याकडे आल्यावर त्यांनींहि तीच पद्धत चालू ठेवली. यूक्रेटाइरीची दोन किंवा तीन सुवर्ण नाणीं, मिनँदरचें एक, कदाचित् तक्षशिलेचें एक; यांशिवाय हिमकडफिसेसच्या पूर्वी दोन शतकांमध्यें पाडलेल्या नाण्यांचे नमुने, हल्ली उपलब्ध नाहींत. कुशानांनीं इतकी सोन्याचीं नाणीं पाडण्याचें कारण हेंच कीं त्यावेळीं रोममधून बरेंचसें सोनें हिंदुस्थानांत आलें होतें. (औरीज् १२४ ग्रेन; अ.= ८०३५ ग्रेन). दोन आवरींच्या वजनाचीं नाणी फक्त हिमकडफिसेसनेंच पाडलीं होतीं. त्याच्यानंतरच्या राजांचीं सर्वांत मोठीं सुवर्णनाणीं फक्त आवरीच आहेत. त्यांच्या नाण्यांवरील अक्षरें ग्रीक व खरोष्ठीमध्यें आहेत. त्यांच्यानंतरच्या ३ राजांच्या नाण्यांवरील अक्षरें फक्त ग्रीकमध्येंच आहेत. नंतर ग्रीक अक्षरें ओळखतां येईनात म्हणून नागरी अक्षरें व शिक्के प्रचारांत आले.

कनिष्क व हुविष्क:- यांचीं नाणीं फार महत्त्वाचीं आहेत. त्यांच्यावरून त्या काळीं पाहिजे त्या धर्मांतील पाहिजे तीं मतें व दैवतें घेण्याचें धर्मस्वातंत्र्य दिसून येतें; कारण त्यांच्या नाण्यांच्या उलट्या बाजूवर ग्रीक व सिथिक देवांच्या आणि बुद्धाच्या प्रतिमा आहेत.

इ.स. १८० नंतर कुशानांची सुवर्णाचीं व तांब्याचीं नाणीं चालू राहिली, परंतु ग्रीक लेखावरून यानंतर कांहीं माहिती मिळूं शकत नाहीं. त्या नाण्यांच्या उलट्या बाजूवर कोठें कोठें अर्थहीन नागरी अक्षरें किंवा छाप उठविलेले आढळतात. हीं नाणीं बहुतकरून स. १८० पासून तें स. ४२५ पर्यंत चालू असावींत.

नाण्यांच्या स्थलावरूनहि त्यांचें पौर्वापर्य ठरवितां येण्यास मदत होईल. ज्या नाण्यांवर शिव आणि नंदी यांचा छाप, कुशान वासुदेवाच्या नाण्यांवरील छापासारखा आहे तीं नाणीं बहुतेक काबूलमधील असावीत; तींच पद्धत सिथो-सस्सानियन लोकांनीं घेतलीं. ज्यांच्यावर एक बसलेली देवता आहे तीं बहुतेक कुशानांच्या राज्यांतील पूर्वेकडील भागांतील असावींत; त्यांचींच नक्कल किदार, कुशान व गुप्त यांनीं केली. सुलट्या बाजूवर आपल्या पूर्वजांचीं ग्रीक नांवें तशींच्या तशींच ठेवून ही नाणीं पुढें कुशानांनीच पाडलीं असतील हेंहि शक्य आहे.

सिथो-सस्सानियन:- पॅरोपोनिससच्या उत्तरेकडील ऑक्ससवरील प्रांतांतून बहुधां हीं नाणीं येतात; परंतु तीं काबुलमध्येंहि केव्हां केव्हां सांपडतात. त्यांचा कालावधि पुढील गोष्टींवरून साधारणत: ठरवितात: (१) कांहीं अगदीं पूर्वीच्या नाण्यांवर सस्सानियन राजा दुसरा अहुर्मझ्द याचा मुकुट व नांव आहे (अहुर्मझ्द दुसरा. स. ३०१-३१०). (२) यानंतरचा काल म्हणजे इ.स. ४५० हा होय. या निरनिराळ्या नाण्यांवर तत्कालीन सस्सानियन राजाचा मुकुट आणि वाईट अशा ग्रीक लिपीमध्यें त्याचें नांव व पदव्या यांचा छाप असतो. डुरुइनच्या मतें, हीं नाणीं युएची किंवा कुशान या लोकांचीं स्वत:चींच आहेत; आणि सस्सानियन नांवें व मुकूट जे त्यांच्यावर आहेत त्याचें कारण असें आहे कीं, युएची व सस्सानियन राजे यांच्यामधील पुष्कळ दिवसांच्या मैत्रीमुळें युएची लोकांनीं ती दोन्हीं त्यांच्यापासून घेतलीं असावीं. अरेकोसिआ आणि बॅक्ट्रिया या प्रांतांत तीं नाणीं पाडलीं गेलीं.

किदार किंवा लहान कुशान:- चिनी ग्रंथांवरून असें दिसतें कीं, किदार कुशान हे उत्तरेकडे सिंधूच्या पश्चिमेला चित्रळ व गिलजीतमध्यें व पूर्वेस परश्वली व काश्मीरमध्यें गेले; त्यांचीं नाणीं काश्मीरमध्यें सांपडतात. किदार कुशानांच्या नाण्यांच्या एका बाजूला एक बसलेली देवता आहे. व तीच नंतरच्या मोठ्या कुशानांच्या नाण्यांची विशिष्ट खूण आहे. यावरून गांधारपेक्षां काश्मीरमध्येंच तीं पाडलीं असावींत. त्यांच्या एका बाजूवर घराण्याचा संस्थापक जो किदार त्याचें नांव आहे आणि दुसर्‍या बाजूवर राज्यावर असणार्‍या त्या त्या राजाचें नांव आहे.

क्षहरात:- नहपान याचें वर्णन क्षहरात (ब्राह्मी)= छहरात (खरोष्ठी) असें त्याच्या नाण्यांवर केलेलें आहे. या घराण्याचींच अशी खात्रीची नाणीं नहपानाच्या नाण्याशिवाय सध्या माहीत नाहींत.

सुराष्ट्राचे सत्रप:- या घराण्यांतील पहिला पुरुष चष्टन; यानेंच शककालाची स्थापना केली अशी समजूत आहे. पहिले दोन सत्रप चष्टन व जयदाम यांच्या कारकीर्दीत आंध्रांच्या सार्वभौमत्वाविषयीं लढा सुरू होऊन तें सार्वभौमत्व पुन्हां प्रस्थापित झालें असावें. अगदीं पूर्वीच्या नाण्यांवरील पदव्या `महासत्रप’ व `सत्रप’ या असून यांमधील भेदाची फोड पुढीलप्रमाणें करतां येईल-

नहपान आणि चष्टन व त्यांच्यानंतरचे राजे यांची रुप्याचीं नाणीं ही पंजाबच्या ग्रीक राजांच्या अर्धद्रामापासून घेतलीं आहेत आणि त्यांच्या वजनाचें प्रमाणहि त्यांच्याचसारखें आहे (फारशी- हेमिद्राम= ४३२ ग्रेन किंवा २८ ग्रॅम). नाण्यांवर ग्रीक लिपीमध्यें लिहिलेली कांहीं तुटक तुटक अक्षरें दिसून येतात यावरून ही वरील गोष्ट सिद्ध होते. हीं अक्षरें पुढें केवळ शोभा म्हणून सत्रप नाण्यांच्या एका बाजूवर उठवीत असत.

चष्टनाच्या नाण्यांवर, नहपानाच्या नाण्याप्रमाणें नागरी व खरोष्ठीमध्यें अक्षरें आहेत, व नंतरच्या सर्व नाण्यांवर फक्त नागरी अक्षरेंच आहेत. यावेळचें नाणें बहुतेक रुप्याचें आहे. परंतु तांबे व मिश्रधातु यांच्याहि नाण्यांचें मासले आहेत. राज्यावर असलेल्या सत्रपाचें व त्याच्या बापाचें अशीं दोन्ही नावें व त्यांच्या पदव्या या नाण्यांवर आहेत. या गोष्टी व एका बाजूवर असलेल्या तारखा यांच्या साहाय्यानें या घराण्याची रूपरेषा बरीच बिनचूक रीतीनें काढतां येतें. पहिल्या दामाजदश्रीचा मुलगा सत्यदामन याच्या नाण्यांवर शुद्ध संस्कृतांतील अक्षरें आहेत. सत्रप नाण्यांवरील तारखा किंवा सन हे रुद्रदामनच्या जुनागड येथील शिलालेखांतील ७३ व्या वर्षापासून सुरू होतात. नाण्यावरील सन पांचवा सत्रप जीवदामन् याच्या कारकीर्दीतील १०० या वर्षापासून सुरू होतात व घराण्याच्या शेवटापर्यंत ते आहेत. गुप्तांच्या हल्ल्यामुळें जेव्हां सत्रपांचें घराणें मोडकळीस येऊं लागलें तेव्हां कोणतींच नाणीं न पाडली जाणें शक्य आहे. हिंदुस्थानांतील या भागांत प्रथम जीं गुप्तांनीं नाणीं पाडलीं त्यांचे सन नीट वाचतां येत नाहींत.

आभीर:- पुराणांतील घराण्यांच्या यादीवरून व नाशिक येथील शिलालेखावरून हीं नांवें आपणांस समजतात. त्यांच्या वेळचा ईश्वरदत्त हा आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या व दुसर्‍या वर्षी नाणीं पाडतो. नांवाचीं तर्‍हा आणि कारकीर्द नोंदण्याची पद्धत यांपासूनहि वरील तर्काला आधार मिळतो.

आंध्र- आंध्र (आंध्रभृत्य किंवा सातवाहन) यांच्या अंमलाखालीं फक्त दक्षिण हिंदुस्थानांतील प्रांतच होते. त्यांच्या नाण्यांच्या वेळेचा त्यांचा इतिहास क्षहरांत व सुराष्ट्र आणि माळवा यांचे सत्रप यांच्या इतिहासांशी संलग्न आहे. आंध्र नाण्यांचे दोन मुख्य वर्ग व राज्याचे पूर्व व पश्चिम असे दोन विभाग यांचा एकमेकांशी मेळ बसतो. दोन्ही वर्गांतील नाण्यांवर नांवें तींच आहेत. परंतु पश्चिमेकडील नाणीं, जी कोल्हापूर संस्थानांत मुख्यत्वें सांपडतात, त्यामध्यें व गोदावरी व कृष्णा प्रदेशामध्यें मुख्यत्वें सांपडणारीं पूर्वेकडील नाणीं यांमध्यें तफावत अशीं दिसतें कीं त्यांचे सांचे निराळे आहेत. आणि पश्चिमेकडील नाण्यांवर दिसून येणार्‍या पदव्या किंवा नांवें ही पूर्वेकडील नाण्यांवर आढळून येत नाहींत.

पूर्व आणि पश्चिम आंध्र नाण्यांच्या प्रकारावरून पुढील गोष्टी सुचतात. (१) चष्टन व त्याच्यानंतरचे राजे यांच्या नाण्यांवरील वैशिष्ट्यदर्शक जें `चैत्य’ चिन्ह तें आंध्रांच्यापासून घेतलें आहे. चष्टन घराण्याची तांब्याची नाणीं मूळ आंध्रांपासून घेतली असावींत असें दिसतें. (२) दुसर्‍या नाण्यांची पद्धत व सांचे यांच्यावरून कांचीच्या पल्लवांच्या नाण्यांशीं त्यांचा संबंध होता असें दिसतें.

वर जीं आंध्र नाणीं सांगितलीं ती सर्व शिशाची किंवा तांब्याच्या एका विशिष्ट मिश्रणाचीं आहेत. त्यांच्यावरील कारागिरी उत्तरेकडील नाण्यांपेक्षां फार निराळी आहे. आणि त्यांच्या वजनाच्या प्रमाणाविषयीं कांहींच निश्चयपूर्वक सांगतां येत नाहीं. आणखी एक तिसरा वर्ग आहे; त्याचा नमुना सोपारा येथील स्तूपांत सांपडला. तीं नाणीं रुप्याचीं आहेत. त्यांची कारागिरी व पद्धत ही सुराष्ट्र व माळवा येथील सत्रपांच्या प्राचीन नाण्यांप्रमाणें आहेत. आणि बहुधा दोहोंचेहि वजनाचें प्रमाण सारखेंच असावें. या नाण्यांवर ``सिरियञ गोतमी पुत सातकर्णि’’ ही अक्षरें आहेत.

आंध्र घराण्यांतील कोणते राजे कोणाच्या मागून राज्यावर बसले व केव्हां बसले व कोणतीं नाणीं कोणत्या राजानें पाडली हें अनिश्चित आहे. `रञो गोतमीपुतस विसळि रायकुरस’ ही अक्षरें असलेलीं नाणीं कित्येकांच्या मतें गोतमीपुत्र १ ला शातकर्णी यानें पाडलीं आहेत. तर कित्येकांच्या मतें सिरियञ गोतमीपुत्र दुसरा सातकर्णी यानें पाडलीं आहेत. उलटपक्षीं गोतमीपुत १ ला सातकर्णी याच्यानंतरचा राजा वासिठीपुत पुळुमायि (हा बहुतेक चष्टनाच्या वेळचा असावा) याचीं म्हणून जीं नाणीं आहेत तीं मात्र खात्रीपूर्वक त्याचींच आहेत.

`माढरीपुत व वासिठीपुत श्री वदसत’ ही अक्षरें असलेली नाणीं यांच्या आंध्रांच्या नाण्यामध्यें कोणता काल येतो हें निश्चित नाहीं.

कारवारचे नंद (?) राजे:- कारवारच्या दोन राजांचीं नांवें (चुटुकुळानंद व मुळानंद) वर असलेल्या नाण्यांची पद्धत व कारागिरी हीं आंध्रांच्या मोठ्या नाण्यांप्रमाणेंच आहेत, यावरून बहुधां आंध्राचा व यांचा काल एकच असावा.

गुप्त व तत्कालीन राजे– गुप्त घराण्याचा संस्थापक गुप्त किंवा श्रीगुप्त (इ.स. २६०) आणि त्याचा मुलगा घटोत्कच हे फक्त शिलालेखांत वर्णिलेल्या वंशावळीवरून माहीत आहेत. या घराण्यांतील तिसरा पुरुष पहिला चंद्रगुप्त याच्या कारकीर्दीत नाणीं सुरू होतात. हीं नाणीं यानें पाडलीं नसून याच्या मुलानें पित्याच्या संस्मरणार्थ पाडलीं असें आता समजतात. या वंशांतील राजांची कारकीर्द पुष्कळशी बरोबर रीतीनें ठरवितां येते व त्यांच्या नाण्यांची परंपरा पूर्ण आहे. चंद्रगुप्ताच्या सुवर्ण नाण्यांवरील एका बाजूवर `लिच्छवय:’ हीं अक्षरें व त्याची राणी कुमारदेवी हिचें नांव हीं आहेत.

सार्वभौम गुप्तांची नाणकपद्धति:- राज्यांतील मुख्य भागांतील नाणीं प्रथमत: सुवर्ण व तांबे यांचीं होतीं. नंतरच्या मोठ्या कुशानांच्या पूर्वेकडील टांकसांळीपासून प्रथम या पूर्वेकडील सोन्याच्या नाण्यांचे सांचे घेतले आहेत; परंतु त्यानंतरच्या सुधारणेचें श्रेय मात्र त्यांचें त्यांनांच दिलें पाहिजे, आणि खरोखरच ती नाणीं म्हणजे हिंदुस्थानांतील कलाकुसरीचें एक अत्युत्कृष्ट उदाहरण आहे. सत्रपांचें राज्य आपल्या राज्याला जोडल्यानंतर गुप्तांनीं वर तारीख असलेलें असें एक रुप्याचें नाणें त्या राज्यांत चालू ठेवलें. हें नाणें त्यांच्या पूर्वीच्या राजांच्या नाण्यांसारखेंच होतें; फक्त एका बाजूवर चैत्याऐवजीं गुप्तांचें नेहमींचें चिन्ह मोर याचें चित्र आहे. पुढें त्या राज्याच्या दुसर्‍या भागामध्यें याच नमुन्याचें परंतु निराळ्या कारागिरीचें एक रुप्याचें नाणें पाडलेलें दिसतें. चंद्रगुप्त, दुसरा विक्रमादित्य याच्या रुप्याच्या नाण्यावरील कालासंबंधीं वादच आहे; परंतु त्याच्या नंतरचे राजे पहिला कुमारगुप्त व स्कंदगुप्त यांच्या नाण्यांवरीलसन मात्र अधिक खात्रीचे आहेत.

रोमन लोकांच्या ऑरीपासून कुशानांनीं जें वजनाचें प्रमाण घेतलें तेंच प्रथमत: या सुवर्णनाण्यांमध्यें घेतलेलें दिसतें; परंतु नंतरच्या सुवर्णनाण्यांमध्यें या हिंदुस्थानांतील सुवर्णाचें प्रमाण धरलें आहे (१४६.४ ग्रेन किंवा ९.४८ ग्रॅम) आणि याचें कारण बहुधां प्राचीन भारतीय वजनाच्या प्रमाणाचें पुनरुज्जीवन हें असावें. या दोन्हीं प्रमाणांचीं नाणीं एकदमच प्रचलित असावीं आणि शिलालेखांत आढळणार्‍या `दिनार’ व `सुवर्ण’ या शब्दांनीं त्या दोन नाण्यांमधील भेद दाखविला जात असावा असें दिसतें. स्कंदगुप्ताच्या कारकीर्दीत रोमन लोकांच्या प्रमाणाचा त्याग केला हें खचित, परंतु सुवर्णाचा पुन्हां स्वीकार त्याच वेळी प्रथम करण्यांत आला की त्याच्यापूर्वी करण्यांत आला हें मात्र तितकें निश्चित नाहीं. फारसी प्रमाणाचे अर्धद्रम्म म्हणून सत्रप राजांची नाणीं पाडण्यांत आलीं त्यांचीच नक्कल गुप्तांनीं आपल्या रुप्याच्या नाण्यांमध्यें केल्यानें वजनाचें प्रमाण अर्थात तेंच चालू राहिले.

चंद्रगुप्त, दुसरा विक्रमादित्य याच्या कारकीर्दीत सुराष्ट्र व माळवा या प्रातांत प्रथमत: पाडलेली हीं गुप्तांचीं रुप्याचीं नाणीं यांचाच नमुना पुढील दोन राजांच्या कारकीर्दीत त्या राजाच्या उत्तर व मध्यप्रदेशांतील रुप्याच्या नाण्यांच्या बाबतींत घेतला असावा. ह्या उत्तरेकडील व मध्यप्रदेशांतील रुप्याच्या नाण्यांमध्यें कारागिरी व कुसराई यांमध्यें बराच भेद आहे. मध्यप्रदेशांतील नाणीं जाडीला कमी व अधिक सपाट असून अधिक काळजीपूर्वक केलेलीं आहेत आणि त्यांवरील मोराचा पिसारा अधिक विस्तृत दाखविला आहे. या तर्‍हेचें एक प्रकारचें हलकें तांब्याचें नाणें (परंतु वर रुप्याचा मुलामा असलेलें) बहुतकरून ज्यावेळीं वलभी प्रांत गुप्तांच्या राज्यांतच होता त्यावेळी त्यांमधें पाडलें असावें. त्यावर कुमारगुप्त व स्कंदगुप्त यांचीं नांवें आहेत. परंतु एका बाजूला मोराच्याऐवजीं एक त्रिशूळ आहे. राज्यांतील मुख्य भागांतील तांब्याच्या नाण्यांचा सांचा मागील कोणत्याहि पद्धतीचा नसून बर्‍याच नवीन पद्धतीचा आहे.

उत्तरेकडील गुप्तराजे:- पहिला कुमारगुप्त (महेंद्रादित्य) यानंतर ओळीनें गादीवर आलेले या शाखेंतील तीन पुरुष भितरी येथें सांपडलेल्या मोहोरेवरून कळतात. `प्रकाशादित्य’ ही पदवी असलेलीं नाणीं याच राजाची असतील असें कोणी म्हणतात. वर सांगितलेल्या भितरी मोहोरेवरून कळून येणारा त्याचा मुलगा नरसिंहगुप्त व नाण्यांवरील नर(गुप्त) बालादित्य हे एकच होते असें म्हणतात; विष्णुगुप्त चंद्रादित्य याचीं नाणीं नर(गुप्त) बालादित्य, कुमारगुप्त दुसरा आणि क्रमादित्य यांच्यासारखीं आहेत.

पूर्व माळव्याचे गुप्त:- स्कंदगुप्तापासून झालेली ही शाखा इ.स. ५१० च्या सुमारास विलयास गेली. याचीं उपलब्ध असलेली नाणीं म्हणजे फक्त बुधगुप्ताचें रौप्य अर्धद्राम व होत आणि यांचीं कारागिरी गुप्तांच्या मध्यदेशीय नाण्याप्रमाणेंच आहे.

पूर्व मगधाच्या नंतरचे गुप्त राजे:- उपलब्ध असलेल्या नाण्यांपैकीं कोणती नाणीं या घराण्यानें पाडलीं असावीं याबद्दल शंका आहे. यांची म्हणून पूर्वी प्रसिद्ध असलेली पुष्कळशी वाईट सोन्याचीं नाणीं बहुतकरून उत्तरेकडील शाखेचीं असावीत.

अनिश्चित गुप्तांची नाणीं:- पुढील नाणीं कोणीं पाडलीं याविषयी समाधानकारक माहिती मिळालेली नाहीं :- (१) वीर(सेन किंवा सिंह) क्रमादित्य हें नांव असलेली सोन्याचीं नाणीं; काल बहुधा इ.स. ८ वें शतक; त्यांचें वजन १६०-१७० ग्रेन्स किंवा १०३६ ते ११०१ ग्रॅम्स यांच्यामध्यें आहे, आणि त्यांच्या प्रमाणाचा फारसी व भारतीय फारसी प्रमाणांशी संबंध आहे किंवा नाहीं हें सांगतां येत नाहीं (द्विद्राम= १७२९ ग्रेन किंवा ११२ ग्रॅम; भारतीय= ११० रती= १८२५ ग्रेन किंवा ११८२ ग्रॅम). (२) जय(गुप्त) याची सोन्याचीं नाणीं (३) रुप्याचीं नाणीं (वर्ष १६६= इ.स. ४८५) त्यांच्यावर श्रीहरिकान्त हीं अक्षरें आहेत. (४) (श्री) महाराज्ञी (ह) रिगुप्तस्य हीं अक्षरें असलेलीं तांब्याचीं नाणीं.

पश्चिममगधाच्या मौखरिघराण्याची नाणीं- शिलालेखांवरून हे व पूर्व मगधाच्या नंतरचे गुप्त हे समकालीन असून एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते असें दिसतें. मध्यदेशीय नाण्यांवरून घेतलेलीं यांची रुप्याचीं नाणीं उपलब्ध आहेत व त्यांच्यावर या घराण्यापैकीं दोन पुरुषांची नांवें आहेत (ईशानवर्मन्- स. ५४ व ५५ व त्याचा मुलगा शर्ववर्मन् स. ५८). तसेंच सूर्यवर्मन्, अंतवर्मन्, इत्यादींहि नांवाचीं नाणीं सांपडली आहेत. अशींच `शिलादित्य’ म्हणून नांव असलेलीं नाणीं आहेत तीं प्रसिद्ध हर्षवर्धन याचीं असावींत.

वलभी:- उलट्या बाजूवर `त्रिशूळाचें’ चित्र असलेलीं कांहीं रुप्याचीं नाणीं वलभीच्या राजांनींच पाडलीं असें म्हणतात; त्यांवरील लेख कोणत्या तरी वाईट अक्षरांमध्यें लिहिलेले आहेत; ती अक्षरें पूर्ण अशी ओळखतां येत नाहींत. परंतु त्यांमध्यें भट्टारक ही पदवी आलेली दिसते. गुप्तांच्या रुप्याच्या नाण्यांचा पश्चिमेकडील नमुना वरील नाण्यांमध्यें घेतलेला दिसतो.

भीमसेन:- याच्या नाण्यांवर कारागिरी व लेखाची तर्‍हा यांमध्यें मध्यदेशीय गुप्तांची पद्धत दिसून येते; त्यांच्यावरील तारखा (किंवा मित्या) निश्चयात्मक रीतीनें वाचतां येत नाहींत, परंतु त्यांचा शक व तोरमाणाच्या तसल्याच नाण्यांवरील शक हे एकच असावेत.

कृष्णराज:- या नाण्यांची कारागिरी पश्चिमेकडील गुप्तांसारखी आहे व ती मुंबई इलाख्यांतील नाशीक जिल्ह्यांमध्यें सांपडतात, आणि ती वरील कृष्णराज नांवाच्या एका राष्ट्रकूट (इ.स. ३७५- ४००) राजानें पाडलीं असें म्हणतात; परंतु हीं नाणीं या प्रांतांत प्रचलित असलेल्या अगदी अलीकडच्या गुप्तांच्या नाण्यांपासून घेतलेली आहेत, आणि त्यांच्या पद्धतीवरून वरील कालाच्या तीं फार नंतरची असावींत असें दिसतें म्हणून तीं कोणी पाडलीं याविषयीं वरील समजूत चुकीची आहे असें दिसते. त्याच कारणामुळें अधिक प्रसिद्ध जो कृष्णराज राष्ट्रकूट (इ.स. ७५६) याच्या कालामध्येंहि तीं असणें अशक्य आहे. म्हणून तीं कोणी पाडलीं हें सध्यां अनिश्चित आहे. कोणी म्हणतात कीं तीं कृष्णराजा कलचुरि याचीं आहेत हें निश्चित झालें आहे.

नरवरचे नऊ नाग:- पुराणांमध्यें पद्मावतीचें पवाया (ग्वाल्हेर संस्थान) नाग व मगधाचे गुप्त यांची सांगड घातली आहे. या घराण्यांतील सहा पुरुषांचें पूर्ण नांव नाण्यांवर आढळतें परंतु दुसर्‍या दोघांचीं फक्त पुसट पुसट नांवेंच दिसतात. वरील नाण्यांसारखींच दुसरीं कांहीं नाणीं आहेत व त्यांच्यावर `अच्यु’ हीं अक्षरें आहेत, आणि नि:संशय अलाहाबाद येथील शिलालेखांत जो अच्युत आहे त्यानेंच तीं पाडलीं असावींत. हा अच्युत नागराजांपैकीं एक असावा हें शक्य आहे.

पारिव्राजक महाराजे:- गुप्तांच्या या दोस्त राजांनीं डभाल (लहान) आणि अठरा वनराज्यांचा प्रदेश यांवर राज्य केलें. `रात्रहस्ति’ हीं अक्षरें वर असलेलीं कांहीं नाणीं महाराज हस्तिन् यानें पाडलीं असावीं. त्याच्या लेखांमध्यें १५६ ते १९१= स. ४७५-५१० हे सन आहेत. `विग्रह’ हीं अक्षरें वर असलेलीं कांहीं लहान नाणीं आहेत. त्यांचा आकार व कारागिरी वरील नाण्यांच्याप्रमाणेंच आहे. माणिक्याला स्तूपांत जनरल व्हेंचुराला या नाण्यांचे कांहीं नमुने व इ.स. ७ व्या व ८ व्या शतकांतील नाणीं सांपडलीं.

हूण:- हिंदुस्थानावर स्वारी करणारे हूण एप्थलाइट्स किंवा गोरे हूण या लोकांच्या पोटजातींपैकीं एक होत.

हूण नाणीं:- या नाण्यांचा ठळकपणे दिसून येणारा विशेष म्हणजे हा कीं त्यांच्यामध्यें नवीनपणा कांहीं नाहीं. तीं नाणीं बहुतेक सस्सानियन्, कुशान किंवा गुप्त यांच्या नाण्यांवरून घेतलीं आहेत, किंवा त्यांमध्यें यांची हुबेहुब नक्कल तरी केली आहे. म्हणून तीं नाणी म्हणजे हूणांच्या स्वार्‍यांचा विस्तार व सुधारणा यांच्याविषयीं सबळ पुरावे आहेत. सस्सानियन कारागिरीचीं जीं पातळशी नाणीं आहेत तीं अर्थात् सर्वांत प्राचीन होत; आणि त्यांतील ज्या नाण्यांवर सिसयो- सस्सानियन् नाण्यांवर दिसून येणार्‍या ग्रीक मूळाक्षरांच्या पद्धतीप्रमाणें अक्षरें आहेत तीं नागरी लेख असलेल्या नाण्यांपेक्षां नि:संशय अधिक पूर्वीचीं आहेत आणि कदाचित् अंशत: तरी हिंदुस्थांतील एप्थलाइटस लोकांच्या स्वारीपूर्वी, त्यांनीं (म्ह. एप्थलाटसनी) चालू केलेलीं असावींत. या पूर्वीच्या हूण नाण्यांपैकीं (उ. ज्यांवर `पाहिजावुव्ल:’ असें नांव आहे तीं) बरीचशीं, सस्सानियनांची पातळ नाणीं आयतींच घेऊन त्यांवर हूणांच्या पुढार्‍याचा मुखवटा, छापावर नाणें ठोकून उठावांत उमटविला आहे; त्यामुळें उलट्या म्हणजे खोलगट बाजूवरील ठसा- सस्सानियन् अग्निकुंड- जवळ जवळ नाहींसा झाला आहे. यानंतरची नाणीं पाडतांना याच नाण्यांचा नमुना पुढें ठेवला गेला असला पाहिजे यांत संशय नाहीं.

या लोकांची दुसरीं कांहीं नाणीं प्रचलित सस्सानियन् नाण्यांची, त्यांतल्या त्यांत फीरूझच्या कारकीर्दीतील उत्तर भागामध्यें निघालेल्या नाण्यांचीं (इ.स. ४७१-४८६) केवळ प्रतिमा आहेत. मूळ नाण्यांबरहुकुम जवळजवळ असणारीं पहिली नकलीं नाणीं पुष्कळशीं मारवाडमध्यें आढळतात, व ती तोरमाण (इ.स. ४९०-५१५) याचीं असावींत. हा जो सस्सानियन् नमुना हिंदुस्थानांत सुरू केला गेला तो पुढें ३००-४०० वर्षांमध्यें गुजराथ, राजपुताना व अंतर्वेदि यांमधील नाणकपद्धतींत प्रमुख होऊन बसला. पूर्व माळव्यांतील नंतरच्या गुप्त राज्यावरील (किंवा सर्व गुप्त साम्राज्यावरील) हूणांच्या स्वारीचा पुरावा तोरमाणाच्या रौप्य अर्धद्रामावरून मिळतो. हे अर्ध-द्राम अथवा द्रम्म म्हणजे बुधगुप्ताच्या अर्धद्रामाची सूक्ष्मरीतीनें नक्कल केली आहे. फक्त सुलट्या बाजूवरील राजाच्या मुखवट्याची दिशा उजवीकडे नसून डावीकडे आहे. या नाण्यांवरील सन ५२ हा आहे. परंतु तो कोणत्या कालमानास धरून आहे हें मात्र समाधानकारक रीतीनें ठरविलेले नाहीं. तोरमाणाच्या अर्धद्रामाच्या शकासंबंधीं बरेच मतभेद होते.

तोरमाणाचा मुलगा मिहिरकुल त्याच्यानंतर गादीवर बसला. त्याच्या रौप्य नाण्यांची कारागिरी सस्सानियन् कारागिरीसारखी आहे. तोरमाण व मिहिरकुल या दोघांच्याहि तांब्याच्या नाण्यांवर सस्सानियन व गुप्त यांच्या नाणकपद्धतीचा एकदमच परिणाम झालेला दिसतो. हीं मुख्यत्वेंकरून पूर्वपंजाब व राजपुताना यांमध्यें आढळतात, आणि कित्येक अशी उदाहरणें आढळतात कीं मिहिरकुलाचे सांचे व लेख तोरमाणाच्या नाण्यांवर उमटविले आहेत. हूण तोरमाणाची नाणीं म्हणून ज्यांनां म्हणतां येईल अशा तांब्याच्या नाण्यांचा हाच एक वर्ग आहे. परंतु मिहिरकुलाचे दुसर्‍याहि नाण्यांचे वर्ग प्रसिद्ध आहेत. यांपैकी एका वर्गावर कुशानांचा नेहमींचा सांचा आहे; परंतु दुसर्‍या एका वर्गावरील सांचे कोणापासून घेतले आहेत याची तितकी खात्री नाहीं.

पुष्कळ प्रकारचीं अशीं हूण लोकांची नाणीं सांपडतात कीं त्यांच्यावर जीं पूर्ण किंवा अर्धवट नांवें असतात ती दुसरीकडे कोठेंहि आढळत नाहींत. एकापेक्षां अधिक अशी हूणांची घराणीं एकाच वेळी राज्यावर असतील हें शक्य आहे; किंवा राज्याच्या निरनिराळ्या प्रांतावर अंमल चालविणार्‍या सुभेदारांनीं तीं नाणीं पाडलीं असावींत. हूणांच्या नाण्यांची कालमर्यादा इ.स. ५४४ पर्यंत आहे.

हूण किंवा पर्शियन यासंबंधीं अनिश्चितता:- कांहीं सुप्रसिद्ध नाणीं कोणत्या राष्ट्रामध्यें झालीं हें बरोबर ठरवितां येत नाहीं. त्यांच्या पातळपणावरून व त्यांच्या उलट्या बाजूवरील अग्निकुंडावरून तीं सस्सानियनांचीं असावींत असें दिसतें. म्हणून त्यांचे कांहीं गुण हूणांच्या नाण्यांशीहि जुळतात आणि कांहीं पंजाब व सिंध येथील पर्शियन राजांच्या नाण्यांशीहि जुळतात. या संशयित नाण्यांच्या वर्गांपैकीं `नष्कीमल्क’ ही अक्षरें वर असलेला वर्ग फार प्रसिद्ध आहे.

पूर्व, पश्चिम, उत्तर व मध्य हिंदुस्थानांतील कांहीं नाणीं, व पंजाब व सिंध येथील पर्शियन राजे:- हिंदुस्थानांतील कांहीं नाणीं वायव्य भागांत सांपडतात. त्यांचा सांचा व कारागिरी हीं सस्सानियनांच्या सारखीं आहेत. त्यांच्यावर नागरी, सस्सानियन, पह्लवी, व अद्यापपावेतों न वाचतां आलेल्या एका लिपींतील अक्षरें आहेत. ही शेवटली लिपी सिथो-सस्सानियननांनीं उपयोगांत आणलेल्या ग्रीक लिपीचें नंतरचें रूपांतर असावें. हीं अक्षरें नंतरच्या हूणांची आहेत, असें कोणी म्हणतात, पण याला पुरेसें कारण नाहीं. तीं बहुतांशीं सिंध व मुलतान यांवर राज्य करणार्‍या कोणत्यातरी सस्सानियन घराण्यानें किंवा घराण्यांनीं पाडली असावींत, हें नाण्यांच्या पद्धतीवरून व सस्सानियन पह्लवीलिपीच्या उपयोगावरून दिसून येतें श्री वासुदेव हें नांवच फक्त नागरीमध्यें असलेलें व बाकीचीं सर्व अक्षरें पह्लवीमध्यें असलेल्या एका नाण्याचा काल, दुसरा खुश्रु (परवीज) याच्या कारकीर्दीतील ३७ व्या (म्हणजे इ.स. ६२७) वर्षी त्यानें पाडलेल्या नाण्यांशीं असलेल्या वरील नाण्याच्या सादृश्यावरून साधारणत: ठरविला जातो. तसेंच शाहितिगिनच्या नाण्यावर नागरात `हितिवि च ऐरान च परमेश्वर’ (हिंदुस्थान व इराण यांचा राजा) व सस्सानियन पहलवीमध्यें `तकान खोरासान मल्का’ (पंजाब व खोरासान यांचा राजा) ह्या पदव्या आहेत. त्या नाण्यांचा वासुदेवाच्या नाण्यांशीं व वर सांगितलेल्या दुसर्‍या खुश्रूच्या विवक्षित नाण्यांशीं निकटचा संबंध आहे. कारण त्याच्या मागील बाजूवरील ठसा- ज्याच्या योगानें मुलतान येथील सूर्यदेवता दर्शविली जाते अशी समजूत आहे तो एकच आहे. या इंडो-पर्शियन वर्गांतील दुसरीं नाणीं कोणी पाडलीं व त्यावरील अक्षरांचा अर्थ काय याविषयी पूर्ण खातरी नाही परंतु त्यांचा देश व काल दुसर्‍या नाण्यांच्याप्रमाणेंच असावा असें दिसतें.

कनोज (कान्यकुब्ज):- कनोजच्या मध्यकालीन राज्यांतील पुढील घराण्यांपैकीं राजांची नाणीं उपलब्ध आहेत:-

(१) रघुवंशी घराणें-
श्रीमदादिवराह ही अक्षरें असलेलीं रौप्यनाणीं भोजदेवानें पाडलीं होतीं (इ.स. ८५०-९००).

(२) तोमर घराणें:- या घराण्यांतील राजांच्या ताब्यांत प्रथम कनोज व दिल्ली ही दोन्हीं होतीं, परंतु इ.स. १०५० मध्यें कनोजवर राठोडांनीं स्वारी केल्यानंतर दिल्ली एकटीच त्याच्या ताब्यात राहिली असें दिसतें, यांच्या सोन्याच्या नाण्यांचा सांचा कलचुरी नाण्यांप्रमाणें आहे; हलक्या रुप्याच्या नाण्यांचा घांट गंधार येथील ब्राह्मणशाही राजांच्या नाण्यांप्रमाणें आहे.

(३) राठोड (गाइडवाल अथवा गढवाल) घराणें:-  मदनपाल देव (इ.स. १०८०) याच्यापासून नाण्याची परंपरा सुरू होते आणि तिच्यामध्यें इ.स. ११९३ पर्यंत राज्य करणार्‍या दोन राजांचीं नाणीं येतात. या नाण्यांचे सांचे तोमर घराण्यांतील सांच्याप्रमाणेंच आहेत.

(४) मगध येथील पाल घराणे:- या घराण्याचीं अशीं खात्रीचीं नाणीं प्रसिद्ध नाहींत; श्रीविग्रह हें नांव असलेली सस्सानियनांपासून घेतलेलीं नाणीं इ.स. ९१० तील मगधाचा राजा पहिला विग्रहपाल याचीच असतील हें असंभवनीय नाहीं.

काश्मीर:-
कनिष्कानें पाडलेल्या नाण्यापासूनच बहुधां काश्मीर नाण्यांच्या सांच्याचा उगम झाला असावा; आणि या वेळेपासून ते १३ व्या शतकांत मुसुलमानांनीं जेव्हां काश्मीर जिंकलें तेव्हांपर्यंत हे नाण्यांचें सांचे- एका बाजूला बसलेला उभा राजा व दुसर्‍या बाजूला बसलेली देवता- न बदलतां तसेच राहिले. या कालांतील कारागिरीइतकी ओबडधोबड आहे कीं, पहिल्या संशोधकांनीं त्यावरील आकृतीचा भलताच अर्थ लावला.

कनिंगहॅमच्या न्युमिस्मॅटिक क्रॉनिकलमध्यें उल्लेखिलेली हूणांची काश्मिरी नाणीं किदार कुशानांच्या नाण्यासारखीं दिसतात. आणि ह्या नंतरच्या नाग किंवा ककोंटक घराण्याच्या सर्व नाण्यांवर किदार हें नांव आहे. काश्मीरच्या हर्षाच्या कांहीं सुवर्णनाण्यांवर (इ.स. १०९०) दक्षिण हिंदुस्थानांतील नाण्यांची हुबेहुब नक्कल केली आहे.

नेपाळ:- नेपाळचीं अत्यंत प्राचीन नाणीं तांब्याचीं आहेत आणि त्यांच्यामध्यें यौधेय नाण्यांपैकीं दुसर्‍या वर्गाच्या नाण्यांमध्यें कांहींसें साम्य आहे. या साम्याचें कारण तीं दोन्ही एकाच कुशानांच्या नाण्यापासून घेतली हें असावें. त्यांचा काल इ.स.च्या ५ व्या शतकाच्या आरंभापासून ते ७ व्या शतकाच्या शेवटापर्यंत आहे. ज्याच्यावर मानांक हें नांव आहें तीं मानदेववर्मनची (इ.स. ४२५) आहेत असें म्हणतात आणि ज्यांच्यावर गुणांक हें नांव आहे तीं त्याच्या नंतरचा राजा गुणकामदेववर्मन् (इ.स. ४५०) याचीं आहेत असें समजतात. ही नांवें फक्त नाण्यांवर व तद्देशीय घराण्यांच्या यादींतच आढळतात; शिलालेख किंवा दुसरा कोणताहि कालनिश्चय झालेला लेख यांमध्यें त्यांचा अद्यापि कोणताच उल्लेख असलेला आढळत नाहीं, म्हणून जे सन दिलेले आहेत ते सरासरी बरोबर आहेत. अंशुवर्मन् आणि विष्णुगुप्त नाण्यांचा काल मात्र अधिक खात्रीचा आहे, कारण सातव्या शतकांतील शिलालेखांवरून हे दोन्ही राजे प्रसिद्ध आहेत. पशुपति व वैश्रवण हीं नांवें असलेल्या नाण्यांचा काल बरोबर सांगता येत नाहीं. हीं देवतांचीं नांवें आहेत, आणि तीं नाणीं कोणीं पाडलीं हें सांगता येत नाहीं; परंतु त्यांची पद्धत व कारागिरी यांवरून ती व दुसरी तत्सदृश नाणी एकाच कालांतील होतीं हें दिसून येईल.

काबूलशाही नाणें:- या नाण्याचा कालवर्ग पुढीलप्रमाणें करतां येईल:- (१) प्राचीन कुशानांचीं नाणीं, (ख्रि.पू. २५ ते शक इ.स. १८०). (२) यांच्यासारखींच नंतरची नाणीं, यांच्यावरूनच हिंदुस्थानावर स्वारी करणार्‍या सस्सानियन लोकांनीं (इ.स. ३००-४५०) नाणीं पाडलीं. (३) गांधार काबीज करणारा किदार कुशान याचीं नाणीं (इ.स. ४२५-४७५). परंतु किदार कुशानांच्या गंगाधरच्या राज्यामध्यें हीं नाणीं पाडलीं कीं काश्मीरच्या राज्यामध्यें पाडलीं याचा संशय आहे. (४) गंधारमध्यें पाडलेलीं हूणांचीं नाणीं (इ.स. ४७५-५३०), या नाण्यावर `षाहि’ या पदवीचा उपयोग याच कारणांमुळे केला असावा. (५) हूणांच्या नंतर इ.स. ६३० मध्यें जेव्हां ह्युएनत्संग आला होता, त्या वेळी गंधारचा राजा एक क्षत्रिय होता. यावरून असें दिसतें कीं, कुशान घराणें हिंदु बनलें. या कालांतील नाणीं कोणतीं असावींत हें सांगता येत नाहीं. कदाचित नंतर ज्यांमध्यें कुशान साचाची ओबडधोबड नक्कल केली होती ती तांब्याचीं नाणीं या कालांतील असावीत. (६) अल्बेरूणी असें म्हणतो कीं एका ब्राह्मण वजीरानें किंवा प्रधानानें राज्य बळकावून घेतलें आणि घराण्याची स्थापना केली. ज्या नाण्यांनां त्यांच्यामधील प्रमुख दिसणार्‍या सांचावरून, `बैल आणि घोडेस्वार सांच्याचीं नाणीं’ असें नांव दिलें होतें तीं नाणीं याच ब्राह्मणी घराण्यांतील निरनिराळ्या पुरुषांनीं पाडली असें म्हणतात (इ.स. ८६०-७०). (७) यानंतरच्या अवशिष्ट कालांत म्हणजे गझनीच्या महंमदाकडून घराण्याचा नाश होईपर्यंत (इ.स. ९५०-१०२६) निरनिराळ्या राजांची नांवें शिलालेखावरून कळतात पण त्या राजांची अशीं कोणतींच नाणीं प्रसिद्ध नाहींत.

डहालाचे कलचुरी:- या वंशांतील मध्यकालीन राज्यांतील गांगेयदेव नांवाच्या एकाच राजाचीं नाणीं उपलब्ध आहेत (इ.स. १००५-१०३५). या नाण्याच्या एका बाजूवर बसलेल्या देवतेचा पूर्वीपासून चालत आलेल्या नमुन्याचा ठसा आहे, परंतु दुसरी सर्व बाजू राजाच्या नामाक्षरांनीं भरून गेली आहे. त्याचीच नक्कल जेजाकभुक्तीचे चंदेल, दिल्लीचे तोमर आणि कनोजचे राठोड यांनी केली.

महाकोसलाचे कलचुरी:- यांतील ३ राजांची नाणीं उपलब्ध आहेत. डहालाच्या कल्चुरींच्या नाण्यांप्रमाणें या नाण्यांवरील एका बाजूवर नुसतीं अक्षरें आहेत परंतु दुसर्‍या बाजूला बसलेल्या देवतेचा ठसा दिसून येत नाहीं.

जेजाकभुक्ति (अथवा महोबा) येथील चंदेल:- यांमध्यें जे ९ राजे झाले त्यांपैकी ७ राजे नाण्यांवरून कळून येतात. ती नाणी डहालच्या कलचुरींच्या नाण्यावरून बेतली आहेत.
दिल्ली व अजमीरचे चव्हाण :- ज्या चव्हाणांच्या नाण्यांवरील नांवें नीट वाचतां येतात तीं, शेवटचे दोन राजे सोमेश्वर व पृथ्वीराज (इ.स. ११६२ व ११९२) यांचीं आहेत. चव्हाणांच्या नाण्यांचा सांचा `बैल व घोडेस्वार’ हाच आहे. तोच पुढें कांहीं पिढ्या दिल्लीच्या सुलतांच्या नाण्यांमध्यें चालू राहिला. नरवर नंतरच्या रजपूत नाण्यांवरून इ.स. १२३० ते १२९० पर्यंतच्या ६ राजांपैकीं राजे ४ कळून येतात. यावरील सन विक्रमादित्यसंवतांतील आहेत.

कांगडा:- येथील राजांच्या नाण्यांचा काल हा बहुधां इ.स. १३३० ते १६१० यांमधील असावा. त्यांचा येथें निर्देश करण्याचें कारण एवढेंच कीं मुसुलमानांच्या स्वारीनंतर `बैल व घोडेस्वार’ या सांचाचीं जीं नाणीं पुढें पुष्कळ शतकें अस्तित्वांत राहिलीं त्या नाण्यांचें हें एक उदाहरण आहे.

अनिश्चित व अनामक नाणीं:- सतलजपासून पूर्वेकडे काशीपर्यंत व हिमालयापासून दक्षिणेकडे नर्मदेपर्यंत खाली दिलेल्या तीन प्रकारचीं नाणीं पुष्कळच सांपडतात.

(१) सस्सानियन तर्‍हेची पातळ रुप्यांचीं नाणीं खरोखरीच्या सस्सानियन नाण्यांची ज्या नाण्यांमध्यें नुसती ओबडधोबड नक्कल केली आहे ती- बहुतांशीं हूणांचीं आहेत असें म्हणतात. यानंतरचीं जीं त्यांच्यासारखीं नाणीं आहेत तीं मूळच्या नाण्यांहून बरींच निराळीं आहेत; त्यांच्यामध्यें पूर्वीच्या नाण्यांची नक्कल तितकी अस्सल नाहीं, व जाडपणाहि थोड्या वाढत्या प्रमाणावर आहे; तीं बहुधां हिंदुस्थानांतीलच असावीं. पण तीं कोणत्या घराण्याचीं असावींत हें मात्र सांगता येत नाहीं. तीं गंगेकडील प्रदेशांत आढळतात, परंतु मेवाड- मारवाड व सर्व राजपुताना `यांमध्यें तीं अधिक’ प्रमाणांत आढळून येतात. तीं दुसर्‍या वर्गांतील नाण्यांच्या अगोदर तरी झालीं असावीं, किंवा त्यांचा एकमेकांशीं कांहीं संबंध नसून तीं दोन्ही फक्त एकाच मूळ सांच्यावरून घेतलीं असावींत. या दोन्ही वर्गांतील नाण्यांचें वजन सारखेंच आहे. आणि ज्या अर्थी कित्येक नाण्यांचें ६० ते ६५ ग्रेन किंवा ३.८ ते ४.२ ग्रॅम इतकें वजन भरतें त्याअर्थी ती बहुतेक मूळच्या सस्सानियन नाण्यांप्रमाणें ग्रीक द्रामापासून घेतलीं असावींत. कांहीं नाण्यांवर ह किंवा ज हीं अक्षरें आहेत, आणि कनिंगहॅमचें म्हणणें असें आहे कीं, कनोजच्या हर्षवर्धनाच्या नांवांतील ह हें तें आद्याक्षर असावें. कनोजच्या भोजदेव (किंवा श्रीमदादिवराह) याच्या नंतरची नाणीं, यांची कारागिरीसुद्धां तशीच आहे व बहुतेक तीं नाणीं त्याच मूळ नाण्यांवरून (सस्सानियन) घेतली असावींत. कनिंगहॅमचें असेंहि म्हणणें आहे कीं ज्यांच्यावर `श्री विद्मह’ हें नांव आहे तीं भोजदेवाच्या नंतरच्या कोणत्या तरी राजानें पाडलीं असावीं; परंतु मगधाच्या पहिल्या विग्रहपालाचीं तीं असावींत हें अधिक संभवनीय दिसतें.

(२) रुप्याचीं जाड नाणीं सस्सानियन सांचांतून काढिली आहेत. परंतु त्यांची कृति इतकी बिघडलेली आहे कीं, त्यांच्यामध्यें व मूळ नाण्यांमध्यें फारच थोडा सारखेपणा दिसून येतो. त्यांनां पैसा `गंधिया’ किंवा `गधैया’ (सस्सानियन राजाच्या मुखवट्याचें रूप या नाण्यांवर गाढवासारखें भ्रष्ट दिसतें म्हणून) असें म्हणतात. आणि कनिंगहॅमच्या मतें तीं व जौनपूरच्या शिलालेखांतील षडबौद्धिक द्रम्म हीं एकच आहेत. ती नैऋत्य-राजपुताना, मेवाड व माळवा व गुजराथ या प्रांतांत आढळतात. त्यांच्या सुलट्या बाजूवरील सांचावरून त्यांचा दुसर्‍या एका वर्गांतील नाण्यांशीं संबंध दिसून येतो; त्या वर्गांतील नाण्यांच्या उलट्या बाजूवर विकृत अशा अग्निकुंडाऐवजी सोमलदेव हें नांव आहे व सुलट्या बाजूवर घोडेस्वाराचा सांचा (बहुधां गांधार येथील ब्राह्मणशाहीपासून घेतलेला) असलेल्या नाण्यांवरहि तेंच नांव आहे.

(३) अतिशय ओबडधोबड कारागिरांची तांब्याचीं नाणीं हीं बहुधां नंतरच्या कुशानांच्या नाण्यांची प्रतिकृति असावी. सुलट्या बाजूला उभ्या असलेल्या राजाचें चित्र आहे. उलट्या बाजूला शिव आणि नंदी यांचे चित्र आहे. परंतु कारागिरी इतकी वाईट साधलेली आहे कीं, त्यांच्या सुलट्या बाजूवर सस्सानियन अग्निकुंडच आहे असें पुष्कळदा समजतात. कनिंकहॅमची अशी समजूत आहे कीं, इ.स. ५०० ते ८०० शतकांतील पंजाब व राजपुताना यांतील प्रचलित तांब्याचीं नाणीं ती हींच असावींत.

दक्षिण हिंदुस्थानांतील नाणीं:- उत्तर हिंदुस्थानांतील नाण्यांच्या इतिहासांत वारंवार होणार्‍या परकीय लोकांच्या स्वार्‍यांच्या योगानें, पुष्कळच महत्त्वाचे भाग सहजीं पडतात. पण तसे दक्षिणहिंदुस्थानांतील नाण्यांच्या इतिहासांत पडत नाहींत. येथे वर अक्षरें लिहिलेल्या नाण्यांचे प्रमाण कमी आहे व त्यांचे वर्गीकरण, त्यांच्या नमुन्यांचे प्राप्तिस्थल, कारागिरीची तर्‍हा व सांचांची पद्धत, यांवरच पुष्कळसे अवलंबून आहे. शिवाय जसे उत्तरेकडील नाण्यांच्या पद्धतशीर अभ्यासानें महत्त्वाचें ऐतिहासिक शोध लागले आहेत तसें त्यांचें सशास्त्र विवेचन अजून झालेलें नाहीं. या पूर्वीची ठसे-पद्धत उत्तरेपेक्षां दक्षिणेमध्येंच अधिक कालपर्यंत होतीं असें दिसतें; आणि कांहीं अशी उदाहरणें आहेत कीं, तेथील नाणकपद्धतींत नंतर सुधारणा म्हणून जी झाली ती नाणें पाडण्याची परकीय पद्धत स्वीकारून झाली नाही, तर पूर्वीच्याच पद्धतीची वाढ म्हणून झाली.

पुष्कळशी रोमन रौप्य व सुवर्णनाणीं दक्षिणहिंदुस्थान व सिलोन (लंका) यांमध्यें सांपडतात; आणि ती बहुधां त्याच प्रांतामध्यें प्रचलित नाणीं म्हणून उपयोगांत आलीं असावींत आणि उत्तरेमध्यें रोमन लोकांच्या सोन्यांच्या नाण्यांचें बरेचसें सोनें कुशानांच्या मोठ्या सुवर्ण नाण्यांच्या उपयोगी पडलें असावें (मिरी, तांदूळ, मसाले, चंदन, बैडूर्यादि मणि यांच्या मोबदला ही नाणीं रोमन व्यापारी देत असत असें दिसते).

पांड्य:- प्राचीन अशा ठसेमुद्रित नाण्यांनंतर इतर ठिकाणांप्रमाणें पांड्य देशांतील नाण्यांचा आकार समचौकोनी असून एका बाजूवर हत्तीचा छाप किंवा सांचा आहे व तो मुशींतून उठविलेला दिसतो. याच्या नंतरच्या नाण्यांवर दोन्ही बाजूंवर हत्तीचे छाप आहेत. दक्षिण हिंदुस्थानांतील रीतिरिवाजाप्रमाणें मुख्य मुख्य प्रकारच्या नाण्यांवर कांहीं सांकेतिक चिन्हांनीं ऐतिहासिक गोष्टींचा निर्देश केला जातो हें सिद्ध आहे व या चिन्हांच्या बदलणार्‍या संख्येवरून कालनिर्णयास एक साधन मिळणें संभवनीय आहे. हीं नाणीं इ.स. ३०० च्या पूर्वीच्या कालांतील असावीं, आणि त्यांची पद्धत व कारागिरी आणि आंध्र आणि पल्लव नाण्यांची पद्धत व कारागिरी यांमध्यें जें साधारणपणें साम्य दिसून येतें त्यांवरूनहि वरील कालमर्यादा शक्य आहे असें दिसतें.

इ.स. ३००-६०० यामधील पांड्यांचीं नाणीं कोणतीं असावींत याविषयीं बरीच अनिश्चितता आहे. सर्व पांड्यांचें, नंतरचें चिन्ह जो `मासा’ तो वर असलेली सोन्याचीं नाणीं इ.स. ७-१० या शतकांतील असावींत असें म्हणतात. नंतरच्या ताम्र नाण्यांवर (म्हणजे १०५० च्या सुमारास) चोल राजांनीं पांड्यांचें राज्य घेतलें त्याचा परिणाम झालेला दिसतो.

चेर:- इ.स. ८७७ तील चोळांच्या स्वारीपूर्वीच्या चेर घराण्याच्या अत्यंत भरभराटीच्या कालांत अमकीं चेरांचींच नाणीं असें सांगता येत नाहीं. या सनानंतर ज्या कित्येक प्रांतांवर चेरांची सत्ता होती व ज्यांच्यावर त्यांनी सुभेदार नेमले होते ते प्रांत स्वतंत्र झाले. अशा प्रांतांपैकीं दोन प्रांतांत पाडलेलीं नाणीं प्रसिद्ध आहेत.

(१) कोंगु देश:- ज्या सुवर्ण व ताम्र नाण्यांवर चेरांचें चिन्ह `धनुष्य’ व इतर चिन्हें सांपडतात तीं नाणीं या प्रांतातील आहेत असें म्हणतात. या सोन्याच्या नाण्यांवरील हत्तीचा छाप मुख्य आहे आणि ज्याअर्थी काश्मीरच्या हर्षदेवानें त्यांची नक्कल केली आहे त्याअर्थी त्यांचा काल इ.स. १०९० पूर्वीचा असावा. ह्या नाणकपद्धतीचा निर्देश काश्मीरच्या राजतरंगिणीमध्यें केलेला उगड उघड दिसून येतो.

(२) केरळ:- या प्रांतावर राज्य करणार्‍या घराण्याचें एक नाणें ब्रिटिश म्युझियममध्यें आहे, व त्यावर ११ व्या किंवा १२ व्या शतकांतील नागरी लिपीमध्यें `श्री वीरकेरलस्य’ हीं अक्षरें आहेत.

चोल:- दक्षिण हिंदुस्थानांत ज्यावेळीं चोल हे सार्वभौम राजे झाले होते त्यावेळचीं हीं सर्व नाणीं आहेत. त्यांचे दोन वर्ग होतात. – (१) इ.स. १०२२ च्या पूर्वीची म्हणजे राज- राज चोल याचें राज्य सुरू होण्यापूर्वी : या नाण्यांवरून असें दिसतें की, चोल हे अगोदरच बलाढ्य होत चालले होते. चोलांच्या निशाणावर मध्यें व्याघ्र असून त्यांच्या दोन्ही बाजूस पांड्य व चेर यांचीं चिन्हें मासा व धनुष्य हीं आहेत. नाण्यांवरील अक्षरें नागरीमध्यें आहेत आणि तीं चोल राजांचीं नांवें किंवा पदव्या आहेत. परंतु तीं नावें व घराण्यांच्या यादींतील नांवें एकच आहेत किंवा नाहींत या विषयीं मात्र मतभेद आहे. (२) इ.स. १०२२ नंतरची, राजराजाच्या राज्याबरोबर एक अगदी निराळ्या सांचाचें नाणें येतें. सुलट्या बाजूवर उभ्या राजाचें चित्र व उलट्या बाजूला बसलेल्या राजाचें, चोलांच्या सत्तेच्या विस्ताराबरोबरच या पद्धतीच्या  नाण्यांचा दक्षिणहिंदुस्थानांतील बर्‍याचशा भागांत प्रसार झाला. चोलांनीं जेव्हा सिंहलद्वीप घेतलें तेव्हां अर्थात वरील नाण्यांचा उपयोग तेथेंहि होऊं लागला आणि कँडीच्या स्वतंत्र राजांनीहि तींच नाणीं पुढें चालू ठेवलीं. त्यांपैकीं एक प्रकारचीं पातळ सोन्याची, पाठीमागून ठोकून बनविलेलीं नाणीं (पूर्वेकडील चालुक्य, चालुक्यचंद्र व दुसरा राजराज यांच्या नाण्यासारखीं) चोळ राजाचीं (बहुधां कुलोत्तुंग पहिला चोल इ.स. १०७० याचीं) आहेत म्हणतात.

सिलोन किंवा सिंहलद्वीप:- कँडीच्या राजांनीं आपल्या पूर्वीच्या चोल राजांच्या नाण्यांची पद्धत विशेष फेरफार न करतां स्वीकारली होती. त्यांच्या नाण्यांचा काल स. ११५३ ते १२९६ हा आहे. या कालाच्या पूर्वी सिंहलद्वीपामध्यें जीं नाणीं प्रचलित होतीं त्यांचा विशेष असा कोणताच नाहीं. ती पूर्वीच्या ठसेपद्धतीचीं तरी असावीं, किंवा परकीय व्यापार किंवा स्वार्‍या यांमुळें बाहेरून आंत तरी आलेली असावीं.

पहलव:- यांच्या नाण्यांचे दोन वर्ग होतात. (१) आंध्रांच्या नाण्यांसारखीं असलेलीं (ज्यांनां इलियटनें कोठें कुरुंबर आणि कोठें पल्लव किंवा कुरुंबर अशी संज्ञा दिली आहे म्हणून) आंध्रांशी समकालीन असावी (इ.स. २ रें व ३ रें शतक) उलट्या बाजूवर एक जहाज आहे त्यावरून पह्लव लोकांची ज्या परदेशी व्यापाराकरितां (नौकानयनाकरितां) प्रसिद्धि होती त्याची साक्ष पटते. (२) दुसर्‍या वर्गांतील नाणीं नंतरच्या कालांतील असून सोनें व रुपें यांचीं आहेत, परंतु त्यांच्या कालाविषयीं निश्चित पुरावा कांहीं नाहीं. या सर्व नाण्यांवर पह्लवांचें निशाण `आयाळ असलेला सिंह’ हें आहे व वर कांहीं कानडी व संस्कृत अक्षरेंहि आहेत.

चालुक्य:- यांच्या दोन्ही शाखांतील सुवर्ण नाण्यांवर यांचें चिन्ह (उर्फ लांछन) वराह हें आहे, आणि ती नाणीं हिंदुस्थानांतील ठसेपद्धतीचें एक विशिष्ट उदाहरण म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या पद्धतीमध्यें विशिष्ट लेखनचित्राचा प्रत्येक भाग नाण्यांवर निरनिराळ्या ठशांचीं उमटविला जातो. पश्चिमेकडील चालुक्यांचीं बरीचशीं नाणीं जाड सोन्याचीं आहेत आणि त्यांचा आकार बहुधा पेल्यासारखा असतो. इलियटची समजूत अशी आहे की कदंबांच्या पद्म-टंकांचीं हीं नाणीं प्रतिकृति असावीत (पद्म-टंकांची कृति त्या नाण्यांसारखीच आहे आणि त्यांच्यामतें तीं ५ व्या किंवा ६ व्या शतकातली आहेत). परंतु दोन्हीहि इतक्या पूर्वीच्या कालांत झालीं होती अशाविषयीं पुरावा नाहीं आणि पौरस्त्य चालुक्यांच्या नाण्यांवरून पाहतां, त्यांचा काल याहूनहि अधिक पुढचा असला पाहिजे.

पौरस्त्य चालुक्यांच्या उपलब्ध असलेल्या नाण्यांचा काल निश्चित झाला आहे. पितळ-मिश्रित धातूच्या नाण्यांचे कांहीं नमुने नुकतेच विजगापट्टम् प्रांतांतील येल्लमांचिलीनजीक सांपडले आहेत; त्यांच्यावर `विषम-सिद्धि’ हीं अक्षरें आहेत. (पौरत्स्य चालुक्य-राजा विष्णुवर्धन याचें एक टोपण नांव अथवा बिरुद `विषमसिद्धि’ होतें.)

दुसर्‍या नाण्यांवर चालुक्यचंद्र उर्फ शक्तिवर्मन (इ.स. १०००-१०१२) व दुसरा राजराज (इसवी सन १०२१-१०६२) यांचीं नांवें आहेत. या नाण्यांवर अतिशय पातळ सोन्याच्या तुकड्यावर चालुक्यांचें वराह चिन्ह व नांवाचें एक अक्षर हीं पाठीमागून भिन्न भिन्न ठशांनीं उमटविलीं आहेत. ही नाणीं पौरस्त्य चालुक्याचीं असावींत हे निर्विवाद दिसतें. परंतु एवढें लक्ष्यांत ठेवण्याजोगें आहे की बहुतेक नाणीं जी उपलब्ध आहेत ती आराकानच्या किनार्‍यालगत अशा चे दुबाच्या बेटामध्यें सांपडली आहेत. प्लीटच्या मतें ही नाणीं इ.स. च्या ६ व्या व ७ व्या शतकांतील पश्चिमेकडील चालुक्यांचीं आहेत.

कदंब:- कदंबांच्या सुवर्णनाण्यांची कारागिरी व कृति पाश्चिमात्य चालुक्यांच्या नाण्यांप्रमाणें आहे. इलियटच्या मतें हीं पद्मटंके- पद्मटंक म्हणण्याचें कारण नाण्याच्या मध्यभागी पद्म किंवा कमळ आहे हें होय- इ.स. ५ व्या शतकांतील कदंबाच्या भरभराटीच्या कालांतील आहेत; परंतु पश्चिमेकडील चालुक्यांच्या नाण्यांप्रमाणें, तीं याहूनहि पुढील कालांतील असावींत हें संभवनीय दिसतें. त्यांच्यावर जीं संस्कृत अक्षरें आहेत त्यांच्या वळणावरूनहि हीच गोष्ट सिद्ध होतें.

राष्ट्रकूट:- या घराण्याच्या अत्यंत भरभराटीच्या काळांत ह्यांची अशी नाणींच नाहींत. (इ.स. ७५७ ते ९७३).

कल्याणपुरचे कलचुरी:- या घराण्यांतील दुसरा राजा सोमेश्वर (इ.स. ११६७- ११७५) याचीं नाणीं प्रसिद्ध आहेत. देवगिरीचे व द्वारसमुद्राचे यादव ह्यांची नाणीं इलियटच्या पुस्तकांत दिली आहेत.

विजयानगर:- या राज्याचा उदयकाल म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासांत व नाणकशास्त्रांत एक महत्त्वाची गोष्ट आहे; कारण कृष्णेच्या दक्षिणेकडील देशांमध्यें ते वरिष्ठ होऊन बसले आणि तेथे दक्षिण हिंदुस्थानांतीलच नाण्यांची पद्धत ठेवण्यांत आली; पण कृष्णेच्या उत्तरेकडील देश बहुतेक मुसुलमानांच्या हातात गेला होता, आणि कांहीं थोड्या नाण्यांशिवाय बाकीच्या सर्व नाण्यांच्या हिंदुस्थानी पद्धतीच्या जागीं त्या प्रांतांत मुसुलमानी पद्धतीचाच पगडा बसला. [रॅप्सन- इंडियन कॉईन्सवरून तयार केलेलें व रा. के. एन्. दीक्षित यांनीं तपासलेलें]

मराठी राज्यांतील नाण्यांसंबंधानें कांहीं माहिती:- शिवाजीनें आपल्या नांवाचें नाणें पाडण्यापूर्वी विजापूरच्या पातशाहींत ``आदिलशाही’’ नाणें चालत असे. विशेषेंकरून मोहोरा व होन हे प्राचीन काळापासून चालत आहेत. होन हा मूळ ``होन्नु’’ ह्या कर्नाटकी शब्दाचा अपभ्रंश आहे. होन्नु ह्याचा अर्थ ``सोनें’’ असा आहे. कर्नाटकामध्यें प्राचीन हिंदु राज्यें जेवढीं होतीं, तेवढ्या सर्व राज्यांमध्यें होन हें नाणें चालत होतें. गजपति, अश्वपति वगैरे होनाचीं जीं नांवें आहेत, तीं सर्व त्याच्या प्राचीनत्वाचीं दर्शक होत. विजयानगरच्या राज्यामध्यें होन चालत असत. रुप्याचें नाणें मुसुलमानी अमलांत चालू झालें असावें. शिवाजीच्या वेळेस जे होन चालत त्यांचीं नावें सभासदाच्या बखरींत दिलीं आहेत तीं येणेंप्रमाणें:- (१) पातशाही, (२) शिवराई, (३) कावेरीपाकी, (४) सणगरी, (५) अच्युतराई, (६) देवराई, (७) रामचंद्रराई, (८) गुत्ती, (९) धारवाडी, (१०) गंजीकोटी, (११) पाकनाईकी, (१२) आदवाणी, (१३) जडमाल, (१४) ताडपत्री, (१५) आफराजी, (१६) त्रिवाळुरी, (१७) त्रिशुळी, (१८) चंद्रावरी, (१९) बिलदधी, (२०) उलफकरी, (२१) महमदशाही, (२२) वेळुरी, (२३) कंठेराई, (२४) देवनहळ्ळी, (२५) रामनाथपुरी, (२६) कुंदगोळीं, इ.

ह्या जुन्या होनांखेरीज बहादुरी व सुलतानी नांवाचे दोन दोन हैदर व टिप्पू यांनीं पाडले. त्यांशिवाय अलमगिरी वगैरे होन दिल्लीच्या बादशाहांनीं पाडले. शिवाजीच्या कारकीर्दीत शिवराई होन, शिवराई रुपये, शिवराई हीं नाणीं पाडण्यास सुरवात झाली. हे शिवराई होन व शिवराई रुपये सांप्रत फार क्वचित दृष्टीस पडतात. जुने होन पुष्कळ दृष्टीस पडतात. पण त्यांच्यावरील अक्षरें बहुतकरून फारशी लिपींत अस्पष्ट अशीं आहेत. कित्येकांवर श्रीकृष्णाची मूर्ति व कोठें (चालुक्यांचा) वराह अवताराचें चित्र दिसतें.

शिवाजीच्या वेळेस रायगड या राजधानीच्या ठिकाणीं त्याची टांकसाळ होती. संभाजी व राजाराम यांच्या धामधुमीच्या कारकीर्दीत नाणें पाडण्यासंबंधानें काय व्यवस्था होती याची माहिती मिळत नाहीं. राजारामानें चंदीस तक्त नेलें, त्यावेळीं त्यानें तेथें अठरा कारखाने सुरू केले होते. शिवाजीच्या वेळचीं सर्व वर्षासनें होनांत असत. शाहूनें सातार्‍यास टांकसाळ सुरू करून आपल्या नांवानें नाणें पाडण्यास सुरवात केली. ``शाहूशिक्का’’ म्हणून जे रुपये व पैसे निघाले ते शाहूच्या कारकीर्दीतले होत. सातार्‍याप्रमाणें कोल्हापुरासहि टांकसाळ सुरू झाली. कोल्हापुर ही राजधानी होण्यापूर्वी (१७८८) पन्हाळा येथें टांकसाळ होती; या टांकसाळीमध्यें शंभुशिक्का किंवा शंभुपीरखानी व पन्हाळी रुपये निघत असत. शंभु या हिंदु नांवाजवळ मुसुलमानी पीरखानाचें नांव कां आलें तें समजत नाहीं. कोल्हापुरास इतर कोणत्याहि राजाच्या कारकीर्दीमध्ये शंभुशिक्क्याखेरीज निराळ्या शिक्क्याचें नाणें पाडल्याचें दिसत नाहीं.

सातारा येथें शाहूच्या कारकीर्दीमध्यें भिकाजी नाईक रास्ते, परशुराम नाईक, अनगळ प्रभृति नामांकित सावकार होते. त्यांच्याकडून छत्रपति कर्ज घेत असत, व त्याच्या फेडीस सरकारी टांकशाळेंतून रुपये पाडून त्यांस देत असत. मराठी राज्याचा जसजसा विस्तार होत गेला, तसतशा निरनिराळ्या ठिकाणीं टांकसाळा स्थापन होऊं लागल्या. नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीमध्यें नाणें पाडण्याबद्दल ठिकठिकाणच्या सावकारांस व इतर लोकांस परवानगी देण्यांत आली. सन १७४४ मध्यें नागोठाणें येथील बाळाजी बापूजी यास तीन वर्षांच्या करारानें परवानगी मिळाली होती, व प्रत्येक वर्षी ५०७५१०० प्रमाणें सरकारास नजर देण्याचा हुकूम झाला होता. रेवदंडा येथील सरकार बहिरोराम दातार यास प्रत्येक वर्षी ६०, ९० आणि १२० प्रमाणें सरकारनजर देऊन नाणें पाडण्याची परवानगी मिळाली. सन १७४८ मध्यें किल्ले माहुली येथील बहिरोशेट व प्रल्हादशेट यांस १२० रुपये नजर देऊन नाणें पाडण्याबद्दल सनद दिली. अशा प्रकारें नाणें पाडण्याबद्दल पुष्कळ ठिकाणच्या लोकांस परवाने मिळाले होते. धारवाड येथें सन १७५३ मध्यें जी टांकसाळ प्रथम संस्थापित झाली ती त्याच पेशव्याच्या कारकीर्दीमध्यें झाली. त्याचप्रमाणें बागलकोट येथें विजापूरच्या बादशहापासून जी टांकसाळ चालत होती, ती ह्याच पेशव्यांनीं पुन्हां सुरू केली.

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीतहि पुष्कळ टांकसाळी सुरू झाल्या. नाशीक येथें सन १७६५ मध्यें लक्ष्मण आप्पाजी याच्या देखरेखीखाली व सन १७७२ मध्यें चांदवड येथें तुकोजी होळकर याच्या विद्यमानें एक टांकसाळ सुरू झाली. सवाईमाधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत सन १७८२ मध्यें कोंकण प्रांतांत दुल्लभशेट गोविंदजी व गोविंद पांडुरंग यास नाणें पाडण्याबद्दल परवानगी मिळाली.

मराठ्यांची राज्यसत्ता जसजशी वाढत चालली तसतशा नाणें पाडण्याकरितां, अनेक सरदारांच्या व जहागीरदारांच्या विद्यमानें सर्व प्रांतांमध्यें टांकसाळा सुरू झाल्या. शिंदे, होळकर यांच्या उज्जनी व इंदूर येथें टांकसाळी होत्या. त्यांच्या शिवाय माळव्यामध्यें भोपाळ, प्रतापगड, भिलसा, गंजबसोडा, सिरोंज आणि कोटा येथें वेगवेगळ्या टांकसाळी होत्या. नागपूर येथें भोंसल्यांची एक मोठी टांकसाळ होती. भडोच शिंद्याकडे आल्यानंतर तेथें त्यांनीं टांकसाळ सुरू केली. ह्याशिवाय शिंद्यांच्या कांहीं टांकसाळी खानदेशामध्यें होत्या; तेथें बर्‍हाणपुरी रुपये पाडीत असत. होळकरांची वाफगांवीं टांकसाळ होती. तेथील रुपयास वाफगांवी असें नांव असे. पेशवाईच्या अखेर प्रत्येक सरदारानें निरनिराळ्या ठिकाणीं टांकसाळी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. टांकसाळीबद्दलची सरकारपट्टी दिली म्हणजे वाटेल त्यास परवानगी मिळत असे. आग्र्याची टांकसाळ कुलाब्यास होती. तेथें श्रीशिक्का रुपये पाडीत असत. जंजिर्‍यास जंजिर्‍याच्या हबशांची टांकसाळ होती. तेथें हबसाणी अथवा निशाणी रुपये निघत, त्यांवर `अ’ हें अक्षर असे. तें जंजिरा या शब्दाचें द्योतक होतें. कर्नाटकामध्यें प्रत्येक प्रमुख ठिकाणच्या देसायाची व जहागीरदाराची टांकसाळ होती. ह्या सर्व टांकसाळींबद्दल पेशवेसरकारास कांहीं नियमित पट्टी मिळे. कर्नाटकांतील टांकसाळीमध्यें खोटें नाणें फार पडू लागल्यामुळें, पेशव्यानीं सन १७६५ मध्यें धारवाड येथें पांडुरंग मुरार ह्याच्या देखरेखीखालीं सरकारी टांकसाळ सुरू करून, कर्नाटकांतील इतर टांकसाळी बंद करण्याबद्दल हुकूम फर्माविले.

प्रत्येक प्रांतांमध्यें एकाच प्रकारचें नाणें पाडीत असत असें दिसत नाही. बागलकोट येथें मल्हार भिकाजी रास्ते हा पेशव्यांचा मुख्य सुभेदार होता. त्याच्या हुकुमानें जे रुपये पाडले त्यांस मल्हारशाई रुपये म्हणत: याची किंमत १५ आणे असे. हे रुपये पेशव्यांनीं सर्व प्रांतांमध्यें चालू करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीं शेंकडा दोन रुपये बट्टा देऊन सर्व नाणें मल्हारशाही करावें असा विचार केला. दुसर्‍या बाजीरावाच्या कारकीर्दीत अंकुशी रुपयांचें महत्त्व फार वाढलें होतें. अंकुशी अथवा चांदवडी रुपये एकाच प्रकारचे होते; हे पुण्यास पाडीत. या रुपयावर दुसर्‍या बाजीरावाच्या कारकीर्दीत मामलेदार लोक वाटेल तो बट्टा घेत असत. पुण्यास हे रुपये तीन प्रकारचे होते. कोरा निर्मळछापी, मध्यमछापी व नारायणछापी. या रुपयांतील चांदीच्या शुद्धा-शुद्ध प्रमाणांवरून हीं नावें पडली होती. पुण्याची टांकसाळ सन १८२२ मध्यें बंद झाली असा चापलिन साहेबाच्या एका रिपोर्टांत उल्लेख आहे. नाण्याची तूट आल्यामुळें पुन्हां ती सुरू केली होती, पण सन १८३४ मध्यें ती कायमची बंद झाली. बागलकोट, कोल्हापूर, कुलाबा वगैरे बहुतेक ठिकाणच्या टांकसाळी ह्याच सुमारास बंद झाल्या.

मराठ्यांच्या राज्यामध्यें प्रातोप्रांतीं निरनिराळें नाणें चाले. दक्षिण महाराष्ट्रामध्यें हुकेरी, निलकंठी, पन्हाळी, कितुरशहापुरी, गलपाडी, भूतपाडी, वगैरे रुपये चालत. निजामशाहीमध्यें बागचलनी, हुकुमचलनी आणि शेटचलनी असे तीन प्रकारचे रुपये असत. तेच निजामाच्या सरहद्दीवरील पेशव्यांच्या मुलुखांतहि चालत असत. `हल्ली शिक्का’ व समशेरी हें सर्व निजामशाही नाणें असे; हें पेशवाईच्या अखेरपर्यंत चालत होतें. खानदेश व नाशिक या प्रांतांत बेलापुरी, चांभार-गोंदी, चांदवडी, बर्‍हाणपुरी, वाफगावी, जरीफटका वगैरे रुपये चालत. कुलाबा प्रांतामध्यें आंगर्‍याचे कुलाबी रुपये विशेषेकरून चालत असत. रत्नागिरी प्रांतामध्यें चांदवडी, दौलताबादी, हुकेरी, चिकोडी वगैरे नाणें चाले. दक्षिण कोंकणांत टांकसाळ स्थापन करण्यांत आली नाही. ह्या सर्व रुपयांचे भाव निरनिराळे असत. थोरल्या माधवराव व सवाई माधवराव यांच्या कारकीर्दीत मल्हारशाही रुपयाप्रमाणे बट्टा कापून घेत असत. चांदवडी व अंकुशी हेच पेशवाईअखेर सर्व महाराष्ट्रांमध्यें प्रमुख ठरीव नाणें होतें.

रुपयांवर बहुतेक फारशी अक्षरें असत. शिवाजी व शाहु यांच्या शिक्क्यांवर मात्र मराठी नांवें उठविलेली असत. त्याचप्रमाणें आंगर्‍यांच्या रुपयावर श्री काढलेली असे. यशवंतराव होळकरानें आपल्या रुपयावर मराठी छाप उठविला होता. ह्यांशिवाय मराठी शिक्क्याचे रुपये फारसे आढळण्यांत येत नाहींत. जरीफटका म्हणून नाशकास एक रुपया पेशव्यांनीं पाडला होता; तो हरिपंत फडक्यांचा होता असें म्हणतात. शिवाजीच्या भगव्या झेंड्याप्रमाणें जरीफटक्याचें माहात्म्य पेशव्यांच्या कारकीर्दीत फार वाढले होतें. त्याचें दर्शक हा रुपया असेल असें वाटतें. १८०३ सालीं सिधोजी नाईक निपाणकरानें आपल्या शिक्क्याचा रुपया तयार केला होता. बडोद्यास सयाशाही म्हणून पहिला सयाजीराव, व बाबाशाही म्हणून पहिला फत्तेसिंग बाबा यांनीं रुपये पाडले होते. सयाशाही रुपयावर देखील तरवार, हिजरी सन आणि ``शिक्के मुबारिक सेनाखासखेल समशेर बहादूर’’ असा फारशी लेख असे. तात्पर्य, मराठी अक्षरांचे रुपये फार क्वचित् दृष्टीस पडत. पेशव्यांच्या कारकीर्दीमध्यें पाडलेल्या बहुविध रुपयांवर प्रत्येक सालाचे हिजरी सन मराठीमध्यें घातले आहेत. पण त्यांवरील शिक्के फारशी आहेत. ह्यावरून फारशी शिक्के उमटविण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धति पेशव्यांनीं बंद केल्याचें दिसत नाहीं.

पेशव्यांच्या राज्यामध्यें रुपयांच्या खालोखाल अधेल्या, आणि चवल्या ही नाणीं होतीं. रुप्याच्या नाण्यांखेरीज सर्व महाराष्ट्रामध्यें तांब्याचें नाणें चालत असे व तें मात्र अगदी एक प्रकारचें होतें. नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत शिवाजीचा शिवराई पैसा पुष्कळ प्रचारांत होता. ह्या पैशामध्यें कोठेंहि फेरबदल केल्याचें दिसून येत नाही. कुलाब्यास आंगर्‍याच्या, कोकणांत पनवेलच्या व कर्नाटकांत धारवाडच्या टांकसाळीमध्यें ``शिवराई’’ पैसे पाडीत.

सातार्‍याची टांकसाळ शाहूपासून शहाजीपर्यंत चालू असावी. प्रतापसिंहाच्या कारकीर्दीमध्यें येथें चांदवडी कोरे रुपये पाडीत असत. त्यानें आपल्या नांवाचा छाप निराळा केल्हा नव्हता; पैसे शिवाजीच्या नांवाचेच पाडीत. प्रतापसिंहानें आपल्या राज्यांत सर्वच चांदवडी शिक्का कायम केला होता. सावकारलोकहि त्याच शिक्क्यावर इतर जातींच्या रुपयांचा वर्तावळा घेत. सरकारी नौकरांस पगारहि त्याच भावानें देत व शेंकडा २।।= बट्टा कापून घेत. सन १८३० सालापासून पुणें कोरे रुपये व चांदवडी अंकुशी रुपये ह्यांमध्यें बट्टा ठरल्यामुळें सातारच्या राज्यांत ३४५७१ रुपये वर्तावळ्याची रक्कम जमा झाली, असा सातारचा  कमिशनर ओगल्वी याच्या एका रिपोर्टांत उल्लेख सांपडतो. शहाजीच्या कारकीर्दीत सर्व कामदारांकडून ४। रुपये बट्टा कापून घेत. दिवाण, फडणवीस वगैरे मुख्य मुख्य कामदारांच्या पगारांतूनहि बट्टा वजा होत असे. सन १८३५ नंतर ईस्ट इंडिया कंपनीचे रुपये राज्यामध्यें चालू झाले.

सातार्‍याजवळ रहिमतपूर येथें टांकसाळ प्रतापसिंहाच्या कारकीर्दीत होती. तेथें शिवराई पैसे पाडीत असत. त्या टांकसाळीवर जे अधिकारी होते त्यांस टांकसाळे असे नांव असे. [विविधज्ञानविस्तार- १६००, सप्टेंबर व आक्टोबर.]

आंतां आज जगांत निरनिराळ्या देशांतून कोणतीं नाणीं विशेषत: सोन्यारुप्याचीं- प्रचलित आहेत तें पाहूं.

 ब्रिटिश साम्राज्यांतील नाणी /  ब्रिटिश वसाहतींतील विशिष्ट नाणी /  परदेशांतील नाणी
   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .