प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ   
     
नाना फडणवीस- नानांचें चरित्र म्हणजे मराठी साम्राज्याची चाळीस वर्षांची हकीकत होय; म्हणून तें जरासें विस्तृत स्वरूपानें देणें अपरिहार्य असल्यानें येथें तसें देण्यांत आलें आहे. यांचें मूळ नांव बाळाजी जनार्दन भानू;  रहाण्याचें गांव रत्नागिरी जिल्ह्यांतील बाणकोटच्या खाडीवरील दक्षिण तीरावरचें वेळास; खाडीच्या उत्तरेकडे श्रीवर्धन आहे. वेळासेस महादजी कृष्ण भानू हा वतनदार होता. त्याला नारायण, हरि, रामचंद्र व बळवंत हीं चार मुलें झालीं. महादाजीच्या पश्चात नारायण वेगळा राहिला व बाकी तिघे एकत्र राहिले. श्रीवर्धनास बाळाजी विश्वनाथ भट हे देशमुख होते, त्यांचा व या तिघांचा स्नेह असे. हबशांच्या त्रासानें रोजगारानिमित्त भट हे घाटावर निघाले; त्यांच्याबरोबर हे तिघेही निघाले. भटानीं भानूंस सांगितलें कीं, आमच्या सबंध भाकरींत तुमचा चतकोर ठेवूं. घाटावर येतांना वाटेंत अंजनवेलीस हबशानें भटांस पकडलें, परंतु भानूंनीं खटपट करून त्यांची सुटका केली.

बाळाजीपंतानें धनाजी जाधव सेनापतीकडे नौकरी धरली; रामाजीपंत भानूस सचिवाकडे काम मळालें व हरि व बळवंत हे बाळाजीजवळ राहिले. बाळाजीनाना हे पेशवे झाल्यावर त्यांनीं सर्व राज्याची फडणविशी शाहूकडून आपल्याकडे मागून घेतली व तीवर हरिपंतास नेमिलें; त्याचप्रमाणें भानू हे मराठी राज्याचे फडणवीस झाले. रामाजीस लोहगडची सबिनशी दिली व नाणेंमावळची सबनिशी हरिपंतास दिली (१७१४). पुढें चार-पांच महिन्यांनीं हरिपंत जेजुरीस वारला. तो निपुत्रिक असल्यानें बाळाजी (बळवंत) पंतास फडणविशी मिळाली.

सय्यदांस मदत करण्यास पेशवे दिल्लीस गेले असतां, सय्यदांच्या विरुद्ध पक्षाची व पेशव्यांची जी लढाई झाली तींत बाळाजीपंत ठार झाला (१७१७). चौथ व सरदेशमुखीच्या सनदा पेशव्यांचा वेष घेऊन आणीत असतां बाळाजी मारला गेला अशी एक दंतकथा आहे; पण तिला ऐतिहासिक आधार नाही. नंतर रामाजीपंतास फडणविशीचीं वस्त्रें मिळालीं; तो पुढें सहा वर्षांनीं वारला (१७२३). यावेळीं त्याचा पुत्र बाबूराव व पुतण्या जनार्दन बल्लाळ हे लहान होते; तरी पण नानासाहेब पेशव्यांच्या वेळच्या कारकीर्दीत यांना प्रत्येक मोहिमेंत हजर रहावें लागे. जनार्दन बल्लाळ यांस बळवंतराव मेहेंदळे यांची बहीण रखमाबाई ही दिली होती; तिला एकच-नाना-अपत्य झालें. नानांचा जन्म सातार्‍यास शके १६६३ माघ कृष्ण ४, शुक्रवारी (१२ फेब्रुवारी १७४२) झाला.

बाबूरावाचा मुलगा मोरोबा हा नानाहून थोडा लहान होता. लहानपणीं नानांस आईनेंच शिक्षण दिलें. नाना तेव्हांपासून मातृभक्त होते. लहानपणीं त्यांनां कथाकीर्तन, देवपूजा वगैरेंचा नाद फार होता. मुंजीनंतर पेशव्यांनीं नाना व मोरोबा यांस विश्वासराव व माधवराव (पेशवे) यांच्याबरोबर अभ्यासासाठीं ठेविलें. ननासाहेब व भाऊसाहेब पेशवे यांचा नानांवर लहानपासूनच फार लोभ होता. तत्कालिन अवश्य असलेलें ज्ञान नानांनी मिळविलें. मोरोबा मंद होता; त्यामुळें तो नानांचा मत्सर करी; हा मत्सर त्यानें अखेरपर्यंत सोडला नाही. नानांचें पहिलें लग्न दहाव्या वर्षी झालें; या स्त्रीचें नांव यशोदाबाई. जनार्दनपंतास पोटशुळाची व्यथा होती; रघुनाथरावदादाच्या स. १५२६ च्या स्वारींत जनार्दनपंत या व्यथेनेंच मृत्यू पावले; थोड्या दिवसांनीं नानांस फडणविशीचीं वस्त्रें पेशव्यांनीं दिलीं. (२९ नोव्हें. १७५६) व स्वत: हैदरावर स्वारी केलीं, तींत नानांस बरोबर घेतलें. नानांची ही स्वारींतील पहिलीच खेप होती.

यानंतर तीन वर्षे नाना पुण्यासच होते. मोरोबाचें व त्यांचें पटेना, म्हणून ते विभक्त झाले. सोळा वर्षे वय होण्यापूर्वीच नानांवर विषयवासनेचा पगडा बसला; मात्र त्याबद्दल त्यांस कसा वारंवार पश्चाताप होई व तिचें दमन करण्यास त्यानीं कसा भगीरथ प्रयत्न केला, या गोष्टी त्यांच्या आत्मचरित्रांत दिलेल्या आहेत. त्यासाठीं कांहीं दिवस ते कायगांवटोकें येथें पुरश्चरण करीत राहिले होते.

पानपतावर भाऊसाहेब निघाले, त्यांच्याबरोबर तीर्थक्षेत्रें पहावीं या उद्देशानें, आई व बायको यांच्यासह नानाहि निघाले. वाटेंत त्यांस अमांशाचा आजार होई, तेव्हां त्यांच्यावरील प्रेमानें भाऊसाहेब फौज सोडून त्यांच्याजवळ राहात. त्यांच्या सांगण्यावरून नाना दिल्लीस बादशहास भेटले; बादशहानें त्यांचा फार मान केला. कार्तिकी अमावस्येस नानांचा मामा बळवंतराव मेहेंदळे पराक्रम करून लढाईंत ठार झाला; त्याच्याबरोबर त्याची स्त्री सती गेली; यामुळें नानांस फार दु:ख झालें. पौष शुद्ध अष्टमी बुधवारीं (१४ जाने. १७६१) पानपतचा शेवटचा संग्राम झाला. सकाळपासून अखेरपर्यंत नाना हे भाऊसाहेबांच्या जवळ होते. शेवटच्या गर्दीत त्यांस पळून जाण्यास एका माणसानें सांगितलें असतांहि ते गेले नाहींत. भाऊसाहेब दिसेनासे झाल्यावर मात्र जेव्हां सायंकाळी सर्व लोक पळाले तेव्हां शेवटी नानाहि तेथून निघाले. होळकर व गायकवाडांसारखे फौजबंद शूर सरदारहि जेथून आधींच पळाले, तेथून सर्वस्व नाहीसें झाल्यावर जीव बचावण्यासाठी पळ काढावा लागला याबद्दल वास्तविक नानांस वाईट वाटण्याचें कारण नव्हतें. तथापि, भाऊसाहेब गेल्यावर आपण समरांतच प्राण कां दिला नाहीं, याबद्दल नानांस नेहमीं पश्चात्ताप होई. ``लक्ष सैन्य... मोठेमोठे सरदार... एकहि त्या समयीं श्रीमंतांस आप्त न जाहला (मजवर) भाऊसाहेबीं कृपा पुत्रवत् केली.’’ असे ते नेहमी उद्गार काढीत. पानपताहून देशी परत येतांना वाटेंत नानांचे फार हाल झाले `शुद्ध लंगोटी लावून’ त्यांनीं कांहीं दिवस प्रवास केला. दोन तीनदां गिलच्यांनीं त्यांना पकडलें, परंतु ठार केलें नाहीं, `हे सत्ता ईश्वराची’. गवतांत लपून जीव बचवावा लागे; बोरीचा पाला खाऊन भूक शमवावी लागें; याप्रमाणें कष्टानें नाना रेवडी या गांवीं आले. तेथें भालेराव या गृहस्थानें त्यांचा परामर्ष घेऊन त्यांची दीग भरतपूरकडे रवानगी करून दिली. वाटेंत त्यांची स्त्री यशोदाबाई भेटली. पानपतास नानांचा पत्ता लागेना, तेव्हां तिनें वेष पालटून दिल्लीचा रस्ता धरला; तेथून ती सोबतीनें भरतपुरास निघाली, तेव्हा वाटेंत नानांची भेट झाली. भरतपुरास पानपतचा पळ बराच आला होता. त्यांतील नानांच्या खिदमतगारानें सांगितलें कीं, तुमची आई पळांत नाहींशीं झालीं. त्यामुळें नानांस फार वाईट वाटले व वैराग्याच्या भरांत काशीवास करण्यास परतून ते ग्वालेरपर्यंत गेले. तेथें पार्वतीबाई पेशवे व मल्हारबा होळकर यांनीं त्यांची समजूत घालून त्यांस परतविलें. पुढें पुष्कळ वर्षे आईची (``स्वत:चें सर्वस्व देऊनहि’’) खरी बातमी काढण्याविषयीं नानांची खटपट चालू होती. एकदां त्यांनी दिल्लीस हिंगणे वकीलास याबद्दल आग्रहाचें पत्र लिहिलें. मात्र त्यावेळीहि त्यांची धर्मनिष्ठा दिसून येते; `आईच्या जातीचा शोध व्हावा, ती शुद्ध असल्यास तिला पाठवावी व बाटली असल्यास परभारें प्रयागास गंगेंत देह अर्पण करण्यास पाठवावी’, असा खुलासा त्यांनी त्या पत्रांत केला होता. नाना बर्‍हाणपुरीं नानासाहेब पेशव्यांस भेटून कायगांवटोकें येथें कांहीं दिवस राहिले व पेशवे पुण्यास वारल्यावर, पुण्याहून निघाल्यापासून १४ महिन्यांनीं नाना पुण्यास परत आले. (जुलै १७६१).

थोरले माधवराव हे पेशवे झाल्यावर त्यांच्या आज्ञेनें नाना हे कारभारांत लक्ष्य घालूं लागले. यावेळीं त्यांचें वय २१ वर्षांचें होतें. त्यानीं यापूर्वीच अनेक दु:खाचे प्रसंग पाहिले होते. त्यामुळे अखेरपर्यंत त्यांच्या स्वभावावर कांहीशीं खिन्नतेची छाया पडलेली होती. राज्यकारभाराचा अनुभवहि त्यांनी थोडाफार मळविला. पेशव्यांच्या बरोबर नेहमीं राहिल्यानें मोठेमोठे मुत्सद्दी, सरदार, सावकार यांच्या स्वभावाची त्यांस ओळख झाली. खुद्द नानासाहेब पेशवे, भाऊसाहेब पेशवे व रामचंद्रबाबा शेणवी या राजकारस्थान्यांचीं उदाहरणें त्यांच्या डोळ्यासमोर होतीं. आपसांतील दुहीचा व हटवादीपणाचा काय परिणाम होत असतो तो पानपतास त्यांनीं प्रत्यक्ष पाहिला होता. या सर्व गोष्टींचा विचार करून यापुढील आयुष्याचें धोरण त्यांनीं आंखलें.

नानांचे आतांपर्यंतचे विश्वासू मित्र हरिपंत फडके, यांचा बाप बाळाजी हा, बाबूराव फडणवीस यांचा उपाध्याय असल्यामुळें नाना व हरिपंत यांचा लहानपणापासून स्नेह जमला व नानांनींच हरिपंतास दरबारांत प्रसिद्धीस आणले.

माधवराव व दादासाहेब यांच्या कुरबुरींत दादांनीं व सखाराम बापूनें दौलतीचा कारभार पाहाण्याचें सोडून दिलें. तेव्हां त्यांचें आर्जव न करतां माधवरावांनीं त्रिंबकरावमामा, गोपाळराव पटवर्धन, नाना फडणवीस, मोरोबा फडणवीस व हरिपंत फडके यांचें कारभारीमंडळ नेमून राज्यकारभार सुरू केला. त्यावेळीं दादा हे निजामाकडे जाऊन त्याची फौज घेऊन पुण्यावर येऊं लागले; म्हणून माधवरावांनीं दादांच्या हाती कारभार देऊन गृहकलह मिटविला. दादा मुखत्यार झाल्यावर त्यांनीं फडणिशी भानूकडून काढून रायरीकरास दिली, त्यामुळें बापूराव व मोरोबा हे निजामास मळाले. पुढें राक्षसभुवनच्या लढाईनंतर, माधवराव हे पुन्हां कारभार करूं लागल्यावर, त्यांनी पुन्हां नानास फडणविशी व मोरोबास कारभारीपणा दिला. माधवरावांचा नानांवर फार विश्वास असे. प्रत्येक कामांत ते नानांचा विचार घेत. त्यांनीं हैदरावर केलेल्या अनेक स्वार्‍यांत राज्याचा सर्व भार इकडे नानांच्याच माथीं असे. तो सांभाळून शिवाय पेशव्यांस नियमित दारूगोळा, धान्यधुन्य व पैका वेळच्या वेळी व भरपूर पुरविण्याचें जोखमेचें कामहि नानांनीं पुरें पाडलेलें होतें. माधवरावानीं शेवटीं थेऊर येथें नारायणरावांची व राज्याची जबाबदारी विश्वासूपणें नानांवरच टाकली होती. तुकोजी होळकर व महादजी शिंदे यांनां सरदारकीचीं वस्त्रें मिळवून देण्याच्या कामीं (दादासाहेबांच्या विरुद्ध) नानांनींच प्रयत्न केल्यानें, हे दोघे सरदार दादांच्या विरुद्ध मसलतींत नानांस अनुकूल असत.

नारायणराव पेशवे हे तापट व गैरमुत्सद्दी होते. त्यांनीं आईच्या सांगण्यावरून व नाना आणि बापू यांच्या संमतीच्याविरुद्ध दादासाहेबांस कैद केलें. कैदेंतून पळून जाण्याचा दादानीं प्रयत्न केल्यानें पेशव्यानीं त्यांची कैद फार कडक केली व त्रासहि दिला; त्याचा परिणाम पेशव्यांच्या खुनांत झाला. नारायणरावांस धरण्याचा कट झाल्याची कुणकुण नानांस होती व त्यांनीं तिची सूचना (पेशव्यानीं थट्टेनें नानाचें पागोटें बोथाटीनें उडविलें असतां, नानांनीं ``माझ्या पागोट्याची किंमत नाहीं, श्रीमंतांनीं आपलें पागोटें सांभाळावें’’ याप्रमाणे) पेशव्यांस दिलीहि होती, पण पेशव्यानीं तिकडे दुर्लक्ष्य केले.’ पेशव्यांस फक्त धरून, कैदेस ठेवून दादानीं कारभार पाहावा’ असाच मूळचा कट होता; मारण्याचा बेत हा अगदी आयत्या वेळी झाला व तो आनंदीबाई व तिचे लोक यांनी केला. यामुळें तो त्या मंडळीच्या बाहेर फुटला नाही; अर्थात तो नानांस मुळीच माहीत नव्हता. खुद्द पेशव्यांसहि जेव्हा स्वत:स पकडण्याच्या कटाची बातमी लागली तेव्हां त्यानीं हरिपंतास त्याचा बंदोबस्त करण्यास आज्ञा केली होती व ती नानानीं ऐकली होती. सारांश, या कामीं नानांवर (निष्काळजीपणाशिवाय इतर दुसरा) कोणताहि आरोप येऊं शकत नाहीं.

आपणांवर मुलाप्रमाणें प्रेम करणार्‍या नानासाहेबांचा मुलगा व शेवटी विश्वासानें माधवरावांनीं ज्याला आपल्या स्वाधीन केलें, तो नारायणराव आपल्या देखत मारला गेला ही गोष्ट नानांच्या मनास कायमची लागली व ती घडवून आणणार्‍या दादासाहेबांबद्दल त्यांच्या मनांत अत्यंत तिटकारा आला आणि त्या भरांत त्यानीं प्रख्यात बारभाईंचें कारस्थान उभें केलें. सखारामबापूस बाह्यत: वडीलकी देऊन, नानानींच हें कारस्थान पार पाडलें. बापू दुटप्पी असल्यानें त्याचा भरंवसा नव्हता (आणि अखेरीस त्यानें फितूर केलाहि) पुढें एकदा मोरोबा फडणवीस, बजाबा पुरंदरे व बाबूजी नाईक ही बारभाईंतील मंडळीहि दादांस फितूर होऊन गंगाबाई, सवाई माधवराव, बापू व नाना यांनां कैद करण्याचा त्यांनीं कट उभारला होता. मात्र त्याचा योग्यवेळीं नाना व बापू यांनी बंदोबस्त केला. याप्रमाणे खुद्द बारभाईंतीलसुद्धा कांहीं मंडळी फुटलेली होती; त्यामुळें कार्याची सर्व जबाबदारी एकट्या नानांवर होती व ती त्यानीं यशस्वी रीतीनें पार पाडलीहि.

नारायणरावांच्या खुनाचें निमित्त काढून निजाम पुण्याकडे येऊं लागला; तेव्हा दादासाहेब त्याच्यावर निघाले. बरोबर बापू व नाना हे होते; परंतु आजारीपणाच्या सबबी सांगून ते पुण्यास परत आले. त्यांनीं गंगाबाईस पुरंदरावर ठेवून, दादांच्या पक्षपाती लोकांनां पकडून गंगाबाईची द्वाही फिरविली व स्वत: कारभारी बनले. दादास बंडखोर ठरवून त्यानीं भोसलें व निजाम यांनां मिळवून घेतलें व आणि खुद्द दादांच्या फौजेंतच फितूर केला. ही हकीकत समजतांच दादा पुण्याकडे वळले. कारभार्‍यांनीं त्रिंबकराव मामास त्यांच्या तोंडावर पाठविलें; मामानें उतावीळ केल्यानें त्याचा पराभव होऊन तो पकडला गेला. त्यावर हरिपंत फडक्यास पाठविण्यांस आलें; त्यानें भोंसले व निजाम यांच्यासह दादांचा पाठलाग केला. तेव्हा दादा इंदुराकडे पळाले. तेथें शिंदे व होळकर यांनीं त्यांनां मदत करण्याचें कबूल केलें.

इतक्यांत इकडे सवाई माधवरावांचा जन्म झाला (१८ एप्रिल १७७४). त्यामुळें दादांचा पेशव्यांच्या गादीवरील हक्क कायमचा नष्ट झाला; तरीसुद्धां ते भांडण्यास तयारच होते. नानांची यावेळीं स्थिति फार बिकट झाली होती. बारभाईंत आपसांत दुही, राज्यांत सर्वत्र फितूर, कोणांवर विश्वास ठेवावा हें समजण्याची पंचाईत; पैक्याची टंचाई, फौज व सरदार बेकैदी, प्रजा उदासीन, भोंसले व निजाम स्वार्थसाधू असा एकंदर प्रसंग बनला होता. वर सांगितलेले मोरोबा, बजाबा व बाबूजी यांचें कारस्थान या वेळींच झालें होतें. पुरंदरास पावसाळ्यांत हवा सर्द असते म्हणून बालपेशव्यांसह कारभारी सासवडास राहिले होते आण त्यावेळीं त्यानां पकडण्याचा वरील मंडळीचा बेत होता. या कटाची पत्रें हरिपंतानें (दादांच्या पाठलागावर बर्‍हाणपुरास असतांना) पकडल्यानें कट उघडकीस आला. सासवडची सर्व मंडळी पुरंदरावर गेली आणि फितुर्‍यांनां कडक शिक्षा झाल्या.

पावसाळा संपल्यावर दादा हे शिंदेहोळकरांच्या फौजेसह नर्मदा उतरले, तेव्हां समेट झाल्यास पहावा म्हणून नाना व बापू हे तापी कांठी त्यांनां जाऊन भेटले. त्यांचीं बोलणीं चालणीं झालीं, परंतु दादांची समजूत पटेना. तेव्हां कारभार्‍यांनीं शंदे होळकरास फोडून हरिपंतासह त्यांनां दादांवर पाठविले. दादा गुजराथेंत पळाले. तेथें त्यांनां गोविंदराव गायकवाड मिळाला. तरीहि हरिपंतानें महीवर दादांचा पराभव केला. तेव्हां दादा खंबायतेहून सुरतेस इंग्रजाकडे गेले.

साष्टी बेट मुंबईजवळ असल्यानें त्यावर इंग्रजांचा पूर्वीपासून डोळा होता. मागें नानासाहेब पेशव्यांशीं दोस्तीचा तह केलेल्या इंग्रजांनीं आतां तो मोडून व वरील गृहकलहाचा फायदा घेऊन साष्टी काबीज केली; परंतु ती पचावी कशी या भीतीने इंग्रज चूर असतां, दादानीं आयतीच त्यांच्याकडे मदत मागितली. तीन हजार फौज मदतीस आल्यास साष्टी व शिवाय वसई वगैरे सव्वा एकोणीस लाखांचा प्रांत इंग्रजांस बहाल करण्यास दादा तयार झाले. मग इंग्रजांची फौज घेऊन दादा खंबायतच्या खालीं उतरले, पण यावेळीं त्यांच्या व हरिपंताच्या किरकोळ लढाया झाल्या (१७७६). याच वेळी हैदर व कोल्हापूरकर हे पेशवाईवर उठले होते; रज्यांत अंदाधुंदी माजली होती; पैशानें हलाखी आली होती व चोवीस लाखांचा प्रांत इंग्रजांनी काबीज केला होता. तेव्हां या एकंदर नुकसानापेक्षां साष्टी व भडोच वगैरे सहा लक्षांचा मुलुख इंग्रजांस देऊन आणि मुख्यत: घरभेद्या दादांस हाती घेण्याचें ठरवून नानानीं त्याप्रमाणें पुरंदरचा तह केला (१७७६). मग नानांनीं हरिपंतास हैदराची बंडाळी मोडण्यास व महादजी शिंद्यास कोल्हापूरकराचा दंगा नाहीसा करण्यास तिकडे पाठविलें. त्यांनी सोपविलेली कामगिरी चोख बजाविली.

याच वेळी मोरोबाने आणखी एक मोठें कारस्थान रचिलें; त्यांत दादासाहेबांच्या पक्षाची एकूणएक मंडळी होती, इतकेंच नव्हे तर बारभाईतील एकट्या नानाखेरीजकरून सर्व (प्रत्यक्ष बापू सुद्धां) माणसें त्यांत सामील झालीं होतीं. हा नानावर कठिण प्रसंग होता. इंग्रजांच्या बळावर प्रतिस्पर्धी प्रबळ झाले होते, जिवलग मित्रहि उलटले होते, जवळ फौज व पैका नव्हता, अशी चोहोंकडून अडचण आली होती. तथापि त्यांनीं आपल्या विलक्षण बुद्धिसामर्थ्यानें हें कारस्थान हाणून पाडलें. त्यानां एके दिवशीं रात्रीं पकडावयाचें ठरलें होतें व रात्री १२ घटकेस पुण्यास जी तोफ उडत असे ती पकडण्याची वेळ ठरवली होती. वेळेच्या आधीं बापू हा नानांकडे बराच वेळ येऊन बसला होता. नानानीं पुण्याच्या तोफेच्या गोलंदाजास आधींच सांगून ठेविलें कीं, पुरंदरच्या ५ तोफा झाल्यावर आज तोफ उडवा. बापू गेल्यावर ताबडतोब नाना एकटे निघून पुरंदरीं पोहोंचलें; त्यांच्या आश्रितास सुद्धां ही बातमी समजली नाही. पुरंदरच्या तोफा झाल्या व मग पुण्याची तोफ झाली. कटवाल्यांच्या ५०० स्वार्‍यांनीं नानांच्या वाड्यास घेरा घातला. पण नाना सांपडले नाही! पुढें मोरोबानें पार्वतीबाई पेशव्यांकडून स्वत:स कारभार्‍याची वस्त्रें घेतलीं. पुण्याच्या इंग्रज वकिलानें मुंबईस ही बातमी आनंदानें कळविली व दादांस ताबडतोब साहाय्य करण्यास लिहिलें. मोरोबाकडे होळकर, बिनीवाले, मेहेंदळे वगैरे सर्व सरदार ३०/४० हजार फौजेसह होते. याप्रसंगी काळवेळ जाणून व इंग्रजांनीं दादांस आणून गादीवर बसविण्याच्या पूर्वीच नानानीं बापूच्या मध्यस्थीनें मोरोबाशीं समेट केला. त्याच्या हातीं पुण्याचा व दौलतीचा सर्व कारभार दिला व आपल्या हातीं पुरंदर आणि बालपेशव्यांचा कारभार ठेवला. मुख्य धनं हातीं असल्यावर त्याच्या नांवावर आपल्याला पुढें पाहिजे ती मसलत करतां येईल, हें धोरण यांत होतें. नानाच्या या धोरणांत मोरोबा फसला व खुद्द बापूसहि भुरळ पडली. नानानीं हळू हळू मोरोबावर आपली छाप बसवून, दादानां गादीवर बसविण्याची त्याची मसलत मोडून काढिली आणि शिंदे व फडके यांस कोल्हापूरकर व हैदर यांच्या मोहिमांवरून ताबडतोब परत बोलाविलें (त्या दोघांनीं तिकडे जय मिळविलाच होता) तेव्हा मोरोबादि मंडळीस संशय न येईल अशा बेतानें ते दोघे हळू हळू येऊन पुरंदरी दाखल झाले. मग नानानीं आपलें स्वरूप उघड केलें. लागलीच त्यानीं ९ लाख रुपये देऊन होळकरास फोडलें. शेवटी शिंद्याच्या फौजेनें एकदम पुण्यास जाऊन मोरोबास पकडून नानांच्या स्वाधीन केलें. मग सर्व कटवाल्यांनां शिक्षा झाल्या. बापूस मात्र नजरकैद झाली व नाना पुन्हां मुख्य कारभारी झाले (११ जुलै १७७८)

पण यामुळें इंग्रजांनीं उचल केली. त्यांनीं पुरंदरच्या तहांतील बहुतेक अटी आपण होऊन मोडल्या. ठरल्याप्रमाणें अठरा लाखांचा मुलुख पेशव्यांस परत दिला नाही, दादांस मुंबईस ठेवलें, सुरत व भडोचच्या फौजा परत नेल्या नाहींत, भाऊसाहेबाच्या तोतयास मदत केली व त्याचें शासन झाल्यावरहि त्याच्या लोकांस ठाण्यास आसरा दिला. याप्रमाणें इंग्रजांनीं आगळिकी केल्या. त्यामुळें त्यांच्या नेकीबद्दल नानांचे मत प्रतिकूल होऊन त्यांस त्यांचा फार राग आला. तेव्हां त्यांनी पुढील युक्ति योजली. फ्रान्सच्या बादशहाकडून या सुमारास एक सेंट ल्युबिन म्हणून वकील पेशवेदरबारी आला होता. व `आपणांस चौल बंदर दिल्यास आपण फ्रान्सहून फौजा आणून इंग्रजांस हांकून देऊं’ असें त्यानें बोलणें लाविलें होतें. नानानीं त्यास हातीं धरून इंग्रजांच्या वकिलाचा ठिकठिकाणी पाणउतारा केला; त्याच्या घरावर पहारे बसवून त्याला शहरांत येण्याची बंदी केली. यूरोपांत याच सुमारास इंग्रज-फ्रेंचांची लढाई चालू होती. तेव्हा इंग्रजांस फार काळजी लागून त्यांनीं वरील कारणसाठी पुण्यावर चाल करण्याचें ठरविलें. ही बातमी नानांस तात्काळ समजली व त्यांनी आपलीहि सर्व तयारी ताबडतोब केली. इंग्रज सैन्य कॅप्टन इगर्टन याच्या हाताखाली दादासाहेबांसह मुंबईहून निघून घाटाकडे येत असतां, पानशानीं त्याच्यावर गनिमी हल्ले करून त्यांतील नांवाजलेला इष्टूर फांकडा (कॅ.स्टुअर्ट) यास ठार केले व त्यांचे मुंबईचे दळणवळण तोडलें. अखेर तळेगांव- वडगांव येथें इंग्रजांचा सपशेल पराभव होऊन, नाना म्हणतील त्याप्रमाणें सर्व अटी त्यांस कबूल कराव्या लागल्या. हा तह इंग्रजांच्या दृष्टीनें मोठया नामुष्कीचा होता. नानांस कारभारावरून काढून दादांस गादीवर बसवून पेशवाई आपल्या हातीं घेण्याचा त्यांचा कट पुरा फसून नानाचेंच वर्चस्व अधिक वाढलें आणि दादांस त्यांच्या स्वाधीन करून निमूटपणें इंग्रजांस परत फिरावें लागलें. यावेळींच फितुरीचे अस्सल कागद सांपडल्यावरून बापूस कैद करण्यांत आलें. यापुढें मरेपर्यंत बापू कैदेंतच होता.

वरील प्रसंगामुळे इंग्रज जास्त चिडले. कलकत्याहून गाडर्ड हा पुण्यावर चालून येत होता. त्यानें हें वडगांवचे वर्तमान ऐकून आपला रोंख गुजराथेवर धरून फत्तेसिंग गायकवाडास फितूर करून अहमदाबाद व डभई घेतली. याच वेळीं शिंद्यांच्या ताब्यांतून दादासाहेब पळून जाऊन भडोचेस इंग्रजांकडे गेले. त्यामुळें शिद्यानें इंग्रजांवर मोहीम केली. तीत इंग्रजांनी गोहदच्या राण्याच्या मदतीनें शिंद्यांस पुष्कळ त्रास दिला. इकडे गाडर्डनें ठाणें-साष्टीकडे मोहीम करून व रामचंद्र गणेश याचा पराभव करून वसई घेतली, आणि कल्याण पासून बोरघाटापर्यंत प्रांत काबीज केला. तेव्हा नानांनी डचांशीं संगनमत करून त्यांना इंग्रजांविरूद्द उठविलें आणि पुढीलप्रमाणें एक मोठें राजकारण केलें- शिंदे, होळकर, भोंसले यांनी पूर्वेस व उत्तरेकडे थेट कलकत्यापर्यंत; निजाम, फ्रेंच व हैदर यांनी दक्षिणेस थेट मद्रासेवर आणि पश्चिमेस आपण स्वत: थेट मुंबईपर्यंत याप्रमाणें एकाच वेळीं चारी बाजूंनी स्वार्‍या करून इंग्रजांस ताण बसवावा व त्यांना हांकून द्यावें असा मनसुबा होता. तो सिद्धीस जाता तर निराळाच इतिहास बनला असता; परंतु तसें झालें नाहीं. भोंसले हा इंग्रजांकडून १६ लाख रूपये लांच घेऊन तटस्थ राहिला, होळकर फौजेस फांटा देऊन स्वस्थ बसला आणि निजामानें टाळाटाळ केली. फक्त हैदरानें व फ्रेचांनी मद्रासकडे इंग्रजांची रेवडी उडवली, शिंद्यानें उत्तरेकडे इंग्रजांस शह दिला व बोरघाटावर पेशव्यांनी गाडर्डचा पराभव करून व त्याचा गोट लुटून त्यास मुंबईकडे पिटाळून लाविलें आणि गुजराथेंतही सुरतेपर्यंत लुटालूट करून इंग्रजांचा पिच्छा पुरविला. यामुळे इंग्रज अगदीं दीन झाला व तहासाठी भोंसले, शिंदे, अर्काटकर नबाब यांच्यामार्फत खटपटी करूं लागला. इंग्रजांस यावेळीं पक्कें कळून चुकलें की, मराठी राज्याचा मुख्य अधिकार जोपर्यंत नानाच्या हातीं आहे, तोपर्यंत ते राज्य जिंकण्याची आपली आशा मृगजळाप्रमाणें होय. नानाच्या व शिंद्यांच्या मनांत दिल्लीचा बादशहा आपल्या हाती आणून त्याच्या निमित्तानें मराठी राज्याचा दरारा सर्व उत्तरेंत आणि इंग्रज, निजाम, रजपूत, अर्काटकर वगैरे मंडळींवर बसवावा असे होतें. यापूर्वी दिल्लीस इंग्रजांचा शह बसला होता. आतां इंग्रज इतका घाबरला की, दिल्लीचा पातशहा व सारी भानगड मराठ्यांस देण्यास तो कबूल होऊन नाना सांगतील त्या अटींवर तह करण्यास तयार झाला. शेवटी शिंद्यांच्या मर्फत सालबाई येथें तह होऊन, साष्टीखेरीज मराठ्यांचा घेतलेला सर्व मुलुख आणि दादासाहेब यांस इंग्रजांनीं मराठ्यांच्या हवाली केलें. याप्रमाणें हें सहा वर्षे चाललेले युद्ध यावेळी बंद झाले (१७८२).

या प्रसंगी इंग्रजांनीं एक डाव टाकला होता, पण नानानीं तो ओळखला व खोडूनहि टाकला. फत्तेसिंग गायकवाड हा इंग्रजांस मिळाला होता. इंग्रजांनीं फत्तेसिंगाच्या मदतीनें अहमदाबाद घेतलें. इंग्रजांचे म्हणणे कीं, अहमदाबाद फत्तेसिंगास द्यावें. नाना म्हणत, फत्तेसिंग हा आमचा जहागीरदार, त्याला ही गुजराथची सरकारी राजधानी काय म्हणून द्यावी? शिवाय स्वराज्यावर प्रसंग आला असतां फत्तेसिंग फितूर झाला, मग अशाला काय ही बक्षिसी द्यावयाची? तसेंच, फत्तेसिंगास त्याच्या जाहगिरींतील कांहीं प्रांत इंग्रजांस द्यावयाचा काय अधिकार? तो स्वराज्यांतील एक नौकर होय. अशामुळें जहागीरदार स्वतंत्र बनतील व मराठी साम्राज्याचे दुवे निखळतील. हे दुवे निखळण्याच्याच उद्देशाने इंग्रजांनीं हा फत्तेसिंगाचा डाव टाकला होता. शेवटी नानानीं फत्तेसिंगास अहमदाबाद दिलें नाही व पेशव्यांस पूर्ववत खंडणी देऊन त्यांची सांगतील ती नौकरी बजाविण्याची त्याची कबुली घेतली आणि इंग्रजांचा डाव विसकटून टाकला.

नानांस इंग्रजांच्या स्वभावाच्या बारीकसारीक गोष्टी माहीत होत्या. इंग्रज लोक इतरांशी तहनामे करतांना कसे दुटप्पी शब्द वापरतात व त्यांच्या बळावर पुढें कशी राजकारणें करतात याबद्दल नानानीं महादजीस लिहिलें कीं, ``इंग्रजांशीं तहनामा करणें तो फार वचार करून करावा लागतो. त्यांचे बोलण्यांत व लिहिण्यांत एका अक्षरांत फार पेंच असतात. ही पुरती माहितगारी येथें (आम्हांस) आहे. ...पुढील मागील गुणदोष फार पहावे लागतात.’’

सवाईमाधवराव सव्वातीन वर्षांचे झाल्यावर मातुश्री गंगाबाई ही नवज्वरानें वारली (१३ जुलै १७७७) ग्रँट डफ व नानांचा चरित्रकार म्याकडोनल्ड यांनीं गंगाबाई व नाना ह्यांच्याबद्दल कुत्सित व खोटी गोष्ट लिहिली आहे. ही गोष्ट दादांच्या पक्षानें उठविली. तसेंच दादांजी बाजू तेवढी चांगली, त्यांस पदच्युत करणारे सगळे लबाड व नीच, असें ठरविण्याकरितां तत्कालीन मुंबईकर इंग्रजांनीं भलभलतें लिहून ठेविलें. ``गोपिकाबाईनें दादा व बापू यांच्या खुनाचा बेत केला होता. सवाईरावसाहेब हा मुळीं गंगाबाईचा पुत्रच नाही... बापू हा अक्षरशत्रु’’  वगैरे. ``असले खोडसाळ प्रकार लिहिणारांनींच, नाना व गंगाबाई यांच्याविषयी ही बातमी कशावरून उठविली नसेल?’’ (खरे- नानांचें चं. पृ. १०७). नानांवर पेशवेकुलाचे फार उपकार होते, त्यांबद्दल त्यांनीं काढलेले अनेक कृतज्ञतेचे उद्गार आढळतात. त्यांची स्वामिभक्ति निस्सीम होती, ते धर्मशील, पापभीरु व सदाचरणी होते; एकदां नानासाहेब पेशव्यांच्या दुसर्‍या बायकोनें त्यानां जेवण्यास स्वत: वाढलें असतां, ``मातोश्रीकडून लेंकरास वाढविलें’’ असे उद्गार नानांनीं काढले आहेत. एखंदरींत असल्या वर्तनाच्या माणसाकडून वरील गोष्ट घडणें शक्य नाही. शिवाय डफनें आपल्या म्हणण्यास आधार दिला नाहीं. तसेच मराठी किंवा मुसुलमानी कोणत्याहि बखरींत किंवा जुन्या कागदपत्रांत चुकूनहि असला उल्लेख आढळत नाहीं; सारांश, ही गोष्ट निखालस खोटी आहे.

सवाईरावसाहेबांस लहानपणीं नाना फार जपत. त्यांच्या परवानगीशिवाय पुरंदरास कोणाचाहि प्रवेश होत नसे. पांच वर्षे झाल्यावर पेशव्यांस पुण्यास आणलें. त्यांची मुंज व लग्न नानानींच मोठ्या हौसेनें व लाखों रुपये खर्चून केलें. लग्नाच्या थाटाची हकीकत पेशव्यांच्या बखरींत दिलेली आङे. पेशव्यांनां सर्व प्रकारचे शिक्षण नानानीं दिलें. पेशवे थोडेसे मोठे झाल्यावर नाना त्यांस दररोज चार घटका दरबारांत घेऊन बसत. याप्रमाणें राज्यकारभाराचेंहि ज्ञान नानानीं त्यांस थोड्या काळांत करून दिलें. यापुढें हैदरावरील मोहिमांत नानानीं लक्ष्य घातलें. मराठे हे इंग्रजांकडे गुंतले असतां हैदरानें त्यांचा कृष्णेकडील प्रांत बळकावला, व नेहमींची खंडणीहि दिली नाहीं. तेव्हां नानानीं एक मसलत केली; हैदरापासून उपद्रव होऊं नये व इंग्रजांसहि जरब बसावी, म्हणून नानानीं हैदराशी तह केला. व त्यास इंग्रजांवर पाठविलें. हैदरास नवीन राज्य जिंकावयाचें होतें, तर नानानांस स्वराज्य राखावयाचें होतें, म्हणून हैदराची व इंग्रजांची जुंपली कीं, तो परस्पर तितका हीनबल होईल, मग आपल्यास त्याच्यापासून आपला प्रांत सोडवून घेतां येईल आणि इंग्रजांनांहि यामुळें आयती तंबी पोंहोचेल; याप्रमाणे कांट्यानें कांटा काढण्याची नानांची मसलत होती. इतक्यात हैदर मेला; त्याबद्दल नाना म्हणतात ``हैदर वारला, तेव्हा इंग्रज शेर (वाघ) होतील... हैदरास इंग्रज वचकत होता.’’

पुढें टिप्पू खंडणी देईना म्हणून नानानीं निजामाची मदत घेऊन त्याच्यावर स्वारी करण्याचें ठरविलें. यासाठीं निजामअल्ली व नाना यांची भेट यादिगरी येथें झाली. टिप्पूनें निजामास आपला मांडलिक म्हणून संबोधून आपलीं वजनेंमापें सुरू करण्यास हुकूम पाठविला होता. या अपमानानें चिडल्यानेंच निजाम हा नानांस मिळाला.

मध्यंतरी नानांस पकडण्याचा एक कट उघडकीस आला व नानानीं त्याचा बंदोबस्तहि केला हा कट कोपरगांवीं असलेल्या आनंदीबाईनें शनवारवाड्यांतील बळवंतराव पटवर्धनाच्या साहाय्यानें केला होता. नानानीं आनंदीबाईस मात्र कांहीं शासन केलें नाही (आणि याबद्दल ग्रँट डफ त्यांची स्तुतीच करतो); कारण पेशव्यांच्या राज्यास धोका न पोंचावा म्हणून दादा व त्यांची मंडळी यांचा जरी नानानीं कडक बंदोबस्त केला होता, तरी त्यांच्याशीं वागण्यांत त्यानीं सेवकपणाचें अतिक्रमण केलें नव्हतें. शिवाय नाना दयाळु व अधिकाराच्या जोरावर यत्किंचितहि अन्याय घडूं नये म्हणून काळजी वाहणारे असत. त्यांचा खासगी द्वेष, ते सरकारी कामांत केव्हांहि आणीत नसत. शत्रूवरील स्वार्‍यांच्या पूर्वी त्यांच्याकडील फौजेंतील व राज्यांतील लोक आणि फौजबंद सरदार भेद करून त्यांनां कमकुवत करण्यांत नेहमी नानांच्या मसलती चालत; याबद्दलचीं त्यांचीं पत्रें प्रसिद्ध झालीं आहेत.

नानांचा वचक सरदारांस फार असे. बदामीच्या लढाईंत बरेच दिवस वेढा पडून झाले तरी किल्ला पडेना, म्हणून एके रात्रीं लष्करांतील व्यवस्था पाहण्यास नाना वेष पालटून बाहेर पडले. पटवर्धनांच्या तंबूंत परशुरामभाऊ व इतर सरदार बुद्धिबळें खेळत होते, तें नानानीं चोरून पाहिलें, इतक्यांत भाऊचें लक्ष्य त्यांच्याकडे गेलें. त्यावर लगेच सर्व सरदार एकत्र बसून दुसर्‍या दिवशीं हल्ला करण्याचें ठरून पुढें लवकरच किल्ला घेतला गेला. टिपूवरील या पहिल्या लढाईंत त्याचा पराभव होऊन मराठ्यांनां ३० लाख रुपये रोख व बदामी, कत्तूर, नरगुंद वगैरे प्रांत मिळाला (१७८७ मार्च व एप्रिल) नाना बदामीहून परत फिरले होते.

टिप्पूचा समूळ नाश करण्याच्या विरुद्ध नाना होते. टिप्पू ही एक इंग्रजांच्या उरावर सर्वकाळ लटकणारी तरवार आहे, ती नाहींशी झाल्यास ते प्रबळ होऊन पेशवाईस उपद्रव देतील; यासाठीं टिप्पू दीन होईपर्यंत मात्र त्याच्या विरुद्ध इंग्रजांस मदत द्यावयाची; त्याला जमीनदोस्त करावयाचे इंग्रजांनी मनांत आणिल्यास त्यांस नाना तर्‍हांनीं अडवून तसें होऊं द्यावयाचें नाहीं, याप्रमाणें नानांचा निश्चय होता व या मोहिमेंत तसें वागण्याबद्दल त्यांनीं हरिपंत व परशुरामभाऊ यांस हुकूम दिला होता (१७९१). त्यामुळेंच इंग्रजांनीं श्रीरंगपट्टणाच्या तहाच्या वेळीं टिप्पूनें सबंध राज्य घेण्याचा हट्ट धरला असतां हरिपंतानें सक्तीची रदबदल करून टिप्पूचें अर्धे राज्य घेऊन त्यास कायम राखलें.

नाना व महादजी शिंदे यांच्यांत चुरस होती, ती या सुमारास वाढत गेली. महादजी हा शूर, चतुर पण महत्त्वाकांक्षी होता; पेशवाईचा सारा कारभार आपण पहावा, एवढेंच नव्हें तर आपण पेशव्यांपासून स्वतंत्र व्हावें अशीहि त्याची इच्छा व प्रयत्न होता. प्रथम नानांप्रमाणेंच त्यांना इंग्रजांशीं द्वेष होता, पण पुढें त्यानें त्यांच्यांशीं गुळचट बोलणी सुरू केली. वडगांवच्या लढाईनंतर दादा व त्यांची मंडळी यांनां, प्रसंगीं नानांच्या विरुद्ध सोडण्यासाठीं त्यानें आपल्याजवळ ठेवून घेतली. सालबाईच्या तहांत महादजी हा स्वतंत्र संस्थानिक असून, त्यावर आपला विश्वास आहे आणि पेशव्यांनां कांहीं राजकारण आपल्याशी करावयाचें झाल्यास तें महादजीमार्फत करावें, असें इंग्रजांनीं जाहीर केलें. यामुळें नानांच्या मनांत महादजीबद्दल तेढ आली. त्यावेळी प्रसंग पाहून ते गप्प बसले. पुढें पुढें स्वत:चा कारभार महादजी घेईल, यापेक्षां तो पेशव्यानां निर्माल्यवत करून स्वराज्यांत इंग्रजांचा शिरकाव करून देईल ही भीति नानांस जास्त वाटे. यासाठीं नानानीं होळकर, भोंसले, पटवर्धन वगैरे जुने नवे मराठे व ब्राह्मण सरदार एकत्र करून प्रत्येक मसलत सर्वांच्या विचारें करण्याचा प्रघात पाडला, व शिंदे-इंग्रजांची जूट फोडण्याचा प्रयत्न चालविला, तो पुढें बव्हंशीं सिद्धीस गेला. याच सुमारास पाटीलबावाने दिल्ली व आग्रा ताब्यांत घेऊन, पातशहास दरमहा ६५ हजारांचा तनखेदार करून आणि वकील-ई-मुतलखीचें पद पेशव्यांसाठी मिळवून दख्खनमध्यें प्रयाण केलें (१७९२).

मध्यंतरी दिल्लीच्या राज्यांतील कांहीं मुसुलमानी अमीर व रजपुतांनीं बंड केल्यानें व तें मोडण्यासाठी महादजीनें मदतीची विनंति केल्यावर, नानानीं मनात मत्सर वगैरे न ठेवतां ताबडतोब होळकर व अलिबहाद्दर यांस मोठ्या सैन्यासह महादजीच्या कुमकेस पाठविलें होतें. एकदां तर महादजीनें नानांच्या मत्सरानें आम्ही ``आणखी छायेस पोट भरूं’’ असें त्यांना कळविलें असतां त्यानीं त्यांचें समाधान करून लिहिलें की, ``ज्यांच्या घराण्याचे एकनिष्ठेचे बाणे चालत आले त्यांच्या चित्तांत हीं अक्षरें येणारच नाहींत... रती इतकी दरज (फट) असतां शत्रूस बळ येतें.’’

पाटीलबाबा पुण्यास कां आला, याबद्दल त्यावेळीं अनेक तर्क प्रचलित झाले. त्यांपैकीं एक, नानांच्या जागीं आपण कारभारी व्हावें असा होता असें म्हणतात. यासाठीं दरबारांत त्यानें अति लीनतेची वागणूक ठेविली, परंतु त्याचा उपयोग होईना;  शेवटीं खुद्द श्रीमंतांसच आपलेसें करण्याचा त्यानें प्रयत्न केला. वय लहान असल्यानें श्रीमंतानीं त्याचें बोलणें ऐकून घ्यावें. या जोरावर एकदां महादजीनें भर दरबारांत नानांची निर्भत्सना केली. महादजी म्हणे, उत्तरेकडील मुलुख मीं मोठ्या कष्टानें मिळविला, त्याची वहिवाट मला सांगावी व त्याबद्दल झालेला खर्च मिळावा. नाना म्हणत आजपर्यंतचा जमाखर्च दाखवा मग जें काय देणें घेणें निघेल तें पाहूं. एके दिवशीं संधी साधून पर्वतीच्या तळ्यांत (लोहगांवच्या नदींत असें एके ठिकाणीं लिहिलें आहे) महादजीनें, नानानां घरी बसवून आपल्याला कारभारी करण्याबद्दल स्पष्टपणें श्रीमंतांस विनंति केली; तेव्हां, त्यानीं नाना व तुम्ही माझे दोन हात आहांत, असें सांगून त्यास गप्प बसविलें. ही बातमी नानानां समजल्यावर त्यानीं पेशव्यांची एकांतांत गांठ घेऊन, स्वराज्याची आपण कशी सेवा केली, पेशवे गर्भस्थ असल्यापासून आतांपर्यंत दौलतीचा कसा बचाव केला, तें सांगून आपला वीट आला असल्यास आपल्यास काशीस जाण्यास परवानगी द्यावी अशी त्यानां स्पष्ट विनंती केली. ``तेव्हां श्रीमंतांस गहिंवर आला व ते नानांच्या गळां पडलें.’’ त्यांनीं हा बेत खोडून काढला. पुढें आपला बेत सिद्दीस जात नाही असें पाहून दूरदर्शी महादजीनें हरिपंत फडक्याच्या विद्यमानें नानाशीं समेट केला. परस्परांनीं आणभाक घेऊन मराठी राज्याकरितां एकत्र खटपट करण्याचें ठरविलें. नानानीं पाटीलबावास सांगितलें कीं, ``सरदारी माझी व फडणविशी तुमची’’ असें म्हटलें व पाटीलबावानें ``जेथें आपण आहां तेथें मी आहें... आपण भाऊ भाऊ खावंद एक’’ असें म्हटलें. परंतु दुदैर्वानें यानंतर थोड्याच दिवसांत पाटीलबावा वारला (मार्च १८९४). त्यामुळें नानांचा एक हात तुटला; इंग्रजांची जरब नाहींशीं झाली. हरिपंत फडकेहि याच वेळीं मरण पावून मराठी राज्याची व नानांची मोठी हानी झाली.

यानंतर खर्ड्याची लढाई झाली. तिच्या पूर्वी इंग्रजांनीं एक डाव टाकला होता; पण तो नानानीं व शिंद्यांनी मोडून काढला. निजामाकडे दोन कोटींची मराठ्यांची बाकी होती; तो ती देईना तेव्हां इंग्रज म्हणू लागले कीं, आपण दोघांत सख्य करून देतो; आणि जो कोणी ऐकणार नाही, त्यावर दुसर्‍याची मदत घेऊन चढून जातों. यावर नाना म्हणाले कीं, आमचें वाजवी येणें वसूल करण्यास आम्हांस कोणाचें भय आहे? व ही मध्यस्थी कशास पाहिजे? मध्यस्थाच्या ढोंगानें इंग्रज आमचे हातपाय बांधून टाकणारा कोण? टिप्पूस समूळ बुडविल्यास आम्ही प्रबळ होऊं अशी इंग्रजांस भीति वाटल्यानें ते ही ढवळाढवळ करीत आहेत. शेवटीं नानानीं इंग्रजांस धुडकावून लावलें व हा इंग्रजांचा डाव हुकला.

नानांच्या इच्छेप्रमाणें सर्व मराठे व महाराष्ट्र पेशव्यांच्या अंमलाखालीं एक होऊन या खर्ड्याच्या लढाईत उभा राहिला. मराठ्यांचें सर्व वैभव जें यावेळी दिसलें ते अखेरचेंच. या मोहिमेंत अथपासून इतिपर्यंत सर्व कारभार नानानींच केला. त्यावेळचा त्यांच्या हातचा पत्रव्यवहार ग्रँट डफने पाहिल्याचें त्यानें लिहून ठेविलें आहे. खुद्द पेशवे व नाना या लढाईंत हजर होते (१७९५ मार्च). या लढाईनें भर दरबारांत स्वत:चें व पेशव्यांचें सोंग आणविणार्‍या निजामास नानानीं दांतीं तृण धरण्यास लाविलें व त्याला जाणविलें कीं, ``ब्राह्मणी राज्य कैदवार, एकापेक्षां एक मसलती.’’

यापुढें नानांस वाईट दिवस येत चालले. नाना अचाट कल्पक होते. परंतु त्या कल्पना कृतीत उतरण्यास त्यास पूर्वी महादजी व हरिपंत यांच्यासारखे स्नेही होते. यानंतर मात्र ते नसल्यानें नानानीं जरी मोठमोठी कारस्थानें लढविलीं तरी मराठी साम्राज्य तगलें नाही व स्वत: त्यांसहि अनेक संकटे भोगावी लागलीं.

नानानीं हैदर, निजाम, इंग्रज वगैरे परकीय दरबारी आपले विश्वासू वकील ठेविले होते. त्यांच्या कचेरीस फड म्हणत व तींत ३००-४०० कारकून असत. या कचेरींत सर्व राज्याच्या जमाबंदीचे, लष्करचे व जहागिरीचे हिशेब तपासले जात. नानांच्या वेळीं रामशास्त्री प्रभुणे व अय्याशास्त्री हे मुख्य न्यायाधीश असल्यानें न्याय चोख मिळत असे. परराज्यांशीं लढाया व कारस्थानें करण्याकडे नानांचा काळ फार गेला. त्यामुळें राज्यांत अंतर्गत व्यवस्था करण्यास त्यास फारसें फावलें नाहीं. तरी पण त्यांनीं प्रजेच्या सुखासाठीं कांहीं गोष्टी नवीन केल्या व काहीं जुन्यांत फेरफार केला; न्यायाच्या कामीं शेवटचें अपील नानांकडे (व पेशव्यांकडे) येई. देहांत शिक्षेस पेशव्यांची मंजुरी लागे. नानांच्या कारकीर्दीत (सवाईरावसाहेबांच्या वेळीं) पेशवाईचें उत्पन्न दहा कोटींचे होतें. त्यांत खुद्द पेशव्यांच्या हाताखालीं अडीच कोटींचा प्रांत होता. सदाशिवरावभाऊनें स्वराज्याची मोजणी करून जमिनीची प्रतबंदी सुरू केली होती; तीच पुढें नानानीं पूर्ण केली (१७८०); हिला `कमाल’ असे म्हणत. बागाईत जमिनीस दर बिघ्यास सहा रुपये, व तीन रुपये; आणि जिराईत जमिनीस दर बिघ्यास दोन रुपये; सव्वा रुपया; एक रुपया;  बारा आणे अशी वर्गवारी लाविली होती. महालावरील मामलेदार दर वर्षी बदलले जात; त्यांनां नेमतांना त्यांच्याजवळ मागच्या वर्षाच्या पक्क्या जमाखर्चाचें पत्रक देत व त्या धोरणानें अंदाजपत्रक आंखून खर्च करण्यास सांगण्यांत येई. सालअखेरीं सरसालचा जमाखर्च गतसालच्या जमाखर्चापेक्षां जास्तकमी झाल्यास मामलेदारास त्याचीं कारणें दाखवावीं लागत असत. यावरून प्रजेचीहि स्थिति कळून येत असे. जमिनीवर सारा अमुक मर्यादेपर्यंत बसवावयाचा असा कायमचा नवीन नियम नानानीं केला; गांवच्या हिशेबांतून बिनपिकाऊ जमीन गाळून टाकली; पूर्वी तिच्यावरहि सारा आकारीत. यामुळें, अखेरीस तोटा न होतां सरकारचा व प्रजेचा फायदाच झाला. तगाई, सारामाफी, तहकुबी वगैरे प्रकार सुरू होते. सारावसुलीसाठीं सरकारनें कुळाचें घरदार कधीहि विकलें नाहीं. सरकारी अधिकार्‍यानें जुलूम केल्यास प्रजेच्या फिर्यादीकडे नाना ताबडतोब लक्ष्य देऊन, योग्य तो निकाल देत. शेतकरी व गरीबगुरीब यांचे नाना हे मित्र होते. त्यांची जमाबंदींतील वाकबगारी, न्यायनिष्ठुरता व दयाळु अंत:करण त्याकाळीं प्रसिद्ध होतें. त्यांच्या कारकीर्दीत प्रजा सुखी असल्याचें प्रमाण असें कीं, इ.स. १७९२ मध्यें महाराष्ट्रांत भयंकर दुष्काळ पडला, तरी पण रयत परागंदा न होतां जागीच राहून तिनें तें वर्ष काढलें.

नाना हे उंच, सडपातळ, किंचित काळसर, गंभीर मुद्रेचे असून त्यांचे डोळे अतिशय पाणीदार, तीक्ष्ण व चंचल होते, असे ग्रँट डफ लिहितो. आहारविहार अत्यंत नियमित असल्यानें त्यांची प्रकृति निरोगी होती; मात्र उतारवयांत वडिलार्जित पोटशुळाची व्यथा त्यानां जडली होती. अतिरिक्त विषयवासनेशिवाय त्यानां कोणताहि दुर्गुण नव्हता. ते अत्यंत भक्तिमान होते. या परस्परविरुद्ध गोष्टींविषयीं पहातां असें दिसतें कीं, नानासाहेब पेशव्यांच्या वेळेपासून पेशवाईंत वाढलेल्या मिजासीचा त्यानां संपर्क झाला असावा, मात्र त्यांचा मूळचा अंकुर वैराग्याकडे वळलेला असावा. ते स्वत: म्हणत कीं `ही पापवासना माझ्या मामाच्या वंशाकडून (मेहेंदळे घराणें) माझ्या अंगीं खिळली.’ ते अत्यंत उद्योगी, चतुर, अतिशय नियमित, सचोटीचे, वचनाचे धड, धर्मनिष्ठ, खरें बोलणारे, दयाळु, परोपकारी (परोपकाराच्या गोष्टी त्यांच्या हातून फार घडल्या) होते. त्यांच्या उघड स्वामिभक्तीबद्दल व स्वदेशाभिमानाबद्दल सांगण्याची जरुरीच नाही. त्यांचा वतनी गांव वेळास हा इंग्रजांच्या ताब्यांत होता; तो त्यानीं सहज सोडवून घेतला असता, पण ते म्हणत कीं, ``सराकरची साष्टी सुटली नसतां आपला गांव सोडवून घ्यावा हें ठीक नाहीं.’’ त्यानीं सातारकर महाराजांस प्रतिबंधांत ठेविलें याचें कारण, महाराज ठरलेल्या राज्यव्यवस्थेंत ढवळाढवळ करूं लागले त्यामुळें स्वराज्यास उपसर्ग होऊं लागला हें होय. गंभीर वृत्ति, मोजकें भाषण व बहुश्रुतपणा त्यांच्या अंगी होता. मोरोपंतानें नानांची वकिली आपल्या `गंगावकिलीं’त केली आहे. नानानां थट्टामस्करी आवडत नसे व ते फारसे कधीं हंसत नसत. त्यांस हंसविण्यास लावल्याच्या व त्यांच्या चातुर्याच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत.

त्यांची दिनचर्या अशी असे- अरुणोदयी मुखमार्जनाच्या नंतर अगदीं जरुरीची कामें पाहून मग स्नानसंध्येंत दोन तास जात. पुढें प्रहर दिवसां वेलबागेंत पूजा करतांना शहरांतील बातम्या व बाजारनिरख ऐकणें; मग भोजन; त्यावर विश्रांति; त्यानंतर राज्यकारभार, तो सायंकाळपर्यंत चाले; नंतर सरकारवाड्यांत अगर देवदर्शनास जाणें; यापुढें निरनिराळ्या कामगारांच्या वर्द्या घेणें व नवीन कामें नेमून देणें; रात्री संध्या व जेवण झाल्यापासून मध्यरात्रीपर्यंत गुप्त हेरांच्या बातम्या ऐकणें, राजकारणीं पत्रव्यवहार करणें व मसलती रचणें, नाना झोंप कायती दीड प्रहरच घेत असत.

नानांचें कुलदैवत गणपती व जोगेश्वरी; परंतु हरिहरांवर त्यांची फार भक्ति असल्यानें त्यानीं त्यांचींच देवळें बांधलीं. ज्योतिषावर त्यांचा फार विश्वास होता. आपल्या आप्तमंडळीस त्यानीं योग्यतेवांचून सरकारी नौकर्‍या दिल्या नाहींत, त्यानां आपल्या खाजगींतून नेमणुका मात्र करून देत. त्यांस अनेक राजकारणें खेळावीं लागलीं, अनेकदां संकटांस तोंड द्यावें लागलें, अशा वेळीं पैसा उपयोगी पडतो हे त्यांस माहीत असल्यानें त्यानीं पैशाचा संचय आस्थेनें केला. त्यानीं आपल्या ठेवी हिंदुस्थानांत ठिकठिकाणी नामांकित पेढ्यांवर ठेविल्या होत्या; ती ठिकाणें त्यांचीं त्यांसच माहीत होती. आयुष्याच्या शेवटच्या प्रसंगी स्वराज्याकरितां व स्वत:च्या अब्रूसाठी त्यानीं दीड कोटींचा खर्च केला; ते कंजूष नव्हते.

नानांजवळ इतकी संपत्ति कशी आली? त्यानीं लचलुचपतीनें ती मिळविलीं, असें अज्ञानामुळे कांहींजण म्हणतात; ते मिथ्या आहे. याबद्दल खरी हकीकत अशी आहे- त्यांनीं थोरल्या माधवरावांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी (नाना कारभारी होण्याच्या आधीच) त्यांच्याजवळ पुष्कळ पैसा होता (सिले. स्टेट पेपर्स बाँबे, २५०), म्हणजे तो वडिलोपाजिर्त होता. त्या काळीं सर्व हिंदुस्थानांत अशी पद्धत होती कीं, जहागिरदार किंवा संस्थानिक मेल्यास त्याचा वारसा द्यावयाचा असेल, सरदारास गुन्हा माफ करावयाचा असेल, परकीय दरबारास मदत मागावयाची असेल, किंवा तह करावयाचा असेल, तर अशा वेळीं सम्राट दरबारास व त्यांतील मुख्य मुख्य कारभार्‍यांस नजराणा, दरबारखर्च, गुन्हेगारी अशा कांहीं तरीं रूपानें लाखों रुपये मिळत; त्या रीतीप्रमाणें खुद्द पेशवे व त्यांचे कारभारी (यांत नानाहि असत) यांनां या रकमा मिळत. हैदरानें एका तहाच्या वेळी शिंदे, फडके व नाना आणि इतर दोन मुत्सद्दी या सर्वांना ३।। लक्ष होन दिले; त्यांत नानांच्या वाटणीस १ लाख होन आले (पत्रें, यादी २२९) याप्रमाणें नानांच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत सर्व हिंदुस्थानांत झालेल्या उलाढालींत त्यानां कोट्यावधि रुपये मिळण्याचा संभव आहे. या रिवाजास त्याकाळीं लांच घेणें असें मुळींच मानीत नसत. त्यावेळचे खुद्द इंग्रजहि असा लांच खात. इंग्रज वकील डेव्हिड अंडरसन यानें एकदां पाटीलबाबांस सांगितलें कीं सालबाईचा तह नानांच्या मर्जीप्रमाणें मी करून देतों. मला पेशवेसरकारानीं १।। लाखाची जहागीर द्यावी. नानांस सरकारांतून त्यांच्या इतमामाप्रीत्यर्थ ३ लाखांचें सालीना उत्पन्न होतें; तसेंच सार्‍या मराठी साम्राज्यांतील फडणवीस नेमण्याचा त्यांचा हक्क होता, त्याबद्दल त्या त्या लोकांकडून त्यांस १।। लाख मिळत; शिवाय छत्रपति, त्यांचे अष्टप्रधान आणि परराज्यें यांच्याकडून त्यानां मिळालेल्या जहागिरीचें उत्पन्न ५५ हजार येई; सारांश, सालीना एकंदर त्यांचें उत्पन्न पांच लाखांचें होतें, आणि एकंदर खर्च ३-३।। लाखांचा होता.

गारदी हे गोर्‍या लोकांनीं शिकविलेलें व मुख्यत: (मराठ्यांशिवाय) परकीयांचा भरणा असलेले लोक, त्यांच्यावर नानांचा मुळीच विश्वास नसल्यानें त्यानीं ५ हजार अरब चाकरीस ठेविले होते. गारद्यांच्या विश्वासघाताची उदाहरणे त्यांच्यादेखत घडलेलीं होतीं.

त्यांचे गुप्तहेरखातें उत्तम होतें; वाटेल तेथील गुप्त बातमी मिळविण्याबद्दल त्यांची ख्याति आहे व त्याबदल्लच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. इंग्रज आणि फ्रेंच यांचा संबंध आल्यापासून कलकत्ता, मद्रास, मुंबई, पांदेचरी, माही येथील बारीक सारीक बातम्याहि त्यानीं मिळविल्या. हिंदुस्थानाबाहेरील या लोकांच्या चळवळीकडे त्यांचें लक्ष असे. इंग्रज व अमेरिकेचें युद्ध, इंग्रज व फ्रेंच यांचीं भांडणेंहीं त्यानां अवगत होतीं. मात्र मराठी राज्यांत दुही पसरल्यानें या परदेशीय राजकारणाचा जितका फायदा करून घेतां आला असता तितका त्यांस घेतां आला नाहीं.

नानानीं नळ बांधून पुण्यास (सदाशिव पेठेच्या मोठ्या व पुष्करणीच्या लहान हौदांत) पाणी आणलें, बेलबाग संस्थान तयार केलें (त्याचे नियम त्यानींच करून ठेविले आहेत). स्वत:चा वाडा बांधला, काळ्या वावरांत मोठा बाग केला, गणेश पेठ व स्वत:ची (नानाची) पेठ वसविली.

नानांची पेठ- श्रीमंत सवाईमाधवराव पेशवे यांनीं कसबें पुणें येथें मुजुमदार यांची २५ बिघे जमीन होती तींतील ७ बिघे जमीन नानांची पेठ वसिवण्याकरितां घेतली. तिचा मोबदला हवेली तालुक्यांतील धानोरी येथील तितकीच जमीन मुजुमदार यांनां देण्यात आली. ता. २० एप्रिल १७९० रोजीं जमीन पेठेकरितां देण्यांत आली. गणेशपेठेच्या पूर्वेस, भवानीपेठेच्या उत्तरेस व रास्ते यांच्या पेठेच्या दक्षिणेस ओढा आहे तेथपर्यंत दक्षिणोत्तर रुंदी गज ४५० व पूर्वपश्चिम लांबी नागझरीपासून गज ६०० याप्रमाणें जागा पेठेच्या वसाहतीस दिली. या पेठेंत वसाहत करणार्‍या व्यापार्‍यांनां सात सालांची जकातीची माफी देण्यांत आली. या पेठेचें शेट्येपण नानांचा नौकर फिरंगोजी खाडे यास देण्यांत आलें होतें. [सवाईमाधवराव यांची रोजनिशी भाग ३, पृष्ठ ३५७]

शिवाय नानांनी १०-१२ वाडे बांधले. आवळस व खोपवलीस मोठा तलाव व धर्मशाळा बांधली, कोंकणांतून पुण्यास येण्याच्या वाटेवर हें गांव असल्यानें तेथें एक अन्नसत्र ठेविलें. भीमाशंकराचें देऊळ बांधण्यास प्रारंभ केला (त्यांच्या पत्नीनें तें पुढें पुरे केले) कायगांवटोकें, वेरूळ, काशी, मेणवली येथें घाट बांधले. यांशिवाय त्यानीं देवळें, मोठमोठ्या रस्त्यांवर पूल, धर्मशाळा, वहिरी, अन्नसत्रें, सडकेच्या बाजूनें झाडें लावणें वगैरे अनेक परोपकाराचीं कृत्यें केलीं. त्यांस कलाकौशल्याचा, चित्रांचा वगैरे नाद होता.

नानांस एकूण नऊ बायका होत्या; पैकी सात त्यांच्या हयातींत वारल्या; आठवी त्यांच्या मृत्यूनंतर चवदाव्या दिवशीं वारली; फक्त नववी जिऊबाई ही एकटीच मागें राहिली. नानांस एकंदर तीन अपत्यें (दोन मुली व एक मुलगा) झालीं, पण ती अल्पवयांतच मेली.

नानानीं सवाईरावसाहेबांस निर्माल्यवत केलें हा समज चुकीचा आहे. घाशीराम कोतवाल, तळेगांव दाभाड्याची मुसुलमान शिकलकराची पंचायत वगैरे प्रकरणांत नानांस न जुमानतां श्रीमंतानीं आपले अधिकार गाजविले होते. खर्ड्याहून परत आल्यावर ते अविचारी लोकांच्या नादी लागल्यानें त्याचा परिणाम राज्यास अपायकारक होईल म्हणून मात्र नानानीं त्यांस प्रतिबंध केला होता. दादांच्या पक्षाच्या लोकांनीं सवाईरावसाहेबांस रावबाजीबद्दल अनेक बनावट व करुणपर गोष्टी सांगितल्या; श्रीमंत वयानें लहान व दूरदर्शी नसल्यानें त्यांच्या मनावर त्यांचा परिणाम होऊन त्यांचा व रावबाजीचा पत्रव्यवहार सुरू झाला. नानानीं याबद्दल प्रथण सामोपचारानें श्रीमंतास अनेक प्रकारें सांगितले, परंतु त्याचा उपयोग झाला नाही; तेव्हां वरील पत्रव्यवहार पकडून त्यांचा बहुत निषेध केला. त्याचा परिणाम उलटा झाला. पेशवे उदास झाले व पुढें त्यांच्या बुद्धीस दिवसेंदिवस भ्रंश पडत चालला. त्यांत रावबाजीच्या मंडळीनें जास्तच भर घातली. शेवटी या भ्रमांतच वाताचा झटका येऊन सवाईरावसाहेबांनीं कारंज्यावर उडी टाकली व त्यानंतर तीन दिवसांनीं ते वारले (१७९५) आणि येथूनच नानासहि उतरती कळा लागली.

यानंतर गादीवर रावबाजीचा हक्क सहजच आला. परंतु नाना त्यास खालील कारणानें विरुद्ध होते. रावबाजी अदूरदर्शी, हलक्या कानाचा, कच्च्या दिलाचा, अविश्वासी, नाकर्ता होता. राज्यांत शांतता राखण्याचें, सरदार व फौज खूष ठेऊन त्यांच्याकडून राष्ट्रोपयोगी मोठमोठीं कामें घडवून आणणें, परराज्यांत मसलती उभारून सर्व हिंदुस्थानांत मराठी साम्राज्याचा दरारा बसविण्याचें हीं कामें घडवून आणण्याची कुवत त्याच्यांत नव्हती. त्यामुळें प्रजेची पायमल्ली होईल, सरदार बिथरून दंगे करतील, ते मोडण्यासाठीं रावबाजी हा इंग्रजांस घरांत घेईल आणि शेवटीं इंग्रजी बावटा शनवारवाड्यावर लागेल अशी नानांची विचारसरणी असल्यानें (व आपण दादांस व रावबाजीस नेहमीं विरोध केल्यानें तो आपल्या प्राणावरहि उठेल या कारणानेंहि) नानानीं प्रथम रावबाजीस गादीवर बसविण्याचें टाळलें व सरदार मंडळाच्या मदतीने दत्तक घेऊन राज्य चालिवण्याचें ठरविलें; आणि त्याप्रमाणें शिंदे, होळकर, भोंसले, पटवर्धन व रास्ते यांच्यापासून ``कायावाचामन:पूर्वक’’ शपथपत्रें घेतली. पण पुढें सर्वच उलट झालें; आणि रावबाजीबद्दलचें नानांचें भविष्य खरें ठरलें.

यापुढें सर्व घोंटाळा माजला. रावबाजीनें शिंद्याचा कारभारी बाळोबा पागनीस या शेणवी कारभार्‍यास व त्याच्यामार्फत दौलतरावास फोडलें व त्यांच्याकडून आपल्यास गादीवर बसविण्याचें वचन घेतलें. हें नानांस कळतांच त्यानीं परभारे परशुरामभाऊस पाठवून रावबाजीस शिवनेरीहून आणून गादीवर बसविण्याचें ठरविलें. हें एकतांच शिंदा मोठ्या फौजेसह एकदम रावबाजीस येऊन वाटेंतच मिळाला; त्यामुळे नाना घाबरले; बाळोबाचा नानांवर फार राग होता: त्याची महत्त्वाकांक्षा आपण नानाप्रमाणें कारभारी व्हावे. या बाळोबानेंच यापुढील बहुतेक सर्व इतिहास घडवून आणून मराठी राज्याचें नुकसान केलें. इंग्रजांस घरांत घेण्याच्या कामीं अगदीं मूळ कारण हाच होय. यानें कारस्थान करून परशुरामभाऊस नानाविरुद्ध फितूर केलें. जो भाऊ आतांपर्यंत नानांचा विश्वासू मित्र होता, तोहि कारभारीपदाच्या अमिषानें फितूर होऊन राष्ट्राचें नुकसान करणारा बनला. हा एक मोठा कलंक भाऊच्या चरित्रावर आहे. नानानीं रावबाजीचा निरोप घेऊन सातार्‍यास प्रयाण केलें. इकडे बाळोबानें रावबाजीस नजरकैद करून (कारण तो आपल्या कह्यांत राहणार नाहीं म्हणून) परशुरामभाऊच्या मदतीनें रावबाजीचा धाकटा भाऊ चिमाजीआप्पा यास यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक देऊन कारभार चालविला व भाऊकडे नानांस धरून आणण्याचें काम सोंपविलें. नानांच्या मित्राने (भाऊनें) तें काम पत्करिलें आणि नानांवर फौज पाठविली. तेव्हां नाना सातार्‍याहून वांईस गेले, तेथेंहि पटवर्धनाची फौज आल्यावर नाना महाडास गेले.

महाडास असतांना नानांनीं जें राजकारण उभारलें, तें अत्यंत महत्त्वाचें व आयुष्यांतील शेवटचें होतें त्यांत त्यांची परिपक्व तारतम्यबुद्धि, मनुष्यस्वभावाची पारख, साधनऔचित्य व महाराष्ट्रांतील त्यांच्या नांवाचा दरारा हीं दिसून येतात. या कारस्थानाचा थोडक्यांत सारांश असा- स. १७९६ चा पावसाळा जवळ आल्यानें चार महिन्यांत नानानीं आपली सर्व तयारी केली. कोंकणांतील सर्व घाट व प्रतापगड, रायगडादि किल्ले यांचा बंदोबस्त केला व दहा हजार फौज जमविली. तेव्हां भाऊनें पावसाळ्यांतहि नानांवर चालून जाण्याचा मनसुबा केला, परंतु नानांचे मित्र फडके, चक्रदेव यांनीं (हे पुण्यासच होते) त्यास मोडता घातला. तेव्हां भाऊनें नानांची जहागीर व त्यांचे पुण्यांतील वाडे जप्त केले. नानांनीं प्रथम दौलतराव शिंद्यास दहा लक्षांची जगाहीर वगैरे देण्याचें कबूल करून बाळोबाच्या विरुद्ध फोडलें; बाळोबाच्या सार्‍या उड्या शिंद्यांच्या फौजेवर होत्या. तुकोजी होळकर पूर्वीपासून नानांच्याच बाजूचा होता, त्यानें आपली सर्व फौज त्यांच्या हवाली केली. बाबा फडक्यानें हुजरात फितवून ठेवली, खुद्द रावबाजी व मानाची फांकडे नानांस मिळून त्यांनीं नानानीं पाठविलेल्या पैक्यानें फौजभरती चालविली, त्यामुळें भाऊ आणि बाळोबास संशय येऊन त्यानीं रावबाजीस सर्जेराव घाडग्याबरोबर बर्‍हाणपुराकडे जबरीनें रवाना केलें. वाटेंत रावबाजीने दौलतरावास दोन कोटींची बक्षिसी व सर्जेरावास त्याची दिवाणगिरी कबूल करून मध्येंच मुक्काम केला. इकडे फांकड्यानें फौज घेऊन वाईस मुक्काम केला. मशीरउल्मुल्क पुण्यास कैदेत होता, त्यास व त्याच्या तर्फे निजामअल्लीस नानानीं वळवून घेतलें; रघुजी भोंसलाहि नानांस मिळाला. भाऊच्या विरुद्ध नानांनीं कोल्हापूरकरास उठविलें व पटवर्धन मंडळींत भाऊबंदकी माजविली. इतकें कारस्थान शिजल्यावर नानांचे जे मित्र बाह्यत: भाऊच्या हाताखालीं होते, त्यांनीं मशीर यास सोडून आफल्या (भाऊ)ला मदत करण्यास त्यास सांगावें असें भाऊस सांगितलें; त्याप्रमाणें भाऊनें व बाळोबानें केलें. मशीरनें वरून त्यांचें म्हणणें कबूल केलें, आंतून तर तो नामांस सामील होता. शेवटी (२७ आक्टो.) नेमल्या दिवशीं दौलतरावानें बाळोबास कैद केलें, मशीरनें भाऊस धरण्यास फौज पाठविली, पण भाऊ चिमाजी आप्पास घेऊन जुन्नरास पळाला; तरी नारोपंत चक्रदेवानें त्या दोघांस धरलेंच; नंतर भाऊस व बाळोबास व कैदेंत ठेविलें; मग नाना महाडाहून पुण्यास आले रावबाजीहि तेथें दाखल झाले. नानांच्या सांगण्यावरून शिंदे व निजाम यांनीं रावबाजी तुम्हांस दगा देणार नाहीं अशी हमी त्यांस लिहून दिली व खुद्द रावबाजीनेंहि असेंच स्वदस्तुरचें पत्र लिहिलें. अखेर रावबाजीस गादीवर बसवून नाना त्याचे कारभारी झाले (२५ नोव्हें.). चिमाजीआप्पाचे दत्तविधान अशास्त्र ठरून भाऊच्या व बाळोबाच्या पक्षाच्या लोकांनां शिक्षा झाल्या. यावेळीं नानांच्या बरोबरीचे कर्ते मुत्सद्दी व मित्र नाहीसे होऊन जी नवीन पिढी आली तींत बहुतेक नादान, अदूरदर्शी, हलक्या कानाचे व कुचकामाचे लोक होते. दौलतराव शिंदा, रघूजी भोंसला, काशीराव होळकर, गोविंदराव काळे व खासा रावबाजी हे लोक असे होते. या लोकांनां नानानें स्वराज्यासाठी केलेल्या श्रमांची व खाल्लेल्या खस्तांची कल्पना नव्हती, एवढेंच नव्हे तर स्वराज्याचीहि फारशी किंमत नव्हती; फक्त आपापला स्वार्थ माहीत होता. दौलतराव पैशाचा लोभी व निर्बुद्ध होता, त्याचा कारभारी जिकडे वळवील तिकडे तो जाई. त्यानें रावबाजी गादीवर बसण्याच्या आदल्या दिवशी नानांस `अकृत्रिमपणें’ चालण्याबद्दल `उदी, बेलभंडार व पाटीलबावाचे पायाची शपथ’ दिली, पण पुढें थोड्याच दिवसांत विश्वासघातानें नानानां कैद केलें.

भोवतीं हलकट लोकांचा बुजबुजाट व खुद्द धनी दुर्बल आणि आपला द्वेष्टा असें पाहून राज्यकारभार सोडून स्वत: काशीस जाण्याबद्दल नानानीं रावबाजीस विनंती केली, परंतु त्यानें ती नाकारली. कारण त्याला शिंद्याविरुद्ध काहीं दिवस नाना पाहिजे होते. इतक्यांत तुकोजी होळकर वारल्याने नानांचा शेवटचाहि आधार तुटला. यावेळीं शिंद्यानें रावबाजीस दोन कोटींच्या रकमेचा तगादा लाविला. तेव्हां त्यानें नानांस कैद केल्याशिवाय इतकी रक्कम शहरांतून उभी राहणार नाहीं (कारण आपल्या स्वत:जवळ इतका पैका नाही) असें सांगितलें. शिंद्यानें ते कबूल केलें व या कामी भोंसल्यास आपल्याकडे वळविलें; परंतु नानांस हें समजतांच त्यांनी भोंसल्याची समजूत १० लाख रुपये रोख (आपल्या खाजगीतून) देऊन केली व त्यास वर्‍हाडांत पाठविलें. नानांस धरण्याच्या मसलतींत इतरहि पुष्कळ मंडळी होती. मध्यंतरी दौलतरावानें नानांच्या घरी जाऊन गोड बोलून आपल्याबद्दलचा त्यांच्या मनांतील संशय काढून टाकला व पुढें एकदोन महिने त्यानें नानांच्या मर्जीप्रमाणें वागणूकहि केली. यामुळें मात्र नाना फसले. त्यानीं हें सर्व खरेच मानले आणि थोड्याच दिवसांनीं दौलतरावानें आपल्या छावणीत दिलेलें जेवण्याचें आमंत्रण स्वीकारलें.

मेजवानीच्या पूर्वी एक दोन दिवस पदरच्या विश्वासू मंडळीनीं, जेवणांस जाऊं नये म्हणून नानांस पुष्कळदां सांगितलें, परंतु तें त्यानीं ऐकलें नाहीं. याच वेळीं शिंद्याचा एक यूरोपियन सेनापति मायकेल फेलोज यानें कपटनाटक करून नानांस फसविलें. ``त्या दगलबाज टोपीवाल्यानें बायबलावर हात ठेवून (दौलतराव तुम्हांस कैद करणार नाहीं अशी) शपथ घेतलीं व नानांस खातरजमेचें पत्र लिहून दिले’’ (खरे, पृ. २१२). शेवटी ठरलेल्या दिवशीं सायंकाळीं ५ हजार अरब बरोबर घेऊन नाना वानवडीस निघाले. भवानीपेठेपर्यंत गेल्यावर फेलोजच्या खात्रीवरून त्या सर्वांनां नानांनी जबरीनें परत फिरविलें. नंतर छावणींत दाखल झाल्यावर दौलतराव हा भेटीसाठी सामोरा आला. थोड्याच वेळांत खलबताच्या निमित्तानें शिंदा, त्याचा कारभारी व फेलोज आणि नाना असे चौघे एका तंबूत गेले आणि तेथेंच ठरल्याप्रमाणें फेलोजनें नानास कैद केलें. नानाबरोबर त्यांचे शेलूकर, शिरवळकर, वगैरे ५-६ विश्वासू लोकहि कैद केले (३१ डिसें. १७९७). पटवर्धनाचा वकील म्हणतो `याउपरी श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला.’ नानांस कैद केल्यावर त्यांच्या पक्षाच्या माणसांनां कैद करून त्यांचे वाडे लुटले; खुद्द नानांचाहि वाडा जप्त झाला आणि त्यांत सर्जेराव रहावयास लागून रोज `अजापुत्रांचा’ वध होऊं लागला. पुणें शहरांतील लोकांस नानांबद्दल फार प्रेम वाटत होतें, नाना गेल्यावर दोन कोटींची उभारणी करण्यासाठीं पेशव्यांच्या संमतीनें सर्जेरावानें पुण्यावर हत्यार धरिलें. मोठमोठे सरदार, शेट, सावकार यांना पकडून त्यांच्यापासून द्रव्य उकळण्याचा त्यानें सपाटा चालविला व अतिशय अनन्वित कृत्यें केली.

दौलतराव व महादजीच्या बायका यांच्यामध्ये या सुमारास बेबनाव झाला. त्यांत सर्जेरावानें जास्त भर घातली. बायांस नानांचे पूर्वीपासूनच साहाय्य होतें. त्यामुळें नानांस वानवडीस ठेवल्यास अधिक घोटाळा होईल म्हणून तीन महिन्यांनंतर दौलतरावानें त्यांची नगरच्या किल्ल्यांत रवानगी केली (६ एप्रिल १७९८). भोंसल्यास व निजामास जें पाहिजे होतें तें मिळाल्यानें त्यांनीं यावेळीं आपली (रावबाजीकडून नानांच्या केसास धक्का लावूं देणार नाहीं ही) हमी धाब्यावर बसविली.

नाना गेल्यावर थोड्या दिवसांनीं पेशवे व शिंदे यांत वितुष्ट येऊं लागलें. शिंद्यास त्याच्या सावत्र आयांनीं फार त्रास दिला. यावेळीं सातारकर महाराज हे स्वतंत्र होऊन त्यानीं कोल्हापुरकरांस मिळून स्वराज्यांत दंगा माजविला. तेव्हा पेशव्यांनीं परशुरामभाऊ, चक्रदेव आणि पिंगळे यांची सुटका करून तो थांबविला. यापुढें चक्रदेव व पिंगळे हे नानांचे विश्वासू असल्यानें त्यांनीं पेशवे व शंदे यांत मुद्दाम (नानांचीं सुटका होण्यासाठीं) तेढ उत्पन्न केली. त्यांनीं शिंद्यांच्या बायांस चिथविलें; त्या बायांनीं- शिंद्यानें त्यांनां कैद करण्याचा प्रयत्न केल्याने (अमृतराव पेशव्यांचा आसरा घेतला; तेव्हां सर्जेराव घाटग्यानें अमृतरावावरच हल्ला केला. यामुळें रावबाजीनें चिडून दौलतरावाचें पारिपत्य करण्यासाठीं निजामाची मदत मागितली व होळकर वगैरे सरदारहि बोलाविले. इकडे बाया कोल्हापूरकरांस मिळून त्यांनीं थेट गोदावरीपर्यंत जाळपोळ व लुटालूट केली. त्यांनां शिंद्यांच्या पदरचें सारें शेवणीमंडळ मिळालें; फौजेंतहि बरीच फितुरी झाली; उत्तरेस बंडाळी माजली; खर्चाची ओढ होऊन सावकारांची धरणीं बसलीं. याप्रमाणें सर्व बाजूंनीं अडचणींत आल्यावर दौलतरावानें नानांस सोडण्याचें ठरिवलें. सुटकेबद्दल दहा लाख व पुन्हां कारभारीपदावर नेमल्यानंतर पंधरा लाख रुपये देण्याचें ठरवून नानास पुण्यास आणलें (२१ जुलै १७९८) याप्रमाणें नाना पावणेसात महिन्यांनीं बंदींतून सुटले.

नाना सुटल्यावर त्यानीं निजामास गप्प बसविलें, पेशव्यांस स्वस्थ केलें, सर्जेरावास कैद केलें आणि बायांचीहि समजूत करून दौलतरावास दहा लाख रुपये रोख देऊन पैशाच्या अडचणींतून सोडविलें. यापुढें त्यांचें पेशव्यांशी साडेचार महिने समेटाचें बोलणें चाललें होतें. शेवटीं गारपिरावर दोघांच्या भेटी होऊन (८ सप्टेंबर) नाना व शिंदे पेशव्यांकडे भोजनास गेले आणि मग नाना वानवडीहून पुण्यास प्रथम वानवळ्याच्या वाड्यांत राहावयास गेले. नंतर स्वत:च्या वाड्याचें उद्धार्जन करून मग ते त्यांत रहावयास आले (२३ डिसेंबर).

नाना सुटल्यानें रावबाजीस पुन्हा भीति वाटल्यानें शिंदे पुणें सोडून जात होते त्यास त्यानें गुप्तपणें सांगितलें कीं, तुम्ही हातांत कारभार घ्यावा. परंतु नानानीं त्यास स्पष्ट सांगितलें कीं, तुमच्यावर माझा बिलकुल विश्वास नाहीं. शेवटी दौलतराव रहात नाही असें पाहून, एके दिवशी मध्यरात्री वेष पालटून, पेशवे नानांच्या वाड्यांत येऊन त्यांनी त्यांच्या पायावर डोकें ठेवून व डोळ्यांत आसवें आणून नानांची प्रार्थना केली कीं, ही मराठा पातशाही तुम्हीच सांभाळावी, तुम्हांस पडकण्यांत माझें अंग बिलकुल नव्हतें, तुम्ही मला वडिलांसारखें आहां. याप्रमाणें दीनवाणें भाषण ऐकून नानानीं पुन्हां कारभार करण्याचें कबूल केले. परंतु वरीलप्रमाणें शपथ घेऊनहि पेशव्यांनीं पुन्हा एकदां नानांस पकडण्याची मसलत चालविली. ती नानांस समजल्यावर त्यानीं पेशव्यांची कानउघाडणी करून कारभारातील लक्ष्य कमी केले व स्वत:चा वाडा सोडून सरकारवाड्यांत जाण्याचें टाळलें आणि चक्रदेव यांच्या हातीं बहुतेक कारभार सोपविला.

या सुमारास हिंदुस्थानांत लॉर्ड वेलस्ली हा गव्हर्नर जनरल आला. इंग्रज राज्यसंस्थापक मुत्सद्दी गव्हर्नर जनरलमध्यें याचें स्थान पहिलें धरितात. एतद्देशीय राजांच्या वैभवास व स्वातंत्र्यास मुठीत आणण्याची त्यानें एक मुत्सद्देगिरीची युक्ति योजली; ती म्हणजे प्रसिद्ध तैनाती फौजेची मराठ्यांच्या चौथसरदेशमुखीसारखीच ही सर्वग्रासी युक्ति होती. या युक्तीस नामशेष करण्याचें सामर्थ्य त्यावेळीं सर्व हिंदुस्थानांत फक्त एकट्या नानांच्याच अंगी होतें. एकजण मराठी साम्राज्य ग्रासूं पहाणारा होता व दुसरा आपल्या सर्वस्वाने तें तारूं पहाणारा होता. प्रथम निजामानें तैनाती फौजेचा तह केल्यावर इंग्रजांनीं पेशव्यांस विनंती केली; परंतु नानांच्या सल्ल्यानें पेशव्यानीं ती नाकारली. यावेळींच परशुरामभाऊ व नाना यांचा समेट झाला.

यापुढें इंग्रजांनीं टिप्पूवर शेवटची स्वारी केली, तींत ठरल्याप्रमाणें आपल्या सैन्याची मदत पाठवावी असें नानानीं पेशव्यांस सांगितलें; पण शिंद्यामार्फत टिप्पूनें पेशव्यांस तेरा लक्ष रु. चारले होते, त्यामुळें पेशव्यानीं फौजेची टाळाटाळ केली. पुढे इंग्रजांनीं टिप्पूचें राज्य घेतल्यावर पेशवे खजील होऊन मुलुखाची वांटणी मागण्यास तयार झाले. तेव्हां वेलस्लीनें एक पेंच टाकला. प्रथम तर वांटणीचें त्यानें नाकारलेंच, परंतु जर पेशवे तैनाती फौज ठेवतील, मराठे- निजामाचें भांडण तोडण्याचा मध्यस्थाचा अधिकार आपल्यास देतील, भोंसल्यास स्वतंत्र सत्ताधीश मानतील, पदरच्या फ्रेंचांस हांकलून देतील तर दहा लाखांचा प्रांत आपण देतों, असें तो म्हणूं लागला. सालबाईच्या तहानें महादजीला पेशव्यांच्या ताटाखालून जसें काढलें तसेंच आतां भोंसल्यास काढून पेशवाई दुर्बळ करावयाची ही युक्ति होती. ही कबूल करणें म्हणजे इंग्रजांच्या हाती जाणें असा उघड अर्थ होत होता. म्हणून नानानीं तें सर्वच फेटाळून लाविलें. अर्थात टिप्पूच्या राज्याची वांटणी मराठ्यांस मिळाली नाहीं.

इकडे कोल्हापूरकरानीं फार त्रास दिला, त्यास सातारकर चतुरसिंग याचें साहाय्य होतें. या दोघांनीं इतर सरदारांचा पराभव केल्यानें, नानानीं परशुरामभाऊस त्यांच्यावर पाठविलें. भाऊनें उतावळीनें पावसाळ्यांतच कोल्हापूरकरांवर स्वारी केली, तींत पट्टणकुडीच्या लढाईत भाऊ ठार झाला. हें वर्तमान ऐकून नानांस फार दु:ख झालें; मध्यंतरी जरी दोघांत बिघाड आला होता, तरी नाना म्हणत की, ``भाऊ निदानीचे सोबती होते.’’ नंतर नानांनीं रामचंद्र आप्पा (भाऊचा पुत्र) याच्या हाताखाली सरकारी फौज कोल्हापुरावर पाठविली व तिनें कोल्हापूरकरांस पराभूत केले. पण याच सुमारास नानांची प्रकृति फार बिघडली. नगरहून सुटल्यापासून त्यांची प्रकृति ढांसळलीच होती, बरोबरची मित्रमंडळी बहुतेक नाहीशी झाली होती, दरबारांत हलक्या लोकांचा भरणा होऊन, रावबाजीसारखा दुर्बळ धनी गादीवर आला होता, त्यामुळें नानाचें लक्ष्य कारभारांतून उडाले होतें. शके १७२१ च्या माघ वद्यांत त्यांस ज्वर येऊं लागला. तो दिवसेंदिवस वाढत चालला. फाल्गुन शुद्ध अष्टमीस पेशवे समाचारास आले. अखेर फाल्गुन वद्य तृतीयेस गुरुवारी मध्यरात्री नानांचें देहावसान झाले (१३ मार्च १८००) प्राणोत्क्रमणसमयीं पेशवे आले होते. अरबांनीं आपल्या पगाराचा फडशा करून घेतल्यावर मग नानांचे शव बाहेर काढूं दिलें. ``नदीवर दहा सहस्त्र माणूस मिळालें होतें. नानांकरितां शहरांत ते दिवशीं हाहाकार झाला.’’ याप्रमाणें या थोर पुरुषाच्या आयुष्याचा शेवट झाला.

नानांच्या स्वभावाची व गुणावगुणांची माहिती मागें आली आहेच. नाना वारले व मराठी साम्राज्य नष्ट झालें एवढें सांगितलें म्हणजे पुरे. ज्या इंग्रजांशी त्यांनी आमरण वैर चालिवलें, त्यांपैकीं एक (कर्नल पामर) म्हणतो कीं, ``नाना गेले व त्यांबरोबरच मराठी राज्यांतील शहाणपणा व नेमस्तपणा हीं लयास गेलीं.’’ लॉर्ड वेलस्लीनें पेशव्यानां पाठिवलेल्या दुखवट्याच्या पत्रांत लिहिलें कीं, ``बाळाजी पंडित हे बुद्धिमत्तेनें, कर्तृत्वानें आणि थोर सद्गुणांनीं ख्याति पावले होते, अशांचें मरण सर्वदा दु:खास कारण होतें, त्यांच्या वागणुकीचे नियम सचोटीचे असून त्यांचे हेतू प्रशंसनीय होते; ते आपल्या धन्याच्या राज्याचें कल्याण व उत्कर्ष होण्यासाठी सतत झटले.’’ शत्रूंनीं ज्याची अशी स्तुति गायली, त्याला त्याच्या लोकांनीं ``खूप शर्तिने राज्य राखिलें यशवंत फडणिस नाना’’ असें म्हटल्यास कांहीं नवल नाही.

नाना वारले तेव्हां त्यांच्या दोघी स्त्रिया बगाबाई व जिऊबाई या देवसेवेसाठीं सिद्धटेकास होत्या; त्यांनां हें वर्तमान समजतांच त्या पुण्यास येण्यास निघाल्या. वाटेत त्यांनां ताब्यांत घेण्यासाठी पेशव्यानीं फौज पाठविली. परंतु तिला बायांच्या बरोबरच्या अरबांनीं हुसकावून दिलें असें म्याकडोनल्ड म्हणतो. बाया पुण्यास आल्यावर बगाबाई नानांच्या पश्चात चवदा दिवसांनीं वारली. जिऊबाईचें वय यावेळीं नऊ वर्षांचें होतें.

नानांच्या अरबांचा पगार चुकता करून पेशव्यानीं त्यांचे वाडे, जहागीर व इनामी गांवें जप्त करून जिऊबाईस शनवारवाड्यांत आणून ठेविलें. नानांजवळील अफाट संपत्ति हातीं येण्यासाठीं पेशव्यानीं बाईस वाड्यांत आणिलें. दौलतराव शिंद्याचीहि त्या संपत्तीवर दृष्टी असल्यानें, त्यानें बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यांत देण्याबद्दल पेशव्यांस विनंति केली, पण पेशव्यानीं ती नाकारली. मागें नाना काशीस जाण्यास निघाले असतां त्यानीं रावबाजीकडून ज्या अटी कबूल करून आपला बेत रहित केला, त्यांत आपल्यास दत्तक घेण्याची अट होती व ती रावबाजीने स्वहस्ताने `येणेंप्रमाणें करार’ म्हणून कबूलहि केली होती. परंतु यावेळेस त्यानें तें सर्व नाकारले आणि नानांचा पक्का सूड उगवला.

यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळीस पेशव्यानीं प्रतिबंधात ठेविलें. यशवंतराव होळकरानें पुणें जाळलें, तेव्हां रावबाजी पळून गेले होते. जिऊबाई वाड्यांतच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावानें बाईस लोहोगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नौकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केलें. नानांचा मुख्य खजिना येथेंच असे. पुढें दोन वर्षांनीं जनरल वेलस्लीने मध्यस्थी करून बाईस दरसाल बारा हजारांची नेमणूक करून देऊन पेशव्यांच्या आग्रहावरून बाईस लोहोगड किल्ला सोडावयास लावला. नंतर बाई इंग्रजांच्या आसर्‍यानें पनवेलास पेशवाई नष्ट होईपर्यंत राहिली. पेशव्यांनीं तिला आपल्या ताब्यांत आणण्याची फार खटपट केली, पण ती त्यांच्याकडे आली नाही.

इंग्रजी झाल्यावर एलफिन्स्टननें बाईस पुण्यास आणून बारा हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गांव जप्तींतून मोकळे केलें. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिनें इ.स. १८२७ मध्यें मिरजेच्या गंगाधरराव भानू नांवाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीनें दत्तक घेऊन त्याचें नांव माधवराव ठेविलें व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली; परंतु इंग्रजांनीं तिचें कांहीं एक ऐकलें नाहीं. अखेर स. १८५४ च्या मार्चमध्यें जिऊबाई वारली. ती शहाणी व सदाचरणी असून तिनें अखेरपर्यंत नानांचें नांव निष्कलंक राखिलें. बाई वारल्यावर तिची नेमणूक इंग्रजांनीं बंद करून, इनामकमिशनच्या द्वारें मेणवली व बेलबाग जप्त केला. डलहौसीच्या संस्थानजप्तीच्या पुढील कार्याचा हा प्रथमचा आरंभ होता. पुढें माधवराव बल्लाळ फडणवीस यांच्या खटपटीनें बेलबाग संस्थान जप्तीतून सुटून, मेणवली गांवहि वंशपरंपरा इनाम मिळाला. माधवराव हे इ.स. १८९० त वारले. त्यांस संतान नव्हतें म्हणून त्यांच्या पत्नीनें भानूंच्या घराण्यांतील एका मुलास दत्तक घेऊन त्याचें नांव बाळाजी ठेविलें. सांप्रत हेच श्री. बाळाजी माधवराव ऊर्फ नानासाहेब फडणवीस विद्यमान आहेत (१९२५).

[संदर्भग्रंथ:- पेशव्यांची, भाऊसाहेबांची व नागपूरकर भोंसल्याची बखर; पत्रें, यादी- आत्मचरित्र- खरे- नाना फडणविसांचें चरित्र; अधिकारयोग; ऐ.ले. सं.भा. ४ ते ११; डफ; सिलेक्शन फ्रॉम स्टेट पेपर्स, बाँबे; पुणें ग्याझे. भा. ३: राजवाडे- खंड. २, ४, ७, १०, १३, १४; पेशवाईची अखेर; म्याकडोनल्ड- लाईफ ऑफ नाना फडणवीस; धाकटे शाहुराजे यांचें चरित्र; नॅरेटिव्ह बाँबे इनाम कमिशन; कैफियती.]

नानांचे दफ्तर- मेणवली येथे नानांचे दप्तर होते; त्यापैकी पुष्कळसे रुमाल इनाम कमिशनच्या वेळीं सरकारनें नेल्याचें समजतें. त्यांतून जवळजवळ १०० रुमाल शिल्लक राहिले होतें. ते रा. वि. का. राजवाडे यांनी इ.स. १८९७ त तपासले. त्यावेळीं त्यानीं त्यांची तपासणी करून व वर्गवारी लावून कालक्रमानुसार पुडकी बांधून ठेविली होती. त्यानीं त्यांचें वर्णन पुढीलप्रमाणे केलें होतें-

``शंभरांपैकीं निम्मे रुमाल जाबसाली पत्रानीं भरलेले आहेत. बाकीचे हिशेबी आहेत. लहान-मोठ्या जाबसाली पत्रांची संख्या २५ हजार आहे. नारायणराव पेशव्यांच्या कारकीर्दीपासून नानांच्या मृत्यूपर्यंत झालेल्या अनेक राजकीय घडामोडीचे हे कागद आहेत. त्यावेळच्या कांहीं गुप्त मसलतींचीहि पत्रें यांत आढळतात. तत्कालिन मराठी राज्यांतील व परराज्यांतील मोठ्या मुत्सद्यांचीं, किंबहुना हिंदुस्थानांत त्यावेळी जो जो कोणी मातब्बर म्हणून माणूस झाला त्याचीं पत्रें या दफ्तरांत आहेत. एकंदर सर्व प्रकारच्या कागदांची संख्या ५० हजार आहे. नारायणरावाच्या खुनापासून सवाईरावसाहेबांच्या मृत्यूपर्यंतची माहिती त्यांत पुष्कळशी आलेली आहे. तेथून पुढें नानांच्या मृत्यूपर्यंतची हकीकत मात्र त्रोटक सांपडते.

या दफ्तरांत एक नकाशांचा रुमाल असून, त्यांत लढाया, वेढे, किल्ले, इंग्रजी आरमार, हिंदुस्थान, निजाम, हैदर, इंग्रज, मराठे यांची राज्यें, व कोंकण इत्यादींचे नकाशे आहेत. कोंकणचा नकाशा ५-५० हात लांब असून त्यांत घाट, किल्ले वगैरे सर्व दाखविले आहेत. परकीय राजकारणाचीं माहितीपत्रें यांत आढळतात. फ्रेंच राजाराणीची फांशी, तत्कालिन यूरोपांतील व निरनिराळ्या व राष्ट्रांतील तह, कलकत्त्याच्या इंग्रजी कौन्सिलांतील रिपोर्ट, सवाईमाधवरावांची डायरी वगैरे ऐतिहासिक साधनें या दफ्तरांत आहेत.’’

याप्रमाणें रा. राजवाडे यांनी वर्णिलेल्या या मेणवलीच्या दफ्तरापैकीं कांहीं भाग इतिहाससंग्रहांत प्रसिद्ध झाला असावा असें वाटतें. `मेणवली दफ्तर’ या नांवाखालीं या मासिकांत कागदपत्र प्रसिद्ध होत असत. [केसरी १ जून, १८९७]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .