विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
पुसद, तालुका.- वर्हाड प्रांत, यवतमाळ जिल्ह्यांतील एक तहशील क्षेत्रफळ १२८५ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) १५२१७४. तालुक्यांतील खेडयांची संख्या ३१० असून पुसद हें तहशिलीचें मुख्य ठिकाण आहे. सन १९०५ आगस्टपर्यंत पुसद तहशील वाशिम जिल्ह्यांत मोडत होती. परंतु नंतर वाशिम जिल्हा मोडल्यामुळें पुसद हें यवतमाळ जिल्ह्यांत आलें.
गांव.- पुसद तहशिलीचें मुख्य ठिकाण. हें पुस नदीच्या कांठी असल्यामुळें त्याचें नांव पुसद पडलें. लोकसंख्या (१९११) ६८६२. ऐने-ई-अकबरींत पुसद परगणा म्हणून उल्लेख सांपडतो. येथें दोन हेमाडपंती देवळें असून पडकी देवळें बरींच आहेत. शिवाय एक कोरडा तलाव आहे.