विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बदाम - हे मूळचे पश्चिम आशियातील साधारण उंचीचे झाड असून काश्मीर व पंजाबमध्ये याची कधी कधी लागवड करतात. बदामाच्या कडू व गोड अशा दोन जाती आहेत. पण वनस्पतिशास्त्रदृष्टया त्या एकमेकांपासून ओळखता येत नाहीत. बदामापासून एक त-हेचा डिंक निघतो. हा डिंक इराणातून मुंबईस येतो व तेथून यूरोपखंडांत पाठवितात. बदामापासून (फळापासून) अर्क व न उडणारे तेल काढतात. दोन्ही त-हेचे बदाम दाबून त्यांपासून तेल काढतात. हे तेल स्वच्छ व पिवळसर असून त्याला चांगली रुचि असते. गंधी लोक या तेलाचा बराच उपयोग करतात पंरतु यांत कधी कधी तीळ, खसखस, अथवा सरसू यांच्या तेलाची भेसळ करतात. कडू बदामापासून अर्क काढतात व त्याला कडू बदामाचे तेल म्हणतात. जरदाळूच्या बियांपासून कडू बदामाच्या तेलासारखे तेल निघते. बदामाचा औषधाकडे उपयोग ब-याच शतकांपासून करतात. गोड बदामाचे बी, भोजनेत्तर विडयांत, उपहारांत व मेवामिठार्इंत बरेंच उपयोगांत आणतात.