विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बद्रिनाथ – संयुक्तप्रांतांत, गढवाल जिल्ह्यामधील मध्य हिमालयाचे शिखर. उंची २३२१० फूट. येथे भीषणगंगा नदीचा उगम होतो. श्रीनगरपासून मानाघाटाच्या रस्त्यावरील डोंगरांत बद्रिनाथाचें देऊळ आहे. मूळचे देवालय श्रीशंकराचार्यानी बांधिले असे म्हणतात. बर्फाच्या डोंगराच्या योगाने कित्येक वेळा हे देऊळ मोडून गेले होते. हल्लीचे देऊळ बरेंच अर्वाचीन आहे. देवळाखाली डोंगरात तळे आहे, त्यांन ऊन पाण्याच्या झ-याचे पाणी जाते. या पवित्र ठिकाणी पुष्कळ लोक स्नान करतात. पूजारी नंबुद्री ब्राह्मण असतात. मुख्य पूजा-याला रावल (राजकुलाचा अपभ्रंश) म्हणतात. या देवालयाचें वार्षिक उत्पन्न ७००० रु. आहे.