विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बनजिग - हे लोक चिनी व्यापारी असून यांची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. व ती बहुतेक म्हैसूर संस्थानातच आहे. हे शेतकी व मजूरी करुन उदरनिर्वाह करतात. यांच्यांत ब-याचशा पोटजाती आहेत व या पोटजातींत देखील रोटी अगर बेटीव्यवहार नाही. या जातीपैकी बाळगारा (कासार) म्हणून एक जात आहे तीत मांसभक्षण अगर सुरापान करीत नाहीत. हे लोक शैव अगर वैष्णव असून ते यज्ञोपवीत धारण करीत नाहीत अगर त्यांना वैदिक संस्कार मान्य नाहीत. विधवाविवाहास परवानगी नाही. हे लोक प्रेते पुरतात. वैष्णव ब्राह्मणांच्या गुरूस हे लोक आपला गुरू मानितात. (से. रि. (म्हैसूर) १९११)