विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बनारस, जमीनदारी - भदोई, चाकीया व रामनगर असे तीन जिल्हे या जमीनदारींत मोडतात. एकंदर क्षेत्रफळ ९८८ चौरस मैल आहे.
इतिहासः - मनसाराम भुईनहार नांवाचा या घराण्याचा मूळ पुरुष होता; तो अयोध्येच्या नबाबाच्या हाताखालचा लील बनारसचा सुभेदार रुस्तुमअल्ली याचा नोकर होता. स. १७३८ त मनसाराम यानें जोनपूर, चुनार व बनारस सरकारचा वसूल गोळा करणाचे काम त्याचा मुलगा बलवंतसिंग याच्या नांवाने घेतले. त्यांस 'राजा' हा किताब मिळाला. नंतर बलवंतसिंग हा गंगापूरचा जमीनदार झाला व १७५४ साली ८०००० रु. देऊन चाकिया मिळाले व कर माफ झाला. सुजाउद्दौला गादीवर बसल्यानंतर को-हाचा अर्धा वसूल त्यास जहागीर म्हणून मिळाला. स. १७६४ त बक्सारच्या लढाईनंतर औधच्या नबाबच्या ताब्यांतील बलवंतसिंगाचा मुलुख बादशहाने कंपनीस दिला, परंतु डायरेक्टरांच्या कोर्टाने हा तह रद्द करून नबाबाचे हक्क परत दिले. बलवंतसिंगाच्यामागे स. १७७० त चेतसिंग गादीवर आला. त्याच्या ताब्यातील मुलुखाची मालकी स. १७७५ त कंपनीस देण्यांत आली. नंतर चेतासिंगाशी करार करण्यांत येऊन वसूल देण्याच्या अटीवर मुलूख त्याच्या ताब्यांत दिला. १७७८ त राजास शिपायांच्या तीन तुकडयांबद्दल खर्च करावा लागला, व स. १७८० त संस्थानच्या सार्वजनिक व्यवस्थेकरिता व घोडेस्वारांच्या तुकडीकरिता खर्च सोसावा लागला. चेतसिंगास हे पसंत पडले नाही. इंग्रजसरकारच्या शत्रूंशी त्याचा पत्रव्यवहारहि चालू झाला होता असे म्हणतात. त्याप्रमाणे वॉरन हेस्टिंग्जच्या हुकुमाने स. १७८१ आगस्टमध्ये त्यांस पकडण्यात आले; हेस्टिंग्ज बनारसला आला होता व जेव्हा चेतसिंगावर जे पहारेकारी ठेविले होते त्यांना चेतासिंगाच्या अनुयायांनी ठार केले तेव्हा हेस्टिंग्ज चुनारास परत गेला. सैन्य गोळा करून एक महिन्याने चेतसिंगाचे किल्ले घेण्यात आले व तो ग्वालेरीस पळून गेला व तेथेच स. १८१० त मेला. नंतर ही जमीनदारी बलवंतसिंगाचा नातू महिपनारायण यास देण्यांत आली व वसूल वाढवला; परंतु राजाच्या हातून प्रांताची व्यवस्था व बनारस शहराची टांकसाळ तीवरील हक्कांसह काढून घेण्यांत आली. स. १७८७ त बनारसचा रेसिंडेट मि. डंकन यानें प्रांतात गैरव्यवस्था आहे असे सरकारच्या नजरेस आणून दिले, त्यास सुधारण्याकरिता सरकारने नेमिले त्याप्रमाणे स. १७९४त करार करण्यांत येऊन त्याच्या हक्काचा मुलूख त्याच्या ताब्यांतील इतर मुलुखापासून वेगळा करण्यांत आला, दुस-या प्रकारच्या मुलुखाची व्यवस्था सरकारने आपल्या हाती घेतली, व एक लाखाचे वार्षिक उत्पन्न राजास कबूल केले, हल्ली राजाला इतर संस्थानिकांप्रमाणे बहुतेक हक्क आहेत. हल्लीचा राजा सर प्रभू नारायणसिंग जी.सी.आय.ई. १८८९ साली गादीवर आला; याला १५ तोफांच्या सलामीचा मान आहे.
या संस्थानची एकंदर लोकसंख्या (१९२१) ३६२७३५. संस्थानांतील जंगलाची लांबीरुंदी सुमारे ३०० चौरस मैल आहे. १९२२ साली, उत्पन्न २६०५३ रु. होते. बरेच जलाशये बांधण्याचे काम चालले आहे.
जमाबंदी – खामपध्दतीप्रमाणे या संस्थानातील ब-याच खेडयांचा अंमल चालतो, व कौलीमक्तेदारांमार्फत चालत नाही. या खामपध्दतीत मुनीमांच्या द्वारा प्रत्यक्ष सरकारी नियंत्रण असते. संस्थानचे वट्ट उत्पन्न १९२२ साली ३४६६२८८ रु. इतके होते; व खर्च ३५४८६७७ रु. असा होता.
१९२२ साली एकंदर सात वैद्यकीय संस्था होत्या. त्या साली दर हजारी जन्ममृत्यूचे प्रमाण २०:१५ व १८:२५ असे अनुक्रमे पडते.
घोडेस्वार व पायदळ यांची संख्या अनुक्रमे ५३ व २०१ अशी आहे. १९२३ साली सैन्याची पुर्नघटना झाली व पायदळाची संख्या आजच्या नव्या स्थितीप्रमाणे वाढवावी असे ठरले. १९२२ साली ८२ शाळा होत्या, त्यांपैकी ४ प्राथमिक मुलींच्या शाळा आहेत. मेस्टन हायस्कूल व लव्हेट हायस्कूल अशी दोन इंग्रजी हायस्कुले आहेत. १९२१-२२ साली शैक्षणिक खर्च ९९६२० रु होता.
स्वराज्य-शिक्षणाच्या बाबतीत पहिली पायरी म्हणून १९२२ साली डिस्ट्रिक्ट बोर्ड ऍक्ट (१९०६ चा) संस्थानांत सुरू करण्यांत आला. व्हिलेज पंचायत ऍक्ट (१९२० चा सहावा) पास करून सुरू करण्यांत आला. कोर्टाबाहेर भांडणे मिटावी हा त्या कायद्याचा मूळ हेतु आहे.
जि ल्हा – संयुक्तप्रांत. क्षेत्रफळ १००८ चौरस मैल आहे. ह्या जिल्ह्याचा भाग गंगानदीच्या पुलीनापासून बनलेल्या जमीनीचा आहे. गंगा, गोमती, वर्णा व नंद या नद्या आहेत. पुलीनाच्या भागांत फक्त 'कंकर' दगड सापडतो. झाडी विशेष नाही. आंब्याची व बाबूंची झाडे पुष्कळ असून फळफळावळहि पुष्कळ आहे, व बनारसची प्रख्याति आंबे व पेरू यांविषयी फार आहे. जंगल फार थोडे आहे. हिवाळयाखेरीज हवा सर्द असते व बहुतेक बंगालप्रमाणेंच आहे. वार्षिक पावसाचे प्रमाण सरासरी ४० इंच असते.
मुसुलमानांच्या स्वारीपूर्वी कधी कधी बनारस शहर राजधानी असे; परंतु तिचा फार प्राचीन इतिहास उपलब्ध नाही. दंतकथेवरून असें दिसते की, भाट व कोरी लोकांच्या ताब्यांत हा जिल्हा एके काळी होता. परंतु बाराव्या शतकांत त्यांचे व कनोजच्या राजाचे सख्य होते. जयचंद याच्या पराभवानंतर बनारस महमद घोरीच्या हातांत गेले, व त्यावर सुभेदार नेमण्यांत आला. पंधराव्या शतकांत हा जिल्हा जोनपूर राज्याचा भाग त्यांच्या शेवटपर्यंत होता; पुढील शतकात मोंगल व पठाण यांच्या भांडणात तेथे फार धामधूम झाली. अकबराच्या वेळी त्याचा समावेश अलहाबादच्या सुभ्यांत केला होता. व अठराव्या शतकापर्यंत तेथे शांतता होती; नंतर पुन्हा मोंगल सत्तेच्या -हासकाली तेथे गडबड झाली. १७२२ सालच्या सुमारास सध्यांच्या बनारस जिल्ह्याचा बहुतेक भाग सादतखानच्या (अयोध्येचा पहिला नबाब) मुलुखांत समाविष्ट होता. त्यानें मीर रुस्तुमअल्ली यास वहिवाटीस दिला. मीर रुस्तुमअल्लीस स १७३८ साली हांकून देण्यांत आले. व हा प्रदेश मनसाराम नांवाच्या गुमास्त्यास देण्यात आला, हा हल्लीच्या राजाचा पूर्वज होय, व याने जोनपूर येथील किल्ला काबीज केला होता.
मनसाराम १८३९ साली मेला. पुढे त्याचा मुलगा बलवंतसिंग यास मुलूख मिळाला व त्यास 'राजा' हा किताब मिळाला. त्याने किल्ले वगैरे बांधून नवीन मुलूख बराच ताब्यांत घेतला. याच्या व पुढील कुटुंबांच्या इतिहासाकरिता (बनारस जमीनदारी) पहा. १७९८ साली जेव्हा इंग्रजांनी अयोध्येचा नबाब वझीरअल्ली यास गादीवरून काढून टाकिले तेव्हा बनारस येथे त्यास राहण्याचा हूकूम मिळाला. १७९९ साली जानेवारी महिन्यांत त्याने गव्हर्नर जनरलचा एजंट मि. चेरी याजवर हल्ला करून दोन कामगारांसह त्यास ठार केले. या वेळेस वझीअल्ली पळून गेला पण पुढे तो पकडला जाऊन कलकत्यांत जन्मभर कैदेत होता.
जिल्ह्यांत पुष्कळ ठिकाणी जुनी कामे आहेत. त्यापैकी मुख्य सारनाथ येथील बौध्द लोकांची कामे आहेत. काशीच्या देवालय-शिल्पाची माहिती 'काशी' या लेखांत सांपडेल. जिल्ह्यांत ३ शहरे व १९९१ खेडी आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या १९२१ साली ४४४३८९८ होती. शे.८९ हिंदू आहेत. बोलण्यांत बहारी भाषा वापरण्यात येते. व शे. ९० लोक ती बोलतात. हिंदुस्थानी शे.७ लोक बोलतात. धार्मिक प्रसिध्दीमुळे बंगाली, मराठी व गुजराथी भाषा बोलणारे लोक बनारस शहरांत पुष्कळ आहेत. बनारस हे सोने व चांदीच्या कामाकरिता, पितळी नक्षीचे काम, कशिद्याचें काम, व रेशमी विणकामाकरिता प्रसिध्द आहे. जिल्ह्याचा व्यापार फारसा नाही. अंतर्गत मालापैकी मुख्यतः कापड मीठ, व धातु होत. बनारस शहर हेंच कायते व्यापाराचे मुख्य ठिकाण होय. जिल्ह्यांत आगगाडी ब-याच भागांतून गेली आहे. व रस्तेहि पुष्कळ आहेत.
त ह शी ल. – हिचे क्षेत्रफळ ४६४ चौरस मैल असून लोकसंख्या १९२१ साली ५६४२७६ होती. हिच्यांत ९८९ खेडी व दोन शहरे आहेत.
श ह र. - 'काशी' पहा.