विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बनूर - पंजाब प्रांतांत पतियाळा संस्थानमध्ये, पिंजौर निझामतींतील याच नांवाच्या तालुक्याचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या सुमारे पांच हजार. गांवाभोवती असलेल्या अवशेषांवरून हे गांव पूर्वी महत्वाचे असावे असें दिसते. याचें जुने नांव पुष्प, पोपनगरी किंवा पुष्पावती होते असे म्हणतात. हे गांव चमेलीच्या अत्तराविषयी प्रसिध्द होते. अकबराच्या कारकीर्दीत सरहिंदच्या राज्यांतील हा एक महाल होता. सिंगपुरिया शीख व पतियाळाचा राजा अमरसिंग यांनी हे गांव मोंगलांपासून घेतले, व अखेर ते पतियाळाच्याच ताब्यांत राहिले. येथे म्हणण्यासारखा व्यापार चालत नाही.