विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बनेरा - राजपुतान्यांत उदेपूर संस्थानमध्ये बनेरा इस्टेटीचे मुख्य ठिकाण. हे रजपुताना-माळवा रेल्वेच्या मांडल स्टेशनच्या पूर्वेस पांच मैलांवर आहे. लोकसंख्या चार हजार. गांवाभोवती तट आहे. या इस्टेटीत एकंदर १११ गांवे असून इस्टटीचे उत्पन्न ८८००० रु आहे, व दरबारला खंडणी ४९०० रु. द्यावी लागते. बनेरा इस्टेट प्राचीन काळापासून मेवाडमध्ये मोडली जाते. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात उदेपूरच्या पहिल्या राजसिंगाचा मुलगा भीमसिंग याने औरंगझेबाची नोकरी चांगली बजाविल्यामुळे त्याला बनेरा ही जहागीर मिळाली. स.१७२६ त येथील किल्ला बांधला गेला. त्यांनतर सुमारे तीन वर्षानी शाहपूरच्या राजाने तो किल्ला घेतला, परंतु दुस-या राजसिंगाने तो परत घेऊन बनेराच्या राजाला दिला.