विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बन्नू, जिल्हा - वायव्य सरहद्दीवरील प्रांतातील, सिंधू नदीच्या पलीकडील एक जिल्हा. क्षेत्रफळ १६७० चौरस मैल. याच्या सर्व बाजूला डोंगर आहेत, कुरम व टोकी ह्या नद्या या जिल्ह्यांतून वाहतात.
इतिहासः - येथे पुष्कळ वर्षांपासून अफगाण लोकांची वस्ती आहे. परंतु येथे एका काळी हिंदु लोक रहात असावेत असे येथील अवशेषांवरून दिसते. गझनीच्या महंमदाने हिंदूंचा नायनाट करून टाकिल्यावर एका शतकापेक्षा जास्त काळपर्यंत हा प्रदेश ओसाड होता. त्यानंतर पश्चिमेकडून बन्नुवाल व नियाझई या लोकांनी येऊन येथे वस्ती केली. अकबराच्या राज्यांत मरवत नावाचे लोक आले व त्यांनी नियाझई लोकांना घालवून लाविले. २ शतकेपर्यंत हा प्रदेश नावाला दिल्लीच्या अंमलाखाली होता. १७३८ साली नादीरशहाने यावर स्वारी करून ह्या प्रदेशाचा विध्वंस करून टाकिला. अहंमदशहा दुराणीने बन्नू खो-यांतून तीन चार वेळ सैन्य नेऊन, प्रत्येक वेळी शक्य तेवढी लूट केली. स १८१८त मंकेराच्या नबाबाने मरवत आपल्या राज्यास जोडले, परंतु रणजितसिंगापुढे त्याला हार खावी लागली. स १८१८त हे खोरे शीखांकडे गेले. रणजितसिंगाने ह्या प्रदेशांत आपले ठाणे देण्याचा प्रयत्न केला. परंतु बन्नू खो-यांतील लोकांकडून जोराचा अडथळा झाल्यामुळे त्याला जी काय लूट मिळाली ती घेऊन परत जाणे भाग पडले. पहिल्या शीख युध्दानंतर हा इंग्रजाच्या सत्तेखाली आला. त्यांनी तेथील किल्ले जमीनदोस्त करून सर्वत्र शांतता प्रस्थापित केली.
प्राचीन अवशेषः- बन्नू खो-यात अक्राव येथे व दुस-या कांही ठिकाणी लहान लहान टेंकडयात भंगलेल्या मूर्ती, दागिने, विटा, कौले व ग्रीक अक्षरे असलेली नाणी सांपडली आहेत.
जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) २४६७३४ शें. ८९ मुसुलमान व बाकीचे हिंदू आणि शीख आहेत. मुख्य भाषा पुश्तु ही आहे. परंतु काही ठिकाणी हिंदकी भाषा बोलतात. शे. ७५ लोकांची उपजीविका शेतकीवर होते.
येथील जमिनींत बरीच वाळू आहे. गहू हे मुख्य पीक असून त्याशिवाय हरभरा, मका आणि बाजरी ही पिकें होतात. बहुतेक गांवांत, स्थानिक उपयोगाकरिता कापड विणले जाते. नखई म्हणजे लोकरीच्या केसाळ चटया व फुलकारी चांगल्या असतात, पण त्या फारच थोडया प्रमाणात होतात. निर्गत माल कापूस, लोकर व धान्य असून आयात माल साखर, कापड, तेल, लोखंड, तंबाखू आहे. या जिल्ह्यांत आगगाडया नाहीत, पण बन्नू येथे माल नेण्याकरिता नॉर्थवेस्टर्न रेल्वेची औट स्टेशन आहे. डेराइस्मायलखान व कोहट येथे जाण्याकरिता बन्नूपासून पक्क्या सडका झाल्या आहेत.
गा व (एडवर्डेसाबाद) - बन्नू जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे गाव कुरम नदीच्या दक्षिणेस १ मैलावर कोहातपासून ७९ मैल आहे. लोकसंख्या सुमारे १५ हजार. लाहोरच्या महाराजांच्या सन्मानार्थ येथील किल्ल्याला धुलीपगड म्हणतात. या गावी कापूस, कापड, लोखंड, जनावरे, तंबाखू व धान्ये यांचा व्यापार बराच चालतो. या ठिकाणी दोन हायस्कुले व दोन आतुरालये आहेत.