विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बयाना - राजपुतान्यांत भरतपूर संस्थानातील बयाना तहशिलीचे मुख्य ठिकाण. १९०१ साली लोकसंख्या ६८६७ होती. या शहरांत एक मराठी शाळा आहे. याचें प्राचीन नांव श्रीपथा. येथील दोन देवळांवर संस्कृत लेख खोदलेले आहेत. त्यांपैकी एकावर १०४३ हा सन असून त्यांत जादन राजा विजयपाल याचा निर्देश केला आहे. त्यानेंच विजयगडचा प्रसिध्द किल्ला बांधला असे सर्वांचे मत आहे. किल्ल्यांत तांबडा दगडी स्तंभ (लाट) व त्यावरील विष्णुवर्धन नांवाच्या वरीक राजाचा खोदीव लेख आहे, तो समुद्रगुप्ताचा मांडलिक होता. स्तंभावर ३७२ हा सन आहे. १५२६ साली बाबरने लिहून ठेविले आहे की, हिंदुस्थानांत हा प्रसिध्द किल्ल्यांपैकी एक आहे. हे पूर्वी प्रांताचे मुख्य ठिकाण होते व आग्रा फक्त लहान खेडे होते. यांत भुयारे, मोठया इमारती व एक उंच किल्ला आहे. याची प्रसिध्दी पांढरी शुभ्र साखर व नीळ यांविषयहि होती.