विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरनाळ (अथवा अनाहदगड) - पंजाबांत पतियाळा संस्थानांतील अनाहदगड निझामतीचे मुख्य ठिकाण. हे पतियाळाच्या पश्चिमेस ५२ मैलांवर व नार्थवेस्टर्न रेल्वेच्या राजपुरा-भटिंडा शाखेवर आहे. लोकसंख्या सुमारे पांच हजार आहे. १७२२ साली पतियाळाचा राजा अलासिंग याने पुन्हा हे शहर वसविले. व १७६३ साली पतियाऴा शहर वसवीपर्यंत हा राजधानी होती. हें गांव गोलाकार आहे, व त्याच्या सभोवती तट असून आंत किल्ला आहे. गांवात एक दवाखाना, एक आंग्लो व्हर्न्याक्युलर शाळा व पोलिस ठाणे आहे.