विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरेली, जिल्हा - संयुक्त प्रांत, बरेली अथवा रोहिल खंड विभागांतील जिल्हा. याचें क्षेत्रफळ १५८० चौरस मैल आहे. नद्या पुष्कळ असून त्यांत रामगंगा व पूर्व बहगुळ या मुख्य आहेत. जिल्ह्यांत जमीन बहुतेक पुळणाचीच बनलेली आहे व कंकर मुळीच सांपडत नाही. येथील वनस्पती गंगेच्या प्रदेशाप्रमाणेच आहेत. उत्तरेस चित्ते नेहमी आढळतात व पूर्वेस लांडगे बरेच आहेत. काही ठिकाणी काळवीट आहेत. सर्पहि पुष्कळ आहेत जिल्ह्यांत वार्षिक पावसाची सरासरी ४४ इंच आहे.
इतिहास – ख्रिस्ती शकापूर्वी उत्तर पांचाल राज्यामध्ये ह्या जिल्ह्याचा समावेश होत होता. रामनगर येथे सापडलेल्या नाण्यांवरून ख्रिस्ती शकापूर्वी २-या शतकांत राज्य करणा-या राजांची नावे उपलब्ध झाली आहेत. ह्या राजांचा अलाहाबादच्या दक्षिणेस राज्य करीत असलेल्या राजवंशाशी संबंध होता, व पुराणांतील संग राजे हेच होत, असेहि एक मत आहे.
मुसुलमानी राज्याच्या काळाच्या आरंभी हल्ली ज्यास रोहिलखंड म्हणतात, त्यासच कटेर म्हणत व तेथील रजपूत रहिवाशी बरेलीस फार उपद्रव देत. बरेली शहर १५१७ त वासदेव व वरेलदेव या दोघांनी वसविले व वरेलदेलच्या नांवावरून याचे नाव पडले. शहाजहानच्या वेळेपर्यंत हे फारसे महत्वाचे ठिकाण नव्हते. पुढे मोंगलांकडून अयोध्येच्या नबाबामार्फत हा भाग इंग्रजांस मिळाला.
अहिछत्र अथवा रामनगर येथे जुनी नाणी बुध्द लोकांचे खोदकाम सांपडले आहे. हे अद्याप जैन लोकांचे पवित्र स्थान आहे. औन्ला व बरेली येथे कांही कबरी व मशिदी आहेत. या जिल्ह्यांत ११ शहरे व १९३८ खेडी आहे. लोकसंख्या (१९२१) १०१३८७५ रामगंगेजवळील पुळणीची जमीन बहुतेक सुपीक आहे. जमीनदारीचे ५५४७ महाल, ५०३ पट्टीदारी व ३६ भैय्याचार हे भाग आहेत. मुख्य पिके तांदूळ, गहूं, हरभरा. आयात माल मीठ, कापड, धातू, दगड व चुना असून निर्गत माल धान्य, साखर, कातडी, ताग व गळिताची धान्ये हा आहे. जिल्ह्यांत शिक्षण साधारणच आहेत.
त ह शी ल - क्षेत्रफळ ३१० चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ३१८६१३. तहशिलीत ४१० खेडी व वरेली (जिल्हा व तहशिलाचे मुख्य ठिकाण) हे एकच मोठे शहर आहे. हीत जमीन फारशी चांगली नाही, तथापि रामगंगा ज्या भागातून वहाते, तो भाग फार सुपीक आहे. उंसाची लागवड फार होते. व गुळाची साखर पुष्कळ ठिकाणी मुख्यतः बरेली येथे तयार होते.
श ह र. – हे कलकत्त्यापासून ८१२ मैल व मुंबईपासून रेल्वेने १०३१ मैल असून अलीगडपासून निघणारी औधरोहिलखंड रेल्वेची शाखा व मुख्य फांटा यांच्या जंक्शनवर आहे. लोकसंख्या सुमारे एक लाख तीन हजार आहे. १८५७ च्या बंडाच्या वेळी बरेली हे महत्त्वाचे ठिकाण होते. शिपायांनी बंड उभारून, हाझिफ रहमतखानाचा नातू खान बहादुरखान यास सुभेदार म्हणून नेमले.
१८५८ साली येथे म्युनिसिपालिटी स्थापन झाली, येथील मुख्य धंदा गुळाची साखर करण्याचा होय, दरवर्षी गूळ सरासरी २०००० टन बाहेरून येतो व १०००० टन साखर बाहेर जाते. बरेली शहर बांबूच्या व लाकडी कामाबद्दल प्रसिध्द आहे. थोडे कापडहि विणले जाते व भांडीहि होतात, पण हे धंदे फारसे महत्वाचे नाहीत. येथे एक कॉलेज आहे.