विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्थेली (१८२७ - १९०७) - एक फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व राजकारणी पुरुष. हा सेंद्रिय रसायनशास्त्राचा अध्यापक होता. भौतिक शक्तीचे मापन करतां येते व त्यांवर रासायनिक चमत्कार अवलंबून असतात, ही कल्पना बर्थेलोने प्रथम निदर्शनास आणली. सेंद्रिय पदार्थांचे पृथक्करण शक्य आहे, व हे पदार्थ त्यांच्या घटकद्रव्यांपासून तयार होणे शक्य नाही किंबहुना यांच्या घटनेचे नियम वानस्पत्य रसायनशास्त्रीय पदार्थांच्या घटनेच्या नियमांहून भिन्न आहेत या कल्पनेचे उच्चाटन त्याने, कित्येक कर्बोज्ज पदार्थ, त्यांच्या घटकद्रव्यांच्या संयोगाने तयार करून, प्रथम केले. याचे कर्बोज्ज पदार्थांसंबंधी कित्येक शोध पुस्तक व निबंधरूपाने प्रसिध्द झाले. यंत्रशास्त्राला जे नियम लागू आहेत तेच रासायनिक संस्कारांस लागू आहेत हेहि त्याने सिध्द केले. या सिध्दीकरिता यांत्रिक रसायनशास्त्र व उष्णतारसायनशास्त्र यांसंबंधी त्याने अनेक प्रयोग केले. या शास्त्राच्या याच शाखेत प्रयोग करीत असल्यामुळे त्याला स्फोटक द्रव्यांचा व त्यांच्या शक्तीचा शोध लागला.