विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्न - हे स्वित्झर्लंडच्या राजधानीचे शहर आहे. या शहरांतील ग्रंथसंग्रहालयांत हस्तलिखित ग्रंथांचाच विशेष भरणा असून छापील पुस्तके फार थोडीच आहेत. ह्याशिवाय येथे स्विस ग्रंथसंग्रहालय आहे. येथे बरीच पदार्थसंग्रहालये आहेत. बर्नमध्ये स. १८३४ मध्ये स्थापन केलेले एक विश्वविद्यालय आहे. शहरास राजकीयदृष्टया बरेच महत्व आहे. येथील हवा आल्प्स पर्वतावरील थंड वा-यामुळें अतिशय थंड आहे. लोकसंख्या (१९२०) १०४६२६ हें शहर समुद्रसपाटीपासून १७८८ फूट उंचीवर आहे.
निडेकचा प्राचीन किल्ला द्वीपकल्पाच्या पूर्वटोकांवर असून ह्याने आरवरील मार्गाचे संरक्षण होते. ह्याकडे झारिजेनचा डयूक ५ वा बेर्कटाल ह्याचे लक्ष जाऊन ११९१ त याने आल्मेनियन बर्गंडियन यांच्या सरहद्दीवर बर्न नावांचे एक लष्करी ठाणे वसविले. झारिजेन घराण्यानंतर १२१८ साली बर्न स्वतंत्र साम्राज्याचे शहर बनले, परंतु स्वातत्र्य रक्षणाकरिता येथील लोकांस फार प्रयास पडले. १३५३ त हे शहर स्विससंघास मिळाले.
१८१५ पासून १८४८ पावेतो झुरिच व लुसर्नेबरोबर बर्न शहरासहि स्विससंघांत वरिष्ठ अधिकार मिळाले. व १८४८ च्या फिडरॅल कायद्याने बर्न शहर राज्यकारभाराचें मुख्य शहर केले व येथे चिरस्थायी फिडरल शासनसत्ता स्थापन झाली. येथेच परराष्ट्रीय वकील राहतात.