विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्नार्ड, सेंट - सेंट बर्नार्ड या नावांचे दोन प्रसिध्द घाट आल्पस पर्वताच्या मुख्य रांगेत असून दोन्हीहि घाटांनां गाडीवाट आहे. त्यांपैकी एक घाट काहीसा मोठा आहे. सेंट बर्नार्ड घाट ५३ मैल लांबीचा असून घाटाच्या मार्गाने -हाइनच्या खिंडीतील मार्टिनी शहरापासून इटलीमधील ऑस्टा शहरास जाता येते. घाटमाथ्यावर सेंट बर्नार्ड (मेन्थानचा) याने स्थापन केलेला एक मठ आहे. प्रवाशांस याचा फार उपयोग होतो. सुमारे तेराव्या शतकापासून, ऑस्टिन संप्रदायी उपासकमंडळ या मठाची व्यवस्था पहाते. घाट उतरून जाणा-या प्रवाशांना (विशेषतः इटालियन मजुरांना) उपासकांच्या चाकरांचा व त्याचप्रमाणे त्यांनी बाळगलेल्या कुत्र्यांचा फार उपयोग होतो. दरवर्षी हजारो प्रवाशांचे प्राण, उपासकांचे चाकर व कुत्रे वांचवितात. इ.स. १८०० त प्रसिध्द नेपोलियन या घाटामार्गाने आपले सैन्य घेऊन गेला. त्यावेळी सध्यांप्रमाणे गाडीवाट नसावी असें दिसते, फक्त पायवाट असे. रोमन लोकांच्या वेळी या घाटमार्गाने वाहतुक चालत असे, परंतु त्यावेळी पायवाट होती किंवा नाही हे नक्की सांगता येत नाही. स्ट्रेबोच्या वेळी देखील पायवाट नसावी असे आढळून येते. इ.स. ६९ सालापासून कांही ठिकाणी पायवाटेचा उल्लेख आढळतो. घाटमाथ्यावर ज्युपिटर (पेनिनस) चे एक मंदिर आहे. मंदिरासंबंधी बरेचसे जुन्या वस्तूंचे अवशेष इ.स. १८९०-९३ त उकरून काढण्यांत आले आहेत, त्याचप्रमाणे इतर ब-याच जुन्या वस्तू मठास जोडलेल्या वस्तुसंग्रहालयांत ठेविलेल्या आहेत.
दुस-या सेंट-बर्नार्ड घाटासंबंधी रोमन लोकांना बरीच माहिती असावी. या घाटासंबंधी उपलब्ध असलेल्या माहितीवरून हा बराच पुरातन काळचा असावा असे दिसते. येथेहि एक उपयुक्त मठ असून मॉरिस व लॅझारस संप्रदायी हे या मठाची व्यवस्था पहातात. मेन्थानचा सेंट बर्नार्ड यानें हा मठ स्थापन केला. बूर्ज सेंट मॅरिस शहराहून ऑंस्टा शहराला या घाटमार्गाने जाता येते. या घाटांत प्रवाशांची विशेष रहदारी नाही.