विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्नियर, फ्रान्सिस - हा फ्रेंच वैद्य व प्रवाशी शहाजहान बादशहाच्या वेळी हिंदुस्थानांत आला, त्यावेळी त्याचें वय तीस वर्षांचे होते राजदरबाराच्या कामांत तो जास्त कुशल होता. स. १६५५ पासून १६६७ पर्यंत १२ वर्षे तो हिंदुस्थांनात होता. आरंभी फ्रान्समधून तो ईजिप्तमध्ये गेला. तेथे कांही दिवस राहून तो स. १६५५ त सुरतेस उतरला. त्याने शहाजहान व औरंगझेब यांच्या वेळची लिहिलेली हकीकत विशेष महत्वाची व साधारणपणे निःपक्षपाताची आहे. फज्लखान (दानिष्मंद) नांवाच्या औरंगझेबाच्या वजिराची व त्याची ओळख होऊन त्याजपाशी बर्नियर राहिला. दानिष्मंद विद्वान होता. तो बर्नियरपासून यूरोपच्या ब-याच भाषा शिकला आणि बर्नियरने त्याजकरिता अनेक सुदंर लॅटिन ग्रंथांची भाषांतरे केली. औरंगझेबाने राज्यप्राप्तीकरिता जी कारस्थाने केली, त्याचे हुबेहुब व चित्तवेधक वर्णन बर्नियरने केले ते वर्णन त्याने यूरोपांत परत गेल्यावर लिहिले. सुजाच्या कारकीर्दीत बंगाल फार भरभराटला होता व औरंगझेबाच्या काळी त्याच्या अवाढव्य सैन्याच्या खर्चामुळे हा देश ओसाड झाला होता असे तो म्हणतो. बर्नियर कांही दिवस औरंगझेबापाशीहि होता. सन १६६७ त त्याने असे लिहून ठेविले आहे की, मोगलांचे राज्य अंतर्यामी सर्वस्वी बिघडले आहे. लहानशी कवाइती यूरोपियन फौज मोंगलांवर चालून येईल तर ती तेव्हाच हे राज्य जिंकून घेईल. (बर्नीअर ट्रव्हल्स, स्मिथ-ऑ.हि इंडिया)