विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलबगड - पंजाबप्रांतात, दिल्ली जिल्ह्यामधील बलबगड तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या सुमारे चार हजार. भरतपूरच्या सूरजमलच्या हाताखाली बलराम नांवाचा एक सरदार या प्रदेशाचा कारभार पहात असे. त्याने येथे एक किल्ला बांधिला होता. त्यावरून बलरामगड याचा अपभ्रंश होऊन बलबगड हे नांव पडले असावे. ही इस्टेट दिल्लीच्या बादशहाने अजितसिंगाला दिली. त्याचा नातू १८५७ सालच्या बंडांत सामील झाल्यामुळे त्याला फाशी देण्यांत आले व त्याची इस्टेट जप्त केली.