विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलसोर - ओरिसाप्रांतातील उत्तरेकडील जिल्हा. याच्या किना-यावरील ३ मैल रुंदीच्या पट्टीत मीठ असल्यामुळे तेथील जमीन लागवडीला निरुपयोगी आहे. पश्चिम भागहि डोंगराळ व जंगली असल्यामुळे येथेहि लागवड होउ शकत नाही. या दोहोंच्या मधील प्रदेशात सुवर्णरेखा, हास्कुरा, सारथा, पांचपारा, वझबलंग, कान्सबान्स, साळंदी व वैतरणी या नद्या वहात असून प्रदेश सुपीक आहे. उत्तरेकडील जंगलांत अस्वले व इतर जंगलांत वाघ, चित्ते, हरणे, पांढरे उंदीर, जवादी मांजर, ससे वगैरे प्राणी आढळतात. उष्णमान ८०० ते ९०० असते. या जिल्ह्यांमध्ये सरासरी वर्षिक पाऊस ६० इंच पडतो. ओरिसावरील लेखांत आलेल्या इतिहासाखेरीज या जिल्ह्याचा इतिहास विशेष महत्वाचा नाही. ओरिसा प्रांताबरोबर हा प्रदेश स.१८०३ मध्ये इंग्रजांच्या हाती गोला व १८२८ साली हा निराळा करण्यांत आला. या जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) ९८०५०४ आहे.
या जिल्ह्यांतील मुख्य पीक तांदुळाचे होय. विलायती कापड, तेल, मीठ व मसाले हे आयात पदार्थ व तांदूळ हा मुख्य निर्गत माल होय. बंगाल-नागपूर रेल्वेचा ८८ मैल लांबीचा फांटा या जिल्ह्यांतून गेलेला आहे. मयूरभंजस्टेटरेल्वे नावांचा एक लहान फांटा राप्सपासून बरीपाडापर्यंत जातो. या जिल्ह्यांतील १९०३-०४ साली सा-याचे उत्पन्न ६५५००० रु होते. बलसोरच्या म्युनिसिपालिटीशिवाय इतर ठिकाणची स्थानिक व्यवस्था डिस्ट्रिक्ट बोर्डाकडे आहे.