विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलुचिस्तान - ब्रिटिश हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील देश. याला हे नाव येथील मुख्य रहिवाश्यांवरून प्राप्त झाले आहे. ब्रिटिश बलुचिस्तान व तद्देशीय राज्य असे या देशाचे दोन विभाग आहेत. सुलेमान व तक्तीसुलेमान पर्वताच्या ओळी या देशांत आहेत. खलीफत, नकतु, चाहिल्तन, मुडीर वगैरे उंच शिखरे आहेत. कोदिसुलतान नांवाचा मोठा ज्वालामुखी पर्वत पश्चिम बलुचिस्तानांत आहे. बोलनत नारी, मध्यप्रदेशात मुल्ल, लोरा या नद्या आहेत, या देशांतील पर्वतश्रेणी क्रॅटॅशस व टर्शिअरी खडकांच्या थराच्या बनलेल्या आहेत. हलक्या प्रतीच्या कोळशाचे पातळ थर, एक प्रकारचे घट्ट तेल, उत्तम पेट्रोलियम, गंधक ही खनिज द्रव्ये येथे सांपडतात. रेकिस, मोहमदानी, नौशिरवानि, देहवार, दुर्झाडा, कंबारानि व मिंगल अथवा मोंगल लोक या जाती येथे राहतात. बोलेडी, साजिडी, शक, गिचकी, गडर या मूळच्या रहिवाश्यांच्या जाती आहेत. या देशांतील लोक एकाच मूळजातीपासून उत्पन्न झालेले नाहीत. अरब वंशांतील लोकांची द्राविडी व इराणी वंशांतील लोकांशी भेसळ झालेली आहे व अशा लोकांना बलुच हे नांव प्राप्त झाले आहे. मारी व बुग्टी लोक रिंडबलुची असतात. रिंडबलुची आफ्रिडी पठाणाहून अगदी भिन्न स्वभावाचे असतात. बलुची लोक पठाणांहून कमी दगलबाज, खून करणारे, धर्मवेडे व ठेंगण्या बांध्याचे असतात. मारी अथवा बुग्टी बलुची लोक मोकळया मनाचे, सत्यवादी, साहसी व नेमस्त असतात. ब्रिटिश बलुचिस्तान खेरीजकरून बाकीचा सर्व प्रदेश कलातचा खान व त्याचे अंकित नायक यांच्या ताब्यांत आहे. बलुची लोक अद्याप चो-या करतात आणि दरोडे घालतात. देशाचे क्षेत्रफळ १३४६३८ चौ.मै. असून लोकसंख्या १९२१ साली ७९९६२५ होती. बहुतेक लोक गुरांचे कळप घेऊन हिंडतात. बहुतेक लोक मुसुलमान आहेत. कांही हिंदु, ख्रिस्ती, शीख व इतर जातीचेहि आहेत. पुस्तु, पंजाबी, उर्दु व सिंधी या भाषा येथे प्रचारांत आहेत. मूळ वाङमय या देशांत नाही. या देशात एक द्राविडी भाषा देखील बोलतात. ब्राहइ लोकांचे स्वतःचे वाङमय नाही. पठाण वंशाच्या तेरा निरनिराळया जाती आहेत, पैकी काकर जात फार महत्वाची आहे. बुग्टी, बोलेडी, डोम्की, पणी, मगसी, रिंड व मारी या महत्वाच्या बलुची जात आहेत.
स्थानिक राज्यकारभार चीफ कमिशनरच्या हाती असून तोच गर्व्हनर जनरलचा एजंट असतो. याच्या खालोखाल रेव्ह्येन्यु कमिशनवर असतो, मुलकी व न्यायखाते त्याच्याकडे असते. होता होईतो लोकांच्या हाती कारभार देण्याची सरकारची वृत्ति दिसते. जिरगा किंवा वृध्द मंडळे जी जुन्या काळापासून आहेत व तीच साधारणतः जिल्ह्यांतील कारभार पहातात.
इतिहास. - या देशाच्या पुरातन इतिहासाविषयी कांही माहिती नाही. एरियन याने प्रथम या देशाचे विस्तृत वर्णन केले आहे. अलेक्झांडर या देशांतून सैन्यासह गेला याविषयी व या देशांतील जमिनीचा रुक्षपणा, पाण्याची दुर्मिळता, येथील लोकांचे अन्न, येथील काटेरी झाडे व ॠतूंचा तीव्रपणा वगैरे बाबतींचे थोडक्यांत व खरे वर्णन एरियनने केले आहे. ८ व्या शतकांत खलिफाचे सैन्य या देशांतून गेले होते.
ब्राहुइ लोकांनी या देशावर स्वामित्व केव्हा मिळविले तो काळ निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु हा गोष्ट बहुधां अडीच तीन शतकांपूर्वी घडली असावी. हिंदु घराण्यांतील शेवटच्या राजाने एका अफगाण नायकाच्या बंडखोरीचा बंदोबस्त करण्याकरिता धनगरांच्या कंबर नांवाच्या नायकाला बोलाविले. पंरतु या कंबरने या बंडखोरांचा बंदोबस्त केल्यावर हिंदु राजाला पदच्यूत करून आपण स्वतंत्र राजा बनला. कंबरच्या राज्यारोहणानंतरचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. कंबरनंतर चवथा राजा अबदुल्लखान याने सिंधच्या नवाबापासून कचगंडवचा सुपीक प्रदेश जिंकून घेतला. याच सुमारास नादीरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली. त्याने बलुचिस्तानांत देखील सैन्य पाठवून आपले वर्चस्व स्थापित केले, परंतु अबदुल्लाच्या हाती राज्यकारभार राहूं दिला. अबदुल्लाच्या मागून त्याचा वडील मुलगा हाजी महंमदखान गादीवर बसला. हा राजा व्यसनी व जुलमी निघाला. याच्या त्रासानें लोक फार त्रासून गेले. तेव्हा याच्या धाकटया भावाने याला ठार मारून गादी बळकावली. याचें नाव नासीरखान होते. याच्यावर नादीरशहाची फार मर्जी होती. यानें नासीरखानास सर्व बलुचिस्तानचा राजा केले. ही गोष्ट १७३९ साली घडली.
नासीरखान फार राजकारणी शूर व तेजस्वी राजा होऊन गेला. १७४७ साली नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याने काबूलचा राजा अहंमदशहा दुराणी याचे स्वामित्व कबूल केले. १७५८ साली त्याने आपले स्वातंत्र्य जाहीर केले व अहंमशहाने पाठविलेल्या सैन्याचा त्याने अगदी मोड केला. तेव्हा स्वतः अहंमदशहा त्याजवर चालून आला. खानाचा पराभव होऊन त्याला कलातच्या किल्ल्याचा आश्रय करावा लागला. दुराणीला वेढा देऊन अगर तोफांच्या साहाय्याने किल्ला घेता येईना, तेव्हा दुराणीने तह केला. दुराणीने नासीरखानच्या चुलत बहिणीशी लग्न करावे व नासीरखानाने काही एक खंडणी देऊं नये परंतु अहंमदशाला जरूर पडेल तेव्हा नासीरखानाने सैन्याची मदत रोकड भरपई घेऊन करावी असे या तहांत ठरले. या खानाने आपल्या राज्यांतील प्रांताचा कारभार सुधारण्यांत व कलात किल्ला मजबूत करण्यांत पुष्कळ श्रम केले. अहंमदशहाला वारंवार सैन्याची मदत करून नासीरखानाने शहापासून पुष्कळ जिल्ह्यांचे कायमचे स्वामित्व संपादन केले. हा खान १७९५ साली मेला. याच्या मागून त्याचा मुलगा महमूदखान हा चवदाव्या वर्षी गादीवर बसला. याच्या कारकीर्दीत प्रांताच्या सुभेदारांनी कलातच्या खानाचे स्वामित्व झुगारून दिले व ते स्वतंत्र बनले, रक्तपात करणारे अंतस्थ कलह लागले, व कलातच्या खानांचे राज्य लवकरच संपुष्टांत आले.
१८३९ साली ब्रिटिश सैन्य जेव्हा बोलन घाटांतून अफगाणिस्तानकडे जात होते त्यावेळी त्याच्या रसदवगैरेंची लूट झाली व हा विश्वासघातकीपणा मेहराबखानाचा आहे असे, त्याचा लुच्चा वजीर महंमद हुसेन याने ब्रिटिश अधिका-यांस भासविले, त्यावरून एक ब्रिटिश सैन्याची तुकडी खानावर पाठविण्यांत आली. किल्ल्यावर हल्ला करून तो घेतला. या हल्ल्यांत मेहरावखान मारला गेला. ब्रिटिश लोकांनी त्याचा मुलगा दुसरा नासीरखान याला १८४१ साली खान म्हणून कबूल केले. इ.स. १८५४ मध्ये ब्रिटिश सरकार व खान यांच्यामध्ये एक तह झाला आणि खानास सालीना ५०,००० रुपये खंडणी, तहाच्या अटी इमानाने पाळल्या तर देण्याचे ठरले. नासीरखानाने मरेपर्यत म्हणजे सन १८५५ पर्यंत या अटी पाळल्या. याच्या मागून याचा भाऊ मीर खोदादाद खान गादीवर बसला. १८५७ साली खानास सल्ला देण्याकरिता एक ब्रिटिश पोलिटिकल एजंट कलात येथे ठेवण्यांत आला. या खानाला ब्रिटिश लोकांच्या मदतीशिवाय आपल्या राज्यांत बंदोबस्त ठेवता येत नसे. राज्यांत अंदाधुंदी माजली. व १८७४ नंतर ब्रिटिश लोकांनी बलुचिस्तानचा संबंध तोडला.
यानंतर लास, वाड, मारी, बुग्टी, केज व मकरान येथील नायकांनी खानाची सत्ता झुगारून दिली; व राज्यांत अगदी बेबंदशाही माजली. तेव्हा ब्रिटिश सरकारने पुन्हा ह्या संस्थानाकडे लक्ष वळविले. स.१८७६ मध्ये स. १८५४ मधील जुना तह बदलून नवीन करण्यांत आला. या तहान्वये क्केटा बसवून खानाच्या राज्यांत ब्रिटिश सैन्य ठेवण्यांत आले. तारायंत्र व आगगाडया बांधण्याचे ठरले. ब्रिटिश बलुचिस्तान ब्रिटिश हिंदुस्थानांत सामील करण्यांत आले व खानास १,००,००० रुपये खंडणी देण्यांत आली.
१८९० व १८९१ साली ब्रिटिश सरकारने झोबदरी घेऊन क्वेटयाच्या पलीकडे आपला लष्करी ताबा वाढविला. स.१८९३ मध्ये मीर खोदादादखान व एजंट यांच्यामध्ये बराच बेबनाव झाल्यामुळे खानास पदच्युत करून त्याचा मुलगा मीर मंहमंदखान याला गादीवर बसविण्यांत आले. वुष्की जिल्हा व नियावत हे खानाने ब्रिटिश सरकारला बंदोबस्त ठेवण्याकरिता १८९९ साली कायमचे दिले.
खानाचे खंडणी व जमीन महसून मिळून उत्पन्न सालीना ५,००,००० रुपये आहे. सन १८८२ पासून त्याला क्वेटा जिल्ह्याचे भाडे सालीना २५००० रुपये व बोलन घाटांतील जकातीबद्दल ३०००० रुपये, नुस्खी नियाबतीबद्दल ९००० रुपये (१८९९) व नसिराबाद तहशिलीबद्दल ११७५०० रुपये (१९०३) दरसाल मिळतात.
(२) हा इराणचा एक प्रांत सूनअ यांत बलुचिस्तानचा पश्चिमेकडील भागाचा समावेश होतो. इराणी बलुचिस्तानचे क्षेत्रफळ सुमारे ६०,००० चौरस मैल असून अरबी समुद्राच्या उत्तर किना-यावर हा देश आहे. याच्या पूर्वेस ब्रिटिश व स्वतंत्र बलुचिस्तान, उत्तरेस सीस्तन व मध्य इराणी वाळूचे मैदान व पश्चिमेस कर्मन आहे. या देशांत पाणी नसून याच्या फारच थोडया भांगात जमीनीची लागवड होते. बाकीचा भाग वाळूचे मैदान, व टेकडया यांचा रुक्ष प्रदेश आहे. मश्कीड व बम्पूर या नद्या यांत आहेत. हा देश कर्मनचा एक राजकीय विभाग आहे. येथील लोकसंख्या २,००,००० पेक्षा कमी आहे. १८४९ त इराणी लोकांनी बम्पूर घेईपर्यंत हा प्रांत स्वतंत्र होता. स. १८७२ पर्यंत पूर्वेच्या जिल्ह्यांवर इराणी सत्ता स्थापिली गेली नव्हती.