विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बल्लारी, जिल्हा - मद्रास इलाख्यांतील अगदी पश्चिमेकडील चार जिल्ह्यांपैकी एक. याचे क्षेत्रफळ ५७१३ चौरस मैल. संदूर संस्थानच्या भागाखेरीज जंगल फारसे नाही यामध्ये मुख्य नदी तुंगभद्रा आहे. या जिल्ह्यातील तुंगभद्रेस येऊन मिळणारी मुख्य नदी 'हगरी' अथवा वेदवती होय दुसरी लहान नदी 'चिक्का हगरी' कित्तानरूजवळ तुंगभद्रेस मिळते. येथे एक जुनी सोन्याची खाण आहे. जिल्ह्याची हवा अगदी कोरडी असल्यामुळे निरोगी आहे.
या प्रदेशावर पश्चिम चालुक्य, होयसळ, बल्लाळ, विजयानगर व नंतर मुसुलमान, मराठे हैदर यांचा अंमल क्रमाने होता व पुढे हा ब्रिटिश अंमलाखाली आला. मद्रास इलाख्यांत बल्लारी जिल्ह्यांतच जुन्या पुष्कळ वस्तू सांपडतात, या दृष्टीने रायदुर्ग तालुक्यांत गोलापल्ली फार महत्वाचे आहे, कारण तेथे जुनी भांडी वगैरे फार सांपडतात. जैन देवळे फार आहेत, पश्चिम तालुक्यांत चालुक्यांचीं देवळे फार आहेत. अदवानी, बल्लारी रायदुर्ग व इतर कांही ठिकाणी जुने डोंगरी किल्ले फार महत्वाचे आहेत. परंतु जिल्ह्यांत अनेक महत्त्वाच्या जुन्या वस्तू हंपीजवळ विजयानगरच्या पडिक भागांत आढळतात.
लोकसंख्या (१९२१) ८६२३७० शें. ५७ लोक कानडी व शे. ३० तेलगू बोलतात. हिंदूंपैकी तेलगू अथवा कानडी आहेत. मुख्य धान्ये, चोलम व कोरा ही आहेत. मुख्य धंदे कापूस व रेशीम विणणे. शिक्षणाच्या बाबतीत मद्रास इलाखांत सर्वांत मागसलेला जिल्हा हाच आहे. सुमारे शेकडा ५ लोकांना लिहितावाचता येते.
ता लु का - मद्रास इलाख्यांत बल्लारी जिल्ह्यांतील पूर्वेकडील तालुका. क्षेत्रफळ ७०५ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) ११९२२४. या तालुक्यांत बल्लारी व शिरगुप्पा ही दोन शहरे असून १५६ खेडी आहेत. अगदी दक्षिण भागाखेरीज जमीन सपाट आहेत.
श ह र. - लोकसंख्या १९२१ साली ३९८४२ होती. हे सदर्न-मराठा रेल्वेवर असून मद्रासपासून ३०५ मैल आहे. इंग्रजांनी हे क्यान्टोनमेंट करीपर्यंत किल्ल्याशिवाय याचे महत्व नव्हते. हे हनुमान अप्पा नाईकांचे राहण्याचे ठिकाण होते, ते विजयानगरच्या राजांचे व नंतर विजयापूरच्या सुलतानांचे सेवक होते. त्याच्यापासून १६४८ साली शिवाजीने हा किल्ला घेतला, परंतु पुन्हा खंडणी देण्याच्या अटीवर परत केला. स. १७६१ च्या सुमारास अदवानीच्या बसालतजंगास नाइकांस खंडणी द्यावी लागली, परंतु ती नाकारल्यामुळे वेढा पडला. तेव्हा नाईकाने हैदरअल्लीची मदत मागितली, हैदरने अदवानीच्या सैन्याचा पराभव केला व किलज १७९२ सालापर्यंत म्हैसूरच्या ताब्यांत होता. तो टिप्पूनंतर निजामाकडे गेला. निजामाने १८०० साली इंग्रजांस इतर मुलुखाबरोबर हें शहर दिले. १८४० हे कलेक्टराचें मुख्य ठिकाण झाले. येथे बरीच हायस्कुले आहेत. १८६७ साली येथे म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथे बरेच जिन व प्रेस असून एक साखरेचा कारखानाहि आहे.