विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बव्हेरिया - सांप्रतच्या जर्मनीतील एक प्रांत. पूर्वी हे १०० वर्षेपर्यंत स्वतंत्र राज्य होते. बाराव्या शतकांत पुढें आलेल्या विटेल्सबाच या राजघराण्याचे राज्य या प्रांतावर आतांपर्यंत होते. येथील मूळचे लोक केल्टिक वंशीय असून त्यांना रोमन लोकांनी जिंकिले होते. (ख्रि.पू. १ ले शतक) यांच्यात पुष्कळ जातीची भेसळ झाली असून त्यांत गॉथिक व केल्टिक यांच्यातील ७-८ शाखा मिश्र झाल्या आहेत. यांचा पहिला ऐतिहासिक लेखी उल्लेख एका फ्रॅंकिश दस्तऐवजांत (५२० सालच्या) आढळतो. यांच्यावर फ्रॅंकिश राजांचा अंमल ५५५ ते ७८८ पर्यंत झाला. यांच्यावेळी कायदे कानू प्रथम करण्यांत आले. रोमन लोकांच्या वेळेपासून ख्रिस्ती धर्म पसरत चालला, परंतु इ.स. ६९६ मध्ये त्याल जास्त जोर आला. पुढे शार्लमेनच्या राज्यांत हा देश समाविष्ट झाला व त्यांनतर कारोलिर्जिअन साम्राज्यांत सामील झाला (८१७) व शेवटी जर्मनीच्या राज्यांत ओटो दि ग्रेट यानें त्याचा समावेश केला (९३८). तेव्हापासून थोडयाबहुत फरकाने हा देश जर्मनीच्या बादशहाच्या ताब्यांत गेला व तो महायुध्दापर्यंत होता.
१९१० - १२ सालामध्ये बव्हेरियाची अंतःस्थ राजकीय स्थिति फारच घोंटाळयाची झाली. १९१२ साली प्रिन्स रीजंट लुइट फोल्ड हा वारला व त्याच्या जागी लुई हा प्रिन्स रीजंट झाला. याच्या कारकीर्दीत, रीजन्सी मोडून त्या जागी 'स्वतंत्र राज्य' स्थापन करण्याची चळवळ सुरू होऊन १९९३ सालच्या मार्चमध्ये बव्हेरिया हे रीजन्सी नसून स्वंतत्र राज्य असल्याचे जाहीर करण्यांत आले.
महायुध्दाच्या अमदानीत जर्मनीमध्ये जिकडे तिकडे महर्घता जाणवू लागल्यामुळे खालच्या वर्गांत फार असंतोष पसरला, बव्हेरियामध्ये बंडाची चिन्हे दिसूं लागली. या अंसतुष्ट वर्गाचा पुढारी आयनर यानें लढाई थांबविण्यासाठी व बव्हेरियांतील राजशाही उलथून पाडण्यासाठी चळवळ सुरू केली (१९१८ नोव्हेंबर). सर्व मजूरवर्गाची व सोशालिस्ट लोकांची जंगी सभा भरून बव्हेरियांतील राजघराण्याच्या हातांतील सत्ता नष्ट करण्याचे व 'स्वतंत्र संस्थान' स्थापन करण्याचे ठरले. या सभेच्या पूर्वीच कांही दिवस बव्हेरियाचा राजा हा म्यूनिच सोडून गेला होता. बव्हेरिया रिपब्लिक झाल्याबरोबर, आयनर यानें मंत्रिमंडळ बनविले. पण थोडक्याच दिवसांत त्याचा खून झाला. त्यानंतर बव्हेरियांतील मवाळ-सोशालिस्ट व बोल्शेव्हिक मताचे सोशालिस्ट यांच्यामध्ये भयंकर झगडा सुरू झाला व त्यांत शेवटी मवाळ सोशालिस्ट यांचा विजय होऊन त्यांच्या हातांत पूर्ण सत्ता आली.
१९१९ सालच्या आगस्टच्या १४ व्या तारखेस बव्हेरियाची नवीन घटना अंमलांत आली. या घटनेने बव्हेरिया हे स्वतंत्र संस्थान बनले व सर्व सत्ता लोकांच्या हातांत आली. २० वर्षावरील सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यांत आला. राज्यकारभार चालविण्याकरतां एक डायेट निवडण्यांत आले. या डायटेला काढून टाकण्याचा अगर त्याच्यांत बदल करण्याचा लोकांना अधिकार आहे. डायेटतर्फे प्रधानमंडळ निवडण्यांत येते. एखादे लोकप्रिय बिल डायेटने नापास केल्यास, सर्व मतदाराचीं मते घेऊन ते बिल मंजूर अगर नामंजूर करावयाचे असे ठरविण्यात आले. चर्च व संस्थान ही अलग ठेवण्यांत आली आहेत.
बव्हेरियाची लो.सं. १९१९ साली ७१४०३४० होती व क्षेत्रफळ ३०५६२ चौरस मैल होते. १९२० साली बव्हेरिया मध्ये कूबर्ग या स्वतंत्र संस्थानचा अंतर्भाव करण्याचा ठराव करण्यांत आला. १९२३ साली २२६०८८२९८४३० मार्कांचे उत्पन्न व २५५०८८२९९८४३० मार्कांचा खर्च होता. बव्हेरिया हे स्वतंत्र संस्थान असले तरी ते जर्मन साम्राज्याच्या छत्राखालीच आहे.