विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बस्तर – मध्यप्रांतांतील संस्थान. क्षेत्रफळ १३०६२ चौरस मैल. संस्थानच्या मधला व वायव्येकडील भाग फार डोंगराळ आहे. पूर्वेस उत्तरेकडून व दक्षिणेपर्यंतच्या लांबीच्या २/३ सपाट मैदान आहे, इंद्रावती, साबरी, तेल या नद्या आहेत, नैर्ॠत्येकडील जंगलात साग पुष्कळ आहे. हवा थंड असून आरोग्यकारक आहे, उष्णमान १०२० पर्यंत चढते.
येथील राजाचे घराणे फार जुने आहे. हे सोमवंशी रजपुतांचे आहे असे सांगतात. प्रथमतः वरंगळ येथे हे होते, परंतु अशी दंतकथा आहे की, या घराण्यास चवदाव्या शतकाच्या आरंभी मुसुलमानांनी तेथून हुसकाऊन दिल्यामुळे ते येथे आले. या घराण्याचा मूळ पुरुष आनमदेव असून दंतेश्वरीच्या कृपेने बस्तर येथे त्याने सत्ता प्रस्थापित केली, हीच देवता अद्याप या घराण्याचे कुलदैवत आहे. तिने दिलेली तरवार अद्याप तेथे आहे. शंकानी व दंतानी नद्यांच्या संगमावर दंतेंवार येथे देंवाच्या देवळांत पूर्वी दरवर्षी स्वीड लोकांप्रमाणे नरमेध करीत असत. मराठयांच्या काळांत बस्तर स्वतंत्र होते, परंतु १८ व्या शतकांत नागपूर सरकारने त्यावर खंडणी बसविली. याच वेळेस बस्तर व जवळचेंच मद्रासेंतील जेपूर या संस्थानांमध्ये पुष्कळ वर्षेपर्यंत भांडण चालू होते ते ब्रिटिश सरकारने मिटविले. मागील राजा भैराप्पदेव हा स. १८९१ मध्ये आपल्या ५२ व्या वर्षी वारला. कित्येक वर्षेपावेतो संस्थानांत व्यवस्था चांगली नसल्यामुळे स्थानिक सरकारने आपला अधिकारी निवडून त्यास स. १८८६ मध्ये तेथील दिवाण नेमिले, त्या राजाचा रुद्रप्रतापदेव नांवाचा लहान मुलगा त्याच्या गादीचा वारस झाला.
संस्थानचे उत्पन्न सुमारे ६ लाख आहे. स. १९२१ मध्ये लोकसंख्या ४६४४०७ होती. २/३ लोक गोंड आहेत, व पुष्कळ हालबे आहेत. सर्व प्रांतांत अगदी रानटी लोक म्हटले म्हणजे बस्तरमधील गोंड होत. काही भागांत अद्याप ते कपडे वापरीत नाहीत. कमरेभोवती कटदोरा बांधतात व त्यास मणी लावले असतात. बोलण्याची मुख्य भाषा हालबी आहे, ही हिंदी, उडिया व मराठी यांच्या मिश्रणाची आहे. उडियापासून झालेली भात्री भाषा शें. ६ व तेलगू शें ७ लोक बोलतात. जमीन सुपीक आहे. मुख्य पीक तांदूळ आहे. लोखंड उत्तम त-हेचे व विपुल सांपडते, अभ्रकाचे मोठमोठाले पत्रे जंगालीजवळ सांपडतात. इंद्रावती व पश्चिमेकडील दुस-या काही लहान नद्यांत थोडेसे सोने सांपडते. मुख्य रस्ते जगदालपूरपासून धमतरी, जेपूर व चांद्यापर्यंत आहेत. व्यापाराचा सर्व माल धमतरी स्टेशनवर जातो. संस्थानात ५० वर शाळा आहेत. जगदालपूर येथे एक इंग्रजी शाळा आहे.