विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बस्ती - केवळ वात किंवा वायु जास्त आहे असे दोष दुष्ट असता, बस्ती देणे हे आयुर्वेदांत सर्व उपचारांत श्रेष्ठ समजतात. अष्टांगसंग्रहकार वृध्द वाग्भटानी या बस्तीचे फारच माहात्म्य वर्णिले आहे. त्यांच्या मते वायूवर मग तो वायु शरीरांत कोठेहि दुष्ट झालेला असो बस्ती हे एकच औषध आहे. सर्व रोंगात वातरोगच पुष्कळ असल्यामुळे चिकित्सेचे निम्मे काम एकटा बस्ती करतो. इतकी अतिशय उपयुक्त असलेली बस्तीची चिकित्सा हल्ली अगदी क्वचित वेळीच करण्यांत येते. व एखाद्यासच ती माहीत आहे. हल्लीच्या एनिम्याप्रमाणे बस्ती देणे सोपे नाही कारण नुसता मल काढण्याकरिता जसा एनिमा उपयोगांत आणतात तसाच बस्तीचा उपयोग नाही. बस्तीने शरीरांतील वातदोषावर परिणाम करावयाचा असतो. व त्याकरिता कित्येक वेळी तीक्ष्ण व रुक्ष औषधे मोठया प्रमाणांत मलद्वाराने शरीरांत घालावी लागतात. ती शरीरांत शोषण झाली आणि त्याचा परिणाम वाईट झाला तर मृत्यूहि येतो; याकरिता रोगहारक बस्ती देणारा वैद्य फार कुशल लागतो एरव्ही अपाय होतो. जितका बस्तीने गुण येतो तितकाच अकुशलतेने अपाय होत गेल्यामुळे मधल्या काळांत ही चिकित्सा लुप्तप्राय झाली असावी. हल्ली कोठे कोठे कुशल वैद्यांनी पुन्हां या चिकित्सेची सुरवात केली असून तींत यशहि येत आहे.
पूर्वी बोकडाच्या मूत्राशयाचा उपयोग बस्तीसाठी करीत असत म्हणून या विधीस बस्ती हे नावं पडले (''बस्तिना दीयते इति बस्तिः'') याचे तीन प्रकार आहेतः-निरुह, अनुवासन व उत्तर, पैकी पहिले दोन गुदद्वाराने द्यावयाचे व तिसरा मूत्रमार्गाने द्यावयाचा; किंवा स्त्रियांस अपत्यमार्गाने देण्याचा निरुह व अनुवासन यांत अनुक्रमे रुक्ष व स्निग्ध औषधे देणे एवढाच फरक आहे व औषधांच्या प्रमाणांतहि फरक आहे.
वयाच्या मानाने कमी जास्त लांबीची नळी बोकडाच्या मूत्राशयास अगर त्या आकाराच्या चामडयाच्या अगर जाड कापडाच्या फुग्यास लावून ती नळी गुदद्वारांत योग्य प्रमाणांत घालून फुग्यांत घातलेले औषध नळीच्या द्वारे गुदद्वारांत घालतात. सकाळी मलमूत्रशुध्दी झाल्यावर मिताहार करवून सायंकाळी सहा घटिका दिवसास हा बस्तिविधी करतात. अनुवासन बस्तीपेक्षा निरुह बस्तीच्या वेळी फारच जपावे लागते, याकरिता दोन तीन कुशल वैद्य जमून हा बस्ती द्यावा. याची औषधे तयार करण्याविषयी बरेच नियम आहेत. व त्यापासून वाईट लक्षणे दिसतात त्यांवर पुष्कळ उपाय सांगितले आहेत.
बस्ती दिल्यावर ऊन पाण्याने स्नान घालून मांसरसाबरोबर भात जेंऊ घालावा. म्हणजे श्रमपरिहार होतो. मूत्राशयाच्या किंवा गर्भाशयाच्या वातविकारांत उत्तर-बस्ती देतात. त्याकरिता लागणारी नळी त्या मार्गाप्रमाणे करावी.