विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहरैच, जिल्हा - संयुक्त प्रांतातील, फैजाबाद विभागाचा, वायव्येकडील जिल्हा. क्षेत्रफळ २६४७ चौरस मैल. या जिल्ह्यांतून गोघ्रा व राप्ती या नद्या वाहतात. जंगल व झाडी पुष्कळ असल्यामुळे यांत वाघ, चित्ते, अस्वले, खोंकड, रानटी डुक्कर, सांबर, हरणे, नीलगायी वगैरे श्वापदे आढळतात. येथील हवा सर्द आणि गोघ्रा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशापेक्षा थंड असून मलेरियाची आहे.
इतिहासः- ब्रह्मदेवाने स्वतःला राहण्यासाठी हा जिल्हा पसंत केला होता अशी एक दंतकथा आहे. दुस-या दंतकथेप्रमाणे हा भाग कर्णाच्या राज्यांत होता असे दिसते. ऐतिहासिक कालाच्या आरंभी यावर उत्तरकोसल राजांचा अंमल असून त्यांची राजधानी श्रावस्ती येथे होती. येथे गौतम बुध्दाने बरेच दिवस काढले असें म्हणतात, पण ते अद्याप सिध्द झाले नाही.
बहरैच गांवाजवळ १०३३ मध्ये, सालार मसूद नांवाच्या मुसुलमान साधूची एका राजाबरोबर लढाई झाली होती. मुसुलमानी अंमलामागून सन १८५६ त हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यांत आला.
बौध्द लोकांच्या वेळचे अवशेष कांही ठिकाणी सांपडले आहेत. सय्यद सालारचे प्रसिध्द थडगे बहरैच गांवाच्या उत्तरेस सुमारे २ मैलावर आहे. १९२१ मध्ये लोकसंख्या १०६५३७७ होती. लोकसंख्येची वाढ होतच आहे. शें. ८१ लोक हिंदु आहेत बहुतेक लोक अवधी भाषा बोलतात.
बहरैचची बहुतेक जमीन चिकणमातीची आहे. व नद्यांच्या कांठच्या प्रदेशात गाळ सांचल्याच्या योगाने जमीन सुपीक झालेली आहे. स्थानिक उपयोगाकरिता, ब-याच गांवांतून कापड तयार करतात. बुरुणूस, कांबळी, केसाळ चटया वगैरे जिन्नसहि थोडेबहुत तयार होतात. पूर्वी काही ठिकाणी कातकाम चांगले होत असे. धान्य, रानांतील उत्पन्न, गळिताची धान्ये व अफू हे आयात जिन्नस आणि कापड, मीठ, साखर व भांडी हे निर्गत जिन्नस आहेत. शे. ३.१ लोकांनां लिहिता वाचता येते.
गां व - हे नार्थ-वेस्टर्न रेल्वेचे स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारे २५ हजार. येथे सय्यद साला मसूर याची कबर आहे. रेल्वेस्टेशन झाल्यापासून येथील व्यापार वाढत आहे.