विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बहावलपूर, संस्थान - हे देशी संस्थान पंजाबात आहे. क्षेत्रफळ १५००० चौरस मैल. येथे वार्षिक पाऊस ५ इंचापेक्षा ज्यास्त क्वचितच पडतो. सिंधशिवाय इतर ठिकाणची हवा बहुधा निरोगी असते. बहावलपूरच्या राजघराण्याचे पूर्वज अब्बासी दाऊदपुत्र हे ईजिप्तच्या अब्बासी खलिपांचे वंशज होत. प्रथम ह्या लोकांनी सिंधमधून येऊन दुराणी राज्याच्या कारकीर्दीत स्वातंत्र्य मिळविले. रणजितसिंग प्रबळ झाल्यावर त्याजपासून स्वतःचे संरक्षण करण्याविषयी तिस-या महंमद बहावलखानाने इंग्रजांची मदत मागितली. बहावलपूरशी पहिला तह १८३३ साली, म्हणजे रणजितसिंगाबरोबर सिंधुनदीवरील व्यापाराची व्यवस्था लावण्यासंबंधी तह झाल्यावर पुढील वर्षी झाला. त्या तहान्वयें नबाबाला आपल्या राज्यांत पूर्ण स्वातंत्र्य मिळाले, व सिंधू आणि सतलज या नद्यांवरील व्यापार खुला झाला. हे संस्थान व इंग्रज सरकार यांच्यामधील हल्लीचे संबंध १८३८ सालच्या तहाने ठरलेले आहेत. सध्या सादिक महंमदखान (वय वर्षे २१) नबाब आहे. बहावलपूरच्या नबाबाला १७ तोफांची सलामी मिळते.
या संस्थानची लोकसंख्या १९२१ साली ७८११९१ होती. शेकडा ८३ लोक मुसुलमान आहेत. तीनचतुर्थांश लोक मुलतानी किंवा बहावलपुरी भाषा बोलतात. येथील मुख्य जाती जाट, रजपूत व बलुची या होत. या जिल्ह्यांतील मुख्य पिके गहू, तांदूळ, कडधान्य व हरभरा ही होत. रेशमी लुंगी (पागोटी) व रेशमी कापड येवढेच कायते महत्त्वाचे जिन्नस या जिल्ह्यांत होतात. या संस्थानांत व्यापार खुला आहे, कारण ब्रिटिश सरकारशी झालेल्या तहान्वये आयातनिर्गत मालावरील जकात बंद झाली आहे. नार्थ वेस्टर्न रेल्वेचा लाहोर-कराची फांटा या संस्थानांतून गेला आहे. समसत येथे या फांटयाला सदर्न पंजाब रेल्वेचा फांटा मिळतो.
राज्यव्यवस्थेकरितां संस्थानचे बहावलपूर, मिंचिनाबाद आणि खानपूर असे तीन विभाग केलेले आहेत. यांना निजामती असे म्हणतात. या संस्थानांतील मुख्य गांवे बहावलपूर, पूर्वअहमदपूर, खानपूर, पश्चिम अहमदपूर व खैरपूर ही होत, पैकी बहावलपूर ही संस्थानची हल्लीची राजधानी आहे. संस्थानचा कारभार स्वतः नवाब पहातो. त्याला सल्ला देण्याकरिता एक मंत्रिमंडळ आहे. संस्थानचा रेसिडेंट पतियाळा येथे रहातो.
१९२०-२१ सालांत या संस्थानचे एकंदर उत्पन्न सुमारे ४४॥ लाख रूपये होते. या संस्थानांतील लष्करची संख्या १३२१ आहे. १९०१ साली या संस्थानांतील शेकडा २.८ (पुरुषांपैकी शेकडा ५.१ व बायकांपैकी शेकडा १ लोकांना लिहितावाचता येत होते.
गांव - राजधानीचे ठिकाण. हे सिंधुनदीच्या दक्षिण तीरावर असून नार्थ वेस्टर्न रेल्वेचे स्टेशन आहे. लोकसंख्या १८ हजार. हे शहर पहिला नबाब बहावलखान याने वसविले. याच्याभोवती चार मैल लांबीची मातीची भिंत आहे. राजवाडा व नूरमहाल (पाहुण्यांकरिता गृह) ह्या येथील मोठया इमारती होत. येथून ५ मैलावंर सतलज नदीवर नॉर्थ वेस्टर्न रेल्वेचा ४२५८ फूट लांबीचा पूल आहे. ह्या गांवांत एक कॉलेज व एक हायस्कूल आहे. येथे व्यापार बराच चालतो.